शेवटची फडफड...

 विवेक मराठी  07-Jun-2019

जय श्रीराम अशी घोषणा देणे हा गुन्हा ठरवत ममता बॅनर्जी यांनी या घोषणेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला. ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेवर देशभरातून टीका होत असून त्यांना हजारो पोस्टकार्डे पाठवली गेली आहेत. कायम दुराग्रहाच्या आणि अहंकाराच्या कोषात जगण्याची सवय लागलेल्या ममता बॅनर्जी यांना जनमत कोणत्या दिशेला वळले आहे आणि आगामी काळात त्याचे काय परिणाम होतील हे कळत नसेल असे म्हणणे धाडसाचे होईल. भाजपाद्वेष, हिंदू समाजाची अवहेलना याच केंद्रबिंदूभोवती फिरणाऱ्या ममता बॅनर्जींच्या राजकारणाला लागलेली ही उतरती कळा आहे का?


मे महिन्याच्या तेवीस तारखेला सतराव्या लोकसभेचा निकाल लागला आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले. नरेंद्र मोदींना अशा प्रकारचे बहुमत मिळेल अशी विरोधी पक्षांना खातरी नव्हती. या निकालाने, पंतप्रधान होण्याचे अनेकांचे स्वप्न लयास गेले. त्यापैकी एक नाव म्हणजे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होय. प. बंगालमध्ये दीर्घकाळ डाव्या विचारांची सत्ता राहिली होती. ती संपवत ममता बॅनर्जी यांनी - तृणमूल काँग्रेसने सत्ता हस्तगत करून आपला डेरा जमवला. सत्ता संपादन केल्यावर मात्र राज्यकारभार करताना ममता बॅनर्जींनी डाव्यांचा मार्ग स्वीकारला. सत्तेच्या जोरावर एकाधिकारशाही आणि भ्रष्टाचाराचे कुरण तयार करण्यात ममता बॅनर्जी आघाडीवर राहिल्या. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत. मागच्या सहा-सात महिन्यांपासून ममतांच्या द्वेषपूर्ण व्यवहाराचा आणि ढळलेल्या मानसिकतेचा प. बंगालला आणि देशाला अनुभव येत आहे.

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी विवेकचे फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन मोदी आणि भाजपाविरुध्द शड्डू ठोकत होते, त्यात ममता सर्वात पुढे होत्या. प्रचारासाठी भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांना प. बंगालमध्ये प्रवेश करण्यास अटकाव करणे, सभेला परवानगी न देणे अशा अनेक मार्गांनी भाजपाला थोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीत भाजपाचे अठरा खासदार निवडून आले. प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या गडाला खिंडार पाडण्यात भाजपाला यश आले. लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचे आमदार, नगरसेवक भाजपामध्ये दाखल झाले. प. बंगालमध्ये भाजपाला मिळणारे वाढते जनमत पाहता ममता बॅनर्जी यांचे पित्त खवळणे स्वाभाविक होते. एका बाजूला होम पीचवर होणारी जनाधारातील घट आणि दुसऱ्या बाजूला भाजपाचा वाढता प्रभाव यामुळे ममता मुख्यमंत्रिपदाचा गरिमा विसरून गेल्या आणि त्यांच्या मनात खूप दिवसांपासून साचून असणारा द्वेष उफाळून आला आहे. त्यांनी मोदींचा, भाजपाचा विरोध करण्यासाठी सर्वसामान्य मतदाराच्या, नागरिकांच्या भावनांशी खेळ खेळण्यास सुरुवात केली.

केंद्र सरकारला कोणत्याही प्रकारे सहकार्य करायचे नाही या दुराग्रहावर त्या ठाम राहत केंद्र सरकारची 'आयुष्मान भारत योजना' राबवण्यासही त्यांनी नकार दिला आहे. आपल्या राजकीय खेळीचा भाग म्हणून आयुष्मान भारत योजनेला विरोध करून त्या प. बंगालच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहेत. ज्या मतदारांनी इतकी वर्षे ममतादीदी म्हणत त्यांची पाठराखण केली, ते मतदार आज आपल्यापासून का दुरावत आहेत? हे समजून घेण्याचा प्रयत्न न करता ममता बॅनर्जींनी भाजपावर आरोप करण्याचे सत्र आरंभले आहे. केवळ आरोप करून त्या थांबल्या नाहीत, तर गुंडगिरी करत भाजपाची कार्यालये ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एका कार्यालयाच्या बाहेर भाजपाचे पक्षचिन्ह पुसून ममता बॅनर्जी त्यावर आपल्या पक्षाचे चिन्ह रंगवत आहेत अशी एक चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. लोकसभा निवडणुकीआधी आणि नंतर अनेक भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. या साऱ्या गोष्टींचा विचार केला, तर ममता बॅनर्जींना काय झाले आहे? त्या अशा विकृत व्यवहार का करताहेत? असे प्रश्न उपस्थित होतात. प. बंगालच्या आगामी काळातील विधानसभा निवडणुका आणि दूर होत जाणारा जनाधार यामुळे ममता बॅनर्जींचे मानसिक संतुलन पुढील काळात अधिक बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल, तसतसा ममता बॅनर्जी मानसिक विकृतीचा नीचांक गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यावर कोणीतरी 'जय श्रीराम' अशी घोषणा देतो आणि ममता बॅनर्जी यांना त्याचा त्रास होतो. त्या घोषणा देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचे आदेश देतात. एकूण काय, तर जय श्रीराम अशी घोषणा देणे हा गुन्हा ठरवत ममता बॅनर्जी यांनी या घोषणेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला. ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेवर देशभरातून टीका होत असून त्यांना हजारो पोस्टकार्डे पाठवली गेली आहेत. कायम दुराग्रहाच्या आणि अहंकाराच्या कोषात जगण्याची सवय लागलेल्या ममता बॅनर्जी यांना जनमत कोणत्या दिशेला वळले आहे आणि आगामी काळात त्याचे काय परिणाम होतील हे कळत नसेल असे म्हणणे धाडसाचे होईल. भाजपाद्वेष, हिंदू समाजाची अवहेलना याच केंद्रबिंदूभोवती फिरणाऱ्या ममता बॅनर्जींच्या राजकारणाला लागलेली ही उतरती कळा आहे का?

एका बाजूला ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची वेगाने घटणारी लोकप्रियता आणि कमी कमी होत जाणारा जनाधार, तर दुसऱ्या बाजूला भाजपाचा वाढता जनाधार अशा परिस्थितीचा आढावा घेतला, तर भविष्यातील प. बंगालचे राजकारण वेगळया स्वरूपाचे असेल हे सांगायला कोणत्याही राजकीय पंडिताची आवश्यकता नाही. प. बंगालच्या मतदारांनी आपली बदललेली दिशा स्पष्ट केली आहे. त्यांना प. बंगालमध्ये द्वेष आणि एकाधिकारशाही राबवणाऱ्या ममतादीदी नको आहेत. या पार्श्वभूमीवर, आगामी विधानसभा निवडणुका डोळयासमोर ठेवून ममता बॅनर्जी यांनी जरी प्रशांत किशोर यांना जवळ केले असले, तरी त्याचा त्यांना व पक्षाला किती फायदा होईल हे आज सांगता येणार नाही. कारण ममता बॅनर्जींच्या राजकारणाला प. बंगालची जनता विटली आहे. आपल्या अस्तित्वरक्षणासाठी नीती-अनीतीचा विचार न करता ममता बेलगाम व्यवहार करत आहेत. ही त्यांची शेवटची फडफड तर नाही ना?