ज्ञान प्राबोधिनी, हराळी माणूस घडविणारे बेट

 विवेक मराठी  06-Jan-2015


****स्नेहा शिनखेडे****

 'शिक्षण' या विषयावर मंथन सुरू झाले की माझ्या मनश्चक्षूंसमोर एक प्रसंग तरळू लागतो. समाजातील एका बडया उद्योगपतींनी समाजऋणाची जाणीव ठेवून कृतज्ञता पुरस्कार सुरू केला. समाजासाठी निरपेक्ष आणि नि:स्वार्थी सेवा करण्यासाठी पुरस्काराच्या माध्यमातून त्यांनी निधी द्यायला सुरुवात केली. उपक्रम छान, सुयोग्य होता. पुरस्कार समारंभानंतर स्नेहमिलन अर्थात गेटटुगेदर असायचे. त्यात समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी होते. एक वर्षी असेच सारे जण जमले होते. गप्पागोष्टी रंगात आल्या होत्या आणि नेहमीप्रमाणे जिथे तिथे प्लॅस्टिक कचरा जमा होत होता. कडक इस्त्रीचा पोशाख असलेला सेवातत्पर सेवकवर्ग तो उचलतही होता. ते बघून चार वर्षांचा एक लहान मुलगा इकडेतिकडे झपाझप फिरत हे काम करू लागला. कचरा गोळा करून टोपलीत जमा करू लागला. भोवतीचे लोक संकोचले, सावध झाले. दुर्गम, छोटया खेडयात समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचा तो नातू होता. त्याची अबोल कृती, समज सर्वांना जीवन शिक्षणाचा धडा शिकवून गेली. तिथे जमलेली बहुसंख्य मंडळी परदेशात शिकून आलेली होती. तेथील शिस्तीपेक्षा त्यांच्या वागणुकीतून पैसाच अधिक बोलत होता. शिक्षण आणि आचरण यामधील दरी स्पष्ट करत होता.

बाजारात एक शुभेच्छापत्र दाखल झाले आहे - 'अमुक एका प्रतिष्ठित शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळाल्याबद्दल अभिनंदन.' शिष्यवृत्ती, कला, संस्कृती, खेळ आणि दहावीची सर्वोच्च गुणांची टक्केवारी असे विविध विभागात प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी ज्या शाळेत असतील, ती शाळा उत्कृष्ट असे निकष ठरून गेले आहेत. विद्यार्थ्यापेक्षा प्रमाणपत्राला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. हा बदलता काळप्रवाह विलक्षण ओघाने पुढे जातो आहे. त्यात अवघी शैक्षणिक मूल्ये वाहून जात आहेत. स्पर्धेमागे सारे शैक्षणिक जग धावत असताना एखादी शाळा जेव्हा स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करीत 'रंग माझा वेगळा' अशी ओळख करून देते, तेव्हा तिची दखल घ्यावीच लागते. ज्ञान प्रबोधिनी, शाखा हराळी ही अशीच शाळा आहे. ही शाळा म्हणजे प्रेरक, माणूस घडविणारे स्वतंत्र असे बेट आहे.

ज्ञान प्रबोधिनी शाळेची स्थापना

हराळी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील लहानसे गाव - म्हटले तर खेडे. धरणीआई कोपली अन् भूकंप झाला, तेव्हा हराळी संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले. जीवितहानी झाली नाही हे सुदैव. तरी गावचा नकाशा बदलला. सारी घरे पडली. लोकांनी भौतिक सारे गमावले. उदास आणि सुन्न मने पाठीपोटाशी घेऊन कुणीतरी मदतीला येईल या आशेने वाटेकडे डोळे लावून बसलेल्या गावकऱ्यांकडे शासनव्यवस्थेने पार दुर्लक्ष केले. पुढे काय? या प्रश्नावर अचानक उत्तर सापडले ते आदरणीय डॉ. व.सी. ताम्हणकर उर्फ ती. अण्णा यांच्या रूपाने. अण्णांची आश्वासक पावले हराळीत उमटली आणि गावाला पुनर्जन्म लाभला. विष-अमृत या खेळात खाली बसलेल्या निष्क्रिय मुलाच्या डोक्यावर अमृताचा हात ठेवला की तो जसा ताजातवाना होत सक्रिय होतो, तसेच इथे घडले. अण्णांचा अमृतमय हात डोक्यावरून फिरायचा अवकाश, की गावात चैतन्य पसरले. श्रम सहकार्याच्या माध्यमातून गाव त्या त्या छोटया व्यवसायासह नांदू लागले. समस्या होती ती शिक्षणाची. शाळेचा प्रश्न उभा राहिला. गावामधल्या मुलांनी शिकायला कुठे जायचे? बाहेर शिकायला जाणे सोपे नव्हते. अशक्य होते म्हणून आणि सरस्वतीची उपासना हराळीत सुरू व्हावी, या हेतूने 1995मध्ये ज्ञान प्रबोधिनी या शाळेची स्थापना झाली. सुरुवातीला पडक्या देवळात, ओसरीत भरणाऱ्या शाळेला आज स्वत:ची सुंदर, देखणी वास्तू - नव्हे, ज्ञानमंदिर लाभले आहे. हा प्रवास कष्टमय असला, तरी आनंद वाढविणारा आणि मूल्यांची रुजवण करणारा होता.

त्रिवेणी शिक्षणपध्दती

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत असलेली ही शाळा निसर्गाच्या सान्निध्यात ज्ञानसाधनेत मग्न आहे. ही निवासी शाळा आहे. दोनशे चाळीस मुले निवासी, तर एकशे पंचवीस मुले हराळीतून आणि जवळपासच्या गावातून येतात. ज्ञान प्रबोधिनीच्या सर्वच शाळांप्रमाणे हीसुध्दा विनाअनुदानित शाळा आहे. ज्ञान प्रबोधिनी निगडी येथील शाळा फक्त अपवाद आहे. ती शासन अनुदानित असली, तरी तिने स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. ज्ञान प्रबोधिनीचे मा. संचालक गिरीशजी बापट म्हणाले की, ''शिक्षकांसाठी आव्हान आणि स्वातंत्र्य महत्त्वाचे असते. एक्स्पोजर कॅन चॅलेंज. ज्ञान प्रबोधिनीने त्रिवेणी शिक्षणपध्दतीचा अवलंब केला आहे. पर्यावरण, ज्ञान-विज्ञान, रूप पालटू देशाचे अशा विविध उपक्रमांद्वारे अभ्यासक्रम शिकवला जातो. विचारप्रक्रिया सुरू असते. रूप पालटू देशाचे म्हणताना त्यासाठी देशाचे आजचे स्वरूप कळले पाहिजे. त्रिवेणी शिक्षणपध्दती सर्वांसाठी आहे. तिच्यावर कुणाचा मालकी हक्क नाही. आज घडीला तीस शाळा त्रिवेणी शिक्षणपध्दतीचा पाठपुरावा करीत आहेत.''

ज्ञान प्रबोधिनी हराळीमध्ये अभ्यासक्रम शिकविताना विविधता तर आहेच, शिवाय जगण्याचे शिक्षण देणारे पायाभूत असे अनेक उपक्रम आहेत. श्रमप्रतिष्ठा हे मानवाच्या जगण्याचे सार्थक असलेले, परंतु आजच्या विज्ञानयुगात हरवत चाललेले मूल्य इथे जाणीवपूर्वक मुलांच्या मनात पेरले जाते. गेली अनेक वर्षे हराळीला संकुलात लहान-मोठे सारे श्रमकार्यात सहभागी होत असतात. त्यामुळे कामांना गती मिळते. श्रमदान असे न म्हणता श्रमकार्य असा शब्द इथे योजला आहे. त्यापेक्षा अधिक चांगला शब्द म्हणजे श्रमसाधना. तो इथे चपखल बसतो. कुठलेही अभियान असो - त्याचे रूपांतर शेवटी नित्यकर्मात व्हायला हवे, यावर शाळेचा कटाक्ष आहे. श्रम हे प्रतिष्ठेचे लक्षण समजून त्याचे रोज आचरण करण्यावर भर आहे. शाळेचा संकल्प आहे की, रोज कमीत कमी पंधरा मिनिटे श्रमकार्य झाले पाहिजे. ज्ञान प्रबोधिनी हराळी व येथील विश्व साकारले ते या श्रमकार्यातून. म्हणून त्याचे महत्त्व सगळे जाणतात. आनंदाने, निरपेक्षपणे, साधना म्हणून रोज इथे श्रमकार्य चालते. श्रमकार्याला शिस्तीचा बांध घातल्यामुळे हा उपक्रम नेटाने चालतो, हे विशेष. कृतिशील शिक्षण हा पाया असल्यामुळे कार्य नेहमी पुढे पुढे जाते. एकदा येथील गटार तुंबले होते. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. ते साफ करण्यासाठी कुणी समोर येईना. हे बघून ती. अण्णांनी स्वत: ही सफाई मोहीम हाती घेतली. त्यांची ही कृती बघून विद्यार्थी सरसावले. संकोच, लाज सोडून इतरही काही जण कामासाठी धावून आले आणि गटारामध्ये अडकून फुगून सडलेल्या मोठया घुशी त्यांनी बाजूला केल्या. स्वच्छता हाच परमेश्वर हा संस्कार असा रुजला.

संस्कारमूल्ये व विद्याभ्यास यांचा संगम

ज्ञान प्रबोधिनीत विद्याव्रत संस्कार समारंभ संपन्न होत असतो. पूर्वी उपनयन संस्कार असायचा. मुलांच्या वयाच्या एका टप्प्यावर झालेल्या या संस्काराचे पडसाद त्याच्या संपूर्ण आयुष्यावर उमटायचे. हळूहळू याचे स्वरूप बदलले. रूढींचा पगडा एवढा तीव्र झाला की, हा संस्कार फक्त मुलांपुरता, विशिष्ट जाती-धर्मापुरता मर्यादित झाला. संस्कारमूल्य पुसले जाऊन फक्त श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन घडविणारा समारंभ तेवढा उरला. विद्याव्रत संस्कार हे उपनयन संस्काराचेच अद्ययावत रूप आहे. आठवी आणि पुढच्या - म्हणजे समजू लागलेल्या वयाच्या - सर्व जातीधर्माच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी हा संस्कार केला जातो. ही विद्येची उपासनापध्दत आहे. शिक्षण पूर्ण होईपर्यंत सर्व व्यसने, प्रलोभने यापासून दूर राहून फक्त विद्याभ्यास आणि संयमित जीवन जगण्याचा संकल्प विद्यार्थी अग्नीच्या साक्षीने करतात. हा संस्कार मराठीतून केला जातो. यात सर्वांना सामावून घेतले जाते. या व्रताचे प्रतीक म्हणून आपआपल्या उपासना पंथाचे पवित्र चिन्ह-यत्रोपवित, तुलसीमाला, ॐकार, क्रॉस, ताईत धारण करतात. यात विद्यार्थी सहा व्रते स्वीकारतात. त्याचे विषय असे - 1) शरीर सतेज सुंदर 2) मन सुदृढ पवित्र 3) दशपैलू बुध्दी 4) इंद्रियसंयमन - चांगल्या सवयींची शक्ती 5) दैनंदिन उपासना 6) राष्ट्र अर्चना या विषयांवर आधारित व्याख्याने होतात. विद्याव्रत संस्काराची पोथी कै. अप्पाजी पेंडसे यांनी लिहिलेली आहे. ती अर्थसंपन्न आणि सुंदर आहे. हे सर्व विषय सोपे करून सावकाश स्पष्ट केलेजातात. या शाळेत 'समाजदर्शन' या अभिनव उपक्रमाद्वारे निरनिराळे कार्यक्रम होत असतात. शाळेतील पहिली ते दहावीच्या मुलांचे 51 गट तयार करून विविध 'चरित्रदर्शन' 51 शाळांमध्ये सादर करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जीवनगाथा आसपासच्या माकणी, उमरगा, लाहोरा येणेगुर, तावशीगड, अणदूर जळकोट या गावात, तर दस्तापूर, फनेपूर, समुद्राळ, कोराळ अशा लहानशा गावात हजार लोकांच्या समुदायासमोर धीटपणे सादर करण्यात आली. मुलांमध्ये असलेले अभिनय, गायन आणि नेतृत्व हे गुण त्यातून प्रकर्षाने सामोरे आले. या उपक्रमांतर्गत हिप्परगा येथे स्वामी रामतीर्थ यांची जीवनकथा त्यांच्या मूळ गावी सादर करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई आणि जोतिबा यांच्या जीवनावर आधारित 'सुंबरान' धनगर गीताचा प्रकार सादर केला. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात शिक्षकांसह सेविका व इतरही कामात सहभाग असणाऱ्या सर्वांना सामील करून घेतात. त्यामुळे त्यांना संधी मिळते व त्यांच्या गुणांचे चीज होते. ते सामोरे येतात. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळाशाळांमध्ये आणि मुलांमध्ये गीते, नाटय यांचे छान आदानप्रदान होते. हराळी परिसरातील 51 शाळांमध्ये या उपक्रमाने चैतन्याची लहर सळसळली. शाळांचा परिवार बांधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मोठया स्वप्नांच्या दिशेने टाकलेले हे छोटे पाऊल आहे. शिक्षणामध्ये जिवंतपणा, चैतन्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, मूल्यांची जाण निर्माण करून एक नवा परिवार तयार व्हावा ही इच्छा आहे. 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती' या भावनेसह त्यांचे दिव्यत्व, जीवनतत्त्व शिक्षणात आणि आचरणात उतरवायचे आहे. रोजच्या जीवनात मातृभूमीचे स्मरण, या भूमीतील वंचितांचे स्मरण आणि त्यांच्यासाठी नि:स्वार्थीपणे काम करण्याची गरज आहे. त्यासाठी ही तळमळ आहे.

ज्ञान प्रबोधिनी हराळी येथील निवासी शाळेचे वैशिष्टय म्हणजे मुलांवर होणारे उत्तम संस्कार. निसर्गाच्या सान्निध्यात, शिस्तीत आणि डॉ. स्वर्णलताताई भिशीकर यांच्यासारख्या प्रेममूर्तीच्या छत्रछायेखाली ही मुले मोठी होतात. इथे संस्काराची छान रुजवण होते. ती. अण्णांनी मुलांसाठी सोपी 14 सूत्रे तयार केली. त्यांच्याकडून म्हणवून घेतली. ती अशी - 1) आम्ही स्वच्छ राहू आणि परिसर स्वच्छ ठेवू. यामुळे खरेच परिसरात कुठेही घाण, कचरा दिसला नाही. 2) आम्ही वस्तूंचा आदर करू, त्या चांगल्या रितीने वापरू. यामुळे वस्तू जागच्या जागी सापडतात, वेळही वाचतो. 3) आम्ही दुसऱ्यांच्या वस्तू वापरणार नाही. वेगवेगळया घरांतून, गावांतून आलेल्या मुलांना या संस्कारांची खूप गरज होती. 4) आम्ही कष्ट करण्यात कधीही कसूर करणार नाही. या सूत्रामुळे बांधकामावर पाणी मारणे, शेतात ठिबक सिंचनाच्या नळया बांधणे, शौचालय साफ करणे, विटा कामाच्या जागी नेऊन ठेवणे ही कामे मुले हौसेने करू लागली. 5) अन्न हे पूर्णब्रह्म आहे. आम्ही अन्न वाया घालवणार नाही. एकदा मुलांची सहल जाणार होती. सर्व मुले घाईत, उत्साहात होती. त्यामुळे नाश्ता करताना त्यांनी शिस्त पाळली नाही. ताटलीत, जमिनीवर पोहे सांडले. हे पोहे एकत्र जमवून लताताई म्हणाल्या, ''नव्वदीत असलेले माझे आई-वडील आणि मी आता हा तुमचा सांडलेला, वाया गेलेला नाश्ता प्रसाद म्हणून खातो.'' हे ऐकून मुले खजील झाली आणि या सूत्राचे कसोशीने पालन करू लागली. 6) आम्ही वेळ पाळायला शिकू. या सूत्रामुळे मुले उपासनेला आणि शाळेत वेळेवर येतात. 7) आम्ही दिलेला शब्द पाळू. या सूत्राने शब्दांचे वजन वाढते. त्याचबरोबर लहान मुलालासुध्दा मोठे महत्त्व प्राप्त होते. 8) आम्ही कोणत्याही प्रकारची चोरी करणार नाही. या सूत्रामुळे परीक्षेत कॉपी होत नाही. 9) आम्ही कोणतेही व्यसन करणार नाही. दारू पिऊन कामावर आलेल्या कामगारांना खावा लागलेला मार मुलांनी बघितला आहे. सहनिवासमध्ये चहा न देता प्रबोधिनीमधल्या गायींचे ताजे दूध दिले जाते. 10) आम्ही जागेपणी मौन पाळायला शिकू. हे सूत्र सर्वांसाठी जरा कठीणच. 11) मला काय त्याचे? ही वृत्ती सोडून देऊ. यामुळे परस्परांमध्ये जिव्हाळा, प्रेम निर्माण होते. आधार वाटून एकोपा वाढतो. 12) आम्ही चांगल्या सवयींची शक्ती मिळवू. यामुळे व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडतात. 13) आम्ही चपला ओळीत ठेवायला शिकू.. हे सूत्र अण्णा स्वत: आचरणात आणतात. त्यामुळे मुले आपोआपच शिकतात. 14) आम्ही वीज व पाणी यांचा काटकसरीने वापर करू. हराळीत पाणीप्रश्न तीव्र स्वरूपाचा आहे. जणू काही जलयुध्दच. एका वर्षी सुकून चाललेल्या रोपांना पाणी मिळावे म्हणून अण्णांसह साऱ्यांनी आंघोळीची गोळी घेतली. पाणी रोपांना दिले. सूत्रांची जपवणूक आणि आचरण यामुळे संस्काराची मुळे इथे घट्ट रोवली आहेत.

मन आणि मनगट मजबूत हे प्रमुख ध्येय

मन आणि मनगट मजबूत असावे, हे शाळेचे ध्येय आहे. प्रबोधिनीच नेहमी परदेशी पाहुणे येत असतात. अशीच एकदा खेन ही इस्रायलची मुलगी हराळी येथे आली होती. मुलांनी तिचे उत्तम स्वागत, आदरातिथ्य केले. तिच्याकडून शिकून तिला आपलेसे केले. यासाठी लताताईंनी मुलांचे अभिनंदन करून मुलांना एक प्रश्न विचारला, ''गोऱ्या रंगाचे आपल्याला आकर्षण असते. आपल्या मनात गोऱ्या लोकांविषयी आदरयुक्त धाक आणि उत्सुकता, कुतूहल असते. ते स्वाभाविक आहे. परंतु जर काळया रंगाचे एखादे विदेशी पाहुणे आपल्याकडे आले, तर तुम्ही त्यांचे असेच स्वागत कराल का?'' या प्रश्नाला मुलांनी उत्तर दिले. नंतर एका मुलाने लताताईंना पत्र पाठवले. त्यात त्याने एक संस्कृत श्लोक लिहिला. त्याचा भावार्थ असा होता की, 'एखादी गाय - मग ती काळी, गोरी, तपकिरी कोणत्याही रंगाची असो - ती दूध तर पांढरेच देते ना? तिच्यात कुठलाही भेदभाव नसतो. ज्ञान प्रबोधिनीत शिकणाऱ्या मुलांच्या मनात माणसाच्या बाह्य रंगापेक्षा त्याचे अंतरंग ठसत असते. तुम्ही आणि अण्णा यांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांच्या मनात असे काही कसे उगवेल? तुम्हाला असा प्रश्नच का पडावा? या कोडयाचे उत्तर मला सापडत नाही.' हे पत्र वाचून लताताईंचे अंत:करण भरून आले आणि मुलांसाठी चाललेली धडपड, तळमळ सत्कारणी लागते आहे, या विश्वासाने त्यांचे मन निश्चिंत झाले. निवासी शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या थोरल्या बहिणीने पत्र पाठवून सांगितले की, हराळीमध्ये शिकायला गेलेल्या तिच्या लहान भावामध्ये आमूलाग्र फरक झाला आहे. वक्तशीर, स्वावलंबी सकाळी लवकर उठून उपासना, वाचन याची त्याला गोडी निर्माण झाली आहे. त्याच्यात 70% सुधारणा झाली आहे.

शेतीपासून ते तंत्रज्ञानाचा अभ्यास

हराळीच्या केंद्र उपप्रमुख डॉ. स्वर्णलताताई म्हणाल्या, ''नवी पिढी सर्वार्थाने साक्षर होते आहे. मुलेच आता त्यांच्या आईवडिलांच्या वाईट सवयी काढून टाकीत आहेत. उदा. तंबाखू, दारू. पूर्वी इथे लहान मुलींची लग्ने होत. शाळेत येणाऱ्या लहान मुलींच्या गळयात काळी पोत असे. आता हे दृश्य दिसत नाही. इथे शिकलेल्या मुलीचे लग्न होऊन ती सासरी गेली तरी शिक्षणाचा वस्तुपाठ तिच्या आचरणात दिसतो. ती घरकामाव्यतिरिक्त स्वत:ची नवी ओळख कामातून निर्माण करते. बागकाम करून फुलांची, फळांची शेती करणे किंवा घराभोवती कोथिंबीर, मेथी व तत्सम भाज्यांची लागवड करून हातभार लावते. त्यात तिलाही आनंद मिळतो. कारण येथील शिक्षणाचा पायाच मुळी व्यवसायाभिमुख आहे. पुस्तकी शिक्षण तर आहेच, शिवाय परिसर शिक्षणामधून मुले समृध्द होत आहेत. इथे कृषी विद्यालय आहे. स्वत:ची स्वतंत्र रोपवाटिका आहे. आपले घर, परिसर सोडून मुलांना पोटापाण्यासाठी बाहेर शोधाशोध करावी लागत नाही. हे खूप महत्त्वाचे आहे. ती शहराकडे धावत सुटत नाही. स्वत:चा रोजगार ते निर्माण करतात.''

हराळीच्या विनाअनुदान, विनाशुल्क शाळेसाठी अर्थबळ नेहमीच उभे करावे लागते. यासाठी तिथे वृक्षांची फळशेती उभी केली आहे. पेरू, बोरे, आंबे, लिंबू, चिंच, काजू अशा फळविक्रीतून उत्पन्न मिळते. पाणीप्रश्न तीव्र असल्याने पाण्याचे रिसायकलिंग इथे होते. इथे तीन शेततळी आहेत. सौर प्रणाली, गोबर गॅस, प्रबोधन रोपवाटिका, सेंद्रिय शेती त्यात वेगवेगळे प्रयोग होतात. इथे असलेल्या कृषी विद्यालयात पाणी, माती परीक्षण व शेतीविषयी इतर आधुनिक तंत्रज्ञान शिकविले जाते. या सगळया प्रयोगाची ओळख आणि शिक्षण शालेय विद्यार्थ्यांना मुद्दाम दिले जाते. हीच त्यांच्या भविष्याची पायाभरणी म्हणू या. ही मुले पुढे आपापल्या गावात जातील, तेव्हा नित्य नवीन उगवणाऱ्या समस्यांतून पळवाट न काढता त्यातून तोडगा शोधतील आणि त्यातून नूतन गाव उभारणीसाठी मदत करतील, असा शाळेचा विश्वास आहे. 26 फेब्रुवारी हा विज्ञानदिन साजरा होते. तो ग्रामीण विश्वातील प्रकल्पाशी निगडित असाच असतो. गाव-गाव, शाळा-शाळा असा पूल बांधीत नव्या शिक्षणाशी प्रयोग इथे होतात.

मुलांना नापास न करता पुढील वर्गात ढकलायच्या शासनाच्या धोरणामुळे आठवीच्या मुलांना साधी सहीसुध्दा करता येत नाही, हे लक्षात आले, म्हणून त्यांच्यासाठी शिबिरे भरविली जातात. पहिली ते सातवीच्या मुलांसाठी लेखन, वाचन यासंबंधी हसत-खेळत शिक्षणाचे प्रयोग होतात. संगीत विभाग हा येथील ठळक विशेष आहे. अभंगगीत गायन, निरनिराळया भाषांमधील स्फूर्तिगीते, प्रार्थना, मातृभूमीची आरती मुले सुरात म्हणतात. त्यामुळे मुलांच्या मनात सात्त्वि भावना जागृत होते. तिचा साऱ्या जगण्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. शनिवारी सकाळी मुले मौन धारण करतात. यामुळे एकाग्रता वाढते. वृत्ती अंतर्मुख होते.

श्रीगणेश उपासना व विसर्जन मिरवणूक हे शाळेचे ठळक वैशिष्टय आहे. कमी शिकलेल्या लोकांसाठी गणेशपूजेची छोटी, सोपी मराठी पोथी तयार करण्यात आली आहे. 150 ते 200 मुलांचे गट तयार करून ही मुले आसपासच्या गावात जाऊन पूजा, आरती करतात. गणेश उत्सवाचा खरा संदेश पोहोचवतात. भव्य, सुंदर, शिस्तबध्द अशी मिरवणूक निघते. यामुळे एकसंघ राष्ट्रनिर्माणाची जाणीव मनात निर्माण होते. त्यातून समाजप्रबोधन होते. सारे प्रवाह एकमेकांत मिसळून जातात आणि मुख्य म्हणजे मनाचे एकत्रीकरण होते. हे मनोमिलन सुंदर वाट निर्माण करते.

इथे जवळ वाटेगावात रामोशी समाज आहे. त्यांच्याजवळ अप्रतिम कलाकौशल्य आहे. मराठी पारंपरिक कला एवढी उत्कृष्ट आहे की डोळयांचे पारणे फिटते. शस्त्र फिरविण्यासारख्या त्यांच्या कलेला राष्ट्रीय क्रीडा खेळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शालेय विद्यार्थ्यांना या सगळया प्रकाराची ओळख करून दिली जाते. शहरातील मुले अशा कौशल्य खेळापासून वंचित राहतात.

ज्ञान प्रबोधिनी हराळी ही शाळा म्हणजे शिक्षणतीर्थ आहे. भारताचा प्राचीन आध्यात्मिक वारसा पुढे नेऊन त्यात काळानुसार (मर्म जपून) बदल घडवीत जाणारी ही शाळा म्हणजे तुमच्याआमच्यासाठी मोठा दिलासा आहे. ती. अण्णांसारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, आदरणीय लताताईंसारख्या वात्सल्यसिंधू मूर्तीच्या छत्रछायेत, शिस्तीत आणि स्वप्नांच्या परिपूर्तीसाठी धडपडणाऱ्या अनेक जणांच्या एकोप्याने, सामंजस्याने शाळा बहरते आहे. भारतापुढील नवी आव्हाने सहज पेलणारे मनगट अन् मन इथे घडते आहे.


गणित, विज्ञान किंवा आधुनिक तंत्रज्ञान यात ही मुले किती झेप घेतील याचा अंदाज आत्ता बांधता येणार नाही कदाचित, परंतु या मुलांजवळ माणुसकीचे दुर्मीळ शिक्षण आहे. त्यात त्यांनी प्रावीण्य मिळविले आहे. मातृभाषेचा आग्रह, स्वत:च्या गावाबद्दल, माणसांबद्दल मन:पूर्वक आदर, प्रेम, मातृभूमीविषयी कमालीचा जिव्हाळा त्यांच्या मनात आहे. गावाच्या, परिसराच्या विकासाकरता झटणारी ही मुले म्हणजे भारताचा उज्ज्वल भविष्यकाळ आहेत. प्राणिविश्वावर, चराचरातील चैतन्यावर या मुलांचे मनापासून प्रेम आहे. येथील बरीच मुले सर्पमित्र आहेत. इथे सर्वांचा गणवेश सारखा आहे. त्यात पदानुसार भेदभाव नाही. मुलामुलींसाठी कामाची निराळी विभागणी नाही. सारे एका पातळीवर राहून एकमेकांविषयी आदर बाळगून एकमेकांचा स्वाभिमान जपतात.

शैक्षणिक प्रयोगांचा अभ्यास आणि रचना तयार झाली, तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यासू, सर्जनशील असा शिक्षकवृंद लागतो. कधी एखादा प्रयोग अयशस्वी होतो, तेव्हा नाउमेद न होता त्याची पुनर्बांधणी करावी लागते. सुदैवाने तन-मन-धनाने शाळेशी समरस होणारा असा शिक्षकवर्ग ज्ञान प्रबोधिनीला लाभला आहे. शिक्षकांच्या प्रबोधनासाठी इथे नेहमी शिबिरे होतात. तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत असते.

वा.ना. उत्पात अण्णांविषयी म्हणतात, ''अण्णांचे मन भगवे पण गणवेश गुलाबी आहे. वृत्ती संन्यस्त आहे; परंतु जीवन रसिक आहे. म्हणून चरैवेती, चरैवेती हा संन्याशाचा मंत्र ते आचरत आहेत.'' तर विवेक घळसासी लताताईंबद्दल म्हणतात, ''लताताईंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला अंतर्बाह्य व्यापून टाकणारा एक स्वर आहे. 'बिन तडजोडीची राष्ट्रभक्ती'. लताताईंच्या जगण्यातून राष्ट्र वजा करा, काही शिल्लक राहणार नाही.'' अशी दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे हराळीच्या ज्ञान प्रबोधिनी शाळेचे सारथ्य करीत आहेत. त्यामुळे शाळेच्या मंदिराचा कळस नेहमी झळाळत राहणार आहे.

ती. अण्णांच्या मनात शाळेसाठी नवे प्रयोग सुरू करण्याची कृतिशील तळमळ सदैव असल्यामुळे ते नवे नवे प्रयोग सुचवीत असतात. सौर आणि संगणक विद्याकेंद्राची उभारणी, यंत्रशाळा, तंत्रज्ञान शिक्षण, मोबाइल दुरुस्ती प्रशिक्षण, पंपदुरुस्ती केंद्र अशा नव्या योजना त्यांना सुरू करायच्या आहेत. या शाळेतून शिक्षण घेऊन मुले जेव्हा बाहेर कॉलेज शिक्षणासाठी जातात, तेव्हा आजही त्यांच्यात नेतृत्वगुण व्यक्तिमत्त्वाची ठळक जाणीव आढळते. ती वाढवावी हा शाळेचा प्रयत्न आहे. लहान, निरागस मूल मोठे होत गेले की त्याच्यामधले कोवळेपण, निष्पापता हरवून जाते. त्याला जबाबदार मोठी माणसे असतात. अनिल अवचट एका कवितेत म्हणतात,

वय त्यांचे होते मोठे। सुरू होतो मग अभ्यास

दप्तर मार्क वा नंबर। सुरुवात होई दु:खास

बाल्यावर चाले छिन्नी। सुंदर ते होई सपाट

डोक्यात कोंबतो आम्ही। आपुल्या जगातील दोष

एवढे तरी करावे। पोरांना ठेवू पोर

जमले तर आपण व्हावे। त्या पोरांमधले पोर

ज्ञान प्रबोधिनी हराळी शाळेत पोरांमधले पोर झालो तर खजिना (कधीतरी मनातच गुप्त झालेला) सापडू शकतो. हराळी हा परिसर, तेथील शेतशिवार फेरी उपक्रम, भविष्यकालीन योजना, विकासाभिमुख, विज्ञानदृष्टी असणारे प्रकल्प आणि मुख्य म्हणजे माणसे, माणुसकी, जिव्हाळा हे सारे शब्दांत मावत नाही. ते अनंत आहे. ते अनुभवायलाच हवे. सुहृदांनी भेट देऊन कृतार्थ व्हावे
ही इच्छा.

9823866182