.
 
चालू अंक
इथे क्लिक करा.
 
'जिणे गंगौघाचे पाणी'

चिरतरुण कवी बा.भ.बोरकर यांच्या स्मरणदिनानिमित्त, ८ जुलै रोजी पुण्यात 'जिणे गंगौघाचे पाणी' हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागॄहात संपन्न झाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि काव्याचे कंगोरे विविध कला माध्यमातून उलगडून दाखवणार्‍या या कार्यक्रमाविषयी--

'नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी', 'जीवन त्यांना कळले हो', 'गडद निळे गडद निळे जल भरुनि आले', 'झिनिझिनि वाजे बीन' अशा विविध लयीतल्या, नादपूर्ण, भावपूर्ण कविता देणारे कवी म्हणजे बाळकॄष्ण भगवंत बोरकर. त्यांच्या ६ दशकांच्या काव्यप्रवासावर प्रकाशझोत टाकायचा प्रयत्न करणे म्हणजे एक धाडसंच! पण 'विवेक व्यासपीठ', 'आमी गोयंकार' आणि 'संवाद' या संस्थांनी हे धाडस केले. कवीवर्य बोरकर यांच्या जन्मशताब्दीवर्षात आणि तेही त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांनी 'जिणे गंगौघाचे पाणी' हा कार्यक्रम केला. चित्रकला, गायन, काव्यवाचन, गद्यवाचन आणि समीक्षण या विविधांगी कलाप्रकारांमधून कवी बोरकर लोकांसमोर उभे करणे ही या कार्यक्रमाची महत्त्वाची बाजू म्हणावी लागेल.

ज्येष्ठ समीक्षक अरुणा ढेरे यांनी आपल्या अमोघ शैलीत बोरकरांच्या निळ्या रंगावरच्या-निळेपणावरच्या कविता, संतांच्या जाणिवांवरच्या कविता यांचे विश्लेषण रसिकांसमोरे केले. कवी बा.भ.बोरकर यांनी दीर्घ आणि समॄद्ध अशी काव्यपरंपरा जपली आहे हे उद्गार त्यांच्या मुखातून येताच रसिकांकडून त्याला तत्क्षणी प्रतिसाद मिळाला.

ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी या कार्यक्रमात बोरकरांच्या 'ज्ञानदेव गेले तेव्हा...' या कवितेवर आधारित चित्र काढायचा आणि ते त्यांच्या परिने समजून द्यायचा प्रयत्न केला व तो सफलही झाला. ही कविता शब्दरुपात सादर केली अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी! राहूलजींनी काव्यवाचन केल्यानंतर अर्धा तास अन्य कलाकार आपली कला सादर करत असतानाही बहुलकरजी आपल्या एकाग्रतेने ज्ञानदेवांचे रूप साकारत होते.

कवीवर्य बोरकर यांच्या काही कविता खूप लोकप्रिय गीतांच्या रूपात आपल्या लक्षात आहेत. त्यातले 'झिनिझिनि वाजे बीन' हे गीत भार्गवी काळे हिने सादर केले. तर लोकप्रिय संगीतकार-गायक सलील कुलकर्णी याने बोरकर यांच्या काही कवितांना स्वतः दिलेल्या चाली सादर केल्या. यात 'तव नयनांचे दल हलले गं', 'आयुष्याची आता झाली उजवण' ही गीते होती. तर त्यांनी चाल लावलेले 'माझ्या कानाबाई वाजे अलगुज' हे गीत ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांनी सादर केले. नाट्य रंगभूमीवरचे मान्यवर कलाकार रामदास कामत यांनी 'संशयकल्लोळ' या नाटकातील भूमिका साभिनय सादर केली. कवी बोरकर हे गोव्यातले. त्यामुळे त्यांनी मराठी प्रमाणेच त्यांचे कोकणी भाषेवरही प्रेम. त्यांनी 'संशयकल्लोळ' या नाटकाचे कोकणी भाषांतर केले. त्यातले एक पदही कामत यांनी सादर केले. बोरकर यांची काही कोकणी गाणी सादर केली निशा पारसनीस यांनी! भाषेचा अडसर न मानता, लयचालीला दाद देत याही गाण्याचा आनंद पुणेकर रसिकांनी मनमुराद लुटला.

पुणेकरांचा आवडता कवी संदिप खरे याने बोरकर यांच्या काही कविता स्वतःच्या शैलीत सादर केल्या, तर राहुल सोलापूरकर यांनी बोरकर यांच्या 'गोव्याची ओढ' या लेखाचे, तसेच 'माझ्या गोव्याच्या भूमीत' या कवितांचे वाचनही केले. बोरकर म्हणजे काय, हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर आधारित काही चित्रफितींचा आधारही घेण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटाला बहुरुपी पु.ल.देशपांडे यांनी कवीवर्य बोरकर यांच्याबद्दल काढलेले उद्गार सर्वांना ऐकता आले, तर प्रत्यक्ष कवी बोरकर यांच्या मुखातून आलेली त्यांचीच ' समुद्र बिलोरी ऐना' ही कविता दॄकश्राव्य माध्यमातून रसिकांना पाहता आली. संवादच्या उत्तरा मोने आणि प्रमोद बापट यांनी सूत्रसंचालन केले.