'पारतंत्र्याच्या श्रृंखला तुडल्यावर येणारा स्वर हा सर्वात मधूर असतो,' असे सांगणारे, क्रंातीचा जयजयकार करणारे आणि सागरालादेखील त्याच्या पामरपणाची जाणीव करून देणाऱ्या कुसुमाग्रजांचे हे जन्मशताब्दी वर्ष. आजच्या संक्रमणाच्या काळात कुसुमाग्रजांच्या स्मृतींना उजाळा देण्याची, त्यांच्या साहित्याचा जागर करण्याची आवश्यकता आहे. तरुण पिढीला उर्जा देणारी त्यांची कविता, समाजाचे अचूक चित्रण करणारी त्यांची नाटके या सर्वांना पुन्हा आठवण्याची आणि नव्या पिढीला या श्रेष्ठ साहित्यिकाची ओळख करून देण्याची गरज आहे.
म्हणूनच विवेक व्यासपीठने 'एक किरण सूर्याचा' या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. तात्यासाहेबांच्या म्हणजेच कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासाची मांडणी प्रसिध्द कवयित्री अरुणा ढेरे यांच्या वैशिष्टयपूर्ण संहितालेखनातून झालेली आहे. विनोद पवारांच्या दिग्दर्शनाने कार्यक्रम आणखीनच रंगतदार झाला आहे. गिरीश साळवी यांनी तात्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार, वेडात मराठे वीर ही गीते, स्पृहा जोशी, संजय मोने यांच्या काव्यवाचनाने कार्यक्रमाला एक उंची प्राप्त झाली आहे. कमलेश भडकमकर यांचे संगीत संयोजन, शीतल तळपदे यांचे प्रकाश संयोजन आणि अजित दांडेकर यांचे नेपथ्य यांमुळे कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली आहे.
'एक किरण सूर्याचा' या कार्यक्रमाचा आगामी प्रयोग डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाटयगृह येथे 27 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता होणार आहे तर पुण्यामध्ये कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृहामध्ये सायंकाळी 5 वाजता होणार आहे. |