चिखलगावची शाळा नव्हे 'प्रयोग'शाळा

विवेक मराठी    06-Jan-2015
Total Views |


*****अश्विनी मयेकर*****

 काही व्यक्तींसारखी काही गावंही भाग्य घेऊन जन्माला येत असावीत... चिखलगावी जाऊन आल्यावर असं म्हणावंसं वाटतं. जेमतेम दोनशे उंबऱ्यांचं हे गाव, कालपरवापर्यंत लोकांना माहीत होतं ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं जन्मगाव म्हणूनच! विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या गावाच्या लौकिकात भर घालणारी एक गोष्ट घडली. पंचक्रोशीतच नव्हे, तर राज्यात, देशात कौतुकाचा विषय ठरलेली शाळा इथं उभी राहिली. या गावच्या सुपुत्राचं कृतज्ञ स्मरण म्हणून त्याच्या नावाने उभी राहिली... ती शाळा म्हणजे रेणू दांडेकर आणि डॉ. राजा दांडेकर या दांपत्याने उभारलेली लोकमान्य टिळक विद्या मंदिर. आज हे गाव ओळखलं जातं ते टिळकांचं जन्मगाव आणि लोकमान्य टिळक विद्या मंदिर, या दोन गोष्टींसाठी...

डॉ. राजा दांडेकरांचा जन्म याच परिसरातला. दारिद्रयाचे चटके सोसत वैद्यकीय पदवीपर्यंतचं शिक्षण जिद्दीने पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांनी शिकत असतानाच ठरवलं होतं की, नोकरी-व्यवसाय न करता खेडयात परतायचं आणि पिढयानपिढया ज्ञानापासून वंचित राहिलेल्यांसाठी शाळा काढायची. डॉक्टरांचं ध्येय आपल्या विचारांशी मिळतंजुळतं आहे, हे रेणूताईंच्या लक्षात आलं आणि या प्रवासात त्यांनी सहधर्मचारिणी बनून साथ द्यायची ठरवली. हा प्रवास रेणूताईंनी इतका तादात्म्यभावाने केला की, लोकमान्य टिळक विद्या मंदिर म्हणजे रेणूताईंची शाळा, असं लोक म्हणू लागले.

हे विद्येचं मंदिर म्हणजे प्रयोगशाळा आहे. सरकारी अनुदान स्वीकारल्यानंतरही एखाद्या शैक्षणिक संस्थेला आपलं स्वातंत्र्य कसं जपता येतं याचा वस्तुपाठ असणारी... नित्यनूतन, जिवंत-रसरसत्या अनुभवांची प्रयोगशाळा...

शाळा सुरू करण्यासाठी दांडेकर दांपत्य जेव्हा चिखलगावात आलं, तेव्हा दापोली ते दाभोळ पट्टयातल्या सुमारे 30 किलोमीटर परिसरात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. परिणाम एकच-मुलांच्या आयुष्यातून शाळा हद्दपार. मग या शिक्षण थांबलेल्या मुलाने मुंबईत चाकरमानी व्हायचं आणि घरी बसलेल्या मुलीचे दोनाचे चार हात व्हायचे.

हे वास्तव लक्षात घेऊन गावाकडच्या मुलांना गावाकडेच थांबायला प्रवृत्त करणं, त्यासाठी त्यांना उपजीविकेचे समाधानकारक मार्ग दाखवणं, त्याकरता योग्य ते शिक्षण-कौशल्य प्रशिक्षण देणं या हेतूने चिखलगावात शाळा सुरू झाली. मुलांमधलं कौशल्य विकसित करताना शालेय अभ्यासक्रम आणि अन्य बाबतीतली सरकारी चौकट स्वीकारायची. मात्र त्यात राहून काम करतानाही प्रयोगशीलता जपायची, तिचा वसा मुलांपर्यंत पोहोचवायचा हे दोघांच्या मनात नक्की होतं.

एकूणच त्या काळात या भागात शाळेबाबत उदासीनता असल्याने, मुलं गोळा करण्यापासूनच कामाला सुरुवात करावी लागणार होती. डॉक्टरांचं मूळ गाव जवळपासच्या परिसरात असलं तरी चिखलगावासाठी ते 'पावणे'च! आणि रेणूताई वाईच्या... कोकणातली लाल माती आणि तिथलं जनजीवन या सगळयाशी काही परिचय नसलेल्या. तिथल्या माणसांच्या दृष्टीने ही घाटावरची बाई... त्यामुळे सुरुवातीच्या काळात परकेपणाची एक अदृश्य भिंत मध्ये उभी होती. ही भिंत भेदून जवळ जाणं, त्यांना आपलंसं करणं आणि या प्रयोगशील शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं हे अवघड आणि आव्हानात्मक होतं. पण कसदार शिक्षण देण्याची तळमळ, नेमकं काय करायचं आहे याचं भान, आणि त्याला असलेली सर्जनशीलता-प्रयोगशीलतेची जोड यामुळे ही आव्हानं समर्थपणे पेलता आली.

घराघरात जाऊन मुलांना शाळेत पाठवायचं आवाहन करावं लागलं. सातवीच्या पुढचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे ते पटवून दिलं, तेव्हा कुठे पहिल्या वर्षी आठवीसाठी सहा मुलं आली. लग्न होण्यापूर्वी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकी करणाऱ्या रेणूताई आठवीच्या मुलांना शिकवू लागल्या. ही शाळा सुरू झाली एका गोठयात.

शासनाने नेमून दिलेली पाठयपुस्तकं ही आधाराला, त्यावर भर नाही की भिस्त नाही. या शालेय अभ्यासाबरोबरच वर्गाच्या चार भिंतींबाहेर दिलं जाणारं शिक्षण हे महत्त्वाचं, हा विचार पहिल्या दिवसापासून पक्का होता. 30 वर्षांच्या वाटचालीत तो अधिकच दृढ होत गेला, तो इतका की प्रयोगशीलता हीच या शाळेची मुख्य ओळख बनली. याचं श्रेय अर्थातच डॉक्टरांचं-रेणूताईंचं आणि त्यांच्या या स्वप्नाला समूर्त करण्यासाठी त्यांच्या बरोबरीने वाट चालणाऱ्या त्यांच्या शिक्षकवर्गाचंही...

प्रयोगाच्या नाना परी...

केवळआपलं विचारस्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ नये, म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक प्रयोगशील शाळा सरकारी अनुदान घेत नाहीत. या पार्श्वभूमीवर, सरकारी अनुदान स्वीकारत, पाठयपुस्तकांचा कमीत कमी आधार घेत आपली प्रयोगशीलता जपणारी आज तरी ही एकमेव शाळा आहे. 'इच्छाशक्ती प्रबळ असली की ना सरकारी नियमांचा काच होतो, ना त्यांचं बंधन वाटतं. किंवात्यावरून संबंधित सरकारी अधिकाऱ्यांबरोबर मतभेदही होत नाहीत. उलट सरकार कोणाचंही असलं तरी सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हांला कायम मदत केली आहे, आमच्या प्रयोगांविषयी आस्थाच दाखवली आहे,' अशी रेणूताईंची या मुद्दयावर प्रतिक्रिया...


सुरुवातीला शाळेत आजच्यासारखी तंत्रशाळा नव्हती, पण त्यामुळे प्रयोगशीलतेला कुठे बाधा आली नाही. त्या वेळी शाळेत येणाऱ्या मुलांना आंब्याची कलमं कशी बांधायची, हिरापासून झाडू कसे बांधायचे याचं प्रशिक्षण देण्यात येत असे. कोकणातल्या या पिढयानपिढयांच्या उद्योगापासून मुलं दूर जायला लागली होती. त्यांना त्यांच्याकडच्या कौशल्याची जाणीव करून देणं आणि ते कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करणं गरजेचं होतं.

त्या वेळी एक वर्ग गोठयात आणि एक वर्ग तळयाच्या काठी भरायचा. काही काळाने गावातल्या वल्हार कुटुंबीयांनी आपली 6 एकर जमीन, गावकीच्या परवानगीने शाळेसाठी दिली आणि शाळेला स्वत:चं छप्पर लाभलं. आपण चांगल्या भावनेने, लोकोपयोगी काम करत असलो तर समाजातून दाते उभे राहतात. देणगी हा प्रश्न फारसा गंभीर नसतो. त्यापेक्षा मोठी गरज असते ती आपली स्वप्नं समजून घेऊन त्यात साथ देणाऱ्या आणि स्वत:ही प्रयोगशील असलेल्या साथीदारांची. लोकमान्य टिळक मंदिर या बाबतीतही भाग्यवंत ठरलं. त्याला उदारहस्ते आर्थिक मदत करणारे दाते लाभले आणि कृतिशील शिक्षकही. तेव्हा रुजू झालेले बहुतेक शिक्षक अगदी तरुण, नुकतेच बी.एड. झालेले होते. बी.एड.च्या मांडवाखालून येणाऱ्या बहुतेक शिक्षकांनी चाकोरीत शिकवण्याची खूणगाठ आपल्या मनाशी बांधलेली असते. त्यामुळे शिकवण्याच्या प्रक्रियेतला जिवंपणा, रसरशीतपणा हळूहळू कमी होऊ लागतो आणि शिकवणं ही एक यांत्रिक प्रक्रिया होते. मात्र इथल्या बहुतेक शिक्षकांच्या नोकरीची सुरुवातच या शाळेपासून झाल्याने नवं काही करून बघायची जी ऊर्मी मनात होती, ती टिकली, त्यात वाढ झाली. कारण प्रयोग करण्याला असलेलं मुक्त स्वातंत्र्य.प्रत्येक शिक्षकाने आपल्या विषयातल्या नोट्स काढा, लॉगबुक भरा, पाठ लिहा अशी काही इथे सक्ती नव्हती. नुसते कागद भरून घेण्यात संस्थाचालकांना रस नव्हता. प्रयोग करण्याची मुभा होती आणि त्यातून योग्य ते परिणाम दिसण्याची अपेक्षा होती. त्यामुळे वाढत्या शाळेबरोबर शिक्षकांचीही घडण होत गेली. प्रयोगशीलता खोलवर रुजत गेली. या सर्वांनी रुजवलेल्या प्रयोगशीलतेचीच ही विविध रूपं...

इयत्ता आहेत, पण वर्ग नाहीत...

थोडं विचित्र वाटतं ऐकायला, पण ही वस्तुस्थिती आहे. इथे इयत्तेनुसार वर्गखोल्या नाहीत, तर त्या विषयानुसार आहेत. उदाहरणार्थ, मराठीच्या विभागात पाचवी ते दहावीचे सगळे तास होतात. त्यासाठी आखीवरेखीव वेळापत्रक नाही. कोणत्या विषयाचा अभ्यास करण्याची मुलांची इच्छा आहे त्याला महत्त्व. या वर्गात शब्दकोश, विश्वकोश ठेवलेले आहेत. संस्कृतीकोश आहेत. शाळेतल्या अगदी पाचवीच्या मुलालाही सगळे कोश पाहता येतात, त्यातून हवी ती माहिती मिळवता येते. वर्गात भरपूर कविता लावलेल्या असतात. 15 ते 25 तरी कविता एका वेळी असतात. या कविता ठरावीक काळाने बदलल्या जातात. मुलांनी ठरवायचं की यातल्या कोणत्या कविता अभ्यासायच्या. मराठीच्या तासानंतर मुलं त्यांची इच्छा असेल तर (अर्थात पूर्ण वर्गाची इच्छा महत्त्वाची!) गणिताच्या वर्गात जातात, इंग्रजीची मुलं समाजशास्त्राच्या वर्गात जातात... 'असं सुंदर गोफ विणला जात असल्यासारखं हे दृश्य खूप छान दिसतं'..इति रेणूताई!

या वयातल्या मुलांना एका जागी दिवसभर बसण्याचा कंटाळा असतो. अशा वर्गांमुळे एका जागी बसण्यातून त्यांची सुटका होते. शिवाय शिकवण्याची साधनं एका वर्गातून दुसऱ्या वर्गात नेण्यात शिक्षकांचाही खूप वेळ जातो. ही पध्दत अवलंबल्याने त्यांनाही फायदा होतो. शिकवणाऱ्यांची हौस म्हणून कोणताही उपक्रम सुरू करायचा नाही, तर त्याआधी मुलांशी बोलायचं, त्यांना तो उपक्रम करावासा वाटला तर सुरू करायचा, यावर इथे कटाक्ष असतो. म्हणून शालेय अभ्यासक्रमातली पाठयपुस्तकं शिकवण्यासाठी असा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेण्याआधी मुलांशी या कल्पनेविषयी बोलण्यात आलं. त्यांना ही कल्पना खूप आवडली, पटली त्यानंतरच ती प्रत्यक्षात आणायचं ठरलं.

कुतूहल कोपरा...

नावापासूनच मनात औत्सुक्य जागवणारा हा प्रयोग. मुलांना प्रश्न पडणं म्हणजे त्यांच्यातील कुतूहल बुध्दी, चौकसपणा जिवंत असल्याचं लक्षण. जोपर्यंत प्रश्न पडत नाहीत आणि पडलेले प्रश्न ते मोकळेपणाने विचारत नाहीत, तोपर्यंत त्यांची स्वत:ची विचार करण्याची प्रक्रिया सुरू होत नाही. यासाठी गणिताच्या, विज्ञानाच्या वर्गात कुतूहल कोपरा असतो. तिथे मुलांचं औत्सुक्य चाळवणाऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात. त्याबद्दल मुलांनी प्रश्न विचारायचे, शंकासमाधान करून घ्यायचं. मुलं खूप प्रश्न विचारतात, हा इथल्या शिक्षकांचा अनुभव. (बहुतेक शाळांमध्ये मुलांना प्रश्नच पडू दिले जात नाहीत, हे दृश्य आपल्या परिचयाचं!)

अनुभव मंडप...

मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, तो वाढवणं याकडे शाळेत विशेष लक्ष दिलं जातं. शाळेतील प्रत्येक मूल बोललं पाहिजे, त्याच्या भावना त्याला त्याच्या शब्दांत व्यक्त करता आल्या पाहिजेत असा कटाक्ष असतो. यासाठी 'अनुभव मंडप' नावाचा उपक्रम शाळेत चालू आहे. शाळेतली सगळी मुलं हॉलमध्ये एकत्र बसतात आणि त्या आठवडाभरात त्यांना आलेले विशेष बरे-वाईट अनुभव ते सगळयांसमोर मांडतात.

अभिव्यक्ती फलक...

भाषा, गणित आणि समाजशास्त्र या विषयांच्या वर्गामध्ये एक अभिव्यक्ती फलक ठेवलेला असतो. त्या फळयावर एक वाक्य लिहिलं जातं, शाळेतल्या कुठल्याही मुलाने येऊन ते पूर्ण करायचं.

या भागात कुणबी समाज मोठया प्रमाणात आहे. त्यांची बोलीभाषा, गावाची म्हणून एक भाषा आणि मराठी प्रमाण भाषा अशा तीन भाषांतून मुलं व्यक्त होत असतात. हे होत असताना कुठेही त्यांच्या बोलीभाषेला कमी लेखलं जाणार नाही याची काळजी घेतली जाते. 'बोलीभाषेत बोललात म्हणजे तुम्ही गावंढळ होत नाही. आधी तुमची भाषा, मग प्रमाण भाषा', असा विश्वास त्यांच्यात रुजवला जातो.

विज्ञानाच्या वर्गातली जवळजवळ सगळी प्रयोगाची साधनं ही मुलांनी तयार केलेली असतात, हे या शाळेचं आणखी एक वैशिष्टय.

बालसभा - ग्रामसभेचं प्रतिरूप

महिनाअखेरीला शाळेत बालसभा होते. ही बालसभा म्हणजे ग्रामसभेचं प्रतिरूप असतं. या सभेत मुलांनी त्यांच्या मनात जे येईल ते बोलायचं. रेणूताई शाळेच्या मुख्याध्यापक आहेत. समजा एखाद्या तासाला त्यांनी शिकवलेलं मुलांना आवडलं नाही, तरी या बालसभेत मुलं मोकळेपणाने सांगतात. त्याव्यतिरिक्त 'काय वस्तू शाळेत हव्या आहेत, कशाची गरज नाही, काय चांगलं घडलं, कोणत्या शिक्षकांनी चांगलं शिकवलं, एखाद्या शिक्षकाचा आलेला चांगला अनुभव' असं बरंच काही मुलं बोलतात. या सभेत एकही शिक्षक उपस्थित नसतो. त्या वर्गांचे मॉनिटर सगळं सांभाळतात, सगळयांना बोलण्याची संधी देतात. सभेसाठी पाचवी ते दहावीची मुलं गटांत बसतात. जो विद्यार्थी शाळेचा जी.एस. असतो, तो रेणूताईंना या सभेचं रिपोर्टिंग करतो. मग आलेल्या सूचनांपैकी कोणत्या सूचनांवर कार्यवाही करणार, ती कशा प्रकारे करणार, कोणत्या सूचनांवर कार्यवाही होऊ शकत नाही, त्यामागची कारणं असं सगळं रेणूताई त्या जी.एस.शी बोलतात. तो या चर्चेचा सारांश आणि झालेले निर्णय मुलांना जाऊन सांगतो.

समृध्द ग्रंथालय

शाळेत वाचनावर खूप भर दिला जातो. शाळेच्या ग्रंथालयात पंधरा हजार पुस्तकं आहेत. मुलांनी स्वत: पुस्तकं चाळून आवडेल ते पुस्तक वाचायला घ्यायचं. त्यांना लायब्ररियनने निवडून द्यायचं नाही. मराठी, इंग्लीश, हिंदी यातलं कुठल्याही भाषेतलं त्याने निवडावं. वाचलेल्या पुस्तकांवर मुलं बोलतात, आपल्या प्रतिक्रिया मांडतात. मुलांचं अवांतर वाचन खूपच कमी झालंय अशी हाकाटी आपण सर्वत्र ऐकतो. पण एका शैक्षणिक वर्षात 125 ते 150 पुस्तकं वाचणारे विद्यार्थी या शाळेत आहेत. या वर्षीचा उत्कृष्ट वाचक पुरस्कार ज्याला मिळाला, त्याने 6 महिन्यात 66 पुस्तकं वाचली आहेत. मैदानाइतकीच वाचनालयात गर्दी करणारी मुलं, हे इतरत्र दुर्मीळ झालेलं चित्र इथे पहायला मिळतं.

शाळेचं वर्तमानपत्र आणि अभ्यासिका

शाळेतली नववीची मुलं दर 15 दिवसांनी वर्तमानपत्र काढतात. त्यासाठी मुलांचंच संपादक मंडळ असतं. संपादकीयही मुलंच लिहितात. ते प्रकाशित करायचं काम नववीच्या वर्गाकडे, सहभाग मात्र सगळया इयत्तांमधल्या मुलांचा. वर्तमानपत्र हस्तलिखित स्वरूपात असतं.

सुरुवातीला असं वर्तमानपत्र काढायची कल्पना मांडली, तेव्हा मुलं खूप गंभीर झाली. त्यांना सरांनी विचारलं, 'का रे, काढायचं नाही का?' त्यावर ती म्हणाली..'नाही.. पण पेपरात छापण्यासारखं फारसं वाईट आमच्या गावात घडत नाही ना...' मग वर्तमानपत्र म्हणजे वाईट बातम्या असं नाही, तर आपल्या गावात जे चांगलं घडतं त्याचीही बातमी होते, त्या द्यायच्या असतात हे त्यांना समजावून सांगण्यात आलं. आता हा उपक्रम खूप चांगला चालू आहे. काही प्रतिभावंत मुलांनी तर स्वरचित गोष्टींची, कवितांची पुस्तकंही तयार केली आहेत.

शाळा सुटल्यावर संध्याकाळी 6 वाजता शाळेतल्या एका वर्गात अभ्यासिका सुरू होते. गेली 25 वर्षं ही अभ्यासिका सुरू आहे. इथे स्वयंअध्ययनाने अभ्यास करायचा असतो. अभ्यासिकेत दहावीच्या मुलांची संख्या जास्त असते. अभ्यासासाठी आलेली मुलंमुली रात्री 9च्या अंधारात घरी परततात. त्यांच्या असं एकत्र घरी परतण्याला ना पालक मज्जाव करतात ना शिक्षक. या किशोरवयीन मुलांमध्ये निर्भेळ मैत्री आहे, याविषयी सर्वांची खात्री आहे. कारण आजपर्यंत कोणताही वावगा प्रकार घडलेला नाही.

शाळेची विशेष ओळख - तंत्रशिक्षण विभाग

गावगाडयात आता बारा बलुतेदार राहिले नाहीत, पण समाजाच्या गरजा तर त्याच राहिल्या आहेत. चिखलगावात शाळा सुरू झाली, त्या वेळी इथली बहुतेक मुलं पोटापाण्यासाठी मुंबईत जायची. या मुलांना गावात थांबवायचं तर त्यांच्यासाठी अर्थार्जनाचं साधन हवं. वंशपरंपरेने त्यांच्याकडे आलेलं कौशल्य ते वापरत नव्हते. तेव्हा या कौशल्याला पुन्हा उजाळा द्यायचा. समाजाच्या गरजा भागवण्यासाठी आजही आवश्यक असणाऱ्या जुन्या व्यवसायांना नवं रूप द्यायचं, या मुलांना प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात रुजवायचा, ही तंत्रशाळा सुरू करण्यामागची भूमिका.

पाचवी ते दहावीतल्या सगळयांसाठी इथे 'मल्टीस्किल ट्रेनिंग' हा अभ्यासक्रम आहे. अभियांत्रिकी, शेती, गृहशास्त्र आणि आरोग्य, पर्यावरण आणि उर्जा हे ते चार ट्रेड्स. सगळे ट्रेड्स पाचवीपासून आहेत. यातले कोणतेही विषय ऐच्छिक नाहीत, चारही विषय शाळेतल्या सगळयांसाठीच. ज्याला आपण लाईफ स्किल म्हणतो, त्या मूलभूत कौशल्यांवर हे ट्रेड आधारित आहेत. प्रत्येक इयत्तेला आठवडयातून एक पूर्ण दिवस टेक्निकलचे तास असतात.

जवळपासच्या गावात नवीन घर बांधलं गेलं की त्या घराच्या इलेक्ट्रिकल फिटिंग करण्याचं कामं शाळा घेते. त्यातून मुलांना प्रात्यक्षिक करायची संधी मिळते. अशा कामांसाठी 15 मुलांचा गट जातो, सोबत त्या विषयाचे शिक्षक असतात. त्याकरिता लागणारे बोर्ड्स शाळेत बनवून न्यायचे, बाकी काम प्रत्यक्ष साईटवर. फळयावर आकृती काढून लाईट फिटिंग शिकवण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्याची संधी त्यांना खूप शिकवून जाते. या कामाला सामान किती आणि काय काय लागलं, त्यासाठी खर्च किती झाला या सगळयाचं अंदाजपत्रकही मुलांना करायला सांगितलं जातं. शाळेतले दरवाजे, बेंचेंस हे शाळेच्या कार्यशाळेत मुलांनी तयार केले आहेत.

तंत्रशिक्षणातला प्रत्येक विषय पाठयपुस्तकातल्या विषयाशी जोडून शिकवला तर त्यांचे शालेय विषयही पक्के व्हायला मदत होते, असा इथला अनुभव. कॉस्टिंगसारख्या विषयातून त्याचं व्यावहारिक गणित पक्कं होतं. गायींच्या वजनाचा आलेख शिकवायचा असेल तर तो वर्गात गणिताच्या तासाला घेतला जातो. त्यातून त्याचं आलेखाचं ज्ञान पक्कं होतं. सर्वेक्षणासारखा विषय भूगोलाशी जोडलेला असतो.

आज सगळीकडे एल.इ.डी.चा जमाना आहे. या शाळेतली मुलं छोटया बॅटरीपासून ते रस्त्यावरील दिव्यापर्यंत सगळया गोष्टी इलेक्ट्रॉनिक्सच्या वर्गात बनवतात. वेगवेगळया प्रदर्शनांतून त्यांची विक्री होते.

शाळेच्या संगणक प्रयोगशाळेत आज 40 संगणक आहेत, त्यापैकी 20 संगणकांची जोडणी शाळेच्या पाचवीतल्या मुलांनी केली आहे. त्यातून विविध पार्ट्सची माहिती, त्याचं कार्य, तो भाग संगणकातली किती जागा व्यापतो याचं नकळत प्रशिक्षण झालं.

शेतीमध्ये भाजीपाला लागवड, नर्सरीतील रोपं तयार करणं, नर्सरी कशी उभी करायची, नारळाच्या झाडावर नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे चढून नारळ काढण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं.

होमसायन्समध्ये पाककला शिकवली जाते. केक, नानकटाई, शंकरपाळे, चकल्या, आवळा कँडी, लोणची, पापड, फेण्या असं मुलांच्या इयत्ता लक्षात घेऊन पाककृती शिकवल्या जातात. ताक कसं करायचं, दही कसं लावायचं, कोशिंबीर कशी करायची या गोष्टी पाचवीच्या मुलांना शिकवण्यात येतात.

लोकरीचं विणकाम, शिवणकाम शिकवलं जातं. गेल्या वर्षी सातवीची जी 30 मुलं होती, त्यांनी सर्वांनी स्वत:साठी मफलर बनवले. क्रोशाच्या सुईवरचं कामही मुलं आवडीने करतात. अत्तर, परफ्यूम, फीनेल मुलं तयार करतात आणि त्याची उत्तम विक्री होते.

स्वयंपूर्ण बनवणाऱ्या या कौशल्य प्रशिक्षणाने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि परीक्षेतील गुणांवरही त्याचा चांगला परिणाम होतो. रेणूताई या संदर्भात बोलल्या ते खूप मोलाचं आहे. त्या म्हणाल्या, ''एवढं सगळं करून मार्कांच्या स्पर्धेतही टिकता येतं, हे आमच्या मुलांनी दाखवून दिलं आहे. गेली काही वर्षं आमचा दहावीचा निकाल 100 टक्के लागतो. यंदा पहिला आलेल्या मुलाला 93 टक्के मिळाले आहेत. आपण मार्कांमागे धावायचं नसतं तर मार्क आपल्यामागे धावत येतात, हे त्यांना उमगलं आहे. इथे 75 टक्के गुण मिळवणाऱ्या मुलाकडे जो आत्मविश्वास असतो, तो बाहेरच्या 90 टक्के गुण मिळवणाऱ्याकडे नसतो, असा आमचा अनुभव आहे. गुण मिळवत असतानाच त्यांच्यातली कौशल्यं इतकी विकसित झालेली असतात की बाहेरच्या जगात वावरताना त्यांना अपयश येत नाही.''


'शाळेतल्या सगळया कल्पनांचे प्रेरणास्रोत म्हणजे आमची मुलं' असं त्यांनी आवर्जून नमूद केलं. त्या म्हणाल्या, ''त्यांच्याशी सतत होणाऱ्या संवादातून त्यांची नेमकी गरज लक्षात येते. त्यातून नवनवीन प्रयोग सुचत जातात. इथल्या मुलांमध्ये अजूनही स्पर्श न झालेली प्रचंड बुध्दिमत्ता आहे, सुप्त क्षमता आहेत, अफाट शारीरिक ताकद आहे. आपण करू तेवढं कमीच पडेल अशी स्थिती आहे.''

तंत्रशिक्षण विभागाचा प्रमुख आहे शाळेचाच माजी विद्यार्थी किसन पांदे. त्याच्याबरोबर जो 4 शिक्षकांचा गट आहे, ते सगळे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. अतिशय समर्थपणे आणि कल्पकतेने ते हा विभाग सांभाळत आहेत, वाढवत आहेत.

प्रशिक्षण - शिक्षकांचं आणि पालकांचंही

शिकवायचं म्हणजे काय, मुलांना आनंददायी वाटेल अशा पध्दतीने कसं शिकवायचं हा दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी बाहेरच्या शाळेतल्या शिक्षकांसाठी शिबिरं घेतली जातात. पालकांसाठीही शिबिरांचं नियोजन केलं जातं. अशा वेगवेगळया प्रशिक्षणासाठी आणि बी.एड./डी.एड.साठी नवं ट्रेनिंग सेंटर उभं राहतं आहे. या संदर्भात रेणूताई म्हणाल्या, ''आपल्याकडे खूप ठिकाणी ट्रे्रनिंग सेंटर्स आहेत, पण ते खूप ऍब्स्ट्रॅक्ट ट्रेनिंग देतात. त्यात मांडलेले विचार, विचार म्हणून खूप चांगले, उदात्त असले तरी ते सगळे प्रत्यक्षात आणता येत नाहीत. अगदी बेताचा वकूब असलेला शिक्षक काय काय करू शकतो, ते आम्ही या ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवतो. शिक्षक हा तुमचा पेशा आहे, तो चोख कसा कराल, त्यात व्यावसायिकदृष्टया कसे यशस्वी व्हाल हे आम्ही या प्रशिक्षणातून सांगत असतो.''

मुलांशी असलेले आत्मीय बंध

शाळा सुरू झाली, तेव्हा पहिली 3 वर्षं मुली येतच नव्हत्या. नंतर हळूहळू सुरुवात झाली. आता अनेकींनी चांगली करिअर केलेली आहे. कीर्तनकार, एम.एस.डब्ल्यू., मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, कायद्याच्या पदवीधर, नर्सिंग केलेल्या, शिक्षिका, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी अशा विविध क्षेत्रांत मुली आहेत. या सगळयांचा आपापल्या क्षेत्रात काम करतानाचा दृष्टिकोन हा इतरांपेक्षा खूप वेगळा असतो, असा अनुभव आहे. आजही सगळे माजी विद्यार्थी शाळेशी जोडलेले आहेत. प्रत्यक्ष भेटीसाठी तर येतातच, पण त्याशिवाय सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनही शिक्षकांशी त्यांचा संपर्क असतो. शाळा संपली तरी त्यांचं शाळेशी नातं संपत नाही. सणावारी गावात आली तर मुलं आवर्जून भेटून जातात. शिक्षकांना फोन करतात.

विद्यार्थ्याच्या लग्ाचं निमंत्रण आलं की सगळे आवर्जून हजर राहतात. रेणूताई, डॉक्टरांसह सगळे शिक्षक आशीर्वाद द्यायला जातात. कधीकधी एका दिवशी 4/5 लग्नं असतात, तरीही सगळीकडे हजेरी लावायचा प्रयत्न असतो.

शाळा सुरू झाली, तेव्हा पालकांची जी पिढी होती, त्या पिढीला शिक्षणात फारसं गम्य नव्हतं, त्याचं महत्त्वही नीटसं उमगत नव्हतं. त्यांचा घरातला राबणारा हात कमी झाला यापलीकडे त्यांनी काही शाळेत जायला विरोध केला नाही. नंतर शाळेला मिळालेले मानाचे पुरस्कार, सर्वदूर झालेलं कौतुक, मुलांना मिळणारं यश यामुळे पालकांच्या मनातही कौतुक, आदराची भावना निर्माण झाली.

''गावाचं, पालकांचं आणि मुलांचं मिळणारं प्रेम आणि सहकाऱ्यांची मिळणारी मन:पूर्वक साथ याच्या बळावरच इथवर आलो... माझी इनिंग आता संपत आली आहे. यानंतर हे बॅटन समर्थपणे पेलण्याइतके आमचे सहकारी सक्षम आहेत याचं खूप समाधान आहे...'' असे सार्थकतेचे भाव आज रेणूताईंच्या आणि डॉक्टरांच्या मनात आहेत. त्यांच्या या वाटचालीत मुलगा ऍड. कैवल्य आणि समुपदेशन तज्ज्ञ सून सहभागी झाले आहेत. धाकटी मुलगी मैत्रेयी लष्करात अधिकारपदावर काम करते आहे. देशातल्या उद्याच्या पिढीवर सुसंस्कारांची शिंपण करणारं दांडेकर दांपत्य आपल्या पोटच्या मुलांनाही अशा कामांसाठी प्रेरित करतं आहे, ही विशेष कौतुकाची गोष्ट आणि समाजासमोर ठेवलेला वस्तुपाठ...

9594961865

 

संपर्क

रेणू दांडेकर - 09403693275

डॉ. राजा दांडेकर - 09422431275

लोकमान्य टिळक विद्या मंदिर

लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट,

चिखलगाव, ता. दापोली

जिल्हा - रत्नागिरी

(02358)205577