डॉ. हेडगेवारांनी आम्हाला काय दिले?

विवेक मराठी    18-Mar-2015
Total Views |

 

 आज आपला देश म्हणजे अभारतीय विचारांची बजबजपुरी झालेला आहे. आपापसात भांडणे करणे, कोणत्याही विषयावर एकमत न करणे, साध्या विषयाचे विपरीत अर्थ काढणे, बुध्दिभेद करणे, विदेशी शक्तीच्या सुपाऱ्या घेऊन देशात कलह निर्माण करणे, विदेशी धनावर वैचारिक नाच करणे चालू आहे. अशा वेळी डॉ. हेडगेवारांची प्रकर्षाने आठवण होत राहते. सर्व महापुरुष आपले आहेत आणि ते जे विचारधन ठेवून गेले आहेत, त्याच्या व डॉक्टरांनी ज्ञानाचा दिवा लावला आणि तो आमच्यासारख्या लाखो स्वयंसेवकांच्या मनात सतत तेवत ठेवला, त्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला पुढे जायचे आहे. 

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

माझ्या वयाच्या सर्व स्वयंसेवकांचा जन्म डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर झालेला आहे. याचा अर्थ आमच्यापैकी कोणीही डॉ. हेडगेवारांना ना पाहिले आहे, ना त्यांची भाषणे ऐकली आहेत. असे असतानाही आमच्यासारख्यांच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव डॉ. हेडगेवारांचाच आहे. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. सामान्यपणे प्रत्येक मुलामुलीवर त्यांना जन्म देणाऱ्या आईचा खोलवरचा प्रभाव असतो. त्या खालोखाल आम्हा स्वयंसेवकांवर डॉ. हेडगेवारांचा प्रभाव असतो. त्यांना न पाहता, न ऐकताही एवढा प्रभाव असण्याचे कारण काय? असा प्रश्न सहजच निर्माण होतो.

तसे पाहू जाता डॉक्टरांनी आम्हाला कसलीही भौतिक गोष्ट दिलेली नाही. त्यांनी सुरू केलेल्या संघामुळे संघात जाणाऱ्या कोणत्याही संघस्वयंसेवकाचा कोणताही भौतिक लाभ होत नाही
, झालेच तर नुकसानच होते. स्वातंत्र्यानंतर सगळी राजवट संघविरोधी निघाली, त्यामुळे अंगात प्रचंड गुणवत्ता असणाऱ्या संघस्वयंसेवकांना राज्यसत्तेने अस्पृश्य ठरवून टाकले. सत्तेने त्यांना कसलेही सन्मान दिले नाहीत. त्यांच्या उद्योग-व्यवसायांना कसलेही साहाय्य केले नाही. शिक्षणसंस्थांपुढे अडचणीच अडचणी उभ्या केल्या. तरीही लाखो स्वयंसेवक डॉक्टरांना एकनिष्ठ राहिले. काही स्वार्थासाठी सोडून गेले असतील, परंतु तो मनुष्यस्वभाव आहे म्हणून त्याचे दु:ख करण्याचे कारण नाही.

'स्व'ची ओळख

डॉक्टरांनी पहिली गोष्ट आम्हाला दिली, ती म्हणजे आमची ओळख. आम्ही कोण आहोत? तर आम्ही हिंदू आहोत. डॉक्टरांच्या काळात 'मला गाढव म्हणा, पण हिंदू म्हणू नका' असा हीनभाव हिंदूंच्या मनात निर्माण झाला होता. हिंदू समाजाचे अध:पतन टोकाचे झाले होते. हिंदू म्हणजे जातिभेद, अस्पृश्यता, अंधश्रध्दा, ब्राह्मणशाही, समुद्रगमनास बंदी, सोवळयाओवळयाच्या अफाट कल्पना, आचरट कर्मकांडे, स्त्रियांचे दास्य, बहुजनांना शिक्षणापासून दूर ठेवणे असा अर्थ झाला होता. यामुळे समाजातील फार मोठया लोकांनी स्वत:ला हिंदू शब्दापासून दूर ठेवले. कोणी ब्राह्मो, कोणी प्रार्थना समाजी, कोणी सत्यशोधक झाले. डॉक्टरांना हिंदूंचे अध:पतन दिसत होते, जाणवत होते, त्याचे दुष्परिणामही ते अनुभवत होते. हिंदू समाजाच्या अध:पतनामुळे राष्ट्राचे अध:पतन झाले, असा त्यांचा रोखठोक सिध्दान्त होता.

डॉ. हेडगेवारांनी आपल्या जीवनातून 'हिंदू' या शब्दाला पवित्र अर्थ प्राप्त करून दिला. डॉक्टरांचे हिंदू जीवन म्हणजे चातुरर््वण्य, जातिभेद, अस्पृश्यता, निरर्थक कर्मकांड, अंधश्रध्दा या सर्वांना नकार आहे. डॉक्टरांचे वैशिष्टय असे की, त्यांनी चुकूनही नकारात्मक विचार मांडला नाही. ते नेहमीच सकारात्मक बोलत. आपले राष्ट्र प्राचीन आहे, येथे एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता, आपली भारतमाता विश्वगुरू होती, मानवधर्म या देशातूनच सर्व जगात गेला, असा विषय ते मांडीत. आपल्याला आपल्या उदात्त तत्त्वांप्रमाणे जगले पाहिजे, उदात्त आदर्श जीवनात आणले पाहिजेत, असे ते सांगत.

राम, कृष्ण, शिवाजी यांची पूजा करता कामा नये. त्यांचा आदर्श आपण जीवनात गिरवला पाहिजे. नुसती गीता वाचून काय कामाचे? गीता जगता आली पाहिजे, असे विचार ते मांडीत. तेव्हा ते ऐकणाऱ्याला आवडत नसत. तो म्हणे की, राम, कृष्ण हे तर ईश्वर, त्यांचे चरित्र पुण्यप्राप्तीसाठी वाचायचे, त्यांचे अनुकरण आपण कसे करणार? डॉक्टरांना ही विचारसरणी पटत नसे. डॉक्टरांनी आपल्या जीवनातून कालसुसंगत विचार करणारा व जुन्यातील चांगले घेऊन त्यात अधिक चांगल्याची भर घालून पुढे जाणारा हिंदू उभा केला. हिंदू समाजात वाईट गोष्टी झाल्या ही गोष्ट खरी, परंतु त्यावर टीका करून त्या गोष्टी सुधारणार नाहीत. हिंदू हे आपले घर आहे, या घरातील घाण-कचरा आपल्यालाच काढायचा आहे, घरातील अंधार उपसून काढता येणार नाही, त्यासाठी दिवा लावावा लागतो. डॉक्टरांनी हा ज्ञानाचा दिवा लावला आणि तो आमच्यासारख्या लाखो स्वयंसेवकांच्या मनात सतत तेवत ठेवला.

संघरूपाने काम करण्याची दृष्टी

डॉक्टरांनी दुसरी गोष्ट आम्हाला दिली, ती म्हणजे संघरूपाने काम करण्याची दृष्टी. हिंदू समाजाचे वर्णन असे केले जात असे - हिंदू एकटा तत्त्वज्ञ असतो, दोन हिंदू एकत्र आले की ते आपल्या तत्त्वज्ञानावर भांडण करतात आणि तीन हिंदू एकत्र आले की प्रचंड गोंधळ उडतो. (हा गोंधळ आपण दूरदर्शनच्या चॅनलवर पाहत असतो.) चार हिंदू आयुष्यात एका दिशेने चालतात, तेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो. हिंदूंच्या या स्वभावामुळे हिंदू समाजात सहमती निर्माण करणे, एकमत निर्माण करणे महाकठीण गोष्ट आहे. हिंदूंनी उभ्या केलेल्या संस्था अनेक वेळा अकाली गर्भपात होऊन मरतात. फारच थोडया संस्था शताब्दी साजरी करतात.

संघटितपणे काम करायचे असेल तर अगोदर एकत्र यावे लागते, एकत्र राहावे लागते आणि एकत्र काम करावे लागते. डॉक्टरांनी आम्हा स्वयंसेवकांना सवय लावली की सतत एकत्र या, कोणताही विषय ठरविताना त्यावर साधक-बाधक चर्चा करा, सगळी मते येऊ द्या आणि शेवटी एकमताने निर्णय घ्या. बहुमताने निर्णय घ्या असे त्यांनी शिकविले नाही. जो निर्णय होईल तो माझा निर्णय आहे असे सर्वांना वाटले पाहिजे. डॉ. हेडगेवारांनी संघाचे नाव, प्रार्थना स्वत: निश्चित केली नाही, संघाचा ध्वजही त्यांनी निश्चित केला नाही, आपल्या सहकाऱ्यांबरोबर या विषयांवर त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली आणि एकमत तयार करून निर्णय घेतला गेला. आज देशात वेगवेगळे राजकीय पक्ष उभे आहेत, त्या राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या मताविरुध्द कोणालाही जाता येत नाही, तसा त्यांनी प्रयत्न केला तर त्याची पक्षातून हाकालपट्टी होते. नावे सांगण्याची गरज नाही. वाचकांना ती माहीत आहेत.

संघस्वयंसेवक संस्था उभ्या करतात आणि या संस्थांचा कारभार सहमती निर्माण करून एकमताने चालवितात. म्हणून संघविचारावर चालणाऱ्या सगळया संस्था आपापसात भांडणे न होता उत्तम चालू असतात. काही संस्थांमध्ये मनुष्यस्वभावाप्रमाणे भांडणे होतात, परंतु त्यामुळे ती संस्था लयाला गेली असे सामान्यत: होत नाही.

व्यापक दृष्टी

डॉक्टरांनी तिसरी गोष्ट आम्हाला दिली, ती म्हणजे व्यापक दृष्टी. संघाच्या एकात्मता स्तोत्रात देशभरातील अनेक नावे आहेत. यात महाराष्ट्रातील महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, ठक्कर बाप्पा अशी अनेक नावे आहेत. या नावातील कोणीही संघ नावाच्या संस्थेचा सभासद नाही. आमच्या संस्थेची माणसे ती आमची माणसे. अन्य एक तर आमचे विरोधक किंवा शत्रू अशी भावना डॉक्टरांनी निर्माण होऊ दिली नाही. आपल्या हिंदू समाजाच्या हितासाठी आणि राष्ट्राच्या हितासाठी ज्यांनी ज्यांनी आपले जीवन झिजविले ती सगळी माणसे आपली माणसे आहेत, त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले पाहिजे, अशी व्यापक दृष्टी डॉक्टरांनी निर्माण केली.


या व्यापक दृष्टीमुळे संघस्वयंसेवकांना विवेकानंद आपले वाटतात, सावरकर आपले वाटतात, आंबेडकर आपले वाटतात आणि गांधीदेखील आपलेच वाटतात. आज सर्व देशभर समरसता हा संघकामाचा एक भाग झालेला आहे. समरसतेची मांडणी करताना डॉ. बाबासाहेबांनी हिंदू समाजाच्या जातिभेदाचा आणि अस्पृश्यतेचा कसा विचार केला आणि ते दोष दूर करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत, याचे मार्गदर्शन केले. हा सर्व विषय संघस्वयंसेवकांना समजून सांगावा लागतो. स्वयंसेवक हा विषय समजून घेतात. अन्य कुठल्याही संस्थेत असे घडणे अशक्य आहे. गांधीवादी संस्थेतील लोक स्वप्नातदेखील डॉ. हेडगेवार-श्रीगुरुजींच्या चिंतनाचा विचार करू शकत नाहीत. त्यांचे मुखवटे जरी मानवतेचे असले, तरी असली चेहरा अत्यंत असहिष्णुतेचा असतो. असे का झाले, हा विचार करण्याचा स्वतंत्र विषय आहे.

या व्यापक दृष्टीचाच दुसरा भाग समन्वयाचा आहे. डॉ. हेडगेवारांनी आमच्यासारख्या स्वयंसेवकांना समन्वयाची दृष्टी दिली. आपल्या भारताची प्राचीन परंपरा वैचारिक रणधुमाळीची नसून विचारात समन्वय साधण्याची आहे. याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण गीतेचे दिले जाते. भगवद्गीतेत सांख्ययोग, कर्मयोग यांचा सुरेख समन्वय साधला गेला आहे. भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचाही सुंदर समन्वय साधला गेला आहे. सांख्ययोग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या मार्गांनी आपण अंतिम सत्य जाणू शकतो, म्हणून सगळे मार्ग सत्य आहेत आणि ते आपापल्या रुचीप्रमाणे ज्याने त्याने निवडावेत, असे भगवंताचे सांगणे आहे.

दोषमुक्त समाज

हिंदू समाजाचा विचार करताना हिंदू समाज दोषमुक्त व्हावा, समर्थ व्हावा, आधुनिक व्हावा यासाठी आपापल्या परीने गांधी, सावरकर, आंबेडकर, फुले आदी थोर पुरुषांनी प्रयत्न केले. प्रत्येकाच्या मांडणीत सत्यांश आहे आणि तो समाजाच्या दृष्टीने हितकारकही आहे. डॉ. हेडगेवारांनी आमच्यासारख्या स्वयंसेवकांचे मानस असे घडविले की, थोर पुरुषांच्या शिकवणुकीतील जे चांगले असेल, हितकारक असेल ते घ्यावे आणि काम करावे. गांधीजींचा सेवाभाव, भारतीयत्वाचा अभिमान, स्वदेशीचा आग्रह, स्वावलंबन, निष्ठा, गोप्रेम हे सर्व घेण्यासारखे आहे आणि अनुकरण करण्यासाखे आहे. सावरकर - आंबेडकरांचा बुध्दिवाद, आपल्या व्यवस्थेची आणि कर्मकाडांची चिकित्सा, धर्माची चिकित्सा याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि आजच्या काळाला जे अनुकूल असेल त्याचा स्वीकार करावा ही दृष्टी डॉक्टरांनी दिली.

डॉक्टरांची शिकवण

डॉक्टरांनी कोणतीही पोथीनिष्ठा शिकविली नाही. ते असे कधीही म्हणाले नाही की, मी सांगतो ते प्रमाण माना, मी सांगतो ते अंतिम सत्य आहे, माझ्यामागून या, मी तुमचा उध्दारकर्ता आहे. याउलट ते नेहमी सांगत की मी एक स्वयंसेवक आहे, माझ्या देशाची सेवा करणे एवढेच माझे काम आहे. 1940 साली त्यांचे अंतिम भाषण झाले. हे भाषण ऐकणाऱ्याच्या आणि नंतर वाचणाऱ्याच्या हृदयावर अतिशय खोलवरचा परिणाम करणारे आहे. जागतिक स्तरावर अशी भाषणे मोजकीच असू शकतील. डॉक्टर या भाषणात म्हणाले, ''मी तुमची सेवा करू शकलो नाही.'' भाषण करणारे डॉक्टर तेव्हा आयुष्याच्या अखेरच्या प्रवासाला निघाले होते, खूप आजारी होते. त्यांची सेवा करणे गरजेचे होते, पण त्यांना खंत होती मी स्वयंसेवकांची सेवा करू शकत नाही याची.

आज आपला देश म्हणजे अभारतीय विचारांची बजबजपुरी झालेला आहे. आपापसात भांडणे करणे, कोणत्याही विषयावर एकमत न करणे, साध्या विषयाचे विपरीत अर्थ काढणे, बुध्दिभेद करणे, विदेशी शक्तीच्या सुपाऱ्या घेऊन देशात कलह निर्माण करणे, विदेशी धनावर वैचारिक नाच करणे चालू आहे. रोजचे वर्तमानपत्र उघडले की याचे उघडे-नागडे दर्शन होते. अशा वेळी डॉ. हेडगेवारांची प्रकर्षाने आठवण होत राहते. सर्व महापुरुष आपले आहेत आणि ते जे विचारधन ठेवून गेले आहेत, त्याच्या प्रकाशात आपल्याला पुढे जायचे आहे, अशी व्यापक आणि समन्वयाची दृष्टी समाजात मोठया प्रमाणात निर्माण करणे हे आजच्या काळाचे आव्हान आहे.

vivekedit@gmail.com