शाखेत न गेलेला स्वयंसेवक

विवेक मराठी    24-Aug-2015
Total Views |


KALAM_1  H x W:


****रमेश पतंगे****

अब्दुल कलाम यांना स्वयंसेवक म्हटल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटेल. शाखेत न जाता कोणी स्वयंसेवक होऊ शकते का? असा प्रश्न काही जणांच्या मनात निर्माण होईल. त्याचे उत्तर श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांनी फार पूर्वीच देऊन ठेवले आहे.
ते सांगत की, ''मनोवैज्ञानिक स्तरावर सर्व समाज संघाचा स्वयंसेवक आहे. जे शाखेत आले, त्यांचे स्वयंसेवकत्व प्रकट झाले आणि जे शाखेत आलेले नाहीत, त्यांचे स्वयंसेवकत्व अप्रकट असते.'' एपीजे अब्दुल कलाम हे या अर्थाने अप्रकट स्वयंसेवक होते.

वुल पाकिर जैनुलाबद्दीन (एपीजे) अब्दुल कलाम यांचे 27 जुलै 2015 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अनेकांचे लेख आले. अनेकांची श्रध्दांजली भाषणे झाली. बहुतेक सर्वांनी 'मिसाइल मॅन' या शब्दांत त्यांचे वर्णन केले. भारताची क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अग्नी, त्रिशूळ, ब्रह्मोस इत्यादी क्षेपणास्त्रे भारतीय सैन्यदलात आहेत. त्यांच्या निर्मितीचे श्रेय एपीजे अब्दुल कलाम यांना देण्यात येते. त्यांच्या अद्वितीय कामामुळे त्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न असे किताब मिळाले.

असे असले, तरी मिसाईल मॅन ही त्यांची ओळख अपूर्ण आहे. जगात क्षेपणास्त्र असलेले अमेरिका, रशिया, चीन, कोरिया, इस्रायल असे अनेक देश आहेत. त्या त्या देशाची क्षेपणास्त्र यंत्रणा त्यातल्या शास्त्रज्ञांनी, तंत्रज्ञांनी विकसित केली आहे, परंतु या पैकी एकालाही एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखी देशव्यापी मान्यता मिळालेली नाही. ते भारताचे राष्ट्रपती होते, 'जनतेचा राष्ट्रपती' या शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. त्यांचे योग्य वर्णन करायचे, तर ते भारताचा विनम्र चेहरा होते.

त्यांची अनेक पुस्तके आहेत. उदा. 'विंग्ज ऑफ फायर', 'टर्निंग पॉईंट', 'टार्गेट 3 बिलियन', 'बिल्डिंग अ न्यू इंडिया', 'इग्नाइटेड माईंड', 'फोर्ज युवर फ्युचर' इत्यादी. याशिवाय वेगवेगळया ठिकाणी त्यांनी केलेली भाषणे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. गेली काही वर्षे वेगवेगळया कारणांमुळे एपीजे अब्दुल कलाम यांचे लेखन आणि पुस्तके मी वाचत होतो. आणि ते गेल्यानंतर माझी स्वाभाविक प्रतिक्रिया झाली - 'शाखेत न गेलेला एक ज्येष्ठ स्वयंसेवक आपल्यातून गेला.'

समाज संघाचा स्वयंसेवक

अब्दुल कलाम यांना स्वयंसेवक म्हटल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटेल. शाखेत न जाता कोणी स्वयंसेवक होऊ शकते का? असा प्रश्न काही जणांच्या मनात निर्माण होईल. त्याचे उत्तर श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांनी फार पूर्वीच देऊन ठेवले आहे. ते सांगत की, ''मनोवैज्ञानिक स्तरावर सर्व समाज संघाचा स्वयंसेवक आहे. जे शाखेत आले, त्यांचे स्वयंसेवकत्व प्रकट झाले आणि जे शाखेत आलेले नाहीत, त्यांचे स्वयंसेवकत्व अप्रकट असते.'' एपीजे अब्दुल कलाम हे या अर्थाने अप्रकट स्वयंसेवक होते.

संघाचा स्वयंसेवक म्हटला की तो सर्व राष्ट्राचा विचार करतो. स्वार्थाचा विचार करीत नाही. स्वार्थाचा विचार करणारा संघात बसू शकत नाही. एपीजे अब्दुल कलाम म्हणजे निःस्वार्थतेचा मूर्तिमंत आविष्कार होते. ते अविवाहित होते. त्यामुळे धनसंग्रह आणि संपत्तीसंग्रह करण्याचा त्यांच्यापुढे प्रश्न नव्हता. राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपली सर्व संपत्ती खेडयांच्या विकासासाठी जो एक न्यास निर्माण केला होता त्याला त्यांनी देऊन टाकली. खेडयांच्या विकासाची त्यांनी एक संकल्पना मांडली आहे. त्या संकल्पनेला 'पुरा' (PURA) असे म्हणतात. त्याचा विस्तार असा आहे - 'प्रोव्हायडिंग अर्बन फॅसिलिटी टू रूरल एरियाज.' निवृत्तीनंतर ते सर्व वेतन त्यांनी असेच दान करून टाकले. ते जेव्हा गेले, तेव्हा त्यांची खासगी मालमत्ता म्हणजे त्यांचे वापरायचे कपडे आणि पुस्तके एवढीच होती. राजकीय पदावर गेल्यानंतर तेथे गेलेला माणूस अशी अगडबंब संपत्ती गोळा करतो, याची उदाहरणे आणि नावे आपल्याला माहीत आहेत. अब्दुल कलामांसारख्या पवित्र माणसाच्या लेखात या पापी लोकांची नावे देऊन मी लेख अपवित्र करू इच्छित नाही

राष्ट्रसमर्पणाचा आदर्श

एपीजे अब्दुल कलाम यांचे सर्व जीवन म्हणजे राष्ट्रसमर्पणाचा एक महान आदर्शच आहे. आपले राष्ट्र हे सनातन राष्ट्र आहे, प्राचीन राष्ट्र आहे आणि या राष्ट्राची एक जीवनधारा आहे. राष्ट्राचे प्राचीनत्व, सनातनत्व आणि जीवनधारा एपीजे यांच्या जीवनात मूर्तिमंत साकार रूपात आली होती. माझ्यात जे काही चांगले आहे, त्याचा मी विकास करीन, आणि विकास करून माझ्यातील सर्व चांगल्या निशी आणि सर्व शक्तिनिशी मी देशाची सेवा करीन, हा त्यांचा जगण्याचा मंत्र होता. त्यांना वैमानिक व्हायचे होते, पण वैमानिकाच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले नाहीत. ते निराश झाले, हृषीकेशला गेले आणि परत आले. त्यानंतर त्यांचे सर्व जीवन म्हणजे ध्येयसाधनेचे आणि कर्मयोग्याचे जीवन आहे.

ते म्हणत असत की, 'स्वप्न बघायला शिका. स्वप्न झोपेत बघू नका, तर अशी स्वप्न बघा की जी तुम्हाला सतत जागी ठेवतील.' संघाचा स्वयंसेवक डोळयापुढे एक स्वप्न ठेवूनच काम करीत असतो. ही आपली भारतमाता वैभवाच्या शिखरावर गेली पाहिजे, आणि जगद्गुरू झाली पाहिजे, हे त्याचे स्वप्न आहे. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी समाज संघटित झाला पाहिजे, सामर्थ्यसंपन्न झाला पाहिजे आणि या सामर्थ्यसंपन्न समाजाचे धर्माचे रक्षण केले पाहिजे. हा ध्येयवाद डोळयापुढे ठेवून किंवा एपीजेंच्या शब्दांत सांगायचे, तर हे स्वप्न डोळयापुढे ठेवून ते जागेपणे साकार करण्याचा प्रयत्न सर्व स्वयंसेवक करीत असतात. एपीजेंच्या डोळयांपुढेदेखील असेच स्वप्न होते.

असे स्वप्न साकार करण्याचा मार्ग काटयाकुटयांचा असतो. तलवारीच्या धारेवरून चालण्याचा असतो. अनंत अडचणी येत असतात आणि त्या अडचणींशी सामना करावा लागतो. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार म्हणत की, ''संकटे उगीच येत नाहीत, ती आपल्या सत्त्वाची परीक्षा पाहतात.'' एपीजे म्हणत, ''यशाचा आनंद मिळवायचा असेल, तर मनुष्याला अडचणींचा मुकाबला करावाच लागतो.'' अडचणींना घाबरू नये, असे त्यांचे सांगणे असे. 'यश मिळवायचे असेल, तर आपल्या अंत:करणाने काम करावे लागते. आपला जीव ओतून काम केले नाही, तर हातात फारसे काही पडत नाही.' असे एपीजे सांगत. संघाचे कार्य तन-मन-धनपूर्वक करायचे असते. आणि आपल्या सर्व सामर्थ्यानिशी करायचे असते. स्वयंसेवकांना शाखेतून याची शिकवण मिळत असते. अडचणी कशा येतात, आणि त्याचा सामना कसा करावा लागतो याची अनेक उदाहरणे एपीजे सांगत असत.

प्रेरणादायी जीवन कहाणी

ते जेव्हा मद्रास इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरोनॉटिकल इंजीनिअरिंगचे शिक्षण घेत होते, तेव्हा त्यांचे प्रमुख प्रो. श्रीनिवासन यांनी त्यांना एक प्रकल्प दिला. सहा महिन्यात त्यांनी आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी मारा करणााऱ्या एका विमानाचा आराखडा तयार करायचा होता. काम सुरू होऊन पाच महिने झाले, पण ते पूर्णत्वाला जात नव्हते. एके दिवशी प्रो. श्रीनिवासन त्यांना म्हणाले, ''मी तुमच्या कामावर नाराज आहे. तुमची प्रगती फार हळू चालली आहे.'' एपीजे त्यांना म्हणाले, ''सर, आणखी एक महिन्याची मुदत द्या.'' श्रीनिवासन त्यांना म्हणाले, ''आज शुक्रवार आहे. मी तुम्हाला तीन दिवस देतो. या तीन दिवसात तुमचे डिझाइन तयार झाले नाही, तर मी तुमची स्कॉलरशिप रद्द करीन.'' पुढे तीन दिवस न झोपता आणि फारसे काही न खाता सगळा प्रकल्प त्यांनी कसा पूर्ण केला, हे मुळात वाचण्यासारखे आहे. तीन दिवसांनंतर श्रीनिवासन त्यांना म्हणाले, ''तीन दिवसांत तुम्ही अशक्य ते शक्य करून दाखविले आहे, यामुळे तुम्ही पूर्वी होता त्यापेक्षा अधिक शक्तिमान झाला आहात.'' अडचणी उत्पन्न झाल्या की त्यावर मात करण्याचा संकल्प करावा लागतो. संकल्प केला की आपल्यामध्ये असलेल्या सर्व सुप्त शक्ती जाग्या होतात आणि अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते. असे एकापेक्षा एकेक प्रेरणादायी प्रसंग एपीजे आपल्या जीवनकहाणीत सांगत जातात आणि वारंवार आठवण करून देतात की, अडचणींचा बाऊ करू नका, संकटांचा सामना करा, धैर्य आणि चिकाटी सोडू नका, आपल्या ध्येयावरचे लक्ष विचलित करू नका. यश तुम्हाला मिळणारच. असा एक जबरदस्त आत्मविश्वास ते व्यक्त करतात. आत्मविश्वासाचे तत्त्वज्ञान सांगायला काय जाते? परंतु एपीजे यांच्या सर्व शब्दांना एक जबरदस्त अर्थ प्राप्त होतो, कारण त्यांचे शब्द म्हणजे 'आधी केले, मग सांगितले' या प्रकारात मोडणारे असल्यामुळे ते पोकळ शब्द नसतात. स्वयंसेवकाने पोकळ बडबड करू नये. फालतू उपदेश करत बसू नये. आचरण करावे आणि आपल्या आचरणातूनच आपला आदर्श आपल्या सहकाऱ्यांपुढे उभा करावा. शाखेची तर हीच शिकवणूक असते.

'फोर्स युवर फ्युचर' हे एपीजेंचे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे तरुणांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांतील निवडक प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे आहेत. प्रश्न असा आहे की, भारताचे पुनरुत्थान शक्य आहे का? प्रश्नकर्त्याने वर्तुळाचा कधी चौकोन होऊ शकतो का? असा पूर्व प्रश्न विचारून भारताच्या पुनरुत्थानासंबंधीच्या अडचणी प्रश्नात मांडल्या आहेत. हाच प्रश्न वेगळया प्रकारे असाही विचारला जाऊ शकतो की, भारत महान होईल का? भारत कधी एकात्म होईल का? भारत कधी समरस होईल का? एपीजींनी प्रश्नाचे जे उत्तर दिलेले आहे ते उत्तर म्हणजे, संघाचा एखादा स्वयंसेवक त्याच्या सभोवताली असणाऱ्या प्रश्नांचा कसा विचार करतो, याचे उत्तर आहे.

एक भव्य स्वप्न

एपीजे म्हणतात की, भारताचे पुनरुत्थान घडविण्यासाठी सर्वप्रथम एक भव्य स्वप्न पाहा, त्याला समर्पित व्हा आणि कृतिशील बना. दुसरा गुण स्वत:मध्ये आत्मविश्वास हवा आणि आत्मगौरवाची भावना हवी. स्वत:ला दुबळे समजू लागलात तर स्वप्न कधीच साकार होणार नाही. तिसरा गुण म्हणजे श्रध्दा हवी. श्रध्दा असेल, तर स्वत:च्या अंगभूत सामर्थ्याचे प्रकटीकरण होईल. शेवटी यश आपल्यालाच मिळणार आहे यावर एकांतिक श्रध्दा असेल, तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. चौथा गुण विजयासाठी धैर्य हवे. टीका करणारे टीका करीत राहतात आणि अनेक वेळा या टीका जहरी असतात. कधीकधी आपल्याबरोबर चार पावले चालणारेदेखील आपले विरोधक होतात. अशा वेळी धैर्य सोडता कामा नये. पाचवा गुण म्हणजे, आपल्यासमोर ज्या अडचणी उभ्या राहतात, त्या अपार कष्ट करून आपण दूर केल्या पाहिजेत. येथे एपीजे अब्राहम लिंकन यांचे उदाहरण देतात. अब्राहम लिंकन याचा जन्म अत्यंत गरीब घरात झाला. शालेय शिक्षण दुसरीपर्यंत झाले. पुढे सर्व प्रकारची कष्टाची कामे करावी लागली. ती करीत करीत त्यांनी वकिलीचा अभ्यास केला. वकिलीची सनद मिळविली. जनहिताचे राजकारण केले आणि शेवटी राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर गृहयुध्द सुरू झाले. एका पाठोपाठ एकेक पराभव होत गेले. प्रचंड टीका होऊ लागली, परंतु लिंकन ठाम राहिले. आपल्या देशाचे त्यांनी एक भव्यदिव्य स्वप्न पाहिले. आज जी अमेरिका आहे, ती अब्राहम लिंकनच्या स्वप्नातील अमेरिका आहे. कष्ट आणि सहन करणे याचे परिणाम असे असतात.

सहावा गुण म्हणजे, जीवन हेतुप्रधान पाहिजे आणि दुसऱ्याविषयी मनात अनुकंपा पाहिजे. सुखासंबंधीच्या अनेकांच्या फार चुकीच्या कल्पना असतात. स्वत:च्या स्वार्थसाधनेने सुख कधी प्राप्त होत नाही. सुखप्राप्तीसाठी जीवनात एखादे लक्ष्य हवे. आपल्याला जे पाहिजे ते मिळविण्यासाठी सत्याचा मार्ग धरला पाहिजे. स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा आपण सत्कार्य हेतूसाठी आपल्याला समर्पित करतो, तेव्हा आपले जीवन अर्थपूर्ण होते. आणि जेव्हा ते सहवेदनेने भरून जाते तेव्हा सुखाचा आनंद आपल्याला मिळतो. वर अब्राहम लिंकन यांचे उदाहरण दिलेले आहे. खरे म्हणजे एपीजे अब्दुल कलाम हे अनेक बाबतीत अब्राहम लिंकन यांची भारतीय प्रतिकृती होती. अब्राहम लिंकन सामान्यांतून असामान्य झाले. एपीजेदेखील सामान्यांतून असामान्य झाले.

संघाची शाखा स्वयंसेवकाच्या चारित्र्यनिर्मितीवर फार मोठा भर देते. संघाच्या प्रार्थनेत परमेश्वराकडे जे गुण मागितले आहेत, त्यात जग नम्र होईल, असे शील आम्हाला दे. एपीजे म्हणजे शीलसंपन्न आणि सात्त्वि व्यक्तिमत्त्व होते. परमेश्वरासाठी त्यांनी एक प्रार्थना केली आहे. त्यांच्या इंग्रजी कवितेत ही प्रार्थना आहे. या प्रार्थनेतील एका कडव्यात ते म्हणतात की, 'सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या देशातील लोकांच्या मनात विचार आणि कृतिशीलता निर्माण कर, ज्यामुळे ते संघटित राहतील. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या लोकांना सन्मार्गाने चालण्याचा मार्ग दाखव. कारण सन्मार्ग चारित्र्याचे बळ निर्माण करतो.' सन्मार्ग, सात्त्विता या गुणांवर त्यांनी वारंवार भर दिलेला आहे. ते म्हणत, ''जर अंत:करणात सात्त्वि भाव असेल, तर चारित्र्य सुंदर होते. आणि जेव्हा चारित्र्य सुंदर असते, तेव्हा परिवारात सामंजस्य आणि सुसंवाद निर्माण होतो. जेव्हा परिवारात सुसंवाद असतो तेव्हा राष्ट्रातही सुसंवाद असतो. आणि जेव्हा राष्ट्रात सुसंवाद निर्माण होतो तेव्हा जगात शांतता निर्माण होते.'' चारित्र्यनिर्मितीला, सात्त्वितेला एपीजे यांनी एवढे अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे.

'मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव।'

चारित्र्याचा मोठा पैलू म्हणजे, समाजातील व्यक्तीने कशाही प्रकारचा भ्रष्टाचार करता कामा नये. आपल्या देशात भ्रष्टाचार ही भयानक समस्या आहे. एपीजे सांगतात की, 'देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे सामर्थ्य तीन लोकांत आहे. ते म्हणजे, माता, पिता आणि गुरू.' आपल्या संस्कृतीचा महान संदेश देणारी तीन वाक्ये आहेत, 'मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव.' एपीजे हाच भाव जवळजवळ याच शब्दांत सांगतात. आईविषयी त्यांची अतिशय सुंदर कविता आहे. त्या कवितेचा भावार्थ असा, ''मी दहा वर्षांचा असतानाचा तो दिवस मला आजही आठवतो. माझ्या वडील भावंडांच्या आणि बहिणींच्या रागाची पर्वा न करता मी आईच्या मांडीवर झोपत असे. माझे विश्व फक्त आईलाच समजत असे. मध्यरात्री जेव्हा कधी मी रडत उठे, तेव्हा माझी वेदना आईलाच समजत असे. तिचा मायाळू स्पर्श माझी वेदना लगेचच दूर करीत असे. आई, तुझे प्रेम, तुझी ममता आणि तुझी श्रध्दा मला शक्ती देते. जगाशी मुकाबला करण्याचे भयविरहित सामर्थ्य देते. त्याचबरोबर सर्वशक्तिमान परमेश्वराची शक्तीही देते. आई, तू शेवटच्या न्यायनिवाडयाच्या दिवशी पुन्हा भेटशील ना?''

आपल्या वडिलांसंबंधीच्यादेखील त्यांच्या अशाच नाजूक भावना आहेत. इंग्रजांचे राज्य असताना एकदा मोठे वादळ निर्माण झाले आणि वडिलांची बोट वादळात नष्ट झाली. ती बोट पुन्हा बांधण्याचे काम वडिलांनी कसे केले आणि त्यापासून आपल्याला जीवनभर कशी प्रेरणा मिळाली, हे ते वारंवार सांगत. दुसरा एक प्रसंग त्यांनी वारंवार सांगितला आहे, तो म्हणजे त्यांचे वडील रामेश्वरच्या मशिदीचे इमाम होते. त्यांच्या घरी रामेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी, चर्चचे मुख्य पाद्री येत आणि वेगवेगळया विषयांवर चर्चा करीत, एकत्र चहापान होई. सामंजस्यपूर्ण जीवनाचा संस्कार बालपणीच त्यांच्या मनावर झाला. त्यामुळे सत्य एक असून त्याकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत, हे वेदवाक्य ते जीवनभर जगत राहिले.


गुरूंविषयी त्यांची अशीच एक सुंदर कविता आहे. ते म्हणतात की, गुरू म्हणजे प्रकाश, आणि हा प्रकाश 'देव एक आहे', याचा संदेश देत असतो, असे ते म्हणतात. याचप्रमाणे रक्षाबंधनावर त्यांनी एक कविता केलेली आहे. त्या कवितेचा आशय असा की, पौर्णिमेच्या दिवशी आपण जो दिवा लावतो त्यातून आनंद आणि शांतीचा प्रवाह बाहेर येत राहतो. सामंजस्यपूर्ण घर हा आनंदाचा झरा असतो. सात्त्वि घरेच सुंदर राज्य निर्माण करतात. या दिवशी भगिनी आपल्या भावांना राखी बांधून आठवण करून देतात की, जे सत्य असेल आणि जे स्वच्छ असेल तेच करा. कपाळावर तिलक लावून आणि डोक्यावर अक्षता टाकून जणू काही त्या सांगत असतात की, मस्तकात योग्य विचार आणि उत्तम कृतीच असू द्या.

स्वातंत्र्याचा सन्मान आणि रक्षण करणे हेच कर्तव्य

शाखेत रक्षाबंधन आणि गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. या दोन्ही उत्सवांचा एक व्यापक सामाजिक संदेश आहे. शाखेत न जातादेखील एपीजे अब्दुल कलाम यांना हा संदेश समजलेला आहे आणि तो ते आपल्या भाषेत, कवितेत व्यक्त करताना दिसतात.

अशा या शाखेत न गेलेल्या स्वयंसेवकाने भव्य-दिव्य, उन्नत, समर्थ भारताचे स्वप्न पाहिले. त्यांचे एक अतिशय उत्तम भाषण आहे. त्यात ते म्हणतात, 'तीन हजार वर्षांच्या आपल्या इतिहासात ग्रीक, तुर्क, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, फें्रच आक्रमक म्हणून आले. त्यांनी आपल्याला लुटले. आपल्याजवळचे धन घेतले. परंतु आपण तशा प्रकारचा व्यवहार अन्य देशांशी केलेला नाही. आम्ही कोणत्याही देशाला जिंकलेले नाही. आम्ही त्यांच्या जमिनी हडप केलेल्या नाहीत, आपली संस्कृती, इतिहास त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही. कारण आपण स्वातंत्र्याचा सन्मान करतो. या स्वातंत्र्याचे रक्षण आपल्याला प्राणपणाने केले पाहिजे.'

स्वप्न विकसित भारताचे

'भारताविषयीचे माझे दुसरे स्वप्न विकासाचे आहे. आपण विकसनशील देश म्हणण्याचे सोडून दिले पाहिजे, आणि विकसित देशाच्या रांगेत येऊन बसले पाहिजे. माझे तिसरे स्वप्न आहे, आपण सामर्थ्यसंपन्न झाले पाहिजे. सामर्थ्यसंपन्न झाल्याशिवाय जगात कोणीही आपल्याला किंमत देणार नाही आणि त्यासाठी आपण सर्व प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे.

आपण नकारात्मक विचार करण्याचे सोडून दिले पाहिजे. दूध उत्पादन, तांदूळ उत्पादन, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट या बाबतीत आपण जगात पहिले आहोत. आपल्या देशात यशाच्या लाखो कथा आहेत. त्या सोडून आपण भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार यांच्याच कथा चालवीत राहतो. परकीय मालाविषयी आपल्याला खूप आकर्षण वाटते, परकीय तंत्रज्ञानाचे आपल्याला आकर्षण  वाटते, सरकारवर आपण वाटेल तशी टीका करतो. व्यवस्था सडल्या आहेत, अशी टीका करतो. फोन चालत नाहीत, नगरपालिका म्हणजे कचऱ्याच्या अड्डे म्हणतो. परंतु हे सुधारण्यासाठी मी काय करू शकतो, याचा विचार आपण अजिबात करीत नाही. देश घडवायचा असेल तर स्वत:पासून त्याची सुरुवात करायला पाहिजे. केनेडीने अमेरिकन जनतेला जे सांगितले त्यात थोडा बदल करून असे म्हणता येईल की, भारत मला काय देणार यापेक्षा मी भारताला काय देणार आहे, याचा विचार आपण केला पाहिजे.'

शाखेचा शेवट प्रार्थनेने होतो. आणि या प्रार्थनेच्या पहिल्याच चरणात असे म्हटले गेले आहे की 'हे वत्सल मातृभूमी, मी तुला वंदन करतो आणि तुझ्याच सन्मानासाठी माझा हा देह कामी येवो, अशी मी प्रार्थना करतो.' संघाची ही प्रार्थना न म्हणताही एपीजे अब्दुल कलाम हा भाव जगत राहिले. परमेश्वराने भारतमातेच्या या लाडक्या पुत्रास आपल्याकडे बोलावून घेतले आहे. भारतमातेची देवाकडे प्रार्थना अशी आहे की, पुन्हा असा पुत्र परमेश्वराने तिला द्यावा.

vivekedit@gmail.com