बोलून नाही, तर करूनही दाखवलं

विवेक मराठी    01-Oct-2016
Total Views |

गेल्या आठवडयातल्या संपादकीयचा समारोप करताना आम्ही म्हटलं होतं की, 'शत्रूला कायमची जरब बसेल अशी निर्णायक खेळी सरकारने खेळावी आणि भारतीयांनी संयम बाळगत त्याला पाठिंबा द्यावा.' आणि खरोखरच अभिमान वाटावा असा पलटवार करून भारताने केवळ पाकिस्तानला नव्हे, तर संपूर्ण जगाला चकित करून सोडलं. या ठोस कृतीबद्दल भारतीय सैन्याचं, त्यांना पुरेसं स्वातंत्र्य देणाऱ्या आणि पूर्ण पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधानांचं, संरक्षणमंत्र्यांचं मन:पूर्वक अभिनंदन!


या आठवडयाभरातल्या घडामोडी भारताकडून काही ठोस कारवाई होणार याचं सूचन करत होत्याच, तरीही अपेक्षेपेक्षाही लवकर कारवाई करून भारतीय लष्कराने सर्वांनाच चकित करून सोडलं. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी युनोतल्या आपल्या भाषणात, काश्मीरवर अधिकार न सांगण्याबाबत अतिशय ठामपणे पाकिस्तानला दिलेला इशारा आणि जहाल शब्दांत केलेली निरर््भत्सना ऐकल्यावर सरकार उरीचा बदला लवकरच घेईल, याचा अंदाज आला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानची कोंडी करण्याच्या हालचालीही सुरूच होत्या. पुढच्या महिन्यात पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय जाहीर झाल्यावर नेपाळ, भूतान, बांगला देश, अफगाणिस्तान, श्रीलंका या सदस्य देशांनीही आपण सहभागी होत नसल्याचं कळवलं. हीदेखील पाकिस्तानची नाचक्कीच होती. त्याचबरोबर, भारताकडून दिला गेलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा आणि त्या दर्जामुळे प्राप्त होणाऱ्या व्यापारविषयक सवलतींनाही येत्या काही दिवसांतच पाकिस्तान मुकण्याची चिन्हं आहेत. या आणि अशा घडामोडींमध्ये सगळयांना गुंतवून ठेवत, आवश्यक ती गुप्तता राखत पाकव्याप्त काश्मीरमधील 7 दहशतवादी प्रशिक्षण तळांवर भारतीय लष्कराने हल्लाबोल केला. या अनपेक्षित हल्ल्याने दहशतवादी आणि त्यांना राजरोसपणे पोसणारा पाकिस्तानही हडबडून गेला.

'सर्जिकल स्ट्राईक्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वैशिष्टयपूर्ण कारवाईची माहिती देणारे तपशीलवार लेख आतापर्यंत प्रसिध्द झाले आहेत. सैनिकाच्या कौशल्याची कसोटी पाहणारी ही कारवाई, अचूक नियोजन आणि परिपूर्ण तयारीनिशी, काटेकोर वेळापत्रकाचा अवलंब करत रात्रीच्या वेळी थेट शत्रूहद्दीत घुसून करण्यात येते. यातली जोखीमही मोठी आणि परिणामही तसेच असतात. आपला एकही सैनिक गमावू न देता ज्या शिताफीने आपले बहादूर गडी परतले, त्यावरून ते किती तयारीचे आहेत याचीही या निमित्ताने प्रचिती आली.

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानची जागतिक स्तरावर कोंडी करण्याच्या विविध हालचाली भारताकडून चालू असतानाही, सीमारेषेपार पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर काही दहशतवादी भारतात घुसण्याच्या इराद्याने आल्याची आणि त्यांना पाकी सैनिक मदत करत असल्याची खात्रीपूर्वक खबर भारतीय लष्कराला मिळाली आणि ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक्सचा निर्णय पक्का झाला. भारताकडून प्रतिहल्ल्याची अपेक्षा नसलेल्या पाकिस्तानला या कारवाईमुळे चांगलाच धक्का बसला असावा. कारण त्यांच्या लष्करप्रमुखांकडून, पंतप्रधानांकडून कारवाईनंतर आलेल्या प्रतिक्रिया त्यांच्या सैरभैर अवस्थेचं दर्शन घडवत होत्या.

दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या 7 तळांवरच्या 40 अतिरेक्यांना आणि 2 पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठवलं. पाकिस्तानच्या खात्रीसाठी दहशतवाद्यांच्या डी.एन.ए.चे नमुनेही देण्यात येणार असल्याचं, तसंच पुराव्याची आवश्यकता असेल तर या हल्ल्याची ध्वनिचित्रफीतही सादर केली जाईल असं भारतातर्फे सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानची कोंडीच नव्हे, तर पार मुस्कटदाबी करणारी, दूरगामी परिणाम करणारी अशी ही कारवाई असल्याचं आता स्पष्ट होत आहे.

दहशतवाद्यांना आपली भूमी वापरू देण्याबरोबरच त्यांना प्रशिक्षण देण्याचं आणि शस्त्रास्त्रं पुरवण्याचं कामही पाकिस्तान करत असल्याची कबुली दहशतवाद्यांनी दिल्याचं, भारताचे लष्करी कारवायांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 

आपण कितीही कुरापती काढल्या, तरी सहिष्णुतचा अंगीकार केलेला भारत आपल्याला प्रत्युत्तर देणार नाही, या भ्रमामुळे  पाकिस्तानने उरी येथे हल्ला करण्याचं दु:साहस केलं. वास्तविक अमेरिकन वृत्तपत्राने याबाबत सावध करायचा प्रयत्नही केला होता. 'उरी येथे पाकिस्तानने केलेला हल्लाहा फक्त भारतावर केलेला हल्ला नसून, या हल्ल्याने देशहितासाठी धोका पत्करणाऱ्या भारताच्या स्वाभिमानी पंतप्रधानाला डिवचण्याचं काम केलं आहे' असा त्या वृत्तपत्राने दिलेला गर्भित इशारा ना पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी मनावर घेतला, ना त्यांच्या हातातलं बाहुलं बनलेल्या नवाज शरीफ यांनी.

येता-जाता भारताला पोकळ धमक्या देऊन डिवचण्याचे परिणाम काय होतात याचा अनुभव पाकिस्तानने याआधी 65च्या, 71च्या आणि कारगिलच्या युध्दात घेतला होताच. तरी या वेळी दहशतवाद्यांच्या मदतीने उरीचं दु:साहस पाकिस्तानने केलं.

देशासाठी पराक्रम गाजवणं हा लष्कराचा स्थायिभाव असला, तरी जोवर राज्यकर्ते हिरवा कंदील दाखवत नाहीत, तोवर त्यांना पुढे जाता येत नाही. लष्कर अशा साहसपूर्ण प्रतिहल्ल्याची वाटच पाहत होतं. ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक्समुळे त्यांना ही संधी मिळाली, आणि त्या संधीचं त्यांनी शब्दश: सोनं केलं.

हे ऑपरेशन पूर्ण झालं असून यापुढे कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच ही कारवाई दहशतवादाविरोधात होती, त्याचा नायनाट करण्यासाठी पाकिस्ताननेही सहकार्य करावं, असं आवाहन या कारवाईनंतर भारतीय लष्कराने केलं आहे.

या घटनेने भारतीय लष्करात तर चैतन्य निर्माण झालं आहेच, त्याचबरोबर सर्वसामान्य भारतीयांमध्येही भारतीयत्वाची भावना नव्याने उफाळून आली आहे. सर्व प्रकारचे भेदाभेद लयाला जाऊन, सर्वात आधी आपण भारतीय असल्याची भावना पुन्हा एकदा सर्वांच्या मनात जागी झाल्याचं दिसत आहे, ही गोष्टही कमी मोलाची नाही.

आपल्या कोल्हेकुईने सिंहाला घाबरवण्याचे दिवस आता संपले आहेत, याची पाकिस्तानने यापुढे खूणगाठ बांधावी. भारतीय सैन्य तर सामर्थ्यवान आहेच, त्याचबरोबर त्यांना पराक्रम गाजवू देणारं सरकार आज सत्तेत आहे याची जाणीव पाकिस्तानला जेवढया लवकर होईल, तेवढी देश म्हणून त्याचं अस्तित्व जगाच्या नकाशावर राहण्याची शक्यता आहे.