भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता

विवेक मराठी    12-Oct-2016
Total Views |

****बाळासाहेब पाटील***

 या जगात जो जन्म घेतो, त्याला मृत्यू ठरलेला असतो. कारण मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य आहे, परंतु मरण हे अंतिम सत्य असलं, तरी ते अकाली येणं याचं प्रचंड दु:ख असतं आणि नेमकं तेच सतीशच्या वाटयाला आलं आणि दु:खचा डोंगर कुटुंबावर कोसळला या अकाली मृत्यूनेचं!


माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो असं म्हणतात. पण सतीश मात्र रिकाम्या हाताने गेला नाही. तो जाताना लोकांचे प्रचंड प्रेम घेऊन गेला, हे त्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी जमलेल्या प्रचंड गर्दीने सिध्द केलं.

माणसं गेल्यानंतर त्यांच्याबद्दल नेहमीच चांगलं बोलल जातं. पण ज्यांच्या जिवंतपणीसुध्दा आणि मृत्यूनंतरही चांगलं बोललं जातं, अशांपैकी सतीश एक होता.

भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्ह्याच्या संघर्षमय वाटचालीतील सतीश हा मैलाचा दगड ठरला. सतीश हा संघ ते जनसंघ, जनसंघ ते जनता पार्टी आणि जनता पार्टी ते भाजपा अशा परिवाराच्या वारीतील सगळयांना बरोबर घेऊन जाणारा एक सच्चा वारकरी होता. संघाच्या मुशीतून तयार होऊन भाजपाच्या कुशीत कार्यरत असलेला सतीश सिनिअर कार्यकर्ता होता. पद कुठलं यापेक्षा जबाबदारीला महत्त्व देणारा कार्यकर्ता होता. ज्येष्ठतेचा अहंकार त्याला जरासुध्दा श्ािवला नाही. राजकीय वाटचालीतील त्याची सिनिऑरिटी त्याने कधीच आडवी येऊ दिली नाही. सांगेल ती जबाबदारी स्वीकारली.  सांगेल तिकडे प्रवास केला, तेही खिशात पैसा नसताना.

माझ्याबरोबर पेण शहराध्यक्ष, जिल्हा खजिनदार, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा प्रवक्ता अशा अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या.

रायगड जिल्हातल्या विकासकामाची दूरदृष्टी असलेला हा खरा समाजसेवक होता. विकासकामांची त्याच्या नजरेतील अनेक उदाहरणे देता येतील. आज दिसणारा खारपाडा पूल हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. सन 1995च्या अगोदर खारपाडा येथील असणाऱ्या अरुंद पुलावर गौरी-गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांना 24-24 तास ट्रॅफिक जॅममध्ये राहावं लागायचं. पण आज मुंबई-ठाण्यापासून, रत्नााग्ािरी, सिंधर्ुदुगपर्यंत जाणाऱ्या सर्व प्रवाशांना बिनदिक्कतपणे खोळंबा न होता वेळेत, ज्या खारपाडयाच्या मोठया पुलावरून जाता येतं, त्या पुलाच्या निर्र्मितीकरिता सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात सतीशचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून कदाचित त्याच्या शोकसभेमध्ये 'खारपाडा' पुलाला सतीश चंदने यांचं नाव द्यावं अशी वक्त्यांनी मागणी केली असावी; आणि हे खरं आहे, कारण सर्व माणसं सारखी असूनसुध्दा एकसारखी वागत नाहीत. काही जण गटातटांचे राजकारण करतात, तर काही माणसं गटतट नष्ट करून सर्वांना एकत्र आणण्याचं काम करतात. उदाहरण द्यायचं झालं, तर भिंत आणि पूल यांचं देता येईल. भिंत बांधण्यासाठी दगड, विटा, रेती, सिमेंट हे सामान लागतं आणि तेच पूल बांधण्यासाठीही लागतं. पण जेव्हा याच दगड, विटा, रेती, सिमेंट यांनी भिंत तयार होते, तेव्हा ती दोन टोकांचं विभाजन करते; पण याच दगड, विटा, रेती, सिमेंटमध्ये तयार झालेला पूल दोन टोकांना जोडण्याचं काम करतो आणि नेमकं तसंच दोन टोकांना जोडण्याचं काम सतीश चंदने आयुष्यभर करत होता. म्हणून त्याचं नाव खारपाडा पुलाला द्यावं अशी अनेकांची इच्छा आहे.

मला आठवतंय - सन 1995मध्ये पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी पेण मतदारसंघामध्ये उमेदवाराची गरज होती. स्व. गोपीनाथजी मुंडे व स्व. शरदभाऊ  कुलकर्णी यांनी चंदने यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही पक्षाचा आदेश मानून, तो मानसन्मान आहे असं समजून भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने राजकीय वाळवंट असणाऱ्या रायगड जिल्ह्यात पडण्यासाठीसुध्दा उभं राहून पक्षाचा आदेश श्ािरसावंद्य मानणारा हा एक मावळा होता. स्व. महाजनजी, स्व. मुंडे, स्व. शरदभाऊ यांच्याशी मैत्री असलेला कार्यकर्ता इतका साधा असू शकतो, हे त्याने आपल्या वागण्यातून दाखवून दिलं आणि म्हणूनच अशा मावळयांचं समर्पण भारतीय जनता पार्टी कधीही विसरत नाही. 


या निमित्ताने इतिहासातला एक प्रसंग आठवतो.   राज्याभिषेकाच्या प्रसंगी श्ािवराय 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे जात होते. सिंहासनाच्या पायऱ्या चढता चढता प्रत्येक पायरीवर हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या प्रत्येक मावळयाची आठवण काढत होते. स्वराज्य मिळवण्यासाठी मावळयांनी दिलेलं बलिदान महाराज कधीही विसरले नाहीत.

तसंच मा. पंतप्रधान नरेंद मोदीजींनीही पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये प्रवेश करताना पहिल्या पायरीवर माथा टेकून पक्षासाठी कार्यकर्त्यांनी त्याग, संघर्ष आणि समर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांची आठवण काढली. सतीश चंदनेसारख्या निरलस कार्यकर्त्यांचं पक्षाच्या वाटचालीतील योगदान पक्ष कधीही विसरणार नाही, याची म्हणूनच खात्री वाटते.

सतीशला रोजची डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या जाण्याआधी काही दिवस त्याची डायरी माझ्या मित्राला पाहायला मिळाली. त्यात पहिल्या पानावर सतीशचं नाव-गाव व जन्मतारीख लिहिली होती. पुढची दैनंदिनी लिहिण्यासाठी बरीच पानं कोरी होती, पण ती पानं कोरीच रािहली. आणि सतीशने फक्त जन्मतारीख लिहिली होती. पण नियतीने खूप लवकर त्याच्या जाण्याची तारीख काळयाकुट्ट अक्षरात लिहिली. नियतीचा खेळ कुणासही समजत नाही, हेच खरं.

सतीश जाण्याअगोदर पनवेलला आला होता. त्याने मला फोन केला, त्या वेळी मी बाहेर होतो. मला म्हणाला, ''संघसरिताचा खंड पूर्ण झाला आहे. त्याचं वाटप चालू आहे.'' चार वर्षांपूर्वी त्याची ऍंजिओेप्लास्टी झाल्याचं मला माहीत होतं. त्यामुळे मी म्हणालो, ''जास्त धावपळ करू नको, तब्येतीला सांभाळ.'' त्या वेळी तो हसत हसत म्हणाला, ''विवेकचं काम करत मला मरण आलं तर मी धन्य होईन.'' हे ऐकून मी सुन्न झालो. नियतीने तेवढंच त्याचं ऐकलं. तो पेणला परत गेला. सकाळी उठून पाली सुधागड येथे संघसरिताचे खंड देण्यासाठी अकरा खंड तयार ठेवून सकाळी उठण्यासाठी लवकर झोपला, तो कधीही न उठण्यासाठी. विवेकचं काम करताना मरण येणार हे नियतीने रात्रीच पक्कं केलं होतं आणि म्हणून संघसरिताचे खंडवाटप व विवेकचा पुढचा प्रवास इच्छा असूनही अपुरा राहिला. तो आपण सर्वांनीर् पूण करू या व त्याच्या कुटुंबाच्या मागे आपलं आयुष्य असेपर्यंत खंबीरपणे उभे राहू या. तो स्वत:च्या घरासाठी नाही, तर समाजासाठी जगला. आता समाज म्हणून आपण त्याच्या घराची काळजी घेऊ या, हीच त्याला खरी भार्वपूण श्रध्दांजली ठरेल.

(लेखक भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत.)


कर्म हीच पूजा

स्व. सतीश चंदने पूर्वी रिक्षाचा व्यवसाय करीत असत. रिक्षा मालक-चालक संघटनेचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत होते. त्या संघटनेच्या जिल्हा-विभाग-राज्य स्तरावरील नेत्यांशी अत्यंत सलोख्याचे आणि स्नेहादराचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या शोकसभेला डोंबिवली, ठाणे, पेण, खोपोली, माथेरान इ. ठिकाणचे रिक्षा संघटनेतील मित्र, पदाधिकारी असे सर्व जण उपस्थित होते.

स्व. सतीशच्या रिक्षाच्या पाठीमागे एक सुविचार अतिशय वेधक स्वरूपात रंगविला होता. तो होता - 'कर्म हीच पूजा.' हा केवळ त्यांच्या रिक्षावरचा संदेश नव्हता, तर खरे तर तो त्यांच्या स्वभावच बनला होता.

'कर्म हीच पूजा' याप्रमाणेच त्यांची जीवनचर्याही होती. अत्यंत किफायतशीर भाडे अाकारणी करणे, लोभाला बळी न पडणे, प्रवासी वृध्द-स्त्रिया-मुले यांना विविध प्रकारे मदत करणे हा त्यांचा स्वभाव बनला होता.

एक प्रसंग अतिशय मर्मस्पर्शी आहे. खोपोलीचा एक रिक्षाचालक अपघातग्रस्त झाला होता. तो मदतीसाठी आमदार निवासात आला होता. सतीश चंदने त्याच वेळी आ. अशोकराव मोडकांना भेटण्यासाठी आपल्या मित्रांसह पोहोचले होते. तो ओळखीचा ना पाळखीचा, पण तो खोपोलीचा आहे आणि रिक्षाचालक आहे एवढेच सतीशला पुरेसे होते. त्याचा दयाभाव, मदतीचा हात देण्याचा धर्म जागा झाला. त्याने त्याला पेणला बोलावले. फारशी मदत जमा झाली नाही. सतीशने स्वत:च्या नावावर अर्बन बँकेतून 50,000 रुपयांचे कर्ज काढले आणि विनाविलंब-बिनाशर्त परतीची खात्री नसताना दिले.

आणि अनपेक्षितपणे जे घडले, त्याची पूर्तता सतीशने त्याच्या मित्रांच्या मदतीने केली. त्या कर्जाची फेड 50,000चे 1,50000-2,00,000 झाल्यानंतर प्रयत्नपूर्वक केली. याचे नाव 'कर्म हीच पूजा.'

9403068168