एक निष्काम कर्मयोगी - सतीश चंदने

विवेक मराठी    12-Oct-2016
Total Views |

***विनायक जोशी****

संघकामाचे वैशिष्टय असे वर्णन करतात की, 'जसा आहे, तसा स्वीकारायचा आणि संघकामाला हवा तसा घडवायचा.' सतीशची संघातली जडणघडण हे या संघटनासूत्राचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सांगता येते.
'शिशु-बाल स्वयंसेवक' ते 'प्रौढ जाणता कार्यकर्ता ही त्याची वाटचाल हे कौतुकास्पद आहे. नऊ-दहा वर्षांचा असताना विठ्ठल आळीतून खेळण्यासाठी शाखेत आलेला सतीश हा आता प्रौढ जाणता, विचारी कार्यकर्ता, जनसंघ-भाजपचा नेता, फर्डा वक्ता येथपर्यंत कसा येऊन पोहोचला हे पाहिले पाहिजे.

ही सारी किमया कशी घडली, हे त्याच्या बोलण्यातून, संवादातून लक्षात येते. अनेक प्रसंग कार्यक्रम, उपक्रम यात त्याचा सकि्र्रय सहभाग असे. त्या स्मरणाच्या आधारेच हे सारे शब्दबध्द करता येईल.

सतीश स्वत:च सांगत असे - ''आम्ही  विठ्ठल आळीतले पाच-सहा जण केवळ खेळण्यासाठी शाखेत येऊ लागलो. आमचा बाल शिक्षक शाखा सुटली की प्रभात बेकरीतली बिस्किटे घेऊन खाऊ घालत असे. त्यामुळे तोही आम्हाला आवडायचा आणि शाखेचीही गोडी लागली.''

ते सारे स्वयंसेवक आजही स्वयंसेवक आहेत. व्यवसायी, कार्यकर्ते, उद्योजक, नोकरदार असे विविध क्षेत्रांत असूनही संघाची गोडी, ओढ अजूनही टिकवून आहेत. उत्सव-कार्यक्रमांना उपस्थित असतात.

शाखेची गोडी लागली की मग उत्सव, कार्यक्रम, दिवाळी वर्ग, शिबिर, संघ शिक्षावर्ग असा तो क्रमच असतो. त्यातून स्वयंसेवकाचा कार्यकर्ता, त्यातून नेता, अधिकारी अशी प्रगती करीत जातो. अशा स्वयंसेवकाला संघाचा विस्तार, खोली, आवाका हे सारे क्रमाक्रमाने कळत जाते आणि आपोआपच त्याची जाणीव विस्तारते, क्षमता वाढतात आणि तो यशस्वी निष्ठावान स्वयंसेवक बनतो.

'जाती-पंथ, पक्ष, या पलीकडचा संघ', उच्चनीचता, विषमता, वर्ण भेद न मानणारा संघ हे सतीशच्या अंगवळणीच पडले. त्याने ते अंगीकारले आणि त्याप्रमाणे वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात त्याचे आचरण होते. स्वयंसेवकाचे हे वैशिष्टय त्याने समाजाला जाणवून दिले, प्राणपणाने जपले, म्हणूनच त्याच्या प्राणोत्क्रमणानंतर त्याच्या अंत्ययात्रेला सर्व पक्षांचे, जातींचे, धर्माचे त्याचे स्नेही साथी, मित्र हे भर पावसातदेखील उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

गोपाळ कृष्ण हॉल मधील शोकसभा

स्स्व. सतीशकरिताची शोकसभा हीदेखील पेणच्या इतिहासात अपूर्वच म्हटली पाहिजे. त्या सभेलादेखील गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, स्वधर्म-परधर्म आपला-परका असा कोणताच भेदभाव नव्हता. सर्वांनीच 'आपला सतीश', 'माझा मित्र', 'मला मदत करणारा', 'आमच्या जातीचा नसतानाही धावून येणारा' अशा शब्दांमध्ये आत्मीयता आणि वेदना व्यक्त केल्या. जणू आपल्या घरातलाच कर्तासवरता माणूस गेला आहे असे त्या सर्वांनाच वाटत होते. खरे तर दशक्रिया विधी आणि तेरावे हे कौटुंबिक कार्यक्रम. पण सतीश हा 'जगसोयरा' होता. त्यामुळे हे विधीदेखील सामाजिक स्वरूपाचे झाले.

विकसित व्हावे अर्पित होऊ नि जावे  

'विकसित' होण्याची अविरत प्रक्रिया त्यांने अंगीकारली होती आणि 'समर्पणाची' भावना त्याच्या रोमारोमात भरली होती. 'संघसरिता' हा त्याच्या जीवनातला अखेरचा उपक्रम ठरला. त्यानिमित्ताने त्याने वयोवृध्द स्वयंसेवकांशी कसे बोलावे? स्वर्गीय स्वयंसेवकांच्या मुला-नातवंडांशी संवाद साधून त्यांच्याच वडिलांचे-काकांचे-आजोबांचे मोठेपण जाणवून द्यावे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण द्यावे, त्यांची संघशरणता वर्णावी, मोठेपणा पटवून द्यावा - हे सारे करणे म्हणजे दिव्यच होते. पण ते त्याने प्रयत्नपूर्वक साधले. अशी अनेक घरे त्याने शोधली - सांधली आणि शेवटी 'संघसरिता'शी बांधली. त्यामुळे 'संघसरिता' 36-37 सालापासूनची अगदी परवापर्यंतची दोन्ही काठांवरून दुथडी वाहत आहे. सतीशने 'संघसरिता'साठी जिवाचे रान केले, ते अनेकांनी पाहिले आहे, अनुभवले आहे आणि संघसरिता प्रकाशनाचे वेळी त्याचा गौरव झाल्याचे पाहून त्याच्या सुहृदांना आनंद झाला.


सतीशची आर्थिक आघाडी

एक छोटेसे दुकान हे त्याच्या उपजीविकेचे साधन होते. त्यात तो फार रमला नाही. एका  जागी बसणे हे त्याच्या स्वभावाच्या विरुध्द होते. नंतरच्या काळात तेही त्याने भाडयाने - चालवायला दिले. त्याचे दुकानाचे येणारे भाडे हेच त्याच्या चरितार्थाचे साधन. त्याच्या सौभाग्यवती यादेखील एका पतसंस्थेत सामान्य उत्पन्नाचीच नोकरी करतात. घरात मुलगी नववी-दहावीतली. मुलीची आजीही 83 वर्षांची, घरातच लेकीला मदत करणारी. अशा सर्व पार्श्वभूमीवर त्याला त्याच्या संघमित्रांनी सुचविले, ''सतीशराव! तुम्ही विवेकचे काम का नाही करत? तुम्हाला, तुमच्या स्वभावाला ते साजेसे आहे. बघा करून जमते का ते?'' सतीशने विवेकचे काम आनंदाने स्वीकारले आणि खरंच तो 'विवेकमय'च झाला.

विवेक हाच ध्यास। विवेक हाच श्वास

सतीशला विवेकने अक्षरश: झपाटले, इतके की एक दिवसाआड त्याचा विवेकसाठी प्रवास अस    े आणि सर्व जुळवाजुळव - म्हणजे लेख, फोटो, वर्गणीदारांचे नूतनीकरण, जाहिराती इ. एक ना दोन अनेक गोष्टी तो लीलया करीत असे आणि आठवडयातून एकदा तरी तो विवेकच्या कामासाठी कार्यालयात किंवा मुद्रणालयात जात असे. त्याने ऊन-पाऊस, वारा-वादळ, तहान-भूक अशी कशाचीच तमा बाळगली नाही आणि अक्षरश: झोकून देऊन तो त्या कामात रमला होता. अनेकांनी त्याला सांगून पाहिले, ''अरे, वयाच्या मानाने एवढी धावपळ करू नकोस. (वय 58). आमची धावपळ उडवशील एखाद्या दिवशी!'' पण छे! हे ऐकून थांबेल तर तो सतीश कसला? सतीशला भीती, माघार, कामचुकारपणा, टाळाटाळ हे शब्दच माहीत नव्हते. हे सारे सतीशच्या वाटेस जाण्यास धजावले नाहीत आणि सतीश मात्र आपल्या निर्धारित वाटेवर चालतच राहिला.


एका बैठकीत त्याने जे सांगितले, तसेच त्याच्या जीवनात घडले. त्याने   सांगितले, ''आमची विवेक प्रतिनिधींची बैठक होती. सर्व विषय झाले. त्या वेळी मला मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. मी म्हणालो, हे काम ती मनापासून स्वीकारले आहे. त्यामुळे हेच काम करता करता माझे देह पडला, तरी मी माझे जीवन सार्थकी लागले असे मानेन.'' आणि खरेच परमेश्वराने व नियतीने त्याची इच्छा पूर्ण केली. धन्य तो सतीश आणि त्याची मनीषा!   

जीवनातला शेवटचा दिवसही सार्थकी

19 सप्टेंबर 2016, सोमवार हा या कर्मयोग्याच्या जीवनातला शेवटचा दिवस ठरला. सकाळी पूजा-अर्चा करून नेहमीप्रमाणे भेटीगाठीसाठी बाहेर पडला. विवेकच्या जोडीला 'एकता' आणि 'सहकार सुगंध' हेही काम तो करीत असे. 'सहकार सुगंध'ची दहा जणांची वर्गणी भरून त्याच्या पावत्या उद्या पनवेलला न्यायच्या होत्या. संघसरिताचे 5-6 खंड त्याच्या 'सबळ' झोळीत होते. आजचे वितरण आणि उद्याचे नियोजन त्याच्या मनात कागदावर आणि घरच्या फळयावर लिहून तयार होते. त्याचप्रमाणे रात्री 11.00 वाजता घरी परततानाही दोन मित्रांना भेटून ''उद्या भेटू!'' सांगून सतीश घरी परतला. परंतु नियतीचे नियोजन वेगळेच होते.

उष:काल झालाच नाही

दि. 20ची सकाळ झाली, पण सतीशच्या जीवनात उष:काल झालाच नाही. ती त्याच्यासाठी काळरात्रच ठरली. सकाळी सिध्दीने (त्याच्या मुलीने) बाबांना हाक मारली, पण 'ओ' आलीच नाही. देह निष्प्राण पडला होता. तिने वर जाऊन कावतकर काकांना (प्रमोद कावतकर यांना) बोलावले. त्यांनी पाहिले - सतीशच्या देहातून प्राणपाखरू उडाले होते. उरला होता सतीश... पण देहरूपाने! ध्येयासाठी प्राणार्पण करणारा एक निष्काम कर्मयोगी तुम्हाला-आम्हाला दु:खसागरात लोटून तो मात्र अनंतांच्या प्रवासाला निघाला होता...   

             9850794507

------------------------

आवाहन

स्वर्गीय सतीश चंदने यांच्या  कुटुंबीयांसाठी

कुटुंब कल्याण निधी

सतीश चंदने यांचे अकाली निधन झाले, त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी, इ. दहावीत शिकणारी मुलगी, त्यांच्या सासूबाई असा परिवार आहे. सतीशचे उत्पन्न मोजकेच होते, पत्नीचीही नोकरी अल्प उत्पन्नाची असून तीही खंडित झाली आहे. त्यामुळे उपजीविकेचाच प्रश्न गंभीरपणे उभा राहिला आहे. त्याचे कुटुंब सावरण्यासाठी दरमहा काही रक्कम व्याजरूपाने त्यांना मिळावी, यासाठी एक मोठी रक्कम उभी करण्याचे त्याच्या मित्रपरिवाराने ठरविले आहे.

आपण पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क मदत करू शकता किंवा प्रत्यक्षपणे पुढील खात्यामध्ये थेट पैसे पाठवू शकता.

समृध्दी सतीश चंदने  

बँक खाते - पुणे जनता सहकारी बँक शाखा- पेण

IFSC CODE : JSBP 0000059

बँक खाते क्रमांक 059220100000232

संपर्क - विश्वास मुळये - 9403068168

विनायक जोशी - 9850794507

प्रमोद कावतकर -9422690887

सुधीर जोशी : 942269088, आनंद जाधव : 9373710327