ईश्वरदत्त प्रतिभेचा आविष्कार जयदेवाचे गीतगोविंद

विवेक मराठी    26-Oct-2016
Total Views |

***मंदाकिनी गोडसे***

संस्कृतमधील स्तोत्ररचनांच्या काळातली ही निर्मिती असली, तरी गीतगोविंद हे काही श्रीकृष्णाचं स्तोत्र नव्हे. गीतगोविंदातला कृष्ण हा तत्त्वज्ञ किंवा राजकारणी कृष्ण नसून तो वृंदावनात कामक्रीडा करणारा कृष्ण आहे. त्याच्या वासंतिक क्रीडेचं अत्यंत शृंगारिक वर्णन जयदेवाने केलं आहे. गीतगोविंदचा विषयच मुळी असा आहे की, जिथे कृष्णाच्या ईश्वरीय महतीला स्थान नाही. रतिभावनाच मुळात ईश्वरीय आहे आणि ती सर्जनाची गंगोत्री आहे. तो केवळ रतिभोग नाही. ती स्वार्थभोगाने गढूळ झालेली नाही. निसर्गनिर्मित रतिभावनेचं आत्मप्रकटीकरण हा गीतगोविंदचा आत्मा आहे.

 
विविधतेने नटलेल्या या भूतलावर प्रत्येक क्षेत्रातल्या काही गोष्टीच सर्वोत्तम उच्चतेला पोहोचलेल्या असतात. त्यांचं श्रेष्ठत्व हे कालातीत असतं. त्या जगमान्य होतात आणि बहुजनांना निभर्ेळ आनंद देतात. कालाच्या ओघात क्वचित त्याच्या रूपात काही बदल होतात, परंतु मूळ गाभा हा अभंग असतो. आपल्या संस्कृत वाङ्मयात अशा अनेक साहित्यकृती आहेत. प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे तर ईश्वरस्वरूप प्राप्त झालेले महामानव!

एक मर्यादापुरुषोत्तम, तर दुसरा मानवी जीवनाच्या सर्व अंगांना रसज्ञता प्राप्त करून देणारा! दोघेही पूर्ण पुरुषच! अगणित प्रज्ञावंतांच्या प्रतिभेला हे दोन्ही नायक सदैव हाकारीत राहिले आहेत. असंख्यांची वाणी आणि लेखणी त्यांच्या अलौकिक कर्तृत्वाने प्रभावित केली. महाकाव्य, काव्य, नाटय, गीतं यांनी संस्कृत वाङ्मय श्रीमंत आणि संपन्न झालं. महर्षी व्यासांनी आणि वाल्मिकी मुनींनी अनुक्रमे महाभारत आणि रामायण ही महाकाव्य निर्र्मिली; परंतु पुढे कालिदासाचं रघुवंश, कुमारसंभव, भवभूतींचं उत्तररामचरितम्, माघकवीचं शिशुपालवध, भारवीचं किरातार्जुनीयम्... एक तर सांगावं. त्यात कालिदासाचं 'मेघदूत' हे कोहिनूर हिऱ्याप्रमाणे सदैव तळपत आहे. आजवर अनेक प्रतिभावंतांनी त्याची रूपांतरं, भाषांतरं केलीत.

आज मात्र मला प्रकर्षाने आठवत आहे ते कवी जयदेवाचं 'गीतगोविंद'! मेघदूताच्या तोडीचं हे काव्य. यक्षाच्या विरहार्ततेचे आणि राधाकृष्णाच्या प्रीतीच्या रितीचे गायिलेले गीत दोन्ही अत्यंत उत्कट!

मधुरकोमलकान्त पदावलिम् ।

श्रुणु तदा जयदेवसरस्वतिम् ॥

सर्वाधिक श्रवणमधुर असं हे भावकाव्य. नवरसांचा राजा शृंगार रस! राधा आणि कृष्ण यांचं प्रणयमीलन, जीव-शिवाची एकता, त्यातली अत्युत्कट अशी प्रीती आणि भक्ती आणि श्रीकृष्णाच्या मधुर बासरीसारखीच गीतरूप घेऊन आलेली जयदेवांची रसाळ प्रतिभा! ईश्वरदत्त प्रतिभेचा तो साक्षात्कार वाटावा अशी गीतगोविंद काव्याची रचना उतरली आहे. हे काव्य म्हणजे भक्तिकाव्यामध्ये 'शृंगाराला' प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या काळाचं प्रातिनिधिक रूप आहे.

विशुध्द रतिभावना, निसर्गनिर्मित अशा या मूलभूत भावनेचे कसलीही गढूळता, अशुचि, संकोच, अप्रतिष्ठा येणार नाही अशा कल्पकतेने राधा... विरहव्याकुळ राधा आणि रतिभोगाचा आदर करीत त्याला तितकाच उत्कट प्रतिसाद देणारा श्रीकृष्ण यांचा अत्यंत लालित्यपूर्ण गेय, नादमय, सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे गीतगोविंद!

गीतगोविंदाचा कर्ता जयदेव. हा बंगालचा सुपुत्र, पण त्याच्या या लोकोत्तर काव्याच्या कीर्तीला आणि लोकप्रियतेला बंगाल प्रांताची मर्यादा पडलेली नाही, हे विशेष आहे. प्रवासाची आणि प्रसाराची साधनं अत्यल्प असलेल्या काळातसुध्दा या गीतगोविंदला चाळीसहून अधिक भाष्यकार लाभले. इतकंच नव्हे, तर त्याचं अनुकरण करून 10-12 कवींनी आपआपली काव्यनिर्मिती केली. गीतगोविंद काव्य 1846 सालापासून कित्येक वेळा विविध ठिकाणी छापलं गेलं. सर विल्यम जोन्स आणि एड्विन अरनॉल्ड यांनी त्याचे इंग्लिशमध्ये अनुवाद केले. जी कोर्टिलियर यांनी ते फ्रेंच भाषेत नेलं. या काव्याची मूळची माधुरी आणि मोहकता अशा कुठल्याच अनुवादात उतरली नाही, ही गोष्ट वेगळी. ते सारेच अभ्यासक मान्य करतात. मूळ गीतगोविंदातील जयदेवाचं पदलालित्य अजोड आहे.

गीतगोविंदकार जयदेव बाराव्या शतकात बंगालचा राजा लक्ष्मणसिंह याच्या राजसभेत होऊन गेला. आपले मातापिता, मूळगाव, पत्नी आणि समकालीन यांचे उल्लेख त्याने स्वत:च आपल्या काव्यात केलेले आहेत. याशिवाय त्याच्या चरित्रात पुढे अनेक आख्यायिका जोडल्या गेल्यात, पण एवढं खरं की केंदुली किंवा केंद्रुबिल्व हे जयदेवाचं गाव. बंगालमधल्या वीरभूम जिल्ह्यात अजया नदीच्या काठी वसलेलं. विशेष म्हणजे त्या गावात अजूनही माघी अमावस्येला जयदेव कवीच्या स्मरणार्थ दर वर्षी यात्रा भरते.

जयदेवाने प्रत्येक गीताच्या आरंभी त्याचा नियोजित राग आणि ताल नमूद केला आहे. त्या परंपरेला अनुसरूनच आजही ती गीतं यात्रोत्सवात गायली जातात. लोकजीवनामध्ये अशी अखंड परंपरा वास्तव आधार असल्याशिवाय टिकू शकणार नाही. त्या दृष्टीने जयदेव भाग्यवान!

सुदैवाने त्याला राजाश्रयही चांगला लाभला. रसिक भेटले. त्यामुळे 'उत्पस्यतेहि मम कोऽपि समानधर्मा' असे म्हणण्याचे वैफल्य त्याच्या वाटयाला आले नाही.

संस्कृतमधील स्तोत्ररचनांच्या काळातली ही निर्मिती असली, तरी गीतगोविंद हे काही श्रीकृष्णाचं स्तोत्र नव्हे. गीतगोविंदातला कृष्ण हा तत्त्वज्ञ किंवा राजकारणी कृष्ण नसून तो वृंदावनात कामक्रीडा करणारा कृष्ण आहे. जयदेवाने त्याच्या वासंतिक क्रीडेचं अत्यंत शृंगारिक वर्णन केलं आहे. गीतगोविंदचा विषयच मुळी असा आहे की, जिथे कृष्णाच्या ईश्वरीय महतीला स्थान नाही. रतिभावनाच मुळात ईश्वरीय आहे आणि ती सर्जनाची गंगोत्री आहे. तो केवळ रतिभोग नाही. ती स्वार्थभोगाने गढूळ झालेली नाही. निसर्गनिर्मित रतिभावनेचं आत्मप्रकटीकरण हा गीतगोविंदचा आत्मा आहे.

आजसुध्दा आपल्या सर्व मालिका, चित्रपट रंजन, करमणूक, नाटय, नृत्य अशा अनेक कला शृंगारप्रधान आहेत. स्त्री-पुरुषांच्या प्रेमाची, प्रणयलीलांची आज जी चित्रं रंगवली जातात, त्यात आणि गीतगोविंदात जयदेवांनी वर्णिलेल्या राधाकृष्ण शृंगारात फरक काय? असा प्रश्न मनात येणं अगदी सहज आहे. मग लक्षात येऊ लागतं की, आज शृंगारपूर्ण कलाकृती सादर केल्या जातात त्या बहुतेक सर्व केवळ इंद्रियजन्य, लैंगिकतेवर प्रदर्शित होतात. देहचाळे म्हणजेच प्रेम... त्यात मनाच्या समर्पणाचा भाव अभावानेच आढळतो. त्यामुळे उथळ, बटबटीत लग्नकथा वा प्रेमकहाण्या तरुण पिढीच्या कामभावना उद्दीपित करण्याचं कार्य फक्त करतात आणि त्याचा विकृत परिणाम म्हणून केवळ लैंगिक वासनांचं, कुठेही, कसंही, कुठल्याही थराला जाऊन केवळ शारीरिक शमन करून घेणं अशी आजची विदारक परिस्थिती आहे. विशेषत: आजच्या विविध कार्यक्रमात अंगप्रत्यंगांचं आणि कामुकतेचं जे उत्तान प्रदर्शन दाखवलं जातं, त्यात शृंगाररसाची पार विल्हेवाट लावून उरतं ते केवळहिडीस देहप्रदर्शन. ती शारीरिक कसरतींची सवंगता पाहताना डोळे मिटून घ्यावेत अशीच अभिजात रसिकांची प्रतिक्रिया होते. रतिभाव हा पराक्रमाचा प्रेरक आहे. कैवल्याचा आनंद देणारा आहे. बादलीत भरलेलं पाणी आणि कलशात ठेवलेलं तीर्थ यात जो फरक आहे तो केवळ मनाला, भावनेलाच समजणारा आहे. एरवी तसं दोन्ही पाणीच! पण आपली मानसिकता त्याला वेगळया उंचीवर नेऊन ठेवते. म्हणूनच सीता-राम, राधा-कृष्ण, उमा-शंकर, माया-ब्रह्म, जीव-शिव अशा जोडया रतिभावनेला मांगल्याचं, आत्मार्पणाचं, पवित्रतेचं अस्तर देतात. त्यामुळे सर्वसामान्य जनांना रतिभाव, कामभाव हा शुचिर्भूत वाटण्याचं काम या कथाकाव्यांनी केलं. ती शुचिता आता विस्मृतीत गेली आहे, असे वाटण्याचे दिवस आहेत.

गीतगोविंदमध्ये पारंपरिक काव्याच्या संकेताप्रमाणे या काव्यात सर्ग आहेत, पण त्यांचा आशयाशी संबंध नाही. तसंच सर्व सर्गांचा आकारही सारखा नाही. प्रत्येकात कमी-जास्त गीतं व श्लोक आहेत. गीतांना प्रबंध असं नाव दिलं आहे. सर्गांची संख्या बारा आणि गीतांची चोवीस असली, तरी प्रत्येक सर्गात दोन गीतं अशी विभागणी नाही. काहीच एकच गीत आहे, तर काहीत चारसुध्दा!

तसं पाहिलं तर ही गीतं आणि त्यांचा मागेपुढे संबंध जोडून देणारे श्लोक असं मिळून हे एक नाटयकाव्य किंवा संगीतिकाच आहे असं म्हटलं तरी चालेल. श्रीकृष्ण, राधा आणि तिची सखी अशी तीन पात्र या संगीतिकेत आहेत. प्रणयोत्सुक किंवा विरहिणी राधेची उत्कंठा किंवा तळमळ, तगमग श्रीकृष्णाच्या कानावर घालण्याचं काम ही सखी करते. श्रीकृष्णाचा निरोप किंवा त्याची मिलनातुर अवस्था राधेकडे जाऊन निवेदन करते. वेळोवेळी राधेची समजूत घालून तिला धीर देते. राधेची मनोगतं, कृष्णाशी तिचं प्रेमळ भांडण, कृष्णाने तिची घातलेली समजूत वा केलेली आर्जवं असे विविध विषय या गीतांमध्ये येतात. गीतांच्या मागेपुढे सांधेजोड करणारे श्लोक आहेत. ते पारंपरिक वृत्तातले आहेत.

जयदेवाने अतिशय कौशल्याने काही ठिकाणी त्या त्या श्लोकाच्या वृत्ताचं नाव शेवटच्या चरणात अर्थपूर्ण रितीने गुंफलं आहे. उदा. -

1) प्रसूतिश्चूतानां सखि शिखरिणीयं सुखयति ॥

2) कंदर्पोऽपि यमायते विरचयच्छार्दूलविक्रीडितम् ॥

3) अहो विबुधयौवनं वहसि तन्वि पृथ्वीगता ॥

4) उपेंद्रवज्रादपि दारुणोऽसि ॥

5) पश्यन्ती चात्मरूपं तदपि विलुलितं स्त्रग्धरेयं धुनोति ।

शिखरिणी, शार्दूलविक्रीडित, उपेंद्रवज्रा, पृथ्वी, स्त्रग्धरा अशा वृत्तरचनेतील कौशल्याचा अभिमान कवीने व्यक्त केला आहे.

हे सर्व श्लोक जयदेवाच्या शब्दलालित्याच्या बरोबरीने त्याचं पांडित्यही दाखवतात.

आपल्या या काव्याबाबत जयदेव आत्मविश्वासाने म्हणतात -

'यदि हरिस्मरणे सरसं मनो यदि विलासकलासु कुलूहलम्।

मधुरकोमलकांत पदावलिंशृणु तदा जयदेवसरस्वतीम्॥

जर तुम्हाला कृष्णाच्या गुणगायनात गोडी वाटत असेल, जर कामिनींच्या रतिविलासातील कलासौंदर्य पाहण्यास तुम्ही उत्सुक असाल तर तुम्ही जयदेवकवीची गीतगोविंद ही कविता ऐकावी. या कवितेतील शब्दरचना मधुर आहे, सुंदर आहे आणि तिच्यात पूर्णपणे भक्तीने राधाकृष्णांचे प्रणयविलास वर्णिलेले आहेत.

स्वत:च्या काव्यरचनेवर जयदेवाचा पुरेपूर भरवसा आहे. सर्वांगसुंदर अशी कविता एकटा जयदेवच लिहू शकतो हे त्याचे उद्गार औध्दत्यदर्शक नसून खरोखरच सार्थ ठरावेत अशीच रचना त्याच्या सरस लेखणीतून उतरली आहे.

शृंगाररसाने नटलेलं जयदेवाचं हे काव्य पुढच्या काळात बंगालमधल्या चैतन्य संप्रदायाने आपल्या पंथाचा अधिकृत शास्त्रग्रंथ म्हणून स्वीकारलं आणि एक प्रकारे त्याच्या उत्कट भक्तिसौंदर्याला आणि काव्यगुणांना गौणत्व दिलं. खरं तर जयदेवाची अस्सल मुक्त प्रतिभा अशी कुठल्याही पंथाचं साचेबंद माध्यम होण्यासाठी जन्माला आलीच नव्हती. त्याच्या प्रतिभेचं नातं देवा-धर्मापेक्षा मानवी संवेदनांना अधिक जवळचं आहे. जयदेवाने जागोजागी कृष्ण आणि कृष्णभक्ती यांच्या महतीवर भर दिला असला, तरी त्यात खरा जीव आलेला आहे तो शृंगारवर्णनात! मग तो संभोगशृंगार असो की विप्रलंभ असो!

गीतगोविंदात रचनेचं एक आगळं सौष्ठव आहे, मार्दव आहे. अंगभूत संगीत आहे. आता हेच पाहा ना, सुरुवातीच्या श्रीकृष्ण स्तुतीत जयदेव म्हणतात -

अमलकमलदल लोचन भवमोचन ए।

त्रिभुवनभवननिधान जय जय देव हरे॥

अभिनवजलधरसुंदर धृतमंदर ए।

समरशमितदशकंठ जय जय देव हरे॥

अत्यंत नादमधुर, शब्दचमत्कृती, विशुध्द पद्यरचना याबरोबरच राधा-माधवाची सुरतक्रीडा वर्णन करताना जयदेवांनी प्रतिभेचा केलेला आविष्कार विलोभनीय आहे. मनोहर पदलालित्य, चित्रप्राचुर्य, शब्दमाधुर्य, भावसौंदर्य इत्यादी विविध गुणांनी गीतगोविंद नटलेलं आहे.

सर्जनात्मक कलानिर्मिती म्हणून गीतगोविंदाला स्वत:चा असा एक घाट आहे. एकीकडे निवेदन, वर्णन, भाषण तर दुसरीकडे पठण, गायन असं एक वेगळंच विणकाम हे तत्कालीन संस्कृत साहित्यविश्वाला तरी नवीनच असलं पाहिजे.

सर्वपरिचित भावभोळया भक्तिभावनेला शृंगारिक गूढ रम्यतेची डूब देऊन एक भावोत्कट आणि चित्रमय शैली जयदेवाने आकाराला आणली आहे.

संस्कृत काव्यातील सर्व पारंपरिक संकेत आणि सामान्य रिवाज तर त्याने पाळले आहेतच, त्याशिवाय परिसरातील निसर्गसौंदर्याशी त्यांचा मिलाफ करून एकूण काव्य त्याने खूप उंचीवर नेऊन ठेवलं आहे. राधाकृष्णाच्या या प्रणयाला देवस्वरूप निसर्ग साक्षी आहे. मेघांकित आकाश, लतावेली, वृक्षराजी, बांबूच्या जाळया, सुगंधी मोहोर, गाणारे पक्षी, फुललेले कुंज, अमृताचा वर्षाव करणारा चंद्र, कमलांचे ताटवे, गीतगोविंदातील प्रणयभाव या सर्वांना सोबत घेऊनच जयदेवांची प्रतिभा उत्कटतेने प्रकट होते. रस आणि अर्थ यातील समन्वय, प्रसाद आणि माधुर्य हे काव्याचे दोन्ही अमोलिक गुण शब्दाशब्दांत, ओळीओळीतून अक्षरश: स्रवू लागतात.

म्हणूनच याच्या तोडीची कलाकृती शोधणं अवघड आहे. संस्कृतभाषेत आधी नादमय, अर्थपूर्ण शब्दांची वाण नाहीत, पण अशा शब्दांचा चातुर्यपूर्ण उपयोग करून जयदेवानं रचलेलं हे काव्य अप्रतिम आहे. विशेष म्हणजे प्रयत्नपूर्वक रचलेली ही काव्यकृती तशी कृत्रिमच! परंतु कृत्रिम असूनही अगदी अकृत्रिम वाटावी अशी बिनतोड कुशलता जयदेवाने इथे प्रगट केली आहे. 'Art lies in concealing art' असं जे म्हटलं जातं, त्याचं हे सुंदर उदाहरण आहे. राधेची सखी श्रीकृष्णाचं वर्णन करताना तिला सांगते आहे -

चंदनचर्चितनीलकलेवर

पीतवसन वनमाली।

केलिचलन्मणिकुंडल मंडित

गंडयुगस्मितशाली॥

गोपींबरोबर श्रीकृष्णाने केलेल्या विविध चेष्टितांचं वर्णन करताना जयदेवाच्या लेखणीला बहरच येतो. कृष्णाच्या भेटीसाठी राधा व्याकुळ झाली आहे. तिच्या मन:स्थितीचं वर्णन करताना जयदेव लिहितात -

'हे सखी, केशी दैत्याचा वध करणाऱ्या त्या कृष्णासाठी मी कामविध्द झाले आहे. तू कोमल पल्लवांची शय्या तयार कर, दृढ आलिंगनाने तो माझं अधरामृतपान करू दे, सुरतश्रमाने माझी सुकुमार तनू घर्मयुक्त होऊ दे, केशकलाप विखुरित होऊ दे, पायातील नुपूर रुणुझुणू देत, कटीची मेखला सैल पडू दे, नेत्रकमलं मुकुलित होऊ देत आणि कृष्णाच्या नखाग्रांनी माझे पीनपयोधर (स्तन) व्रणित होऊ देत. हे असं सगळं तू घडवून आण.'

विरहावस्थेत रेखाटलेल्या या सुंदर रतिस्वप्नांच्या रूपात जयदेवानं इथे विप्रलंभ शृंगाराचा किती रमणीय परिपोष केला आहे.

राधेला अभिप्रेत असलेल्या या मदन-संग्रामात, तो शृंगाररसप्रिय नवमेघश्याम राधेच्या अंत:करणात आणि जयदेवाच्या लेखणीतही कसा संचारून राहिला आहे, याचा प्रत्यय या काव्यात जागोजागी येतो.

राधेचा विरहताप, तिला झालेली मदनबाधा याचबरोबर तिच्या विरहाने व्याकुळ झालेल्या श्रीकृष्णाची अवस्थाही जयदेव बहारीने वर्णन करतात. भोवती फुललेल्या आम्रमंजिरी आणि प्रफुल्लित निसर्ग यांच्या रूपाने प्रत्यक्ष मदनच आपल्याला मारण्याकरिता धावून येत आहे, असं कृष्णाला वाटतं. त्याच्या अवस्थेचं वर्णन करताना जयदेव लिहून जातात -

'मोहं तावदयं च तन्वि तनुतां बिंबाधरो रागवान्।

सद्वृत्तस्तनमंडलस्तव कथं प्राणैमम क्रीडाति॥

कित्येक ओळी वाचताना अर्थ पूर्ण नाही कळला, तरी शब्दांची माधुरी आणि तालबध्दता मनाची पकड घेतात आणि गीतरूपाने जिभेवर नाचू लागतात. शृंगाररसाचा हा असा ओतप्रोत आविष्कार संस्कृत भाषाच पेलू शकते. मराठीमध्ये ही वर्णने वाचताना कित्येकदा बावरून जायला होते. संकोच वाटतो.

चोविसाव्या प्रबंधातला पाचव्या श्लोकात -

'साधूनां स्वत एव संमतिरिह स्यादेव भक्त्यार्थिनाम् ।

या चार ओळींच्या श्लोकात स्वत: जयदेव सांगतात -

जे भक्तियुक्त सज्जन आहेत, त्यांना हे काव्य आपोआपच संमत होईल. जे विद्वान आहेत, ते ग्रंथाच्या रचनेत ओतलेले परिश्रम पाहून त्याविषयी आदर बाळगू लागतील. दुसऱ्यांचे ऐकून आपले मत बनवणाऱ्यांना माझी प्रार्थना आहे, त्यांनी हा ग्रंथ स्वत: पुन्हा पाहावा आणि तो पाहूनही त्याला क्षुद्र म्हणण्याची त्यांची इच्छा कायमच राहिली, तर त्यांनी मला खुशाल क्षुद्र म्हणावे.

प्रत्येक प्रबंधाच्या शेवटी जयदेवांनी कृष्णाची एवढी विविध रूपं चित्रित केली आहेत की राधेच्याच नव्हे, तर श्रीकृष्णावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक रसिकाला त्याच्या या विविध रूपांनी मोहून टाकावं. सामोद दामोदर, मुग्धमधुसूदन, केशव धृत-दशविधरूप म्हणजे दहा अवतार घेणारा कृष्ण, अक्लेश म्हणजे क्लेश हरण करणारा कृष्ण, स्निग्ध मधुसूदन, साकांक्षपुंडरीकाक्ष - (आकांक्षायुक्त कमलनयन कृष्ण), सोत्कंठ वैकुंठ (उत्कंठित कृष्ण), नागरनारायण (सुसंस्कृत कृष्ण), विलक्षलक्ष्मीपती - चमत्कारिक वेषातील कृष्ण, मुग्ध मुकुंद, चतुर चतुर्भुज, सुप्रीत पीतांबर, जय जगदीश... प्रत्येक सर्ग म्हणजे अशा विविध रूपांनी नटणाऱ्या त्या नटनाटक श्रीहरी कृष्णाची आणि त्याला सर्वस्वाने समर्पित होणाऱ्या राधेची मनोहारी रूपं जयदेव आत्मभावाने मोठया बहारीने वर्णन करतात आणि जणू मानवी जीवन व्यापून उरणाऱ्या रसराज शृंगाररसालाच अमर करून टाकतात. ओळीओळीतून असं प्रतिभेचं सामर्थ्य गीतगोविंदात प्रत्ययाला येतं.

वर्णितं जयदेवकेन हरेरिदं प्रणतेन।

किन्दुबिल्व समुद्रसम्भव रोहिणीरमणेन॥

श्रीकृष्णाच्या चरणी शरण असणाऱ्या जयदेव कवीने हे गीत गायिलं आहे. रोहिणीचा लाडका चंद्र जसा समुद्रातून उदय पावला, तसा पद्मावतीचा लाडका जयदेव किंदुबिल्व या विशाल गावात जन्माला आला आहे.

जयदेवाला त्याच्या अलौकिक प्रतिभेची जाणीव आहे आणि अभिमानही! तो स्वत:ला चक्रवर्ती मानतो. वाग्देवता सरस्वती आणि चरणचपला अशी लक्ष्मी ज्याच्यावर प्रसन्न आहेत असे कविराज जयदेव आपल्या पत्नीविषयी म्हणतात, 'गृहलक्ष्मी पद्मावती आपल्या पायरवाने जयदेवाचे घर धन्य करते आणि मी शृंगारकलासंपन्न राधा आणि वासुदेव यांचा प्रणय वर्णन करतो.'

धीर समीरे यमुनातीरे वसति बने वनमाली।

गोपीपीनपयोधर मर्दनचश्चलकर युगशाली॥

आपल्या प्रसन्नराघव या सात अंकी नाटकात जयदेवाने शृंगार, वीर, करुण यांचा उत्कट परिपोष केला, तर गीतगोविंदमध्ये शृंगारसर शिगेला पोहोचला आहे. जयदेव पराभक्तीचा पूजक आहे. काही भाष्यकार 'राधाकृष्ण' आध्यात्मिक दृष्टीने पाहतात प्रकृती आणि पुरुष या रूपात.

परंतु कायिक, वाचिक, मानसिक अशी पराकाष्ठेची प्रीती, मनाची विलक्षण तादात्म्यवृत्ती यांनी गीतगोविंद संस्कृत साहित्यात आणि रसिकांच्या मनात मानाचं स्थान मिळवून आहे!

9421264008