गगनविहार

विवेक मराठी    26-Oct-2016
Total Views |

अंतराळ संशोधनाची नांदी म्हणताना साराभाई यांनी जरी ''आपल्याला चंद्र, तारे यांच्यावर स्वारी करण्याची आकांक्षा नाही'' असं म्हटलं असलं, तरी आता परिस्थिती बदलली होती. आपण आपल्याच अंगणात खेळणारे खेळाडू राहिलो नव्हतो. जागतिक पटांगणात विहार करण्याची क्षमता आपण कष्टसाध्य केली होती. साहजिकच मग चंद्रापुढेही मजल मारून मंगळापर्यंत पोहोचण्याची ईर्षा उत्पन्न झाली होती. त्याला एक व्यावहारिक कारणही होतं. आज ना उद्या अंतराळातल्या, विविध ग्रहांवरच्या नैसर्गिक साधनसामग्रीवर आपलाही हक्क सांगण्याची स्पर्धा सुरू होईल, तेव्हा आपलंही प्यादं त्या पटावर सरकवण्याची संधी आपल्याला मिळायला हवी. त्यासाठी मग ती मजल मारण्याची धमक आणि क्षमता आपल्याजवळ आहे, हे सिध्द करून दाखवणं आवश्यक होतं.


"अ
तिपरिचयादवज्ञा' असं म्हणतात ते काही खोटं नाही. आज आपल्या माजघरात आरामात बसून आपण जगाच्या पाठीवर कुठेही होत असलेले खेळांचे सामने तत्काळ पाहू शकतो. अगदी अलीकडेच पार दूरवर रिओ द जानिरो इथे झालेल्या ऑॅलिम्पिक स्पर्धांमधला युसेन बोल्टचा विक्रम त्या क्षणीच आपण पाहू शकलो. कोणत्याही देशी-परदेशी करमणुकीच्या कार्यक्रमाची मजाही आपण तशीच लुटू शकतो. जगाच्या पार दुसऱ्या टोकाला असलेल्या आपल्या मित्राशी तळहातावर धरलेल्या इवल्याशा फोनद्वारे संवाद साधू शकतो. 'आम्ही मायदेशी, मुलं परदेशी' अशी अवस्था असलेले ज्येष्ठ नागरिक घरटयातून उडून गेलेल्या आपल्या पाखरांना डोळे भरून पाहू शकतात. पण हे कसं साध्य होतं, ही किमया कोणी केली, कशी केली, याची मात्र सुतराम माहिती त्यांना नसते. ती करून घेण्याची इच्छाही त्या करामतींची फळं चाखणाऱ्या आबालवृध्दांना होत नाही. आपल्याच वैज्ञानिकांनी स्वबळावर आणि आपल्या इथेच विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अवकाशात स्थापन केलेल्या अनेक उपग्रहांच्या कार्याचं हे फलित आहे, याची कल्पना नसते. अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाविषयी किंवा हे उपग्रह तिथे कसे पोहोचले, ते काय करताहेत याविषयी कुतूहल वाटत नाही. आणि ज्या काही मूठभर मंडळींना यासंबंधीची वरवरची माहिती असते, अशी थोरथोर मंडळी आपल्या समाजाचा कळवळा आपल्यालाच आहे हे दाखवत अशा एखाद्या लक्षवेधी कार्यक्रमाची घोषणा झाली की 'आपल्यासारख्या गरीब देशाला ही चैन परवडणारी आहे का?' असा सवाल करत त्या वैज्ञानिकांचं मनोबल खच्ची करण्याचा उदात्त कार्यक्रम राबवणं सोडत नाहीत. प्रसारमाध्यमंही त्याचीच री ओढत तशा टीकांच्या कार्यक्रमांचे रतीब घालण्यात धन्यता मानतात.

पण मग अशी एखादी वरवर चमत्कारिक वाटणारी घटना घडते की सर्वांनाच खडबडून जाग येते. 5 नोव्हेंबर 2013 या भाऊबीजेच्या दिवशी सीमोल्लंघन करत आपणच तयार केलेलं देशी बनावटीचं एक यान - मंगलयान - मंगळाच्या दिशेने प्रवासाला सज्ज होत श्रीहरीकोटा अंतराळस्थानकावरून उड्डाण करतं. किंवा 22 जून 2016 या दिवशी आपलाच एक अग्निबाण तब्बल वीस उपग्रहांना कुशीत घेऊन अंतराळात त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्थित नेऊन पोहोचवतो. त्यातला एक सोडल्यास बाकीचे तद्दन उपग्रह इतर देशांचे असतात. त्यातही काही अमेरिका, कॅनडा, जर्मनी यासारख्या विकसित देशांचे असतात. त्यांना आपल्या गंतव्यस्थानी पोहोचवण्याची कामगिरी या देशांनी आपल्या अंतराळ संशोधन संस्थेवर - इस्रोवर - विश्वासाने सोपवलेली असते. असं काही झालं की हे अक्रित कसं घडलं, अशी कुजबुजल्यासारखी विचारणा करत मंडळी त्याविषयीचा तपशील धुंडाळायला सुरुवात करतात. त्या उड्डाणांचा साग्रसंगीत सोहळा माजघरातल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहत असताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो.

पण यापैकी कोणालाही त्या वेळी होमी जहांगीर भाभा किंवा विक्रम अंबालाल साराभाई या महाभागांची नावंही आठवत नाहीत. वास्तविक त्यांची गणना कोलंबस, मॅगेलन, वास्को डी गामा यांच्या मांदियाळीतच करायला हवी. अज्ञात प्रदेशाचा वेध घेण्याची ऊर्मी माणसाच्या मनात केव्हापासून वस्ती करून आहे. म्हणूनच तर मध्ययुगात कोलंबसासारख्या साहसी दर्यावर्दींनी आपली गलबतं भर समुद्रात लोटली होती. या धरतीवरच्या तोवर अज्ञात असलेल्या प्रदेशांचा वेध घेतला होता. त्या प्रदेशांची इत्थंभूत माहिती मिळवली होती. पृथ्वीची आणि ज्ञानाचीही क्षितिजं विस्तारली होती. आता त्या धरतीचा कानाकोपरा धुंडाळून झाल्यावर अनंत अवकाशाची ओढ लागल्यास नवल नाही. त्यात अनादिकाळापासून या अवकाशात मनसोक्त विहार करण्याची स्वप्नं माणूस पाहत आला आहेच. त्या स्वप्नांच्या पूर्तीचा इतिहासही तसाच मनोवेधक आहे. त्या स्वप्नपूर्तीत येणाऱ्या नैसर्गिक अडथळयांवर आपण कशी मात केली, त्या प्रवासात आपण मध्येच कसे धडपडलो, कसे ठेचकाळलो, पण जिद्द न सोडता आधीच्या अनुभवातून शहाणे होत त्या अडचणींवर कशी मात केली, याची गोष्ट कोणत्याही डिटेक्टिव्ह कथेइतकीच रोमांचकारक आहे.

म्हणूनच भाभा आणि साराभाई या दोन सुपुत्रांना सलाम करायला हवा. कारण ज्या क्षणी त्यांनी भारताचा झेंडा अंतराळ संशोधनाच्या जागतिक नकाशावर फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला, तेव्हा त्या संशोधनाला आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सामग्रीचीही वानवा होती. जिद्द, केवळ जिद्द आणि आधुनिक भौतिकशास्त्रातल्या मोलाच्या संशोधनाचा अनुभव यापलीकडे त्यांच्या गाठी काहीही नव्हतं. तरीही त्यांनी अंतराळ संशोधनाची मुहूर्तमेढ रचलीच.

भाभांनी आपल्या द्रष्टेपणाची प्रचिती त्यापूर्वीच दिली होती. ज्या वेळी 'अणू अविभाज्य नाही' असा सिध्दान्तच केवळ मांडला गेला होता, त्या अणुभंजनापायी मुक्त झालेल्या अफाट ऊर्जेचा वापर कसा केला जाऊ शकतो, याची पुसटशीच ओळख झाली होती. त्या ऊर्जेचा वापर करून हिरोशिमा आणि नागासाकी या महानगरांना पार उद्ध्वस्त करणाऱ्या अणुबाँब नामक महाभयानक अस्त्राची निर्मितीही झाली नव्हती, किंबहुना त्या अणुभंजनाच्या प्रक्रियेला दावणीला कशी बांधता येईल, हे दाखवून देणारा एक अतिशय गुप्त प्रयोग एनरिको फर्मीने नुकताच करून दाखवला होता आणि अणुऊर्जेचा विचारही फारसा कोणाच्या मनात आला नव्हता, त्या वेळी भविष्यात डोकावत भाभांनी या भारतभूमीवर अणुविभाजनाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाची प्रतिष्ठापना करण्याचा मनोदय व्यक्त करत आता क्रांतिकारक ठरलेलं एक पत्र जे.आर.डी. टाटांना लिहिलं होतं. आज टाटा मूलभूत संशोधन संस्था या नावाने जगविख्यात झालेल्या संशोधनसंस्थेचा आराखडा तयार केला होता.


त्याच द्रष्टेपणाचा दाखला देत त्यांनी रशियाने अवकाशात धाडलेल्या स्पुटनिक नामक पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाला जेमतेम चार वर्षं होत असताना याही क्षेत्रात देशाने आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करायला हवं हे जाणलं होतं. स्पुटनिकने झेप घेतली 1957मध्ये आणि भाभांनी पंडित नेहरूंच्या आशीर्वादाने 1961 साली अणुशक्ती आयोगाच्या अखत्यारीतच 'इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च'ची - 'इन्कोस्पार'ची स्थापना केली. दोनेक वर्षांनंतर त्यांनी विक्रम साराभाईंच्या हाती त्याची धुरा सोपवली.

तेही जोमाने कामाला लागले. अनेक आघाडयांवर एकसाथ प्रगती साधायची होती. उपग्रह तर बांधायचे होतेच, त्याचबरोबर त्यांना अवकाशात भरारी मारण्यासाठी मदत करणारे प्रक्षेपक अग्निबाणही तयार करायचे होते. त्यांचं उड्डाण सुरळीत होण्यासाठी प्रक्षेपणकेंद्रांची उभारणी करायची होती. ते अवकाशात यशस्वीरित्या भ्रमण करू लागल्यावर त्यांच्याशी सतत संपर्क साधण्यासाठी सारी यंत्रणा प्रस्थापित करायची होती. एक ना दोन. पण साखळी प्रणालीचा अवलंब करत एकापाठोपाठ ही कामं करायला गेलो, तर आपला अग्निबाण प्रत्यक्षात अवकाशात जाण्यासाठी तीस-चाळीस वर्षं वाट पाहावी लागेल आणि तोवर इतर सगळं जग कितीतरी पुढं निघून गेलेलं असेल, याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी समांतर प्रणालीचा अंगीकार करण्याचं ठरवलं. जे काम तातडीने स्वबळावर करता येईल किंवा करायला हवं, ते त्याच वेळी सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर उर्वरित कामांचा श्रीगणेशा करतानाच तात्पुरती परदेशी मदत घेऊन तंत्रज्ञान विकासाला गती देण्याचं धोरणही त्यांनी अवलंबलं.

म्हणूनच तर त्यांनी धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यापासून वर्षभरातच आपण केरळमधील थुंबा इथे बांधलेल्या प्रक्षेपणतळावरून पहिल्या अग्निबाणाने 21 नोव्हेंबर 1967 रोजी अवकाशात झेप घेतली. तो अग्निबाण आपण अमेरिकेकडून मिळवला होता. नाईक अपाचे जातीच्या त्या अग्निबाणाचं उड्डाण मात्र आपल्याच वैज्ञानिकांनी घडवून आणलं होतं. आपल्याच भूमीवरच्या आपणच बांधलेल्या प्रक्षेपणतळावरून त्याने उड्डाण केलं होतं. त्यामुळं अग्निबाणाचं प्रक्षेपण करण्यासाठी कोणकोणती तयारी करायला हवी, त्याच्यावर सतत नजर ठेवण्यासाठी कोणती यंत्रणा सज्ज ठेवायला हवी, त्याचं नियंत्रण कसं करायचं यासारख्या तंत्रज्ञानाची माहितीही मिळाली आणि ती क्षमता अंगी राबवण्याचा अनुभवही.

त्याच्याच बळावर ते तंत्रज्ञान अधिक विकसित करून त्यानंतर उण्यापुऱ्या चार वर्षांनी आपण आपल्याच अस्सल देशी बनावटीच्या 'रोहिणी 75' या अग्निबाणाचं प्रक्षेपण केलं. त्याने भलेही जेमतेम साडेचार किलोमीटरचीच उंची गाठली, पण त्याने जगाच्या अंतराळ विज्ञानाच्या नकाशावर भारताचं नाव कायमचं कोरून ठेवलं.

मध्यंतरीच्या काळात थिरुवनंतपुरम इथे 'स्पेस सायन्स ऍंड टेक्नॉलॉजी सेंटर, कार्यान्वित झालं होतं. त्याचंच आता 'विक्रम साराभाई स्पेस सेंटर' असं नामकरण झालं आहे. 1968मध्येच संयुक्त राष्ट्रसंघाने - युनोने थुंबा इथला प्रक्षेपणतळ आंतरराष्ट्रीय सुविधा असल्याची मान्यतेची मोहोर उठवली. कामाचा पसारा आता वाढायला लागला होता, त्याचबरोबर निरनिराळया सुविधाही प्रस्थापित होत होत्या. त्या सर्वांच्या कामात सुसूत्रता आणणं आणि त्यांना दिशा देणं आवश्यक झालं होतं. म्हणूनच मग 1971मध्ये 'इंडियन स्पेस रिसर्च ऑॅर्गनायझेशन'ची - इस्रोची - स्थापना करण्यात आली. अंतराळ संशोधन आणि विकासाचा कार्यक्रम राबवण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा स्वबळावर स्थापन करण्याचा निश्चय तर केला गेला होताच, तसंच हा कार्यक्रम म्हणजे हस्तिदंती मनोऱ्यात बसलेल्या वैज्ञानिकांनी स्वान्तसुखाय निर्माण केलेली सोय नसून अंतिमत: देशविकासासाठी आणि लोकहितासाठी त्याचा उपयोग करायचा आहे, याचं भान सुटलं नव्हतं. म्हणूनच अहमदाबाद इथे स्पेस ऍप्लिकेशन सेंटरची स्थापना करण्यात आली होती.

साराभाईंनी पंतप्रधानांपुढे आपली उद्दिष्टं स्पष्ट शब्दांमध्ये व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, ''या आंतरराष्ट्रीय मंडळात काही सदस्य असेही आहेत, की ज्यांना आपल्यासारख्या विकसनशील राष्ट्राला अंतरिक्ष विज्ञानक्षेत्रात महत्त्वाचं स्थान मिळण्याबाबत मनात नेहमीच शंका असते. परंतु आपल्याला कोणतं काम करायचं आहे, आपलं ध्येय काय, याबद्दल आपल्या मनात कोणतीही शंका नाही. आपल्याला चंद्र, तारे, मानवाचा चंद्राकडे प्रवास असल्या कार्यक्रमात मुळीच स्वारस्य नाही आणि आर्थिकदृष्टया बलवान अशा देशांशी तुलना वा स्पर्धा करण्याची इच्छाही नाही. या क्षेत्रातल्या कार्यक्रमांतून सामान्य माणसाकडे, तसंच समाजाकडे पाहणाचा आमचा दृष्टीकोन मात्र नक्कीच प्रतीत होईल. उपग्रह तंत्रज्ञानाने संपूर्ण भारतात दूरदर्शनचा प्रसार, मोसमी पावसाचा अंदाज व अभ्यास, नैसर्गिक संवर्धनाचं मापन, सागरी विज्ञानात प्रगती तर होईलच, त्याशिवाय त्यातूनच सर्वसामान्य माणसाच्या गरजा आणि त्याच्या आकांक्षा पूर्ण करता येतील.''

कोणत्याही अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे तीन घटक असतात. अंतराळात संचार करणारे उपग्रह, त्यांना तिथे नेऊन सोडणारे प्रक्षेपक अग्निबाण आणि ते संचार करत असताना त्यांच्याशी सतत दुतर्फा संपर्क साधणारी जमिनीवरची केंद्रं. इस्रोने या तिन्ही आघाडयांवर एकसाथ काम सुरू केलं. म्हणूनच अग्निबाण तयार होण्याची वाट पाहत न राहता उपग्रहांची बांधणी करायला सुरुवात केली. आणि असे उपग्रह अवकाशात स्थापित होण्यापूर्वीच टेलिफोनसारख्या दूरसंचार यंत्रणेसाठीचा त्याचा वापर, रेडिओ किंवा टीव्ही कार्यक्रमांचं देशभर प्रक्षेपण, जमिनीवरच्या आणि धरतीच्या पोटातल्या नैसर्गिक साधनसाग्रीचं सर्वेक्षण करणारी दूरसंवेदन यंत्रणा, हवामानावर नजर ठेवून त्याविषयीचे आडाखे बांधणारी यंत्रणा यासारख्या उपयोजित प्रकल्पांची तयारीही सुरू केली.

आर्यभट्ट हा आपला पहिला उपग्रह. केवळ सहा वर्षच तो आपली कामगिरी नीटनेटकेपणे करू शकेल अशीच अपेक्षा ठेवली गेली होती. पण पठ्ठयाने त्याच्या जनकांच्या योजनेवरही मात करत तब्बल सतरा वर्षं देशसेवेत घालवली. हा तसा लहानखुराच, साडेतीनशे किलोग्रॅम वजनाचा उपग्रह होता. 1975 साली त्याने रशियन अग्निबाणाचं बोट धरत अवकाशातलं आपलं मुक्कामाचं ठिकाण गाठलं.

त्याचं प्रक्षेपण आणि प्रतिष्ठापना निर्विघ्नपणे पार पडल्याचं पाहून आपल्या वैज्ञानिकांचा उत्साह द्विगुणित झाला. त्यांनी आता भास्कर-1 या साडेचारशे किलो वजनाच्या उपग्रहाची निर्मिती केली. याच्याकडे दोन टीव्ही कॅमेरे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचं सर्वेक्षण करून त्यांची छायाचित्रं घेण्यात वाकबगार असणारे तीन दूरसंवेदक होते. त्याचीही पाठवणी रशियन अग्निबाणानेच केली होती. त्याचीच सुधारित आवृत्ती असणाऱ्या भास्कर-2नेही 1981च्या नोव्हेंबर महिन्यात आपलं अंतराळातलं स्थान पटकावलं.


याच वर्षी ऍपल या उपग्रहाचंही यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. या उपग्रहाच्या लांबलचक वैज्ञानिक नावाचं 'ऍपल' हे लघुरूप होतं. पावणेसातशे किलो वजनाच्या या उपग्रहाची पालखी युरोपीय महासंघाच्या अग्निबाणाने वाहिली होती. टेलिफोन दळणवळणासाठी मुख्यत्वे त्याचा वापर होणार होता. त्याशिवाय रेडिओ तसंच टीव्ही कार्यक्रमांचं देशभरचं प्रसारणही त्याच्याकडून होत होतं. या उपग्रहाची परिभ्रमण कक्षा भूस्थिर असल्यामुळे अशा भूस्थिर उपग्रहांची निर्मिती, प्रक्षेपण, स्थापना आणि संपर्क या सर्वच क्षेत्रांची ओळख पटली, त्याविषयीचं प्रशिक्षणही आपलं काम करता करताच मिळालं.

त्यानंतर मात्र निरनिराळया प्रकारच्या उपग्रहांची बांधणी, प्रक्षेपण आणि प्रतिष्ठापना यांचा धडाकाच सुरू झाला. आयआरएस (इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उपग्रह मालिकेची रुजवातही याच काळात झाली. पहिला देशी बनावटीचा आयआरएस उपग्रह ध्रुवीय कक्षेत रशियन अग्निबाणाच्या मदतीने स्थापन करण्यात आला. त्यावरच्या सगळया यंत्रणाही आपणच बनवलेल्या होत्या. त्याच्या नावाप्रमाणेच दूरसंवेदनासाठी त्याचा उपयोग होणार होता. साहजिकच धरतीची छायाचित्रं घेऊन नैसर्गिक साधनसामग्रीची माहिती मिळवण्याची क्षमता त्याच्या ठायी असणं आवश्यक होतं. त्यासाठी त्या उपग्रहावर वेगवेगळे कॅमेरे ठेवण्यात आले होते. तसंच पाहिलं तर आपण हाताळतो तो कॅमेरा म्हणजेही एक प्रकारचा दूरसंवेदकच असतो. कोणत्याही वस्तूचं दूरवरूनच छायाचित्र काढून आपण त्या वस्तूची ओळख पटवतो, तिची माहिती मिळवतो आणि ती साठवूनही ठेवतो. दूरसंवेदन उपग्रहही हेच करतात. मात्र सर्वच वस्तू आपल्या ओळखीच्या तानापिहिनिपाजा या पट्टयातल्या दृश्य प्रकाशालाच दाद देत नाहीत. त्या पट्टयाच्या दोन्ही बाजूंना पसरलेल्या जंबुपार (अल्ट्राव्हॉयलेट) आणि अवरक्त (इन्फ्रारेड) या अदृश्य प्रकाशातही छायाचित्रं घेता येतात. त्यांच्यावर योग्य ते संस्कार केले की ती आपल्यालाही पाहता येतात. झालंच तर रेडिओ लहरींना दाद देणारे कॅमेरेही आणखी काही वस्तूंची छायाचित्रं मिळवू शकतात. त्या वस्तूवरून परावर्तित होणाऱ्या किंवा तिच्याकडून विखुरल्या जाणाऱ्या लहरींना पकडून ही छायाचित्रं घेता येतात. काही वस्तू - उदाहरणार्थ दूरवरचे तारे - या लहरी स्वत:च प्रक्षेपित करत असतात. त्यांचाही वेध घेता येतो. अशा सर्वच प्रकारच्या प्रकाशलहरींना दाद देणाऱ्या कॅमेऱ्यांनी हा आयआरएस उपग्रह सुसज्ज होता.

असा उपग्रह जेव्हा ध्रुवीय कक्षेत प्रदक्षिणा घालू लागतो, तेव्हा 16 ते 22 दिवसांत तो सगळया पृथ्वीला एक फेरी मारतो. जवळजवळ एक हजार किलो वजनाचा हा जागतिक दर्जाचा आयआरएस उपग्रहही याला अपवाद नव्हता. त्याने पाठवलेल्या छायाचित्रांचं सखोल निरीक्षण केल्यानंतर अनेक प्रकारची उपयुक्त माहिती आपल्याला मिळाली. लागवड झालेल्या पिकांच्या निरनिराळया प्रजाती, त्यांना छळणारे विविध कीटक किंवा रोगजंतू, वनक्षेत्राचा विस्तार, खनिज आणि तेल यांचे साठे, समुद्रातील मासेमारीसाठी उपयुक्त ठरणारे प्रदेश, हिमनद्यांचं वितळणं आणि त्यांचं वाहत्या नद्यांमध्ये होणारं रूपांतर, भूगर्भातले पाणवठे, पुरांचा धोका असणारे प्रदेश... एक ना दोन! माहितीच्या अलिबाबाच्या खजिन्याची किल्लीच त्याने हाती दिली होती. या पहिल्यावहिल्या आयआरएस उपग्रहानंतर त्याच जातकुळीतले एकूण बारा उपग्रह आपण अवकाशात स्थापन केले आहेत. आणि त्यापैकी अकरांची पाठवणी आपणच तयार केलेल्या अग्निबाणांनी केली आहे. त्यापैकी एक सोडल्यास बाकीचे सर्वच्या सर्व आपल्यावर सोपवलेली कामगिरी इमानेइतबारे निष्ठापूर्वक पार पाडत आहेत.

अशाच प्रकारचा एक उपग्रह - ओशनसॅट - आपल्या विस्तृत सागरांची पाहणी करून मच्छीमारांना अतिशय मोलाची ठरणारी माहिती पुरवीत आहे. कार्टोसॅट जातीचे तीन उपग्रह देशाचे अद्ययावत नकाशे तयार करण्यासाठी मदत करत आहेत. या मालिकेतल्या चौथ्या आणि सर्वात अद्ययावत उपग्रहाची पाठवणी नुकतीच जून महिन्यात करण्यात आली. हे सर्वच आयआरएस उपग्रह घेत असलेल्या छायाचित्रांचा दर्जा इतक्या उच्च जातीचा आहे की त्यांच्यापासून मिळालेली माहिती विकत घेण्यासाठी जगातल्या निरनिराळया संस्था रांगा लावून उभ्या आहेत. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं अत्युच्च रेझोल्यूशन. 36000 किलोमीटर उंचीवरून पाहणी करूनही ते जमिनीवरच्या एकमेकांपासून केवळ पाच मीटर दूर असलेल्या दोन वस्तू वेगवेगळया ओळखू शकतात. म्हणजेच एखाद्या बसचं तोंड आणि पाठ वेगवेगळया ओळखू शकतात. सहा फूट उंचीच्या एखाद्याने त्याच्या पायाच्या करंगळीचा चावा घेणाऱ्या मुंगीच्या शरीरवैशिष्टयांची अचूक ओळख पटवण्यासारखंच आहे हे!

दूरसंवेदनाखेरीजही उपग्रहांचे अनेक व्यावहारिक उपयोग आहेत. टेलिफोनचं दळणवळण, टीव्ही किंवा रेडिओ यांच्या कार्यक्रमांचं देशभर एकसाथ करायचं प्रक्षेपण, हवामानावर सतत नजर ठेवून त्यात होणारे बदल टिपून त्यांची अचूक पूर्वसूचना देणं हे त्यापैकी काही. यातल्या प्रत्येकासाठी खरं तर वेगवेगळया उपग्रहांची नियुक्ती करणं योग्य ठरतं. पण ते तसं खर्चीकही आहे. तेव्हा आपल्याला परवडणारी सोय करायची, तर या तिन्ही सुविधा एकाच उपग्रहाकडून का मिळवू नये? असा विचार करून आपल्या वैज्ञानिकांनी एक कल्पक शक्कल शोधून काढली. त्यातूनच आयआरएस या उपग्रहांच्या मालिकेचा उगम झाला. या उपग्रहांवर ही तिन्ही कामं करण्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा असावी, तरीही त्या एकमेकींच्या पायात पाय घालणाऱ्या नसाव्यात, अशीच योजना केली गेली होती.

तोवर 1982 साली दिल्ली इथे आयोजित केलेल्या आशियाई खेळांच्या स्पर्धा गळयाशी आल्या होत्या. त्यांची सुरुवात होण्याआधी निदान टेलिव्हिजन कार्यक्रमांचं देशभर प्रक्षेपण करणं शक्य व्हावं, या उद्देशाने या प्रकारच्या चार उपग्रहांची ऑॅर्डर एका अमेरिकन कंपनीला दिली गेली. आपल्या बांधणीचे उपग्रह उपलब्ध होण्यापर्यंतची ही तात्पुरती व्यवस्था होती. पण त्यातल्या दोनच - इन्सॅट 1 बी आणि 1 डी या दोन उपग्रहांनी अपेक्षा पूर्ण केल्या. मात्र त्यानंतरच्या इन्सॅट 2, 3 आणि 4 या मालिकेतल्या झाडून साऱ्या देशी बनावटीच्या उपग्रहांनी आपली कामगिरी सुरळीत पार पाडलेली आहे. आपलं तंत्रज्ञान इतर कोणापेक्षाही उणं नाही, याची आणखी कोणती साक्ष हवी!

36000 किलोमीटर उंचीवरच्या भूस्थिर कक्षेत या उपग्रहांची स्थापना करावी लागते. त्याला तशीच कारणंही आहेत. आपल्या धरतीचा आकार गोलाकार म्हणजेच वक्राकार आहे. त्यामुळे नाकासमोर सरळ रेषेत जाणाऱ्या रेडिओ लहरी फार दूरवर पोहोचू शकत नाहीत. रेडिओ कार्यक्रमांच्या प्रसारणासाठी मध्यम आणि लघु तरंगलांबीच्या रेडिओ लहरींचा वापर केला जातो. या लहरी वातावरणातून जात असताना वाकू शकतात. त्यामुळे त्या दूरदूरवर पोहोचू शकतात. म्हणूनच तर कोलकाता किंवा अरुणाचल प्रदेशातल्या रेडिओ स्टेशनवरून प्रसारित केलेले कार्यक्रम मुंबई-पुण्यातही सहजगत्या ऐकता येतात. टीव्ही कार्यक्रमांच्या प्रसारणाची गोष्ट वेगळी आहे. कारण त्यासाठी बहुधा अतिलघू रेडिओ लहरींचाच वापर केला जातो. या लहरी वातावरणातून जाताना वाकत नाहीत. ताठपणे सरळ रेषेतच त्या प्रवास करतात. त्यामुळे आपल्या घरांवरच्या डिश ऍंटेनांच्या दृष्टिक्षेपात तो उपग्रह नसेल, तर त्याच्या ट्रान्सपॉन्डरवरून पुनःप्रक्षेपित केलेल्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचणारच नाहीत.

उपग्रहांच्या आगमनापूर्वी टीव्ही कार्यक्रम साध्या मनोऱ्यावरच्या ऍंटेनांकरवी प्रसारित केले जात. या मनोऱ्यांची उंची जेवढी जास्त, तेवढया अधिक अंतरावर त्या लहरी पोहोचू शकत व तिथपर्यंत कार्यक्रम दिसू शकत. म्हणूनच तर त्या काळात मुंबई केंद्राकडून प्रसारित केलेले कार्यक्रम महाराष्ट्रातही निरनिराळया ठिकाणी सहजगत्या दिसू शकत नव्हते. ते तसे उपलब्ध करून द्यायचे, तर वाटेत निरनिराळे मदतनीस मनोरे बांधावे लागत. तरीही शंभर-दीडशे किलोमीटर पलीकडे त्यांची मजल जात नसे.

ते टाळून देशभरचे, एवढंच काय पण विदेशातलेही कार्यक्रम आपल्या घरातल्या संचावर पाहायचे, तर मग उपग्रहांकरवी त्यांचं प्रक्षेपण करायला हवं. त्यासाठी तो उपग्रहही अशा जागी हवा की देशातल्या कोणत्याही ठिकाणच्या डिश ऍंटेनांशी सरळ रेषेत नजरेला नजर भिडवून तो उभा असेल. 36000 किलोमीटर उंचीवरच्या आणि विषुववृत्तावरच्या अवकाशात असलेल्या उपग्रहाचा दृष्टिक्षेप जगाच्या एक तृतीयांश भागावर पडत असतो. असे तीन उपग्रह एकमेकांपासून विवक्षित अंतरावर ठेवले, तर ते सारं जग आपल्या नजरेच्या टप्प्यात ठेवू शकतात. त्यांच्या पाऊलखुणा जगभर पसरलेल्या असतात. हे ध्यानात घेऊनच इन्सॅट मालिकेतल्या सध्या कार्यरत असलेल्या बारा उपग्रहांची स्थापना करण्यात आली आहे.

यापैकी प्रत्येक उपग्रहावर एकाहून अधिक ट्रान्सपाँडर्स असतात. हे ट्रान्सपाँडर्स म्हणजे एका परीने रिले केंद्रच असतात. जमिनीवरच्या टीव्ही केंद्राच्या महाकाय डिश ऍंटेनाने प्रक्षेपित केलेले संदेश ते पकडतात. त्यांची क्षमता वाढवतात आणि परत ते जमिनीकडे प्रक्षेपित करतात. आपल्या घरावरच्या छोटयाशा डिश ऍंटेनाही ते पकडू शकतात. शिवाय त्यांच्या वाढवलेल्या क्षमतेमुळे आपल्या संचावर स्पष्ट चित्र उमटतं.

हे बिनबोभाट, आणि कोणताही खंड न पडता, साध्य व्हायचं तर हे उपग्रह विचलित न होता एकाच जागी स्थिर राहिले पाहिजेत. पण ज्या उंचीवर हे बसलेले असतात, तिथे त्यांना सौर वाऱ्यांच्या माऱ्याचा सामना करावा लागतो. झालंच तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाची ओढही त्यांना जाणवायला लागते. त्यामुळे ते आपल्या नियोजित जागेपासून ढळतात. तसं झालं, तर मग कार्यक्रमांच्या प्रक्षेपणात बाधा येते. ते टाळायचं तर त्यांना परत जागेवर आणून बसवावं लागतं. उंडारणाऱ्या अवखळ पोराला जसं टपली मारून परत आपली जागा दाखवून द्यावी, तसंच. मग उपग्रहावर बसवलेले थ्रस्टर्स म्हणजेच छोटेखानी अग्निबाण कार्यान्वित होत इथेतिथे उंडारू पाहणाऱ्या त्या उपग्रहाला परत नियोजित जागी आणून बसवतात.

या थ्रस्टर्सना ऊर्जा पुरवण्यासाठी इंधनाच्या टाक्याही तिथेच बसवलेल्या असतात. या टाक्यांमधलं इंधन जोवर पुरेसं आहे, तोवरच अर्थात थ्रस्टर्स आपलं काम सुरळीत करू शकतात. एकदा का त्या इंधनाचा साठा संपला की त्यांना काम करणं अशक्य होतं. साहजिकच मग त्या उपग्रहाची कार्यक्षमताही घटते. त्याला मग निवृत्त करणं भाग पडतं. साधारणपणे आपल्या इन्सॅट उपग्रहांचा कार्यकाल बारा वर्षांचा आहे. म्हणूनच मग ठरावीक काळानंतर नवनवीन इन्सॅट उपग्रहाचं प्रक्षेपण करावं लागतं.

आज टीव्ही कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या वाहिन्यांच्या जाळयांमुळे आपण उपग्रहांची उपलब्धता आणि क्षमता गृहीत धरत आहोत. पण ते साध्य होण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांनी फार पूर्वीपासून तयारी केली होती. इन्सॅट उपग्रहांच्या मोहिमेचा ओनामा होण्यापूर्वीच उपग्रहावरून टीव्हीचे कार्यक्रम दूरदूरवर कसे प्रसारित करावेत आणि शिक्षणासाठीही त्याचा उपयोग कसा करता येईल, हे पाहण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला गेला होता. अहमदाबाद इथे त्याचं केंद्र होतं. एटीएस-6 हा एक उपग्रह त्यासाठी अमेरिकेकडून भाडयाने घेऊन ऑॅगस्ट 1975 ते जुलै 1976 या वर्षभरात सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्स्पीरिमेन्ट - साईट - हा प्रयोग राबवला गेला. त्या वेळी देशात फक्त पाचच महाशहरांमध्ये टीव्हीचे कार्यक्रम प्रसारित होत होते. पण आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि ओडिशा या सहा राज्यांमधल्या प्रत्येकी 400, म्हणजे एकूण 2400 गावांमध्ये हे साईटचे कार्यक्रम प्रसारित केले जात होते. त्यासाठी यापैकी प्रत्येक खेडयाला एक टीव्ही संच प्रदान केला गेला होता. गावातल्या चावडीवर किंवा कट्टयावर हा संच ठेवला गेला होता. संध्याकाळच्या वेळी गावकरी तिथे जमून हे शैक्षणिक पण कल्पकतेने मनोरंजक केलेले कार्यक्रम पाहत असत. मागे वळून पाहता आज त्याची आपल्याला गंमतच वाटेल. पण आजच्या या चोवीस तास चालणाऱ्या आणि आपलं मन रिझवणाऱ्या तसंच मानसिकतेची क्षितिजं विस्तारणाऱ्या कार्यक्रमांचं मूळ त्या प्राथमिक स्वरूपाच्या छोटेखानी पण कल्पक कार्यक्रमात दडलेलं आहे.

आज आपल्या इन्सॅट उपग्रहांमुळे आपल्याला देशी-विदेशी मिळून पंधरा-सोळा भाषांमधल्या दोनदोनशे वाहिन्यांवरचे कार्यक्रम पाहणं शक्य झालं आहे. तसंच आज खेडयापाडयांमध्येही मोबाइल टेलिफोनची जी सेवा पसरलेली आहे, तीही टेलिफोनच्या संदेशांचं दळणवळण करण्यात मदत करणाऱ्या या उपग्रहांवरच्या ट्रान्सपाँडर्समुळेच.

हवामानाच्या अंदाजांमध्येही या उपग्रहीय सेवेमुळं क्रांतीच घडून आली आहे. अलीकडेच येऊन गेलेल्या फयान वादळाच्या वेळी याचं प्रत्यंतर आलं. ते वादळ कुठे आणि कसं घोंघावत आहे, त्याची तीव्रता किती आहे, त्यात किती वेगाने झंझावाती वारे वाहत आहेत, त्या वादळाचा प्रवास कोणत्या दिशेने आणि किती वेगाने होत आहे, अशी त्याची बित्तंबातमी क्षणाक्षणाला अचूकपणे मिळवणं आपल्या हवामानतज्ज्ञांना शक्य झाल्यामुळे आपण वेळीच सुरक्षा उपाय अंमलात आणू शकलो. मालमत्तेची हानी टाळू शकलो नाही, तरी ती किमान पातळीवर राहील हे पाहू शकलो. जीवितहानी तर जवळजवळ संपूर्णपणे टाळण्यात आपण यशस्वी झालो. त्याचं श्रेय निश्चितच या उपग्रहांनाच द्यायला हवं.

उपग्रह तयार करण्याचं तंत्र साध्य झालं, तसंच लोकहिताच्या कार्यक्रमांसाठी त्याचा वापर कसा करायचा याची कलाही हस्तगत झाली, तरी तो उपग्रह अवकाशात विवक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्याची व्यवस्था करण्याचीही गरज होतीच. त्या उपग्रहाला वाहून नेणारे पालखीचे भोईही तयार करायला हवे होते. अर्थात आपल्या अंतराळ वैज्ञानिकांना याची जाणीव होतीच. ते स्वस्थ बसले नव्हते. एकीकडे आपणच बनवलेले उपग्रह दुसऱ्या देशांच्या अग्निबाणांच्या मदतीने अवकाशातली आपली जागा पटकावत असताना अग्निबाण विकसित करण्याचा प्रकल्पही आकार घेत होताच. खरं तर हे अग्निबाण म्हणजे अग्निबाणांची एक साखळीच असते. तीन-चार कडी असलेली ही साखळी एखादी रिले शर्यत धावणाऱ्या खेळाडूंच्या संघासारखी असते. पहिली कडी नियोजित उंचीवर पोहोचून तिने एक विशिष्ट वेग गाठून दिला की ती सारी सूत्रं पुढच्या कडीकडे सोपवते. त्या दुसऱ्या कडीच्या अग्निबाणाला आता प्रज्वलित केलं जातं. तो आता आणखी पुढची मजल मारतो. पहिल्या कडीचा अग्निबाण आपण कृतकृत्य झाल्याच्या समाधानात गळून पडतो. पुढच्या कडीचे अग्निबाणही हीच परंपरा चालू ठेवतात. शेवटच्या टप्प्यावरचा अग्निबाण उपग्रहाला नियोजित कक्षेत विशिष्ट स्थानी बसवून मगच त्याचा निरोप घेतो.

हे असं करण्याचं कारणही आहे. धरतीच्या ओढीपासून सुटका करून घ्यायची, तर उपग्रहाने मुक्तिवेग गाठायला हवा, तसंच अंगावर सोपवलेल्या जबाबदारीनुसार विवक्षित उंचीही गाठावयास हवी. एकाच अग्निबाणाकडून ही सगळी कामगिरी पार पाडायची, तर त्याचा आकार एवढा अवाढव्य आणि त्याचं वजन इतकं भारी होईल की ते कदाचित त्यालाही पेलवणार नाही. शिवाय ते वजन वाढल्यामुळे लागणारं इंधनही जास्तीचं लागेल. त्याचंही वजन त्या अग्निबाणालाच सहन करावं लागेल. यासाठी मग एकाऐवजी तीन-चार अग्निबाणांची साखळी रचली की पहिल्या अग्निबाणाला जमिनीवरच बत्ती देण्यात येते. तो तुलनेने हलकाही असतो आणि त्याला लागणारं इंधनही कमी असतं. पण त्यामुळे तो एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वेग गाठू शकत नाही की विशिष्ट उंचीच्या टप्प्यापलीकडे जाऊ शकत नाही. पण त्याने जो वेग गाठलेला असतो, तो फक्त त्याचाच वेग राहत नाही. न्यूटनच्या जडत्वाच्या नियमाप्रमाणे त्याच्या पुढचे अग्निबाण आणि उपग्रह सगळयांनीच तो गाठलेला असतो. त्याक्षणी दुसरा अग्निबाण कार्यान्वित झाला की त्याला शून्यापासून सुरुवात करावी लागत नाही, तर तोवर गाठलेल्या वेगापासून आणि उंचीपासून तो आपली कामगिरी सुरू करतो. त्यामुळे त्याला पुढचा पल्ला गाठण्यासाठी तेवढा जोर लावावा लागत नाही. साहजिकच इंधनाचीही बचत होते. चेंडूचा तिखट मारा करणारे वेगवान गोलंदाज कसे दूरवरून पळत येतात आणि वेग मिळवतात, त्यामुळे त्यांच्या हातातल्या चेंडूलाही तो वेग प्राप्त झालेला असतो. आता जेव्हा तो गोलंदाज आपल्या खांद्यातील बळाचा वापर करत तो चेंडू जोरात फेकतो, तेव्हा आधीच मिळालेला वेग आणि त्या जोरापायी मिळालेला वेग यांची बेरीज होऊन तो चेंडू भन्नाट वेगाने फलंदाजाजवळ पोहोचतो. अग्निबाणांची ही मालिका तशीच कामगिरी करत असते.

सॅटेलाईट लाँच व्हेइकल - एसएलव्ही-3 हा आपण वापरात आणलेला पहिला देशी अग्निबाण. श्रीहरीकोटा इथल्या प्रक्षेपणतळावरून रोहिणी-1 या देशी बनावटीच्या उपग्रहाला कुशीत घेऊन त्याने 18 जुलै 1980 रोजी अवकाशात झेप घेतली. त्यात एकूण चार अग्निबाणांची साखळी कार्यरत होती. जवळजवळ 23 मीटर उंची आणि सतरा टन वजन असलेल्या या साखळी अग्निबाणामध्ये फक्त घनरूपातलंच इंधन होतं. उपग्रहाला तो जमिनीपासून फार उंचीवर नेऊ शकला नाही. कमी उंचीवरच्या कक्षेतच रोहिणीची प्रतिष्ठापना झाली. पुढच्या दोन वर्षांमध्ये याच एसएलव्हीच्या सुधारित आवृत्त्या तयार केल्या गेल्या. त्यांनी रोहिणीच्या बहिणींचीच स्थापना कमी उंचीवरच्या प्रदक्षिणा मार्गांमध्ये केली.


त्यापेक्षा अधिक ताकदीचा अग्निबाण विकसित करण्याचे पहिले दोन प्रयत्न फसले. पण तिसऱ्या वेळी मात्र ऑॅगमेंटेड सॅटेलाईट लाँच व्हेइकल - एएसएलव्ही - या अग्निबाणाने यश मिळवून दिलं. रोहिणीच्याच जातकुळीतल्या स्रॉस या 106 किलो वजनाच्या उपग्रहाला त्याने जमिनीपासून चारशे मीटर उंचीवरच्या कक्षेत नेऊन ठेवलं. अशाच आणखी दोन प्रयोगांनंतर आपले वैज्ञानिक पुढची मजल मारायला सरसावले.

ध्रुवीय कक्षेमध्ये उपग्रह स्थापित करण्यासाठी वेगळया अग्निबाणाची गरज होती. या प्रकारचा अग्निबाण आकाराने तर अवाढव्य होताच, तसंच वजनदार उपग्रह पेलण्याची क्षमताही त्याच्यात होती. आयआरएस मालिकेतले सगळे उपग्रह तोवर रशियन अग्निबाणांनी मुक्कामी पोहोचवले होते. या प्रकारच्या उपग्रहांची निकड पाहता अशा प्रकारे दुसऱ्यावर कायमचं अवलंबून राहणं परवडणारं नव्हतं. असा पहिला अग्निबाण - पोलर सॅटेलाईट लाँच व्हेइकल - पीएसएलव्ही - खरोखरीच महाकाय होता. त्याची उंची म्हणजे पंधरा मजली इमारतीएवढी होती, तर वजन 280 टन होतं. चार अग्निबाणांची साखळी याच्या मुख्य भागात होती. त्यात द्रवरूप इंधन वापरलं होतं. त्यापैकी दुसऱ्या आणि शेवटच्या म्हणजे चौथ्या अग्निबाणांचं द्रवरूप इंधन आपणच विकसित केलं होतं. त्याचं नावही 'विकास' असंच ठेवलं गेलं होतं. या व्यतिरिक्त याला चारी बाजूंनी घन इंधनावर चालणारे एकूण सहा बूस्टर अग्निबाण जोडले गेले होते.

15 ऑॅक्टोबर 1994ला देशी बनावटीच्या पीएसएलव्हीने आयआरएस-पी2 हा उपग्रह घेऊन अंतराळात उड्डाण केलं आणि इतिहास घडवला. कारण हजार किलोग्रॅम वजनाचा उपग्रह ध्रुवीय कक्षेत स्थापन करणाऱ्या अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीन या पाच देशांच्या पंक्तीत आता भारतही जाऊन बसला. आणखी दोन वेळा अशीच उड्डाणं केल्यावर तर आपले बाहू फुरफुरायला लागले. या अग्निबाणांचा व्यापारी उपयोग करण्याचा घाट घातला गेला. 1999मध्ये इतर देशांच्या तीन उपग्रहांना आपण त्यांच्या नियोजित ठिकाणी नेऊन पोहोचवलं. आपले अग्निबाण अशा रितीने भाडयाने देणाऱ्या इन्यागिन्या देशांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची ताकद आपण कमावली.

आपल्या अंतराळवेधाच्या कार्यक्रमात पीएसएलव्ही या अग्निबाणाचा सिंहाचा वाटा आहे. कल्पना-1 हा हवामानवेधी उपग्रह याच अग्निबाणाने भूस्थिर कक्षेतही स्थापन केला आहे. आजवर आपले चौदा आणि इतरांचे सोळा असे तब्बल तीस उपग्रह याच अग्निबाणाच्या मदतीने आपण अंतराळात नेऊन ठेवले आहेत. 2008 सालच्या एप्रिलमध्ये तर याने कमालच केली. एकाच वेळी तब्बल दहा उपग्रह आपल्या मिठीत घेऊन याने अंतराळात झेप घेतली. तो एक जागतिक विक्रमच आहे. त्याच वर्षी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालेल्या चांद्रयानाची पालखीही यानेच उचलून धरली.

कल्पनासारख्या उपग्रहाला या अग्निबाणाने भलेही भूस्थिर कक्षेत नेऊन आपल्या क्षमतेबाहेरची कामगिरी केली. पण त्या कक्षेमध्ये एखाद्या उपग्रहाला थेट स्थापन करायचं, तर वेगळा जिओस्टेशनरी सॅटेलाईट लाँच व्हेइकलसारखा अग्निबाण बनवणं आपल्याला जमायला हवं, याची जाणीव झाली होतीच. कारण बहुपयोगी असे इन्सॅट मालिकेतले उपग्रह भूस्थिर कक्षेतच स्थापन करायचे असतात. त्या उपग्रहांचं आयुष्य तसं मर्यादितच असल्यामुळे सातत्याने अशा उपग्रहांची स्थापना करावी लागणार, हेही स्पष्ट होतं. हे उपग्रह तसे वजनदार असल्यामुळे पीएसएलव्हीपेक्षा अधिक बलवान अग्निबाण बांधणंही आवश्यक होतंच.

या अग्निबाणांची साखळी तीनच कडयांची होती. यापैकी पहिल्या म्हणजेच तळाच्या अग्निबाणात घनरूप इंधनाचीच तजवीज केली गेली होती. पण त्यावरच्या दोन कडयांमध्ये मात्र अतिशीत अशा क्रायोजेनिक इंधनाचा वापर केला होता. या प्रकारच्या इंधनात द्रवरूप ऑॅक्सिजन आणि द्रवरूप हायड्रोजन यांचा वापर होतो. या वायूंना द्रवरूप देण्यासाठी शून्याखाली 183 अंश इतक्या अतिशीत तापमानाची गरज असते. साहजिकच अशा इंधनाचा वापर करणाऱ्या इंजीनाची जडणघडणही वेगळीच असते. या इंजीनांना 'क्रायोजेनिक इंजीन' असंच म्हटलं जातं. जीसॅट-1 हा उपग्रह घेऊन या प्रकारच्या पहिल्या अग्निबाणाने उड्डाण केलं. ते संपूर्णपणे यशस्वी झालं नाही, कारण उपग्रह हव्या त्या उंचीवर पोहोचल्यानंतरही त्याला भूस्थिर कक्षेत स्थापन करण्यात अपयश आलं. पण त्याने डगमगून न जाता पुनश्च हरिओम् करत 2003मध्ये जीसॅट-2 या उपग्रहाला मात्र योग्य ते स्थान मिळवून देण्यात या प्रकारचा अग्निबाण यशस्वी ठरला. या अग्निबाणाने तेव्हापासून आजवर पाच-सहा उड्डाणं केली आहेत. एका वेळी तर इन्सॅट मालिकेतल्या दोन टन वजनाच्या उपग्रहालाही याने हळुवारपणे भूस्थिर कक्षेत नेऊन सोडलं आहे. आजवर यासाठी लागणारी क्रायोजेनिक इंजीनं रशियाकडून विकत घेतलेली होती. पण आता आपणही ते इंजीन बनवण्यात वाकबगार झालो आहोत.

साहजिकच आपली क्षितिजं आता विस्तारली आहेत. आजवर आपण धरतीभोवतीच चकरा मारण्यात आनंद मानत होतो. आता नजर त्या पलीकडच्या विश्वाकडे लागली आणि आपल्याला सर्वात जवळ असणाऱ्या चंद्रापर्यंत मजल मारण्याची स्वप्नं आपण बघायला लागलो. चंद्रावर स्वारी ही केवळ कल्पनारम्य विज्ञानकथा न राहता ती वस्तुस्थिती बनवण्याचा प्रकल्प आपण हाती घेतला. त्याचीच परिणती चंद्रयानाच्या बांधणीत आणि यशस्वी प्रक्षेपणात झाली. याचं आयुष्य तसं जुजबीच राहिलं, तरी त्याने चंद्रावर पाणी असल्याचा भक्कम पुरावा सादर केला. जगभरच्या वैज्ञानिक जगताने त्याचं कौतुक केलं आहे.

पण चंद्र हा नाही म्हटलं तरी आपल्याच आवाठयातला. त्याच्यापर्यंत मजल मारणं तसं अभिमानास्पद असलं, तरी आपल्या महत्त्वाकांक्षेला फुटलेले धुमारे शांत करणारं नव्हतं. अंतराळ संशोधनाची नांदी म्हणताना साराभाई यांनी जरी ''आपल्याला चंद्र, तारे यांच्यावर स्वारी करण्याची आकांक्षा नाही'' असं म्हटलं असलं, तरी आता परिस्थिती बदलली होती. आपण आपल्याच अंगणात खेळणारे खेळाडू राहिलो नव्हतो. जागतिक पटांगणात विहार करण्याची क्षमता आपण कष्टसाध्य केली होती. साहजिकच मग चंद्रापुढेही मजल मारून मंगळापर्यंत पोहोचण्याची ईर्षा उत्पन्न झाली होती. त्याला एक व्यावहारिक कारणही होतं. आज ना उद्या अंतराळातल्या, विविध ग्रहांवरच्या नैसर्गिक साधनसामग्रीवर आपलाही हक्क सांगण्याची स्पर्धा सुरू होईल, तेव्हा आपलंही प्यादं त्या पटावर सरकवण्याची संधी आपल्याला मिळायला हवी. त्यासाठी मग ती मजल मारण्याची धमक आणि क्षमता आपल्याजवळ आहे, हे सिध्द करून दाखवणं आवश्यक होतं. त्यातूनच मंगलयान मोहिमेची आखणी केली गेली. पहिल्याच सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम करणाऱ्या खेळाडूप्रमाणे आपणही पहिल्याच प्रयत्नात अचूकपणे मंगलयानाला मंगळाभोवतीच्या कक्षेत स्थापित केलं. त्याच्याकडून मिळणाऱ्या संदेशांनी मंगळाविषयीच्या माहितीचा अभूतपूर्व खजिना आपल्याला उपलब्ध करून दिला आहे.

आपल्यासारख्या गरीब देशाला ही चैन परवडणारी आहे का? असा सवाल करणाऱ्या शंकासुरांनाही त्या मोहिमेने मूँहतोड जवाब दिला आहे. कारण मंगलयानानंतर आठवडयाभरातच अमेरिकेने पाठवलेल्या 'मेहन' या यानाचा खर्च आपल्यापेक्षा दसपटीने जास्त आणि त्याच्या तयारीसाठी लागलेला वेळ आपल्यापेक्षा तिपटीने जास्त होता. स्वस्त आणि मस्त असा अंतराळ प्रवास आपणच देऊ शकतो, हे जगजाहीर झालं होतं. 

हे अर्थात सहजसाध्य झालेलं नाही की हा प्रवास विनाअडथळाही करता आलेला नाही. कारण वेळोवेळी जगातल्या इतर काही देशांनी आपल्याला एक प्रबळ प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये असेच डावपेच आखले होते. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी अतिशीत तापमानाला आपली कामगिरी पार पाडणाऱ्या क्रायोजेनिक इंजीनाची आपल्याला गरज होती. ती भागवण्यासाठी रशियाकडून अशी इंजीनं आणि ती बांधण्याचं तंत्रज्ञान खरेदी करण्याचा करारही आपण केला होता. त्याची पूर्ण किंमतही अदा करून झाली होती. पण ऐन वेळी अमेरिकेच्या दबावापुढे कच खात रशियाने तंत्रज्ञान विकत देण्यास नकार दिला. आकांडतांडव न करता आपण त्या करारात थोडा बदल करत त्या किमतीत पूर्वी ठरल्याप्रमाणे तीनच इंजीनं न देता सहा द्यावीत, असा प्रस्ताव मांडला. त्यांच्या रचनाबंधाचा आणि कार्यपध्दतीचा तपशीलवार अभ्यास करत मग आपणच त्या इंजीनांच्या बांधणीचं तंत्रज्ञान विकसित केलं. आज आपण हीच स्वनिर्मित इंजीनं वापरत आहोत. त्यासाठी कोणावरही अवलंबून नाही. 

आज अंतराळ संशोधनाच्या या कार्यक्रमाला पूर्ण राजकीय पाठबळ मिळालं आहे. पर्याप्त अर्थबळही पुरवलं जात आहे. तो कार्यक्रम व्यापारी दृष्टिकोनातूनही फायदेशीर ठरत असल्याचं दिसून आलं आहे. या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं स्वातंत्र्यही वैज्ञानिकांना बहाल करण्यात आलं आहे. धोरणनिश्चिती करून तपशील ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं आणि वैज्ञानिकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला गेला तर ते अक्षरश: गगनाला गवसणी घालू शकतात हेच इस्रोच्या आजवरच्या वाटचालीने निर्विवादपणे सिध्द केलं आहे. त्याचीच पुनरावृत्ती इतर क्षेत्रातही होऊ शकते, याचं भान आपण ठेवायला हवं.   

balphondke@gmail.com