काळोखतिढा

विवेक मराठी    26-Oct-2016
Total Views |

*** सुरेंद्र पाटील***

कसं आसंल माय माणूस जल्माचं? कोण तर सुखी हाय का इथं? परत्येकामागं परमात्म्यानं कायतरी किरकीर लावल्याली हायचं. दुख न्हाई आसा जगात कोण आसंल का? या घराला म्या लय नटत होते! खटलं मोठ्ठं म्हणून जरा वढवढ हुत्याय जीवाची; पर माजी तकरार न्हाई. या घराला म्या कवा येगळं समजाया न्हाई, ना या घरानं मला! घरागण्ािस वाटण्या झाल्यात गावात पर हामचं घर आखंड हाय! घर असावं तर तात्या बिराजदारावनी आसं म्हणत्यात गावात! तवा आप्पाची गर्वानं छाती फुगत्याय, ''श्ािवकन्या हाय म्हणून हामचं घर टिकून ऱ्हायलय. तिच्याजागी दुसरी आसती तर ह्या घराचा कवाच चिंदाणा झाला आसता.'' आसं घरात मन गुतलंय. गुतल्यावर कुथणारी म्या न्हाई!

 
ती
न पोरं नौकरदार करायची रग होती आप्पात; पर तसं झालं न्हाई. धाकला शंकर बी.एड. श्ािकून घरात बसलाय. पर त्येला नौकरी धंदा न्हाई. शेताचा लळा न्हाई म्हणून शेतात जाणं फिणं न्हाई. तीन टाईम रेटून खायचं न् वर तोंड करून बोंबलत फिरायचं! शेंडीफळ म्हणून आव्वाचा लाड! घराला आपुनबी हातभार लावावं, काय तर करावं आसं शंकरला जराबी वाटत नसंल का? ते सीडी का काय आणायच्या आन पिक्चर बघायचं, एवढंच ध्यान हाय त्येला! गावात न्हाई त्या करामती करायच्या आन आप्पा सिवसांब भावजीच्या नावानं ''नौकरी लावाया घरचे पैसे दिनात!'' आसं गऱ्हाणं करत फिरायचं, एवढंच काम हाय त्येला. आता तर आप्पालाबी बोलायचं सोडल्यात माय. आप्पा आव्वा त्येच्यापायी मधल्यामधी धुपू लागलेत. आसी धुपू लागली की आव्वा आधी माज्यावर वसकते, ''नौकरी न्हाई लागली तर बसून खाईल शंकर... मोप जमीन हाय त्येला!''

''बसून का खाईनान् उठून का खाईना, मला काय करायचं हाय? घ्या त्येला डोस्क्यावर.. भाऊ चांगले म्हणून चालल्यात नखरे!'' मी मनातल्या मनात म्हणते. उघड म्हणल्यावर फाडून खाईल आव्वा!

हंाऽऽ!

तर शंकर आस्सा. घराला काडीची मदत करत न्हाई. सिवसांब भावजी ब्यांकेत चिटकले म्हणून हामचं घर लईनवर ऱ्हायलं. न्हाईतर माजे तीन लेकरं, आप्पा-आव्वा, मी, माजा नवरा मन्मथ. एवढा पसारा वढायचा म्हंजी चेष्टा हाय का? शेतातलं तर शेतालाच पुरंना. सिवसांब भावजीच्या जीवावर हामचं समदं झाकून चाल्लंय. आन बिचारा या घराला करतोबी बक्कळ! खोटं कशाला बोलावं आपुण तर?

ऊस गोड लागल्यावर मुळापस्तोर खात्याल का कोण? पर सिवसांब भावजीला तसंच करत्यात ह्या घरची माणसं. त्येंलाबी संसार हाय, लेकरंबाळं हाईत! ब्यांकेत आसले म्हंजी त्येनी नोटा छापाया बसल्यात का ह्या घरापायी? कसं कळंना की आप्पाला!  वाघ्या बैलाचीच गोष्ट घ्या, काय गरज होती त्येला बदलायची? दुसरा बैल इकत आणायची? आत्ता काय जड कामं आसत्यात शेतात? पर सांग्ाितले आन माज्या नवऱ्यानं उरावर बसून आणले त्येंच्याकडून पैसे!.. निव्वळ भोळया सांबाचा आवतार सिवसांब भावजी. तीन भावात येगळेच! माजा नवरा मन्मथ मुलखाचा चाबरा! ह्या बोटाचा थुका त्या बोटावर कराया एक नंबर! आप्पानं कारभारी केल्यापसून तर रान मोकळं झालंय त्येंला. आन गावात कुणालाबी बोलू दिनात! माज्यासंगट तर जोकून बोलल्यात. कोंच्या जल्माची श्ािक्षा हाय की ती मला? मी काय इचारले, तर ''आक्कल हाय का?'' ''येडी हाळद'' आसली भाषा त्येंची! मला बोलताना जीभ बांधून ठिवत्यात आन ती सोडली तर आसं!.. पर घरी मुक्कामाला आसले की पाय दाबून घ्येयलान् तंगडं टाकाया बायकू लागतेच!

पर शेताचा हिशोब त्येंला नीट जमला न्हाई, ना संसाराचा. लेकराबाळाच्या हातावर कवा यंपी ठिवले न्हाईत, का त्येंला कवा पाच रुपयाचं इंजेक्शन टोचून आणले न्हाईत! लेकराचं दुखणं-खुपणं आप्पा आन भावाच्या उरावर. लेकरं ह्येनी काढायचे आन तकलीप त्या बिचाऱ्याला! लय घट्ट माय काळीज.. महानंदा न्हाई, पर अनुसया लय हुशार म्हणून कित्ती नटतो शंकर! इंग्रजी वाचत्याय पोरगी! शाबासकी देत्याल वाटलं होतं, तर म्हणले, ''तिला टुकडे बडवाया श्ािकीव. येडी हाळद कुठली.''

आप्पानी त्येंला श्ािकवायची जी तोड कोश्ािस केले पर, शेताचा गाईगुराचा नाद कशाची शाळा करू देतो? मला श्ािकायचं न्हाई, म्हणीत आव्वाच्या पदरात लपले. काय करत्याल मग आप्पा मायलेकरापुढी? मर म्हणले शेतात! शाळा सोडून हातानं वाटुळं करून घेतले. शेत तर नीट करत्यात का ह्येनी? केलं तर मर मर राबायचं गुरावनी. उचकले की शेत न्हाई का फीत न्हाई. उगं भिर भिर फिरायचं लोकाची कामं करत. आप्पा म्हणतेत, ''गुरावनी मरून शेती होत नसते, त्येला कष्टाबरुबर डोस्कं लावावं लागतंय!'' पर हे कळाया हेंला डोस्कं तर फायजी का?

ह्या दोन वरसापसून गुडघ्यानं आधू झाल्यात आप्पा. आता वढवढ सहन हुईना त्येंला. सापळा झालाय शरीराचा. ताणाताण करून घेतलेल्या आंब्याच्या शेतापस्तोरबी जायचं आवसान न्हाई त्येंच्यात. ते शेत घिऊन चुकलं म्हणत्यात कधी कधी. त्येच्यात पेराचंय आन खळयाला जायचं! आसंच आसतंय माज्या नवऱ्याचं. ''जिव्हाळयाचं तीस एकर इनाम हाय! त्या आंब्याच्या चार एकरात काय पडलंय!'' आसं ह्येंचं चलींतर.

इनामाच्या शेतातली हीर पडल्ती. बुजून गेल्ती. ह्येनी लागले सिवसांब भावजीच्या मागं. हीर उपसून ती बांधून दिली. जिवंत पाणी हाय! उन्हाळयातबी डबडब आसती. हीर उपसले, बांधले, पाईपलाईन करून दिले, मग काय तर करून दावावं का ह्येनी?

घरच्या बाया शेतात जाऊ देत न्हाईत हामच्यात, न्हाईतर मी करून दावले आसते आप्पाला! लोकं पाण्यापायी कित्ती पैसे घालवू लागले. पर हामच्या घरी त्येचा फायदा करून घेयला यिना! सिवसांब भावजी हीरीचं काढल्यावर गपच बसल्ते. तवा ह्येनी, ''पाणी वर काढून दी, मग बघ आपली शेती! तुज्या मागचं हामचं खर्चा पाणी संपणार उद्या. ह्या घराचं म्या सारतो. शंकरचं श्ािक्षण, त्येची नवकरी, ह्येची तू आज्याबात चिंता करायची न्हाई. मी बघीन समदं..''

''अण्णा, विहिरीला खूप खर्च येईल उपसायला..''

''कर काय तर, न्हाई म्हणू नको.''

''आसं का?''

मग सिवसांब भावजीनं कसली तर फाईल केले कर्जाची. मोप वढावढ करून घेतले त्या हिरीपायी, पर मागं सराया न्हाईत. हीर-मोटार करूनच दाखिवले जगाला! पाण्याची सोय शेतात व्हायलान् लयटीचा खेळखंडोबा सुरू व्हायला गाठ पडली काय की.. लोडशेडींगच्या नावाखाली पंधरा पंधरा घंटे आंधार. शेतकऱ्याचं नशीबच फुटलंय. फाशीला जायचा वकूत आलाय. हेन्ला तर लयटीपायी टेन्शन टेन्शन यिऊ लागलंय. आधीच करणीसूर त्येच्यात लयटीचा खोळंबा! ते म्हणत्यात की, पादऱ्याला पावटयाचं निमित..

आता माजं नशीब बऱ्यावर हाय. पयलं एका बाईचा नाद लागल्ता की हेन्ला! आप्पा इनामात जाईनात, हेन्ला रान मोकळं. लागला पत्यानं पत्ता. शेतात घिऊन बसायचे तिला ह्येनी. बघितले तर संडास यिऊनी आशी! ह्येंला कशी भूल पडल्ती की ? कळाल्यावर मला आन्न गोड लागंना, सुधरंना. शेतात जायला बंदी. पिंजऱ्यातल्या पोपटावनी फडफड होऊ लागली जीवाची.. आव्वाला सांग्ाितले आन गेले इनामात तर... बसल्ते ह्येनी तोंडात तोंड घालून कोठयात. दारूची बाटली. ग्ािलासं.

तळपायाचीं आग मस्तकाला. डोस्कं गरगर झालं, आधी बाटली दिले फेकून. पदर खवले आन धरले तिच्या झिंज्या.

''सोडा, सोडाऽऽ'' ती आरडू लागली.

''भवानी, माज्या नवऱ्याला नादाला लावतेस.. रांडंऽऽ''

''ए, तू कशाला आलीस शेताला?''

''तुमची कीर्ती बघाया! तीन लेकराचे बाप हाव की! शोभतंय का तुमाला?'' त्येंला मी म्हणले. जोडा मारल्यावनी झालं तोंड. कशाला काय बोलत्यात? मग मलाबी आवसान आलं. घातले तिला लाथा बुक्या.. तिच्या भावालाबी बजावून सांग्ाितले आप्पानी.. हे समदं डोळयासमोर चित्रावनी येऊन गेलं.

थोरला चंदर अकरावीत बसलाय. औशाला खोली करून ऱ्हातो. सिवसांब भावजी मोप लातूरला जवळ ठिवा म्हणून मागं लागले, पर मी ठिवले न्हाई. ह्या घराचं वझं हाय का त्येंच्यावर? आन लांबूनच गोड आसतंय!... चंदरचं श्ािक्शण, पोरीची चिंता आता सुधरू दिईना. नवरा तर शेत सोडून कशाचा इचार करतनी. कसं हुईल माय? आसं मला झालं होतं. आनसी रस्त्यावरून चालली म्हंजी काळीज हालतंय माजं! देखण्या पोरी मायबापाला घोर आसत्यात. त्येंला लपवायाबी येतनी. एकामागं एक लगनं करावं लागणारेत दोघींचे. चार वरसात जिकडं तिकडं करावं लागंल काटर्याचं!

सारं टकुऱ्यात आसंच खालीवर चालल्यालं. ह्येनी आजून बाहीरून आले नव्हते. लईट नसल्यानं गाव लवकर सामसूम होतं. दिवसभर राबून आंग मुसळानं कुटल्यावनी आंबलंय. धुरानं डोळे कचकच करीत होते. पर ह्येनी घरी आले नव्हते. ''कुठं बसले आसतील माय ह्येनी?'' मनात न्हाई ते इचार यिऊन चालले पर कुठं बेपत्ता झाले, ते कळंना. आप्पानी झोपण्याआधी दोनदा चवकशी केली,

''मन्मथ बाहीरुन आला का न्हाई?''

''न्हाई आप्पा.''

''तू झोप. बसला आसंल कुठंतर दोस्ताजवळ. लईट नसल्यानं घरी यिऊन तर काय करणार? येडं केलंय दुनियेला त्या लयटीनं.... जेवलाय का?''

''न्हाई...''

''आं?'' आप्पानं धीर दिला, ''यिल म्हण झोप तू. मायला, लेकरंबाळ सोडून कसं बसावं वाटत आसंल ह्या पोराला?''

वाट बघून डोळा लागला आसंल नसंल, तर परसाकडल्या दारानं आले की ह्येनी. चोरावनी, मांजराच्या पावलानं. तोंडाला घट्ट मफलर बांधल्यालं. मी लटमन उठून बसले. खोलीतला कंदील मोठा केले.

''जेवायला वाढते, चला.''

''नगं. झोप यिऊ लागलीय.''

''कुठं जेवलाव का?''

''शेळक्याच्यात सांग्ाितलं होतं.''

त्येनी पडले आथरुणावर. मी खोलीची कडी लावून घेतले. झोप झोप आल्याली. आता त्येंचे पाय दाबुनी आसं झाल्यालं. पडले वाकळ घिऊन. तर ह्येनी वाकळ वढायले. डवचायले. राग राग आला. आता फायजी काय की त्येंला? बायकुलाबी जीव आसतो, ते कळंना की त्येंला... मी वाकळ गच्च धरले. मग हाट्टालाच पेटले. खसमन वढून फेकले वाकळ. वढले मला जवळ! तोंडावरचं मफलर बाजूला झाल्तं त्येंच्या. तोंडाचा आंबटचिट्ट वास आला... लक्क झालं काळजात. म्हणले, हे आजून कवा चालू केले म्हणावं? कुण्या दोडानं ह्या वाटंला नेला आसंल? त्येचा मुडदा बसविला!   शेतात त्या बाईच्या झिंज्या धरून धाडल्यावर. पुन्ना कवा घरी पेल्यालं ह्येनी दिसले न्हाईत, ना त्येंच्या पेण्याचा कवा बोभाटाबी न्हाई.... म्या सोताला किती नशीबवान मानू लागल्ते तर....

''यिऊ वाटंना जवळ?'' त्येनी म्हणले. माजी दातखिळी बसलेली.

''माजल्याय जात.'' आसं म्हणून त्येनी धरले पदराला. मी दिले त्येंचा हात झिडकारून. घशात मातीचा बुकणा भरल्यावनी झालं.

''आत्ता हे गुळवणी प्येयचं कोण श्ािकवलं? संसारात काय कमी पडलं तुमाला?'' माजा आवाज मलाच वळखू यिना. उरात कायतरी गढूळ दुख साठल्यावनी. कोपऱ्यातल्या कंदिलाची वात माज्यासारखीच फडफडत होती.

''पार्टी होती दिनू शेळक्याची. मिलीटीतला दोस्त हाय! लईच आग्रेव केला त्येनं. लंगुटीयार हाय. मंग घोटभर घेवं लागलं!'' कधी न्हाई ते मला एवढं बोलले त्येनी. मला नवल वाटलं त्येंचं. मंग कळलं, ही समदी दारूची माया हाय! न्हाईतर ह्येनी मला आसं कवा बोलावं घडघड?

''त्या भाडयानं चोरी कर म्हणल्यावर करताव?''

''तेवढं कळंना व्हय मला?... लईच नाकुटयानं बोलू लागलीस बा. दुसऱ्यावनी रोज पिवून आल्यावर तर काय केली असतीस की?'' त्येंच्या मनाला माजं बोलणं लागलं होतं काय की. आवाज कडकड झाल्ता चाबकाच्या फटक्यावनी.

''एकदा पेल्यावर दुसऱ्यांदा पेयला का जड जातंय व्हय? तुमच्या सारक्यानं तसल्या वाटंला जाऊनी. आव्वा आप्पाला हे कळलं तर डोस्कं आपटून घेत्याल की.''

''च्या मायला, शेळीनं पाला खाल्यावनी लयच मचमच करायली की तू! ह्येच्या अदुगर सोडलो नव्हतो का? कालपस्तोर पेल्तो का सांग?'' आसं म्हणून आथरुणावर ताडकन उठून बसले. कंदिलाच्या उजेडात त्येंचा चेहरा वायलाच दिसू लागला. खुरपूट दाढी. धष्टपुष्ट शरीर. डोळे कावल्याले. गडी बेचैन झालेला. तोंडबींड वंगळंढयाण केल्ते.

मग मलाच दया आली. म्हणले, केले आसत्याल दोस्तमित्रांनी जबरदस्ती, त्येच्यानं घेतली आसत्याल थोडी. त्येनी तोंडानं सांगू लागलेत की घोटभर घेतलो म्हणून. लपवून तर ठिवलनीत की! आपुणबी पराचा कावळा करू लागलोय, लईच ताणून धरणं बरं न्हाई... पर मनाला हे पटंना गेलं.

''जेवताव का थोडं?'' कायतरी इचारायचं म्हणून इचारले, तर गडी मारक्या बैलावनी तुंबलेला. जात्याच्या खुटयावनी उशाला बसलेला. मी पुन्ना जेवा म्हणले लाजग्ािडयावनी, तरी त्येनी घुश्श्यातच. म्या इचार केले, आधीच आपणाला तोंड उचलून बोलत न्हाईत, आता काय तर मनात धरून बसले तर बरं न्हाई ते!

''इथं दिनरात खपावं, न्हाई ती किर किर करून शेताचं रेघंरुपंला लावावं आन घरात आसं !... आप्पाला माजं कायबी पटतनी. मी जे करावं म्हणताव, त्येनी त्येच्या उलटं ऱ्हात्यात.. माज्या मनावर मूठभर गहू पेरू दिनात.. उठलं की सुटलं त्या सिवसांबचं कवतुक! त्येनच घरात शाणा! का? तर पैसा देतो म्हणून! पर त्येला कोण श्ािकिवलं? तो शंकर तर सुई तर उचलतो का शेतात, का कवा खळयादळयात आलाय? हाय का घरात कुणाला शेताची झळ? म्या मातीत मेलो म्हणून दोघं श्ािकले.''

''आवं, पर म्या कुठं?...''

''गप बस. समदे माळंचे मणी हाव! माघारी नाव ठिवताव मला, माहिताय मला. समद्याला वळखून हाव म्या. मन्मथ बिराजदार म्हणत्यात मला! उडत्या पाखराची पंख मोजताव म्या.... कळलं का? शेतीतून उत्पन काढाया यिना मला, आसं माज्या माघारी म्हणताव.... लईटच साथ दिना तर म्या काय करू? ह्या लयटीनं लय टेंशन आणलंय, कशाला नीट हुत्याय शेती, पाणी येळंला मिळंना गेल्यावर?

शेती कसं करताव ते मलाच माहीत. खुरपाया रोजगारी यिनात. भलताच भाव आलाय त्येंला. सदा नडून बघत्यात, खुरपण बी-भरणं, आवश्ािद, एवढा मोठा लागूड घालून समाधान न्हाई जिवाला.. शंकर तर शेतात पाय ठिवतनी, का कवा भाकरी घिऊन येतनी! सव्वीस एकर इनाम तर वढावंच, आंब्याचं शेत तर त्या धाकटयानं बघावं का? ते बी न्हाई. घरात बसून आप्पाला, ब्यांकेत पंख्याखाली सिवसांबला काय ढेकळं कळणार हाय शेतीचं? आप्पाचा काळ गेला, तवा माणसं काम ऐकायची, पर आत्ता शेती करणाऱ्यालाच कळत्याय... शेती करण्यापरीस काटयावर चलल्यालं बरं. जीव इनुस्ती आलाय निसता.''

आसं काय काय मनातलं सांगू लागलेन् छक्क झाला माजा जीव! आप्पा, आव्वा, म्या त्येनी शेत नीट करतनीत म्हणून त्येंच्या नावानं सदा हाका मारताव. पर त्येंच्या आडचणीचा दुखाचा कवा कोणबी इचार कराया न्हाई. पिकलेलं आवघड जाग्यावरचं केस्तूड सुईचा धक्का लागल्यावर पू मोकळं होतं, तसं हुरद्यात साठल्याला समदा काला ह्येनी बाहीर काढले. कवा एवढं मला बोलले नव्हते लगीन झाल्यापसून; पर दारू पेल्यानं बोलले का काय? मलाबी त्येंचं म्हणणं पटत चाललं. आप्पा घरी बसल्यापसून कुणबिकीचा समदा भार त्येंच्या डोस्क्यावर हाय. एक आसतंय का शेताचं? वढाताण आसत्याय, रात यिळ खपावं तवा चार दाणे येत्यात घरात! खरंच हाय माय त्येंचं, काटयावर चलायचा धंदा हाय कुणबिकीचा. कितीबी मरा कमीच आसतंय! शंकरला काय होतंय, ह्येंच्या हाताखाली मदत कराया? गावात श्ािकल्याले पोरं का शेतात जात न्हाईत? फुगट मिळावं म्हणत्यात, वर समद्याला आरी घेतल्यात..... आता आप्पाच त्येच्या वाटंला जाईनात तर आपुण काय करणार हाव? पर ह्येंच्यावर जुलूम होऊ लागलाय... गडी म्हारुती तर निव्वळ रंडुला, सदा घरी पडावं म्हणतोय... कवा एकटं इनामात जा म्हणलं तर जात न्हाई. मुलखाचं भिकुरं हाय. उचल मागाया तर महिना जाऊ देतनी!

आन त्या लयटीनं तर सत्यानास केला शेताचा. त्या सरकारला कसं कळंना म्हणावं? मढं उचललं त्या सरकारचं! त्येच्या गवऱ्या उचलल्या मी!... इचार केले, समदं खराय, पर दारू पिवून काय होणार हाय? आसलं काय तर टेंशन घिवून रोज प्याचे ह्येनी... काटाच आला आंगाला. मग मन घट्ट केले. गोड बोलून ताळयावर आणाया फायजी.

त्येंच्याकडं बघितले. आडकित्यानं सुपारी करकर कातरीत होते. कातरून टाकली सुपारी तोंडात! हा एक जुना नाद. तंबाखू-सुपारी आसंल तर जेवण लागत न्हाई न बायकू! मला न का नीट बोलंनात पर आप्पान् सिवसांबपुढीबी आगाव बोलतनीत... दारू पिऊनी, म्हणून त्येंला कसं सांगाव मला सुधरंना. वसमन आंगावर आल्यावर काय घ्या? आज त्येंचे पाय दाबाया नव्हते. घरी आसले की एकदा आनसेकडून कचकच आंग तुडवून घेत्यात. आन रातरी मलाबी दाबावं लागत्यात पाय. कितीबी दाबा. नगं म्हणत न्हाईत!

''आडव व्हा, पाय दाबते!''

''पाय फिय काय नगं ... कुणाची म्हेरबानी नगं.... म्या चाललो शेताकडं.'' त्येंचं रागानं बोलणं ऐकून घाबरून गेले. एवढया रातरी कशाला निघाले शेताकडं? म्हारुती तर गेलाय. आजतर आक्काबाई गेलीय पोटात. डोस्क्यातबी जाळ करून घेतल्यात.

''काय जायचं न्हाई शेताकडं, पडा उगं.''

''नगं.'' बारक्या पोरावनी आडून बसले. मी पुन्ना जोर केल्यावर झाले आडवे. मी पाय दाबाया लागले. मग गडी जरा पघळला.

''उगंच्या उगं तुज्यावर राग काढलो म्या... राग आला आसंल तुला?'' मनालाच बोलल्यावनी म्हणले.

''त्येच्यात कशाचा राग?''

''ह्येच की मघा घालून पाडून बोललो ते...'' त्येंच्या या बोलण्याचं नवल वाटलं! येरी कवा आसं मयानं बोलत न्हाईत. आर्धा जलम कडंला आला. वाटलं, काय का आसंना बायकुवर जीव हाय! मनातून बोलायलेत का नशा झाल्याय, म्हणावं?

''जाऊ द्या, तुमच्यावर लय वझ्झं पडू लागलंय. येतय कवा तर आसा राग.'' मी म्हणले, ''माणसालाबी काय जीव आसतो का न्हाई?''

''ऱ्हाव दे ते पाये.. ये इकडं!''

''जावा तिकडंऽऽ..''

''जाऊ का शेताकडं?'' हासले फिदी फिदी. पडले त्येंच्या शेजारी. नव्या नवरीला बघावं तसं बघू लागले. दमबी न्हाई माय या माणसाला!

''समदं खरं झालं, पर एक सांगायचं ऱ्हायलंच की! सांगू?''

''हूं''

''आयकू लागलाव का?''

''सांग..''

''पुन्ना पिऊन येयचं न्हाई, शपथ हाय माजी तुमाला.'' मी त्येंचा हात धरला.

''न्हाई.. न्हाई पेणार पुन्ना. झालं समाधान?'' त्येंनी आसं म्हणायलान् लईट यायला एकच गाठ पडली. बोला फुलाला गाठ पडावी तसं. चांगला शकून झाला! ह्येनी आपलं बोलणं खरं करून दावणार आसी मला परचिती आली.. लईट कशी आली होती की मधीच? न्हाईतर ती पाचला यित्याय पहाटं.. त्येनी वरची लईट बंद केले.. कंदील फुकून टाकले आन वाकळंवर माजा चोळा मोळा कराया सुरू केले. माज्या पायानं कायतरी वाजलं. पलीकडच्या खोलीतून आप्पा बोललेच,

''श्ािवकन्याऽऽ मन्मथ आला का?''

''आलेऽ आले ऽ''

''जेवला बिवला का?

''हूं. जेवले की.''

त्येंच्या तोंडाचा वास सोसंना गेल्ता. पर त्येंच्यापुढी माजा इलाज चलंना. माजलेल्या बैलानं श्ािगानं मातीचा ढिगारा टोकरावा तसा कायतरी खेळ चालला होता त्येंचा. पयलंच्यावनी आता सहन हुईना जीवाला. कमी व्हायचं तर त्येंचं आसलं वाढतच चाललं. बरं, न्हाई म्हणावं तर एखादी ठिवली तर काय करावं? हाईतबी तसले. बघितले होते एकदा तर!

आंगणातल्या पत्र्याच्या खोलीत टीवीचा मोठ्ठा आवाज चालू होता. शंकरनं ते खोकडं आणून ताप केलाय डोस्क्याला. ते घरी आणल्या दिवशी आप्पा बोंब मारून ऱ्हायले. तर शंकर म्हणला,

''मी कुणाला पैसे माग्ाितले का घरात? माज्या दोस्तानं दिलाय. गावात सगळीकडं रंगीत डिश टीव्ही आलेत. जगात काय चाललंय ते कळाया नको का? मग ब्लॅक व्हाईटही नको का घरी?''

''आरं, पर दोस्त फुगट देणार हाय का ह्येला? आज ना उद्या त्येनं पैसे मागाया येणारच. फुगट येडंबी मुततनी करंगळीवर'' आव्वाला आप्पानं सांग्ाितलं.

''आव्वा, माग्ाितले तर माझं मी सारेन. कुणी चिंता करू नका त्या पैशाची.'' शंकर म्हणला, ''खरं म्हणजे, तुमच्यासाठीच आणला मी. करमणूक होतीय, मालिका बघता येतात.''

''लेकरांन एवढं आपल्यापायी आणलं तर, ऱ्हाऊ द्या की! त्येचा पायबी टेकल घरात!''

''नवकरीचं बघायचं सोडून आता सिनिमा बघत बसा... त्या सिवसांबच्या जीवाला ताप हाय ह्येचा.'' आप्पा तणतणत गेले बाहीर. चित्रात बघितल्यावनी सारं डोळयापुढून गेलं. मी आथरुणावर उठून बसले. दारूचा वास नाकात बसल्यावनी झालेला. माजा नवरा तिकडं तोंड करून घोडे इकून आल्यावनी डाराडूर घोरत पडलेला. घोरायची बेकार खोड. त्येनी फरागत झोपल्याले आन त्येच्या पेण्याची चिंता भूतावनी माज्या उरावर बसलेली.

धा-पंधरा दिवसापसून गाडी रुळावर आल्यावनी समदं नादर चालल्यालं. सोयाबीन काढून टाकले होते. पुढच्या सात आठ दिवसामधी हायब्रीड काढायचं बाप ल्योकानी ठरविल्ते. हाय ते घासकुटका पोटात ढकलाचयन् दारं देयला गडयाला घिऊन पळायची सर्कस ह्येंची चाललेली. राती लईट आसंल तवा उसाला रातभर दारं देयचं. आसं रातपाळीचं दारं आलं, की जीवाला घोरच लागायचा. इच्चू काटयाचं भ्या वाटायचं. दोन तीनदा पायातूनबी साप गेल्ता म्हण. म्हारुत्यांन सांग्ाितला, तवा नारळ फोडले होते.

दारं देयचं काम खरं तर म्हारुत्याचं! राती दारं म्हणलं की गडी एकटा जाईना. निसतं बोलतंय राघूवनी! बायकूला सोडून जायला जीवावर येतंय त्येच्या! गावात कोणसुद्दा त्येला ठिवना गेल्तं, आन ह्येला सापडला वाघ! खादगी बोकडाची आन कळा माकडाची आसल्या गुणाचा!...

चांगलं म्हणाया भागचं न्हाई, कायतर आडचण ठेवल्यावनी यित्याय, शेताकडचा डीपी धडमन उडाल्ता लय लोड हाय म्हण त्येच्यावर. उसाच्या पाण्याचा खोळंबा झाला. तीन चार दिवस घालीवले लईटवाल्यानी. पर रोजच आज उद्या म्हणल्यावर ह्येचं टक्कुरं सरकलं. शंभरदा चकरा मारले आसतील ह्येनी त्या लइट आफीसात. ऊस पाणी आसून जळू लागला म्हणून राख घालून घिऊ लागले. घरात कुणाला नीट बोलंनात. एवढं बक्कळ खात, लाग लागूड घालून नुकसान दिसू लागल्यावर कोंच्या शेतकऱ्याचं टाळकं फिरणार न्हाई?

मनात आसं खालीवरी चाललं होतं. त्या लयटीला बेमारीचा गड्डा यिऊ दे, त्येच मढं उचलू दे, आसं म्हणीत होते. दुपार टक्क झालेली. यव्वा मी लयटीचंच बोलत होतो. तर ढेळजेच्या तोंडाकडून कालवा आला कानावर. उठून बाहीर जायच्या आधी तर वरातच घिऊन आल्यावनी आले की लोकं! बघून हात पाय थंडच पडले!! मुताड घिऊन आल्ते ह्येनी. चलाया यिना गेल्तं. तोंडानं ''लईट आफीस जाळून टाकतावऽऽ सोडा.'' आसं बरळत होते. दोन बाजूला दोघांनी गच्च धरल्यालं. कपडे वाकडे तिकडे, डोळे लालबुंद झाले होते. मागं धा पंधरा पिळगाडं तमाशा बघाया! त्रिंबकनानानं धरून आणलं होतं. त्रिंबकनाना मागं लय वरसं गडी होता हामच्यात. बोलला,

''दारू दे म्हणून धोंडयाला मारलं, मालकीण.''

''आता काय बघायचं ऱ्हायलंय?'' आप्पा कुचमचला, ''श्ािवहार, श्ािवहार!''

''त्रिंबकनाना, त्येला पडवीला तर टाका. काय कम पडलं आसंल म्हणावं?'' आव्वा पडवीच्या खांबाला कपाळावर हात मारून घेत बोलली. मला बघितलं त्येनी.

मला काय सुधरतंय? पाये खिळे मारून ठोकून बसवल्यावनी झालेले. काळीज फडफड सुपावनी करत होते. घरात बघणाऱ्याची गर्दी वाढायाच लागली. लेकरं कमरंला घिऊन गल्लीतल्या बायाबी आल्या ह्येंची करणी बघाया! दुनिया तर बघायाच बसलीय! त्येंचे नवरे लय गुणाचे आसल्यावनी आल्यात भवान्या! मला सनकीच भरली. मी चटमन सतरंजी टाकले. त्येंची दशा बघून अवघड वाटलं. आजून जेवायाबी नव्हते. डोस्क्यात डीपीच बसला होता नव्हं!

''आगं, ताक तर पाजवा त्येला. जल्दी उतरत्याय.'' शेजारची म्हातारी पारुमाय म्हणाली. आव्वाजवळ ती टेकल्ती आता..

''सकाळपसून जेवायबी न्हायतं यंऽ'' मीच बोलेले.

''जेव रं मन्मथ. उटा माडती'' आव्वा जवळ गेली.

''काय रोग आला न्हाई त्येला. तेवढं कवतुक कराया! उगं झोपू द्या. आसं केल्यावर रोज पिवून यिल शाणा.'' आप्पा आसं कावल्यावर मिस घेतल्या उंदरावनी पडले की! न्हाईतर, ''सोडाऽ मला. मला लईट आफीसला जायचाय!'' म्हणत होते ह्येनी. तुल्ल झाल्ते.

''सिनेमा हाय का सर्कस हाय? आपल्या घरात बघा आधी.'' आप्पानं गर्दीला बघून डोळे मोठे केले, तवा हामचं घर रिकामं झालं.

''त्रिंबक, कुठून आणलो ह्येला?''

''लईट आफीसमधी श्ािव्या दिल्यात. गाव गोळा झाल्तं. डीपी जळालाय म्हण की तिकडच्या श्ािवारात?''

''व्हय. दोन दिवसापसून सांगून थकलाय त्या लईटवाल्याला. पायाला दम न्हाई. तेवढंच हातात हाय. समदा चोराचा बाजार. वरल्या आफीसला जाऊन आर्जबी दिऊन आलाय. त्येनी कालच बसवायला सांगतो म्हणले होते म्हण डीपी.''

''आसंच कायतर नेमानं मन्मथमालक बोलत होते, तर इंजिनेरनं वाकडं बोलला म्हण ह्येन्ला.. टक्कुरं सरकलं. धोंडयाकडं जाऊन पिऊन पुन्ना लईट आफीसमधी आले म्हण ह्येनी आन्.''

''आन्''

''चप्पल काढले म्हण इंजिनेरला माराया..''

''आरं श्ािवा.''

''बरं तर बरं... शंकर मालक आले धावून, फडफड इंग्रजी बोलले त्या सायबाला.''

''ऑं...'' हामच्या पोटात गोळाच आला. वाटलं पुलीस फीलीस लावून दोन भावाला धरून नेलं तर? आप्पा, आव्वाचं तोंड उतरलं होतं. माजे तर पाय थरथर करत होते.

''आन धोंडयाला का बरं मारला?''

''लईट आफीसमधून सणकीत तिकडंच गेले मन्मथमालक. तुमी, सिवसांब मालकानं दारू दिऊने म्हणून ताकीद दिल्ती नव्हं धोंडयाला.. त्या बिचाऱ्यानं दारू न्हाई म्हणल्यावर त्येलाबी वढले म्हण दोन हात! मग दिला त्येनं दारू!''

''चांगलं केलं बाबा! पर आसं डोस्क्यात इस्तू घालून भागतंय व्हय, त्रिंबकनाना?''

त्रिंबकनाना इकडलं तिकडलं बोलून गेला. आप्पाबी ढेळजेला जाऊन टेकले.

कसं आसंल माय माणूस जल्माचं? कोण तर सुखी हाय का इथं? परत्येकामागं परमात्म्यानं कायतरी किरकीर लावल्याली हायचं. दुख न्हाई आसा जगात कोण आसंल का? या घराला म्या लय नटत होते! खटलं मोठ्ठं म्हणून जरा वढवढ हुत्याय जीवाची; पर माजी तकरार न्हाई. या घराला म्या कवा येगळं समजाया न्हाई, ना या घरानं मला! घरागण्ािस वाटण्या झाल्यात गावात पर हामचं घर आखंड हाय! घर असावं तर तात्या बिराजदारावनी आसं म्हणत्यात गावात! तवा आप्पाची गर्वानं छाती फुगत्याय, ''श्ािवकन्या हाय म्हणून हामचं घर टिकून ऱ्हायलय. तिच्याजागी दुसरी आसती तर ह्या घराचा कवाच चिंदाणा झाला आसता.'' आसं घरात मन गुतलंय. गुतल्यावर कुथणारी म्या न्हाई!

पर... पर माज्या या संसाराला आता दीष्ट लागली काय की? खुणी निघून गाडीचा चाक घरंगळून जावा. सारं एकार हुऊन लांबवर आक खडखडत जावा, समदे कासरेच हातातून निसटून गेल्यावनी केलंय माज्या नवऱ्यानं. का बरं पिऊ लागलेत ह्येनी? का बरं....? फिरून इचाराचं घडयाळ तिथंच आटकू लागलं. सोसंच ना त्येंचं तसलं वागणं.

''का थांबली हेंदरटावनी? पारू काय म्हणली ऐकाया न्हाईस का?'' आव्वा माज्याकडं बघत कावली. ताक आणाया म्या इसरल्ते. धांदरुन गेल्ता जीव ह्येंचा आवतार बघून.

''पोरगी घाबरून गेलीय, आव्वा... आण ए, ताक आण थोडं.'' पारुमाय चुकचुकली.

लगबगीनं सैपाकघरात गेले. ताक ठिवल्याल होतं. आणले तांब्यात वतून. पाजिवलो ह्येंला सासू-सुनानं. बिचारी आव्वा लटलटत होती. आंगावर त्येंच्या ताक सांडलं जरा. पदरानं पुसले. आप्पाला ढेळजेत करमतं व्हय? यिऊन बघत होते ताक पाजवायचं. ह्येनी डोळं उघडायला आन आप्पानं बघायला एकच गाठ पडली! मग ह्येनी न्हाई उघडले डोळे घंटाभर!

''आव्वा, ग्ािलासभर ताक गेलंय आता मन्मथच्या पोटात. घंटयाभरानं यिल मन्मथला सुशा... सांगा नीट समजावून त्येला, आसं नाव ठिवून घेयचं वागुनी. शाणा हाय मन्मथ. शाण्याला मार शब्दाचा आन येडयाला टोमक्याचा!'' पारुमायनं सूर लावला.

म्या आसाच कायतरी इचार करू लागल्ते, तर आव्वा म्हणली, ''आगं च्या तर कर की, श्ािवकन्या. पारुआक्का कधी न्हाई ते आल्याय!''

माजा पाय तिथून उचतल नव्हता. माजं जळू लागलंय आन हेन्ला च्याचं पडलंय! आवघड जागचं दुख सोसंना आन पिळायाबी यिना आसे माजे हाल.... उठले. आव्वाचा राग आल्याला. पारुमायचाबी! काम तर काय थेरडीला? सज भेटाया येती, आन चटणी कुटाया लागती!

राग गटमन ग्ािळले. पोरी शाळंतून आजून आल्या नव्हत्या. बापाचा परताप बघून त्या कशा करत्याल माय? आधीच हारीण काळीज हाय त्येंचं.

चुलीत काटक्या घातले. ढण्ण जाळ पेटला. भगुण्यात च्यापत्ती टाकून दूध वतले आन आधण यिऊ दिले. पारुमायन् आप्पाला दिले कपामधी. आव्वाला त्येंच्या ताटात दिले. मागून फू फू करत आव्वा म्हणली, ''साखर कमी टाकलीस!''

कप आन आव्वाचं ताट न्येयाला गेल्यावर आप्पा मलाच बघत होते. तोंड पांढर सिप्पट झाल्यालं. काय इचार करत आसतील आप्पा? जलम दिल्यात त्येनी तर! आप्पा म्हणले, ''तूबी घे च्या!'' मी ''बरं'' म्हणून सैपाकघरात गेले. पर कशाचा च्या न् फ्या? फेफरी गुंग केल्ती की आनसीच्या बापानं! चुलीतल्या काटक्या पार जळून गेलत्या. राख बाहीर वढले आन हातानं पाणी मारून इझिवले... पर जीवाचा कोळसा-कोळसा झाल्याला, तो पुन्ना कसा पेटंल?

आप्पाला माजी उलघाल कळाली कायकी. सुपारीचं खांड तोंडात टाकून पारुमायला जरा देऊन आप्पा ढेळजेला गेले. मी बसले हेन्ला राखायला बसल्यावनी.

पुन्ना मनात भवरा गरगरू लागला. काय झालं आसंल म्हणून ह्येनी पेत आसतील? सोन्यावनी संसार चालला होता. काय तकरार नव्हती. शेतीचा जिम्मा ह्येनी वढीत होते. पर आसं दारू पिऊन उताणं वागल्यावर घरात ह्येंला कोण पुसनार हाय?

आसा इचार करीत म्या सैपाकघरात जाऊन डोळे पुसत बसले. लय येळ माजं मलाचं वाईट वाटू लागलं. पडवीतून आव्वाची हाक आल्यानं मी गेले. तर ह्येनी उठून बसलेले. खांबाला टेकून चूळ भरीत होते. लय आज्यागळ माणूस. खालची जमीन तर पाण्यानं वल्ली केल्तेच केल्ते, वरची आंगीबी भिजवून घेतल्ते.

''पाणी आणू का वं?'' लाजग्ािडयावनी पुसले त्येंला.

''नगं.''

''जेवतोस का रं, मन्मथ?'' आव्वानं इचारलं.

''नगं ए.''

''जरा तुकडा खा की बाबा.''

''बरं.. आण कोरभर.''

भूक लागल्ती काय की. माज्याकडं तर डोळा उचलून बघाया न्हाईत. पोरी शाळंतून पळत आल्यावनी आल्या. बापाचे लालबूंद डोळे. डोस्क्याचे वाकडे तिकडे केस, भिजल्याली आंगी बघून चिमणीएवढं झालं तोंड. म्या डोळयानंच त्येन्ला शंकरच्या खोलीत जावून बसा आसं खुणीवले.

आचानक वारं सुटलं येडयावनी. बेलाचं झाड लकलकू लागलं. धुराळयानं समदं पाचट घुरमळत पडवीला आलं. शंकरच्या खोलीवरचे पत्रे लपलप करायले. आता पोरीपायी काळीज खोलीकडं वढ घेऊ लागलं. उगंच धाडले आसं झालं.

वारं आलं तसं गेलं. पडवीला आले आप्पा, तर ह्येनी जायच्या तयारीत. आता बापल्योकात काय वावदान उठतं म्हणून जीव धडधडू लागला.

''मन्मथ.''

''माजं काय चुकलं आसंल तर दोन थुतरीत हाण माज्या.''

''आप्पा, काय तर काय बोलू लागलाव आसं?

''मग तू आसा का रं वाकडं वागू लागलास? दारू पिऊन धिंगाणा घातलास म्हण लईट आफीसमधी! बरं न्हाई गडया आसलं. लईटवाल्याला श्या देयची काय गरज होती? त्या कडवाला तोंडात साखर ठिवून काम घेवं लागतंय.''

आप्पाचं बोलणं आयकून ह्येंचं तोंड उतरून गेलं. आप्पाला गप्प बसवायला यिना कुणालाबी. सापळयात धरल्यावनी झालं ह्येन्ला. आप्पाला काय वाटलं की! पोरीना बोलिवले पडवीला. पोरीबी आल्या.

''तू ह्येच्यापुढी पेणार न्हाईस म्हणून लेकराबाळापुढी सांग, तोबा तोबा कर!''

बरबर घामच आला की ह्येन्ला! आप्पा लेकरापुढी आशी फजिती करतील आसं वाटत नसंल ह्येन्ला.. आसचं फायजे हेन्लाबी. मनात म्या म्हणले, आत्ता कसं??

ह्येनी तोबा तोबा केले. म्हणले,

''आत्ता पेत न्हाई. तोबा तोबा! लईट नसल्यानं शेतीचं नुकसान हुवू लागलं. टाळकं सरकल्तं... पर आत्ता पेयच्या वाटंला कवाबी जाईना म्या!''

''मालक, डीपी घिवून लईटवाले गेल्यात शेतात. शंकर मालकानं लइनवाल्याना लई झापलं. गावात तुमचे काय लफडे चालल्यात माहित न्हाई का, म्हणले. आर्धा गाव आकडयावर लईट घेतंय, कवा धरलाव का म्हणले इंजिनेरला. कुणाकडून किती खाताव, त्येची लीस्ट हाय म्हणल्यावर ढुंगणाला पाय लावून आपल्या शेताकडं पळालेत कडवं!''

आसं म्हणीत म्हारुत्या बाहेरून आला आणि घरात वातावरण बदललं. डीपी बसिवण्याचा आनंद समद्याला झाल्ता. म्या बी हुरळून गेल्ते! रानातल्या लयटीचा तिढा सुटला होता. ह्येनी उठून म्हारुत्याच्या मागं शेताकडं गेले. खरं तर काय समंध संसारात लईटीचा? पर म्हाभारत उठलं होतं की तिच्यापायी? शंकरची दीष्ट काढावं काय की!

डीपीची किरकिर मिटल्याला तर आनंद झालताच, पर ह्येनी लेकराबाळापुढी पुन्ना पेतनी म्हणल्यानं माजा पाय जमिनीवर ठरंना! झाडाला झोका बांधून उच उच झोके घेवं आसं वाटू लागलं. झर्र झर्रऽऽ.

जणू दिसभर चाललेला मनावरचा काळोखतिढा हाटत चालला होता.

9503872765