मुस्लीम समाजाकडून अपेक्षित बदल

विवेक मराठी    26-Oct-2016
Total Views |

***डॉ. प्रमोद पाठक*****   

आजवर हिंदू-मुस्लीम एकमेकांचे प्रथम भाऊ-भाऊ, नंतर शेजारी आणि आता केवळ नागरिक या स्तरावर संबंध राहिले आहेत. एकेकाळी काशीविश्वनाथाला सकाळी उठून सनई वाजविणाऱ्या बिस्मिल्ला खान यांची अथवा कोकणात रवळनाथाच्या आणि होळीच्या उत्सवात गुलालाने रंगणाऱ्या मुस्लिमांची पिढी अस्तंगत झाली आहे. ती पिढी इथे रुजलेली होती, असे म्हणावे लागते. आजची मुस्लिमांची पिढी ही टोप्या आणि बुरखे घालून फिरणारी आणि सौदी अरेबियाच्या मलिद्यावर पोसले जाणाऱ्या जाकीर नाईकच्या भाषणांना गर्दी करणाऱ्यांची आहे. त्यांना सहअस्तित्वाची नव्हे, तर वेगळया अस्तित्वाची, त्यापुढे जाऊन वहाबी विचारसरणीची आणि देवबंदी कट्टरतेची सामाजिक प्रथा जाणीवपूर्वक रुजवायची आहे. ती बहुसंख्य हिंदू समाजाने निमूटपणे स्वीकारावी, अशी इच्छा आहे.      


ध्या भारतात एक प्रकारच्या उत्साहाची आणि विजिगीषू भावनेची लाट आली आहे. उरी येथील हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले. सीमेपारच्या बातमीप्रमाणे सुमारे 50 दहशतवाद्यांचा खातमा केला. या घटनेने भारतीय जनमानस ढवळून निघाले आहे. पाकिस्तानमधे घुसून दहशतवादी अतिरेक्यांचा खातमा करणे आजवर जणू अशक्यप्राय गोष्ट वाटत होती. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला एकटे पाडण्याची राजनैतिक चाल, सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार इ. गोष्टींचे गुऱ्हाळ किती दिवस, किंबहुना किती वर्षे सुरू राहील, याविषयी जनसामान्यांत एक प्रकारची आशंका आणि निराशेची भावना होती. माझ्या मनातसुध्दा केवळ निराशा आणि काहीतरी घडण्याची वाट पाहत बसणे हीच भावना होती. दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास ती शल्यक्रियात्मक हल्ल्याची बातमी आली आणि मनावरील सावट दूर झाले. मला आनंद होऊन मी माझ्या कार्यालयातील सहकाऱ्यांना पेढे वाटले, हेसुध्दा नमूद करतो. मनावर साचलेले एक प्रकारचे मळभ त्या एका घटनेने दूर सारले.

मनावर हे मळभ साठण्यामागे केवळ उरी आणि पूर्वी झालेला पठाणकोटवरील हल्ला एवढेच कारण नव्हते. देशांतर्गत मुस्लीम समाजाला धरून घडणाऱ्या घटना त्यासाठी कारणीभूत होत्या. त्या एक-दोन घटना नसून अनेक आहेत. त्यातून सर्वसाधारण मुस्लीम समाजाची प्रवृत्ती कशी बदलते आहे, तो कसा आक्रमक बनतो आहे, याची जाणीव मला अधिक तीव्रतेने होत होती. बुऱ्हान वानी या दहशतवाद्याला कंठस्नान घातल्यावर काश्मीरमध्ये बरोबर अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ सातत्याने होत असलेली अत्यंत आक्रमक निदर्शने हा देशासाठी चिंतेचा विषय झाला होता. पाकिस्तानचा दिखाऊ पंतप्रधान नवाझ शरीफ याने बुरहानला शांतिदूत म्हणून भलावण करत संयुक्त राष्ट्र परिषदेत भाषण ठोकून त्यात तेल ओतण्याचे काम केले. त्याला एकास एक, अरे ला कारे प्रकारचे उत्तर भारताने दिले. सुषमाजींच्या भाषणातील नेहमी जाणवणारा तिखटपणा त्या वेळी जाणवला नव्हता. काय ते कारण असो, ही गोष्ट जरी चांगली झाली असली, तरी आमचे समाधान झाले नव्हते. पण या शल्यक्रियात्मक हल्ल्याने त्यावर कडी केली.

सध्या (ऑक्टोबरच्या सुरुवातीस) भारतात सर्वत्र सुरक्षा व्यवस्था सजग झाली आहे. सीमेवरील गावे दहा कि.मी. अंतरापर्यंत आत हलविण्यात येत आहेत. अशा वेळी अशांतता घडविण्यास कारणीभूत असणारे हुरियत कॉन्फरन्सचे नेते मात्र आरामात काश्मिरात राहून मजा पाहात असावेत.

मवाळ धोरण आणि भोंगळपणा

काश्मिरात घडून येणारी निदर्शने उत्स्फूर्त नसून पैसे देऊन घडवून आणली जातात, हे आता गुप्त राहिलेले नाही. हवालामार्गे काश्मीरमध्ये बँकांच्या खात्यात मोठया रकमा जमा होतात आणि रस्त्यावर उतरून दगडफेक करणाऱ्या तरुणांना आणि कोवळया मुलांना त्या दिल्या जातात, हे सर्वांना माहीत झाले आहे. (दि. हिंदू दि. 18 ऑॅगस्ट 2016) काश्मीरचे फुटीरतावादी हुरीयतचे नेते यात मोठा घोटाळा करत असून खुद्द अहमदशहा गिलाणी याचा मुलगा या पैशांच्या अफरातफरीत गुंतल्याचे बाहेर आले आहे. या नेत्यांनी देऊ केलेल्या हजार-पाचशे रुपयांसाठी ही तरुण मुले स्वत:च्या जिवावर उदार होऊन रस्त्यावर येतात. त्यामागे दोन कारणे आहेत. एकतर या तरुणांच्या मनात वर्षानुवर्षे भारतीय लष्कर आणि हिंदूंची म्हणून ठसविली गेलेली प्रशासन व्यवस्था जबाबदार आहे. दुसरे म्हणजे फुटीरतावादी नेते हे जणू अभय दिल्याप्रमाणे वावरताना दिसतात. कधी तात्पुरते गजाआड असले तरी त्यांचे इतरांशी संपर्क साधणे निर्वेधपणे सुरू असते. बाहेर असले तर उघडपणे ते भारताविरुध्द गरळ ओकत असतात. अशा वेळी भारलेल्या (radicalised) वातावरणात दोन नोटा हातात पडताच तरुणांना रस्त्यावर उतरविणे शक्य होते. या फुटीरतावादी नेत्यांना, त्यात गिलाणीबरोबरच मिरवाझ फारूख आणि यासिन मलिक इ.ना काश्मिरातून हटवून इतर राज्यात - विशेषत: दक्षिणेत हटविण्यासारखा सोपा पर्याय काँग्रेस शासनाने कधी अंमलात आणला नाही. त्यांना मुस्लीम मते घटण्याची भीती होती. पण आता भाजपाच्या बहुमताच्या वेळी ते करण्यास आडकाठी असू नये. याचे एक उदाहरण पूर्वी घडले आहे. पं. नेहरूंनीच स्वत:चे सर्व ऐतिहासिक ज्ञान बासनात बांधून शेख अब्दुल्लाला चक्क काश्मीरचा पंतप्रधान केले. शेख अब्दुल्लाने आपल्या इस्लामी नख्या काढल्यावर खुद्द पं. नेहरूंनीच त्याला दक्षिणेत स्थानबध्द केले होते. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी, नंतर मुख्य निवडणूक आयुक्त झालेल्या, तरुण टी. एन. शेषनसारख्या खमक्या अधिकाऱ्याला नियुक्त केले होते. शेषन यांनी कडक निगराणीत शेख अब्दुल्लाला हूं का चूं करू दिले नव्हते. त्यानंतर इंदिरा गांधींनी शेख अब्दुल्लाला मोकळे सोडले, इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री केले. मग घराणेशाही प्रस्थापित झाली ती ओमर अब्दुल्लापर्यंत होती. जोवर शेख अब्दुल्ला लोकांच्या दृष्टीसमोर नव्हता, तोवरची काश्मिरी जनता आणि नंतरची काश्मिरी जनता यात काय फरक पडला? चिथावणी देणारे वाढले. आता चिथावणी देणाऱ्यांना दृष्टीआड केले, तर काश्मिरी जनतेच्या वागण्यात अपेक्षित बदल घडणार नाही? नेते दृष्टीआड करण्याचे तंत्र ब्रिटिशांनी योग्य रितीने अंमलात आणले होते. लो. टिळक, बहादुरशहा जफर यांना ब्रह्मदेशात, तर थिबा राजाला रत्नागिरीत ठेवून त्यांनी परिस्थिती हाताळली होती. बिहारच्या गुंडाराज नेता सय्यद शहाबुद्दीन याला बिहारच्या तुरुंगात ठेवून नंतर त्याला जामिनावर मोकळे सोडून परत तुरुंगात घालण्याची नामुश्की येण्याचे कारण तेच आहे. तो लोकांच्या डोळयासमोर राहतो, तुरुंगातून निवडून येऊ  शकतो. तो जामिनावर सुटल्यावर त्याच्या स्वागतासाठी शेकडो गाडयांचा जथा येऊ  शकतो. शेकडो गाडया घेऊन येणाऱ्या या लोकांची प्रवृत्ती कायदा न मानणाऱ्या, एवढेच नव्हे, तर 'हम करे सो कायदा' या प्रकारची असते, ती वाढताना दिसते, ही चिंतेची बाब आहे. यावर तोडगा काढण्याबाबत सामाजिक चिंतन झाले पाहिजे.


दुर्गापूजेला विरोध

बंगाली समाज आणि दुर्गापूजा यांचे अतूट नाते आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव, तर बंगालमध्ये दुर्गापूजा यांना कोणी थांबविण्याचा प्रयत्न करेल असे वाटू शकेल? पण बंगालमध्ये गेल्या चार वर्षांपासून ते घडते आहे. दि.26 सप्टेंबर रोजी काही बातम्या देणाऱ्या ई-माध्यमांमध्ये बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कांगलापहारी या ठिकाणची बातमी प्रसिध्द झाली. तेथे राहणाऱ्या सुमारे तीस मुस्लीम कुटुंबांनी आक्षेप घेतल्यामुळे गावातील तीनशे हिंदू कुटुंबांना दुर्गापूजा साजरी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन परवानगी देत नाही. या वर्षी चौथे वर्ष आहे. संबंधित अधिकारी त्या संदर्भात बोलायला तयार नसतात, असे वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

भारतात बहुसंख्य हिंदू असलेल्या वस्तीत 10-12 टक्के  असलेले मुसलमान त्यांच्या दृष्टीने धर्मबाह्य असलेल्या मूर्तिपूजेला विरोध करतात, ही चिंतेची बाब असू नये? मुसलमानांवर अतोनात ममता करणाऱ्या ममतादीदी मतांच्या मिळणाऱ्या भिकेपोटी आंधळया झाल्या आहेत. हे जरी खरे असले, तरी शेजारीच राहणाऱ्या बहुसंख्याकांच्या धर्मभावनांना सपशेल धुडकावणारी तीस मस्तवाल मुस्लीम कुटुंबे ही कोणत्या मानसिकतेची आहेत, हे लक्षात येते. त्यांच्यापुढे ममतादीदींचे शासन झुकते, हीसुध्दा दुर्दैवाची गोष्ट आहे. काँग्रेसने प्रथम मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी मुस्लीम लोकसंख्या वाढू देण्याचे राजकीय पाप केले. पुरेशी लोकसंख्या वाढताच आझमखानसारखे नेते पुढे येऊन त्यांनी काँगे्रसलाच धुतकारले. आता ते मुलायम-लालू यादव गणांना आणि तृणमूल ममताला कोणत्या निवडणुकीत धुतकारतात, हे पाहायचे. तो दिवस फार दूर नाही.

यामागे सामाजिक स्तरावर मुस्लीम समाजात निर्माण झालेली अलगतेची, स्वत:चे वेगळे अस्तित्व राखून ते बहुसंख्याकांवर ठसविण्याची नव्हे, तर लादण्याची मनोभूमिका आहे. त्यातून असे प्रकार घडतात. आजवर हिंदू-मुस्लीम एकमेकांचे प्रथम भाऊ-भाऊ, नंतर शेजारी आणि आता केवळ नागरिक या स्तरावर संबंध राहिले आहेत. एकेकाळी काशीविश्वनाथाला सकाळी उठून सनई वाजविणाऱ्या बिस्मिल्ला खान यांची अथवा कोकणात रवळनाथाच्या आणि होळीच्या उत्सवात गुलालाने रंगणाऱ्या मुस्लिमांची पिढी अस्तंगत झाली आहे. ती पिढी इथे रुजलेली होती, असे म्हणावे लागते. आजची मुस्लिमांची पिढी ही टोप्या आणि बुरखे घालून फिरणारी आणि सौदी अरेबियाच्या मलिद्यावर पोसले जाणाऱ्या जाकीर नाईकच्या भाषणांना गर्दी करणाऱ्यांची आहे. त्यांना सहअस्तित्वाची नव्हे, तर वेगळया अस्तित्वाची, त्यापुढे जाऊन वहाबी विचारसरणीची आणि देवबंदी कट्टरतेची सामाजिक प्रथा जाणीवपूर्वक रुजवायची आहे. ती बहुसंख्य हिंदू समाजाने निमूटपणे स्वीकारावी, अशी इच्छा आहे.       

     
मेहबूबा मुफ्ती म्हणते, त्याप्रमाणे केवळ 5 टक्के मुस्लीमच काश्मीरमध्ये दंगलींना कारणीभूत नसून इतर 80 टक्के मुस्लीम जनतेचा त्यांना मूक पाठिंबा आहे. त्यांच्यामधूनच पाकमधून भारतात घुसणाऱ्या अतिरेक्यांना वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. पाकव्याप्त काश्मिरातील तथाकथित स्थानिकांचे पाकिस्तानने जे हाल केले आहेत आणि ते पाकिस्तानपासून वेगळे होण्याची भाषा, आंदोलने करत असताना भारतातील काश्मिरी मुस्लिमांनी पाकिस्तानात सामील होण्यासाठी रस्त्यावर उतरावे, यात आत्यंतिक धार्मिक असहिष्णुता आणि केवळ सुन्नी-वहाबी इस्लाम हाच एक पंथ अस्तित्वात असावा, अशी हेकट वृत्ती दिसते. ती बदलण्याची आज मुस्लीम समाजाला आवश्यकता आहे.

   कंडू शमला नाही

तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर आणि आसपासच्या भागात हिंदू मुलींची छेड काढण्यावरून दंगे झाले होते. त्यापूर्वी काही वर्षे सातत्याने हिंदू मुलींना रस्त्याने जाताना सतावण्याचे सत्र सुरू होते. एक दिवस त्याचा अतिरेक झाला. एका मुलीच्या भावाने त्या छेडखानीला आक्षेप घेताच त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर जे दंगे उसळले, त्यात हिंदू-मुस्लीम अशा दोन्ही समाजातील लोकांना मोठया प्रमाणात स्थलांतरित व्हावे लागले. महापंचायतीच्या सभेवरून परतणाऱ्या हिंदूंवर हल्ले करण्याचे धाडस स्थानिक मुस्लिमांनी दाखविताच त्याची तेवढीच संतप्त प्रतिक्रिया उमटली. त्या वेळी केंद्रात सोनिया गांधींचे सरकार होते. विस्थापितांना भेटण्यासाठी सोनिया गांधी व राजपुत्र राहुल गेले असताना त्यांनी फक्त मुस्लीम विस्थापितांच्या छावण्यांना भेट दिली. याचे विपरित परिणाम होतील, हे लक्षात घेऊन स्थानिक अधिकाऱ्याने त्या दोघांना बळेबळे हिंदू छावणीकडे नेले. स्थानिक मुसलमानांना या काँग्रेसी मानसिकतेचा अजमास होता. तरीसुध्दा 2014च्या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. इतकी वर्षे झाली, तरी वार्षिक श्राध्द घालावे त्याप्रमाणे सेक्युलर लेखक आणि विशेषत: इंग्लिश वृत्तपत्रे दंग्यांच्या वाढदिवशी गळे काढण्याचा रतीब घालतात. विस्थापितांच्या करुण कहाण्यांत फक्त मुस्लिमांचाच समावेश असतो. अखिलेश यादवचे मुस्लीमधार्जिणे सरकार असल्याने त्यांचे अश्रू ओघळण्याचे थांबत नाही.

कधीतरी उ.प्र. मुस्लिमांनी शांतपणे बसून विचार केला आहे काय की हिदूंच्या महापंचायतीला मोठी सभा भरवून 'बहू-बेटी बचाव' यासारखे आंदोलन करण्याची आवश्यकता का भासावी? या बाबतीत मुझफ्फरनगरच्या दंगली झाल्यानंतरचे मुस्लीम  समाजातील विचारप्रवाह हे आपल्यावर अन्याय होतो आहे या स्वरूपाचे होते. गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लीम दंगली वारंवार होत आहेत. मी जेव्हा बरेलीला बरेलवींच्या शिक्षणसंस्थेचे काम जाणून घेण्यासाठी गेलो होतो, त्या वेळी तेथे एक प्रकारचा उन्माद जाणवला होता. त्या भागात अर्थातच मुस्लीम लोकसंख्या जास्त होती. लोकसंख्या जास्त असल्याने राजकीय पक्षांच्या मतांच्या गरजेपोटी नेतृत्वाला आम्ही वाकवून घेऊ, अशा तऱ्हेची गुर्मी मला जाणवली.

मुझफ्फरनगरमधील दंगली घडून गेल्यावर तरी त्या भागातील किंवा इतर आसपासच्या प्रदेशातील मुस्लीम समाज काही समजून घेईल, त्यांच्यात काही सुधारणा घडेल असे वाटावे, तर स्थिती जैसे थे अशीच आहे. बिजनौर जिल्ह्याच्या पैड्डा नावाच्या खेडयात सप्टेंबरच्या मध्यात दंगल झाली. दि. 17 सप्टेंबरच्या इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीत आल्याप्रमाणे मुलींच्या छेडखानीला धरून ही दंगल घडली. जाट समुदायाच्या लोकांनी मुस्लीम वस्तीवर गोळीबार केल्याचे वृत्त होते. त्यात तीन मुस्लीम पुरुष मारले गेले. त्यांची नावे वृत्तात दिल्याप्रमाणे हसीनुद्दिन, सर्फराज आणि एहसान अशी होती. दंगलीदरम्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक झाली. त्यात दहा-बारा लोक जखमी झाले. दि. 18 सप्टेंबर रोजी आलेल्या  वृत्ताप्रमाणे स्थानिक पोलीस यंत्रणेने दंगल सुरू असताना त्यापासून दूर राहाण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे काही पोलीस अधिकाऱ्यांना नंतर कामावरून काढून टाकण्यात आले. याचा अर्थ असा की कुठल्याही प्रकारचा समाजात निर्माण होणारा प्रश्न हा सामोपचाराने सोडविण्याचा सबुरीचा मार्ग न अवलंबिता हातघाईवर येऊन हिंसाचार करण्याकडे मुस्लीम समाजाची वृत्ती झाली आहे. तिला असदुद्दिन ओवैसीसारखे उडाणटप्पू नेते आपल्या आगलावू, भडकाऊ भाषणांनी, तसेच मदरशांतून चालणाऱ्या भाषणांमधून मुल्ला-मौलवी खतपाणी घालत आहे. ही वस्तुस्थिती मुस्लीम समाजातील वयस्क आणि तारतम्याने वागणाऱ्या लोकांच्या कशी लक्षात येत नाही की आता तसे वाटणारे लोक - किंबहुना महिला त्या समाजात राहिल्या नाहीत? कारण काही वर्षांपूर्वी मुस्लीमबहुल असलेल्या मुंबईच्या वांद्रे भागात जेव्हा परिस्थिती हातघाईवर आली होती, त्या वेळी मुस्लीम महिलांनी बाहेर पडून समाजातील डोके फिरलेल्या तरुणांना आवरताना सांगितले होते की तुम्ही जायबंदी व्हाल, मराल, पण पुढे तुमच्या पोराबाळांचे सर्व आम्हाला निस्तरावे लागते. तेव्हा हे चाळे बंद करा. त्यानंतर दंगल झाली नाही. त्याच वांद्रे उपनगरात या वेळी झालेल्या एम.आय.एम. पक्षाच्या सभेत बोलताना असदुद्दिन ओवैसीने परत भडकाऊ भाषण केले. त्याची दखल घेण्यात आली. दंगली होऊनही मुस्लीम समाज आपली मनोवृत्ती बदलण्याच्या मनःस्थितीत नाही. सतत अन्याय झाल्याची जोपासली जाणारी भावना जेव्हा काफीरद्वेषाच्या आधारे पोसली जाते, तेव्हा सामाजिक स्तरावरील लक्ष प्रगतीच्या मार्गाकडे, उन्नती करून घेण्याच्या दृष्टीने न ठरता, बदला आणि जिहाद या भावनांनी प्रेरित होते. मुस्लीम समाजाने ठरवून ही मनःस्थिती बदलली पाहिजे.

तुमच्यापेक्षा मी वरचढ

काही वर्षांपूर्वी आपल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांनी विधान केले होते की अल्पसंख्याकांचा (मुस्लीम हे गृहीत धरावे) या देशातील संसाधनांवर अधिक अधिकार आहे. हे तर्कट जरी असले, तरी आज मुस्लिमांमध्ये - विशेषत: महाराष्ट्रात स्थिरावलेल्या ओवैसी बंधूंच्या नेतृत्वाने तो मुद्दा उचलून धरला आहे. सध्या त्या पक्षाच्या वारीस पठाण या महाराष्ट्रातील आमदाराची निखिल वागळे चालवीत असलेल्या कार्यक्रमात चलती असते. सप्टेंबरच्या मध्यास झालेल्या एका कार्यक्रमात आरक्षणाबाबत झालेल्या चर्चेत वारीसने ठामपणे सांगितले की नागरी सुविधा आणि आरक्षण यांच्यावर इतर समाजापेक्षा मुस्लिमांचा अधिकार अधिक आहे. कारण ज्या वेळी देशाचे विभाजन झाले, त्या वेळी पाकिस्तानात पळून न जाता आमचे बापजादे इथेच राहिले. आता आमचा जन्म इथला, आम्ही मरणार इथेच, म्हणून आमचा इथल्या संसाधनांवर तुमच्यापेक्षा अधिक जास्त अधिकार आहे. तसे पाहिले, तर ओबीसी आरक्षणात मुस्लिमांचा समावेश आहेच.          

     याचा अर्थ असा की तुम्ही हिंदू आहात. तुम्हाला जाण्यासाठी दुसरी कोणती जागा हक्काने सांगता येईल? आमच्या बापजाद्यांना तशी मिळाली होती, तरी ते इथे तुमच्यावर जणू उपकार करून राहिले. त्यामुळे आमचा हक्क तुमच्यापेक्षा वरचढ आहे. आहे ना विचारातील उफराटे तर्कट? इथे एकच उपमा देता येते. ईदच्या वेळी बकऱ्याला बळी देण्यापूर्वी खाऊ-पिऊ घालून पुष्ट करतात. नंतर त्याला बळी देण्याचा हक्क त्याला खाऊ -पिऊ  घालणाऱ्याचा अधिक असतो. मागासलेल्या अनुसूचित जाती-जमातींच्या वर्गाला बाजूला सारून धर्मावर आधारित आरक्षण मागणाऱ्या वारीसचा प्रतिवाद करताना कोणी सेक्युलर विचारवंत धजावत नाही. असे दोन-चार वेळा घडले आहे.

     वस्तुस्थिती अशी आहे, या एम.आय.एम. पक्षाचा बापजादा म्हणता येईल असा हैदराबादचा रझाकार आधी हिंदूंवर अत्याचार करण्यात पुढे होता. पोलीस ऍक्शननंतर तो पाकिस्तानात पळून गेला. त्याची पिलावळ जी मागे राहिली, त्यांनी आता परत एम.आय.एम.चे भूत उभे केले आहे. वारीसला कोणीतरी ठणकावून सांगायला हवे की मोहाजीरांचे हाल पाकिस्तानात कुत्रे खात नाही. त्यांनी मोहाजीर कौमी मूव्हमेंटचे नाव बदलून मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट केले. आपले अस्तित्व नाकारले. भारतात मात्र संख्येच्या बळावर लोकशाहीच्या मार्गातून आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा त्यांचा डाव आता उघड झाला असून त्यावर प्रतिबंध घालणे संघर्षात्मक ठरेल. मुस्लिमांनी आपल्या मानसिकतेत सर्वसमावेशकता आणण्याचा बदल सामाजिक स्तरावर घडविण्याची अपेक्षा आहे. तेच त्यांच्या हिताचे ठरेल.

हलाल की झटका?

गेल्या काही वर्षांपासून मी मांसाहार करणे टाळतो. याचे कारण सा. विवेकच्या एका अंकात मी हिंदू खाटिक झटका विकतात, तर मुस्लीम खाटिक हलाल मास विकतात, असे लिहिले होते. त्यावर मला एका हिंदू खाटिक असलेल्या वाचकाने माहिती दिली. त्यांनी सांगितले की आजकाल हिंदू खाटिक पशू मारत नाहीत. ते मारण्याचे काम मुस्लीम खाटिक हलाल पध्दतीने करतात. हलाल हा प्रकार भयंकर असतो. त्यात पशूचा गळा अर्धवट चिरल्याने, तो रक्त वाहून तडफडत तडफडत मरतो. नुकतेच माझ्या घराच्या मागे मांसविक्री करणारे एका खाटकाचे एक दुकान आले आहे. आजकाल ही दुकाने चालविणारे बहुधा मुस्लीमच असतात. त्याच्याकडून मी माहिती घेतली. मुस्लीम खाटिक हलाल करण्यावर ठाम आहेत. पशुवध करण्यासाठी झटका पध्दती स्वीकारायला तयार नाहीत. गुर्मी इतकी, की पाहिजे असेल तर घ्या, नाहीतर फुटा! दुसरे असे की यामुळे आजकाल हॉटेलमधून विकले जाणारे मास सररास हलाल मास असते, हे  न सांगताही धरून चालावे. असे हलाल मास खायचे की नाही, हे हिंदूंनी स्वत:साठी ठरवावे. पशू कापणारा मुस्लीम खाटिक मात्र त्यांना पाहिजे तसे कापून देणार नाही. मला त्या खाटकाने सांगितल्याप्रमाणे, ''साहेब, तुम्ही तुमच्या पध्दतीने मान कापा, मग मी सोलून देतो.'' त्याच्याकडे हे काम नंतर हिंदू खाटिक करतात. हे माहीत झाल्यापासून मी मांस खाणे सोडले. हलाल खाण्याचे दूरगामी परिणाम मुस्लीम समाजावर दिसतात. त्याची चर्चा वेगळया ठिकाणी करायची आहे. एक नक्की की बहुसंख्य हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन त्याप्रमाणे बदल करण्यास मुस्लीम खाटिक समाज आजतरी तयार नाही. उद्या समजा हिंदूंनी त्या प्रकारचे मास खाण्यावर बहिष्कार टाकला, तर कदाचित ते विचार करतील. एक हिंदू म्हणून ती गोष्ट दूरच वाटते. मुस्लीम नटांनी कितीही हिंदू धर्मविरोधी कृत्ये केली अथवा पाकिस्थानमधील अतिरेकी लोकांच्या कृत्यांना अथवा त्यांच्यामुळे बळी पडलेल्यांना करोडोंची मदत केली, तरी भोट हिंदू प्रेक्षक त्यांच्या सिनेमांवर बहिष्कार टाकू शकत नाही. त्या नटांच्या बाजूने बॉलीवूडमधील सेक्युलर धेंडे उघडपणे उभी राहतात. त्यांचे सिनेमेसुध्दा करोडोंचे नफे कमावतात. अशा वेळी दररोज लागणाऱ्या मासाहारावर हिंदू बहिष्कार टाकतील, ही गोष्ट 'दिल्ली बहोत दूर है' अशी झाली. या परिस्थितीत मुस्लीम समाजाकडून बदलण्याची अपेक्षा करता येईल? इतके मात्र खरे की हलाल मांस खाऊनसुध्दा हिंदू हिंदूच राहिले आहेत.

 

9975559155

drpvpathak@yahoo.co.in