सारे काही जाणशी तू

विवेक मराठी    27-Oct-2016
Total Views |

***वसंत वाहोकार***

कॅलेंडरवाला भेटला रस्त्यात, चौकापलीकडे. बिडी फुंकत होता आणि हातात ती कॅलेंडरं उंच, लांबरुंद, कडकड करणारी... त्यात सगळेच होते, आपल्यासाठी वरदहस्त घेऊन आलेले. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे', अशी खात्री देणारे. सगळयात वर कॅलेंडर होतं, ते त्रिमूर्तीचं. म्हटलं चला, हेच घेऊन टाकू. राहील भिंतीवर, देवघरात नाहीतर टेबलावर कुठेही. त्यात ना कुठे आध्यात्मिकता होती, ना धार्मिकता, त्यांच्याकडे काहीही मागणं नव्हतं. फक्त एक, त्याक्षणी आवडलेलं रंगीत, आकर्षक चित्र. थांबलो. त्याला म्हटलं, ''विझवून टाक नं बे ती बिडी लेका... देव खेटरं मारतील ना बे अशानं. त्याहीचा राग तुले माहीत नाही का बे. भयानथुतऱ्या...''

''हा तं सायेब असून बी आपल्यासारकाच बोलून रायला सायाचा...'' त्याला असं वाटलं असेल त्यानं बिडी विझवली, फेकली तशीच न कुरकुरता.

''चाल दे हेच कॅलेंडर. हेच वरचं. एकच पाह्यजे...'' म्हणत मी पन्नासची नोट त्याच्यासमोर केली.

त्यानं खिसा उपसला. मेल्या, अदमुशा, चुरगाळल्या दहाच्या दोन नोटा काढल्या. माझ्या हातात ठेवल्या.

व्यवहार संपला.

घरात, ध्यानीमनी नसताना त्रिमूर्तींचं आगमन झालं. सुनीताने पाहिलं ते कॅलेंडर. खदखदून हसली. ''काय माणूस आहे बाबा हा पती आमचा. अशी कशी रे बुध्दी झाली तुला?'' मीही हसून म्हटलं, ''झाली... झाली तर झाली.''

''पण संबंध काय तुझा, त्यांच्याशी? उगीच पोरखेळ नाही का हा?''

मी काही बोललो नाही. म्हणालो, ''चहा दे. मग पाहू पोरखेळ आणि काय काय ते!'' घरात आत जातानाही ती खदखदून हसत होती.

***

ते तसं होतं पडून कॅलेंडर, त्रिमूर्ती. नेहमी असतं तसंच. ओळखीचं. त्यावर मी पुस्तकं ठेवली, मग नंतर काही. त्यामागे असा काही हेतू-उद्देश नव्हता. पण ते सुनीताला पटलेलं दिसत नाही. माहेरकडून तिच्यात आध्यात्मिकता-धार्मिकता, पूजा सारं आलं होतं. तिच्यात ते आताही आहे, मनापासून करते आणि घरासाठीच करते, म्हणून मीही ते सारं करायला लागलो. म्हणजे देवघरात बसून देवांचं न्हाणंधुणं-पुसणं, दिवा, उदबत्ती आणि आठवेल ते. अभंग, स्तोत्र, ओवी, लावणी, सिनेमाची जुनी गाणी. खूश होऊन देव टाळया वाजवितात. ऐकतो तो आवाज मी अनेकदा. एकदा तर ते जटाधारी महाराज आसनावरून उडी घेऊन ताम्हणातल्या पाण्यातच नाचायला लागले. मग लक्षात आलं, होय रे... आपण म्हणत होतो ना तेव्हा, 'झुमका गिरा रे... बरेली के बाजार में...' त्यांना ते आवडलं असावं. साधना आठवली असावी. वाटलं असेल, आपणही माणसांसारखी दंगामस्ती करावी, गावं-नाचावं, माणसांतलंच एक होऊन जावं... एरव्ही आपण राहतोच त्यांच्या कुटुंबात. त्यांच्या हसण्याखेळण्यात. सण-समारंभात, ऊनपावसात कधीही. त्यांच्या कुटुंबातले. कधीही जन्मजन्मांतराला धावून येणारे वडीलधारे, तरी आपणच. मग राहावं ना कुटुंबातलेच एक होऊन, खावं, प्यावं, मजा करावी, आणि देव असणंही न विसरता, आसनही न सोडता, त्याच घरात.

सुनीता म्हणाली, ''अहो, फ्रेम तरी करून आणा नं ते कॅलेंडर.''

''अगं कशाला? मी ते तसंच ठेवणार आहे गंमत म्हणून. आपल्याकडे आहेत ना संग्रहात अशी कितीतरी. आहेत ना, तसंच.''

''नाही. नाही. ते काही बरं वाटत नाही मला. तुम्ही ते आणाच बरं फ्रेम करून.''

''बरं! आणलं फ्रेम करून. मग पुढे.... भिंतीवर देवघरात कुठे लावणार, तूच सांग...'' सुनीता थोडी विचारात पडली. मग तिचा काही निर्णय झाल्यासारखी म्हणाली,

''आपल्या त्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात द्या ती फ्रेम. तिथं तर रांगेनं आहेत कितीतरी फोटो... त्यात लावतील त्या सुवर्णाभाभी...''

म्हटलं, ''ठीक आहे.''

***

फ्रेमवाला बसला होता, धोब्याच्या टपरीत, त्याच्या त्या मालकिणीशी, धोबिणीशी काहीतरी बोलत असावा. मला पाहताच धावत आला. खुर्ची पुढे सरकवत म्हणाला ''बसा दादा...''

मी ते कॅलेंडर त्याच्यासमोर धरलं.

त्याने ते उभं-आडवं काळजीपूर्वक पाहिलं. ''बापा! बापा! किती दिसात आले हे 'गुरुर्ब्रम्हा' आमच्या घरी आज. नशीबच म्हणा लागते लेक... आजकाल कोणी नाही करून घेत ना अशा फ्रेम... लोकांना पाहयजे असतात ते, आपले...'' त्याने यादी सांगितली.

मग मला म्हणाला, '''या तुम्ही दादा. तुमचे कामंधामं उरकून या ना! एखांद्या तास-दीड तासात... करून ठेवतो मी... ठेवतो ना! दुकान उघडून तं बसलो पन कामच नव्हतं आज हाती... बरं झालं हे महाराज आले तं.... या ना दादा... या...''

तो पैशांबद्दल काही बोलेल असं वाटलं होतं. तो बोलला नाही आणि मीही मुद्दाम काही विचारलं नाही.

***

डीटीपीवाल्या राहुलकडे एक कथा पडून होती चार दिवसांपासून. म्हटलं, बघू त्याचं काय केलं त्याने.. म्हणून त्याला फोन लावला.

''काका, ते तयार आहे ना... या ना तुम्ही, कधी येता?''

''पोहोचतो आता दहा मिनिटात... येऊ ना?''

'''हो. हो... आहे मी 'सुपर'मध्येच आहे.''

गेलो, तेव्हा तिथे समोरच नेहमीचे रिकामे बसलेले होते गाडया पार्क करून, गर्दी होती. मी दिसलो तसे ''रामराम... रामराम... आओ अंकल... दिखेच नही इतनेमे'' म्हणाले. त्यांच्याशी बोलून मी आत गेलो. करेक्शन्स झालेली होती. राहुलने प्रिंटआऊट घेऊन माझ्यासमोर ठेवले.

''विजयराव!'' तिथे बसलेले स्तंभलेखक देवधर मला उद्देशून म्हणाले. ''बोला सर! काय म्हणता?'' मी त्यांना विचारलं. ते आम्हाला बरेच सीनिअर. ''तुमच्या काही गोष्टी वाचल्या आहेत मी... आपल्या दिवाळीतल्या त्या सगळयाच जवळजवळ... म्हणजे जेव्हा मिळाली तेव्हा वाचलीच...''

आम्ही दोघंही एकाच मान्यवर दैनिकासाठी लेखक-स्तंभलेखक म्हणून जुळलेले होतो. तो धागा होता दोघांमध्ये... ''वाचल्या असतीलच... तुमचं वाचन आहे सर चौफेर आहे.''

''आताची ही गोष्टही इथे बसल्या बसल्या वाचून काढली बरं मी... तुमची परवानगी नसताना वाचली.''

''त्यात काय बिघडलं? गोष्टी वाचकांसाठीच लिहितो ना आम्ही. तुम्ही तर त्यातही मोठे वाचक आहात जयवंतराव! आवडलं मला...''

देवधर थोडे संभ्रमात पडले की काय. मग पुन्हा म्हणाले..

''विजयराव, माझी एक तक्रार आहे किंवा चौकशी म्हणून टाकू आपण ती... तर बोला, चालेल? विचारू? विचारू काय?''

''बिल्कुल विचारा हो! अधिकार आहे तुमचा तो... मोठे वाचक आहात सर तुम्ही...''

''तक्रार अशी की तुमच्या गोष्टींमध्ये खूप मटेरियल - आय मीन मसाला असतो. स्टाईल आहे, व्हरायटी आहे... विषय सगळेच येतात कुठून अजबच आहे ते...''

''हो! असेलही बुवा. लेखकाला नाही कळत ते लिहिताना... असेल, असेल.''

''छुपा सेक्स तर फारच असतो. तो वाचकांना कळतो...''

'बाप रे! पण, तोही आवश्यक आहेच ना, आयुष्यात तो टाळून कसं... सांगा तुम्हीच!''

''मला असं वाटतं...'' देवधर बोलत होते. ''आध्यात्मिक-धार्मिक विषयांना, त्या प्रश्नांना हात घालत नाही तुम्ही कधी... तुमची ती बैठक दिसली नाही मला...''

राहुलने चहा मागवला होता. चहाचे ग्लास ठेवून साधू निघून गेला. राहुल म्हणाला, ''घ्या काका, चहा घ्या.'' मग पुढे म्हणाला, ''हो, हाच प्रश्न काकांना मीही विचारणार होतो... पण डेरिंग झालं नाही बाबा आपलं...''

राहलसुध्दा वाचक आहे. वाचलेलं कळतं त्याला... आवड-नावड आहे त्याचीही. त्याचंही मत देवधरांशी जुळतं होतं. मी थोडा विचारात पडलो.

''विजयराव! का, काय झालं...? तुम्ही उत्तर देत नाही आहात...''

मग थोडा सावरलो आणि म्हणालो,

''ते लिहिणारे खूप असतात हो जयंतराव... मी सुरुवातीपासूनच वेगळी वाट निवडली. समाज आणि कुटुंब, बदलणारं जग, माणूस म्हणून जगताना होणारी गळचेपी-कुचंबणा, स्त्रियांचे प्रश्न, असे साधारण विषय असतात माझ्या कथांचे...''

''हो, तेच तर म्हणतो मी... तुम्ही म्हणता सेक्स असतोच आपल्या आयुष्यात, असतो ना! पण त्यापेक्षा अधिक अध्यात्म असतं... धार्मिक भावना असतेच प्रत्येक कुटुंबात, ते कुटुंब कसंही असलं तरी - अगदी तळागाळातलं असू दे ना. मग... का नाही?''

''अजून मला ते प्रश्न समजलेले नसावेत देवधर, त्यांचं गांभीर्य किंवा ती बैठक नसावी माझी, असं दिसतं एकूणच... किंवा ती माझी मर्यादाही असेल लेखक म्हणून...पण विचार करावा लागेल तुमच्या म्हणण्याचा जयंतराव!''

''करा! जरूर करा... अजून फार वेळ आहे... खूप लिहिणार आहात तुम्ही अजून. खूप वर्षं लिहा हो! पण फोकस इकडेही असू द्या...''

त्यांनी टाळीसाठी हात समोर केला.

***

साधं ते कॅलेंडर. पण फ्रेममध्ये आलं आणि बदलूनच गेलं. आपलं सगळं कौशल्य पणाला लावत त्याने ते फ्रेम केलं होतं. मनापासून आवडलं मला, ते वेळेत झालं होतं. तोंडून आपोआपच तत्क्षणी ''व्वा... क्या बात!'' निघूनच गेलं.

त्यावर तोही खूष झाला. त्याने हात जोडले.

'श्रीरंग फ्रेमिंग आर्ट' म्हणजे याचं नाव श्रीरंग असावं का? तसं मी विचारलं.

''श्रीरंगभाऊ... पैसे किती झाले हो या कामाचे?''

मग तो बारीक हसला. म्हणाला, ''द्या. जेवढे द्याचे असतील तेवढे... ते काय सांगायचे दादा?''

''असं कसं? धंदा आहे तुमचा...''

''सामान लागलं ते साडेतीनशेचं... द्या तेवढेच..''

''हो! पण तुमची मेहनत, मजुरी... त्याचे पैसे?'' मी व्यवहारी बोलून गेलो.

''ते नको मला... आता तरी नको या कामाचे... सोडा ना दादा...''

मग मीच विचार केला. त्यात तेवढेच जोडले आणि सातशे रुपये काढून त्याच्या समोर धरले. त्याने त्या नोटांना नमस्कार केला. आणि गल्ल्यात टाकले. म्हणाला,

''दादा! मी प्रसाद म्हणून घेतले ते, माउलीचा प्रसाद! मजुरी म्हणून नाही.'' ते कोडं न सोडवता मी निघालो. मी दिले ते मजुरी म्हणून. तुझं तू पाहा बाबा.

***

सुनीतालाच काय, आमच्या कामवालीलाही फार आवडती ती फ्रेम. तीच उतावीळपणे म्हणाली, ''भावजी, मंग प्रसाद तं आनायचा होता ना, एवढी छान फ्रेम आनली आनि प्रसादच नाही... अरे वा रे व्वा!''

''उद्या... प्रसाद उद्या देतो... गुरुवार आहे ना गं उद्या... संध्याकाळी प्रसाद...' सुनीताने आणि मी विचार केला, फ्रेम तर झाली... आता पुढे काय? कुठे लावायची, देवघरात तर कुठे रिकामी जागाही नाही... आणि घरात कोणत्याही भिंतीवर अशा देवदेवतांच्या तसविरी लावल्याच नाहीत... एकतर निसर्ग तरी, नाहीतर कलाक्षेत्रात शोभतील अशा कलात्मक युवती-प्रौढा अशा तीन-चारच फ्रेम...

''उद्या सकाळी. मंदिरात द्या त्या सुवर्णाभाभींना. त्या लावतील. छान दिसेल बरं त्या भिंतीवर.''

ती फ्रेम नेली मी सकाळी मंदिरात. त्यांची पूजा सुरू असताना. मला पाहताच त्या सुवर्णाभाभी बाहेर आल्या म्हणाल्या, ''बोला लेखक. काय आणलं बाबा...''

मी ती फ्रेम समोर केली. त्यांनी ती काळजीपूर्वक पाहिली. त्यांच्या कपाळावर किंचित आठी उमटलेली पाहिली मी.

''अडचण केलीत ना हो तुम्ही आमची. आमच्या सगळया फ्रेम्सचा हा साईज तर बघा आणि या फ्रेमचा साईज... नाहीच मॅच होत. शिवाय गर्दी एवढी झाली की तुम्हीच पाहा. कुठे लावू शकतो... तुम्हीच सांगा...''

मी काही बोलण्याआधीच त्या पुन्हा म्हणाल्या,

''त्यापेक्षा असं करा ना हो... समर्थनगरात, त्यांच्या मंदिरात द्या. त्यांचं सभागृहही फार मोठ्ठं आहे. ती मंडळी ना, लावतील बघा आनंदाने...''

त्यावर मी ठामपणे इतकंच म्हणालो, ''काय ते तुम्हीच ठरवा. ते इथे आले... आता निर्णय तुमचा. अधिकारही तुमचा.'' तरीही त्यांची धुसफुस सुरूच. म्हणतात कशा,

''तुम्ही साधं विचारलंसुध्दा नाही ना आधी... विचारलं असतं, तरी...'' मी दोन्ही हात जोडले. त्यांना म्हणालो, ''ती चूकच झाली. पण आता.''

''द्या. आणा.'' त्या म्हणाल्या. त्यांनी नेऊन ती गाभाऱ्यात ठेवली. मी पुन्हा एकदा नमस्कार केला.

***

तिकडे गावी शेतीच्या काही कटकटी आणि भानगडी होत्याच. तिकडे लक्ष देणं भाग होतं. पण आपले इकडचे व्याप-ताप, प्रकृतीच्या तक्रारी, प्रवास-दगदग इत्यादी कारणांमुळे मी ते टाळत होतो. पण मधल्याने एक दिवस फोन करून धमकीच दिली की-

''हे जर सरकंसुधं होत नशीन ना यंदा, नं मी सायाले काई बी बरंवाईट करून घेईन या माया जीवाचं.'' मनात म्हणालो, आधीच हे इतकं सुरू आहे, त्यात हा खूडदिमाख, अर्धवटही असं काही करून बसला तर? आपल्या माथी पाप नको. शेवटी मी सुनीताला म्हणालो,

''पाहातो जाऊन काय ते. एकदा का ते गाडं नीट रस्त्याला लागलं की आपले हात वर.'' ती म्हणाली, ''करूनच टाका ना एक घाव दोन टुकडे...''

मग मी निघालो आणि दुपारीच पोहोचलो.

स्टँडवर गाव फार बदललं होतं. फारच. किती वर्षं झालीत मला इकडे न येऊन. तीन, चार... हो. फार नाही. पण हा बदल. रस्त्याच्या, हायवेच्या दुतर्फा ढाबे आणि हॉटेलांची गजबज, नवा पेट्रोलपंप. लहानसहान टपऱ्या, मोबाइल, रिचार्ज, फॅक्स झेरॉक्स... दोन खर्ुच्यांची सलून, शर्ट-टीशर्टची टपरी... जिथे गाडीच्या वंगण तेलासाठी मारामार होती, शहरात जावं लागत होतं, तिथे हे नवं जग उभं झालं होतं. गाढवं, डुकरं लोळत होती, तिथे ग्राामपंचायतची ढोली गिर्रेबाज कमान, दोन बँका, शेजारी पोस्टाचं दुकानही. अच्छे दिन हेच असतील... मनात हा विचार घेऊनच गावात शिरलो. चारसहा घरं पुढे, साठेनगरीला वळसा घालून. खरं सांगतो, रस्ता मुळीच चालण्यासारखा नव्हता. थेट आमच्या घरापर्यंतही... प्रचंड नासधूस, मोडतोड, विध्वंस होता आत गावात. दगडी बांधणीचं एवढं टोलेजंग मंदिर कपाळावर दोन्ही हात ठेवून गुडघ्यात मान घालून बसलं होतं, पावसाचा धावा करणाऱ्या गलितगात्र शेतकऱ्यासारखं. आणि अगदी त्याच्या समोरच्याच वाडयातल्या देवळाचा परकोट पार उद्ध्वस्त झाला होता. भिंतीच्या भिंतीच काढून नेल्या होत्या लुटारूंनी. दगड, विटा, मलब्यासह... सहज म्हणून मी त्या ऐसपैस पायविहिरीत डोकावलो. काही बोलू नये त्यापुढचं. हेसुध्दा आताचं माझंच गाव. कधीकाळी जे वैभवात, दिमाखातही होतं, नांदतं होतं.

आमची वस्ती तिथेच होती. आमची घरंही तिथेच होती. परंतु ओळख पटणार नाही अशी. समोरच्या छान सिमेंटच्या चौथऱ्यावर हापशी लागली होती, तिच्या आजूबाजूला गावरान केशरी घंटी, कण्हेरींचा लहानसा ताटवा फुलला होता. बाजूलाच कंबरभर उंचीचे टाकेही दिसले आणि त्यात पाणीही. जीव हरखून गेला.

आमची तीन-चार घरंही विटा-सिमेंटांनी मजबूतपणे उभी होती. लहानलहान अडीच खोल्यांची घरं. समोर कुठे गुलाब, कुठे कर्दळी. अशी झाडंही होती. सावलीसाठी ओसरीही होती घरांसमोर. मी नक्की कोणत्या घरी जाऊ हा विचार सुरू असतानाच पोरं धावत आली. येऊन समोर उभी राहिली. मला तर त्यांची ओळखही उरली नव्हती. गुडघ्याएवढी होती ती आता. छातीभर झाली होती. शेवटी मी देवळामागे आमचं मुख्य घर होतं तिथेच गेलो. हातातली बॅग कुणातरी पोराने आणून ठेवली. ''काकू! मोठे बाबा आले काकू...'' त्याने आवाज दिला.

सूनबाई ललिता आणि तिची मुलगी दोघीही धावतच आल्या. आल्याआल्याच त्यांचा तोच ठरावीक प्रश्नही, ''आताबी तुमी एकटेच आले का दादा... बाई नाई आल्या का...'' तो प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच दुसरी काळजी - ''किती झटकले दादा तुम्ही... तब्येत बरी नाही का, मागच्या वेळपेक्षा... या वेळी... तं लैच बारीक झाले बापा...!''

स्वत: पापड, कुरडी असलेली आमची ही ललिता स्वत: मात्र छान टुणटुणीत चकली झाली होती. अंगावर मूठभरच काय, चांगलं ओंजळींनी मांस चढलं होतं. प्राथमिक चौकशा सुरूच होत्या. तर तिची मुलगी चहा घेऊन आली. सोबत कुरकुरीत टोस्टचा पुडाही होता. माझ्या वडिलांना फार आवडत होते हे टोस्ट.

मी म्हटलं, आता मी आराम करतो. ललिताने अंथरूण लावलं. पंखा आणून शेजारी ठेवला. माझा डोळा लागला.

मध्येच कधीतरी लाईन गेली असावी. पंखा बंद झाला होता. उकाडयाने हैराण होत होतो. घामही फार येत होता.

मग उठूनच बसलो. हात तोंड धुतले. तेवढयात चहा तयार. भरपूर दुधाचा. इथेच आम्ही कैकदा कोरा-काळा चहाही पीत होतो. कधी वेळेवर तोही नसायचा.

***

रात्रीची जेवणं झाली. जेवणात एकाच वेळी दोन दोन भाज्या होत्या आणि चढणी-कढी असं सगळं ताट भरून होतं. मनात सहज विचार आला, आज आता हे पाहायला निदान आई तरी असायला हवी होती. कसे दिवस पाहिले तिनं शेवटचे? ते आठवलं. मन उगीच सैरभैर झालं.

मला बरीच नवी माहिती मिळाली होती. त्यात पहिलं होतं म्हणजे की शेती परवडत नाही. हाती काही लागत नाही. तोंडास तोंडमिळवणी करता करता जीव अगदी घशाशी येतो. त्यावर सगळयांचं एकमत होतं.

घरात लहानसहान पूरक उद्योग चालून आले होते. त्यात बायकांचा पुढाकार दिसून आला. म्हणजे उदाहरणार्थ शेवयांचं यंत्र. शेवयांचा हंगाम असतो, हे नव्याने कळलं. मग होस्टेलच्या मुलांसाठी डबे पोहोचवणं. अंगणवाडीतील मुलांसाठी दुपारचं जेवण. आजूबाजूला मोठी शाळा आली होती. बरड लालमातीची एकरांनी शेतजमीन मालकांनी विकून टाकली होती. तिथे कॉलेज, तंत्रनिकेतन, मुलींसाठी उद्योगशाळा उभ्या झाल्या होत्या. त्यामुळे तिथला स्टाफ-कमचारी यांची काही घरं झाली होती. गावाच्या पश्चिमेला ती वस्ती झाली होती. त्यांच्या, कुटुंबांच्या गरजा गावातून पूर्ण होत होत्या. त्यात आमची घरं, बायकामुलं सगळीच लक्ष घालून होती. भावांनीही आपला भार उचलला होता. एकूणच शेतीशिवाय घरात अशा रितीनं पैसा येऊ लागला होता. खाणेघेणे-कपडालत्ता यांची तरी एकूणच सुबत्ता दिसत होती. मुलींनी वेगवेगळया क्लास आणि कोर्सेसमध्ये नावं घातली होती. शाळेच्या व्हॅनमधून घरातली पोरं शहरात शिकायला जात होती. मला हे सारं नवं होतं. मी अचंबित होत होतो.

समोर मंदिरासमोर बिछायत दिसली. कापडी मंडपही होता. मी सहज म्हणून चौकशी केली. ''बाबू! का रे आता कशाचा कार्यक्रम आहे रे?''

''सप्ताह आहे ना भाऊ, आता दहा तारखेपर्यंत चालतो. पोथीवाचन पारायण, प्रवचन असं सगळं ठेवतो आम्ही त्यात.''

''आम्ही? म्हणजे रे?'' मी फारच भाबडा होतो की काय?

''मी आणि हा शिरीष आम्ही दोघं असतो. याचे दोन मित्र असतात. आणि घरादारातले सगळेच आपापले. मग गावातून, पलीकडच्या गावातून खूप लोक येत असतात. सगळे भाग घेतात, मदत करतात.''

मला आठवलं, आमचं हे त्रिमूर्तीचं उंच, धिप्पाड मंदिर. त्यातलं ते संगमरवरी दैवत. कधीकाळी कहाते सावकारांनी पूजेसाठी ठेवलेले गुरुजी. ठेंगणे, काळी टोपीवाले, दत्तोपंत त्यांचं नाव. ते सकाळ-संध्याकाळ मंदिर उघडं ठेवत. पूजाअर्चा, दिवावात करीत एकटेच. कधीतरी मलाही आवाज देत, ''ये रे, गणेशा, ये. आरती करू ना रे आपण.'' मी अभ्यासाचं पुस्तक बाजूस ठेवून जाई. त्यांचा स्वर बारीक-किरटा अनुनासिक होता. त्यात माझा पातळ सूर मिसळत असे. मंदिरातली घंटीही वाजवत असे. ''छान शिक तू गणेशा! हुशार आहेस बापा तू. तूच मोठा साहेब होशील बरं. या भटजीचा आशीर्वाद आहे लेका तुला, काय?'' मी दत्तोपंतांचं ऐकत असे. अभ्यासातलं काही विचारीत असे. कधी ज्वारीची भाकर, मसाल्याची एखादी भाजी, ताक-दही त्यांना कहाते सावकारांच्या माडीत नेऊन देत असे. तेव्हा शेजारच्यांना, गावातल्यांना फार वेळ नसे. शेत-रान-संसार यात ते खर्ची पडत. कधीतरी येत, दैवताला हात जोडून नमस्कार करत. दारात असतील ती सापडतील तेवढी चार फुलं वाहत. बायका आल्याच, तर प्रसादासाठी चमचाभर साखर तेवढी एखाद्या पानावर ठेवून जात.

''हो! हो का रे? मग पैशांचं-वर्गणीचं कसं काय जमवता रे तुम्ही?''

''सगळेच देतात. देणारे तर मनापासून देतात. बँकेवाले, दवाखान्याचे डॉक्टरलोकं, कॉलेजचे ओळखीवाले, बिझनेसवाले सगळे येतात. कार्यक्रम करतात. आता तर गावातूनही फार मोठा सहभाग असतो लोकांचा.''

माझ्यासाठी ही माहिती-बदल नवे होते सारेच.

''किती बदल झाला रे ज्ञानदेव हा.'' मी समाधानाने बोललो. ''फारच मोठी कृपा आहे बरं त्यांची आमच्यावर. आमच्यावर तर आहेच दादा. महाप्रसाद किती मोठा असतो सांगू का दादा?'' ज्ञानदेव सांगू लागला.

''लग्नासारखाच का?''

''अरे! हे तर काहीच नाही हो. किती माणसं जेवत असतील त्याची काही गणतीच नाही म्हणा ना. कधीच काही कमी पडत नाही हो. कधीच नाही.''

''काय म्हणावे रे या सगळयाला, काय म्हणावं तरी...'' मी गोंधळून गेलो. घरातल्या ज्याला जमेल तो माहिती पुरवत होता. ती बरीचशी सुरस, चमत्कारिक अशीही होती. गुरुवारी वारी निघत होती. पायी वारी, दिंडी वारी... ज्या गावातून जाईल तिथे चहा-फराळ तिथले भाविक देत होते. आमच्या घरीही ते सगळं आलं होतं. मधल्या रस्त्यावर गोठयाच्या बाजूला तशी व्यवस्थाही केली होती या लोकांनी. घरात उपासतापास आले होते आणि याच मंदिरात आमचा सगळयात धाकटा विठ्ठल, रोजची पूजा नियमित करीत होता. तोच मला सांगत होता. ''आता तं मंदिरच बांधून रायलो ना हो आमी. आपल्याच आखरात, वरच्या पट्टयात देल्ली जागा आपून मंदिरासाठी... बांधा म्हनलं. जेवळं मोठं बांधसान तेवळं...!'' आत्मविश्वास होता त्याच्या बोलण्यात, ठाम विश्वास.

''काय? आपलं पिकाचं शेत आहे ते तर! सगळयात कसदार वावर... ते देता तुम्ही, मंदिरासाठी?'' मी आश्चर्याने कोरडा ठण्ण झालो होतो.

''अरे हौ ना हो! इच्याराना तुमी या शिरीसलेच विचारा.''

''हो. दादा... मंदिर वही बनायेंगे.. ये इरादा भी... और वादा भी.'' शिरीष ठामपणे बोलत होता.

''क्या बात?'' मी म्हणालो. ''कुठून शिकला रे तू एवढं?'' मग पुढे म्हणालो,

''पण एवढया मोठया मंदिरासाठी इतका पैसा आणता रे कुठून? कमी नाही लागत रे पैसा.''

''देतात तेच... तेच देतात. सगळं करतात, पाहा ना. वर्षभराच्या आत आपलं हे मंदिर जर उभं नाही राहिलं ना हो, तं हा बहाद्दर नाव बदलवून देईल...!''

''शिरीष! मोठा माणूस झाला रे तू तर...!''

गप्पागोष्टी झाल्यावर मी ज्ञानदेवला म्हणालो, ''मी निघतो मग दुपारच्या गाडीने. म्हणजे संध्याकाळच्या आत घरी पोहोचता येईल.''

''एखांदा दिवस थांबले असते तं बरं झालं असतं दादा... कारण की उद्यापासून सप्ताह सुरू होत आहे ना, म्हणून म्हणतो बुवा...''

मला वाटलं होतं, शेतीचे व्यवहार, वाटण्या, रजिस्ट्री असे मुद्दे समोर येतील, त्यावर चर्चा-वाद, हमरीतुमरी होईल. बैठक बसेल. बायकाही मध्ये पडतील. ''आमचं आम्हाला देऊन टाका'' म्हणतील. ते ते काहीच कोणी बोलत नाही.

''नाही थांबत बाबा. मी हात जोडतो त्यांना. प्रार्थनाही करतो. आणि निघतो. तुम्ही आहात नं सगळे, करा छान करा उत्सव.''

मग मला कोणीही, घरातल्या सुनांनीही ''थांबा ना! राहूनच जा दादा!'' असंही म्हटलं नाही.

त्या रात्री मला कधी नव्हे ती शांत-गाढ झोप लागली. मधूनच कधी जाग आली, तर मंदिरातल्या घंटेचा किणकिणता नाद तेवढ कानी पडे.

***

सकाळी, चहाच्या वेळी सगळेच एकत्र होतो.  शेजारचे चुलत भाऊ, मधली काकी, अधूनमधून डोकावत होते. जमेल तशी चौकशी करीत होते.

मग जेवण झालं आणि बॅग घेश्रन मी निघालो. वर चढून त्या संगमरवरी समाधीवर माथा टेकला. माझ्या जन्मापासून, जाणत्या वयापासून, ती मधूनच तडा गेलेली-चिरलेली समाधी तशीच होती. त्यावरची अगम्य-गूढ लिपीही होती शाबूत. काळ किती पुढे गेला. पण हे मी हात जोडले पुन्हा एकदा. पुन्हा भेट कधी, हे मनात आलं.

आता उत्सवाची-सप्ताहाची लगबग सुरू झाली होती.

स्टँडवर निघालो, तेव्हा ज्ञानदेव सोबत चालत येत होता. थोडया वेळानंतर धावतच विठ्ठलही आला. काही भेटी होत होत्या. रामराम घडत होते. आम्ही पुढे पुढे जात होतो. रस्ता कालचाच होता आणि चालण्यासारखाही वाटत होता मला आता. चालता चालताच विठ्ठल मला म्हणाला,

''चार दोन दिवसासाठीतरी दोघंही या ना... सवड काढून या दादा...!''

काय होतं त्याच्या मनात, त्याचा अंदाज काही मला आला नाही त्या क्षणी.

***

सुनीताने सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाली, ''असं झालं तर मग...''

म्हटलं, ''तुला काही नवल वाटलं नाही या सगळयात?''

''नाही. मला माहीत होतं हे सगळं.''

''अगं पण तरी?''

''तरी काय? आम्ही फोनवरच तर बोलत असतो सगळया एकमेकींशी. त्या पोरी सांगत असतात ना मला सगळं. मीठमिरचीपासून तर सांगत असतात हो!''

मला वाटलं, तिचा प्रश्न येईल, मग ते भांडणतंटे, हिस्सेवाटणी-वादविवाद या सगळयाबद्दल काय बैठक-चर्चा झाली... ती काहीच बोलत नाही, असं वाटून मीच म्हणालो, ''सुनीता! हे सगळं तर झालं. पण ज्यासाठी मी इथून इतका तडतडत गेलो, त्याबद्दल कोणीच काही बोललं नाही. तो विषयही पुढे आला नाही. हे नाही समजलं बुवा आपल्याला.''

''समजणारही नाही कधी...'' ती बोलून गेली. मी चक्रावलोही खरं तर.

''तरी पण?'' मी विचारलं.

''अहो, साधंच तर आहे. पोट भरलं असलं की प्रश्नच पडत नाहीत.''

''हे म्हणजे फारच बरं, सुनीता! आध्यात्मिक वगैरे, असं नाही वाटत तुला.. सांग बरं!''

''करेक्ट!'' ती म्हणाली.

मी मग तिथेच थांबलो. ''आपल्या डोक्याला ताप नाही ना?''

आंघोळ लवकरच आटोपली. म्हटलं, ''चला बरं, पूजाही लवकरच करायची आज. दुपारी मग आपापली कामं तरी होतात.''

माझी पूजा सुरूच होती. फुलं वगैरे वाहून झाली. सगळं आटपून उठणार, तेवढयात आमच्या समोरच्या संकुलातली शिवानी धावतच आली आणि म्हणाली ''काका! आई म्हणाली की काकांना नेऊन दे म्हणून.''

मी पाहिलं. त्रिमूर्ती... तेच विलोभनीय छायाचित्र. श्री गुरुचरित्र. 14वा अध्याय.

''शिवानी! अगं हे कशासाठी आणलंस पोट्टे? मला काही काम नाही बुवा! मी तर वाचलंही नाही बाई हे कधी.''

ती पोर गोंधळली. म्हणाली, ''आई म्हणाली की काकांनी मागितलं आहे. त्यांना असेल काही तरी काम काका.''

''बरं बरं!'' सुनीता म्हणाली. ''सांग गं पोट्टे आईला दिलं म्हणून!''' ती अल्लड पोर निघून गेली.

शिवानीची आई माझ्या प्रेमातच आहे. ते प्रेमही असं मधूनच उफाळून येत असतं.

सुनीता म्हणाली, ''येऊ दे हो. आलेत ना, आता थांबा म्हणावं देवघरात. आरामात बसा!''

आणि तिने ती प्रत देवघरात ठेवून दिली.

***

पोस्टातलं काम आटपून मी गोंधळातच उलट दिशेनं घराकडे निघालो. ''अरे, गडबड झाली. आपण तर मेन रोडवरच आलो. जाऊ आता घरी या रस्त्याने. पुन्हा उलट...!''

झाडाखाली कॅलेंडरवाला होताच.

म्हटलं, ''चला, पुन्हा याला छेडू. काय हाती लागते ते तरी पाहू. असंही करून जातील दहावीस रुपये तरी.''

गेलो. थांबलो. गाडीवरच होतो, तर बिडी विझवून तोच समोर आला, म्हणाला ''बोला...''

मी त्याच्या हातातली कॅलेंडर पाहत होतो. तीच तशीच. सगळे हात आशीर्वादासाठी आपल्या डोक्यावर उभारलेले. सगळे कृपावंत. सगळे पाठीशी.

त्यात नव्हते ते त्रिमूर्ती.

म्हणालो, ''अरे! मी ते कॅलेंडर नेलं होतं ना, ते असं...''

त्याला ते पटकन आठवलंही. म्हणाला, ''हो. नेलं तं होतं साहेब तुमी.''

''ते नाही का रे आता?''

''नाही ना साहेब. ते एकच तं होतं माझ्याजवळ. तुमी नेलं ना! आता तो मालच नाई ना येवून रायला. ते क्यालेंडर...''

''अरे! पण असं कसं? काहीही नको सांगू बे... लेका काहीही... धंदा करून रायला लेका, असा?''

''खोटं बोलतो का बावा मी? शप्पत. तो मालच नायी आला ना..'' असं म्हणून त्यानं तो गठ्ठाच कपाळाला टेकवला.

''पन! तुमही तं नेलं ना हो क्यालेंडर, आता काय काम हाये तुमाले सायेब आता पन दुसरं घ्या कोन्तं बी... देवच तं हायेत राजेहो सगळे. देवच असतात आपल्याजोळ...'

तो माझ्याकडे, मी त्याच्याकडे पाहात होतो.

न समजून....

तेवढयात त्या झाडाखाली एक ऑटोरिक्षा थांबली. त्यातून ते काळी टोपी, केशरी, टिळाधारी मिशीबहाद्दर काका डोकावले. त्यांनी कॅलेंडरचा एक गठ्ठा समोर धरला आणि ओरडले, ''इसन्या! अबे भाडखावू... घेनं भडव्या... घे...!''

विष्णूने तो गठ्ठा हातात घेतला. न थांबताच ऑटो निघूनही गेला. घाईघाईतच विष्णूने तो गठ्ठा उघडला... आणि हातच जोडले.

तेच होते. ते त्रिमूर्ती...

मी गाडीच्या खाली उतरलो.

विष्णू तिथेच माझ्या दोन्ही पायांवर झुकला.

8007731505