परीक्षा

विवेक मराठी    27-Oct-2016
Total Views |

***कृ.ज. दिवेकर***

गांगल, परोपकारी आणि आता हे ओरपे. कोण होते हे आपले? आपणाला नोकरीतील उच्च पद मिळावे, म्हणून परीक्षेच्या घोडयावर स्वार होण्यासाठी, कोणतेही नातेसंबंध नसलेली ही मंडळी केवढी प्रयत्नशील होती, हे पाहून त्या तिघांबद्दलचा माधवचा आदर दुणावला आणि घोडयावर बसायचेच आहे, तेव्हा आता लगाम हाती धरलाच पाहिजे असा त्याने निश्चय केला. जनरल पेपरला तो घाबरत नव्हता. प्रेसी रायटिंग म्हणजे दोन-तीन पानी मजकुराचा अर्ध्या पानात संक्षेप करणे, ड्राफ्टिंग म्हणजे पत्रव्यवहाराचे मसुदे बनवणे. हे तो सहजपणे करू शकणार होता. व्याकरणावरची तर्खडकरांची तिन्ही पुस्तके आणि रेन ऍंड मार्टिनचे ग्रामर त्याने आधीच अभ्यासले होते. त्यामुळे त्या दुसऱ्या पेपराची चिंता नव्हती. प्रॉब्लेम होता तो पहिल्या पेपराचा.

 
परीक्षा म्हटली की माधवच्या पोटात गोळा उठायचा. एरवी तसा तो अभ्यासात खास चमकणारा नसला तरी बरा होता. परीक्षा मात्र त्याला नको वाटायची. पण परीक्षेशिवाय पर्याय नाही या वस्तुस्थितीची त्याला जाणीव असल्यामुळे निव्वळ मेहनतीच्या बळावर त्याने बी.कॉम.ची वेस कशीबशी ओलांडली, जेमतेम थर्ड क्लासमध्ये. त्याच्या बरोबरीची मुले कोणी एलएल.बी.कडे, कोणी एम.कॉम.कडे, पुढे सी.ए., सी.एस. वगैरेकडे. परीक्षांचे अग्निदिव्य नको, म्हणून माधवने मात्र नोकरीसाठी शोधाशोध सुरू केली. शंभर अर्ज टाकले, पण 'ऍप्लाय ऍप्लाय, नो रिप्लाय' असा कटू अनुभव आला.

तेवढयात 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये रेल्वे ऑडिट विभागात ऑडिटर्सची भरती होणार असल्याची जाहिरात झळकली. ती माधवच्या वाचनात येणे शक्यच नव्हते. पण ती त्याच्या वडिलांच्या पाहण्यात आली. ती वाचल्यावर माधवच्या वडिलांना भगवानराव गांगलांची आठवण झाली. रेल्वेच्या त्याच विभागात ते वरिष्ठ अधिकारपदावर होते. वडिलांचा त्यांच्याशी परिचय होता. आपल्या मुलाला कोणाचातरी टेकू मिळाल्याशिवाय नोकरी मिळणार नाही, याची वडिलांना खात्री होती. ते तडक गांगलांना जाऊन भेटले आणि मुलाच्या नोकरीबद्दलची अडचण त्यांच्या कानावर घालून 'टाइम्स'चा तो अंक त्यांनी गांगलांपुढे धरला.

''मला माहीत आहे, आमच्या ऑफिसची जाहिरात आली आहे.'' गांगल किंचित हसले.

''तर मग त्यासंबंधी काही करता येईल का?''

''पाहू या. मी त्या पॅनलमध्ये आहे. प्रत्यक्ष इंटरव्ह्यू घेणाऱ्यातही कदाचित मी असेन. पण थोडा प्रॉब्लेम आहे. तुमच्या मुलाला पास क्लास आहे. एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट मिनिमम सेकंड क्लासची आहे. तरीही बघू काही करता येईल का. तुम्ही अर्ज आणून द्या. मीच ऑफिसात नेऊन देईन.''

याचा अर्थ माधवला सेकंड क्लास नसूनही ऍकोमोडेट होण्याचे चान्सेस होते. सेकंड क्लास त्या काळी सहज, सोपा नव्हता. आजच्यासारखी पंचाण्णव-अठ्ठयाण्णव टक्क्यांइतकी खिरापत वाटली जात नसे. साठ-पासष्ट टक्के माक्र्स म्हणजे अगदी डोक्यावरून पूर. तसेच तेव्हा पदवी परीक्षांत फर्स्ट क्लास फार कमी, सेकंड थोडयांना आणि बाकीच्यांना पास क्लास मिळायचा. नोकरीसाठी लेखी परीक्षांचीही तेव्हा फारशी पध्दत नव्हती. म्हणजे माधवला परीक्षेच्या भयगंडाची लागण होणार नव्हती. फक्त इंटरव्ह्यू. पण त्याच्यासाठी तोही घाम फोडणाराच प्रकार होता.

अर्ज पडताळणीत भगवानराव गांगलांनी लक्ष घातले. माधवला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. बापरे! हेही काही कमी तापदायक नव्हते. कसा फेस करायचा इंटरव्ह्यू? त्याचा चेहरा एकदम उतरून गेला. पण मुलाखतीच्या वेळी गांगलसाहेब आपणाला सांभाळून घेतील ही अंधुकशी पण चिवट आशा होती.

इंटरव्ह्यूचा दिवस उगवूच नये इतका माधव हडबडून गेला होता. पण कालनेमिक्रमानुसार तो 'घामट' दिवस आलाच. वडिलांनी त्याला परोपरीने धीर देऊन तयार केले. एकदाचा तो मुंबईतील रेल्वेच्या ऑफिसात पोहोचला, त्या वेळी तो घामाघूम झाला होता. त्याचा नंबर आल्यावर लटपटत्या पायांनी तो मुलाखतीच्या कक्षात शिरला. पण तेथे एन्ट्री घेताच त्याच्या डोळयांपुढे अंधारी आली. कारण इंटरव्ह्यू घेणाऱ्यात त्याचे तारणहार गांगल साहेब नव्हते, तर तेथल्या भल्या मोठया टेबलाशी तीन वक्र ग्रह होते. राहू, केतू व शनी! ''टेक अ सीट'' राहू आज्ञार्थी बोलला. केतूने त्याच्या अर्जाची उलटापालट केली व त्याच्याकडे असा कटाक्ष टाकला की, त्यामुळे आपली जळून राखुंडी कशी झाली नाही याचेच माधवला आश्चर्य वाटले. कमीत कमी राख सांडू तरी नये म्हणून तो खुर्चीत घट्ट बसून राहिला. तेवढयात शनीने प्रश्न केला, ''व्हॉट इज इन्कमटॅक्स?''

माधव गोंधळला. कारण आतापर्यंत त्याला पाच पैसेही इन्कम झाले नव्हते. इन्कमच नाही, तर टॅक्स कसला?

''येस्, प्लीज ऍन्सर,'' केतूचा पहिला शब्दोच्चार!

आत काहीतरी सांगणे भागच होते. कपाळावरचे धर्मबिंदू पुसत माधव चाचरला, म्हणाला, ''व्हॉट इन्कम वुई गेट, टॅक्स इज ऑन दॅट!'' झाले! पहिल्याच बॉलला त्रिफळा! राहू, केतू, शनी कितीही बलाढय असले तरी या अबब उत्तरापुढे हतबल झाले. मुलाखत तेथेच संपली. ''यू कॅन गो'' असे जरी म्हणण्यात आले, तरी 'गेट आऊट' असाच त्यातला ध्वनी होता.

खजील होऊन खालच्या मानेने माधव घरी आला. वडील वाटच पाहत होते. काय झाले असावे हे मुलाच्या चेहऱ्यावरच लिहिलेले होते. तरीही त्यांनी विचारले, ''कसा काय झाला इंटरव्ह्यू?''

माधव वडिलांना घाबरत असला तरी त्या राहू, केतू, शनींएवढा नाही. ''ओके. ठीक झाला.'' म्हणत तो तेथून सटकलाच. त्याला खात्री होती की नोकरीचा हा बार फुकट गेला. फुसका आपटीबार ठरला!

चार महिने उलटले आणि एके दिवशी नवल ते घडले! खाकी रंगाच्या लिफाफ्यातून सरकारी संदेश प्रकारचा 'यू आर सिलेक्टेड ऍज ए ज्युनिअर ऑडिटर. अटेंड मेडिकल एक्झॅमिनेशन.'

मेडिकल एक्झॅमिनेशन म्हणजे पुन्हा परीक्षा? पण लगेच त्याच्या लक्षात आले की ती शारीरिक होती, बौध्दिक भानगड नाही. पण सिलेक्टेड? इंटरव्ह्यूत दांडी उडूनही सिलेक्शन झाले?

माधवने पत्र पुन्हा पुन्हा पाहिले, 'आर' व 'सिलेक्टेड' यामधील 'नॉट' शब्द राहून गेला की काय? पण नसावा. कारण त्या दोन शब्दात गॅप नव्हती. पण हा कसा चमत्कार घडला? निवड होणे एकशे एक टक्के असंभव होते. मग तरी ती झाली कशी? उत्तर स्पष्ट होते. गांगलांची भगवंत कृपा फळाला आली होती!

पण माधवला एक कोडे उलगडत नव्हते. लिफाफा रेल्वे ऑडिट ऑफिसातून आला नव्हता. 'सेंडर्स नेम'च्या पुढे शिक्का होता ऑफिस ऑफ द डेप्युटी डायरेक्टर ऑफ कर्मशिअल ऑडिट. तेथे तर माधवने अर्जच केला नव्हता. वडिलांनाही अर्थबोध होईना. 'डायरेक्टली फ्रॉम द गांगल माउथ'कडूनच समस्यापूर्ती होऊ शकणार होती.

पेढयांचा बॉक्स व 'ऑल इंडिया गव्हर्मेंट सर्व्हिस' म्हणजेच ओ.आय.जी.एस. हे बिरुद भाळी असलेला, बिन पोस्टल तिकिटाचा सरकारी लिफाफा घेऊन माधवचे वडील भगवानराव गांगलांना भेटले. लिफाफ्याकडे बोट करून गांगलांनी विचारले, ''कमर्शिअल ऑडिट ऑफिसकडून नेमणूक पत्र आले आहे ना?''

''हो. पण अर्ज केला होता रेल्वे ऑडिटकडे.''

''शंका रास्त आहे.'' गांगलांनी खुलासा केला. ''त्याचे असे आहे, दिल्लीला देशाच्या अर्थव्यवस्थेची तपासणी करणाऱ्या कन्ट्रोलर ऍंड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचे, म्हणजे सी.ए.जी.चे मुख्य ऑफिस आहे. सिव्हिल ऑडिट, कस्टम्स ऑडिट, पोस्ट ऍंड टेलिग्राफ ऑडिट, डिफेन्स ऑडिट, रेल्वे ऑडिट अशा त्यांच्या विविध शाखा आहेत. कमर्शिअल ऑडिट हीही त्यापैकीच एक स्वतंत्र शाखा आहे. सिव्हिल ऑडिट अकाउंटंट जनरल म्हणजे ए.जी. ऑफिस करते, तर कमर्शिअल ऑडिटचे काम डायरेक्टर ऑफ कमर्शिअल ऑडिटकडे सोपवण्यात आले आहे आणि तेथूनच तुमच्या मुलाला ऍपॉइंटमेंट लेटर आले आहे.''

''पण अर्ज तर...''

''बरोबर आहे. अर्ज रेल्वे ऑडिटकडे केला होता. पण सिलेक्ट झालेल्या उमेदवारांची आम्ही वर्गवारी केली व वर उल्लेखित वेगवेगळया ऑफिसात त्यांच्या नेमणुका केल्या. तुमच्या मुलासाठी कमर्शिअल ऑडिट योग्य वाटलं.''

''रेल्वे ऑडिट ऑफिसातील एम्प्लॉइजना फ्री रेल्वे पासाच्या फॅसिलिटीज असल्याचं ऐकलं होतं....'' काहीतरी गमावल्यासारखे वडिलांना वाटले.

''आहेत ना. इतर रेल्वे कर्मचाऱ्यांप्रमाणे रेल्वे ऑडिटमधील सर्वांनाच लोकल फ्री पास व इतरत्र रेल्वे प्रवासाच्या सोयी सवलती आहेत. पण पुढील पदोन्नतीच्या दृष्टीने कमर्शिअल ऑडिट विभागासाठी मीच तुमच्या मुलाची निवड केली. कारण नोकरीत कन्फर्म झाल्यावर सबऑर्डिनेट ऑडिट सर्व्हिसच्या - म्हणजे एस.ए.एस.च्या परीक्षा असतात. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसच्या खालोखाल या परीक्षा महत्त्वाच्या असतात. खूप अवघड असतात. पण सिव्हिल, पी.ऍंड टी., डिफेन्स, कस्टम्स, रेल्वे येथील परीक्षा फार किचकट असतात. 'एस.ए.एस. कमर्शिअल'च्या परीक्षा त्यातल्या त्यात ठीक असतात. कॉमर्स स्टुडंट्ससाठी तर अधिक बऱ्या असतात. ज्युनिअर ऑडिटर म्हणजे क्लार्कच. तुमच्या मुलाला कायम कारकून एके कारकून राहायचं आहे का?''

''नाही हो गांगलसाहेब, नोकरीत त्याने पुढील प्रगती केलीच पाहिजे. आपल्या मध्यमवर्गीयांसाठी नोकरीशिवाय दुसरीकडे कुठे स्कोप आहे?''

''नाही ना? म्हणूनच कमर्शिअल ऑडिटला पाठवलं.''

गांगलांनी माधवला स्वतःचे वजन वापरून नोकरी मिळवून तर दिलीच होती. इतकेच नाही, तर त्याच्या नोकरीतील पुढील भवितव्यासाठी दूरगामी विचार केला होता.

कृतज्ञतेच्या नजरेने गांगलांकडे पाहत माधवच्या वडिलांनी पेढयांचा बॉक्स त्यांच्यापुढे धरला.

पण गांगल तो स्वीकारण्यास तयार नव्हते. ''नको. मला शक्य होते ते मी केले. पुढील परीक्षा वगैरे त्याच्या त्याने पार पाडायच्या आहेत. फार स्ट्रिक्टली घेतात एस.ए.एस.च्या परीक्षा. मलाच काय, कोणालाच काही करता येत नाही. कोड-डीकोड सिस्टिममुळे संपूर्ण गुप्तता पाळली जाते, जशी ती आय.ए.एस. परीक्षांच्या बाबतीत घेतली जाते. तेव्हा आत्ता पेढे नकोत. एस.ए.एस.च्या परीक्षा पास झाल्यावर आनंदाने घेईन.''

''तेव्हा तर देईनच, पण आत्ता हे ठेवा. तुमची मुलगी किशोरी उच्चविद्याविभूषित झाली आहे. युनिव्हर्सिटीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. मला ती मुलीसारखीच आहे. तिच्यासाठी खाऊ म्हणून असू द्यात.''

भगवान दिनकर गांगल, जे बी.डी. गांगल या नावाने 'लोकमान्य' होते, त्यांचा आदरपूर्वक निरोप घेऊन माधवचे वडील स्वगृही परतले. त्यांचा सुपुत्र एस.ए.एस. परीक्षा देऊन ज्युनिअर ऑडिटरचा सिनिअर ऑडिटर झाला, पुढे ऑडिट ऑफिसर, डेप्युटी डायरेक्टर, डायरेक्टर वगैरे प्रगतीची शिखरे पार करत थेट सीएजी झाल्याची रम्य स्वप्ने ते रंगवीत राहिले.

पण माधवला त्यात जरादेखील इंटरेस्ट नव्हता. 'कशाला जीवतोड अभ्यास करायचा?' साक्षात सीएजींना लोकांची टीका व सरकारच्या शिव्याच खाव्या लागतात. नकोच ते लफडे. शेवटी पैसा, पैसा आणि पैशासाठीच ना हे सर्व? 'पोटापुरता पसा पाहिजे, नको तुपाची पोळी' असे काहीतरी ग.दि.मा. म्हणतात तेच खरे... वाचनाची व लेखनाचीही किंचित आवड असणाऱ्या माधवचे पुढील स्वगत... वडिलांनी स्वप्ने पाहिली, मला दाखवली, तेवढे पुरे! आपला विश्वास सत्यावर आहे, स्वप्नांवर नाही. स्वप्ने कसली? दिवास्वप्नेच असतात ती. सत्याला सामोरे गेले पाहिजे. परीक्षांच्या बाबतीत माझी लायकी ती काय? कसाबसा बी.कॉम. झालो. गांगलसाहेबांच्या वशिल्याने नोकरीत चिकटलो. तेवढे बास आहे. पिताश्री काय म्हणतील ते म्हणू द्या.'

माधवला कमर्शिअल ऑडिट भलतेच आवडले. मुख्य म्हणजे तेथे सतत टूर्स असायच्या. महाराष्ट्र, गुजरात, गोवा ही तीन राज्ये वेस्टर्न रीजनमधली होती आणि माधवच्या ऑडिट ऑफिसकडे तेथल्या विविध सरकारी कंपन्या-कॉर्पोरेशन्सच्या आर्थिक उलाढालींची तपासणी करण्याचे काम होते. तीन महिन्यांच्या क्वार्टरली ऑडिट प्रोग्रॅम्सप्रमाणे वेगवेगळया ठिकाणी जावे लागायचे. सरकारी खर्चाने भरपूर हिंडणे फिरणे व्हायचे. शिवाय जेथे ऑडिट असे, त्यांच्यामार्फत जावयासारखी तैनात ठेवली जायची. 'आपण हे बघू, ते बघू' म्हणत ऑडिट पार्टीला बाहेर गुंतवून ठेवण्याकडेच तेथील मंडळींचा कल असायचा. कारण त्यामुळे ऑफिस रेकॉर्ड्सचे चेकिंग कमी व फक्त वरवरचे व्हायचे. जास्त 'खणणे' व्हायचे नाही. ऑडिटर्ससाठी खाणेपिणे, हवे ते आणि हवे तेवढे न मागता मिळायचे; नव्हे, त्याचा मारा व्हायचा. कसलीच कमतरता नसे. राहण्याची चोख व्यवस्था सरकारी खानदानी रेस्ट हाऊसमध्ये. एकूण मजेदार नोकरी होती. माधव चांगलाच रमला. आणि काम तरी काय, तर हिरव्या पेन्सिलीने टिका मारणे. वर्षभरानंतर माधव कन्फर्मेटरी परीक्षा पास झाला. बी.कॉम.पेक्षा ती फारच सोपी होती. नोकरीत कायम होण्यासाठी एक फॉरमॅलिटी, इतपतच ते सव्यापसव्य होते. ज्युनिअर ऑडिटर म्हणून माधवचे नोकरीतील स्थान आता पक्के झाले.

त्यानंतर माधव फ्री बर्डच झाला. सर्वांशी मिळून मिसळून वागण्याच्या त्याच्या लाघवी स्वभावामुळे, दूरदूरच्या व इंटरेस्टिंग ऑडिट प्रोग्रॅम्समध्ये त्याचा समावेश होऊ लागला. ज्युनिअर ऑडिटर म्हणून कामाची जबाबदारी शून्य. ऑफिसची रजिस्टर्स चेक करताना पाचपन्नास टिक्स मारल्या की झाले काम. बाहेरगावी वास्तव्य होत असल्यामुळे घरच्या कटकटी नव्हत्या. फावला वेळ खूप मिळायचा. वाचन-लेखनासाठी माधव त्याचा उपयोग करू लागला. नियतकालिकांतून त्याच्या बऱ्याच कथा साभार परत आल्या, तरी काही प्रसिध्दही व्हायच्या. टूरिंग जॉबमुळे पगाराव्यतिरिक्त ट्रॅव्हलिंग अलाउन्स, डेली अलाउन्स वगैरेंमुळे ऍडिशनल आमदनी व्हायची. जेथे ऑडिटचे काम सुरू असायचे, तीच मंडळी 'आनंदाने' सिनेमे हॉटेलिंगची व्यवस्था करायची. कारण ऑफिसच्या खर्चाने ऑडिटर्सबरोबर त्यांनाही एन्जॉयमेंट करायला मिळायची. माधवसाठी हे कसे अगदी छान चालले होते.

बघता बघता कन्फरमेशनच्या आधीचे वर्ष धरून माधवला आता ज्युनिअर ऑडिटर म्हणून नोकरी चार वर्षे पुरी होत आली होती. पुढील सिनिअर ऑडिटरच्या प्रमोशनसाठी एस.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. त्या परीक्षांना बसण्यासाठीची अर्हता सिध्द करण्यासाठी, आधी प्रिलिमिनरी एक्झॅमिनेशनमध्ये पास व्हावे लागायचे. नोकरीत त्याच्याबरोबर जॉईन झालेले त्याचे सहकारी सतत या परीक्षांबद्दलचाच विचार करायचे. टूरवर फावला वेळ खूप मिळायचा. सोबत पुस्तके आणलेली असायची. रेस्ट हाऊसवर अभ्यास करण्यात ती मंडळी मग्न असत. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, इतकेच नव्हे तर मध्य प्रदेश, राजस्थानमधून आलेला प्रत्येक जण परीक्षांच्या मागे हात धुऊन लागलेला असे. त्यांच्यापैकी बहुतेक जणांनी प्रिलिमिनरी टेस्ट केव्हाच पार केली होती. एक दोन जण एस.ए.एस. पार्ट वनदेखील पास झाले होते. माधवनेही वेळ वायफळ वाया घालविण्याऐवजी जरा सिरियस व्हावे, परीक्षा द्याव्यात, याबद्दल त्याचे ऑफिसर्स सतत आग्रह करायचे. त्याचे सहकारीही या बाबतीत त्याला मदत करायला तत्पर होते. पण माधव कोणाचेच ऐकायला तयार नव्हता. त्या अतिअवघड परीक्षा देणे आपल्याला जमणार नाही आणि त्याबद्दलची इच्छाआकांक्षांही नाही, असे तो ठामपणे सांगायचा.

एकदा माधवच्या वडिलांना गांगल अचानक भेटले. माधवसाठी खूपच 'आउट ऑफ द वे' जाऊन त्यांनी मदत केली होती. त्याबद्दलची कृतज्ञता वडिलांच्या मनात पुरेपूर होती. गांगलांना त्यांनी आदराने नमस्कार केला. गांगलांनी मुलाचे कसे काय चालले आहे याबद्दलची चवकशी केली.

''त्याचं चांगलं चाललं आहे. सध्या टूरवर आहे,'' वडिलांनी सांगिलतले.

''छान! खूप अनुभव मिळतो आऊटसाईड ऑडिटमध्ये. रेल्वेमध्ये तसं होत नाही.'' गांगलांनी माहिती पुरविली. ''रेल्वे ऑडिटमध्ये स्टेशन्स टू स्टेशन्स हिशोब तपासणी होते. रेल्वे वक्र्सशॉप व इतरही रेल्वे ऑफिसेस आहेत. तेथेही ऑडिटसाठी जावे लागते. रेल्वेचा पसारा अवाढव्य असला, तरी शेवटी रेल्वे एके रेल्वे. कमर्शिअल ऑडिटमध्ये मात्रखूप वैविध्य आहे. स्टेट ऑडिट्स व सेंट्रल ऑडिट्स असे त्यात दोन विभाग आहेत. स्टेट ऑडिट्समध्ये एस.टी., एम.एस.ई.बी, गव्हर्मेंट डेअरीज आणि मॅफ्को, सिडको यासारख्या राज्य सरकारच्या कंपन्या व कॉर्पोरेशन्स येतात, तर सेंट्रल ऑडिटसमध्ये सरकारची एस्टॅब्लिशमेंट्स आहेत. खूप काही अशा ठिकाणी शिकायला मिळते. पण तसा ऍप्रोच हवा. नुसती टूरची गंमत नको.''

वडिलांना गांगलांच्या बोलण्यातून ऑडिटसंबंधी बरीच नवी माहिती कळत होती, प्रबोधन होत होते. आपला मुलगा नुसती गंमत म्हणून टूर्सकडे बघतो आहे. त्यातून काही शिकावे, पुढील परीक्षा देण्यासाठी तयारी करावी अशी त्याला महत्त्वाकांक्षा नाही, हे वडिलांना दिसतच होते. गांगल पुढे म्हणाले, ''कन्फरमेटरी परीक्षा दिल्यावर तुमचा मुलगा नोकरीत कायम झाला. त्यावरही तीन वर्षे उलटली. एस.ए.एस. परीक्षांचा विचार तो का करत नाही? तसा त्याने केला पाहिजे. कर्मशिअल ऑडिटमध्ये या परीक्षा तुलनेने कमी कठीण आहेत. म्हणून तर मी त्याला तेथे असाइनमेंट दिली. परंतु त्याच्याकडून तशी काहीच हालचाल होत नाही.''

वडील काय बोलणार? गांगलांबद्दलचा त्याचा आदर दुणावला. त्यांनी माधवला नुसती नोकरी दिली नव्हती, काही चांगल्या हेतूने कमर्शिअल ऑडिट विभागात त्याची नेमणूक केली होती. त्याची पुढे प्रगती व्हावी याकडेही त्यांचे लक्ष होते. दुसऱ्यासाठी कोण कशाला एवढे करील? स्वतः गांगलांना एकुलती एक मुलगी. तिच्या आधी मुलगा होता, पण तो अकाली गेला. ती सल कायम मनात खोलवर असूनही आपल्या मुलाच्या करिअरबद्दल ते काळजी करत आहेत, हे पाहून वडील भारावून गेले.

दुसऱ्याच दिवशी परगावचे ऑडिट संपल्यावर माधव घरी आला. सकाळी चहा घेता घेता वडिलांनी विचारले, ''कशी काय झाली ट्रिप?''

''ट्रिप?'' माधव क्षणभर थबरला, ''हां, म्हणजे टूर. फाईन. झकास. टूरवर मजाच असते. नो प्रॉब्लेम!''

वडिलांचा आवाज चढला, ''प्रॉब्लेम नाही कसा! आहे.''

''कोठचा?''

''सिनियर ऑडिटरच्या परीक्षा देण्याचा. आता मजा पुरे झाली. कालच गांगल भेटले होते.''

''गांगल?... हां. आपले ते भगवानराव गांगल साहेब?''

''होय तेच ते... ज्यांची 'भगवंत कृपा' होऊन सध्या तुमची जी भटकंती चालली आहे, त्यामागचे हेल्पिंग हँड. त्यांची आज्ञा आहे...''

''भगवंत आज्ञा म्हणजे देवाज्ञाच म्हणायची!'' माधव हसला.

''थट्टा पुरे. तू असाच भटकत राहिलास तर मला मात्र लवकरच देवाज्ञा व्हायची.'' वडिलांचा आवाज चढला, ''टूरवरचा हँगओव्हर अजून उतरलेला दिसत नाही. मी काय सांगतो ते सिरियसली ऐक.''

''तुम्ही सांगूच नका, मीच सांगतो.'' परीक्षांचा हा विषय आज ना उद्या निघणार याची माधवला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे तो तयारीत होता. त्याबद्दलचा एकदाच सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्याने आपली भूमिका मांडली. ''मी स्पष्टच सांगतो, त्या एस.ए.एस.च्या जंजाळात मला पडायचे नाही. कसाबसा मी बी.कॉम. झालो. मागून मजबूत टेकू मिळाला म्हणून पोटार्थी नोकरीला लागलो. तेथे पर्मनंट झालो. ऑफिसात आता व्यवस्थित स्थिरावलो आहे. चांगले कॉन्फिडेंशिअल रिपोर्ट मिळत गेले, आणि तसे ते मिळतीलच; त्यामुळे परीक्षा न देतादेखील काही वर्षांनी मी एस.ए.एस. प्रमोटी म्हणून सिनियर ऑडिटर म्हणजे सुपरिंटेंडेंट होईन. त्यापुढील ऑफिसर्स वगैरेंची अधिकारपदे मात्र फुलफ्लेज्ड एस.ए.एस. पार्ट वन व पार्ट टू झालेल्यांनाच मिळतात, प्रमोटीजना नाहीत. त्यामुळे मी ऑडिट ऑफिसर कधीच होणार नाही. पण हव्यात कशाला ऑफिसर होऊन नसत्या जबाबदाऱ्या आणि विवंचना? मला तसलं काही नकोच आहे. 'नेमिले भगवंते तैसेची राहावे', यात मला समाधान आहे. अधिकाराचा लवमात्र हव्यास नाही.'' माधव हसला.

मुलाच्या मुक्ताफळांपुढे काय बोलावे हेच वडिलांना सुचेना. ते हतबुध्द झाले. वैतागून म्हणाले, ''ऑडिटर म्हणून गोंडस नाव लावले तरी खरे म्हणजे कारकूनच. राहा तसेच जन्मभर.''

''का म्हणून? इतर क्षेत्रे नाहीत की काय? माझा साहित्याचा व्यासंग आहे, सखोल वाचन आहे, लेखनाचीही क्षमता आहे. साहित्यात मी नाव कमवीन. माझी पुस्तके निघतील, प्रसिध्दी होईल. पैसाही मिळेल. काही लेखकांना एक एका पुस्तकाची लाखभरदेखील रॉयल्टी मिळते. ठोकून तसे मानधन घेतात ती मंडळी.''


''ठोकून घेतलेल्याला मानधन म्हणायचे? ते तर अपमानधन! काही असो, पण तू त्या दर्जाचा होशील का? उत्तम साहित्यकार होणं काही सोपं नाही. श्रेष्ठता प्रस्थापित करणं फारच दुर्लभ आणि दुर्घट. तसे जे थोडे ख्यातकीर्त लेखक आहेत ना, तेही उच्च शिक्षण घेतलेले - कोणी प्रोफेसर, कोणी डॉक्टर, कोणी एक्झिक्युटिव्ह्ज वगैरे वरिष्ठ पदांवर आहेत. जेवढे शिकू, जेवढे श्रेष्ठ पदांवर काम करू, तसतशी आपली विचारशक्ती, ग्रहणक्षमता आणि अनुभवविश्व विकसित होते. विस्तारते, समृध्द होते. आजकाल कारकून असूनही प्रख्यात लेखक झालेला कोणी दिसत नाही. अपवाद म्हणून तू होणार असशील तर आनंदच आहे!''

वडिलांच्या बोलण्यात उपहास होता पण तथ्यही होते, हे माधवला पटले. साहित्य क्षेत्रातील वाटचालीत अनेक नामवंत लेखकांशी त्याने उन्मेखून परिचय करून घेतला होता. ती सर्व मंडळी शैक्षणिकदृष्टया व व्यावसायिकदृष्टया खूप वरच्या स्तरावर होती. खरीच!

दुसऱ्या दिवशी माधव मुंबईतील त्याच्या हेडक्वॉटर्सच्या मुख्य ऑफिसात गेला. टूर संपवून परत आले की प्रथम तेथे हजर व्हावे लागायचे. प्रवास भत्त्याची बिले सादर करणे किंवा आधीच्या बिलांचे पैसे घेणे, नवे क्वार्टर्ली प्रोग्रॅम समजून घेणे वगैरे सव्यापसव्य असे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा एस्टॅब्लिशमेंटसंबंधीची कामे उरकून घ्यावी लागत. नंतर मग जरा इकडे तिकडे करून घरी पळ काढता येत असे. मुख्य ऑफिसातील सर्वांशी माधवचा उत्तम रॅपो होता. त्यामुळे गप्पाटप्पा झाल्या. टूरवाल्यांना अतिरिक्त कमाई बऱ्यापैकी होत असल्यामुळे टूरवरून आले त्यांनीच चहापाणी करायचे असा संकेत असल्यामुळे माधवने ती प्रथा पाळली. आणि मग घरी परतण्यासाठी तो लिफ्टकडे वळला, तेवढयात ऑफिसचा शिपाई त्याच्या मागोमाग धावत आला. ऍड्मिन साहेबांनी बोलावले असल्याचे त्याने सांगितले.

''बापरे! थोडक्यात वाचलो...'' माधवला हायसे वाटले. शांताराम परोपकारी हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर नावाप्रमाणे फारसे मृदू नसले, तरी एकूण चांगले होते. माधवला त्यांची कधीही धास्ती वाटली नव्हती. कारण एकंदरीत माधवचा स्वभाव सगळयांशी जमवून घेणारा तर होताच, शिवाय ऑफिसला जॉईन झाल्यापासूनचे त्याचे सर्व्हिस रेकॉर्ड एकदम क्लीन होते. टी.ए. बिल्स बनवताना युक्त्या-प्रयुक्त्या करणारे काही महाभाग होते. रेल्वेच्या जनरल क्लासने प्रवास करायचा पण फर्स्ट क्लास दाखवायचा, ऑडिटसाठी परगावी गेल्यावर ओळखीच्या किंवा नातेवाइकांकडे पथारी टाकायची पण रेस्टहाऊस किंवा हॉटेलची बिले सादर करून हायर डेली अलाउन्स क्लेम करायचा, वगैरे प्रकार घडत. पण माधव या बाबतीत अगदी काटेकोर व स्वच्छ होता. त्याने सादर केलेली बिले फारशी तपासलीही जात नसत. लगेचच पास होत. कारण जेवढे लेजिटिमेट तेवढेच तो घ्यायचा. अधिकाराचा विचारही त्याच्या मनाला शिवत नसे. आपल्याला लायकीहून जास्त मिळते, मग आणखी हाव का धरायची? गेल्या चार वर्षांत त्याला दोनदाच मेमो आले होते. पण त्याला एकटयाला नव्हे, तर त्याच्या ऑडिट पार्टीतील सर्वांबरोबर. तेही विमान प्रवासासंबंधी. त्याचे असे झाले - राजकोट येथील ऑडिट संपवून पुढे भूजला जायचा प्रोग्रॅम होता. मध्ये कच्छचे आखात असल्यामुळे रेल्वे मार्ग किलोमीटर्सच्या हिशेबाने लांबचा होता. त्यामुळे विमानभाडे फर्स्ट क्लास रेल्वे तिकिटाहून कमी होते. पैशाप्रमाणे वेळेचीही बचत होत होती. त्यामुळे सर्व पार्टी मेंबर्स राजकोटहून भूजला हवाई मार्गाने गेले. पण यात ऑफिसचीच कशी बचत होती, त्याचे स्पष्टीकरण दिल्यावर मेमो मागे घेण्यात आले. दुसऱ्या वेळी महाराष्ट्र स्टेट स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे ऑडिट होते. त्यांच्या मुंबईतील मुख्य ऑफिसमधील काम संपवून ऑडिट पार्टी रेल्वेने औरंगाबाद युनिटच्या तपासणीसाठी गेली. तेथे हेडक्वार्टरकडून ऑर्डर आली की एम.एस.एस.आय.डी.च्या नागपूर युनिटचेही ऑडिट करून यावे. वेळ कमी होता, म्हणून कॉर्पोरेशनने ऑडिट पार्टीला तेथल्या संबंधित स्टाफ मेंबर्ससह त्यांच्या खर्चाने विमानाने नागपूरला नेले व तेथले काम संपल्यावर विमानानेच मुंबईला आणले. सर्वांनी टी.ए. बिलात तसा उल्लेख करून त्या प्रवासाचे रेल्वे फेअरही क्लेम केले नाही. यात ऑाफिसचा खर्च वाचला. पण तरीही ऑफिस रूल्सप्रमाणे ऑडिट पार्टी मेंबर्सपैकी कोणीही विमान प्रवासाला पात्र नव्हते व त्यामुळे नियमबाह्य वर्तन झाल्याचा ठपका ठेवून सर्वांना मेमो देण्यात आले. अर्थात व्यवस्थित खुलासा केल्यावर ते लगेच मागेही घेण्यात आले!

...परंतु अलीकडे तसले काही नवीन असे घडले नव्हते. तर मग परोपकारी साहेबांनी बोलावले कशाला?

ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे कडक डिपार्टमेंट. काहीशा संभ्रमित अवस्थेत माधव परोपकारींच्या केबिनमध्ये शिरला.

''गुड इव्हनिंग सर''

''इव्हनिंग?'' परोपकारींनी भुवया उंचावल्या, ''अजून धड आफ्टरनून झालं नाही. घरी निघाला होता ना? नाही, गुड इव्हनिंग म्हणालात, म्हणून विचारलं.''

''नाही... हो...'' माधव चाचरला.

''डोन्ट पॅनिक. मी आपलं सहज म्हटलं. आय अंडरस्टँड, टूरवर केवढं टेन्शन आणि धावपळ असते ती..'' माधव मनातल्या मनात म्हणाला, कसली धावपळ आणि टेन्शन? टूरसारखी कुठे मजा नसते. तेवढयात परोपकारी पुढे म्हणाले, ''तुम्हाला मेन ऑफिसला आल्यावर कधीतरी असं थोडं फार लवकर जायला मिळत, दॅट इज ओके. तसं कामही इथे नाही. त्यामुळे टाइमपास करीत येथे बसण्याऐवजी घरी जायला हरकत नाही. सो, नो ऑब्जेक्शन फ्रॉम माय साईड.''

तर मग काय काम आहे? बोलावले कशाला? माधवचे मूक प्रश्न. ''सांगतो,'' त्याचा चेहरा 'वाचत' परोपकारी म्हणाले व बाजूला काढून ठेवलेला फॉर्म त्यांनी माधवपुढे धरला.

एस.ए.एस. प्रिलिमिनरी परीक्षेला बसण्याचा तो फॉर्म पाहून माधवने जोरजोरात मान हालवली, ''नाही सर, मला नाही द्यायची ती परीक्षा.''

''मग काय जन्मभर कारकुंडेगिरी करणार? ते काही नाही. गुपचूप सही करा आणि परीक्षेला बसा.''

''नाही... नको सर. मला जमणार नाही.''

''का नाही जमणार? कोठून कोठून येथे आउटसायडर्स येतात. जिवाचं रान करून परीक्षा देतात व तुमच्या डोक्यावर बसतात. तुम्हाला येथे सर्व सोयी, सवलती आहेत आणि परीक्षा देणार नाही म्हणता? ते काही नाही. साईन हियर.''

नकोशी वाटणारी गोष्ट करण्याचा परोपकारी आग्रह करत असले, तरी त्यामागची त्यांची स्वच्छ व साहाय्यकारी भावना माधवला स्पर्शून गेली.

परोपकारीसाहेब त्याला देव वाटले. त्याचे वडील काय, गांगल काय, हे परोपकारी काय, त्याच्या भल्यासाठी केवढे झटत होते. वडिलांचे एक वेळ सोडा, पण गांगल व परोपकारी त्याचे कोण होते? निरपेक्ष व निःस्वार्थी वृत्तीने ते त्याच्या हितार्थ धडपडत होते. तो हेलावून गेला.

माधवने सही केली.

परोपकारींनी बाजूच्या कपाटातून दोन पुस्तके काढली. ऑडिट कोड व अकाउंट्स कोड. ''ही घ्या. पहिला पेपर या दोन विषयांचा. दुसरा जनरल, त्यात प्रेसी रायटिंग, ड्राफ्टिंग व थोडे ग्रामर वगैरे. तुम्ही लेखन वगैरे करता. मी थोडे वाचलेय तुमचे. चांगले लिहिता. हा दुसरा पेपर तुम्हाला सोपा जाईल. पहिल्यासाठी ही पुस्तके वाचा. किचकट आहेत, पण लक्ष घातले तर जमून जाईल. ही परीक्षा म्हणजे किरकोळ टेकडी आहे. पुढच्या परीक्षा म्हणजे हिमालय आहे. फारच अवघड. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेपेक्षाही कठीण परीक्षा. त्यांचा रिझल्ट पाच-सहा टक्के, तर आपला एक दोन टक्के, कधीकधी तर शून्य टक्के.एस.ए.एस. पार्ट वन व एस.ए.एस. पार्ट टू अशा दोन भागांत परीक्षा घेतली जाते. दोन-तीनदा गोते खावे लागतील. पंचवार्षिक योजनाच म्हणा ना. पण चिकाटी दाखवली व नेट धरला, तर होऊन जाईल. त्याआधी प्रिलीमच्या घोडयावर बसणे महत्त्वाचे, म्हणून हा फॉर्म भरून घेतला.''

तेवढयात आकर्षक ट्रेमधून चहा आला. माधवपुढे त्यातील एक कप सारत परोपकारी म्हणाले, ''घ्या. बी फ्रेश.''

माधव कमालीचा संकोचला. कसाबसा चहा संपवून त्याने नमस्कार करत परोपकारींना म्हटले, ''येतो सर. थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच.''

त्यांच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर, आपण अशी काही कमिटमेंट करून बसू, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्याचे वडील व गांगल वारंवार आग्रह करत असूनही त्याने तो विषय दुर्लक्षित केलाहोता. याउलट ऍडमिन साहेबांनी पहिल्याच बॉलला त्याची विकेट काढली होती!

लोकलमधून घरी परतताना त्याने ऑडिट कोड, अकाउंट्स कोड पुस्तके उघडून चाळली व त्याला अक्षरश: घाम फुटला. चक्क रडूच आले. बापरे! यापेक्षा चिनी, जपानी भाषा सोपी. एक अक्षरे कळेल तर शपथ. दोन्ही पुस्तके खिडकीतून बाहेर फेकून द्यावीत इतका आततायी विचार त्याला आवरता आवरेना. कसाबसा तो घरी आला व कॉटवर मेल्यासारखा पडून राहिला. बरे तर बरे, वडील घरी नव्हते. नाहीतरी मुलगा निपचित पडलेला पाहून डॉक्टरांकडे त्यांनी धाव घेतली असती!

दुसऱ्या दिवशी त्याने पुण्याला जाणारी गाडी पकडली व दापोली स्टेशनवर उतरून थेट एस.टी. सेंट्रल वर्कशॉप गाठले. तेथे सलग दोन महिने ऑडिट रिव्ह्यूचे काम होते. मुख्य सिनियर ऑडिटर व दोन ज्युनिअर ऑडिटर अशी पुणे हेडक्वार्टर असलेली ती लोकल ऑडिट पार्टी होती. रिव्ह्यूचे कठीण व वेळमोडीचे काम होते. ऍडिशनल हँड म्हणून माधवला त्या पार्टीला जॉईन व्हायला सांगण्यात आले होते. त्याला पुणे आवडायचे. तेथे हायर डी.ए. रेट होता. शिवाय त्याचे आजोळ पुण्यात होते. मामांकडे राहण्याची घरगुती सोयही होती. सिनियर ऑडिटर ओरपे स्वभावाने अतिशय सालस, मनमिळाऊही, तेवढेच ऑडिटरच्या कामातले दर्दी होते. माधवचे त्यांनी स्वागत केले व तो एस.ए.एस.च्या प्रिलीम परीक्षेला बसणार असल्याचे कळल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला. म्हणाले ''हे पाहा, परीक्षेला अजून एक महिना आहे. येथे नियमितपणे येऊन अभ्यास करायला हरकत नाही. काही अडलं, तर मला विचारा. कामाचं आम्ही बघून घेऊ. ही महिन्याभरापुरती 'स्टडी टूर' आहे असं समजा.''

गांगल, परोपकारी आणि आता हे ओरपे. कोण होते हे आपले? आपणाला नोकरीतील उच्च पद मिळावे, म्हणून परीक्षेच्या घोडयावर स्वार होण्यासाठी, कोणतेही नातेसंबंध नसलेली ही मंडळी केवढी प्रयत्नशील होती, हे पाहून त्या तिघांबद्दलचा माधवचा आदर दुणावला आणि घोडयावर बसायचेच आहे, तेव्हा आता लगाम हाती धरलाच पाहिजे असा त्याने निश्चय केला. जनरल पेपरला तो घाबरत नव्हता. प्रेसी रायटिंग म्हणजे दोन-तीन पानी मजकुराचा अर्ध्या पानात संक्षेप करणे, ड्राफ्टिंग म्हणजे पत्रव्यवहाराचे मसुदे बनवणे. हे तो सहजपणे करू शकणार होता. व्याकरणावरची तर्खडकरांची तिन्ही पुस्तके आणि रेन ऍंड मार्टिनचे ग्रामर त्याने आधीच अभ्यासले होते. त्यामुळे त्या दुसऱ्या पेपराची चिंता नव्हती. प्रॉब्लेम होता तो पहिल्या पेपराचा. तीन आठवडे त्याने ऑडिट कोड, अकाउंट्स कोडचा पिच्छा पुरवला. ओरपे यांनीही खूप समजावले. त्याची भरपूर शाळा घेतली. पण माधवच्या डोक्यात प्रकाशच पडत नव्हता. त्याला त्या विषयाची आवडच निर्माण होत नव्हती. या पेपरात आपण भुईसपाट होणार, याची त्याला मनोमन खात्री वाटत होती.

परीक्षेच्या दोन पेपरांसाठी माधवने मुंबई ऑफिसात यावे, असे त्याला सांगण्यात आले होते. पण परीक्षा जवळ आली तरी त्यासंबंधीचे ऑफिशिअल इंटिमेशन त्याला आले नव्हते. त्या वेळी आजच्या एवढया फोनच्या सुविधा नव्हत्या. मोबाइल तर ऐकूनही कोणाला माहीत नव्हते. परीक्षा चार दिवसांवर आली, तेव्हा ओरपेंनी मुंबईला ट्रंक कॉल करून विचारणा केली. त्यांना सांगण्यात आले की ऑडिट ऑफिसर गुप्ते सोमवारी दापोली वर्कशॉपच्या रिव्ह्यूसंबंधीची पडताळणी करण्यासाठी येतील. सोबत ते दोन्ही पेपर्स आणतील व तेथेच त्यांच्या सुपरव्हिजनखाली परीक्षा घेतली जाईल.

''हे चांगले झाले,'' ओरपे म्हणाले, ''गुप्ते हे आपल्यापैकीच आहेत. येथेच परीक्षा घ्यायची, तेव्हा...''

''ते तर माझ्या फायद्याचेच आहे. मला तुमची मदत होईल'' माधवने हसून ओरपेंचे वाक्य पुरे केले.

''तसे नाही हं. परीक्षा म्हणजे परीक्षा. आम्ही काहीही सांगणार नाही. कॉपी करू देणार नाही. फक्त कमी-जास्त वेळ देऊ शकू.'' ओरपे ऑफिस डिसिप्लिन व डेकोरम पाळणारे होते. त्या बाबतीत एकदम घट्ट. स्टि्रक्ट.

सोमवारी परीक्षा होती. दापोली वर्कशॉपचे टाईम सकाळी आठ ते चार होते. ऑफिस नऊ वाजता सुरू व्हायचे. काहीशा अनिच्छेनेच माधव परीक्षेसाठी हजर झाला. मूड काही चांगला नव्हता, कारण काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती व आता जोर वाढला होता. ओरपे आले, पण गुप्त्यांच्या येण्याबद्दल काहीच कळत नव्हते. पाहता पाहता दहाचा सुमार झाला. तिकडे मुंबईला पहिला पेपर सुरूही झाला होता. ओरपे टेलिफोन ऑपरेटरजवळ बसून होते. पावसामुळे टेलिफोन लाईन्स बंद झाल्या होत्या. ऑफिसला ट्रंक कॉल लावण्यासाठी निष्फळ धडपड सुरू होती, पण दगडावर डोके आपटत राहावे असा प्रकार झाला होता! शेवटी ओरपेंनी दापोली पोस्ट ऑफिस गाठले. आपण सांगितल्याप्रमाणे परीक्षेसाठी येथे कँडिडेट हजर आहे, पण पेपर्स घेऊन गुप्तेसाहेब येणार होते ते अद्याप आलेले नाहीत, तेव्हा काय करावे?' अशा अर्थाची तार त्यांनी मुंबईच्या हेडक्वार्टर्स ऑफिसात केली व ते लगेच वर्कशॉपच्या ऑफिसात आले. स्वत: माधव, ओरपे आणि त्यांच्या पुणे ऑडिट पार्टीतील दोघे जण हवालदिल होऊन नुसते बसून होते. समोर कागदपत्रे होती, पण कामात लक्ष लागत नव्हते. अधूनमधून ओरपे टेलिफोन ऑपरेटरकडे जात होते. पण मुंबई कनेक्शन बंद होते. आवश्यक तेथे संपर्कच साधता येत नव्हता. परीक्षेच्या तयारीने यावे पण पेपरच समोर येऊ नये, त्यामुळे माधवची उलाघाल होत असली, तरी दुसरीकडे त्याला हायसेही वाटत होते. नाहीतरी त्याला स्वत:ला परीक्षा द्यायचीच नव्हती. 'लोकाग्रहास्तव' तो कसाबसा तयार झाला होता. दुपार उलटली व मुंबईला दहा वाजता सुरू झालेला पेपर संपला होता. इकडे एस.टी वर्कशॉपचे ऑफिस बंद होण्याची वेळ आली, तरी परीक्षेसंबंधी काही कळत नव्हते. गुप्तेसाहेबांचा पत्ता नव्हता व टेलिग्रामचेही उत्तर आले नव्हते. पाच वाजले व ऑफिस बंद झाले. शेवटचे म्हणून ओरपे टेलिफोनचे बघून आले, परंतु फोन डेड!

सर्वांनी आणखी तासभर तसाच वेळ काढला. मग ओरपे म्हणाले, ''मुंबईचे ऑफिसही आता बंद झाले असेल. चला, घरी जाऊ. उद्या बघू काय करायचं ते.'' लगेचच विषादपूर्ण स्वरात म्हणाले, ''किंवा काहीही करायचे नाही, परीक्षा बुडली असे समजायचे व गप्प बसायचे!''

इकडे संध्याकाळी आठ वाजता वर्कशॉपमध्ये तार आली. दुसऱ्या शिफ्टचा ऑपरेटर आला नसल्यामुळे सकाळचेच सावंत बोर्डापाशी होते. त्यांनी तारेचा कागद वाचला, 'गुप्तेज व्हिजिट कॅन्सल्ड. कँडिडेट शुड कम टू हेडक्वार्टर टुमॉरो.'

बोर्डाकडे बघायला दुसऱ्या कोणाला तरी सांगून ऑपरेटरने त्या वेळी वर्कशॉपच्या डयुटीवर असलेल्या प्रमुखांना सर्व हकिगत सांगितली. सरकारी ऑडिटसंबंधीचे काम असल्यामुळे त्यांनी लगेच जायची व्यवस्था केली. प्रभात रोडवर ओरपे कोठे राहतात ते ऑपरेटरला माहीत होते. त्यांनी ओरपेंना तार दाखविली. ते संभ्रमात पडले. माधव साने शुक्रवार पेठेत त्यांच्या मामांकडे राहतात, याची त्यांना कल्पना होती, पण निश्चित पत्ता माहीत नव्हता.

''बापरे! शुक्रवार पेठ केवढी मोठी! कसे त्यांना गाठायचे?'' ऑपरेटरने शंका व्यक्त केली.

''कठीणच आहे. मंडईजवळ कोठे तरी जोशी मामा राहतात, असे त्यांच्या बोलण्यातून कळले. चल, प्रयत्न करून पाहू.''

ओरपे, ऑपरेटर व जीपचा ड्रायव्हर यांनी मंडईभर सर्वत्र हिंडून जोशी मामांचा शोध घेतला. पण तासभर पायपीट करूनही काहीच हाती लागले नाही. निराश होऊन त्यांना परतीची वाट धरावी लागली.

मंगळवार उजाडला. नऊ वाजण्याच्या आधीच ओरपे दापोली वर्कशॉपमध्ये हजर झाले. मागोमाग माधवही आला. ओरपेंनी त्याच्या हाती मुंबईहून आलेला टेलिग्रॅम ठेवला. माधव चमकला. बुचकळयात पडला. तिकडे दहा वाजता दुसरा पेपर सुरू होणार होता. लगेच निघून कितीही धडपड केली, तरी मुंबई गाठायला चार-पाच तास सहज लागणार होते. त्या वेळी एक्स्प्रेस हायवे नव्हता. ठिकठिकाणी, विशेषत: घाटात प्रचंड ट्रॅफिक जॅम व्हायचे. कधीकधी आठ आठ, दहा दहा तास सहज लागायचे. एकदा विधानसभेचे तात्कालीन सभापती जयंतराव टिळक असेच दहा-बारा तास रखडले व तेव्हा मोठी ओरड होऊन नवीन रस्त्याची जोरदार मागणी पुढे आली. काय करावे कळेना. मुंबईकडल्या गाडया आधीच निघून गेल्यामुळे रेल्वेने जाण्याचाही पर्याय नव्हता. पण आता फोन सुरू झाला होता. ओरपेंनी मुंबईच्या ऑफिसांतील परोपकारींशी संपर्क साधला. ऑफिस टाईम दहाचे असले, तरी आधीच तेथे येण्याचा परोपकारींचा रिवाज असल्यामुळे ते शक्य झाले. त्यांनीच आग्रहाने पुढाकार घेऊन माधवला प्रिलीम परीक्षा देण्यासाठी राजी केले होते आणि आता हा असा अनावस्था प्रसंग गुदरला होता. त्वरित निर्णय घेण्याची विशेष क्षमता असणाऱ्या परोपकारींनी ओरपेंना सांगितले,

''ऑफिसात मी सहा वाजेपर्यंत आहे. सानेंना लगेच इकडे यायला सांगा. दिवसभरात ते पोहोचले, तर दुसरा पेपर त्यांच्याकडून लिहून घेऊ.''

''पण पहिला पेपर होऊन गेला साहेब!''

''ते बघू मग. आधी त्यांना लगेच मुंबईला पाठवा.''

आता आली का पंचाईत? ओरपे दिङ्मूढ झाले. पण योगायोगाने दापोली वर्कशॉपकडून एस.टी.चा ट्रक काही कामासाठी परळला निघाला होता. ओरपेंना हे कळताच ते लगेच वक्र्स मॅनेजरला भेटले. ऑडिटला सगळेच दचकून असल्यामुळे तेथे मोठा मान होता. बरे, कामही वावगे नव्हते. लेजिटिमेट होते. माणुसकीला धरून होते. त्यामुळे त्वरित परवानगी मिळून, थांबलेल्या माधवला ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसवून मुंबईकडे त्याची रवानगी झाली.

लवकरात लवकर पोहोचावे म्हणून ट्रक सुसाट निघाला. एकूणच एस.टी. ड्रायव्हर्स प्रशिक्षित असतात. ड्रायव्हिंगच्या कामात कुशल असतात. माधवला मुंबईकडे घेऊन जाणारा ड्रायव्हरही त्याच्या कामात वाकबगार होता. कितीही वेग दिला तरी त्याचा कंट्रोल कधी सुटत नसे. पण दुसऱ्या गाडीच्या सारथ्याने कंट्रोल सोडला, तर पहिल्याने काय करावे? लोणावळयाला येता येता, मागून ओव्हरटेक करणाऱ्या मद्यधुंद ड्रायव्हरपासून आपले वाहन वाचवण्याच्या प्रयत्नात एस.टी. ट्रक झाडावर आदळला व बंद पडला. बरे तर बरे. ट्रकची फारशी हानी झाली नाही व माधवला व ड्रायव्हरला किरकोळ मुका मार लागण्यावर भागले. अजूनही पावसाची रिपरिप सुरूच होती. कालपासून माधव मनाने आधीच गळपटून गेला होता व त्यात आता हा शारीरिक धक्का. बारा वाजून गेले होते. पोटात काहीच गेले नव्हते. घामाने व पावसाने कपडयांची पुरती वाट लागली होती. तेवढयात सातारा-मुंबई एस.टी. बस आली. एस.टी.चाच ट्रक अपघातग्रस्त झाल्याचे पाहून बस ड्रायव्हरने बस थांबविली. ट्रक ड्रायव्हरने घडलेली हकीकत सांगितल्यावर माधवला लगेच बसमध्ये घेण्यात आले. सुदैवाने पुढे ट्रॅफिकची अडचण आली नाही व मुंबई सेंट्रलपर्यंतचा प्रवास सुरळीत झाला. तेथून टॅक्सी करून माधव मुंबई ऑफिसात पोहोचला.

आपण निर्जीव झालो आहोत, इतक्या हतबल अवस्थेत माधव होता. त्याच्या मानसिक व शारीरिक दुरवस्थेमुळे त्याच्यात काही त्राणच उरले नव्हते. पण तेथील त्याच्या स्टाफ मेंबर्सनी त्याला धीर दिला. कपडे बदलणे शक्य नव्हते. परंतु त्यातल्या त्यात त्याने ते ठाकठीक केले. हात-तोंड धुऊन तो फ्रेश झाला. दोन कप गरमगरम चहा घेतल्यावर त्याच्यात हळूहळू जान आली व तो नॉर्मल झाला.

तो आल्याची वर्दी परोपकारींकडे गेली. त्यांनी केबिनमध्ये त्याला बोलावून घेतले. तो प्रचंड दमलेला, गांजलेला दिसत होता. ''काय झालं साने?'' त्यांनी सहानुभूतीने विचारले.

जे घडले ते सुसंगतपणे माधवने कथन केले. परोपकारींच्या चेहऱ्यावर हळहळ व्यक्त होत होती. जे काही विचित्र झाले ते ऑफिसमुळेच, हे त्यांना पटले. प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपणच दोषी व जबाबदार आहोत अशीही त्यांनी मनोमन कबुली दिली. तेवढे ते प्रांजळ होते. त्यांनी चहा मागवला.

''सर, मी घेतला आहे. दोनदा. आता आणखी नको.''

''चार वाजत आले आहेत. दुसरा पेपर कधीच संपला आहे. तरीही नियमाप्रमाणे तीन तास देऊ. सात वाजेपर्यंत तुम्ही हा आजचा पेपर सोडवायचा. मी बाहेर हॉलमध्ये स्वतंत्र व्यवस्था करतो. स्वामी सुपरवाईज करतील. आर यू रेडी फॉर दॅट, मिस्टर साने?''

''येस सर.''

''गुड!''

सुपरिंटेडंट स्वामींना त्यांनी बोलावून घेतले व सांगितले की, ऑफिस सुटले, तरी सात वाजेपर्यंत सान्यांकडून हा दुसरा पेपर लिहून घ्यावा. पहिला पेपर मिस झाला, त्याबद्दलची एक नोट तयार करावी. परीक्षेसाठी मुंबईला येण्यासाठी दापोलीला सानेंना कळविले होते. पण टपाल त्यांना मिळाले नाही. अतिवृष्टीमुळे ट्रंक लाइन्स बंद होत्या. त्यामुळे तोही पर्याय उपलब्ध नव्हता. दुसऱ्या दिवशीच्या पेपरसाठी ते कसेबसे येऊ शकल्यामुळे त्या दिवसाची प्रश्नपत्रिका त्यांच्याकडून लिहून घेतली... वगैरे सर्व नोटमध्ये मेन्शन करा आणि शेवटी, एकूण परिस्थितीचा सातत्याने विचार करून पहिला पेपर कँडिडेटने दिल्याचे माफ करावे व या दुसऱ्या पेपरच्या परफॉर्मन्सवरून त्याच्या प्रिलीम एक्झॅमिनेशनबद्दल सहानुभूतिपूर्वक निर्णय घ्यावा, असे लिहून नोट पुरी करावी.

''पण सर, आपण गुप्तेसाहेबांबरोबर पेपर्स पाठवून दापोलीलाच सानेंची परीक्षा घ्यावी असे ठरविले होते. पण त्यांच्या काही आकस्मिक अडचणींमुळे गुप्ते तिकडे जाऊ शकले नाहीत, म्हणून हा सर्व घोटाळा झाला. तसेच पोस्टाने आपण दापोलीला काहीच कळविले नव्हते.''

''डू यू थिंक आय डोंट नो धिस, मिस्टर स्वामी? पण आता जो घोटाळा झाला आहे म्हणता, तो निस्तरायला हवा की नको? का ऍडमिनिस्टे्रशकडून दिरंगाई व दोष घडला म्हणून तुम्ही व मी नोकरी गमवायची? स्पीक आऊट स्वामी, आय ऍम रेडी फॉर दॅट, बट आर यू? तुमच्या पदरात चार मुली आहेत, तेवढे लक्षात ठेवा.'' स्वामी गडबडले. त्यांनी न दिलेले उत्तर परोपकारींना समजले होते.

''म्हणून म्हणतो, मी सांगतो तसे करा. अडचणीतून आडवळणानेच मार्ग काढावा लागतो, हे पुढे तुम्ही ऑफिसर होऊन माझ्या खुर्चीत बसाल तेव्हा कळेल. ऍडमिनिस्ट्रेशन इज ए थँकलेस जॉब. मी ऍप्रूव्ह केली की सानेंच्या आजच्या आन्सर पेपरला जोडून इतरांच्या पेपर्सबरोबर दिल्लीला लगेच पाठवून द्या. डू यू फॉलो मिस्टर स्वामी?''

''येस सर.''

''देन गो ऍंड ऍक्ट फास्ट.''

तेथेच उभ्या असलेल्या माधवला या प्रकरणातील जी 'मोडस ऑपरेंडी' परोपकारींनी सुचविली होती, त्यातील सर्वच काही फॉलो झाले नाही. ते समजून घेण्याइतका तो भानावरही नव्हता. आता जो लिहायला लागणार आहे तो पेपर आपण कसा काय सोडवायचा, याच विवंचनेत तो होता. परोपकारींनी खरेच दयाबुध्दी दाखविली होती, यात शंका नव्हती. त्यांच्याकडे कृतज्ञतेने पाहत तो स्वामींसह केबिनबाहेर आला.

मग ठरल्याप्रमाणे माधवची एकाच पेपरची परीक्षा घेण्यात आली. प्रेसी राईटिंग व ड्राफ्टिंगचा तो पेपर तसा बरा होता. सात वाजेपर्यंत फक्त तो स्वामी व एक शिपाई एवढे तीन जणच होते. नोट स्वामींनी लिहिली व त्यांनीच लगेच ती टाईप केली. टायपिस्ट म्हणूनच ते तिथे नोकरीला लागले होते व प्रचंड कष्टाने, अक्षरश: घाम गाळत एस.ए.एस.च्या दोन्ही परीक्षा फर्स्ट ऍटेम्प्टमध्ये उत्तीर्ण होऊन सध्या प्रशासन विभागात सुपरिटेंडेंट या पदावर कार्यरत होते.

स्वामींनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना 'थँक्स' म्हणत माधव घरी परतला.

तो दापोलीला असताना मध्येच कसा घरी आला, याचे त्याच्या वडिलांना आश्चर्य वाटले. त्यांना थोडक्यात काय ते माधवने सांगितले. अधिक बोलण्याची त्याच्यात ताकद नव्हती. रेस्ट ऍंड कम्प्लीट रेस्ट, हीच त्याची त्या वेळची अपरिहार्य व नितांत गरज होती.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या गाडीने माधव दापोली वर्कशॉपमध्ये गेला. ओरपे त्याची वाटच पाहत होते. जे झाले ते सविस्तरपणे त्याने सांगितले. ओरपेंनी कपाळाला हात लावला व निराशेने मान हलवली. फक्त एक पेपर? दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून आधीचा राहिलेला पहिला पेपरही लिहून घ्यायला हवा होता. कारण अर्धवट परीक्षा दिल्यावर काय रिझल्ट येणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. ओरपेंची ही प्रतिक्रिया! माधवची प्रतिक्रिया मात्र अगदी विरुध्द होती. स्वामींकडून मागून घेतलेल्या पहिल्या पेपरांची घडी त्याच्या खिशात होती. तो पेपर लिहावा लागला असता, तर त्यांचा निश्चित त्रिफळा उडणार होता. त्याने तो पेपर ओरपेंना दाखवला नाही. मौनं सर्वार्थ साधनम्!

त्याच्या बाबतीत परीक्षेच्या निकाल लागल्यासारखाच असताना महिना उलटल्यावर दिल्लीच्या सीएजीच्या ऑफिसकडून प्रत्यक्ष रिझल्ट आला. आणि महदाश्चर्य म्हणजे माधव परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते! हा अजब चमत्कार झाला कसा? दोनऐवजी फक्त एक पेपर देऊन 'पास' डिक्लेअर? ऑडिट ऑफिसच्या इतिहासात हे अद्भुत प्रथमच घडले होते!

पण सत्य हे कल्पितापेक्षा कधीकधी अधिक आश्चर्यकारक असते. ओरपेच नव्हे, तर मुंबईतले हेडक्वार्टर ऑफिसही चकित झाले होते. माधवने लिहिलेल्या दुसऱ्या पेपरच्या दर्जावरून पडताळणी करण्यात आली होती व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर परोपकारी यांनी त्यांच्या नोटमधून केलेली कारणमीमांसा विचारात घेऊन 'माधव साने वॉज डिक्लेअर्ड ऍज पास्ड!' माधववर 'दिल्लीकर' प्रसन्न झाले होते, हेच खरे!

माणसाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या बाबतीत असा एखादा टर्निंग पॉईंट येतो की त्यामुळे त्याचे अवघे जीवनच बदलून जाते. माधवच्या बाबतीत एस.ए.एस. परीक्षेसाठी जी पूर्वपरीक्षा घेतली गेली, त्यात विघ्न आले तेच वरदान ठरले. यात काहीतरी ईश्वरी संकेत असावा याची त्याला खात्रीच पटली. आता पुढील दोन पार्ट्समध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आपण जर कसून मेहनत केली, तर तेथेही आपल्याला नशिबाची साथ मिळेल व तो अवघड गडही सर होईल, या जिद्दीने त्याने एस.ए.एस. पार्ट वनची परीक्षा दिली. त्यात तो नापास झाला. दुसऱ्यांदाही तसेच झाले. पण या दोन्ही वेळी मुंबईचा रिझल्ट शून्य टक्के लागला होता. कोणीच नव्हते पास झाले. तिसऱ्या वेळी थोडी सहानुभूती दाखविली गेली असावी, कारण मुंबईसाठी पन्नास टक्के निकाल लागला व माधव त्यात तरला. पार्ट टूच्या परीक्षेत पहिल्या वेळी तो फक्त एका विषयात नापास झाला. पण ऑप्शनची सवलत नसल्यामुळे पुन्हा दुसऱ्या वर्षी सर्व पेपर्स द्यावे लागले. आणि नवलाई म्हणजे मुंबई ऑफिसातून तो एकटाच पास झाला!

ऑफिसात त्याचे प्रचंड कौतुक झाले. सर्वप्रथम तो परोपकारींच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या पाया पडला. घरी गेल्यावर वडिलांच्या. लगेच आकर्षक पुष्पपरडी घेऊन भगवानराव गांगलांच्या घरी गेला व त्यांच्या पायी त्याने माथा टेकवला. कोठलाही संकोच न बाळगता. गांगलांनी त्याची पाठ थोपटत त्याला मिठीतच घेतले. ''आजच्या इतके समाधान मला कधीच झाले नाही माय बॉय!'' त्याचे उत्स्फूर्त उद्गार ऐकून माधवला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. त्याच्या यशाचे खरे शिल्पकार तेच होते ना. त्याला त्यांनी जणू त्यांच्या मुलाच्या जागी मानले होते. व्हायचे असेल तर होते हेच खरे! नोकरीतील पुढील पदोन्नती आता प्युअरली सिनियॉरिटीप्रमाणे - म्हणजे क्रमाक्रमाने होणार होती. त्यासाठीही एखादा परीक्षा असती तर बरे झाले असते, असे माधवला वाटले!

दूरध्वनी : 022-25349806