मार्तंड जे तापहीन

विवेक मराठी    27-Oct-2016
Total Views |

***डॉ. अनघा लवळेकर***

 एखादी कणखर पण अत्यंत स्नेहल व्यक्ती निकटच्या लोकांना अशा परिस्थितीतही किती शांतपणे समजून घेऊ शकते, ते कळलं. जवळच्या-लांबच्या स्नेह्यांना स्वतःच्या उदाहरणातून-संवादातून दिलेलं मूल्यांचं देणं, प्रखर राष्ट्रनिष्ठा, शिक्षणाबद्दलचं मूलभूत चिंतन, विद्यार्थी-कार्यकर्त्यांप्रती असलेला अपार स्नेह, संघकार्यामधील पूर्ण तद्रुपता असलेले कै. भाऊ आता आपल्यातच नाहीत. त्याचं जगण्यातील हे तेज त्यांच्यातील 'मार्तंड'रूपाचं दर्शन देतं. पण त्या तेजाची कधी कुणाला झळ बसली नाही, उलट त्यातूनच शेकडो, हजारो जणांची जगणी उजळत गेली. त्यांच्या या स्मृती मनात जपून त्या आधारे आपलं जगण अजून समृध्द करणं, राष्ट्रकार्यी लावणं यातूनच त्यांच्यातील चैतन्याला खरी आदरांजली होईल असं वाटतं.


सुमारे 1945 चा काळ असेल. त्या वेळच्या पुण्यातल्या एका रात्रशाळेत रात्र महाविद्यालयात शिकायला आलेला, आळंदीजवळच्या चऱ्होली गावात मूळ वास्तव्य असणारा एक काळासावळा पण तेज विद्यार्थी. शिकता शिकता एकीकडे वाडिया कॉलेजमध्ये शिपाई म्हणून, नंतर डी.ई. सोसायटीत कारकून म्हणून नोकरी करतो आणि पुढच्या 5 तपांमध्ये शिक्षणक्षेत्रात-संघटनक्षेत्रात 'ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व' अशी स्वतःची ओळख उभी करतो, हे किती विस्मयकारक पण तितकंच प्रेरणादायी आहे, नाही का?

कै.ती. राजाभाऊ लवळेकरांबद्दल लिहायचं, तर प्रथम डोळयासमोर येतो तो त्यांचा हा अद्भुत प्रवास. प्रश्न असा पडतो की मी त्यांच्याविषयी सांगायचं ते कुठल्या भूमिकेतून? पंचवीस वर्षं त्यांचा स्नेहमय सहवास आणि आधारछत्र मिळालेली सून म्हणून? ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक विचारांवर काम करताना त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून दिसलेल्या व्यापक शिक्षणतज्ज्ञाबद्दल? लहानपणापासून जो संघसंस्कार मी आवतीभोवती बघितला (आणि 'लोक इतके निर्मोही, समर्पित असू शकतात' याबद्दल वाटलेलं आश्चर्य!) तो कै. भाऊंच्या प्रत्येक विचार-कृतीतून मला दिसत आला, त्याबद्दल? इतक्या संस्था-संघटनांमघ्ये ताज्या दमाच्या कार्यकर्त्यांपासून मुरलेल्या-अनुभवी-प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांना ते ज्या सहजसंवादातून जिंकून घेत त्यााविषयी? कुठल्याही झगझगाटात कधीच न रमलेले भाऊ किती जणांच्या मनात प्रकाशत होते ते मोजताच येत नाही त्याबद्दल?

एखाद्या लोलकावर प्रकाशकिरण पडावा आणि त्यातून रंगाच्या शेकडो छटा दिसाव्यात, तसं भाऊंच जगणं! प्रत्येक रंग अस्सल आणि परिपूर्ण. या छोटयाशा लेखात त्यांच्या स्मरणांच्या अनंत छटांपैकी काही पकडण्याचा प्रयत्न करणार आहे.

ती. भाऊ तसं पाहिलं तर भावंडांमधले थोरले. (आक्का त्यांच्याहून वडील, पण भाऊ शाळेत असतानाच आक्कांचं लग्न झालं होतं.) त्यामुळे अगदी युवावस्थेपासूनच कुटुंबाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. चऱ्होली सोडून पुण्याला यावं लागलं. वाडिया कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करता करता एकीकडे रात्र विद्यालयात शिक्षण चालू होतं. भाऊ एक गमतीची गोष्ट नेहमी सांगत. ते आणि त्यांचे दोन निकटचे मित्र (हे अगदी खात्यापित्या घरचे सुस्थितीतले) एका तत्कालीन ज्योतिषाकडे मुद्दाम गेले. तिघांच्या पत्रिका नाव खोडून एकत्र करून त्यांना दिल्या आणि विचारलं की ''काय रिझल्ट लागणार एस.एस.सी.चा, ते सांगा.'' ते ज्योतिषी पत्रिका अभ्यासून भाऊंच्या पत्रिकेवर बोट ठेवून म्हणाले, ''हा मुलगा नक्की पास होणार'', दुसऱ्या पत्रिकेवर बोट ठेवू म्हणाले, ''हा पास होणार नाही.'' यावर भाऊ म्हणाले, अहो असं कसं होईल? हा चांगल्या घराच जातो, घरून खूप मदत आहे ह्याला आणि पहिल्या पत्रिकेमधील मुलाला काहीच मदत नाही हो. तो रात्रशाळेत शिकतोय. तुमची काहीतरी गफलत होत आहे.'' नंतर ते ही गोष्ट विसरूनही गेले. पण खरोखरच निकाल लागला, तेव्हा भाऊ व्यवस्थित उत्तीर्ण झाले आणि मित्राला पुन्हा परीक्षा द्यावी लागली. हे दोघं मित्र आणि भाऊ पुढचं सर्व आयुष्य, अंतिम श्वासापर्यंत सख्खे मित्र म्हणून जगले. पण त्या प्रसंगातून दिसते कै. भाऊंची जिद्द आणि लढाऊ वृत्ती. एकीकडे पदवीचं शिक्षण घेता घेता नवीन मराठी शाळेत कारकून म्हणून केलेलं काम, बी.एड. करून निभावलेलं अंतर्बाह्य शिक्षकपण, मुलांच्या सर्वंकष हितासाठी झटलेले त्यांच्यातले मुख्याध्यापक आणि निवृत्तीनंतरही असंख्य विद्यार्थ्यांना मिळालेलं त्याचं पितृतुल्य प्रेम आणि मानसिक-भावनिक आधार! केवढा पल्ला होता हा!

त्याचं 'आधारवड' असणं काही विलक्षणच होतं. रक्ताच्या नात्याचं त्याला बंधन नव्हतं. त्यांच्या नात्यातल्या कितीतरी जणांना त्याचं घर हक्काचं होतंच, तसंच इतरही कित्येकांना अडचणींच्या वेळी "Problem Solving"ला भाऊच लागायचे. त्यांच्या घराचा आणि मनाचा दरवाजा खरोखर सदैव सताड उघडा असे. माझं लग्न होऊन मी 'नवी नवी सून' बनून लवळेकरांच्या घरात आले. माहेरी माणसांचं येणं-जाणं होतं, पण इथली बातच निराळी होती. चहाचं पातेलं सदैव गॅसवर चढलेलंच असायचं! येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचं अगत्याने स्वागत! त्याच्या/तिच्या आवडीनिवडीप्रमाणे आतिथ्य! सुरुवातीला मला वाटलेलं दडपण घरात भाऊंनी-आईंनी जोपासलेल्या मोकळया वातावरणामुळे केव्हाच पळून गेलं आणि रात्री बारा-बारापर्यंत हात वाळवत गप्पा मारण्यात मीही तरबेज झाले.

न बोलता, न विचारता दुसऱ्याची गरज समजून घेण्याची भाऊंची सवय! 1995मध्ये एक मित्र नुकतेच सहकार नगरातल्या घरात राहायला आले, तेव्हाची गोष्ट. काकूंना गुडघ्याचा खूप त्रास होता. भाऊ आणि आई त्यांचं घर पाहायला गेले होते. अजून घरात काहीच सामान-फर्निचर नव्हतं. घरी परतल्याबरोबर भाऊंनी 'वहिनींसाठी' लोखंडी पलंग आणि जेवणाचं टेबल पाठवून दिलं. अशी मायेची पाखर त्यांनी अनेकानेक स्नेही-सोबती-विद्यार्थ्यांवर धरली. मी ज्ञान प्रबोधिनीत काम करते - मला शनिवारी सकाळी लौकर जावं लागे, तेव्हा कितीतरी वेळा आई नसताना मी घरी येईपर्यंत कुकर होऊन, स्वयंपाक तयार असे. माझ्यासाठी ओटयावर चिठ्ठी असे, '' मी बैठकीला जातो. जेवून घे बरं का!'' भाऊंच्या विशाल परिवारात कुठलाही छोटा-मोठा समरप्रसंग उद्भवला, तर तो सोडवायला भाऊंच्या कोर्टाशिवाय पर्यायच नसे. हे कोर्टसुध्दा कसं, तर थेट निवाडा न करता सगळयांनाच 'आपण काय प्रकारे विचार केला तर हा प्रश्न सुटेल?' हे अत्यंत मार्दवी पण ठाम शब्दात समजावून सांगणारे (खरं तर भाऊ 200% समुपदेशक पिंडाचे होते. जातिवंत आणि अंतर्बाह्य) कितीतरी वेळा अशी माणसं चर्चेला बसली की गमतीने आम्ही 'भाऊंचा दरबार बसला' असं म्हणायचो. पण ह्या दरबारातून प्रगल्भतेचं लेणं घेऊन किती जण आपल्याला आयुष्यात समाधानाच्या वाटेवर चालले असतील, ते आज प्रकर्षाने जाणवतं.

संघाचा, अन्य संस्था-संघटनांचा संसार करताना भाऊंनी कुटुंब व्यवहाराला आणि संसाराला कधी कमी लेखलं नाही. ती. आई टेलिफोन्समध्ये नोकरी करत असल्याने शिफ्ट्स असायच्या. दिवसभराचं सर्व काम संपवून रात्री बारा वाजता कित्येक वर्षं भाऊ त्यांना आणायला कँपमध्ये जायचे. मुलगा-जावई, मुलगी-सून हा भेद त्यांच्या शब्दकोशातच नव्हता. वरवर करारी, शिस्तीचे, अलिप्त वाटणारे भाऊ नातवंडांसोबत रमताना इतके 'मऊ मेणाहून' व्हायचे! त्यांच्या चुकांना 'अढीतला आंबा आहे गं अजून' असं म्हणून पोटात घालायचे. त्यांच्यासाठी गाणी रचायचे आणि म्हणायचेही! तरुणपणी कदाचित ते खूप वेळ देऊ शकले नसतील, पण ज्या आत्मीय भावनेतून आणि पूर्ण जबाबदारीतून त्यांनी सर्व नाती सांभाळली, त्यांचा परिपोष केला, त्यामुळे स्नेहमय नात्यांचा एक अक्षय कोषच तयार झाला, जो आज आमच्यासाठी अनमोल ठेव बनला आहे.

संघ आणि भाऊ हे तर अद्वैतच म्हणावं लागेल. वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी जडलेलं संघाचं-संघकार्याचं वेड अंतिम श्वासापर्यंत तितकंच कट्टर होतं. सुरुवातीच्या खडतर प्रवासातसुध्दा संघाच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या. पंचविशीत असताना जेव्हा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे पूर्णवेळ प्रचारक होणं केवळ अशक्य होतं, तेव्हा त्याच्या मनाची घालमेल बघून त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं, ''तुला एवढं वाटतंय ना, मग नोकरीचे आठ तास सोडून बाकीचा सगळा वेळ संघाला दे. घरात तुला आम्ही अडकवणार नाही.'' आणि खरोखरच पुढची कैक वर्षं भाऊंनी रात्रीची पाच-सहा तासांची झोप आणि आवरणं सोडलं, तर सर्व वेळ पूर्ण समर्पिततेने संघातल्या विविध दायित्वांना निभावलं. इतकंच नाही, तर संघाने जी जी अवघड-गुंतागुंतीची कामं सोपवली, त्यांना 'माझं हे काम कसं असेल?' असा प्रश्न मनातही न आणता शेवटापर्यंत पूर्ण केली. मग त्यात संघर्ष आले, अनेक ताणतणाव आले, कायद्याच्या किचकट गोष्टी आल्या...! पुण्यातील 'तरुण भारत' दैनिकाचं काम थांबवणं आणि त्याचे सर्व व्यवहार गुंडाळणं हे असंच आव्हानात्मक काम आणि तेसुध्दा निवृत्तीनंतर - अत्यंत चिकाटीने, संवादाचं सर्व कौशल्य पणाला लावून भाऊंनी शेवटाला नेलं! त्या वेळच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक कुटुंबामध्ये 'भाऊंचा शब्द अखेरचा' इतका स्नेह जोपासून!

पूर्व भागामध्ये काम करत असताना एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी भाऊंची चर्चा झाली. तिथल्या शाखेबद्दल बोलताना त्यांनी विचारलं,

''कशी चालू आहे शाखा?''

''छान! जेव्हा जेव्हा मी जातो, तेव्हा भरपूर संख्या असते.'' भाऊ म्हणाले.

''आणि एरवी?''

''एरवीचं फार माहीत नाही.''

''मग काय उपयोग अशा शाखेचा, जी तुमच्यावर अवलंबून आहे? तिथले स्थानिक लोक तयार व्हायला हवेत. तू नसतानाही शाखा चालायला हवी.'' भाऊ हा प्रसंग बऱ्याचदा सांगत आणि खरोखरत त्यांनी जे जे दायित्व घेतलं, तिथे नवे नवे कार्यकर्ते - स्वयंसेवक घडावेत, इतकंच नाही, तर त्यांनीच वेगवेगळया जबाबदाऱ्या घ्याव्यात यासाठीच सदैव प्रयत्न केले. त्यांचा व्यक्तिसंपर्क तर अफाट होताच, त्याचबरोबर समोरच्याच्या मनात उतरून मग विचारांचा खुराक देण्याचं त्यांच कौशल्य संघटन क्षेत्रात धडपडणाऱ्या माझ्यासारख्या कितीतरी नवशिक्यांना जिवंत Role Model वाटतं. 'असू आम्ही सुखाने पत्थर पायातील' या संघगीतातील भूमिकेशी ते खऱ्या अर्थाने एकरूप झालेले होते. लौकिक अर्थाने ते 'प्रकाशझोतात' (थोडक्यात प्रसारमाध्यमे-पुरस्कार-चमचमीत बातम्यांचे केंद्रबिंदू) कधीही नव्हते आणि तरीही त्यांच्या सहवासाच्या प्रकाशात जे जे आले, त्यांची अंतरं आपसूक उजळून गेली! अशा 'आत्मविलोपी' कार्यकर्त्यांची संघात वाण नाही, म्हणूनच तर हे काम अथकपणे सर्व अडथळे पार तरत वाढत आहे. भाऊंचं संघाशी तादात्म्य असं स्वरूपमय होतं. त्यांची हृदयशस्त्रक्रिया झाल्यावर जेव्हा त्यांनी कमी दगदग करावी असं घरच्यांनी सुचवलं, तेव्हा ते जरा वैतागले. त्याचं डॉक्टरांशी काय बोलणं झालं माहीत नाही, पण डॉक्टरांनी आम्हा सर्वांना बजावलं, ''त्यांना काम करता यावं म्हणूनच ही शस्त्रक्रिया केलेली आहे. तेव्हा त्यांना जे हवं ते करू द्या!'' आमची बोलती बंद! तळागाळातल्या स्तरावर दशकानुदशके काम करणारा संघ कार्यकर्ता हा संघकामाचा आधार. ती. भाऊंनी पुणे महानगर कार्यवाह या नात्याने केलेले अफाट काम याची प्रचीती आहे.

भाऊ म्हणजे संस्काराचं चालतं बोलतं विद्यापीठच. नुसत्या महज संवादांतून छोटया छोटया कृतींतून, एखाद्या समर्पक टिप्पणीतून, कधी इतिहासाचं मार्मिक दर्शन घडवून त्यांनी अनेकांना 'जीवनदायी शिक्षण' कसं असतं ते दाखवलं. इतकंच नाही, तर त्याचा अमिट ठसा समोरच्याच्या मनावर उमटवला. मला आठवतं, मी एखाद्या सामाजिक/सार्वजनिक कार्यक्रमात गेले आणि तिथे 'भाऊंचा' एखाद्या विद्यार्थी सापडला नाही असं घडलेलंच नाही. बरं, हे सर्व विद्यार्थी, 'कुणीतरी लवळेकर सरांचे' विद्यार्थी नसायचे. त्या प्रत्येकाकडे भाऊंची 'त्याची' अशी एखादी तरी खास आठवण असायची.

'मी दहावीत असताना अभ्यासाला घरी जागा नव्हती. अशासाठी सरांनी शाळेत संध्याकाळी उशिरापर्यंत अभ्यासिका सुरू केली. एका उद्योजकांशी बोलून चांगल्या टयूबलाईट्स बसवल्या. एवढं करून ते थांबले नाहीत, तर ते त्या अभ्यासिकेत स्वतः चक्कर मारत. मुलांवर लक्ष ठेवत. कुणाला काही अडलं, तर संबंधित शिक्षकांची मदत मिळवून देत.'

'त्यांना हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा ते एका समारंभात होते. मीच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. शुध्दीवर आल्यावर त्यांच्याकडे डॉक्टरांनी माझं कौतुक केलं. ते हसून म्हणाले, 'अरे, माझा प्रसाद (भाऊंचा मुलगा) बरोबर नव्हता तर काय झालं, 'आपला प्रसाद' (हा विद्यार्थी) होता ना!'

'मी 9वी फ मध्ये होतो, तेव्हा एकदा आमच्या वर्गातील मुलं खूप घाणेरडया शिव्या देत होती. सरांनी वर्गाबाहेर ऐकलं आणि वर्गात येऊन चकार शब्दाने न रागवता फक्त फळयावर सर्व शिव्या लिहून त्याचा संपूर्ण अर्थ शांतपणे समजावून सांगितला. त्यानंतर आमच्या वर्गात कुणीच ते शब्द परत उच्चारले नाहीत.'

भाऊंचे घरातले, कार्यक्षेत्रातले संस्कार असे होते. यातील काहीही त्यांच्या तोंडून कधीच ऐकायला मिळायचं नाही. पण त्यांच्या सहवासात आलेल्या जवळजवळ प्रत्येकाकडून असे अगणित अनुभव-संस्कार एकमेकांपर्यंत पोहोचत असत.

त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात जे अढळ स्थान मिळवलं, त्याबद्दल त्यांच्याशी कधी बोललं तर ते शांतपणे हसून सोडून द्यायचे. पण एकदा मात्र गप्पा मारताना त्यांनी आम्हाला जुनी आठवण सांगितली. 'सोसायटीचे जुने कागदपत्र पाहताना सोसायटीच्या इतिहासाचं एक बाड मिळालं. त्यात टिळक, आगरकर, चिपळूणकर या संस्थापक सदस्यांनी ही शाळा कशी उभारली, ते तपशिलात दिलं होतं. त्यात असं वर्णन होतं की मुलांना शिकायला बसल्यावर जमीन टोचू नये, म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर रोज सकाळी शेण गोळा करून वर्ग स्वतः सारवत असत. विद्यार्थ्यांसाठी - देशासाठी त्या पिढीने जे केलं, त्याची तुलनाच नाही. आमचं काम त्यापुढे किती क्षुल्लक आहे!' असं म्हणताना त्याचे भरून आलेले डोळे, रुध्द झालेला गळा आठवला की जाणवतं, त्यांची Role Models कशी होती आणि ते (आणि त्यांच्यासारखे अनेक जण) शिक्षक म्हणून कशी 'तपश्चर्या' करत होते ते!

भाऊंच्या आयुष्यात आदर्श आणि व्यवहार याची उत्तम सांगड - तीही कुठल्याही गाभ्याच्या तत्त्वांशी तडजोड न करता त्यांना कशी घालता आली, याचा मला खूप विस्मय वाटतो आणि त्यामुळेच तसं करत राहण्याच्या इच्छेला पाठबळही मिळतं. ('व्यवहार' याचा अर्थ इथे आदर्शांच्या स्वप्नरंजनात न रमता वस्तुस्थिती नीट लक्षात घेऊन आयुष्याचे निर्णय घेणं आणि तरीही स्वतःशी कायम प्रामाणिक, पारदर्शक राहणं असा आहे.) त्याच भूमिकेतून त्यांनी स्वतःचं अर्थकारण केलं, विविध संस्थांच्या पदांवरून काम करताना त्याच हित सांभाळायचा तत्त्वनिष्ठ प्रयत्न केला. मात्र ज्या क्षणी कुठे विरोधाभास वाटला किंवा स्वतःची वयाची/स्वास्थ्याची मर्यादा लक्षात आली, त्या वेळी अतिशय सहजपणे गुंतलेला पाय हलकेच काढूनही घेतला. पूर्ण आस्था ठेवून, लागेल त्या मदतीचं वचन देऊन. माझ्या मते 'परमार्थ' आहे तो हा! तो भाऊंनी अखेरपर्यंत निष्ठेने निभावला.

संघपरिवारातील अनेक संस्था-संघटनांना त्यांची जी पारख मिळाली, त्यामुळे अनेक जण अक्षरशः 'घडले'. संस्कार भारती, विद्या भारती, स्वरूप वर्धिनी, ज्ञानदा प्रशाला... अशी अनंत खाती त्यांच्या डोक्यात भिरभिरत असायची. प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटे, 'मी भाऊंशी केव्हाही बोलू शकतो, कधीही भेटू शकतो, माझ्या अडचणी भाऊंना नक्की कळतील, माझा आनंद भाऊंबरोबर वाटून घेतलाच पाहिजे...'


भाऊ हे अशा सर्व रचनांमधले खऱ्या अर्थाने Catalyst Leader होते. प्रक्रिया सुरू करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलायचा आणि स्वतः अलगद बाजूला व्हायचं! (अर्थात जबाबदारी डोक्यात ठेवून मगच.) त्यामुळे अडलेले निर्णय, धोरणांतील सुसंगती, व्यक्तीव्यक्तींमधील ताणे-बाणे असे असंख्य विषय त्यांच्याकडे यायचे. क्वचितच असं कधी झालं की या सगळया ऊहापोहानंतर भाऊंविषयी कुणाच्या मनात काही नाराजी किंवा कटुता राहिली. जी कधी राहिली, तीसुध्दा त्यांच्या एखाद्या फोनवरच्या ॠजू, मार्दवपूर्ण हाकेने धुतली जाई.

संस्कार भरतीमध्ये एकदा मोठा पेच उद्भवला. दोन प्रसिध्द कलाकार व्यक्तींची वादावादी झाली. त्यातील एकाने 'मी आता या व्यासपीठावर येणार नाही' असं जाहीर केलं. भाऊंमधल्या संघटकाला स्वस्थ बसवेना. दुसऱ्या कलाकार महोदयांना सांगून, सोबत घेऊन ते थेट नाराज झालेल्या महनीयांच्या घरी गेले, तेही त्यांच्या वाढदिवशी! अशा दिवशी प्रातःकाळी, वाद मिटवायच्या तयारीने समोर आलेल्या माणसांवर कसं रागवायचं? त्यांचा राग वितळून स्नेहाने त्याची जागा घेतली आणि शिवाय 'संस्कार भारती'च्या व्यासपीठाला त्यांचा कायमचा लोभ मिळाला! भाऊंची conflict resolution skills ही अशी होती.

असं म्हणतात की कर्तृत्व सिध्द करणाऱ्या छोटया छोटया गोष्टींतून आधी व्यक्तित्व (individuality) घडतं आणि मग जेव्हा स्वतःपलीकडे आपण इतरांचाही विचार करायला लागतो, तेव्हा 'व्यक्तिमत्त्व' (Persenality) विकसित होते. भाऊंच्या बाबतीत हे दोन्ही कायम हातात हात घालूनच झालं असणार. अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत स्वतःची क्षमता सिध्द करतानाच त्याचं समाजभान तितकंच प्रखर जागं राहिलं. घरातली कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावतानाही प्रत्येकाला स्वतःचा अवकाश (Space) मिळावा, याकडे त्याचं बारिक लक्ष असे. त्यामुळे कुठलाही विषय त्यांच्याशी बोलायचा संकोच वाटायचा नाही. 2013मध्ये त्यांचं एक गंभीर आजारपण झालं. त्यातून बरे होण्याच्या मार्गावर असताना मला एका दीर्घ अभ्यासदौऱ्यासाठी बाहेर जाण्याची वेळ आली.

मला ठरवता येत नव्हतं काय करावं ते? कामातील निकड म्हणून जाणं आवश्यक होतं, पण नुकत्याच आजारातून उठलेल्या भाऊंसाठी घरी थांबावं, असंही वाट होतं. मदतीची व्यवस्था होती, पण तरीही निर्णय होत नव्हता. शेवटी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली आणि म्हटलं, ''काय करू?'' भाऊ म्हणाले, ''निश्चितपणे जा. चांगल्या कामासाठी मी कधीतरी आडकाठी केली आहे का? छान दौरा पूर्ण करून ये.'' त्यांच्या त्या आश्वस्त शब्दांचं मोल ते नसताना आज आणखीनच तीव्रपणे जाणवतं. असा unconditional support - सहज-विनाअट आधार किती जणांना मिळत असेल?

भाऊ श्रध्दावान होते. परमेश्वरी शक्तीला - निसर्गातील देवत्वाला मानणारे होते. घरच्या देवाची पूजा करणं त्यांच्या आनंदाचा, तादात्म्यतेचा भाग होता. पण कुठलंही कर्मकांड त्यांनी कधीच मानलं नाही. जे त्यांना पटे, तेवढंच ते करत; पण दुसऱ्या कुणाला पटत नसेल, तर त्याचा तितक्याच औदार्याने आदर करत. किंबहुना भारतीय संस्कृतीमधील छोटया-मोठया उत्सव/सणांतील आणि पूजाविधींमागील शास्त्रीयता शोधण्याची आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्याचा अर्थ लावायचा, तो सुंदर, ओघवत्या भाषेत मांडायचा ही त्यांची आवडती गोष्ट होती. वटसावित्रीची कथा, चतुर्मासातील सणांचं पर्यावरणाशी असलेलं नातं, विविध दैवतांचं मानवी वृत्तीशी असलेलं साधर्म्य असे कितीतरी विषय त्यांच्या नित्य चिंतनाचे होते.

जे करायचं ते नेटकं, साक्षेपी वृत्तीने - मग ते कपडयांच्या घडया करणं असो की निवासी गृहसंकुलाचे हिशोब काटेकोरपणे देखण्या अक्षरात लिहिणं असो. रसिकतेने 'पाकिजा'सारखा चित्रपट पाहून त्यावर चर्चा करणं असो किंवा नातवंडासाठी छंदोबध्द, सुंदर शब्दांत जोजवणारं गीत लिहिणं असो! प्रत्येक क्षणात त्याची समरसता असे आणि तरीही पूर्ण अलिप्तपण कायम जागं असे!

त्याच्या सर्वच गंभीर आजारपणात त्यांच्यातील 'मार्तंड जे तापहीन' वृत्तीला जवळून बघायला मिळालं आणि एखादी कणखर पण अत्यंत स्नेहल व्यक्ती निकटच्या लोकांना अशा परिस्थितीतही किती शांतपणे समजून घेऊ शकते, ते कळलं. जवळच्या-लांबच्या स्नेह्यांना स्वतःच्या उदाहरणातून-संवादातून दिलेलं मूल्यांचं देणं, प्रखर राष्ट्रनिष्ठा, शिक्षणाबद्दलचं मूलभूत चिंतन, विद्यार्थी-कार्यकर्त्यांप्रती असलेला अपार स्नेह, संघकार्यामधील पूर्ण तद्रुपता असलेले कै. भाऊ आता आपल्यातच नाहीत. त्याचं जगण्यातील हे तेज त्यांच्यातील 'मार्तंड'रूपाचं दर्शन देतं. पण त्या तेजाची कधी कुणाला झळ बसली नाही, उलट त्यातूनच शेकडो, हजारो जणांची जगणी उजळत गेली. त्यांच्या या स्मृती मनात जपून त्या आधारे आपलं जगण अजून समृध्द करणं, राष्ट्रकार्यी लावणं यातूनच त्यांच्यातील चैतन्याला खरी आदरांजली होईल असं वाटतं.