सैराट

विवेक मराठी    27-Oct-2016
Total Views |

***मंगला गोडबोले****

''लग्न झालं तेव्हा...'' ताई एकदम मनाने मागेमागे गेल्या. पुढयात दाणेवाला वगैरे काही त्यांना दिसलंच नाही. लग्नानंतरची पहिली दहाबारा वर्षं खरंच अवघड गेली होती त्यांची. घर लहान. एकटे दादाच कमावते. आईवडील, तीन धाकटी भावंडं घरात. सर्वात मिळून एक जुनी स्कूटर, दादांच्या वडलांच्या स्कूटर कंपनीतल्या नोकरीमुळे त्यांना कधीकाळी सवलतीत मिळालेली. घरातल्या न्हाणीघरापासून ह्या स्कूटरपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सतत कोणाचा ना कोणाचा क्लेम लागलेला. स्कूटर कंपनी बंद पडल्याने घरी बसावं लागलं, म्हणून वडील नाराज आणि घरात आणखी गर्दी ह्या नव्या वहिनीमुळे झाली म्हणून दीर-नणंदा त्रासलेले. पुढे एकेकाची शिक्षणं संपणं, नोकऱ्यांचे शोध, साखरपुडे-लग्नं-पोरांची बारशी असे उपक्रम पाठोपाठ पाठोपाठ लागलेलेच!

 
सिनेमाचा खेळ संपला, तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. थिएटरबाहेर किंचितसा अंधार आणि गारवा यायला बघत होता. पण दिवसभराचं कामकाज आवरून घराकडे पळणाऱ्या चाकरमान्यांमुळे रस्ते नुसते गर्दीने भरून वाहत होते. किशोरने सिनेमाची तिकिटं काढून आणून दिली, थिएटरवर सोडायला गाडी दिली म्हणून ताई-दादा इथवर पोहोचले तरी होते. नाहीतर गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये सिनेमा-नाटकच काय, घटकाभर मजेसाठी घराबाहेर पडणंही त्यांना जमलेलं नव्हतं. ती सवयच सुटल्यासारखी झाल्याने गर्दीन पुरते बावचळलेले ते दोघं कसेबसे वाट काढत होते. 'डावीकडे बघा', 'तू भरभर चाल ना जरा', 'हळू ऽ... सिग्नल यायचाय अजून..' 'लक्ष कुठेय तुमचं?' ह्यासारख्या शब्दांमधून एकमेकांवर डाफरत होते. ताई जरा जास्तच! कारण सिनेमा संपल्यावर त्यांना घरी नेण्यासाठी गाडी द्यायला किशोर तयारच होता. पण दादांनी खोडा घातला. ''काही नको. अजून मला माझ्या घरी येता येतंय'' असं किशोरलाच सुनावलं. ते आठवून तेवढया गर्दीतही ताई पुटपुटल्या,

''मुलगा एवढा सोय करतोय, तरी आपण सुख अंगाला लावून घ्यायचं नाही... काय बाई तरी विक्षिप्तपणा!''

खरं तर हल्ली दादांना चांगलंच कमी ऐकायला यायला लागलं होतं. पण हे पुटपुटणं त्यांनी व्यवस्थित ऐकलं आणि उलट खेकसले, ''यायचं तर ये. नाहीतर राहा इथेच!''

कोपऱ्यावर रिक्षा स्टॅण्ड होता. त्या दिशेने वळण्याऐवजी दादा मुख्य रस्त्याकडेच जाताहेत, हे पाहिल्यावर ताईही आवाज चढवून म्हणाल्या,

''तरातरा चाललाहेत कुठे?''

''पलीकडच्या रामकृष्ण भवनमध्ये''

''तिथे कशाला?''

''मस्तपैकी डोसाबिसा खावा म्हटलं...''

''बाहेरचं खायला बंदी आहे तुम्हाला. डॉक्टरांनी निक्षून सांगितलंय...''

''लावलास नाट? मघाशी इंटरव्हलमध्ये वेफर्सपण खाऊ दिले नाहीस. नतद्रष्ट आहेस.''

''तुम्हालाच त्रास होतो ना?''

''मला सुख लागलं की तुला खरा त्रास होतो वाटतं.''

''अहोऽ असं काय करता?... मी काय म्हणते... बरं का.. अहो...''

ताईंच्या बोलण्याकडे जराही लक्ष न देता दादा सरळ रामकृष्ण भवनमध्ये जाऊन बसले. मग ताईंना पाठोपाठ जाणं भागच पडलं. हॉटेलातला हा कोपरा, ते टेबल, ती खुर्ची वगैरे करत करत दोघं एकदाचे स्थानापन्न झाले.

''एक घी डोसा मख्खन मार के'' दादांनी खुशाल आपली ऑर्डर देऊन टाकली. ताईच्या वटारलेल्या डोळयांकडे काणाडोळा करत.

''एवढा मोठा असतो हो तो. संपणारे का तुम्हाला?''

''ते बघू. अर्धा डोसा नसतं कोणी मागवत. तू काही सांगणार की मी कसा खातो ते बघत बसणार?''

''तुमच्या तोंडाकडे एकटक बघत बसायला तुम्ही म्हणजे त्या अर्चीचा परश्याच लागून गेलात की नाही?... हीच नावं होती ना त्या सिनेमातल्या हीरो-हिरॉइनची?... आजकाल नावं फार विसरते मी.''

''नावाचं सोड गं. डेअरिंग बघायची त्या पोरांची. हे ऑस्सं मॉणूस पॉहिजे बुवॉ जवॉनीत.'' दादा खुर्चीत सैलावत म्हणाले.

''हे अस्सं म्हणजे कस्सं?'' ताईंनी हसून विचारलं.

''बिनधॉस्त! घ्या हो, तुम्हीपण घ्या घी इडली वगैरे. डोसा टोचेल उगाच हिरडयांना, म्हणून म्हटलं...''

तार्इंचे निम्मे दात काढून झाले होते. तोंडातले खरे दात... खोटे दात... रिकाम्या जागा ह्यांच्याशी जुळवून घेताना त्यांचं खाणं हा 'युध्दाचा प्रसंग'च झालेला होता. पण आतापुरतं ते विसरून त्या म्हणाल्या, ''चालेल. इडली तर इडली. वेटर... एक प्लेट इडली लाव... जरा नरम बघ रे... आणताना...''

जरा वेळाने वेटर डोसा घेऊन आला, तेव्हा बशीमधली ती डोश्याची टेकडी बघून ताईंना बोलल्याशिवाय राहवेना. ''हे प्रकरण कधी, कसं संपवायचं हो? उगाच मी आणखी एक जिन्नस मागवला.''

''मागवलास ना? मग खा जमेल तेवढं. उगाच कीस नको पाडूस.''

''तरी पण... वाया?''

''एवढं आयुष्य वाया गेलंयऽ ते नाही थांबवू शकलो आपण. डोश्याचं काय घेऊन बसलात ताई? आता खाता चूपचाप? की भरवू?''

''काहीतरीच काय?''

''तो परश्या का फरश्या नाही भरवत तिला? पाहिलंस ना आताच!''

''अरे देवा... कुठे ते लोक... कुठे आपण... त्यात ही जागा, ही गर्दी, वाहता रस्ता, आपली वयं, कशाचातरी मुलाहिजा ठेवाल की नाही?''

''च्यक्''

''लोक हाकलून देतीक्बरं आपल्याला इथून.''

''नाहीतरी इथे कोण कायमचं राहायला आलंय? निघावं लागणारच एकदा ना एकदा.''

''बरं. पुरे. चालू द्या तुमच्या म्हातारचळ!''

''गाणं म्हणू? याड लागलं याड लागलं रं...''

''अहो ऽ आता करू तरी काय बाई?''

''गाणं ऐक. भरवू देत नाहीस, मग गाणं तरी ऐक. नाहीतरी मला वेड लागलंय असं तुला वाटतंच आहे नाऽ.. मग तेच मी गाण्यात म्हणेन. याड लागलं... याड लागलं रं...

ह्यावर आपण गप्प बसणं एवढाच उपाय असू शकतो, हे मनोमन पक्कं ओळखून ताईंनी भराभरा खायला सुरुवात केली. दादांनाही एकाच वेळी खाणं आणि गाणं शक्य नसल्याने त्यांनी गांण थांबवून पुढयातल्या डोश्याशी झटापट सुरू केली. जमेल तेवढे जिन्नस संपवून दोघं हॉटेलबाहेर पडले. रिक्षात बसतच दादांनी सूचना दिली, ''बीच पे चल!'' ताई चक्रावल्या.

''अहो आता घरी जायचं सोडून समुद्रकिनारी कुठे जाताय?''

''जाऊ या थोडा वेळ.''

''वारा सुटला असेल. तुम्ही मफलर नाही आणलेला.''

''मग तुझा पदर पांघरू का?''

''चला...''

ताई-दादा समुद्रकिनारी पोहोचले. आठवडी सुट्टीचा दिवस नसल्याने तिथे फार गर्दी नव्हती. भेळवाले, नारळवाले आपापसात गप्पा मारत होते आणि तुरळक जोडपी सोयीचे आडोसे घेऊन बसली होती.

''त्या पलीकडच्या पन्हाळीखाली बसायचं का?''

''तेवढया खोलात? वाकून बसायचं?''

''छान वाटेल तिथे. कोणाला दिसणारही नाही सहजासहजी.''

''अगदी भर गर्दीत चाळे केले तरी आता आपल्याकडे कोणी बघणार नाही. जळळं... लोकांच्या नजरा चुकवायला कंबरा का मोडून घ्यायच्या आहेत?''

''चल गं, तेवढीच मजा!''

''तुम्ही जा. मी समोरच्या उंच बाकावर बसते. तुमचं लपाछपी, बुवा-कुक् वगैरे खेळून झालं की या बाहेर.''

हो-ना करता दोघं बाकावर जाऊन बसले एकदाचे. ताईंना आता चांगलाच कंटाळा आला होता. केव्हा घरी जातो आणि पलंगावर जरा पडतब्ल्ल असं झालं होतं. हल्ली एवढया गर्दीची, आवाजाची सवयच राहिली नव्हती. दवाखाना, औषधं, डॉक्टर, लेक ह्यांच्या वाऱ्या सोडल्या, तर एरवी फार बाहेर जाणंही होत नसे. त्यांनी बाकावर बसल्या-बसल्या हात दाबून मान, पाठ चेपायला सुरुवात केली.

''दमलीस?''

''हुं.''

''हल्ली फार लवकर दमतेस तू. हे बरोबर नाही.''

''मग काय हे असं भुतासारखं बाकावर बसणं बरोबर आहे?''

''बसू ग घटकाभर. आज एवढं तरी जमतंय.''

''जमण्याचा प्रश्न नाही दादाऽ.. पणऽ मला काय वाटतं माहितीये का...''

''बोला ताईऽ''

पहिल्यापासून दादा कुटुंबात सख्ख्या-चुलत भावंडांमध्ये सगळयात मोठे होते. त्यामुळे धाकटी भावंडं आणि ओघाओघाने त्यांचे आईवडीलही त्यांना दादा म्हणायला लागले. असे ते गावदादा झाले. लग्न झालं, तेव्हा सगळे एकत्रच राहात. सगळयांसमोर एकमेकांना नावांनी हाका मारणं 'बरं दिसत नाही' असं मानलं जाई. म्हणून मग ''तुमचे दादा आले की जाऊ बाहेर'', ''दादांना विचारून घ्या'' असे उल्लेख लग्नाची बायकोही करायला लागली. दादांच्या आजीला घरात सगळे 'वहिनी' म्हणत असत. दुसरी वहिनी नको, म्हणून दादांची बायको घरादारासाठी 'ताई' बनली. दादाही चेष्टेने बायकोला 'ताई' म्हणायला लागले. अशी ताई-दादांची जोडी जमली ती जमीलच. ही संबोधनं इतकी फिट बसली की पुढे त्यांची नातवंडंही त्यांना 'दादा आजोबा' आणि 'ताई आजी' म्हणायला लागली.

''मग काय ताई? आवडला का सिनेमा?''

''ठीक आहे. तुम्हाला कसा वाटला?''

''त्रासदायक.''

''फार ढयाण ढयाण वाटलं का संगीत? म्हणून त्रास?''

''नाही गं, आपल्या वेळी हे असं काही नव्हतं, म्हणून चुटपुट लागली.''

''असं काही म्हणजे?''

''खुल्लमखुल्ला! काय टेचात म्हणजे ती पोरगी त्या पोराला - मलापण तू खूप आवडतोस. 'खूप' म्हणते का 'लई' म्हणते गं?''

''आगाऊपणा आहे नुसता!''

''का? तिला आवडत होता तो! मनाला आवडलं. तोंडातून पडलं. काय चुकलं? आपल्यासारखं मचूळ आयुष्य जगण्यापेक्षा हेच बरं की!''

''असं बेछूट वागलं की सगळयांनाच त्रास होतो. माहितीये? आपण आपल्या रीतीभाती पाळल्या. संस्कार जपले वेडवाकडं वागले नाही... भलतंसलतं बोललो नाही...''

''म्हणजे काय? नवराबायकोने एकमेकात बोलण्यात काय भलतं असणार? हक्काने भलतंसलतं बोलता यावं, म्हणून तर माणसं लग्न करतात ना?''

''मला नाही माहीत. पण आपलं सगळं पक्कं आठवतंय.''

''खारे दाणे घेऊ या? छान वास येतोय बघ त्याच्याकडच्या पेटलेल्या कोळशांचा!''

''लग्न झालं तेव्हा...'' ताई एकदम मनाने मागेमागे गेल्या. पुढयात दाणेवाला वगैरे काही त्यांना दिसलंच नाही. लग्नानंतरची पहिली दहाबारा वर्षं खरंच अवघड गेली होती त्यांची. घर लहान. एकटे दादाच कमावते. आईवडील, तीन धाकटी भावंडं घरात. सर्वात मिळून एक जुनी स्कूटर, दादांच्या वडलांच्या स्कूटर कंपनीतल्या नोकरीमुळे त्यांना कधीकाळी सवलतीत मिळालेली. घरातल्या न्हाणीघरापासून ह्या स्कूटरपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सतत कोणाचा ना कोणाचा क्लेम लागलेला. स्कूटर कंपनी बंद पडल्याने घरी बसावं लागलं, म्हणून वडील नाराज आणि घरात आणखी गर्दी ह्या नव्या वहिनीमुळे झाली म्हणून दीर-नणंदा त्रासलेले. पुढे एकेकाची शिक्षणं संपणं, नोकऱ्यांचे शोध, साखरपुडे-लग्नं-पोरांची बारशी असे उपक्रम पाठोपाठ पाठोपाठ लागलेलेच! ह्या सगळया धुमश्चक्रीत स्वत:शी खुलून बोलणंही जमत नव्हतं, एकमेकांत काय बोलणार? तेही भलतंसलतं? ताईंनी झटक्याने मान हलवली.

''कशाचा एवढा रागराग करत्येस?''

''राग कुठला? अगतिकता! इकडे तीन मुलं चांगली जाणती झाल्यावर तिकडे आपण स्वत:च्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो, तेव्हा कुठे स्वत:ची बेडरूम मिळाली!''

''काय उपयोग?''

''म्हणजे काय?''

''तोवर तुम्ही एकदम प्रौढ... जबाबदार... अनुकरणीय वगैरे मातामाउलीच होऊन बसलात ना...''

''माहितीये! फ्लॅटच्या कर्जाचे हप्ते द्यायला तुम्हीसुध्दा रोज रात्री त्या मारवाडयाच्या दुकानाचे अकाउंट्स लिहायचं काम करायचाच की! संध्याकाळी सातला नोकरीवरून यायचं, बकाबका जेवायचं की मारवाडयाकडे जायचं... रात्री अंथरुणाला पाठ ठेकायला अकरा वाजून जायचे आणि बोलण्याचंही त्राण नसायचं... असा ऽ संसार ऽऽ झाला ऽऽ''

''हे तुझं अगदी उगाच सबबी सांगणं. तुझ्यात मुळी ते नाहीच. नाहीतर ती सिनेमातली पोरगी बघ. खुश्शाल नवऱ्याला...''

''झालंय हे मगाशी बोलून.''

''तू मला कधी म्हटलंस का, तुम्ही मला फार आवडता, वगैरे वगैरे...''

''सगळं सारखं म्हणायला कशाला पाहिजे?''

''सारखं नसेल, पण कधीतरी, अधूनमधून, चुकूनमाकून म्हणायला काय हरकत आहे?''

''एवढे काळेभोर आणि दाट केस होते माझे. सगळा गाव वाखाणायचा. तुम्ही कधी केलंत कौतुक?''

''केसांचं काय कौतुक करायचं?''

''तुम्हाला रजा असली की मुद्दाम न्हाऊन, पाठभर मोकळे केस सोडून मी तुमच्या आवतीभोवती फिरायची. आता तरी हे बघतील... मग तरी हे बघतील... पण दृष्टीच नाही माणसाला.''

''आज म्हणतो... किती छान केस आहेत तुझे! झालं समाधान?''

''आता चार पांढऱ्या झिपऱ्या उरल्याहेत डोक्यावर... आता काय म्हणता कपाळ? चला ऽ... आणखी रात्र व्हायच्या आज घरी जाऊ.''

''घरी जाऊन भरून काढा कसर. चालेल?''

''आता?''

''मग कधी? पुढे वेळ मिळेल... न मिळेल...''

''बास. पुरे. चला.''

''येतो. पण एका अटीवर. घरी पोहोचल्यावर मी तुला रीतसर प्रपोज करेन.''

''रीतसर म्हणजे काय?''

''म्हणजे असा गुडघ्यावर बसून... एका हातात फूल घेऊन... ते तुला नजर करून...''

''समोर खड्डा आहे. बघून चला.''

''रसभंग करू नकोस गं. मी म्हणेन, तू माझ्याशी लग्न करशील का? तू म्हणशील, मला तुम्ही खूपखूप...''

''वैताग देताय. रिक्षाऽ... ओ रिक्षावाले काका...''

रिक्षाने दोघं घरी आले तोवर पुरते थकून गेले होते. समुद्रावर भणाणणारा वारा त्रासदायक होता. घरी नेहमी सोबतीसाठी ठेवलेली एक मुलगी, ह्यांना यायला उशीर झाल्याने निघून गेली होती. दरवाजा उघडणं, घरात शिरणं, दिवा लावणं, खिडक्या उघडणं ही कामंही ताई-दादांना कठीण वाटत होती. तरीही कशीबशी ती उरकून दोघं हाशहुश करत कोचावर समोरासमोर बसले. नैराश्याने ताई हलकेच म्हणाल्या,

''आता तुम्हाला काही खायचं प्यायचं नसेलच ना?''

''बोलायचंय.''

''काही नको. औषधं घ्या आणि झोपा गुपचुप.''

''मग ते प्रपोजचं काय होणार? पुढच्या जन्मी का करायचं?''

''मी घेईन हो समजून.''

''मला प्रपोज करायचंय आहे आज. ती पोरगी म्हणाली तसं म्हणतो हवं तर. मराठीत सांगून कळंना झालंय? इंग्लिशमध्ये सांगू?''

''परमेश्वरा... ह्या असल्या सिनेमांमुळे तरुण मुलं बिघडतात असं ऐकलंय. पण म्हातारेपण चळतात हे नव्यानंच बघत्येय.''

''तू इथे अशीच बसणार आहेस का?''

''का?''

''नाहीऽ म्हणजेऽ मला तुझ्या समोर उभं राहून गुडघ्यावर यायला जागा पुरेल की नाही ते बघत होतो.''

''ऐका... एक गुडघा आणि तसेच अडकून राहिलात तर राहा रात्रभर 'एक पाय नाचीव रे गोविंदा' करत. मी काही तुम्हाला उचलू शकायची नाही.''

''तू कशाला उचलत्येस? मी असं फूल पुढे करेन... फूल आहे का आता घरात?''

''फुलांवरून जंतू येतात घरात, त्यांचा संसर्ग नको म्हणून ताजी फुलं घरात येऊन देत नाही आपण गेले पुष्कळ दिवस.''

''मग राहू दे. त्या फ्लॉवरपॉटमधलं प्लॅस्टिकचं फूल घेतो.  तोच ताजा सुगंधी गुलाब आहे असं समज.'' दादांनी म्हटलं आणि तसंच कोपऱ्यापर्यंत जाऊन खिडकीतल्या जुन्यापान्या फ्लॉवरपॉटमधलं एक मळकं, ओबडधोबड प्लॅस्टिकचं फूल आणलं. कोचावरची एक छोटी उशी ताईंसमोर जमिनीवर ठेवली. ताईंच्या ''हे काय?'' ''ते कशाला?'' वगैरेंना जराही दाद दिली नाही. आपल्या रोडक्या पायांना, गुडघ्याला जमीन टोचेल म्हणून उशीचा आधार घेतला. दोनदा-तीनदा मागेपुढे करत. एकदाचा एक गुडघा त्या उशीवर टेकला. दोन्ही टेकणं शक्यच नव्हतं, म्हणून दुसऱ्या गुडघ्यात पाय नुसता वाकवला. पुढे झुकले आणि ते फूल ताईंसमोर धरत म्हणाले,

''वासंती ऽ...''

''अगोऽऽ बाईऽऽ तुम्हाला माझं नाव आठवतंय?''

''मग? तू काय मला अगदीच 'हा' समजलीस की काय? तर प्रिय वासंती, मला तू फार म्हणजे फारच आवडेतस तर बुवा तू म्हणजे माझ्याशी आपलं एक लग्न बिग्न...'' ताईंचे डोळे भरू लागले. दादांचा आवाज कापला. घणघण फोनची घंटा वाजली. अलीकडे घरी फोन फारसा येत नसे. मुलं आळीपाळीने भेटून जात. पण नेमका आता फोन आला. दादा समोर अवघडत उभे असल्याने ताईंना उठून तो घेणं शक्यचं नव्हतं. त्यामुळे दादांनाच धडपडत, इकडे तिकडे आधार घेत फोनपर्यंत जावं लागलं.

''हॅलोऽ'' ते मोठयांदा ओरडले.

''कोणाचा फोन आहे?'' ताईंनी विचारलं. दादांनी त्यांना हाताने थांबवण्याची खूण केली. हलू नकोस, पुरं व्हायचंय वगैरे सूचनाही केल्या. मग खूप वेळ ते हलके हलके बोलत राहिले.

''हो का? असं म्हणताहेत का ते?... पण तो दुसरा तर म्हणाला होता... काय माहिती? आपल्याला काही कळत नाही. बघ नारे... हा विश्वासाचा आहे म्हणतोस? असेल बुवा... किती दिवस? सांगता येत नाही का?... बरं तर मग... अरे नाही... सिनेमा संपल्या संपल्या सरळ घरी आलो नाही आम्ही... हं... असंच जरा इकडेतिकडे... हो ना... हो... पाहायचं... तयारी काय करायचीये आता? बघतो... तू लवकर येणार म्हणतो मदतीला?... बघ जमलं तर... नाहीतर पुढचं पुढे... हं... आता काय... सगळे दिवस अन् वार सारखेच आम्हाला... हो... झोपतो लवकर... झोपेची गोळी ना?... अर्धी?... नाही ऽ संबंध... घेतो. चालेल... कळव मग... गाडी कधी पाठवतोस ते... आता ना? काय करणार ह्या वेळी आम्ही? झोपण्याची तयारी न् काय... चालेल... हो हो... भरतो नीट... राहातो, तयार राहातो... सगळया फायली नीट आणतो... गुडनाईट ना?... हो... गुडच म्हणायची. तू झोप शांत.'' दादांनी बोलणं संपवलं. शांतपणे फोनचा रिसीव्हर झाली ठेवला. तोवर ताईंचा तिथे दम निघत नव्हता. त्या उठून लडबडत त्यांच्या मागे येऊन उभ्याच होत्या.

''कोणाचा फोन होता?''

''किशोरचा.''

''ह्या वेळी?''

''हो. तो संध्याकाळपासून करत होता.''

''काय एवढं ठरवत होतात बापलेक?''

''उद्या सकाळी ऍडमिट व्हायचंय वाटतं.''

''काही करायचं नाही असं ठरलं होतं ना?''

''हो.''

''मग आता कशाला?''

''किशोरचा तो कॅन्सर स्पेशलिस्ट मित्र म्हणतोय म्हणे... तो परदेशी कॉन्फरन्सला जाण्यापूर्वी एकदा माझं पोट उघडून बघता येईल.''

''तो काय कपाटाचा कप्पा आहे उघडायला?''

''अरेच्चा! मागचा डॉक्टर काही उपाय करणं शक्य नाही म्हणाला होता, तरी तू रागावलीस. हा एक ट्राय मारायचा म्हणतोय, तरी तू रागावतेस.

''हाल होतात ना जिवाचे?''

''मग काय त्या थिएटरला गेल्यासारखं वैकुंठात जायला मिळणारे?''

''आता काय करायचं?''

''करायचं काय? जायचं उद्या. उपाशीपोटी. दिवसभर शंभर यंत्रांखाली झोपायचं. हजार सुया टोचून घ्यायच्या की परवा सकाळी कापाकापी. पोटातलं ते गाठोडं सुटं बाहेर काढण्यासारखं असलं तर काढणार. नाहीतर...''

''नाहीतर काय?''... ताईंनी एकदम त्यांचा दंड धरत विचारलं. त्यांनी नुसताच ताईंचा हात थोपटला. जरा सावरून ताई म्हणाल्या,

''किती दिवस राहणं पडेल?''

''कुठे?''

''हॉस्पिटलात हो.''

''असं का? मला वाटलं, ह्या जगात.''

''नका ना हो असं बोलू.''

''बरं. मग मघाचंच परत सुरू करू या, तेव्हा त्यालाही तुझी हरकत होती. तू तुझी पोझिशन घे. मी माझी घेतो. दोघं मिळून म्हणायचं का? झिंग झिंग झिंगाट...''

दादा बेसूर गायला लागले. ताईंनी मोठ्ठा हुंदका दिला. दोन्ही आवाज एकमेकांत मिसळून गेले.

9822498225

mangalagodbole@gmail.com