माझी आनंदयात्रा

विवेक मराठी    27-Oct-2016
Total Views |

****शशिकांत सावंत***

 1996-97नंतर मी महानगरची नोकरी सोडली आणि जवळपास पूर्ण वेळ पुस्तके विकू लागलो. आणखी मी एक काम केले, ते म्हणजे एक शिपाई ठेवला. पुस्तके पोहोचवण्यासाठी. नंतर वेगवेगळया लोकांनी हे काम केले. अमित कुंभार असेल, अगदी श्रीकांत आगवणेसारखा दिग्दर्शक असलेल्या माझ्या सहकाऱ्यांनी हे काम केले आहे. त्याचा एक फायदा असा झाला की कोणाला पुस्तक हवे असेल, तर ते घरपोच किंवा त्याच्या ऑॅफिसात मिळू लागले. यामुळे सर्वांना माझी माहिती मिळत असे आणि लोक पुस्तके नोंदवत.


1982 साली मी कीर्ती महाविद्यालयात होतो. बारावीत शिकत होतो. बहुतेक जण त्या वेळी आय.आय.टी.ची तयारी करत असत. आय.आय.टी. एंट्रन्ससाठी प्रसिध्द पुस्तक होते, ते तीस रुपयांना मिळायचे. एक दिवस रस्त्यावर मी ते सहा रुपयांना पाहिले. अनेक मित्रांना ते हवे होते. एका मित्राला मी विचारले, ''तुला कितीला परवडेल?'' तो म्हणाला, ''अकरा रुपये.'' मी त्याला ते आणून दिले आणि मला पाच रुपये मिळाले. तेव्हा पाच रुपयात भरपूर जेवण यायचे. चहा आठ आण्यात यायचा आणि पंधरा रुपयांत महिन्याचा रेल्वेचा पास यायचा. या छोटयाशा प्रसंगातून मला एक-दोन गोष्टी कळल्या. सहज जाताजातादेखील पैसे कमवता येतात. फक्त तुम्हाला पुस्तकांची माहिती हवी. त्यानंतर मग मी रद्दीतून अनेक पुस्तके घ्यायचो. पण ती कोणाला विकायची ते मला आजच्यासारखे माहीत नव्हते. ती मी लायब्ररीमध्ये विकायचो. जेम्ससारखे पुस्तक एक रुपयाला मिळायचे. मी ते लायब्ररीत दोन-तीन रुपयांना विकायचो किंवा पाच रुपयांना. पी.जी. वूडहाउसची पुस्तके एक माणूस वाशीमध्ये पंधरा रुपयांना विकत घेत असे. ती रद्दीमध्ये आठ आणे, एक रुपया, दोन रुपयांना मिळत. पंचचे अंक पाच रुपयांना मिळत. मला व्यंगचित्रे काढायची होती, म्हणून मी पंचचे अनेक अंक जमवले. नंतर नंतर माझ्याकडे पाच-सहा वर्षांत मिळून शेकडो अंक तयार झाले. ते मी रद्दीत न टाकता वाशीच्या वाचनालयात देऊन टाकले. मी हे जयराजला विचारले, तर तो म्हणाला की ''आपण राजला विचारले असते.'' जयराजने राज ठाकरेला त्या अंकांबद्दल विचारले. राज ठाकरे यांना हवे होते म्हणून वाचनालयातून परत आणले. वाचनालयात कोणी तो गठ्ठा उघडला नव्हता. ते सारे अंक राजने सहा हजार रुपयांना विकत घेतले. बारावी झाल्यानंतर मी तीन वर्षे डिप्लोमा केला दहावीच्या मार्कांवर. अभ्यासात फार लक्ष नव्हते. मी वाचनालयात बराच वेळ वाचन करत असे. अगदी 'केअर'सारखे आरोग्यविषयक मासिकही मी वाचायचो. 'हाऊ टू स्टडी'सारखी पुस्तके वाचली. इंग्लिश चांगले व्हावे म्हणून थ्रिलर वाचायचो. झेन ऍंड ऑॅफ आर्ट मोटारसायकलसारखे जड पुस्तकही वाचायाला घेतले. हा सारा काळ इंग्लिश चाचपडत वाचण्याचा होता. नंतर पूर्ण वेळ काम करण्यासाठी महाडला गेलो. या कामात बराच वेळ मिळत असे. प्रवासही व्हायचा. प्रामुख्याने मी चालत्या बसमध्ये पुस्तके वाचायला शिकलो. परत आल्यानंतर काही काळ नोकरी केली, पण कंटाळलो. नोकरी नव्हती. पोट कसे भरायचे हा प्रश्न होता. हळूहळू काही पत्रकारांच्या, लेखकांच्या ओळखी झाल्या. व्यंगचित्र काढायला निखिल वागळे यांच्याकडे गेलो. त्यांना एकदा सेल्बन या पत्रकाराचे इंदिरा गांधी यांच्या काळावरचे 'आय ऑॅन इंडिया' पुस्तक दाखवले. ते त्यांनी वीस-पंचवीस रुपयांना विकत घेतले. तेथेच प्रशांत कुलकर्णी भेटले. त्यांनी व्यंगचित्राची काही पुस्तके मागवली. विवेक मेहेत्रेबरोबर मी काही काळ काम करत होतो. त्यांनी विनोदांची, व्यंगचित्राची बरीच पुस्तके माझ्याकडून विकत घेतली. त्याच काळात आचार्य अत्रेंची सही आणि शिक्का असलेली दोन पुस्तके माझ्या हाती लागली. पण विवेक आणि त्याच्या बहिणीच्या भांडणामध्ये ती पुस्तके अडकली आणि माझ्या हातून गेली. वाशीमध्ये मी स्पेस सेलिंग करू लागलो. छोटया-छोटया पेपरसाठी मी जाहिराती घ्यायचो. हे काम फार कौशल्याचे नव्हते. काही काळ छपाईचे काम केले. माझा मित्र मोहन याच्याबरोबर पण स्पेस सेलिंगचे काम सूट होणारे होते. मग त्या काळात मी 'पत्रकारांना पाच पुस्तके दीडशे रुपयांत' अशी एक योजना सुरू केली. माझ्या अनेक मित्रांनी त्याला प्रतिसाद दिला. आता माझे छोटेसे वाचनालय सुरू झाले. 1990-91ची ही गोष्ट आहे. त्याच सुमारास माझा भाऊ वरळीला राहायला गेला आणि मी स्वतंत्र राहू लागलो. आता इथे मात्र पुस्तकांचा गठ्ठाच्या गठ्ठा तयार होऊ लागला आहे. दर दिवशी काही पुस्तके आणायचो. खर्च सुसह्य व्हावा म्हणून पेइंग गेस्ट ठेवले होते. माझा पेइंग गेस्ट चक्क माझ्यावरच चिडायचा. म्हणायचा, ''अरे, तू किती पुस्तके आणतोस? पुस्तकावर पुस्तके रोज घेऊन येतोस.'' त्यामुळे अनेकदा मी पुस्तके मागे लपवून दार ठोकायचो. मग एकदा तो मला म्हणाला, ''मी माझ्या आईला म्हटले, तर आई म्हणाली - किती झाले, तरी त्याचे घर आहे.'' त्यावर मीही मनात म्हटले, ''हो! हे माझेच घर आहे. मी ती गोष्ट विसरत चाललेलो.'' पुस्तके ठेवायला रॅक नव्हते, त्यामुळे एकावर एक पुस्तके ठेवायचो. त्या काळात मी वाचलेला पहिला सर्वात महत्त्वाचा लेखक म्हणजे जॉन शिवर. जॉन शिवरची 'गुड बाय माय ब्रदर' ही कथा वाचली. तिने मला झपाटून टाकले. तिची मी अनेकदा पारायणे केली, आजही करतो. दर वेळी त्या कथेत काहीतरी नवीन सापडते. चाळीस-पन्नास पानांची ती दीर्घकथा आहे, पण तिचा अवाका एखाद्या कादंबरीइतका आहे. माणसाचा सिनिसिझम हा तिचा विषय आहे. बेटावर सुट्टी घालवायला गेलेला नायकाचा भाऊदेखील तिथे येतो आणि सतत तक्रारी करत राहतो. थोडीशी वाईन पिणाऱ्या आईबद्दल तो म्हणतो - ती दारुडी होत चालली आहे. घराला तडा पडलाय, तर तो म्हणतो घर पडणार आहे? असे प्रत्येक गोष्टीत नकारात्मक बोलणारी माणसे आजही आपल्या आजूबाजूला दिसतात. किंबहुना मीही कधीकाळी या मानसिकतेतून गेलोय. तर या नकारात्मक माणसांचे काय करायचे? जॉन शिवरचा नायक फार सुंदर म्हणतो की गर्दीत ही माणसे कुठेतरी दिसतात. जॉन शिवरची आणखी एक कथा फार सुंदर आहे. एका स्त्रीने घेतलेल्या सूडाबद्दलची. या साऱ्या कथा वाचताना मला जाणवू लागले की पाश्चात्त्य साहित्याचे एक मोठे दालन माझ्यासमोर खुले होत आहे. त्यासोबत मी अनेक नवे नवे ग्राहक मिळवत होतो. उदा. - प्रसिध्द होमिओपॅथी डॉक्टर ढवळे यांना मी पुस्तके विकायचो. शिडया चढून मी त्यांच्या दवाखान्यात जायचो. दवाखाना संपल्यावर सात-आठ पुस्तके नेलेली ते पाहायचे आणि त्यातली दोन-तीन विकत घ्यायचे. 1993-94 साली आधी जाहिरातीचा अनुवादक म्हणून आणि मग पत्रकार म्हणून मी महानगरमध्ये नोकरी करू लागलो. या काळात बरीच पुस्तके महानगरला विकायचो. त्याचे बिल करायचो आणि त्याचे मला पैसे मिळायचे. कधीकधी पगार खर्चही व्हायचा नाही. पगार तुटपुंजाच होता. आधी दीड हजार, मग एकवीसशे रुपये. तरीही पूर्णच्या पूर्ण पगार बाजूला पडायचा. महानगरच्या खाली रद्दीवाल्याचे एक दुकान होते. तिथून पुस्तके घ्यायचो. जवळच एक छान रद्दीवाला होता, तिथून नॅशनल जिओग्राफिकचे, पंचचे अंक मिळायचे, ते घ्यायचो. त्याच्यासमोर आणखी एक रद्दीवाला होता. तो खाली पुस्तके लावायचा. कधी खूप कंटाळा आला, तर दादरपर्यंत चालत जायचो. तिथे पुस्तकांची दोन दुकाने होती. त्यातले एक आजही आहे, एक बंद झाले.

1996-97नंतर मी महानगरची नोकरी सोडली आणि जवळपास पूर्ण वेळ पुस्तके विकू लागलो. आणखी मी एक काम केले, ते म्हणजे एक शिपाई ठेवला. पुस्तके पोहोचवण्यासाठी. नंतर वेगवेगळया लोकांनी हे काम केले. अमित कुंभार असेल, अगदी श्रीकांत आगवणेसारखा दिग्दर्शक असलेल्या माझ्या सहकाऱ्यांनी हे काम केले आहे. त्याचा एक फायदा असा झाला की कोणाला पुस्तक हवे असेल, तर ते घरपोच किंवा त्याच्या ऑॅफिसात मिळू लागले. यामुळे सर्वांना माझी माहिती मिळत असे आणि लोक पुस्तके नोंदवत. उदा., आज मित्र असलेल्या एकाला माझा नंबर क्रॉसवर्डमधून मिळाला. तेव्हा क्रॉसवर्ड महालक्ष्मीला होते आणि कोणालाही जुने किंवा दुर्मीळ पुस्तके मिळत नसल्यास ते माझा पत्ता देत. शिवाय पुस्तकातल्या लोकांना हळूहळू माझी माहिती होऊ लागली. त्यातच आमीर खान माझ्याकडून पुस्तके घेत होता. ही माहिती - कशी का होईना, पण जगजाहीर झाली. हळूहळू विशाल भारद्वाजसारखा सेलिब्रिटी असेल, विश्वास पाटील यांच्यासारखे लेखक असतील, बर्वे, प्रभाकर कोलते यांसारखे चित्रकार, लक्ष्मण श्रेष्ठांसारखे चित्रकार अशी वेगवेगळया क्षेत्रातील माणसे पुस्तके घेऊ लागली. त्यातच राजीव श्रीखंडेशी माझी मैत्री झाली. राजीवकडे आज दहा हजारच्या वर पुस्तके आहेत. तेव्हाही चार-पाच हजार असावीत. तो माझा एक नियमित वाचक आणि क्लायंट बनला. अनेक वेगवेगळया लेखकांची नवे तो सांगत असे. उदा. - हिसालो शावो, जी मला माहीतही नसत. पण ती पुस्तके मिळाली की ती मी घेऊन टाकत असे. आता माझ्या खरेदी-विक्रीची एक पध्दत बनली. स्वत:ला हवी ती पुस्तके विकत घ्यायचीच, पण अमुक पुस्तक कोणाला लागू शकेल असा विचार करून ते विकत घ्यायचे. म्हणजे विजय तेंडुलकर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, मी उच्च गणितावरची पुस्तके वाचतोय, तर मी गणितावरची पुस्तके घेतली. खरे तर तेंडुलकरांशी माझा परिचय नव्हता. पण मी एक त्यांच्या घरी धडकलो ते गणिताचे पुस्तक घेऊनच. गौतम राजाध्यक्षशी तसे एक-दोनदा फोनवर बोलणे झाले होते. एकदा मला सेक्सील ग्रेटाचे पुस्तक मिळाले. हे पुस्तक पन्नास-शंभर रुपयांना मिळाले होते. मी मौजेत घेऊन गेलो, कारण त्याला मुखपृष्ठ नव्हते. माधवराव भागवतांना विनंती केली की याला जरा चांगले कव्हर घालून द्या. त्यांनी छानपैकी काळा डार्क पेपर घालून त्या पुस्तकाला सजवले आणि मग ते पुस्तक गौतम राजाध्यक्ष यांच्याकडे ठेवले. नंतर त्यांचा फोन आला - खरे तर मी नावही सांगितले नव्हते, पण ते एवढेच म्हणाले की ''अरे, हे पुस्तक पाहिल्यावर मी ओळखले की शशिकांत सावंत हे ठेवून गेला असणार.'' बाहेर त्या पुस्तकाची किंमत खूपच होती. तेव्हा गूगलवरून किंमत काढता येत नसे. पण साधारण छायाचित्रावरची दुर्मीळ पुस्तके हजार-दीड हजारला पडत. ते पुस्तक मी बाराशेला विकले आणि गौतम राजाध्यक्ष यांनी ते हसत हसत विकत घेतले. त्यानंतर गौतम राजाध्यक्ष यांनी इतर अनेकांप्रमाणेच मला ब्रीफ दिले की ते काय वाचतात. त्यांनी म्हटले की राणी एलिझाबेथ पूर्ण इतिहासात एखाद्या फल्क्रमसारखी होती. म्हणून एलिझाबेथ संदर्भात कायम सर्वकाही वाचतो. प्रामुख्याने मी इतिहास आणि संगीतावरची पुस्तके वाचतो. मग मी त्यांना अनेक पुस्तके दिली. संगीतावरच्या पुस्तकांची एक मालिका होती केम्ब्रिजची, जी निळया-पिवळया रंगात येत असे. त्याच्यातील एक मालिका रोमँटिसिझमवर, तर एक परिचय करून देणारी होती. गौतमना मी एवढेच म्हटले की ''ही परिचय करून देणारी पुस्तके आहेत'' तर ते म्हणाले, ''अरे, तिथली परिचय करून देणारी पुस्तके म्हणजे आपल्या दृष्टीने वरची पुस्तके.'' त्यांनी तिथली दोन-तीन पुस्तके घेतली. एक पुस्तक कंडक्टरवरही होते. त्या काळात मुंबईमध्ये विशिष्ट पुस्तके मिळत. उदा. - पुस्तकांचा एक सेट होता तो अत्यंत स्वस्त, म्हणजे दहा-वीस रुपयाला एक पुस्तक असा मिळत असे. ठरावीक लेखक होते आणि ठरावीक पुस्तके होती. ही पुस्तके बहुधा लॉटमध्ये आलेली असावीत. पण त्याच्यातच कधीतरी एखादे वेगळे पुस्तक मिळायचे. डेबोनेअरमधली काही मंडळी माझी मित्र झाली. डेबोनेअरमध्ये आदिल जेसावालाशी माझी भेट झाली. आदिलने मला अनेकांच्या ओळखी करून दिल्या. हेरी पिंटो, विजय नंबिसन हे लोक तिथेच भेटले. आदिल जेसावालासाठी मी व्यंगचित्रावरची मी काही पुस्तके दिली, ज्याच्यात मेल कालमनचे पुस्तक होते. त्याने फ़्रेंच लेखकाचे 'स्टोरी ऑॅफ ऍन ओ' हे एरॉटिक मानले जाणारे एक पुस्तकही दिले. मग मी ते पुस्तक विकत घेतले. माझ्या लक्षात आले की अनेक देशांत एरॉटिक लेखन बॅन आहे. आपल्याकडे अनेक पुस्तके बॅन आहेत. त्यामुळे ती पुस्तके मिळत नाहीत. प्रामुख्याने ऑॅलिम्पिया प्रेसची पुस्तके होती आणि ही फारच दुर्मीळ होती. फोर्टमधला एक माणूस ती पाहताक्षणी शंभर रुपयांना घेत असे व नंतर त्याच्याकडचे प्रत्येक पुस्तक चारशे-पाचशेला विकत असे. त्याला इंग्लिश येत नव्हते. असे कितीतरी विक्रेते माझे मित्र झाले. त्यांचे वैशिष्टय लक्षात आले, ते म्हणजे त्यांना इंग्लिश येत नाही, पण त्यांना पुस्तके बरोबर कळतात. एक दिवस बर्लिनचे जॉन ग्रे पुस्तक मी मागितले. त्यांनी ते सहाशे रुपये सांगितले. मी म्हटले की सहाशे रुपये खूपच जास्त होतात. त्यावर ते म्हणाले, ''साहेब, जॉन ग्रेचे पुस्तक आहे.'' असाच एक जण कॉल पॉपरचे पुस्तक रस्त्यावर सोळाशे रुपयांना विकत होता. पुस्तकाचे नाव होते 'ऑॅल लाइफ इज प्रॉब्लेम सॉल्व्ह'. मी मॅक्समुलर भवनमध्ये त्याची नोंद केल्यावर त्यांनी ते विकत घेतले. पण ते पुस्तक आजही मला मिळत नाही. इतकेच निरंजन राजाध्यक्षसारख्या माझ्या मित्राने ती मागणी नोंदवली आहे. निरंजनवरून मला आठवण झाली - हळूहळू मुंबईमधले सारेच संपादक माझ्याकडून पुस्तके घेऊ लागले होते. मित्र झाले. आकार पटेलने तर माझ्याकडून शेकडोंनी पुस्तके घेतली. आकारमुळेच मिड डेमध्ये माझी मुलाखत आली. 'चलो मुंबई डॉट कॉम'वर असल्याने ती फारशी वाचली गेली नाही. परंतु खाडिलकर या मित्राने अत्यंत चांगली मुलाखत घेतली होती. त्यानेच गिरीश टकलेंशी माझा परिचय करून दिला. गिरीश टकले हे माझे असे क्लायंट आहेत, ज्यांची कीर्ती लोकांना माहीत नाही, पण कळायला हवी. त्याच्याकडे दहा हजार पुस्तके आहेत. राजीव श्रीखंडेंप्रमाणे अत्यंत चिकित्सक वाचक आहेत. मात्र प्रसिध्द टकले ज्वेलर्समधील ते बंधू असल्यामुळे त्यांचा सारा वेळ धंद्यात आणि व्यवसायात जातो. त्यातूनही ते शेकडो पुस्तके कसे वाचतात हे त्यांचे त्यांनाच माहीत. त्यांचा सिनेमाचाही व्यासंग आहे. पुस्तकांमुळे अनेकांशी माझी मैत्री झाली आणि त्यांच्याकडून मला कितीतरी गोष्टी कळत गेल्या. उदा. - मला एकदा टकले म्हणाले की, ''एक प्रसिध्द आक्रमक होता. तो विंध्य पर्वताच्या अलीकडचा मोठा आक्रमक मानला जातो आणि टायच्या इतिहासात सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. आणि ऑॅक्स्फर्डच्या भारताच्या इतिहासात त्याचे नावही लिहिलेले नाही.'' अशा प्रकारचे इनसाईट मला चांगल्या वाचकांकडून मिळाली आहे. नरेश पाटीलसारख्या मित्राने किरण खलपसारख्या मित्राशी माझी ओळख करून दिली. किरण खलपच नव्हे, तर त्याचे सगळे कार्यालय हे वेगवेगळया विषयांवरच्या समृध्द करणाऱ्या पुस्तकांनी भरलेले आहे. साहजिकच किरण खलपला मी जाहिरात क्षेत्राबरोबरच इतर अनेक पुस्तके दिली. आता माझे क्लायंट ही चांगलेच वाढले होते. अरुण खोपकर असतील, शांता गोखले असतील, लीला भागवत असतील, अगदी किशोरी आमोणकर यांना संगीताची डिक्श्नरी भेट दिलेली आहे. वेगवेगळया क्षेत्रातील मंडळींशी माझा परिचय झाला. राजीव श्रीखंडेचा मित्र रवींद्र श्रीखंडे हा इंजीनिअर आहे. त्याचा मुलगा वयाच्या पंचविसाव्या वर्षी मरण पावला, तेही लग्न होऊन सात महिने झाले असताना. या संदर्भात मला एक गोष्ट सांगायची आहे की पुस्तके खरच कुठल्याही दुख:चा निवारा करू शकतात का? त्यांच्यामध्ये हीलिंग ताकद असते का? माझ्या मते याचे उत्तर 'होय' असे आहे आणि अनेकदा ते मला मिळाले आहे.

मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की ही सारी पुस्तके तुम्ही कुठून घेता? याचे निश्चित उत्तर नाही. एकेकाळी न्यू ऍंड सेकंडहँड पुस्तकांच्या साध्या बुक स्टॉलसारखे दुकानाचे स्वरूप होते. अगदी तळवळकरही तिथे पुस्तके घेताना दिसत. मानकामे नावाचे पुस्तकाची समग्र माहिती नसलेले विक्रेते मॅनेजर होते. पण अनेकांना तेच दुकानाचे मालक वाटत. तर इथे स्वस्तात चांगली पुस्तके मिळत. दुर्मीळ पुस्तके मात्र महाग मिळत. स्वत: मानकामे नेहमी भारतावरची पुस्तके मागत, कारण त्यांना खूप मागणी आणि गिऱ्हाईक असे. त्याव्यतिरिक्त या दुकानाच्या बाहेरच फळी टाकून एक माणूस बसत असे. इथे सारी पुस्तके पाच ते दहा रुपयांत मिळत. 1987 साली मी थोडा वेळ कॉम्प्युटरची नोकरी केली, तेव्हा या दुकानाच्या बाजूलाच माझे ऑॅफिस होते. तेव्हा तर दोन रुपयांना पुस्तके मिळत. शेक्स्पिअरची हार्डबाउंड पुस्तके मी दोन ते पाच रुपयांना घेतलेली आहेत. इथे पाण्याची एक बादली आहे, त्याचा वरचा विभाग हा क़ि्रटिसिझमचा होता. मानकामे बसत किंवा उभे राहत, त्याच्या समोरची जागा मायथॉलॉजीची होती. दुकानात शिरल्या शिरल्या उजव्या हातावर एक फिरता रॅक असे. याच्यावरही स्वस्तातली पुस्तके असत. कितीतरी चांगली पुस्तके - उदा.गॉड दॅट फेल्ड सारखे पुस्तक पाच-दहा रुपयात घेतलेले आहे. या फिरत्या रॅकच्या मागे, म्हणजे उजव्या बाजूला सिनेमा-नाटकावरची पुस्तके असत. त्या बोळकांडीत शिरल्यावर डाव्या हाताची पूर्ण भिंत भारतावरच्या, मुंबईवरच्या पुस्तकांनी व्यापलेली आहेत. जिलीयन टिंडालचे सिटी ऑफ गोल्ड पुस्तक इथूनच घेतले.

क्रिटिसिझम असा विभाग लागत असे. पुढे याला छोटासा जिना होता. त्या जिन्याने वर गेल्यानंतर सारी पुस्तके भारतावरची, काही चर्चिलवरची, काही इतिहासावरची अशी होती. प्रामुख्याने हार्डबाउंड पुस्तके वरच्या मजल्यावर असत. चर्चिलच्या मुलाने लिहिलेले चर्चिलचे प्रचंड मोठे चरित्र इथे होते. वेगवेगळी कितीतरी पुस्तके इथे मिळत. बॅशमचे Wonder that was India हे पुस्तक पहिल्यांदा इथेच पहिले. किंवा सॅम्युअल जॉन्सनची डिक्शनरी.. या डिक्शनरीबद्दल बरेच सांगण्यासारखे आहे. सॅम्युअल जॉन्सनने पहिल्यांदा डिक्शनरी बनवली, तेव्हा त्याचा हेतू हा होता की भाषेत वापरात असेलेले सगळे शब्द इथे आले पाहिजेत. त्यामुळे त्याने अनेकांना हायर केले. हीच नव्हे, तर ऑक्स्फर्ड डिक्शनरीच्या अनेक आवृत्त्या इथे होत्या. इथे असलेली ऑक्स्फर्ड डिक्शनरी म्हणतात दोन भागातली. ती काही मला परवडली नाही. अनेकदा ती मी विकत घ्यायचा प्रयत्न केला. एकदा केवळ त्याचा अर्धा भाग स्वस्तात मिळाला. नंतर ती मी आता नवी कोरी विकत घेतलेली आहे. डिक्शनरीच्या अनेक आवृत्त्या मला इथे मिळाल्या. त्यातूनच  डिक्शनरीच्या इतिहासाविषयी छंद जडला आणि एक दिवस 'प्रोफेसर ऍंड मॅडमॅन' हे पुस्तक इथे मला बिनकव्हरात स्वस्तात मिळाले. ही आणि अशी अनेक पुस्तके तुम्हाला दुसरी पुस्तके वाचायला उद्युक्त करतात. नकाशाचे शास्त्र, चित्रकलेचे शास्त्र, प्रोफेसर ऍंड मॅडमॅन, संगीताचे शास्त्र, गणिताचे शास्त्र अशा विविध विषयांवरती इथे पुस्तके होती. एक प्रकारे हे चालतेबोलते विद्यापीठच होते. आज फ्लिपकार्टवर पुस्तके घेणाऱ्यांना असे वाटते की कुठलेही पुस्तक फ्लिपकार्टवर मिळते आणि अनेक पुस्तके मिळतात हे बरोबर आहे. पण पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर तुम्हाला त्याच विषयाची दहा पुस्तके एकाच वेळी दिसतात. तेव्हा 'प्लॅनेट एम' या नावाने टाइम्स ऑॅफ इंडियाने एक दुकान सुरू केले आहे. त्याचे भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित यावरचे, म्हणजे विज्ञानावरचे सेक्शन अत्यंत सुंदर होते. तिथेच मला प्रसिध्द आणि महान टी.ई. बेलचे मेन ऑॅफ मॅथमॅटिक्सपासून ते गणित लोकप्रिय करणाऱ्या आणि गणितातले साैंदर्य शोधून सांगणाऱ्या अमुक अमुक लेखकापर्यंत कितीतरी पुस्तके सापडली. प्लॅनेट एमची गंमत वेगळीच होती. इथे मोफत कॅसेट ऐकता येत. वेस्टर्न क्लासिकलच्या कॅसेट खूप महाग असत. त्या ऐकत ऐकत पुस्तके चाळणे ही एक वेगळी गंमत होती. गृज नावाचे कॅसेटचे दुकान निघाले होते. आणि रिदम हाउसचेही. संगीत आणि पुस्तके मला वाटते एकत्र राहतात. चांगले संगीत ऐकताना उत्तम चहाचा आस्वाद घेत एखादे पुस्तक वाचणे किंवा चांगली वाईन पीत पुस्तके वाचणे यासारखे श्रेष्ठ जादू किंवा श्रेष्ठ आंनद असू शकत नाही. अर्थात अनेकांना हे पटणार नाही. त्या काळात मी संगीत आणि चित्रपट याचा वेडाने झपाटलो होतो. साहजिकच चित्रपटावरची प्राथमिक पुस्तके म्हणजे सत्यजित राय यांची पुस्तके, पथेर पांचाली याच्याबरोबरच सत्यजित यांनी लिहिलेले एक एलियन म्हणजे परग्रहावरच्या मानवाबद्दलचे स्क्रिप्टही मला मिळाले. त्यात सत्यजित राय यांनी काढलेली चित्रेही होती. नंतर 'ईटी ः द एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल' हा सिनेमा तयार करण्यात आला.  तो सत्यजित रे यांनी काढलेल्या चित्राप्रमाणेच होता हे मला कळले. आता मी दिल्लीच्या चित्रपट महोत्सवाला जाऊ लागलो होतो. साहजिकच गोदार्द, न्यू वेव यातले जुने अभिजात सिनेमे, आंद्रे वायदा बर्गमन यांचे सिनेमे मी पाहू लागलो होतो. या सिनेमांबद्दल अधिक माहिती त्यांच्या पुस्तकातून सापडत होती.

 न्यू हँड सेकंडहँड मला या पुस्तकांची मालिका गवसली. ही मालिका होती 'अमुक अमुक' या प्रकारची ही पुस्तके होती. एका लेखकाचे समग्र आयुष्य सतत मुलाखती घेऊन मांडणे ही यातली कला होती. किस्लोवस्की ऑॅन किस्लोवस्कीसारखे पुस्तक वाचताना किंवा Godfatherच्या दिग्दर्शकाचे 'कोपाला कोपोला' वाचताना आपली चित्रपटाबद्दलची जाणीव समृध्द होतेच, शिवाय ती वाचल्यावर आपण त्यांचे चित्रपट अधिक एन्जॉय करू शकतो, असे माझ्या लक्षात आले. आता माझी भूक वाढली होती.

दरम्यान 2002-03च्या आसपास कधीतरी कवितांच्या  कार्यक्रमांचे मला निमंत्रण मिळाले. आदिल जेसावालाने हे निमंत्रण पाठवले होते. ह्या निमंत्रणामुळे माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या. एकतर वेगळया क्षेत्रातले कितीतरी मित्र मिळाले, कवितेचा माझा व्यासंग वाढला आणि सगळयात महत्त्वाचे म्हणजे माझे इंग्लिश बोलणे, लिहिणे सुधारले. कारण इथे येणारी अर्धी मंडळी घरातही इंग्लिश बोलणारी होती. अनेक पारशी मंडळी होती, ज्यांची मातृभाषाच इंग्लिश होती. शिवाय आदिल जेसावालासारख्या माणसाचे निरूपण ऐकणे, जेन भंडारीसारख्या मुळातच ब्रिटिश असलेल्या बाईचे सुंदर इंग्लिश ऐकणे हा छंद होता. शिवाय जेरी पिंटोपासून ए.के. मल्होत्रापर्यंत, रणजीत होस्कोटेपासून अरुंधती सुब्रह्मण्यमपर्यंत अनेक कवी-लेखक इथे भेटत. आदिल, जेन भंडारी, शंकर मेनन, आस्पी मिस्त्री, लिया मेहता, सुबोध, रोहित मनचंदा, गीतांजली डांग, नियती मेहता, आनंद ठाकूर, जेरी पिंटो, रणजीत होस्कोटे ही मंडळी तेव्हा लोकेशन्समध्ये येत-जात असत. सगळेच लेखक, कवी, काही पत्रकार, काही विद्यार्थी. दर मंगळवारी कोणीतरी एक कवितांवर प्रेझेंटेशन करायचा. उदा. वॉलेस स्टिवन्सच्या कविता किंवा सिनेमा आणि कविता किंवा आधुनिक प्रेमकविता असा कुठलाही विषय घेऊन एक जण त्यावर बोलायचा. मग त्याने आणलेल्या कविता सर्व जण वाचत. महिन्याच्या पहिल्या मंगळवारी प्रत्येकाने आपल्या आवडीच्या दोन कविता वाचायच्या. (स्वत:च्या कविता वाचायच्या नाहीत, असा नियम होता.)

सुरुवातीला मी आदिल, जेन, जेरी पिंटो यांची प्रेझेंटेशन्स पाहिली. आदिलला कवितेवर बोलताना ऐकणे हा एक अनुभव होता. आदिलने तेव्हा केलेले एक प्रेझेंटेशन आर्बिट्ररी, परस्पर विसंगत किंवा तर्कहीन प्रतिमा असलेल्या कवितांवर होते, ज्यात प्रामुख्याने वॉलेस स्टिवन्सच्या कविता त्याने वाचल्या. एका कवितेतील पायांच्या वर्णनाबरोबर जाणारे ख्रिस्ताच्या पायांचे चित्र त्याने आणले होते, तर 'एंपरर ऑॅफ आइसक्रीम'सारख्या कवितेचा अगदी वेगळा अर्थ त्याने लावून दाखवला.

तरीही वेळोवेळी एक गोष्ट स्पष्ट करण्यात येई - ही काही ऍकडमिक सेशन्स नाहीत. भिन्न भिन्न प्रकृतीच्या अधिकाधिक कविता वाचणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. रणजीत, लिया, जेन भंडारी, जेरी पिंटो, अरुंधती सुब्रह्मण्यम, मेनका शिवदासानी, दीपाली एडवणकर, आनंद ठाकूर हे प्रॅक्टिसिंग कवी होते. आनंद, रणजित, जेन आणि मेनका यांचे कवितासंग्रहही प्रकाशित झाले होते. या सर्वांचा मिळून 'पोएट्री सर्कल' नावाचा आणखी ग्रूप होता. तिथे ते स्वत:च्या कविता वाचत आणि इतर जण त्याची चिरफाड करत. नव्या कवींसाठी हा अनुभव बराच दाहक ठरत असे.

'लोकेशन' साडेपाच वाजता, मंगळवारी 'चौराहा' नावाच्या NCPA या नव्या जागेत भरे. काही मंडळी आधीच आलेली असत. तास-सव्वा तासानंतर मध्यंतर होई. त्यात चहा-बिस्किटे, सँडविच येत. पुन्हा तब्बल आठपर्यंत ते चाले. कवितेबरोबरच काही वेळा शांत, तर काही वेळा गरमागरम चर्चा होई. उदा. एकदा साधी डिक्श्नरी किंवा ऱ्हायमिंग डिक्शनरी घेऊन कविता लिहिणे बरोबर की चूक, यावर गरमागरम चर्चा झाली. त्यात जुने आणि नवे असे तट पडले. शंकर मेनन हा एशियन एजचा स्तंभलेखक, शिवाय आय.ए.एस. ऑॅफिसर. तो डिक्शनरी वाचायच्या विरोधात होता. त्याचे वाचन चांगले होते. पण आधुनिक कविता, विशेषत: 'बीट' कवींवर तो टीका करत असे.

'लोकेशन्स'मुळे मी नवे-जुने कवी शोधू लागलो. शेक्स्पियर, टेनिसनपासून ते रिल्के, नेरदा ते अगदी कालपरवाच्या 'न्यूयॉर्कर'मधल्या आजच्या कवींपर्यत मी अनेक कवी वाचलेत. जॉर्ज लुई बोरहेसचे गद्य मी वाचले होते. पण त्याच्या कविता आता वाचल्या. अनेकदा तो कवितेत केवळ विशिष्ट प्रतिमांची यादी करे. उदा. बायरनवरच्या कवितेत रोमँटिकतेशी संबंधित असे शब्द केवळ एकत्र येतात. अरुण कोलटकरांच्या 'भिजकी वही'मध्ये हा गुण थोडासा डोकावतो.

मार्क स्ट्रँड हा कवी मला गवसला. इतर अनेक नवे-जुने कवी मी वाचत होतो, पण मार्क स्ट्रँड मला खूप जवळचा वाटला. 'पोएट्री डॉट ऑॅर्ग'वर त्याची ही कविता त्याच्या आवाजात ऐकायला मिळाली.

इंग्लिश भाषेचा आभ्यास आणि उच्चार तसेच त्याचे व्याकरण भाषेतून शिकणे यात हा सर्व काळ गेला. आता मी अधिकाधिक साहित्य वाचू लागलो आणि माझ्याकडून पुस्तके विकत घेणारी मंडळी वाढली होती. नंतरच्या काळात अनेकांनी मला त्यांचे ग्रंथ संग्रह दिले, त्याच्यामध्ये अनिरुध्द फडकेने दिलेला य.दि. फडके यांच्या मोठया संग्रहातील अनेक पुस्तके होती. य.दि. फडकेंचा संग्रह मोठा होता. लहानपणापासून मी ते पाहत होतो. कारण अनिरुध्द माझ्या वर्गात होता आणि मी जायचो, तेव्हा य.दि. नेहमीच पुस्तक वाचत बसलेले असत. त्यातील अनेक पुस्तके त्यांनी पुण्याला शिफ्ट केली, काही घरी ठेवली, तरी पुस्तकांची संख्या असंख्य वाटावी इतकी होती. अर्थात असंख्य पुस्तके कोणाकडे असू शकत नाहीत. कुमार केतकरांनी आपल्या घरची सहा-सातशे पुस्तके मला दिली. तसेच आम्ही खारघर इथे एक वाचनालय सुरू केले, त्यात त्यांचा मोठा संग्रह काही काळ ठेवला होता. उकर्जी म्हणून पारशी प्राध्यापक आहेत, ते तत्त्वज्ञान शिकवायचे. त्यांच्या जावयाने मला दोनशे पुस्तके दिली. त्यात मोठया प्रमाणावर तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांचा संग्रह आहे. शिवाय इकडून-तिकडून कोणीतरी पुस्तके पाठवतच असते. या प्रकारे पुस्तके वाढत राहतात.

ज्या लोकांना मी पुस्तके विकायचो, त्यांच्याकडून मला अनेकदा नव्या पुस्तकांची ऑॅर्डर यायची, जेणेकरून एक वेगळा लेखक कळायचा. उदा., हंसल मेहतासारख्या दिग्दर्शकाला मी 'रिच मॅन पुअर मॅन' नावाचे पुस्तक विकले, ज्याच्यावर त्यांनी सिनेमा बनवला. हंसल मेहतांनी मला एक नव्या दिग्दर्शकांची मालिका सांगितली, जी प्रोजेक्शन म्हणून थोडीशी महागडी पुस्तके होती. पण यात नव्या दिग्दर्शकांच्या मुलाखती वाचायला मिळत. चित्रपटाच्या तंत्राबद्दल, अभिनयाबद्दल, विविध अंगाबद्दल ते समरसून बोलत. या मालिकेचे वैशिष्टय म्हणजे ही पुस्तकाच्या स्वरूपात असायची, पुस्तकासारखी वाचता यायची. ग्रांटा हीसुध्दा अशीच एक नियतकालिकाची मालिका, जी पुस्तकच्या स्वरूपात येते. म्हणजे ग्रांटा हे एक त्या महिन्याला निघालेले पुस्तकच असते म्हणा. अर्थातच मी न्यूयॉर्करचा मोठा संग्रह केला आणि न्यूयॉर्करमुळे मला जगातले मोठे लेखक तर कळलेच, त्याशिवाय संगीताबद्दल, चित्रपटाबद्दल, साहित्याबद्दल, कवितेबद्दल माझी आस्था वाढली. न्यूयॉर्करमधील अनेक लेखांमुळे कवितेची भाषा, साहित्याची भाषा, संगीताची भाषा यावरचे विविध प्रकारचे लेखन वाचता आले. वाफ डिलनसारख्याची मुलाखती प्रोफाईल किंवा प्रसिध्द अमेरिकन चित्रकार जास्फर किंवा डेविड सालसारख्यांच्या मुलाखतीवर आधारित प्रोफाईल यामुळे चित्रकलेच्या भाषेबद्दलही मला बरीच जाण आली. अनेक पुस्तके परवडत नसत, ती मी वाचनालयातून घेत असे. विशेषतः वॉल्टर बेंजामीन यासारख्या उत्तर आधुनिक लेखकांची पुस्तके याचा यात समावेश करावा लागेल. 2011 साली पूर्ण दशकभराच्या वाचनावरती मी एक मोठा लेख लिहिला. लोकसत्तामध्ये जवळपास दीड हजार शब्दांच्या या लेखात नव्या दशकातील पहिल्या दहा वर्षांतील लेखक-विचारवंत-कवी-चरित्र-आत्मचरित्र अशा विविध विषयांचा धांडोळा घेतला होता. पुन्हा 2015 साली जवळपास दुप्पट आकाराचा हा लेख मी अमेरिकन नियतकालिकासाठी लिहिला, जे ऑॅनलाइन होते. या साऱ्यामुळे मी पुस्तकाच्या सहवासात असतो. सतत पुस्तके चाळत असतो, वाचत असतो, लावत असतो किंवा चाखत असतो - म्हणजे अनेक पुस्तकांतील काही भाग वाचून सोडून देतो. मध्यंतरी मला माक्र्सवर लिहायचे होते, तेव्हा मी कार्ल माक्र्सवरची पुस्तके मोजली. माक्र्सवर जवळपास सतरा पुस्तके होती. मग माक्र्सच्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोवरचे पुस्तक आहे खरे तर चाळीस-पन्नास पानांचे. पण त्यावर तीनशे पानाचे सुंदर पुस्तक पेंग्विन क्लासिकमध्ये प्रसिध्द झाले आहे. माक्र्सचे बर्लिनने लिहिलेले छोटे सुंदर चरित्र तेही माझ्याकडे आहे. छोटया दोन पुस्तिका आहेत, शिवाय माक्र्सच्या निवडक लेखनाचे संग्रह आहे. कॅपिटलचे एक दोन भाग आहेत. या प्रकारे माक्र्सवरच विविध पुस्तके आहेत. शिवाय त्यावर हॉफजॉमने माक्र्सवादावर लिहिलेला लेखांचा संग्रह आहे. आता मी जॉन अपडाईकवर लेख लिहितोय, तर जॉन अपडाईकवर माझ्याकडे त्याच्या निबंधाची आठ-नऊशे पानांचे दोन संग्रह आहेत. शिवाय रॅबिट रनसारख्या दोन कादंबऱ्या, पुअर हाउस ऑॅफ हेयरसारखी कादंबरी, ब्राझिलसारखी कादंबरी, विलेजसारखी कादंबरी अशा कितीतरी कादंबऱ्या आणि अर्ली स्टोरी असा एकशे तीन कथांचा संग्रह आहे. शिवाय त्याचे माय फादर टीयर्स ऍंड अदर स्टोरीसारखे संग्रह आहेत. या प्रकारे एखाद्या लेखकावर लिहायचे झाले, तर त्याची अधिकाधिक पुस्तके मी चाळण्याचा, वाचनाचा प्रयत्न करतो आणि अधिकाधिक पुस्तके मिळवण्याचा प्रयत्न करतो. खरे तर या अभ्यासाचा उपयोग काय? या वाचनाचा उपयोग काय? असा प्रश्न माझ्याच मनाला पडतो. कारण मी काही पीएच.डी. करत नाही. मी काही तसा समीक्षा लेखक नाही. पण मला असे वाटते की कुठेतरी मला जॉन अपडाईक समजून घ्यायचा असतो, तिथून मला साहित्य म्हणजे काय हे समजून घ्यायचे असते. आणि मग मी त्याचा पिच्छा करतो. जे चांगले वाचक मला मिळाले, - मग ते अरुण खोपकर असतील, राजीव श्रीखंडे असतील, टकले असतील, दीपक लोखंडे, आकार पटेल, किंवा संजय छेल, हंसल मेहता यासारखी चित्रपटातली मंडळी असतील, प्रशांत कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी यासारखी नाटक-सिनेमातील मंडळी असतील, जयंत पवारसारखा लेखक असेल किंवा आधीमधी भेटणारा पण मी ज्याचे नेहमी साहित्य वाचतो तो निखिलेश लेखक असेल, दौलत हवालदार, सतीश काळसेकर यांचे पुस्तक संग्रह असतील - या साऱ्यांशी झालेल्या संभाषणातून, गप्पांमधून किंवा कधीमधीच्या भेटीतून त्यांच्या वाचनातून मला अधिकाधिक पुस्तकांचे जग खुलत गेले. आणि स्वत:ला समृध्द करण्याचा प्रयत्न मी कायम करत राहिलो. पुस्तकांनी जे काही दिले मला, ते हेच. आणि अर्थातच त्यांनी मला जगण्याचे स्वातंत्र्य दिले. मी पुस्तकविक़्री करत नसतो, तर मला कुठेतरी अकरा ते सहा नोकरी करावी लागली असती. दोन-तीन तास प्रवासात गेले असते. शिवाय सहकाऱ्यांचे गॉसिप, ऑॅफिसमधले राजकारण यात मी गुरफटून गेलो असतो. पण पुस्तकांमुळे मला मनाला हवे तसे जगता येऊ लागले. पुस्तकांनी माझ्या आयुष्यात आनंद आणला. जॉन अपडाईक कादंबरी लेखनाबद्दल म्हणतो की कादंबरी लिहिणाऱ्याने आयुष्यातील आनंद थोडातरी अनुभवला पाहिजे. तो वाटायची त्याला आवड हवी. मला वाटते, मी या दोन्ही गोष्टी मी पुस्तकवाचनातून आणि विक्रीतून साध्य करायचा प्रयत्न केला.

9821785618