विज्ञानवादी भविष्यवेत्ता

विवेक मराठी    28-Oct-2016
Total Views |

ऑलविन टॉफलर यांनी तीन लाटांच्या माध्यमातून एका अर्थाने मानवी संस्कृतीच्या आर्थिक विकासाची रूपरेखा मांडलेली आहे. ही सगळी रूपरेखा काही गृहीतांवर आधारित आहे. मनुष्याचे भौतिक सुख हेच सर्वोच्च आहे आणि हे सुख साध्य करण्यासाठी वेगवेगळया रचना उभ्या राहतात. एक लाट संपते आणि दुसरी लाट येते हेदेखील एक गृहीत आहे. माणसाची बुध्दी सर्वोच्च आहे आणि या बुध्दिवैभवानेच या सर्व लाटा निर्माण झाल्या आहेत. भौतिक विकासाचा क्रम टॉफलर यांनी मांडलेला आहे. तो तथ्यहीन मुळीच नाही. टॉफलर यांच्या भविष्यवाणीची टिंगलटवाळी अमेरिकेत झाली नाही.


विष्य जाणण्याची उत्सुकता कुणाला नसते? ''माझा भविष्यावर विश्वास नाही'' असे म्हणणारेदेखील वर्तमानपत्रात येणारे राशीभविष्य वाचायला विसरत नाहीत. अनेक नामवंत राजकीय नेते आपले राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी शास्त्री, पंडित, फकीर यांच्या नादी लागलेले असतात. या भविष्यवेत्त्यांच्या अनेक लोककथादेखील आहेत आणि त्या अतिशय मनोरंजक आहेत. भगवान गौतम बुध्दाच्या जन्माच्या वेळी त्यांचे भविष्य असे सांगितले गेले की हा संसारात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल आणि संसार सोडून गेला तर बुध्द होईल. भविष्य सांगण्याचेदेखील अनेक प्रकार आहेत. जो थोर होणार आहे, त्यांच्या शरीरावर बत्तीस लक्षणे असतात असे म्हणतात. या लक्षणांवरून त्यांचे भविष्यकथन करता येते. हस्तसामुद्रिक, तळहातावरील रेषा पाहून भविष्यकथन करतात. नाक, कान, डोळे, कपाळ, ओठ, चेहरेपट्टी यावरूनदेखील भविष्यकथन केले जाते. या प्रकारे भविष्य जाणून घेण्यात काही गैर आहे असे नाही. उत्सुकता हा मनुष्यजातीला मिळालेला निसर्गदत्त गुण आहे. त्या गुणाचा हा परिणाम आहे.

भविष्यवेत्ता ऑलविन टॉफलर

ऑलविन टॉफलर हे जगातील थोर भविष्यवेत्ते होते. दि. 27 जून 2016 रोजी वयाच्या 87व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. मनुष्यदेहावरील लक्षणे, कुंडली, हस्तरेषा, चेहरापट्टी यांपैकी काहीही त्यांच्या भविष्यवाणीचा आधार नव्हते. विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्यातही तंत्रज्ञान जगात - म्हणजे मानवी संस्कृतीत जबरदस्त बदल घडवून आणणार आहे, याची भविष्यवाणी त्यांनी 1970 साली केली. 1970 साली त्यांचे पहिले पुस्तक 'फ्युचर शॉक' (भविष्यातील धक्का) प्रसिध्द झाले. नंतर या पुस्तकाच्या 70-80 लाख प्रती विकल्या गेल्या. जगातील अनेक भाषांत त्याची भाषांतरे झाली. 'फ्युचर शॉक' या पुस्तकात ऑलविन टॉफलर यांनी आज ज्या विज्ञान-तंत्रज्ञान युगात आपण जगतो, त्याची जवळजवळ अचूक भविष्यवाणी केली. 1970च्या पुस्तकातील अनेक विधाने तेव्हा वाचकांना स्वप्नरंजनात्मक वाटली. असे घडणे शक्य नाही असे त्यांना वाटले. उदाहरणार्थ - भावी काळ संगणकाचा राहील, कुटुंबव्यवस्थेला जबरदस्त धक्के बसतील, समुद्रातील खनिजांचा शोध घेण्यात येईल, औद्योगिक क्रांतीचे युग संपेल, बदलाचा वेग प्रचंड असेल, इत्यादी. आज तसे घडत आहे आणि त्या घडणाऱ्या जगात आपण जगत असतो.

'फ्युचर शॉक' या पुस्तकानंतर 1980, 1990 आणि 2006 अशा वर्षांच्या अंतराने त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली. 'दी थर्ड वेव्ह', 'पॉवर शिफ्ट' आणि 'रिव्होल्युशनरी वेल्थ' अशी या पुस्तकांची शीर्षके आहेत. पहिल्या पुस्तकात जे विचार मांडले आणि संकल्पना मांडल्या, त्यांचा विस्तार पुढील तीन पुस्तकांत केला गेला आहे. या पुस्तकांच्यादेखील लाखो प्रती खपल्या आहेत. यातील प्रत्येक पुस्तकांचा सारांश मांडायचा म्हटला, तरी अर्धा दिवाळी अंक भरून जाईल. हे टाळण्यासाठी या पुस्तकातील प्रमुख संकल्पना आज प्रत्यक्षात कशा अवतरल्या आहेत, एवढे आपल्याला पाहता येईल.

कालसापेक्ष बदल

मुळात ऑलविन टॉफलर कोण होते? आणि त्यांच्या पुस्तकांना एवढे महत्त्व देण्याचे कारण काय? एका विदेशी लेखकाचा एवढा उदोउदो कशासाठी? या प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागतील. ऑलविन टॉफलर यांचा जन्म दि. 3 ऑक्टोबर 1928 रोजी झाला. जन्माने ते ज्यू होते. तरुण वयात माक्सर्िस्ट होते. माक्सर्िस्ट माणसाचा असा विश्वास असतो की, जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे आहेत. परंतु ऑलविन टॉफलर यांच्या लवकरच हे ध्यानात आले की, माक्र्सचा विचार एकांगी असून तो कालबाह्य झालेला आहे. मग कालसापेक्ष काय आहे याचा शोध त्यांनी सुरू केला. अनेक वर्षे त्यांनी फॅक्टरीमध्ये काम केले व पुढे ते लेखक झाले. फॉरच्युन मासिकात साहाय्यक संपादक म्हणून काम करू लागले आणि 1970 साली 'फ्युचर शॉक' हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले, त्यामुळे ते जगप्रसिध्द झाले. त्यांच्या पत्नीचे नाव हैदी टॉफलर. खरे म्हणजे ही सर्व पुस्तके या दांपत्याने लिहिलेली आहेत. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यांनी समाजात बदल घडवून आणणाऱ्या प्रवाहांचा अभ्यास केला. वेगवेगळया विज्ञानशाखांचा अभ्यास केला. त्यांच्याशी संबंधित तज्ज्ञांशी दीर्घसंवाद केले आणि अशा उदंड अभ्यासानंतर पुस्तकांची रचना केलेली आहे. कोणत्याही पाश्चात्त्य विद्वानाची ही वैशिष्टये आहेत. त्यांच्या गहन अभ्यासाच्या पाऊलखुणा या चारही पुस्तकांत पानोपानी दिसतात.

मानवी जीवनात येणाऱ्या लाटा

फ्युचर शॉक या पुस्तकात ते म्हणतात, 'एकविसावे शतक यायला तीन दशके बाकी आहेत. या काळात लक्षावधी सामान्य माणसांना आणि मानसिकदृष्टया स्थिर असणाऱ्या लोकांना अचानक येणाऱ्या भविष्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. जगातील श्रीमंत आणि तांत्रिकदृष्टया अतिप्रगत असणाऱ्या देशांना सतत बदलाच्या रेटयाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना असे वाटेल की भविष्यकाळ फारच लवकर पुढे आला आहे.' फ्युचर शॉक हे येऊ घातलेल्या तांत्रिक बदलाची आणि समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, धर्मव्यवस्था यावर या बदलाच्या होणाऱ्या परिणामांची चर्चा करणारे पुस्तक आहे.

या पुस्तकातील आशय अधिक स्पष्ट होण्यासाठी त्यांचे 'द थर्ड  वेव्ह' फारच महत्त्वाचे ठरते. या पुस्तकात एकविसाव्या शतकात जे तंत्रज्ञान समाजात येणार आहे, यांची विस्तृत चर्चा टॉफलर यांनी केलेली आहे. आपण आज या तिसऱ्या लाटेच्या जगात जगत आहोत. तिसरी लाट म्हणत असताना पहिल्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत, हे ओघानेच आले. त्या कोणत्या होत्या आणि मानवी संस्कृतीच्या सर्वांगांवर त्यांचा कशा प्रकारे परिणाम झाला, यांचे अत्यंत मार्मिक विश्लेषण टॉफलर यांनी केले आहे.

कृषी संस्कृती

कृषीचा शोध ही पहिली लाट होती. कृषीच्या शोधामुळे माणसाचे भटकंतीचे जीवन संपले आणि स्थिर वसाहती करण्यास प्रारंभ झाला. इ.स. पूर्व 8000 वर्षे कृषीचा शोध लागला असे टॉफलर यांचे म्हणणे आहे. जमीन ही अर्थव्यवस्थेचा कणा झाली व तिच्या आधारे संस्कृतीचा विकास सुरू झाला. जमीन ही कुटुंबव्यवस्था, राजकीय रचना, अर्थव्यवस्था या सर्वांचा कणा झाली. खेडयांची रचना झाली आणि विकेंद्रित अर्थव्यवस्था उदयाला आली. शेती हा प्रमुख व्यवसाय झाल्याने शेती संबंधातील व्यवसायांचा विकास सुरू झाला. श्रमविभाजन झाले आणि या श्रमविभाजनाच्या तत्त्वावर जातींचा आणि वर्गांचा विकास झाला. सरदार, उमराव, शेतमजूर, गुलाम असे विविध वर्ग तयार झाले आणि जन्मावरून व्यक्तीचे समाजातील स्थान निश्चित झाले जमिनीची मालकी संपत्तीचा स्रोत झाल्याने जमीन जिंकण्यासाठी लढाया सुरू झाल्या. जमिनीत म्हणजे शेतीत पाणी लागते, पाण्यावरून संघर्ष सुरू झाले. भगवान गौतम बुध्दाच्या चरित्रात रोहिणी नदीच्या पाण्याचा तंटयाचा उल्लेख येतो. डॉ. बाबासाहेबांच्या मते, सिध्दार्थाच्या गृहत्यागाचे ते एक कारण होते.

पहिल्या कृषी संस्कृतीच्या लाटेत, मानवी श्रम आणि पशुश्रम हे ऊर्जेचे स्रोत होते. शेती अधिक किफायतशीर करण्यासाठी विविध शेती अवजारांचा शोध लागत गेला. बहुतेक उत्पादन स्थानिक गरजा भागविण्यासाठी होत असल्याने प्रारंभिक अवस्थेत व्यापार-विनिमय नगण्य होता. पण हळूहळू गरज भागवून उरणाऱ्या उत्पादनाच्या व्यापारास सुरुवात झाली. त्यातून व्यापारी संस्कृतीचा आणि अर्थकारणाचा जन्म झाला. व्यापारी मार्ग तयार होत गेले. विनिमयासाठी मौल्यवान धातू उपयोगात आणले जाऊ लागले. टॉफलर यांनी भारताच्या विदेश व्यापाराचे वर्णन केलेले नाही. पण इ.स.पूर्व तीन-चार शतकांपासूनच जागतिक बाजारात/उत्पादनात भारताचा तीस टक्क्याच्या आसपास वाटा होता. (कृषी संस्कृतीने भारतास कसे समृध्द केले, हे समजण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा 'भारताचा प्राचीन व्यापार' हा प्रबंध वाचायला हवा.) या काळात युरोप खूप मागे होता. कारण, युरोपची प्रचंड थंडी आणि शेतीसाठी प्रतिकूल हवामान आणि जमीन.

संपर्क यंत्रणा आणि अर्थव्यवस्था

अर्थव्यवस्थेत संपर्क यंत्रणेला फार महत्त्व असते. कृषी कालखंडातील संपर्क यंत्रणा मौखिक होती. व्यक्तीच्या संपर्कातून संपर्क यंत्रणा प्रारंभी अवस्थेत चालली. पण नंतर संपर्काचे विविध मार्ग शोधण्यात आले. पर्शियन, रोमन, झार साम्राज्यांनी गतिमान संपर्क यंत्रणेची पायाभरणी केली. सांडणीस्वार म्हणजे घोडयावरून जलदगतीने पत्र, दस्ताऐवजे देणारी व्यवस्था उभी करण्यात आली इ.स. 1800पर्यंत युरोपमध्ये संपर्कासाठी घोडदळ एक्स्प्रेस उभी राहिली, त्यात वीस हजार लोकांना रोजगार मिळत होता. त्यांना विशिष्ट प्रकारचा गणवेश देण्यात आला होता. सरदार, उमराव, सेनाधिकारी, राजघराणी आणि व्यापारी यांच्या संदेशवहनांचे काम ही यंत्रणा करीत होती. अर्थव्यवस्थेला जलद संपर्क यंत्रणेचा फायदा झाला आणि दूरदूरवर व्यापारी केंद्रे उभी राहण्यात त्याची मदत झाली.

औद्योगिक क्रांती आणि तिचे टप्पे

कृषी संस्कृतीतूनच पुढे औद्योगिक लाटेचा उदय झाला. तो होण्यासाठी तीन गोष्टी कारणीभूत झाल्याचे टॉफलर नमूद करतात. त्या तीन गोष्टी अशा : 1) निश्चित वेळ दाखविणारे घडयाळ 2) छपाई यंत्राचा शोध 3) शेती अवजारांसाठी नवनवीन धातूंचा उपयोग - विशेषतः लोखंडाची आणि पोलादाची निर्मिती. 1650 सालापासून औद्योगिक क्रांतीच्या दुसऱ्या लाटेचा प्रारंभ झाला आणि ती पूर्णावस्थेत जाण्यास पुढील तीनशे वर्षे लागली. औद्योगिक क्रांती ही ऊर्जा क्रांतीदेखील आहे, कारण औद्योगिक क्रांती ऊर्जेशिवाय शक्य झाली नसती. कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू यांचे भूगर्भातील साठे शोधण्यात आले. औद्योगिक क्रांतीने पुढील गोष्टी केल्या - 1) मास प्रॉडक्शन (प्रचंड उत्पादन), 2) त्यासाठी प्रचंड भांडवल, 3) मर्यादित दायित्वावर आधारित उद्योग समूह, 4) श्रमविभागणी, 5) व्यवस्थापनाची श्रेणीबध्द रचना, 6) औद्योगिक रचनेला पूरक शिक्षणव्यवस्था, राज्यव्यवस्था व 7) नोकरशाहीचा प्रचंड पसारा.

बदलती समाजव्यवस्था

टॉफलर म्हणतात - 'औद्योगिकीकरणाला अनेक पदर आहेत, ती अनेकांगी सामाजिक व्यवस्था आहे. मनुष्यजीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करून व्यापणारी ही व्यवस्था आहे. या व्यवस्थेने शेतीत ट्रॅक्टर आणला. घरात रेफ्रिजरेटर तर कार्यालयात टाइपरायटर आणला. पोस्टाची सेवा, टेलिफोन, तारायंत्र आणि रेडिओ यांचा जन्म झाला. मास मीडियाचा याच काळात उदय झाला. सर्वत्र प्रचंड उत्पादन, प्रचंड वितरण, वितरणाची जलदगती दळणवळणाची साधने निर्माण झाली.

या सर्वाचे परिणाम समाजव्यवस्थेवर होत गेले. एकत्र कुटुंबपध्दतीची जागा छोटया कुटुंबांनी घेण्यास सुरुवात केली. खेडयातून लोक शहरात येऊ लागले. निवासाच्या जागा लहान झाल्या. कृषी संस्कृतीत निश्चित तासांची नोकरी ही संकल्पना नव्हती, आता तिचा जन्म झाला. कामगारांकडून तीन गोष्टींच्या अपेक्षा केल्या गेल्या - 1) वक्तशीरपणा, 2) आज्ञाधारकता व 3) एकाच प्रकारचे काम सातत्याने करण्याची सवय. या गुणांची निर्मिती करणारी शिक्षणव्यवस्था उभी करण्यात आली. यांच्या आधारावर हळूहळू फार मोठे उद्योग समूह उभे राहिले. लहान कुटुंब, कारखाना पध्दतीच्या शाळा आणि अतिप्रचंड उद्योग समूह उभे राहिले. दुसऱ्या लाटेची ही तीन वैशिष्टये झाली. कृषी व्यवस्थेत उत्पादन कुणासाठी केले जात आहे याची जाणीव उत्पादकाला होती. कारखान्यात होणारे उत्पादन कुणासाठी आहे? त्याचा उपभोक्ता कोण? हे त्या मजुरास माहीत नसते. कृषी व्यवस्थेतील उत्पादनाचा सर्वात मोठा हिस्सा उत्पादकच उपयोगात आणीत असे. ती स्थिती आता राहिली नाही.

विश्वाचे नियमन

औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ युरोपात झाला. ही क्रांती होण्यापूर्वी ईश्वर, विश्व, मानव यांच्या संबंधात तेथे नव्याने विचारांची मांडणी झाली. रेने देकार्त, फ्रान्सिस बेकन, सर आयझॅक न्यूटन, डार्विन इत्यादी तत्त्वज्ञांना आणि वैज्ञानिकांना त्याचे श्रेय द्यावे लागते. विश्व ही यांत्रिकी संरचना आहे. या यंत्रातील विविध भाग कसे चालतात, हे कोणत्या नियमांनी ते बांधिल असतात, या विविध भागांचा परस्पर संबंध कोणता, हे जाणून घ्या, म्हणजे विश्व कसे चालते हे समजेल असा विचार पुढे आला. घडयाळ कसे चालते हे समजण्यासाठी घडयाळाचे विविध भाग कसे चालतात, हे समजून घ्यावे लागते. विश्वदेखील एक प्रचंड घडयाळ आहे, या संकल्पनेच्या आधारे विश्वाचे नियमन करणारे विविध नियम शोधण्यात आले. गतीचे नियम, ऊर्जेचे नियम, गुरुत्वाकर्षण, पदार्थांच्या रचना असे असंख्य शोध लागत गेले. जग परमेश्वर चालवत नसून ते कार्यकारणभावावर चालते, नियमांवर चालते. निसर्गाची रहस्ये खणून काढा आणि त्याचा आपल्या भल्यासाठी उपयोग करा. सृष्टिनिर्मितीत मनुष्य श्रेष्ठ प्राणी असून ही सृष्टी त्यांच्यासाठीच आहे, जीवनसंघर्षात श्रेष्ठतम तेच टिकेल, युरोपीय वंश मानवात श्रेष्ठ आहे, म्हणून त्याला जगावर अधिकार गाजविण्याचा अधिकार आहे, हा सोशल डार्विनिझमचा सिध्दान्त पुढे आला. वसाहतवाद, साम्राज्यवाद, राजकीय गुलामी, नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळविण्यासाठी आणि उत्पादनाला बाजारपेठ मिळविण्यासाठी नवनवीन भूमींवर आक्रमण, युध्दे ही औद्योगिक संस्कृतीची अपत्ये ठरली. भारतही या कालखंडात इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि इंग्रजांनी भारताचे कसे शोषण केले, हे आता सर्वांनाच ज्ञात आहे.

भौतिक औद्योगिक संस्कृतीच्या लाटेच्या अनेक वैशिष्टयांचे दर्शन टॉफलर यांच्या पुढील परिच्छेदात घडते - 'औद्योगिक आणि प्रचंड व्यापक उत्पादन, व्यापक वितरण, व्यापक उपभोग, व्यापक शिक्षण, व्यापक प्रसारमाध्यमे, व्यापक करमणुकीची साधने आणि व्यापक संहारक शस्त्रे यावर दुसऱ्या लाटेचा समाज आधारित आहे. प्रमाणीकरण, केंद्रीकरण, कॉन्सन्ट्रेशन आणि Sychronization यांच्याशी याचा मेळ बसविल्यानंतर आताची नोकरशाही उभी राहते.'

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड

टॉफलर यांनी कृषी आणि औद्योगिक लाटेचे जे विश्लेषण आणि विवरण केले आहे, ते अनेक प्रकारे विचारांना चालना देणारे आहे. समाजात ज्या व्यवस्था उभ्या राहतात, त्याच्या बुडाशी समाजाची उत्पादन पध्दती किंवा अर्थव्यवस्था असते, असा याचा अर्थ होतो. शिक्षणाचा अर्थही लाटेप्रमाणे बदलत जातो. पहिल्या लाटेत कृषिज्ञान हेच शिक्षण होते. दुसऱ्या लाटेत कारखान्यांना आवश्यक ते शिक्षण असे झाले. पहिल्या लाटेत स्वयंपूर्ण खेडे याला महत्त्व होते. दुसऱ्या लाटेत शहराधारित खेडे झाल्याचे दिसते. पहिल्या लाटेत मोठे कुटुंब होते. शेती आणि शेती उद्योगाची ती आवश्यकता होती. दुसऱ्या लाटेत परिवार लहान झाले. (Nuclear Family). प्रथम विज्ञानाचा विकास होतो, सृष्टीची रहस्ये शोधली जातात. पुढे त्याच्या आधारावर तंत्रज्ञानाचा विकास होतो. अशा प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालून वाटचाल करताना दिसतात.

तिसरी लाट - माहिती तंत्रज्ञानाची

विज्ञान-तंत्रज्ञानाचे परिणाम तिसऱ्या लाटेत झाले आहेत. कृषी संस्कृतीची लाट हजारो वर्षे टिकली, औद्योगिक लाट 300 वर्षे टिकली आणि आताची तिसरी लाट किती काळ राहील, ते सांगता येत नाही. या तिसऱ्या लाटेत आपण जगत आहोत. तिसऱ्या लाटेला 'माहिती तंत्रज्ञानाचे जग', 'अवकाश युग', 'इलेक्ट्रॉनिक युग', 'टेक्नोट्रेनटि्रक युग' अशा विविध नावांनी संबोधले जाते. 'भविष्यकाळ फार लवकर सामोरे येईल' या शब्दात टॉफलरने 1970 सालीच या युगाची भविष्यवाणी केली होती. 1950 साली या युगाची पायाभरणी झाली, कारण त्या वर्षी संगणकाने आर्थिक क्षेत्रात प्रवेश केला होता. हे संगणक एकविसाव्या शतकात घरोघर जातील आणि मानवी संस्कृतीचा ते अविभाज्य भाग बनतील, हीदेखील टॉफलरचीच भविष्यवाणी होती.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगाने जगात प्रचंड उलथापालथ घडवून आणली आहे. टॉफलरच्या सिध्दान्तांचा विस्तार करणारी अनेक इंग्लिश पुस्तके आहेत. त्यातील थॉमस फ्रिडमन यांची दोन पुस्तके 'वर्ल्ड इज फ्लॅट' आणि 'फ्लॅट, क्राउडेड' खूप गाजली. नवीन तंत्रज्ञानाने जग सपाट करून टाकले असून विचारवंत आता 'जागतिक खेडया'ची भाषा बोलू लागले आहेत. माहिती तंत्रज्ञान युगाचा विकास औद्योगिक लाटेचाच पुढचा परिणाम आहे. प्रचंड माहिती साठवून ठेवणे, माहितीचे विश्लेषण करणे, अफाट गणिती आकडेमोड करणे, अस्त्रांचे नियंत्रण करणे. गुप्त माहितीचे संकलन करणे अशा असंख्य गरजांतून संगणक तंत्राचा विकास होत होता, तो आजच्या स्थितीला आला आहे. प्रत्येकाच्या हातात असणारा लहानसा का होईना मोबाइल हा छोटा संगणकच असतो. भारतात 1990 साली कुणी याची कल्पना केली नव्हती आणि 2000 सालीदेखील संगणक यंत्रणेचा एवढा विस्तार होईल याची जाणीव फारच थोडयांना असावी.

भावनिक गुंतवणुकीचा ऱ्हास

या तिसऱ्या लाटेची - म्हणजे आजच्या आपल्या जगण्याची वैशिष्टये कशी असतील, हे टॉफलर सांगून गेले आणि आपण तसेच जगत असतो. टॉफलर यांनी 'Transience' असा शब्दप्रयोग केला आहे. त्याचा अर्थ होतो तात्पुरतेपणा. पूर्वी घरातली प्रत्येक वस्तू सजीव वाटत असे. तिच्याशी भावनिक नाते निर्माण होई. आज 'वापरा आणि फेकून द्या'ची संस्कृती आली आहे. असावे घर ते आपुले छान अशी भावना पूर्वी असे. आता वन रूममधून थ्री रूम, फोर रूममध्ये कधी जातो याची प्रत्येकाला आंच असते. पूर्वी नामांकित कंपन्यांत, बँकेत, पोस्ट ऑफिसात किंवा शासकीय नोकरी मिळाली की मुलगा-मुलगी जीवनात स्थिर झाली असे समजण्यात येई. आज सतत नोकऱ्या बदलत राहणे आणि कोणत्याही आस्थापनाशी भावनिक गुंतवणूक न करणे हा स्थायिभाव झालेला आहे. व्यवस्थापक आणि कर्मचारी दोघेही 'वापरा आणि टाकून द्या' या मन:स्थितीत असतात. औद्योगिक युगात कुटुंब लहान झाले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकल माता किंवा पिता अशी कुटुंबव्यवस्था निर्माण होताना दिसते. औद्योगिक युगात कर्मचारी तयार करण्याची शिक्षण व्यवस्था होती. आजच्या अवकाश युगात माहिती तंत्रज्ञानाच्या ज्ञानाला महत्त्व आले आहे. पूर्वी उपभोक्तावाद मर्यादित होता. आता त्याचे रूपांतर चंगळवादात झाले आहे. 'मला काय मिळणार आहे?' हा प्रत्येक कामाचा मंत्र झाला आहे. प्रत्येक गोष्ट उपभोगासाठीच आहे, म्हणून प्रत्येक विषयाचा Event करून जगण्याची चढाओढ सुरू आहे. या युगाने शिक्षण, परिवार, शास्त्रीय संशोधन, प्रसारमाध्यमांची भूमिका, राज्यसत्तेची भूमिका, अशासकीय संस्था, व्यक्तिस्वातंत्र्य, कायदा करण्याच्या समाजाच्या शक्तीविषयी प्रश्न अशा असंख्य विषयांसंबंधी नव्याने मांडणी करण्यास सुरुवात केली आहे.


माहितीचा महापूर

या नव्या युगात नव-लाटेत काय काय होणार आहे, याबद्दलची टॉफलर यांची (1980 सालातील) भविष्यवाणी अशी होती -

* क्वांटम इलेक्ट्रॉनिक, इन्फॉर्मेशन थिअरी, मॉलेक्युलर बायलॉजी, ओशिअनिक इकॉलॉजी, स्पेस सायन्स या क्षेत्रांत नवीन तंत्रज्ञानाच्या विकास होईल. (जीवशास्त्रात आता पशू, मानव यांच्या जिवंत प्रतिकृती करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.)

* अवकाश उद्योगाला सुरुवात होईल. अवकाशातील ग्रहांवर स्पेस शटलद्वारे माणसांची ये-जा सुरू होईल. (लवकरच ते होण्याची शक्यता आहे.)

* मीडियाच्या सार्वत्रिक प्रसारावर बंधने येतील. (Demassification of media) (सोशल मीडियाचे, लोकल चॅनेल्सचे आगमन झालेले आहे.)

* माहितीचा महापूर येईल आणि लोक त्याखाली दबून जातील. पण पुढे आपल्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहे, त्याचाच लोक स्वीकार करतील.

* पूर्वी ज्ञान मौखिक परंपरेने, नंतर ग्रंथ परंपरेने पुढच्या पिढीकडे जाई. या युगात ते लहानशा चिप्सच्या माध्यमातून जााईल.

* स्त्री वर्ग अधिकाधिक बंधनमुक्त होत जाईल.

* राष्ट्र-राज्य संकल्पनेवर आतून आणि बाहेरून आघात होत जातील. सार्वभौमत्वाचा संकोच होईल.

 * ज्ञानाधारित उद्योगांना प्राधान्य मिळेल व ते उत्पादनावर नियंत्रण ठेवतील.

* लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित राहणार नाही. निर्णयातील पारदर्शकतेची मागणी वाढेल.

* पूर्वी एकाच कारखान्यात विशिष्ट वस्तूंचे उत्पादन होई. आज नेटवर्किंगच्या माध्यमातून वस्तूंच्या विविध अंगांचे उत्पादन वेगवेगळया देशांत होत जाईल.

मसल पॉवर ते माइंड पॉवर

येणारे जग कसे असेल याची मांडणी टॉफलर यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी केली. 'पॉवर शिफ्ट' आणि 'रिव्होल्युशनरी वेल्थ' या पुढच्या दोन ग्रंथांत सत्ता आणि संपत्ती यांच्या संकल्पनात कोणकोणते क्रांतिकारक बदल होणार आहेत, याची मांडणी त्यांनी केली आहे. तीही विचारांना नवीन चालना आणि दिशा देणारी आहे. पॉवर शिफ्टचा अर्थ होतो 'सत्तेचा बदल'. हा विषय समजण्यासाठी सत्ता म्हणजे काय आणि ती पूर्वी कोठे होती, आता कोठे असणार आहे याचा विचार करावा लागतो. आपल्याला जे हवे ते दुसऱ्याकडून करून घेण्याची शक्ती म्हणजे सत्ता. कुटुंबप्रमुखापासून ते राष्ट्रप्रमुखापर्यंत आणि गल्लीच्या दादापासून 'डॉन'पर्यंत सत्तेचा खेळ चालत असतो. हिंसा, संपत्ती आणि ज्ञान ही सत्तेची उगमस्थाने आहेत, असे टॉफलर आपल्या पुस्तकात स्पष्ट करतात. हिंसेच्या आधारे सत्ता गाजवणे या गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहेत आणि मानवजात त्याचा स्वीकार करत नाही. इसिसच्या धिक्कार याच कारणासाठी जगभर होत आहे. संपत्तीच्या साहाय्याने लोकांना उपकृत करून, विकत घेऊन किंवा लालूच दाखवून त्यांच्याकडून कामे करून घेतली जातात. व्यक्तिगत स्तरावर हे जसे होते, तसे देशपातळीवरही होत असते. ज्ञानाच्या आधारे सत्ता ही तिसऱ्या लाटेची उत्पत्ती आहे. ज्ञानाधारित सत्तेच्या हाती उपकृत करण्याची, त्याचबरोबर शासन करण्याची अमर्याद सत्ता असते. टॉफलर यांचे म्हणणे असे आहे की आजच्या जगात 'मसल पॉवर'ची जागा 'माइंड पॉवर'ने घेतली आहे.

ज्ञानाच्या क्षेत्राचा विस्तार

तिसऱ्या लाटेच्या जगात ज्ञानाचे क्षेत्र झपाटयाने विस्तारित होत चालले आहे आणि त्यामुळे सत्तेचे उर्वरित दोन आधार - हिंसा आणि संपत्ती यांना दुय्यम स्थान मिळत चालले आहे. आजचे जग ज्ञानाधारित जग आहे आणि जी संपत्ती आज निर्माण होते, ती ज्ञानाधारित संपत्ती आहे. उदाहरणार्थ - कृषी संस्कृतीत जमीन आणि जमिनीवर होणारी उत्पादने ही संपत्ती होती. दुसऱ्या लाटेत कारखाने, उद्योग समूह यांच्या माध्यमातून निर्माण होणारे उत्पादन ही संपत्ती झाली. त्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, धातू, तेल यांची गणना संपत्तीत होऊ लागली. आज ज्ञानाधारित उद्योग हा संपत्तीचा मूलाधार झाला आहे. रोजच्या व्यवहारातील काही उदाहरणे घेतली, तर हा विषय लक्षात येईल. 1990 सालापूर्वी देशात कॉम्प्युटर आणि मोबाइल नव्हते. आज मोबाइलची संख्या 1,034,253,328 (दहा कोटीपेक्षा जास्त) एवढी आहे. मोबाइल हे माहिती तंत्रज्ञान या ज्ञानाधारित व्यवस्थेचे उत्पादन आहे. आज भारतात सॅमसंग, नोकिया, सोनी, एल.जी., कार्बन, लिनोवो, ब्लॅकबेरी, मोटोरोला अशा पंधराहून अधिक मोबाइल कंपन्या आहेत. ज्ञानाधारित उद्योगांची संख्या दिवसेंदिवस झपाटयाने वाढत चालली आहे. त्यातील काही नामवंत कंपन्याची नावे अशी - T.C.S. विप्रो, कॉग्निझन्ट टेक्नॉलॉजी सोल्यूशन, HP इंडिया, HCL टेक्नॉलॉजी, IBM इंडिया इत्यादी.

या सर्व कंपन्या ज्ञानाधारित कंपन्या आहेत आणि त्यांची वार्षिक उलाढाल 147 बिलियन डॉलर्स एवढी आहे. (एक बिलियन म्हणजे 100 कोटी.) या कंपन्या 99 बिलियन डॉलर्सची निर्यात करतात आणि त्यांच्या वार्षिक वाढीला दर 13 टक्के आहे. जागतिक स्तरावर ज्ञानाधारित उद्योग करणाऱ्या 'गुगल'ची वार्षिक उलाढाल 74.54 बिलियन डॉलर्स श्राहे. मायक्रोसॉफ्टची 93.58 बिलियन डॉलर्स आणि फेसबुकची आहे 2.59 बिलियन डॉलर्स. या ज्ञानाधारित उद्योग करणाऱ्या कंपन्यांना IT उद्योग म्हटले जाते. या उद्योगात आता आपल्या देशात 35 लाख लोकांना रोजगार मिळतो.

ज्ञान ही संपत्ती

हा रोजगार कुणाला मिळतो? ज्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे आणि कौशल्य आहे, त्यांना नोकऱ्या मिळतात. त्यांचे पगारही गलेलठ्ठ असतात. वार्षिक सहा-सात लाखापासून ते कोटी-दीड कोटीपर्यंत पे पॅकेज तयार होतात. शिक्षणाची सर्व संकल्पना यामुळे बदलत गेलेली आहे. कारखानदारीच्या काळात कारखान्यात मजुरीचे काम किंवा कौशल्याचे काम करणारे नोकरदार लागत आणि त्यांच्याकडून वक्तशीरपणा, सातत्य, आज्ञाधारकपणा या गुणांची अपेक्षा केली जाई. शालेय शिक्षणही तसेच होते. पूर्वी मुलांची महत्त्वाकांक्षा डॉक्टर किंवा इंजीनिअर होण्याची असे. आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इंजीनिअर बनण्याकडे ओढा असतो. टॉफलर यांनी 'पॉवर शिफ्ट' आणि 'रिव्होल्युशनरी वेल्थ' या दोन्ही पुस्तकांत ज्ञानाच्या आधारे संपत्ती निर्माण आणि त्या आधारे सत्तेत होत जाणारे बदल यांचे विस्ताराने वर्णन केले आहे. अर्थशास्त्राचे भविष्य आणि भविष्यातील अर्थशास्त्र कसे दोन शब्दप्रयोग करून त्यांनी भविष्यातील अर्थशास्त्रांची चर्चा केलेली आहे. माक्र्सचे अर्थशास्त्र, केनचे अर्थशास्त्र आणि मुद्रा अर्थशास्त्र आजचे प्रश्न सोडवण्यास अपुरे आहे, असे त्यांचे मत आहे. अर्थव्यवस्थेत मध्यवर्ती बँकेला (रिझर्व बँकेला) दुसऱ्या लाटेत खूप महत्त्व होते. संपत्तीचे समान वाटप कसे होईल हे पाहणे हे मध्यवर्ती बँकेचे काम होते. आज ज्ञान हीच संपत्ती झाल्यामुळे ज्ञानाचे समान वाटप कसे होणार हा विषय पुढे आलेला आहे.

ज्ञानाधारित उद्योगामुळे माहितीचा महापूर लोटलेला आहे आणि काळ, काम आणि वेग या सर्वांचा नव्याने विचार करणे आवश्यक झालेले आहे. यामुळे मोठमोठया शहरात जर आपण एका चौकात उभे राहिलो आणि पाहात बसलो, तर आपल्याला दिसेल की माणसे, वाहने अतिशय गतीने धावत आहेत. ज्ञानाधारित जगात प्रत्येकांच्या जीवनात एक विलक्षण गती आणलेली आहे. औद्योगिक क्रांतीच्या पर्वात जी नोकरशाही उभी राहिली, तिची गती या नवीन युगाशी विसंगत असते. आणि यामुळे तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न प्रत्येक देशात उत्पन्न झालेले दिसतात. जुने कायदे, जुने नियम, जुन्या रचना, व्यवस्थापनाचे जुने संकेत अशा सर्व गोष्टी झपाटयाने कशा बदलता येतील, हा विषय पुढे येतो. टॉफलर यांच्या भाषेत सांगायचे, तर हे सर्व समाजाला आणि राज्यरचनेला बसणारे धक्के आहेत.

राज्यसत्तेचे झपाटयाने विकेंद्रीकरण

राज्य सर्वसत्ताधारी आणि जनता सार्वभौम या लोकशाहीच्या संकल्पना आहेत. परंतु त्या पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. सार्वभौमत्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे गेलेले आहे आणि राज्याची सत्ता झपाटयाने विकेंद्रित होते आहे. भारतातील उदाहरण द्यायचे, तर माहितीचा अधिकार लोकांना दिल्यामुळे सत्ता राबविणाऱ्याच्या हातातील सत्तेचा फार मोठा भाग स्थानिक स्तरावरील संघटनांकडे गेलेला आहे. त्याचप्रमाणे बहुराष्ट्रीय कंपन्यावर कुठल्याही सरकारला वाटेल की बंधने घालता येत नाही. कोकाकोला एकदा भारतातून हद्दपार झाला, तो पुन्हा आला. मॅगीवर बंदी घातली गेली ती पुन्हा उठविण्यात आली. जागतिक स्तरावर जोपर्यंत रशियाचे साम्राज्य होते, तोपर्यंत सत्ता संतुलन राखले जात होते. 1990 हे जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारे वर्ष आहे. या वर्षी रशिया कोसळला आणि नवीन येणाऱ्या ज्ञानाधारित जगाच्या शर्यतीत तो फार मागे पडला. सत्तेचे संतुलन बिघडल्यामुळे आतापर्यंत दबलेले वंशिक गट, धार्मिक गट यांच्या आकांक्षा उफाळून वर आल्या. त्यांच्या परिणाम म्हणून युगोस्कोव्हया फुटला आणि अरब देशात प्रचंड उलथापालथी व्हायला सुरुवात झाली. टॉफलर यांची भविष्यवाणी अशी आहे - जे देश कालबाह्य विचारांना कवटाळून बसतील आणि अतिरेकी, आणि अविचारी संकल्पना जवळ करतील, विद्वेषाचा आधार घेऊन उभे राहतील, ते देश जगाच्या पाठीवरून नाहीसे होतील.

ग्लोबल ग्लॅडिएटर्स

सत्तेचे विभाजन होत जाणार आहे आणि त्यामुळे अनेक देशांत  सत्तेचा खेळ खेळणारे पण राज्याशी बांधिल नसणारे लोक आणि गट उभे राहतील. इंग्लिशमध्ये त्यांना 'नॉन स्टेट प्लेअर' असे म्हणतात. टॉफलर यांनी त्यांच्यासाठी वापरलेल्या शब्द आहे 'ग्लोबल ग्लॅडिएटर्स'. बहुतेक दहशतवादी संघटना या प्रकारात मोडतात. अल कायदा आणि तालिबान ही त्यांची दोन ज्वलंत उदाहरणे आहेत. राज्याच्या आश्रयाने काम करणारी, परंतु राज्याच्या नियंत्रणाखाली नसणारी ही सत्ता केंद्रे आज जगापुढे मोठे आव्हान ठरली आहेत. टॉफलर यांनी नवीन प्रकारच्या गुप्तहेर यंत्रणेच्या आवश्यकतेची नोंद केली आहे. पारंपरिक गुप्तहेर यंत्रणांच्या साहाय्याने या मंडळींवर काबू आणता येणे अवघड आहे.

मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांवर होणारे परिणाम

'रिव्होल्युशनरी वेल्थ' या पुस्तकात टॉफलर यांनी तिसऱ्या लाटेने ज्ञानाधारित संपत्तीची जी सुरुवात केली आहे, तिचे परिणाम मुस्लीम आणि ख्रिश्चन जगावर कसे होणार आहेत हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ख्रिश्चनाच्या संख्येत झपाटयाने वाढ होत जाईल आणि 2025पर्यंत त्यांची संख्या 2.6 बिलियन एवढी होईल. मुस्लिमांची संख्या 2001 साली 1.2 बिलियन होती, ती 1.8 बिलियन 2025पर्यंत जाईल. मागील 20 वर्षांत युरोपमध्ये मुस्लिमांची संख्या दुप्पट झाली आहे. मुसलमानांची संख्या मलेशियात आणि इंडोनेशियातदेखील वाढत चालली आहे. युरोपात जाणाऱ्या मुसलमानांना 'भूमिहीन मुसलमान' अशी संज्ञा टॉफलर देतात. अरबस्थान ही इस्लामची मुख्य भूमी आहे आणि इंडोनेशिया, मलेशियातील मुसलमान अरबी मुसलमानांपेक्षा वेगळे आहेत. मध्यपूर्वेतील इस्लामच्या प्रभावाला हे दोन्ही विषय कमी करणारे ठरतात, असे टॉफलर यांचे मत आहे.

मध्यपूवर्ेतील मुस्लीम देशांना व्यापारी मार्गामुळे (सुवेझ कालवा) आणि तेलामुळे फार महत्त्व आले. परंतु या तिसऱ्या लाटेत तेलाला झपाटयाने पर्याय शोधला जाईल. लवकरच हायड्रोजनवर चालणाऱ्या लाखो मोटरगाडया बाजारात येतील. मध्यपूवर्ेतील देशांनी तेलात मिळालेला पैसा मदरशांवर आणि दहशतवादी संघटनांवर खर्च केलेला आहे. भावी जग ज्ञानावर चालणार आहे हे या देशांनी लवकर लक्षात घेतले नाही, तर त्या देशांत बेकार, निराश आणि संतप्त युवकांचे तांडेच्या तांडे उभे राहतील. असे दिसते की इस्लामचा संघर्ष इस्लामशीच चालू आहे. सीरिया, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशात मारणारे मुसलमान असतात आणि मरणारेदेखील मुसलमानच असतात. शिया आणि सुन्नी एकमेकांना मारतात आणि शिया व सुन्नी आपल्या गटातील वेगवेगळया पंथांच्या लोकांना मारतात. इस्लामला ज्ञानाधारित जगात यायचे असेल, तर मतस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य लोकांना द्यावे लागेल. मदरशांचे शिक्षण बंद करून ज्ञानाधारित शिक्षण द्यावे लागेल. विज्ञानाच्या आधारावर समाजाची रचना उभी करावी लागेल. ज्ञानाधारित उद्योगांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाचा विकास करावा लागेल.

भारताच्या अध:पतनाचे कारण

ऑलविन टॉफलर यांच्या चार पुस्तकांचा हा अतिधावता आढावा आहे. तो घेण्याचे कारण काय? हा सुरुवातीला उपस्थित केलेला प्रश्न लेखाच्या शेवटाकडे जाताना पुन्हा उपस्थित करावा लागतो. झपाटयाने बदल जाणाऱ्या जगाची दखल सोळाव्या शतकापासून भारताने घेतली नाही, त्याचे परिणाम त्या पिढीने तर भोगलेच आणि आपणही भोगत आहोत. आपल्या पूर्वजांनी जगाचे दरवाजे आपल्यासाठी बंद केले, हे भारताच्या अध:पतनाचे कारण आहे असे विवेकानंदांच्या म्हणण्याचे सार निघते. आज जगाबरोबर राहायचे असेल, जगाच्या पुढे जायचे असेल आणि जगाच्या गुरुस्थानी बसायचे असेल, तर केवळ टॉफलर नाही, तर अनेक अमेरिकन आणि इंग्लिश लेखकांना वाचावे लागते. यापूर्वी एका परिच्छेदात भारतातील ज्ञानाधारित उद्योगांची अत्यल्प माहिती दिलेली आहे. आनंदाची गोष्ट आहे की आपण या क्षेत्रात उतरलो आहोत आणि भरारी मारत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील डिजिटल इंडिया संकल्पना मांडतात.

त्रैवर्णिक विभाजन

एका बाजूला हे चित्र जसे दिसते, तसे दुसऱ्या बाजूला विज्ञान आणि तंत्रज्ञान यामुळे जग कसे बदलत चालले आहे, आपले जीवन कसे बदलत चालले आहे, आपली कुटुंबव्यवस्था व सामाजिक मूल्ये  यांच्यात काय काय बदल होत चालले आहेत, याचा वेध घेणारी वैचारिक पुस्तके मराठी भाषेत अधिक प्रमाणात निर्माण झाली पाहिजेत आणि वाचली गेली पाहिजेत. आपल्याकडे काही विद्वान असे आहेत की त्यांच्या मानगुटीवरून जातीचे आणि मनुस्मृतीचे भूत कधी उतरत नाही. एकूणच जातिव्यवस्थेवर या तिसऱ्या लाटेचे काय परिणाम झाले आणि पुढे काय परिणाम होतील, यांचाही वेध घेतला पाहिजे. भारतात असे दिसते की कृषी कालखंडात जगणारा सर्वात मोठा समूह आहे, औद्योगिक कालखंडात जगणारा दुसरा वर्ग आहे आणि ज्ञानाधारित लाटेवर जगणारा तिसरा वर्ग आहे. आपल्या वर्णाच्या भाषेत सांगायचे, तर हे त्रैवर्णिक विभाजन आहे. कृषी क्षेत्रातदेखील आता झपाटयाने माहिती तंत्रज्ञानाचा, जैविक तंत्रज्ञानाचा, उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीचा प्रचार होऊ लागला आहे. औद्योगिक कालखंडातील उद्योग 1990पासून झपाटयाने बंद होत चालले. मुंबईतील मिल मजदूर संकल्पना आता इतिहासात जमा झाली आहे. त्यांच्या कामगार संघटनादेखील इतिहास झालेला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा क्षेत्रात काम करणारे मुंबई-पुण्यात कैक लाख युवक आणि युवती आहेत. ते कामगार संघटना या संकल्पनेत बसू शकत नाहीत आणि हा बदल इतका वेगवान आहे की काल आजच्यासारखा नसतो आणि आज उद्यासारखा नसतो. आज ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, तो अशिक्षित नसतो. ज्याला sms करता येत नाही, नेट बघता येत नाही, ईमेलचा वापर करता येत नाही, तो निरक्षर ठरतो. शिक्षणाची संकल्पना बदलत चालली आहे. काल जे शिकलो ते आज विसरावे लागते आणि पुन्हा नव्याने शिकावे लागते. जीवनसंघर्ष तीव्र बनत चालला आहे. आणि प्रत्येकावरील ताण मर्यादेबाहेर वाढत चालला आहे. त्याचा अभ्यास झाला पाहिजे. विश्लेषण झाले पाहिजे.

असे विश्लेषण होत नसल्यामुळे भारताचा विचार करता नवनवीन समस्या निर्माण होत चाललेल्या दिसतात. सर्वसामान्य माणसाला जीवनात सुरक्षा हवी असते. सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेचा थेट प्रश्न त्यांच्या अर्थार्जनाशी येतो. नोकरी-व्यवसायाची त्याला हमी हवी असते. आताच्या अतिप्रगत तंत्रज्ञान युगात शेतीतून रोजगार उत्पन्न होण्याच्या शक्यता झपाटयाने कमी होत चालल्या आहेत आणि शेती आतबट्टयाचा व्यवहार ठरू पाहात आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतो आहे. एका शेतकऱ्याची आत्महत्या त्याचे कुटुंब उद्ध्वस्त करून टाकते. कालानुरूप शिक्षणात बदल न झाल्यामुळे नोकरी-व्यवसायाच्या बाजारात तरुणांना काही किंमत राहिली नाही. या कारणामुळे समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या अस्वस्थेतेचे उद्रेक हरियाणातील जाट आंदोलनात, गुजरातमधील पटेल आंदोलनात आणि महाराष्ट्रातील मराठयांच्या मूकमोर्चामध्ये आपण पाहू शकतो.

बदलत्या काळाचे वास्तव

टॉफलर ज्या समाजरचनेसंबंधी विवेचन करतात, त्या समाजरचनेत जाती नाहीत, अस्पृश्यता नाही. भारतात ती आहे. जातिगत विषमता म्हणजे सामाजिक विषमता हे आपल्या समाजाचे वैशिष्टय आहे. या व्यवस्थेमुळे परंपरेने जो वर्ग अधिकारावाचून दूर ठेवला गेला, सत्ता, संपत्ती आणि ज्ञान यापासून दूर ठेवला गेला, त्यांच्यावरील अन्यायाच्या क्षतिपूर्तीसाठी आरक्षणाची व्यवस्था स्वीकारली गेली. हे आरक्षण आज समाजात फार मोठा कळीचा विषय झालेला आहे. आम्हालाही आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी समाजातील प्रगत जाती करतात. त्यामागची भूमिका अशी असते की शासकीय नोकरीत शाश्वतता असते, सुरक्षा असते, आर्थिक उन्नतीची हमी असते आणि सामाजिक सन्मानाची ती एक पायरी असते. यासाठी जाट, गुज्जर, पटेल, मराठा देशभर आंदोलन करताना दिसतात.

टॉफलरच्या विचारसरणीप्रमाणे भविष्यात राज्याचे क्षेत्र संकुचित बनत जाणार आहे. शासकीय नोकऱ्यांचे प्रमाणदेखील कमी होत जाईल आणि पुढे होत जाणार आहे. उदाहरण द्यायचे, तर सध्या रेल्वे तिकीट ऑनलाइन बुकिंग करता येते आणि बहुतेक लोक या मार्गाचा अवलंब करतात. या एका तंत्रज्ञानाने रेल्वेतील किती क्लेरिकल जागा कमी झाल्या असतील, यांचा हिशेब केला पाहिजे. रेल्वेवर लाल डगल्याचे हमाल पूर्वी खूप दिसयाचे. परंतु जेव्हापासून चाके असलेल्या बॅगा आल्या, तेव्हापासून या हमालांचे रोजगार बुडाले. ऑनलाइन सर्व्हिस, डिजिटायझेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शासकीय सेवेतील कारकून भरती दिवसेंदिवस कमीच होत जाणार आहे. मोठमोठे उद्योग आता हजारो कामगार ठेवण्याऐवजी तंत्रज्ञानाची माहिती असणारे मोजकेच लोक ठेवतात आणि अन्य सर्व कामे आउटसोर्स (बाहेर देऊन टाकतात) करतात. शासनसुध्दा याच मार्गाने निघाले आहे. नोकरशाहीचा न पेलवणारा भार शासन उचलू शकत नाही. बदलत्या काळाचे हे वास्तव आहे.

वाईट याचे वाटते की, बदलत्या काळाच्या वास्तवाची जाणीव तरुण पिढीला करून दिली जात नाही. जातीचे अभिनिवेश भरण्याचे काम पटकन केले जाते. आरक्षणाच्या मृगजळामागे धावण्यास सर्वांना लावले जाते. असा आभास केला जातो की आरक्षण ही जादूची कांडी आहे, ती आपल्याला मिळाली की आपले दैन्य आणि दु:ख संपेल. हा आभासी विश्वाचा एक बुडबुडा आहे. तोही आज ना उद्या फुटेल, मग पुढे काय?

टॉफलरची मांडणी मार्मिक, तरीसुध्दा अपूर्ण

ऑलविन टॉफलर हे अमेरिकन आहेत. एका अर्थाने त्यांची पुस्तके अमेरिकन जीवनासंबंधीची आहेत. अमेरिकन संस्कृती भौतिक संस्कृती आहे. प्रत्येकाने जास्तीत जास्त भौतिक सुख प्राप्त करून घेतले पाहिजे आणि त्यांच्या आड कोणतेही अनैसर्गिक बंधने असता कामा नये, ही अमेरिकन स्वातंत्र्याची आणि समाजजीवनाची प्रेरणा आहे. उपभोग हा जीवनाचा मंत्र आहे. अमर्याद संपत्ती गोळा करत जाणे हा आदर्श इहवाद आहे. संपत्ती निर्माणाची वेगवेगळी साधने शोधणे यात अमेरिकेची बुध्दी जेवढी चालते, तेवढी अन्य कुणाची चालत नाही. गुगल, फेसबुक, टि्वटर, संगणक हे सर्व शोध अमेरिकेत लागले आहेत.

आपण जगात राहात असल्यामुळे यापैकी कोणतीही गोष्ट आपण टाळू शकत नाही. तंत्रज्ञानाचा विरोध ही गांधीजींची भूमिका आपण घेऊ शकत नाही. परंतु गांधींनी उपस्थित केलेल्या मूलभूत प्रश्नाकडेही कानाडोळा करू शकत नाही. तो प्रश्न म्हणजे मनुष्य जीवनाचे ध्येय कोणते? अमर्याद भौतिक सुखाची प्राप्ती, भोगलालसा, हे मनुष्य जीवनाचे लक्ष्य राहू शकते काय? भारतातील कोणताही महापुरुष याचे होकारार्थी उत्तर देत नाही. ते सर्व जण एकमुखाने सांगतात की भौतिकतेकडे पाठ फिरवू नका, पण तिच्या मागे धावूदेखील नका. शाश्वत सुखाचा विचार करा. इंद्रियांच्या भोगलालसा पूर्ण करण्यात शाश्वत सुख नाही. या लालसा अमर्याद असतात. त्यांना आपल्यावर स्वार होऊ देता कामा नये. विज्ञान आणि तंत्रज्ञान मनुष्यासाठी आहे. मनुष्य विज्ञान तंत्रज्ञानासाठी नाही. तासन्तास मोबाइल पाहात बसणे यांचा अर्थ असा झाला की आपण मोबाइलचे गुलाम झालो आहोत. मोबाइल मला नाचवणार की मी मोबाइलचा वापर करणार? हा प्रश्न ज्याचा त्याने स्वत:ला विचारला पाहिजे. म्हणून टॉफलरची मांडणी भौतिक जीवनाच्या दृष्टीने मार्मिक आणि चित्र स्पष्ट करणारी असली, तरी ती अपूर्ण आहे.

टॉफलर यांनी मांडलेल्या तीन लाटांचा विचार केल्यानंतर चौथी लाट कोणती असली पाहिजे, याचादेखील विचार केला पाहिजे. योगी अरविंदांनी अत्यंत खोलवर चिंतन करून या चौथ्या लाटेची मांडणी केली आहे. म्हणून तिचा विचार या ठिकाणी करणे अप्रस्तुत होणार नाही.

मानवी बुध्दिवैभवानेच लाटांची निर्मिती

ऑलविन टॉफलर यांनी तीन लाटांच्या माध्यमातून एका अर्थाने मानवी संस्कृतीच्या आर्थिक विकासाची रूपरेखा मांडलेली आहे. ही सगळी रूपरेखा काही गृहीतांवर आधारित आहे. मनुष्याचे भौतिक सुख हेच सर्वोच्च आहे आणि हे सुख साध्य करण्यासाठी वेगवेगळया रचना उभ्या राहतात. एक लाट संपते आणि दुसरी लाट येते हेदेखील एक गृहीत आहे. माणसाची बुध्दी सर्वोच्च आहे आणि या बुध्दिवैभवानेच या सर्व लाटा निर्माण झाल्या आहेत. भौतिक विकासाचा क्रम टॉफलर यांनी मांडलेला आहे. तो तथ्यहीन मुळीच नाही. टॉफलर यांच्या भविष्यवाणीची टिंगलटवाळी अमेरिकेत झाली नाही. उलट येणाऱ्या जगाला सामोरे जाण्याची तयारी अमेरिकेतील उद्योग जगताने केली. शासनाने आणि शिक्षण व्यवस्थेने केली. टॉफलर यांची तिसरी लाट, क्रांतिकारक संपत्ती मानवजातीला कोठे घेऊन जाणार? याच वैज्ञानिक आणि तांत्रिक लाटेतून येणारी चौथी लाट भस्मासुरी लाट तर होणार नाही ना? तेल, कोळसा इत्यादी ऊर्जेचे साठे उद्या संपतील. खनिजांचे साठेही संपतील. जागतिक तापमानात दिवसेन्दिवस वाढच होत जाणार. जीवविविधतेचा झपाटयाने ऱ्हास होत चालत आहे. जेनेटिक बदल करून उद्या कशा प्रकारची माणसे उत्पादित होतील... सांगता येत नाही.

आज मानवजातीला माणसाला दैवी पातळीवर घेऊन जाणाऱ्या लाटेची आवश्यकता आहे. मनुष्य जडातून उत्पन्न झाला की चैतन्यातून, हा वाद खूप जुना आहे. मनुष्य ईश्वराची सर्वश्रेष्ठ कृती आहे हा एक पक्ष आहे, आणि मनुष्य पशुयोनीतून उत्क्रान्त होत निर्माण झाला हा दुसरा पक्ष आहे. दुसऱ्या पक्ष वैज्ञानिकांचा पक्ष समजण्यात येतो. मनुष्य जडातून जीवात वैज्ञानिक नियमांच्या आधारे उत्पन्न झालेला आहे. जडवाद हा पाश्चात्त्य विचारसरणीचा पाया आहे. टॉफलर यांची सर्व मांडणी या जडवादाच्या पायावरच झालेली आहे.

भारतीय विचार असा नाही. आधुनिक काळातील ऋषी योगी अरविंद या विचारांचे श्रेष्ठ भाष्यकार समजले जातात. टॉफलर यांच्या लाटांच्या भाषेत बोलायचे, तर योगी अरविंद चौथ्या लाटेची भविष्यवाणी करताना दिसतात. ही चौथी लाट सर्वच मानवजातीला अतिमनाच्या माध्यमातून अतिमानवाकडे नेणारी, त्याला मूलभूत चैतन्याच्या समीप घेऊन जाणारी असणार आहे. योगी अरविंद यांचे संपूर्ण जीवनच अद्भुत आहे. वडिलांनी त्यांना भारतीय संस्कृतीचा स्पर्श-संसर्गही होऊ नये, याची दक्षता घेतली. सर्व शिक्षण इंग्लिशमधून केले. तेरा वर्षे त्यांना इंग्लंडमध्ये ठेवले. आयसीएसची (आजचे आयएएस) परीक्षा द्यायला लावली. वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत भारतीय अध्यात्माची गंधवार्ता त्यांना नसावी. पण भारतात आल्यानंतर, बडोदा संस्थानात नोकरी करीत असताना प्रथम त्यांनी योगाचा अभ्यास केला. त्यातील त्यांची प्रगती त्यांच्या गुरूंनादेखील आश्चर्यचकित करणारी होती. पुढे अलिपूर जेलमध्ये श्रीकृष्णाचे दर्शन, भगवंताचे आदेश, योगसाधना हा त्यांचा अद्भुत प्रवास आहे. ज्यांना विज्ञान आणि विज्ञानाचे सिध्दान्त माहीत आहेत, जड तत्त्वज्ञान ज्यांना पूर्ण अवगत होते, ते चैतन्य तत्त्वज्ञानाची जेव्हा भाषा बोलतात, तेव्हा तिला फार महत्त्व प्राप्त होते.

जडातून विश्वाची उत्पत्ती झाली हे खरे असले तरी ते अर्धसत्य आहे. जडातच चैतन्य आहे आणि उत्पत्तीबरोबर त्याचाही विकासक्रम सुरू झाला. मनुष्ययोनीत या चैतन्याचा विकास फार झपाटयाने दिसतो. इंद्रिये, मन, बुध्दी आणि आत्मा असा हा विकासक्रम आहे. इंद्रिये भोगलालसा ठेवतात. जडवादी तत्त्वज्ञान या भोगाची मन आणि बुध्दी यांच्याद्वारे पूर्तता करते. टॉफलरची दुसरी आणि तिसरी लाट मन-बुध्दीच्या सामर्थ्यावर उभी राहिली आहे. आजचे जग तर मानवी बुध्दीच्या अफाट सामर्थ्याचे जिवंत रूपच आहे.

प्रश्न असा निर्माण होतो की माणसाचे हे बुध्दिसामर्थ्य त्याला निरतिशय सुख देऊ शकते काय? आज जगात 'हॅपिनेस इंडेक्स'ची चर्चा केली जाते. विज्ञानाने दिलेली सर्व साधने घरात आली खरी, पण त्यांनी सुख आणावे की वेगवेगळया समस्या आणल्या? विज्ञानाचे सुख माकडाच्या पंजातील गोष्टीसारखे आहे. हा जादूचा पंजा इच्छा तर पूर्ण करतो, पण त्याची किंमतही तशीच जबरदस्त मागतो. या कथेचा लेखक W.W. जेकब्ज अमेरिकनच आहे. माकडाच्या पंजाकडे कोणतेही तीन वर मागितले की तो ते पूर्ण करीत असे. एका वृध्द दांपत्याच्या हातात हा पंजा गेला. वृध्दाने त्याच्याकडे दोनशे डॉलर्सची मागणी केली. (कथा 1907ची आहे.) दुसऱ्या दिवशी सुटाबुटातील एक माणूस यांच्या घरी आला आणि त्याने त्यांना दोनशे डॉलर्स दिले. तो म्हणाला, ''काल कारखान्यात यंत्रात सापडून तुमचा मुलगा गेला. त्याची नुकसानभरपाई म्हणून दोनशे डॉलर्स तुम्हाला देण्यासाठी आलो आहे.'' ही बातमी ऐकून ते दांपत्य कोसळले. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे वरदायक आहे. परंतु ते प्रत्येक वराची तशीच किंमत मागत असते.

योगी अरविंद आपल्याला सर्वस्वी वेगळया विश्वात घेऊन जातात. मनुष्याची उत्क्रांती चैतन्याचा विकासात आहे. मनाच्या उच्चतर अवस्थेत आहे. मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत चैतन्यमय मनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनुष्य ज्या चैतन्यातून आला आहे, त्या चैतन्याचा समीप जाण्याचा मनुष्याचा प्रवास राहणार आहे. ते कसे घडून येईल, त्यासाठीची योगसाधना कोणती आणि हे घडून येणे का अपरिहार्य आहे, याचे तर्कशुध्द विवेचन योगी अरविंदांनी केले आहे. साध्या भाषेत सांगायचे तर सृष्टीच्या आरंभी चैतन्य होते, त्याचाच विकास होत चाललेला आहे. आणि सर्व मानवजातीला या चैतन्याची अनुभूती होण्यात त्याची परिणती होईल.

जड तत्त्वज्ञानाचा विकास पाश्चात्त्य संस्कृतीने केला आहे. आध्यात्मिक शक्तीचा विकास भारताला घडवून आणायचा आहे. औद्योगिक क्रांतीची लाट किंवा ज्ञानाधारित संस्कृतीची लाट पाश्चात्त्य जगात निर्माण झाली. आता मानवजातीला या चौथ्या लाटेची आवश्यकता आहे. त्याच्या काही पाऊलखुणा जगात उमटू लागल्या आहेत. युनोने अनेक भारतीय विषय उचलले आहेत, ज्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस, पर्यावरण दिवस, महिला दिन यांचा उल्लेख करावा लागेल. आपली एक जीवनपध्दती आहे. या जीवनपध्दतीत सर्व प्राणिमात्रांच्या जगण्याचा अधिकार मान्य केलेला आहे. सत्य एकच असले, तरी त्याची अभिव्यक्ती वेगवेगळया प्रकारे होत असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा टोकाचा आग्रह आपल्या जीवनशैलीत बसत नाही. आपण नेहमी मध्यममार्गाच्या शोधात असतो. विज्ञान, तंत्रज्ञान तर आम्हाला हवेच आहे आणि त्याच वेळी मानवी चैतन्याचा विकासही आम्हाला साधायचा आहे. या दोघांचे संतुलन ही या काळाची गरज आहे. परिवार उद्ध्वस्त होत आहेत. व्यक्तिजीवनात एकाकीपण येत चालले आहे. असुरक्षेची भावना मोठया प्रमाणावर वाढत चालली आहे. नातेसंबंधातील ओलावा कमी होत चालला आहे. या परिणामांची चर्चा जशी आवश्यक आहे, तशीच विज्ञान तंत्रज्ञानाने हे परिणाम घडवून आणले आहेत, त्याला आपल्या मूल्यव्यवस्थेत कसे बसवायचे याचीही चर्चा आवश्यक आहे. जुन्या व्यवस्था बदलत जाणार. हा बदल कोणाला थांबविता येणार नाही. परंतु जीवनमूल्ये बदलण्याची गरज नसते. जीवनमूल्यांवर आधारित नवीन रचना हे आपल्यापुढील मोठे आव्हान आहे.

vivekedit@gmail.com