युध्दाकडून बुध्दाकडे...

विवेक मराठी    29-Oct-2016
Total Views |

उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणारे सर्जिकल स्ट्राइक करून भारतीय लष्कराने आपल्या मनगटातील ताकद केवळ शत्रुराष्ट्रालाच नाही, तर अवघ्या जगालाच दाखवून दिली. शांतताप्रिय आणि सहिष्णू वृत्तीच्या भारत देशाकडून असा पवित्रा घेतला जाणे हे सर्वांना अनपेक्षित होते. आपल्या ताकदीचे आणि लढवय्या वृत्तीचे यथायोग्य दर्शन घडवण्यापासून येथील राज्यकर्त्यांनी भारतीय लष्कराला गेली काही वर्षे वंचित ठेवले होते. या निद्रिस्त पौरुषाला जागवण्याचे काम विद्यमान राज्यकर्त्यांनी केले.


वास्तविक युध्दखोरी हा या देशाचा स्वभाव नाही. इथल्या राज्यकर्त्यांनी युध्दे केली ती दुर्जनांच्या निर्दालनासाठीच. सर्वत्र सुखशांती नांदावी हा विचार इथल्या मातीत शतकानुशतके रुजलेला आहे. मात्र आमच्या शांतिप्रियतेचा चुकीचा अर्थ कोणी काढला, तर त्याला त्याची जागा दाखवण्यात आम्ही कुचराई करत नाही. याच्या पुष्टयर्थ रामायण-महाभारत-बुध्दकाळातील दाखले तर देता येतीलच, तसेच स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या दोन अणुस्फोट चाचण्याही त्याचेच प्रतीक आहेत. विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झालेल्या यशस्वी अणुस्फोट चाचण्या बुध्द पौणिर्मेला झाल्या होत्या. पैकी पहिली चाचणी यशस्वी झाल्यानंतर, 'आणि बुध्द हसला..' या सांकेतिक भाषेत मोहीम फत्ते झाल्याचे पंतप्रधानांना कळवण्यात आले होते. अणुस्फोट चाचणी ही भारत स्वसंरक्षणासाठी सज्ज असल्याचा जगाला दिलेला इशारा होता, जो देणे ही काळाची गरज होती. दुबळयांच्या अहिंसेला मोल नसते, हे कळण्याइतके आमचे राज्यकर्ते धोरणी होते, आजही आहेत.

आमचा प्रवास युध्दाकडून बुध्दाकडे... या दिशेने होणारा आहे. आम्ही युध्द करतो ते शांततेच्या प्रस्थापनेसाठी. सर्जिकल स्ट्राइकला पाठिंबा देणाऱ्या आजच्या राज्यकर्त्यांचे विचारही तेच आहेत. 'युध्दाचा नव्हे तर, बुध्दाचा देश' ही देशाची खरी ओळख  मुखपृष्ठाच्या माध्यमातून पोहोचवली आहे. विवेक परिवाराशी गेली अनेक वर्षे जोडले गेलेले नामवंत चित्रकार किशोर नादावडेकर यांच्या समर्थ कुंचल्यातून हे चित्र साकारले आहे. त्यामुळे दिवाळी अंकाच्या विशेष मेजवानीला मुखपृष्ठापासूनच सुरुवात झाली आहे, असे म्हणता येईल.

विवेकचा दिवाळी अंक हा वाचकांसाठी बौध्दिक, वैचारिक खुराक असतो. त्याच परंपरेला हाही अंक आहे. विचारप्रक्रिया आणि विचारधारांचा प्रवास याचा ऊहापोह करणारा दिलीप करंबेळकर यांचा लेख एका मूलभूत विषयावर वेगळया वाटेने विचार करायला भाग पाडेल. ऑलविन टॉफलर या भविष्यवेधी विचारवंत अमेरिकन लेखकाचे विचार आणि भारतीय तत्त्वज्ञान यांच्यातील साम्य-फरकाचा वेध रमेश पतंगे यांनी घेतला आहे.

'मेक इन इंडिया' हा आजच्या जगाचा मंत्र आहे. पण त्याचा मर्यादित अर्थ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. यापलीकडे अनेक अर्थांच्या आणि त्यानुसार क्रियाशील होण्याच्या शक्यता या मंत्रात दडल्या आहेत. त्या अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखवल्या आहेत प्रा. डॉ. ज्येष्ठराज जोशी आणि प्रा. डॉ. मिलिंद सोहोनी या शास्त्रज्ञद्वयाने. हा लेख वाचकांना 'मेक इन इंडिया'विषयी नवी दृष्टी प्राप्त करून देईल. तर इस्रोच्या आजवरच्या देदीप्यमान वाटचालीचा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळ फोंडके यांनी रेखाटलेला प्रवास, भारतीय अवकाश संशोधकांबद्दल आणि त्यांनी उभारलेल्या अनमोल कार्याबद्दल आपल्या मनात आदरभाव निर्माण करेल.

निर्विवाद बहुमत मिळवत भाजपाचे सरकार सत्तेत आले आणि अनेकांना अचानक या देशात व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचे भास होऊ लागले. त्यातून पुरस्कारवापसीचा नवा अध्याय सुरू झाला. एकूणच सामाजिक वातावरण गढूळ होण्यास अशा घटनांनी सुरुवात झाली. देशभक्त आणि देशद्रोही या दोन संकल्पनांचा वापर फार सैलपणे होऊ लागला. या पार्श्वभूमीवर, आजच्या काळात भारतीय राष्ट्रवादाची अभिव्यक्ती कशी असावी, याचा ऊहापोह करणारा परिसंवाद घेतला आहे. रंगा हरीजी, डॉ. शेषराव मोरे, डॉ. सदानंद मोरे, मिलिंद कांबळे, मंदार भारदे आणि डॉ. नीलम गोऱ्हे या मान्यवरांचा परिसंवादात सहभाग आहे. यातील प्रत्येकाचे कार्यक्षेत्र भिन्न असल्याने विषयाशी संबंधित अनेक आयाम परिसंवादाच्या माध्यमातून समोर आले आहेत. (वास्तविक अब्दुल कादर मुकादम हे ही या परिसंवादात सहभागी होणार होते, मात्र त्यांच्या व्यस्ततेमुळे ठरलेल्या तारखेपर्यंत ते लेख देऊ शकले नाहीत.)

मुस्लीम प्रश्नाचे गाढे अभ्यासक असलेल्या डॉ. प्रमोद पाठक यांनी आपल्या लेखातून, मुस्लिमांनी आपल्या मानसिकतेत सर्वसमावेशकता आणण्याची गरज अधोरेखित केली आहे.

गुरुदेव टागोरांच्या शांतिनिकेतनची वैशिष्टये उलगडून दाखवणारा रेणू दांडेकर यांचा लेख, चक्रवर्ती सम्राट अशोकाची थोरवी सांगणारा डॉ. अरुणचंद्र पाठक यांचा लेख, तर पुस्तकविक्रीच्या व्यवसायातून अनोखे अनुभव गाठीशी जमा झालेल्या शशिकांत सावंत यांच्या लेखांनी अंकाच्या समृध्दतेत भर घातली आहे.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा आजवरचा उद्बोधक इतिहास विद्याधर ताठे यांनी दीर्घ लेखातून मांडला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक गो.नी. दांडेकर आणि रा.स्व. संघ यांच्यातील नाते उलगडले आहे प्रा. श्याम अत्रे यांनी, तर रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक राजाभाऊ लवळेकर यांचे शब्दचित्र उभे केले आहे डॉ. अनघा लवळेकर यांनी. कविश्रेष्ठ जयदेवाच्या 'गीतगोविंद' या अजरामर काव्यातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवली आहेत मंदाकिनी गोडसे यांनी.

मंगला गोडबोले, सुप्रिया अय्यर, रेखा बैजल, कृ.ज. दिवेकर या नेहमीच्या वाचकप्रिय कथाकारांबरोबरच यंदा शेफाली वैद्य, सुरेंद्र पाटील यांच्या कथांची भर पडली आहे. नव्या-जुन्या कवींच्या रचनांची काव्यमैफल आणि व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांची नर्मविनोदी व्यंगचित्रे यांनी सजलेला अंक वाचकांसमोर सादर करताना आनंद होत आहे.

हा दीपोत्सव आमच्या वाचक-हितचिंतक-जाहिरातदार-वर्गणीदार-पालक यांच्या मनात विवेकाचे लक्ष लक्ष दीप उजळो, ही प्रार्थना!