नायजेरीयन लग्न

विवेक मराठी    29-Oct-2016
Total Views |

***राजेश कापसे***

एक दिवस संध्याकाळी आमच्यासोबत काम करणारा डॉ. ल्युक त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला. लग्नाचे निमंत्रण द्यायला जायचे असेल तर आपल्याकडे आपण तांदळाच्या अक्षता घेऊन जातो. मग ज्यांना पत्रिका दिली जाते ती व्यक्ती तुमचं अभिनंदन करते व तोंड गोड करायला काहीतरी देते. दक्षिण नायजेरियात लग्न पत्रिका द्यायला जाताना पत्रिका आणि वाईनची बाटली देण्याची पध्दत आहे. हा आमचा डॉक्टर लग्नपत्रिका व वाईनची बाटली घेऊन आला. कला बारला लागून असलेल्या ऍक्वाईबोम राज्यात त्याचे लग्न होते. आम्ही त्याच्या लग्नाला जायचे ठरवले. नायजेरियन विवाह कसे जुळतात, हुंडापध्दत, जातीभेद याबद्दल त्याच्या लग्नाला जाताना बऱ्याच गप्पा झाल्या. आपल्याकडे मुलगी बघायला जाणे, चहा-पोहे, बोलाचाली, हुंडा, सुपारी फोडणे, साखरपुडा, लग्न, मग मधुचंद्र...असा क्रम असतो पारंपरिक पध्दतीत. आता बरंच बदलतंय. अर्थात, मुलीच्या कुटुंबाने मुलाला हुंडा देण्याची पध्दत आणि विशेषत: एकाच जातीत विवाह करणे या प्रमुख गोष्टी आपल्याकडे लग्संस्थेत आढळून येतात. मुलीच्या लग्नाचा खर्च, हुंडा यामुळे अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्न आपल्याकडे अजूनही दिसून येतात. शेतकरी आत्महत्येचे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते, स्त्रीभ्रूणहत्येचेही हे एक महत्त्वाचे कारण आहे.


नायजेरियात लग्नसंस्थेत आपल्यापेक्षा काही वेगळया पध्दती आहेत. सगळयात महत्त्वाचा फरक म्हणजे इकडे मुलाने मुलीकडच्यांना हुंडा द्यायचा असतो. ही पध्दत साधारणत: संपूर्ण नायजेरियात दिसून येते. हा सामाजिक पध्दतीतील खूप मोठा बदल जाणवला. कदाचित त्यामुळे इथे स्त्रीभ्रूणहत्येबाबत फार कधी एकले नाही. वंशाचा दिवा-वंशपुढे चालू राहावा म्हणून मुलगा असला पाहिजे असा आग्रह असतो पण मुलगी झाली तर तिचा द्वेष कुणी करत नाही अथवा भ्रूणहत्या केली जात नाही. लिंग निदानावर प्रतिबंधही नाही. लग्नाआधी मुलाला जो हुंडा द्यावा लागतो त्या पैशांतून मुलीच्या भावी संसारासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेतल्या जातात. काही कुटुंब त्या वस्तू विकत घेण्यासाठी स्वत:ची पदरमोड करतात, पण मुलांकडून तसा आग्रह मुळीच नसतो. काही जमाती मुलाने दिलेली रक्कम स्वीकारता, पण आदरपूर्वक ती मुलाला परत करतात. त्यामागची भावना ही की आम्ही आमची मुलगी विकत नाही, ती आमच्याच कुटुंबाचा घटक आहे.

इथेही पुरूषप्रधान संस्कृतीच आहे. इथे महिला गावाची प्रधान होऊ शकत नाही किंवा कोलानट(इकडचे सुपारीसारखे महत्वाचे फळ) फोडू शकत नाही. पण हुंडा पध्दत(सामाजिक अर्थकारण) आपल्या नेमकी विरूध्द असल्याने किती मोठा फरक आहे. सामाजिक प्रश्नांमध्ये शेतकरी आत्महत्त्येबद्दल फार कधी ऐकले नाही का स्त्री भ्रूणहत्येबद्दल. पण इकडे उपासमारीमुळे मृत्यू होतात. अर्थात तो ही मनुष्यनिर्मित असा एक वेगळा विषय आहे.

इथे काही जमातींमध्ये जातीभेद असल्याचे ऐकले आणि नंतर वाचले. इबो नावाच्या जमातींमध्ये ओसू (हा शब्द वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे) जातीव्यवस्था थोडयाफार प्रमाणात दिसून येते. आपल्याकडे वाघ्यामुरळी हा जसा प्रकार तसाच हा. ही मंडळी देवाला अर्पण केलेली. म्हणून खालच्या जातीची, अस्पृश्य. वरच्या जातीतले लोक या खालच्या जातीतील लोकांशी विवाह करत नाहीत. वरच्या जातीतील व्यक्तीने खालच्या जातीतील व्यक्तीशी विवाह केला तर वरच्या जातीतील व्यक्तीच्या कुटुंबातील सर्वजण खालच्या जातीचे होतात व त्यांना धर्मभ्रष्ट समजले जाते. ही प्रथा नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. कायद्याने पण बंदी आणली गेली, पण अजूनसुध्दा ही प्रथा कमीअधिक प्रमाणात अस्तित्वात आहे. समजा, अमेरिकेत या भागातील वरच्या जातीतील व्यक्ती विवाह करत असेल, तर त्याचा भावी जोडीदार खालच्या जातीतला तर नाही ना? यासाठी त्याच्या घरचे पूर्र्ण चौकशी करतात. काही वर्षांपूर्वी तर चर्चमध्येसुध्दा यांची बसण्याची व्यवस्था वेगळी असे!

आमच्या या डॉक्टर मित्राच्या नातलगांसोबत गप्पा मारताना नायजेरियन समाजजीवन अधिक विस्तृतपणे समजू शकलो. लग्नसमारंभ पण एक मनोरंजक प्रकार होता. महिलांच्या वेगवेगळया केशरचना, पुरुषांच्या टोप्या आणि अजब पेहराव...लग्न लावण्याची परंपरागत पध्दत...मस्त अनुभव होता.

समारंभ म्हटलं, की नटूनथटून जाणे हा मनुष्यस्वभाव. मग पृथ्वीतलावर तुम्ही कुठेही जा. नायजेरियातील लग्नसमारंभही त्याला अपवाद नाही. साधारणत: सुट्टीच्या दिवशीच मोठया प्रमाणात लग्नांच्या तारखा असतात. आपल्याकडे जसे लग्नसमारंभासाठी घरातून कुणीतरी गेले पाहिजे, असा आग्रह असतो तसाच नायजेरियातसुध्दा आहे. इकडे लग्नसमारंभासाठी ड्रेसकोड असतो. एकाच प्रकारचे, एकाच रंगांचे मोठे कापड घेऊन, सगळे त्याचाच पेहराव करून येतात. ही पध्दत पाश्चिमात्य जगातसुध्दा असल्याचे कळले. तसेच इकडे टोप्यांचेही अजब प्रकार. महिला व पुरूष वेगवेगळया पध्दतीच्या टोप्या घालून समारंभासाठी येतात. ह्या पध्दतीतून पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव दिसतो.


पण महिलांची केशरचना हा नायजेरियातच नाही तर संपूर्ण आफ्रिकेत एक अत्यंत कुतूहलाचा आणि जगावेगळा प्रकार आहे. इथे प्रत्येक महिलेची केशरचना आणि केसांचा पोत वेगळा दिसतो. कोणाच्या डोक्यावर अमेरिकन स्टाईलचे केस तर कोणाच्या डोक्यावर भारतीय स्टाईलचे केस तर कोणाच्या डोक्यावर चक्क जटा! बरं, प्रत्येक 15 दिवसांनी स्टाईल व केसांची ढब बदललेली दिसते. मला ह्याचे खूप कुतूहल वाटायचे. या लग्नात एकाला याचे रहस्य विचारले तर तो म्हणाला, मुळात या महिलांची केस लहान असतात, अगदी पुरूषांसारखे. मग हेअर विव्हींग करून जसे हवेतसे केस व केशरचना केल्या जातात. ज्याच्याकडे जेवढे पैसे त्यानुसार केसाचा प्रकार आणि स्टाईल बदलण्याचा कालावधी बदलतो. समजा, एखादी महिला श्रीमंत असेल तर ती प्रत्येक आठवडयात केसांची स्टाईल बदलते, जर गरीब असेल तर महिन्यातून एकदा. आफ्रिका हा खंड केसांची मोठी बाजारपेठ आहे. मला टक्कल पडल्यामुळे वाटणारी काळजी ह्या केशरचनेच्या नवीन प्रकारामुळे कायमची हद्दपार झाली. अभाव ही कल्पकतेची जननी आहे.

'कन्या वरयते रुपं, माता वित्तं, पिता श्रुतम्, बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरेजना:' हे संस्कृत सुभाषित जगात सगळीकडेच लागू पडते. मग तो नायजेरिया असो वा इंग्लंड किंवा भारत. लग्नात खायला प्यायला चांगले हवे. इकडे लग्नात पाउंडेड याम (याम हे कंदमुळं उकडून मग ते कुटतात व त्याचा उंडा तयार केला जातो.) साधारणत: आपल्याकडे रताळे किंवा बटाटे उकडून त्याचा कुटून गोळा तयार केला तर कसा लागेल तशीच चव असते. नायजेरियातील शाकाहारी लोकांसाठी हे एक उत्तम अन्न आहे. अगदी उपवासालाही चालू शकते! तर हा यामचा मोठा गोळा आणि चिकनचे सूप किंवा मटणाचे सूप यासोबत खायची पध्दत आहे. तुम्ही शाकाहारी असाल तर मग पालेभाजीच्या सूपसोबत किंवा भाजीसोबतसुध्दा याचा आस्वाद घेऊ शकता. या यामचेच चिप्ससुध्दा तयार केले जातात. तसेच इथला फेमस पारंपरिक पदार्थ म्हणजे जेगारी. याम सारख्याच कंदमुळाचे बारीक पिठ तयार केले जाते व ते उकडून खातात. साधारणत: रव्याचा उपमा जसा (मीठ न घालता) लागतो तसाच हा पदार्थ.

एक मजेशीर डिश म्हणजे उकडलेली किंवा भाजलेली केळी. अर्धकच्ची केळी उकडून अथवा भाजून पेपे सॉस (मिरचीचा ठेचा) सोबत खाल्ली जाते. वऱ्हाडाकडच्या लोकांसाठी किंवा मराठवाडयातील लोकांसाठी एक मस्त डिश आहे. तसेच फुफू (केळीच्या पानात ठेवून उकडलेले कंदमुळाच पीठ) त्यात क्रे फिश टाकून तयार केला जातो. ज्या लग्नात क्रे फिश असतो ती व्यक्ती श्रीमंत. लग्न समारंभात क्रे फिश असलाच पाहिजे. फळं मोठया प्रमाणात उपलब्ध असल्याने प्रत्येक लग्न समारंभात फ़्रूटबास्केट असतेच. जगात कुठेही जा...भात हा उपलब्ध असतोच. नायजेरियात जोलेफ राईस प्रसिध्द आहे. त्यासोबत स्टू व सॉस खाण्याची पध्दत आहे. हे खाद्यपदार्थ संपूर्ण नायजेरियात मिळतात. डोसा जसा असतो तसाच प्रकार उत्तरेकडे मिळतो, त्याला मासा म्हणतात. तो खरपूस भाजलेल्या व मस्त मसाला लावलेल्या चिकन व कांद्यासोबत खाल्ला जातो. आपल्यासारखीच उकडलेले शेंगदाणे, मक्याचे भाजलेले कणीस खाण्याची पध्दत इथेही आहे. आपल्याकडच्या बटाटेवडयासारखाच पदार्थ म्हणजे इकडचा अकारा. हा तिखट आणि गोडही असतो. थोडक्यात सांगायचे तर सोवळी आज्जी नायजेरियात आली तरी उपासमारीची वेळ येणार नाही. इतरांसाठी तर खाद्यपदार्थाची रेलचेल आहेच.

दक्षिण नायजेरियात लग्नात मदिरा असतेच. बियर, व्हीस्की, तसेच आपल्याकडे जशी ताडीमाडी असते तशीच इकडे पाम वाईन मिळते. धुंद होऊन नाचगाणे हे ठरलेलेच. मनुष्य प्राणी कमीअधिक प्रमाणात सगळीकडे सारखाच!!!

लग्नसमारंभाची पध्दत वेगळी पण रंजक आहे. इकडे दोन प्रकारच्या विवाहपध्दती आहेत. एक पारंपरिक विवाहपध्दत आणि दुसरी म्हणजे चर्चमध्ये जाऊन लावले जाणारे लग्न. बरेच जण पारंपरिक विवाहपध्दतीने विवाह करतात. नावांच्या बाबतीतही तसेच आहे प्रत्येकाचे एक पारंपरिक नाव असते व एक इंग्लिश नाव असते.

जसे, अबायोमी (जी आनंद घेवून येते अशी) इक्पेमे (आडनाव). आडनावांना अर्थ का नाही हे विचारू नका, कारण आपल्याकडील 99% लोक ह्याचे उत्तर देऊ शकणार नाहीत. माझ्या गुजराती मित्राने, माझ्या 'कापसे' या आडनावांचा अर्थ 'कॉटने'(cotton या इंग्लिश शब्दाला ने हा प्रत्यय लावून तयार केलेले) आहे असे एका इंग्रज मित्राला सांगितले होते! तेव्हापासून आडनावांचा अर्थ काढण्याच्या फंदात मी पडत नाही. असो, तर अबायोमी या नायजेरियन मुलीचे एक दुसरे इंग्लिश नाव असतेच (त्याच अर्थाचे नाही). मुलींच्या नावांमध्ये ब्लेसिंग, कंम्फर्ट, रोज, प्रॉमिस अशी वापरातील -इंग्रजी शब्दांची नावं असतात. तर मुलांच्या इंग्रजी नावांमध्ये मी फ्रायडे, संडे, मंडे ही नावेही ऐकली आहेत. बाकी जोसेफ, व्हिक्टर इ. नावे कॉमन आहेत. मुलांची लोकल नावे जशी अबियोडून (सणांच्या कालावधीत जन्माला आलेला), अबेगुण्डे (सुटीच्या दिवशी जन्माला आलेला) इ. ऐकण्यात येतात. मुलगा आणि मुलगी दोघांनीही वापरता येतील अशीही नावं आढळून येतात. आपल्याकडे जसे तारा, संजू, मनू तसे..

लग्नसमारंभ अजून सुरू व्हायचा होता. माझ्या गप्पा सुरू होत्या. लग्नसमारंभ ही एक अशी इंटरेस्टींग चीज आहे की जिथे तुम्हाला संपूर्ण समाजव्यवस्था नीट कळू शकते. अर्थात गप्पा मारायची तयारी आणि मानसिकता असेल तर...

मला प्रश्न होता, नायजेरियातील घरात पाहुण्यांचे स्वागत कसे केले जाते? ज्यांना प्रश्न विचारला त्या गृहस्थाचे घर लग्नमंडपाजवळच होते. हा भला माणूस मला चक्क त्याच्या घरी घेऊन गेला. त्याने एक कोलानट, पाण्याची बाटली, वांगं एका प्लेटमध्येआणले. म्हणाला फोडा कोलानट आणि खा. कच्चं वांगं ही खायचा आग्रह त्याने केला. दक्षिण नायजेरियात एखाद्या घरात गेल्यानंतर कोलानट, वांगं आणि पेयपदार्थ कुणी तुमच्यासमोर आणून ठेवल, तर समजा त्याने तुमचे मन:पूर्वक स्वागत केले. मी कोलानट फोडली आणि खायला सुरुवात केली. तुरट चव, त्यावर पाणी प्यायले की जी भगोड पडते, आवळा खाऊन पाणी पिल्यानंतर होते नेमके तसेच. कोलानट शेंगदाण्यासोबत खाण्याची पध्दत आहे. मग मी कच्चे वांगे खायला उचलले. पण आश्चर्य म्हणजे नायजेरियातल्या वांग्याची चव कडवट मुळीच नव्हती. चवच नव्हती म्हणाना. ते खायला मजा आली. आम्ही लग्नसमारंभाकडे निघालो.

जगात सगळीकडेच लग्न म्हणजे धमाल असते. नायजेरियात जशी आर्थिक परिस्थितीत संलग्न स्थळ, लग्नावर केला जाणारा खर्च या गोष्टी अवलंबून असतात. श्रीमंत मंडळी लग्नासाठी स्टेडियम बुक करतात तर सामान्य मध्यमवर्गीय माणूस आपल्या घराजवळच्या परिसरातच लग्नमंडप टाकून लग्न लावतो.

माझ्या डॉक्टर मित्राचं लग्न त्याच्या होणाऱ्या बायकोच्या राहत्या घराजवळच्या मोकळया शेतात मांडव थाटून लावण्यात आलं होतं. या मोकळया शेतात विशेष अतिथींसाठी साधारणत: चार विशेष छोटेखानी शामियाने आणि एक मोठा शामियाना इतर पाहुण्यासाठी उभारण्यात आला होता. या लग्नमंडपाला लागूनच नववधूचे राहाते घर होते. सगळया शामियान्यांत पांढऱ्या प्लास्टिकच्या खर्ुच्या लावण्यात आल्या होत्या. प्रत्येक समारंभात विशेष अतिथींसाठी एक हाय टेबल असते तसेच इथेही होते.

जिथे लग्न लागणार होते तिथे प्रवेश करताच डाव्या बाजूस एक मंडप बॅंडपथक व नृत्यांगनांसाठी, उजव्या बाजूस एक मंडप नवऱ्याचे आई-वडील, बहिण इत्यादींसाठी, समोर एक विशेष मंडप हाय टेबलसाठी व त्याच्या बाजूस असलेला मोठा मंडप इतर पाहुण्यांसाठी होता.

वरांकडील मंडळींनी पाहुण्यांनी इथल्या प्रथेनुसार साधारणत: सारख्याच रंगाचा पोषाख केला होता. पण त्याचे वडील, आई आणि बहिणींनी विशेष कपडे परिधान केले होते. नवऱ्या मुलाचा पोषाख म्हणजे मखमली लुंगी ज्यावर सुंदर जरी व नक्षीकाम केलेले होते, त्यावर झगमगीत झब्बा-कुर्ता, डोक्यावर मखमली टोपी (आपल्याकडे कव्वालीत घालतात तशी टोपी), खांद्यावर एक झगमगीत रूमाल. कमीअधिक तसाच पोषाख त्याच्या वडिलांचा. वराच्या आईनेही सुंदर जरीचा नायजेरियन ड्रेस व नायजेरियन महिला एक सुंदरसा रेखीव फेटा घालतात तसा फेटा डोक्यावर परिधान केला होता. नवरीने सुंदर रेशमी ड्रेस व डोक्यावर नाजूक नक्षीकाम केलेला फेटा घातला होता.


लग्न भटजीशिवाय लागणार कसे? या लग्नासाठी एक पास्टर (ख्रिश्चनपादरी) आला होता तसेच पारंपारिक विवाहपध्दत सांगण्यासाठी गाव प्रधान उपस्थित होते. लग्नविधीबद्दल लाइव्ह कॉमेट्री देण्यासाठी एक सूत्रसंचालकसुध्दा उपस्थित होता. अर्थात सध्याच्या युगात लाउड स्पीकरशिवाय लग्न ते कसले! चार मोठे स्पीकर्स चार बाजूस लावण्यात आले होते.

सगळयात सुरूवातीला नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांचे  करण्यात आले. बॅंड वाजवण्यात आला. नवऱ्याकडून आलेल्या सर्वांनी जोरजोरात घोषणा दिल्या. नवऱ्या मुलाने हात उंचावत  संपूर्ण मंडपातून चक्कर मारली. मग त्याला मध्यभागी उभे करण्यात आले. परत बँड. मग नवरी मुलगी नटूनथटून आली. ती व तिच्या मैत्रिणींनी सुंदर नृत्य करत संपूर्ण मंडपाची प्रदक्षिणा केली व स्वत:ची ओळख करून दिली. सर्वांनी तिचे टाळया वाजवून जोरदार स्वागत केले. नवरानवरी मंडपातून जात असतांना त्यांच्यावर पैसे उधळण्यात आले. बँड वाजवण्यात आला. मग तिला नवऱ्यामुलाच्या शेजारी उभे करण्यात आले.


तितक्यात ग्रामप्रधान चिडून उठले आणि मंडप सोडून जायला निघाले. एकच गोंधळ माजला. ते चिडले होते कारण प्रथेनुसार वाईनची बाटली हाय टेबलावर ठेवण्यात आली नव्हती. सर्वांनी त्यांना समजावून सांगितले, वाईनची बाटली लगेच आणली गेली व ती हाय टेबलावर ठेवण्यात आली. ते कसेबसे शांत झाले व परत लग्न समारंभ सुरू झाला.

नवरानवरीच्या पालकांना बोलावण्यात आले. मग गावप्रधान वाईनची बाटली घेऊन गेले. त्यांनी थोडी वाईन जमिनीवर ओतली व थोडी एका ग्लासात भरली. मग त्यावर जादूमंतर करून वर आणि वधूस ती प्यायला सांगितली. पास्टरने बायबलमधील काही भाग वाचले व दोघांनाही शपथ घ्यायला सांगितली आणि लग्न झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर सुंदर नृत्य सादर करण्यात आले, बँड वाजवला गेला मग जेवणासाठी हायटेबलवरील बसलेल्या आम्हा सर्वांना घरात बोलावण्यात आले.

एका भल्यामोठया टेबलावर वेगवेगळया डब्यांमध्ये खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. मग प्रार्थना करण्यात आली आणि लोकांनी ताटांमध्ये जेवण घेऊन खायला सुरुवात केली. आपल्यासारखेच लोक इकडे हातानेच जेवण करतात, काटयाचमच्याने नव्हे. टेकअवे जेवणाचे डबे आलेल्या पाहुणेमंडळींनी वाटण्यात आली. आहेर झाले आणि लग्न पार पडले. लग्न पार पडेपर्यंत जोरदार आवाजात डी.जे. सुरू होता, लोकांचे नाचणे सुरू होते. नवरानवरीसोबत फोटो काढण्याचा उद्योग पार पडला आणि आम्ही बाहेर पडलो. तितक्यात दोन फोटोग्राफर आमचे काढलेले फोटो घेऊन आले आणि ते विकत घेण्याची विनंती करू लागले. ही एक नवीन पध्दत अनुभवली. कोणत्याही कार्यक्रमात अनेक फोटोग्राफर तुमचे फोटो काढत असतात. आपल्याकडे राजकीय नेत्यांच्या प्रत्येक क्षणाचे फोटो काढले जातात तसे. पण समारंभ संपला की किमान दहा फोटोतरी तुम्हाला विकत घ्यावे लागतात. काही फोटो विकत घेतले आणि आम्ही कलाबारच्या दिशेने निघालो. नायजेरियन लग्नसमारंभास गेल्याने इथल्या समाजजीवनाच्या अनेक पैलूंबाबत मला माहिती मिळू शकली.

सौजन्य ः डॉ ल्युक यांच्या लग्ाचे छायाचित्र