उथळ पाण्याचा खळखळाट

विवेक मराठी    08-Oct-2016
Total Views |

वघ्या काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 'सर्जिकल स्ट्राईक'बद्दल लष्कराचे आणि अन्य संबंधितांचे अभिनंदन केले, त्या वेळी 'देर आए, दुरुस्त आए' अशी आमची त्यांच्याबद्दलची भावना होती. एका जबाबदार विरोधी पक्षनेत्यासारखी त्यांची प्रतिक्रिया होती. पक्षीय भेदाभेद दूर ठेवून सर्वांनी एक झाले पाहिजे अशीच उरी येथील घटना होती. त्याला दिलेल्या चोख आणि धाडसी प्रत्युत्तराबद्दल सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही लष्कराचे तसेच विद्यमान सरकारचे अभिनंदन केले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकणारी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली होती.


त्यानंतर संजय निरुपम, अरविंद केजरीवाल, दिग्विजय सिंग - ज्यांना सर्व जण बेताल बोलण्यामुळेच ओळखतात, अशा बौध्दिक दिवाळखोरीत निघालेल्या नेत्यांनी 'सर्जिकल स्ट्राईक'बद्दल कुशंका व्यक्त केली. या तिघांचाही प्रसारमाध्यमांनी खरपूस समाचार घेतल्यावर, एवढेच नव्हे, तर संजय निरुपम यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे सांगून या बाबतीत पक्षाने त्यांना एकटे पाडल्यानंतरही, राहुल गांधींनी आपलेच पूर्वीचे मत बदलत सर्जिकल स्ट्राईकसंदर्भात सरकारवर तोंडसुख घेतले आणि तसे करताना शिष्टाचाराच्या, सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यातून, चार दिवसांपूर्वी या कारवाईबद्दल कौतुक करणारे राहुल गांधी खरे की उत्तर प्रदेशातल्या जाहीर सभेत बरळलेले राहुल गांधी खरे, असा संभ्रम निर्माण झाला. अर्थात, त्यांचा पूर्वेतिहास पाहता असंबध्द टीका करणारेच राहुल गांधी खरे, असे म्हणावे लागेल. त्यांच्या वर्तनपध्दतीत बदल झाल्याचा आधीचा केवळ भास होता, या निष्कर्षापर्यंत आता सर्वच जण येऊ लागले आहेत.

काँग्रेसला अन्य कोणी नामशेष करण्याऐवजी आपणच ते पुण्यकर्म करावे आणि कीर्तिरूपे उरावे, असा दृढनिश्चयच या गांधीकुलोत्पन्नाने केला असेल तर त्यांना कोण थांबवणार? त्यांना असे वागण्यापासून रोखू शकेल अशी एकही व्यक्ती शंभरी ओलांडलेल्या पक्षात असू नये, हेही दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यांच्या मातोश्रींच्या प्रकृतिअस्वास्थ्यापायी पक्षाची धुरा लवकरच राहुल यांच्याकडे येण्याची शक्यता असताना त्यांना स्वत:सह पक्षही नामशेष करण्याचे डोहाळे लागले आहेत. आधीच उत्तर प्रदेशात काँग़्रेसपुढे मोठे प्रश्नचिन्ह आहे. अशा वेळी त्या राज्यासह देशभरात जिथे जिथे काँग्रेसचे अस्तित्व टिकून आहे, तिथे तिथे त्याला मूठमाती मिळेल अशी व्यवस्था खुद्द पक्षाचा प्रमुख नेताच करतो आहे. योग्यता नसतानाही जेव्हा घराणेशाहीतून नेतृत्वाची धुरा खांद्यावर येते, तेव्हा 'काय हसे होते?' याचे एक उदहारण राहुलबाबा सर्वांसमोर ठेवत आहेत. अर्थात असे कर्तृत्ववान वारसदार अन्य पक्षांकडेही आहेतच... जशा राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई. पण तो आजचा मुद्दा नाही, तेव्हा ते प्रकरण तूर्तास बाजूला ठेवू.

'सर्जिकल स्ट्राईक'चे गांभीर्य कळायला मुळात उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य कळायला हवे. ते तसे समजले आहे का, याबाबतच मनात शंका आहे. लष्कराच्या एका प्रमुख तळावर जेव्हा असा हल्ला होऊन जवानांचा हकनाक बळी जातो, तेव्हा लष्कराच्या मानसन्मानाला ठेच लागते. त्यामुळे जवानांचे मनोधैर्य ढासळण्याची शक्यता असते. अशा वेळी हल्ल्याचा निषेध केवळ शब्दांनी करून भागत नाही, तर दहशतवाद्यांना अद्दल घडेल अशा प्रकारे कृतीतून उत्तर द्यावे लागते. तेच आपल्या लष्कराने केले. ही कृती देशवासीयांना अभिमानास्पद आणि जगाला भारताची ताकद कळण्यासाठी आवश्यक होती. त्यामुळेच अमेरिका, सोविएत रशिया यांच्यासह अनेक राष्ट्रांनी भारताने दिलेल्या चोख आणि नियोजनबध्द प्रत्युत्तराची प्रशंसा केली. त्याच वेळी पाकिस्तानवर चीनचा अपवाद वगळता सर्वांनीच कडाडून टीका केली.

दहशतवादाचे भरणपोषण करणाऱ्या पाकिस्तानसाठी अशी चहूबाजूंनी टीका होणे अनपेक्षित असावे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि तेही केवळ दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'ला 'युध्द पुकारले' असेही लेबल पाकिस्तान लावू शकत नाही, अशा विचित्र कोंडीत पाकिस्तान सापडला आहे. त्यातच भर म्हणून की काय, पाकव्याप्त काश्मीरमधील जनताही पाक सरकार दहशतवाद्यांना पोसत असल्याची टीका करत रस्त्यावर उतरली आहे. आपल्याला जगाने आणि ज्यांच्यावर आपण 'आपले' म्हणून अधिकार गाजवत होतो त्यांनीही वाळीत टाकले आहे, तेही आपल्या कुकर्मांनीच याची जाणीव झाल्याने किंवा याहून वेगळा पर्याय समोर नसल्याने नवाज शरीफ यांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आदेश लष्कराला दिले आहेत. पाकिस्तानात सरकार कोणाचेही असो, या देशावर सत्ता गाजवते ते लष्करच... असा इतिहास आणि वर्तमानही असल्याने नवाज शरीफांची ही गर्जना पोकळ ठरण्याचीच शक्यता आहे.

भारतीय लष्कराने केलेली कारवाई, त्यासाठी विद्यमान सरकारने त्यांना दिलेला पाठिंबा आणि प्रोत्साहन, जागतिक पातळीवर भारताच्या पंतप्रधानांनी, परराष्ट्रमंत्र्यांनी काढलेले पाकिस्तानचे वाभाडे या सगळयामुळे पाकिस्तानची नाचक्की आणि भारताची प्रतिमा उंचावत आहे. यामुळे अप्रत्यक्षरित्या विद्यमान सरकारचीही प्रतिमा उंचावत आहे. सर्व विरोधी पक्षातील नेत्यांचा पोटशूळ उठण्याचेही तेच कारण आहे. या सगळयाचे परिणाम भाजपासाठी लाभदायी ठरू शकतात, या विचारानेच सर्वांच्या तंबूत अस्वस्थता पसरली आहे. म्हणूनच चढाओढ लागल्यासारखा जो-तो आपल्या वकूबानुसार प्रतिक्रिया देत सुटला आहे. त्यात कोणी म्हणता कोणी मागे नाही. शरद पवारांसारख्या जाणत्या(?) नेत्यापासून सगळेच समाील झाले आहेत. हे दृश्य पाहून, भांबावलेले राहुलबाबा आपण केलेली प्रशंसा विसरून त्यांच्या सुरात सूर मिसळून टीका करायला लागले आणि स्वत:ची शोभा (कितव्यांदा?) करून घेतली.

काँग्रेसची डुबती नय्या तारण्याचे काम फक्त गांधी घराणेच करू शकते या विश्वासावर, आपल्या निष्ठा पक्षाऐवजी गांधी घराण्याच्या चरणी अर्पण केलेल्यांची मोठी पंचाईत राहुलबाबांच्या बोबडया बोलांनी केली आहे. त्यांना अध्यक्षाच्या तख्तावर बसवण्याआधी वयाला साजेसे शहाणपण येईल यासाठी पावले उचलायला हवीत. अन्यथा, पक्षाची जलसमाधी अटळ आहे.