अपशकुनी मायाजाल!

विवेक मराठी    08-Oct-2016
Total Views |

आताच्या पार्श्वभूमीवर सर्जिकल स्ट्राईक आणि भारताने घेतलेली खरमरीत भूमिका या गोष्टींचे स्वागत करण्याऐवजी आपल्या मूर्ख चाळयांनी या भूमिकेला अपशकुन करणाऱ्या लोकांचे हे मायाजाल कितीही पसरले तरी जनता फसणार नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे. या महायुध्दात कौरव कोण आहेत आणि पांडव कोण आहेत हे भारतीय जनतेला पक्के उमगले आहे.


ध्या आपला देश एका संस्कृत सुभाषितात वर्णन केलेल्या परिस्थितीचा अनुभव घेत आहे. ते सुभाषित असे आहे -

दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम्।

बलं मूर्खस्य मौनित्वं चोराणामनृतं बलम् ॥'

वरील सुभाषिताचा एवढाच अर्थ होतो की, प्रत्येकाने आपले बल जाणून घ्यावे. त्यामुळे त्याचा फायदाच होतो. काही जणांना आपले बल कशात आहे याची कल्पना नसल्यामुळे ती मंडळी समाजात हास्यास्पद ठरतात. सभ्यतेच्या मर्यादा पाळण्याचे ठरविले असल्यामुळे वाचक संकेत समजून घेतील हीच अपेक्षा आहे.

आता हे सुभाषित कसे लागू ठरते हे आपण पाहू या! दुर्बळ प्रजेचा राजा हेच तिचे बळ असते. कारण यथा राजा तथा प्रजा अशी परिस्थिती असते. बऱ्याच कालावधीनंतर भारताला ताठ कण्याचा एक पंतप्रधान लाभला आहे. पाकने कुरापत काढल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक करून त्याचे जे थोबाड रंगविले आहे, त्यामुळे भारतीय प्रजेचेच नव्हे, तर सैन्याचे मनोधैर्यही कमालीचे वाढले आहे. आज प्रत्येक भारतीयाची मान जगासमोर ताठ झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे.

बळी तो कान पिळी अशी म्हण असली तरी भल्याभल्यांनाही वाकविण्याची ताकद केवळलहान मुलांच्या रडण्यात असते. ते आपले भोकाड पसरूनच हवे ते साध्य करायला पाहतात. ज्याला काही उपमाच देता येणार नाही अशा एका संजयाने असेच भोकाड पसरले आहे. तो म्हणतो, ''भाजपाने आपली पोळी भाजून घेण्यासाठी हे सर्जिकल स्ट्राईकचे नाटक रचले आहे.'' ही व्यक्ती स्वतःला मुंबई काँग्रेसची अध्यक्ष म्हणवून घेत असली तरी तिचे वक्तव्य किती बालिशपणाचे आहे, ही गोष्ट काँग्रेसच्या अखिल भारतीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीच दाखवून दिली आहे. जर सर्जिकल स्ट्राईक हे नाटक असते, तर या लोकांनी भारतीय लष्कर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून स्तुतिसुमने का बरे उधळली असती? मूल खरोखर रडत असेल तर त्याचे रडणे मोठा माणूस अवश्य लक्षात घेईल. पण नाटक, नाटक म्हणून मूल जर खोटेच भोकाड पसरत असेल, तर त्याला गप्प करण्याचे अन्य उपाय 'गरम' डोक्याच्या पालकांना अवश्य माहीत असतात. त्यामुळे आपल्या विरोधात जनमताचे वातावरण तापण्यापूर्वी पालकांनी या भोकाड पसरणाऱ्या पोराला थाऱ्यावर आणणे शहाणपणाचे ठरणार आहे. पण पालकांना कोणी जुमानते का नाही अशी शंका लोक व्यक्त करू लागले आहेत. कारण संजयासोबत आपण 'दिग्विजय'च केला आहे अशा तोऱ्यात वावरणाऱ्या एका म्हाताऱ्या सिंहाने आणि ज्याच्या नावासमोर 'पी' हे विशेषण लावता येईल अशा चिंधीभर माणसानेही रडारड आरंभली आहे. जेव्हा यांची सत्ता होती, तेव्हा ते पाकडयांचा मार खात रडत बसले होते आणि आता पाकची शेकल्यावरसुध्दा रडीचा डावच मांडत बसले आहेत. पक्षाने या रडतराऊतांना आवरले नाही, तर जनता त्यांना गप्प बसविण्यासाठी पुढे आल्यावाचून राहणार नाही. आणि तशी ती आलेली आहेच!

सुभाषितकाराने पुढे असे म्हटले आहे की, गप्प बसणे हे मूर्खाचे बळ आहे. कारण गप्प बसल्यामुळे त्याचा मूर्खपणा झाकला जातो. पण काही मूर्खांना तेसुध्दा कळत नसेल तर त्याला काय म्हणावे! हा बहुमान काही फिल्मी ताऱ्यांनी मिळविला आहे. अर्थात सर्वच फिल्मी तारे या गटात मोडत नाहीत. बरे! तोल सोडून काही तरी बरळले असे म्हणावे, तर यांचा तोल नेमका जागेवर असतो कधी? हासुध्दा मोठा प्रश्न आहे. स्वतःला भाईजान समजणाऱ्या सलमान खानने आधी अकलेचे तारे तोडले होते. बिचाऱ्याचे म्हणणे असे होते की, पाकिस्तानातून भारतात आपली कला दाखविण्यासाठी आलेले कलाकार हे दहशतवादी नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. कलाकार आणि दहशतवाद या दोन्ही वेगळया गोष्टी आहेत. म्हणजे पाकिस्तान एका हाताने भारतीय जनतेसमोर मनोरंजनाच्या बाहुल्या नाचवीत आहे आणि दुसऱ्या हाताने आसनाखाली बाँबला काडी लावत आहे, तर अशा वेळी आपण सावध न होता मनोरंजनाची हौस भागविण्यावर भर द्यावा. आंतरराष्ट्रीय राजकारण खरे तर सलमान खानसारख्या इसमाच्या बुध्दीला झेपणारे नाही, त्यामुळे गप्प बसणे हेच आपले बळ आहे ते त्याने लवकर ओळखले पाहिजे. पण असे ओळखले तर तो सलमान कसला?

केवळ नावातच 'ओम'कार असलेल्या दुसऱ्या बुजुर्ग नटानेही आपली हौस 'पुरी' करून घेतली आहे. त्याने थेट सवालच केला आहे की, सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांना लष्करात जाण्यासाठी कोणी सांगितले होते? त्यांच्यावर कोणी बळजबरी केली होती? पुरीचे केस पिकले असल्यामुळे या नटाला असे वाटणे स्वाभाविक आहे की, देशातील युवा पिढीने तोंडाला रंग फासून कॅमेऱ्यासमोर उभे राहून खोटा खोटा अभिनय करून बक्कळ पैसा कमवावा. उगीच सैन्यात कशाला जावे? सिनेमात जरी मरण आलेले दाखविले तरी प्रत्यक्षात आपण जिवंतच असतो की! पण सीमेवर लढायला गेलो की खऱ्याखुऱ्या गोळया खाव्या लागतात आणि त्यात खरेच मरण येते. हे कसे परवडणार? पण अशी बेताल बडबड करून आपण देशासाठी शहीद झालेल्या जवानांचा घोर अपमान करीत आहोत अशी पुसटशी शंकाही पुरीच्या मनात डोकावली नाही. आपण गप्प बसलो तर शहाणे ठरू, याची भीती वाटल्यामुळेच हा बरळण्याचा मूर्खपणा त्यांना सुचला आहे. या बेतालांच्या जोडीला करण जोहर इत्यादी 'रत्ने' आलेली आहेच म्हणा! यावरून असे म्हणता येईल की, गप्प बसणे हे मूर्खाचे बळ असते, पण त्याचे बळ त्यालाच ठाऊक नसते.

खरे तर विदूषकी चाळयांचा मोह मुख्यमंत्रिपद मिळाले तरी काही जणांना मुळीच सुटत नाही, ही गोष्ट अरविंद केजरीवाल यांनीही बेफाम वक्तव्य करून दाखवून दिली आहे.

शेवटचा मुद्दा म्हणजे असत्य हे चोराचे बळ असते. हा मुद्दासुध्दा गेली अनेक वर्षे 'चोराच्या उलटया बोंबा' ही म्हण खरी असलेला पाकिस्तान स्पष्ट करून दाखवीत आहे. तेथील कलाकार फवाद खान हासुध्दा 'चोराची पावले चोरालाच ठाऊक' अशा भूमिकेत बरळला आहे की, बॉलीवूड किसके बाप का है क्या? अरे चोरा! ही भारतभूमी आमच्या बापजाद्यांची आहे आणि येथील प्रत्येक गोष्टसुध्दा वारसाहक्काने आम्हाला मिळालेली आहे. नुसते बॉलीवूड काय घेऊन बसलास!! तू पाहातच राहा! तुझ्या बापजाद्यांनी बळकावलेली इंच इंच भूमी परत घेऊन तुझी सव्याज परतफेड करू आम्ही!

या चोरांचे सोडा हो! पण या चोरांना साथ मिळालेली आहे घरभेद्यांची. ही जयचंदाचीच अवलाद म्हणायला हवी. पी. चिदंबरम आणि अरविंद केजरीवाल यांना सर्जिकल हल्ल्याचे पुरावे हवे आहेत. ही ताठ कण्याची माणसं आहेत की पाकिस्तानी वजिरांची प्यादी, हे त्यांनीच जाहीर करून आपल्या देशभक्तीचा पुरावा द्यायला हवा! शंका घ्यायचीच झाली तर कोणत्या गोष्टींची घ्यायला हवी? उरी येथे पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला करून जवानांची हत्या केली. त्याच्या विरोधात संपूर्ण देशभरात संतापाचा आगडोंब उसळला होता. पंतप्रधान मोदी यांनी जनभावनेला कल ओळखून कठोर पावले उचलली आणि पाकिस्तानचे जगभरात तोंड काळे केले. यच्चयावत् भारतीय मनुष्याला समाधानाचे भरते आले. पाकिस्तान मात्र खोडसाळपणा करतच राहणार! म्हणतात ना - जित्याची खोड... पाकिस्तानची शकले शकले होऊन त्याची नावनिशाणी नकाशावरून पुसली जाणार, तेव्हाच त्याचा हा खोडसाळपणा संपणार आहे. हे सामान्य भारतीय माणसालाही माहीत आहे. पण मग जी माणसं शहाणीसुरती आहेत असा सामान्य माणसांचा आजपर्यंत समज होता, तीच भलभलती विधाने करीत बरळत सुटली आहेत, तेव्हा आपण खरेच गैरसमजात होतो असे सामान्य माणसाचे मत झाल्यावाचून राहणार नाही. कारण या सर्व गणंगांनी आपली लायकी दाखवून दिली आहे, एवढे मात्र खरे!

अटलजींनी आपल्या एका कवितेत असे म्हटले होते -

कौरव कौन पांडव कौन, टेढा सवाल है

हर तरफ शकुनी का फैला मायाजाल है!!

आताच्या पार्श्वभूमीवर सर्जिकल स्ट्राईक आणि भारताने घेतलेली खरमरीत भूमिका या गोष्टींचे स्वागत करण्याऐवजी आपल्या मूर्ख चाळयांनी या भूमिकेला अपशकुन करणाऱ्या लोकांचे हे मायाजाल कितीही पसरले तरी जनता फसणार नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे. या महायुध्दात कौरव कोण आहेत आणि पांडव कोण आहेत, हे भारतीय जनतेला पक्के उमगले आहे.    & 9594961864