हिलरी का हरल्या?

विवेक मराठी    11-Nov-2016
Total Views |

हिलरी महिला असूनही आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या असभ्यतेबद्दल राळ उठवूनही त्यांना अपेक्षित प्रमाणात महिलांचे मतदान झाले नाही, कारण मोनिका ल्युवेन्सकी प्रकरण असो किंवा पती बिल क्लिंटन यांच्यावर बलात्कारापासून लैंगिक शोषणापर्यंत आरोप करणाऱ्या डझनावारी महिला असोत, स्त्रीवादी हिलरींपेक्षा पतिव्रता हिलरी अधिक उजव्या ठरल्या. राजकीय पदावर असलेल्या आपल्या नवऱ्याच्या बाजूने त्या कायम उभ्या राहिल्या. एका भूमिकेवर ठाम न राहणे, तसेच जगासाठी एक कायदा आणि आपल्यासाठी वेगळा कायदा अशा वृत्तीमुळे त्या वारंवार संकटात सापडल्या.


मेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकांचे एका ओळीत वर्णन करायचे, तर मी म्हणेन की अमेरिकेतील बहुसंख्य लोकांना व्यवस्थेबाहेरील माणूस अध्यक्ष म्हणून हवा होता आणि दुर्दैवाने शर्यतीत केवळ एकच बाहेरचा माणूस होता, तो म्हणजे डोनाल्ड ट्रंप. डेमोक्रॅटिक पक्षाकडेही बर्नी सँडर्स हा व्यवस्थेबाहेरचा उमेदवार होता. पण बडे उद्योगपती, त्यांच्या हातात असलेली किंवा मग राजकीय व्यवस्थेची बटीक झालेली प्रसारमाध्यमे, त्यातील पत्रकार, विश्लेषक आणि पक्षातील पदाधिकारी यांनी संगनमताने बर्नी सँडर्स यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले आणि establishmentच्या, म्हणजेच व्यवस्थेच्या गेल्या तीस वर्षांपासून प्रतिनिधित्व करणाऱ्या हिलरी क्लिंटन यांना आपले उमेदवार बनवले. शिक्षणाने वकील असलेल्या हिलरी यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत बिल क्लिंटन यांची पत्नी या नात्याने 1983-92 अर्कन्सास प्रांताच्या 'पहिल्या महिला', त्यानंतर आठ वर्षे अमेरिकेच्या 'पहिल्या महिला', 2001-9 अमेरिकेच्या सिनेटमध्ये न्यू-यॉर्क राज्याच्या प्रतिनिधी, 2009 ते 2013 अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव आणि त्यानंतर अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपदाच्या स्पर्धेतील पहिल्या महिला उमेदवार अशी अनेक मानाची पदे भूषवली. हिलरी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या तुलनेत डोनाल्ड ट्रंप अगदीच नवखे. सार्वजनिक जीवनात कुठलेही पद न भूषवलेले. गडगंज पैसा असूनही अनेकदा दिवाळखोरीत गेलेले, कर-चुकवेगिरीचे आरोप झालेले. प्रसिध्दीच्या हव्यासापोटी रिऍलिटी टीव्हीच्या माध्यमातून आपल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अपरिपक्वतेचे प्रच्छन्नपणे प्रदर्शन करणारे. विरोधकांच्या मते पराकोटीचे वंशवादी, पुरुष वर्चस्ववादी, स्त्रियांना उपभोगाची वस्तू समजणारे, इस्लामद्वेष्टे, उचलली जीभ लावली टाळयाला अशा स्वभावाचे आणि अन्य आणखी बरेच काही. ते अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरले हा अनेक राजकीय विश्लेषकांच्या लेखी विनोद होता आणि एकएक पायरी चढत अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडले गेले, हा अमेरिकेच्या इतिहासातील सगळयात काळा दिवस होता.

नावात 'युनायटेड' असलेली अमेरिका जगातील अन्य अनेक देशांप्रमाणे एकसंध कधीच नव्हती. दर वेळेस अध्यक्षपदाच्या निवडणुकांत अमेरिकेच्या विभाजनाचा पॅटर्न दिसून यायचा. पश्चिम किनारा आणि उत्तर-पूर्व भागातील राज्ये सातत्याने डेमोक्रॅटिक पक्षाला निवडून द्यायची. मध्य भागातील तसेच दक्षिण-पूर्व किनाऱ्यावरील राज्ये रिपब्लिकन पक्षाला निवडून द्यायची. तीच गोष्ट मतदात्यांच्या बाबतीतही. सरतेशेवटी काही राज्ये आणि कुठल्याही एका पक्षाशी बांधिलकी नसलेले मतदार अमेरिकन अध्यक्षांचे भवितव्य ठरवायचे. रिपब्लिकन पक्षनिष्ठ मतदार म्हणजे सनातनी ख्रिश्चन, कॉलेजात न गेलेले गोरे लोक, शेतकरी आणि काही अल्पसंख्याक समुदाय. डेमोक्रॅटिक पक्षनिष्ठ उमेदवार म्हणजे उच्चशिक्षित, कामगार संघटना, पुरोगामी, महिला, कृष्णवर्णीय आणि बहुतेक अल्पसंख्याक समुदाय.

आजवर मुक्त व्यापार, बाजारपेठ, भांडवलशाही आणि जागतिकीकरणाचे नेतृत्व करणारी अमेरिका गेल्या काही वर्षांपासून त्याच्या दुष्टचक्रात पुरती आडकली आहे. एकीकडे विकसनशील देशांतून उच्चशिक्षित तसेच प्रतिभासंपन्न तरुण अमेरिकेत येऊन तेथे जागतिक ख्यातीच्या कंपन्या, संगीत, चित्रपट आणि साहित्य निर्माण करत आहेत, तर दुसरीकडे शेजारच्या मेक्सिको आणि त्यामार्गे येणारे वैध-अवैध मजूर काबाडकष्ट करून श्रमशक्तीला हातभार लावत आहेत. हे अमेरिकन ड्रीम आजही जगभरातील प्रतिभेला आणि कर्तृत्वाला अमेरिकेकडे आकृष्ट करत आहेत. पण रुपेरी कड असलेल्या या ढगाची काळी बाजूही तितकीच गडद आहे. जागतिकीकरण, मुक्त व्यापार, आउटसोर्सिंग आणि ऑॅटोमेशनच्या भराडयात अमेरिकेत गेल्या अनेक पिढया राहणारी, आपण बरे आणि आपले जग बरे असा विचार करणारी, आपली संस्कृती आणि विचारसरणी हीच अमेरिकन विचारसरणी असा समज असलेली पिढी - जी मुख्यत्वे श्वेतवर्णीय आहे - गेली काही वर्षे भरडून निघत आहे. एकीकडे उच्चशिक्षित, पांढरपेशा वर्गाची झपाटयाने होणारी प्रगती आणि दुसरीकडे हिस्पॅनिक मजुरांकडून हिरावले जाणारे रोजगार, सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणाऱ्या वैद्यकीय तसेच उच्च शिक्षणाच्या सेवा, पदवी घेऊनही शाश्वत नोकरीचा अभाव यामुळे एकाच वेळेस निर्माण होणारा न्यूनगंड आणि आक्रोश. जगातल्या अनेक देशांत एक मोठा मध्यमवर्ग इकडे आड आणि तिकडी विहिर अशा द्विधा मनःस्थितीत सापडलाय. पण राजकारण आणि मोठया उद्योगांच्या साटेलोटयातून प्रचंड पैसा कमावलेले नेते - जे त्याच मध्यमवर्गातून कधी काळी वर आले होते, मध्यमवर्गाच्या आक्रोशाबद्दल पूर्णत: उदासीन आहेत. एवढेच नाही, तर गरीब तसेच धार्मिक, वांशिक आणि अन्य प्रकारच्या अल्पसंख्याकांच्या मतपेटया जपण्यासाठी मध्यमवर्गाला आणखी कोपऱ्यात ढकलत आहेत. या व्यवस्थेने एरवी समाजात जागल्याचे काम करणाऱ्या पत्रकार, बुध्दिजीवी यांना, तसेच आता समाज माध्यमांत प्रभाव असणाऱ्या सगळयांनाच आपल्याशी बांधून घेतले आहे. गेली तीन दशके सार्वजनिक जीवनात असणारे हिलरी आणि बिल क्लिंटन हे या व्यवस्थेचे मेरुमणी.

आपल्याकडे भ्रष्टाचार, राजकारणी आणि उद्योगांचे एकमेकांत गुंतलेले हितसंबंध, राजकारणासाठी गुन्हा अन्वेषण तसेच न्याय व्यवस्थेचा वापर, पेड न्यूज या गोष्टी इतक्या सरावाच्या झाल्या आहेत की आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही. अमेरिकेत तुलनेने परिस्थिती बरी असली, तरी अमेरिकेची आर्थिक, लष्करी आणि व्यापारी ताकद बघता अमेरिकेत या राजकीय साटेलोटयांनी खूप मोठा धुमाकूळ घातला आहे. वॉशिंग्टन या अमेरिकेच्या राजधानीत सर्व प्रकारच्या लॉबींनी - म्हणजे दबावगटांनी व्यवस्थेला बटीक बनवले असून लोकांच्या हितापेक्षा आपल्याला पैसा पुरवणाऱ्यांचे, मग ते कोणीही असो... अगदी अरब जगतातील तेलसंपन्न देश किंवा त्यांनी पोसलेल्या दहशतवादी संघटना - हित प्रथम पाहिले जात आहेत. हिलरी आणि बिल क्लिंटन यांच्या सावलीप्रमाणे असलेले जॉन पोडेस्टा हे गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेतील सगळयात मोठा लॉबीस्ट आहेत. जॉन राजकारण्यांशी संबंध सांभाळतात, तर त्याचे भाऊ  टोनी उद्योगांशी. गेल्या अनेक दशकांपासून जॉन बिल आणि हिलरी क्लिंटन यांच्यासाठी काम करत आहेत. हिलरी पराभूत झाल्याच्या रात्री उद्विग्न झालेल्या समर्थकांचे सांत्वन केले पोडेस्टा यांनीच.


अर्कन्सास प्रांताचे गव्हर्नर असल्यापासून बिल क्लिंटन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि मोठया उद्योगांशी हितसंबंध असल्याचे आरोप होत आहेत, पण ते कधीही सिध्द झाले नाहीत. हिलरी यांची सत्तेची आणि पैशाची लालसा बिल यांच्यापेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते. हिलरी महिला असूनही आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या असभ्यतेबद्दल राळ उठवूनही त्यांना अपेक्षित प्रमाणात महिलांचे मतदान झाले नाही, कारण मोनिका ल्युवेन्सकी प्रकरण असो किंवा पती बिल क्लिंटन यांच्यावर बलात्कारापासून लैंगिक शोषणापर्यंत आरोप करणाऱ्या डझनावारी महिला असोत, स्त्रीवादी हिलरींपेक्षा पतिव्रता हिलरी अधिक उजव्या ठरल्या. राजकीय पदावर असलेल्या आपल्या नवऱ्याच्या बाजूने त्या कायम उभ्या राहिल्या. एका भूमिकेवर ठाम न राहणे, तसेच जगासाठी एक कायदा आणि आपल्यासाठी वेगळा कायदा अशा वृत्तीमुळे त्या वारंवार संकटात सापडल्या. चौकशीमध्ये शपथेवर खोटे बोलण्याचा प्रमादही त्यांच्याकडून अनेकदा घडला. या निवडणुकांत सगळयात गाजलेले आणि एका अर्थाने त्यांना कलाटणी देणारे प्रकरण म्हणजे त्यांच्या खाजगी ई-मेल सर्व्हरचे.

आपल्याकडे मोठमोठे नेते मंत्री झाल्यावरही जी-मेलवरच असले, तरी अमेरिकेत मात्र याबद्दल कडक नियमावली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव म्हणून अधिकृत ई-मेल वापरायचे बंधन असताना त्यांनी मेल पाठवण्यासाठी खाजगी ई-मेल सर्व्हरचा वापर केला. खाजगी मेल वापरली तर त्यात काय मोठे, असे बऱ्याच जणांना वाटेल; कारण आज स्मार्टफोनच्या जमान्यात आपण सर्वच अशा गोष्टी करतो. पण हिलरींच्या खाजगी सर्व्हरमधून तब्बल 6.5 लाखाहून अधिक मेल पाठवल्या गेल्या. त्यातील बहुतांश ई-मेल सामान्य स्वरूपाच्या असल्या, तरी जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू झाली, तेव्हा त्यांनी 30000 मेल डिलीट केल्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे मुख्य सचिव जॉन पोडेस्टा यांचे ई-मेल अकाउंट विकिलिक्सने हॅक करून त्या जगासमोर उघड केल्या. त्यामुळे क्लिंटन कुटुंबीयांच्या सार्वजनिक वर्तनाबद्दलच लोकांच्या मनात असलेला संशय अत्यंत गडद झाला.

हिलरी क्लिंटनवर झालेल्या सगळयाच आरोपांची शहानिशा झाली नसली, तरी ते गंभीर आहेत. गेल्या तीन दशकांत डेमोक्रॅटिक पक्ष सत्तेवर असतानाच्या काळात जॉन पोडेस्टा यांचा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी मुक्त वावर होता. अमेरिकन संसदेच्या सभापती वर्षभरात तीन वेळा व्हाइट हाउसवर गेल्या, तर पोडेस्टा शंभरहून अधिक वेळा व्हाइट हाउसला जाऊन आले. सामाजिक कामे करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या क्लिंटन फाउंडेशन या न्यासाचा उपयोग बलाढय कंपन्या, अरब जगतातील राजे, लष्करशहा, कट्टर इस्लामिक राज्यकर्ते आणि अनेक वादग्रस्त व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून देणग्या घेण्यासाठी केला गेला. क्लिंटन फाउंडेशनला मिळालेल्या देणग्यांचा उद्देश सामाजिक कामापेक्षा परराष्ट्र सचिव किंवा सिनेटर असलेल्या क्लिंटन दरबारात मांडवली करण्यासाठी होता. क्लिंटन फाउंडेशनला देणगी देणाऱ्यांमध्ये भारतातील अमर सिंह यांच्यासह अनेक राजकारणी आहेत. फाउंडेशनकडून विकसनशील देशांत नैसर्गिक संकटांच्या वेळी पुरवल्या जाणाऱ्या मदतीत, मदत करण्यापेक्षा आपल्याला देणग्या देणाऱ्या जागतिक कंपन्यांना या देशांतील बाजारात चंचुप्रवेश मिळवून देण्याचा उद्देश होता. गेल्या 15 वर्षांच्या काळात हिलरी आणि बिल क्लिंटन यांनी कॉर्पोरेट कंपन्यांच्या सभांत भाषणे करण्याबद्दल कोटयवधी डॉलर्सची फी मिळवली. यातील अनेक भाषणे वॉल स्ट्रीटच्या घोटाळेबाज बँकर्ससाठी केली होती. त्यांची संहिता हिलरी यांनी शेवटपर्यंत उघड केली नाही. या भाषणांच्या निमित्ताने क्लिंटन दांपत्याने अप्रत्यक्षपणे लाच घेतली असल्याचे म्हटले जाते.

2004 साली डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांत हिलरींना हरवल्यानंतर पुढे रिपब्लिकन पक्षाच्या जॉन मॅकेन यांना पराभूत करून ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. ओबामांच्या पहिल्या टर्ममध्ये हिलरी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव होत्या. ओबामा सरकारचे अनेक निर्णय कालांतराने वादग्रस्त ठरले. मग तो विमा आणि औषध कंपन्यांची धन करणारा ओबामा केअर असो किंवा आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांशी मुक्त व्यापार करार. मुक्त व्यापार करारांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा झाला असला, तरी अमेरिकेतील श्रमिक वर्गाचे कंबरडे मोडले. पर्यावरणाचा विषय संवेदनशील आहे आणि जगातील सर्वात जास्त प्रदूषण करणाऱ्या अमेरिकेसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ओबामांनी स्वच्छ ऊर्जेसाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक झाले असले, तरी त्यामुळे अमेरिकेतील कोळसा उद्योगावर अवकळा आली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील जागतिक कंपन्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणाचा बागुलबुवा निर्माण केला जात आहे, या ट्रंप यांच्या बोलण्यावर कामगारांचा मोठया प्रमाणावर विश्वास बसला. आपल्या गोष्टींबद्दल अनाठायी गुप्तता बाळगणे आणि परिस्थितीनुसार रंग बदलणे या हिलरींच्या अवगुणांचे निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात वेळोवेळी दर्शन झाले. प्रचारादरम्यान एकदा उष्माघाताने त्यांना चक्कर आली असता ही बाब लोकांच्या नजरेपासून दूर राहावी, म्हणून कसोशीने प्रयत्न करण्यात आले. पण याबाबतची व्हिडिओ टेप समाज माध्यमांत बाहेर आल्यावर या प्रकारावर सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला.

पोडेस्टांप्रमाणेच हिलरी यांच्या दुसऱ्या सहकारी आणि पाकिस्तानी मूळ असलेल्या हुमा अबेदिन याही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. त्यांचे सौदी अरेबियातील दीर्घकाळ वास्तव्य, त्यांच्या आईचे इस्लामिक भगिनी संघटनेचे सदस्यत्व आणि हमास आणि आयसिस यासारख्या संघटनांना पैसा पुरवणाऱ्या सौदी आणि कतारी संस्थांकडून त्यांना मिळालेल्या देणग्या यावरून हुमा या इस्लामिक दशहतवादी गटांच्या हस्तक किंवा समर्थक असल्याच्या बातम्या रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी पसरवल्या आणि त्यावर लोकांनी विश्वास ठेवला. हुमा यांचे आता विभक्त झालेले पती ऍंथोनी वीनर यांचे अल्पवयीन मुलींना अश्लील संदेश आणि फोटो पाठवण्याचे प्रताप आणि त्यांच्या संगणकावर हुमा आणि हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल आढळणे यामुळे एफबीआयने निवडणुकींच्या दहा दिवस आधी हिलरींकडे संशयाचे बोट दाखवले आणि मतदानाला दोन दिवस असताना ते काढूनही घेतले. पण याचा हिलरींच्या पराभवात मोठा हातभार लागला.


महागलेल्या आरोग्यसेवा, बेरोजगारी, इस्लामिक दहशतवादी हल्ले, न परवडणारे उच्च शिक्षण या सगळयामुळे फक्त सनातनीच नाही, तर एकूणच श्वेतवंशीय आणि मध्यमवर्गीय अमेरिकन लोकांत एका प्रकारचा असंतोष होता. ट्रंप यांचे अवगुण सर्वश्रुत असले, तरी त्यांच्याकडे असलेली जमेची सर्वात मोठी बाजू म्हणजे त्यांची कोरी पाटी, तसेच मुख्य प्रवाहातील माध्यमे, बुध्दिवादी-विचारवंत इ.चा त्यांना होत असलेला विरोध. हा विरोध करता करता या लोकांनी ट्रंपना पाठिंबा देणाऱ्यांच्या अकलेवर आणि मानसिक संतुलनावर प्रश्न उपस्थित केले. या सगळयामुळे अल्प आणि मध्यम शिक्षित श्वेतवर्णीय लोकांमध्ये व्यवस्थेविरुध्द असलेला राग हा ट्रंपना मत देण्याच्या निर्धारात परावर्तित झाला. यात श्वेतवर्णीय महिलांचाही मोठया प्रमाणावर समावेश होता. दुसरीकडे ओबामा अध्यक्ष असूनही कृष्णवर्णीय लोकांशी होणारा सावत्रभाव कमी न झाल्याने त्यांनी ओबामांच्या वेळेएवढा उत्साह दाखवला नाही. आर्थिक मरगळीमुळे ग्रस्त असलेल्या तरुणवर्गानेही मतदानासाठी म्हणावा तेवढा उत्साह दाखवला नाही.

हिलरींनी या निवडणूक प्रचारावर ट्रंपपेक्षा काही पट जास्त पैसा ओतला. हॉलिवूडमधील प्रसिध्द गायक-अभिनेत्यांनी हिलरीच्या समर्थनार्थ कार्यक्रम केले. क्लिंटन परिवाराकडून विविध लाभांचे मानकरी ठरलेल्या पत्रकार, राजकीय पंडितांनी त्या जिंकाव्या म्हणून वादविवादाचे प्रश्न फोडून ते हिलरी यांना कळवले. तंत्रज्ञान कंपन्यांनी रोबोट्सचा आणि बिग डेटाचा मोठया प्रमाणावर वापर करून मतदान न केलेले किंवा करू शकणारे लोक ओळखून त्यांच्यापर्यंत पोहोचायची सोय उपलब्ध करून दिली. बोटावर मोजण्याएवढे काही अपवाद वगळता, आजवर झालेल्या शेकडो मतदानपूर्व चाचण्यांमध्ये क्लिंटनच विजयी होणार अशी भाकिते करणारे पत्रकार-पंडित 9 नोव्हेंबरला तोंडावर आपटले. हिलरी का हरल्या? या विषयाप्रमाणेच ट्रम्प का जिंकले? ते संपूर्ण अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकतील का? समर्थकांना दिलेली अविश्वसनीय आश्वासने ते पूर्ण करू शकतील का? त्यांच्या राजवटीत महिला, अल्पसंख्याक, समलिंगी, विभिन्न वांशिक गटांचे लोक आणि पत्रकार सुरक्षित राहतील का? आणि सगळयात महत्त्वाचे म्हणजे मुख्य प्रवाही मीडिया आणि दुखावले गेलेला अभिजन वर्ग त्यांना सुखाने राज्य करू देईल का? प्रश्न अनेक आहेत. प्रत्येक प्रश्नावर एक लेख लिहिला जाऊ शकतो. पण नंतर कधीतरी. तूर्तास अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रंप यांच्या लवकरच सुरू होणाऱ्या कारकिर्दीस शुभेच्छा.

9769474645