प्रजा कालस्य कारणम्.

विवेक मराठी    11-Nov-2016
Total Views |

हा लढा केवळ उजवे आणि डावे विचारवंत असा नव्हताच; कारण ट्रंप जरी उजव्या - म्हणजे रिपब्लिकन पक्षातून लढले असले, तरी त्यांची सगळी मते ही त्या पक्षाशी जुळणारी नाहीत आणि या लढयातले डावे - म्हणजे अमेरिकन भाषेतील 'लिबरल' हे जनतेला समजू शकले नाहीत, ही त्यांच्या उमेदवार (हिलरी) आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी या निवडणुकीसाठी शोकांतिका ठरली आहे. बुध्दिवाद आपल्यालाच माहीत आहे, विचारवंत म्हणजे काय आम्हीच, आम्हालाच जनतेला काय योग्य ह्याचे ज्ञान आहे असा कुठेतरी आविर्भाव होता. त्या उलट ट्रंप हे जनतेच्या काळजाला भिडणारे बोलत होते. त्यांचे साधे सोपे बोलणे जनतेला प्रामाणिक संवादासारखे वाटत होते. आणि डाव्यांचे 'व्हाइट अनएज्युकेटेड' वगैरेसारखे शब्द कुठेतरी जाचत होते. लोकशाहीत जे जाचते, त्याला विरोध दाखवता येण्यासारखा एकच दिवस सामान्य माणसासाठी असतो - मतदानाचा दिवस.


गे
ल्या दीड-एक वर्षांपासून चालू झालेल्या 2016च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या अंतिम अंकावर नोव्हेंबर 9च्या अमेरिकन पहाटे शेवटी पडदा पडला. जे होण्याची शक्यता आहे असे माध्यमपंडितांपासून ते दोन्ही प्रमुख पक्षांमधील राजकारणी तसेच बहुतांश सामान्यांना स्वप्नातदेखील वाटले नव्हते, तेच झाले आणि डेमोक्रॅटिक हिलरी क्लिंटन या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन निवडणूक पध्दतीत हरल्या आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप हे 'अधिकृत उगवते राष्ट्राध्यक्ष' (प्रेसिडेंटइलेक्ट) म्हणून जाहीर झाले आहेत.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणूकही 'इलेक्टोरल कॉलेज' पध्दतीने होते. थोडक्यात, प्रत्येक राज्यासाठी किती मते/गुणांक हे ठरलेले आहे. ज्या उमेदवाराला 270 अथवा अधिक इलेक्टोरल कॉलेजची मते मिळतील, तो/ती राष्ट्राध्यक्ष. त्यामुळे राष्ट्रीय एकूण मतगणनेत हिलरी क्लिंटन या ट्रंपपेक्षा पुढे राहिल्या असल्या, तरी (हे लिहीत असताना) इलेक्टोरल कॉलेजमध्ये 276 मते मिळवून ट्रंप निवडणूक जिंकले म्हणून जाहीर झाले.

निवडणूक संपण्याच्या वेळच्या इथल्या काही पध्दती विचारात घेण्यासारख्या आहेत. पराभूत उमेदवार हिलरीने स्थानिक पहाटेच्या अडीचच्या सुमारास कल्पना आल्यावर ट्रंप यांना फोन करून पराभव मान्य केला. ट्रंप यांनी त्यांच्या लढवय्येपणाबद्दल हिलरींचे कौतुक केले आणि निवडणुकीतली भांडणे विसरून पुढे जाण्याची भाषा केली. नंतर ट्रंप यांनी समर्थकांसमोर आणि प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून देशाला (आणि जगाला) उद्देशून पहिले भाषण केले आणि समन्वयाची भूमिका मांडली. सकाळी हिलरी यांनी समर्थकांपुढे सविस्तर भाषण केले. त्यात नजीकच्या भविष्यात प्रेसिडेंट झाल्यावर ट्रंप यांना सहकार्य करण्याची भाषा करत असतानाच अप्रत्यक्ष शब्दांत जर या देशातल्या समानतेचा भंग झाला आणि जनतेला चुकीची वागणूक मिळाली, तर आवाज उठवण्याची भाषादेखील केली. अर्थात त्यानंतर हिलरी यांची राजकीय कारकिर्द कायमस्वरूपी संपुष्टात आली. जरी कधीकाळी त्याला इतिहासात अपवाद झालेले असले, तरी अमेरिकन पध्दतीतील हा अप्रत्यक्ष नियम आहे.

त्याआधी गेला महिनाभर ओबामा प्रशासनातून हिलरी आणि ट्रंप यांच्या निवडक सहकाऱ्यांबरोबर 20 जानेवारीला त्यांच्यातले कोणीही राष्ट्राध्यक्ष झाल्यास कसे सत्तांतर करावे यावरून वेगवेगळया वेळेस चर्चा चालू होती. आता ओबामांनी प्रथेनुसार ट्रंप यांना उद्या व्हाइट हाउसमध्ये बोलावले आहे. त्यानंतर ट्रंप यांचे सहकारी न्यू जर्सीचे गव्हर्नर ख्रिस ख्रिस्ती हे ट्रान्झिशन टीम प्रमुख म्हणून सत्तांतरासाठीची प्रक्रिया चालू करतील. दि. 20 जानेवारी हा ओबामांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शेवटचा दिवस ट्रंप यांचा पहिला दिवस असेल.

तमाम माध्यमे, राजकीय विचारवंत, सांख्यिकी तज्ज्ञ, सर्वेक्षणकर्ते आणि राजकीय पक्ष, या सगळयांनाच हिलरी कमी-अधिक फरकाने जिंकून येणार याची खात्री होती. तरी मग असे कसे झाले? अर्थात ट्रंपचा अपवाद होता. ते प्रत्येक भाषणात सातत्याने आणि अत्यंत खात्रीने जिंकूनच येणार हे म्हणायचे. पण मग ट्रंप सोडून इतके सगळे कसे काय चुकले?


हिलरी या गेली 30हून अधिक वर्षे राजकीय आणि सरकारी अनुभव असलेल्या, तर ट्रंप हे अमरिकन इतिहासातले आता पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत, ज्यांना सरकारातील आणि/अथवा सैन्यदलातील अनुभव नाही. त्यांचा अनुभव धंदेवाईक - रिअल इस्टेट, कॅसिनो आणि माध्यम (रिऍलिटी शो)... हिलरीचे व्यक्तिमत्त्व हसरे (कधी कधी जास्तच हसरे) आणि बोलणे-वागणे सभ्यतेला धरून. तर ट्रंप हे किमान निवडणूक काळात तरी भडक माथ्याचे आणि टि्वटरसारख्या समाजमाध्यमातून माध्यमांशी भांडणारे, वाटेल तसे बोलणारे, 'मेक्सिकोच्या हद्दीवर त्यांच्या पैशाने भिंत बांधू', 'मुसलमानांना अमेरिकेत येण्यापासून बंदी करू', आधी घटनेत न बसणारे निर्णय घेण्याची भाषा, आणि हिलरीलादेखील क्रूकेड हिलरी असे संबोधणारे... एकूण अमेरिकन पांढरपेशा जीवनशैलीत हिलरी या किमान वरकरणी चपखल बसणाऱ्या, तर ट्रंप हे अगदीच गावरान! हिलरी क्लिंटनचे निवडणूक व्यवस्थापन अत्यंत चोख, आधुनिक आणि तळागाळापर्यंत पोहोचलेले, तर ट्रंप यांचे व्यवस्थापन होते तरी का, याविषयी पक्षांतर्गत झालेल्या प्राथमिक निवडणुकांपासून शंका. हिलरीकडे अधिकृतपणे गोळा केलेला भरपूर पैसा, तर ट्रंप या फंदात विशेष पडले नाहीत आणि प्रसंगी स्वत:चा पैसा घालून निवडणूक लढवत राहिले. हिलरींची सरकारी कामासाठी खाजगी ईमेल सर्व्हर वापरणे आणि क्लिंटन फाउंडेशन वरून काही गैर आहे, असे सिध्द नसले झाले तरी शंकास्पद निधीसंचयाचे आरोप आणि त्यावर चर्चा, तर ट्रंप यांचे स्त्रियांवरील वर्तन, त्यावरील भाष्य, कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन अठरा वर्षे जवळपास एक बिलियन डॉलर्स इतका टॅक्स चुकवणे, धंदे दिवाळखोरीत काढणे आदी अनेक आरोप आणि त्यावर चर्चा.

या निवडणुकीत हिलरीच्या बाजूने ओबामांसकट अनेक डेमोक्रॅटिक दिग्गजांनी स्वत:चे नाव पणाला लावले होते आणि सर्वत्र प्रचार करत फिरणे शेवटपर्यंत चालू ठेवले. बहुतांशी माध्यमेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिलरींच्या बाजूने होती. दुसऱ्या बाजूला ट्रंप हे अनेक कारणांनी अनेकांना न आवडणारे अथवा काळजी करायला लावणारे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या पक्षातील दिग्गज नेतेही ट्रंप यांच्या बाजूने प्रचारात उतरलेले नव्हते. मात्र ट्रंप या अवस्थेतदेखील कुठेही हताश न होता स्वत:, त्यांचे कुटुंबीय आणि काही दुसऱ्या फळीतले रिपब्लिकन नेते यांच्या मदतीने प्रचार करत राहिले.

या निवडणुकीत अंदाज वर्तवणारे जे अनेक मुद्दे मांडायचे, त्यात एक आवडता मुद्दा असा होता की केवळ श्वेतवर्णीय अशिक्षित हेच काय ते ट्रंप यांचे समर्थक आहेत. या देशातील दुसरा मोठा समुदाय म्हणजे लॅटिनो अथवा दक्षिण अमेरिकन वंशीय जनता. तीदेखील कृष्णवर्णीयांबरोबर आणि सुशिक्षितांबरोबर हिलरीलाच मते देणार हा भ्रम होता हे आता लक्षात येत आहे. पण वास्तवात यातील बहुतांश बिगर शहरी समाज हा अर्थकारणामुळे गांजलेला आहे. त्याचे नक्की कारण काय आहे, याचा विचार करण्यात, अर्थात जनतेची नस ओळखण्यात हिलरी आणि हिलरी समर्थक सर्वार्थाने कमी पडले. ट्रंपचे वाटेल तसे बोलणे, वागणे हे जनतेला आवडणार नाही असे सर्वांना वाटायचे, त्यावरून भरपूर विनोददेखील करण्यात आले. पण जनतेला असे 'मोकळे' वागणेच प्रामाणिक वाटत राहिले. हिलरींचा कथित भ्रष्टाचार हा त्यांच्या प्रतिमेसाठी आणि उमेदवारीसाठी मारक ठरला. जनतेला एकंदरीत वॉशिंग्टनला चालणाऱ्या त्याच त्याच राजकारणाचा आणि म्हणून पर्यायाने राजकारण्यांचा कंटाळा आला होता. त्यामुळे एकदम कसलाही राजकीय अनुभव नसलेल्या ट्रंप यांच्या गळयात विजयमाला पडली आहे.

हा लढा केवळ उजवे आणि डावे विचारवंत असा नव्हताच; कारण ट्रंप जरी उजव्या - म्हणजे रिपब्लिकन पक्षातून लढले असले, तरी त्यांची सगळी मते ही त्या पक्षाशी जुळणारी नाहीत आणि या लढयातले डावे - म्हणजे अमेरिकन भाषेतील 'लिबरल' हे जनतेला समजू शकले नाहीत, ही त्यांच्या उमेदवार (हिलरी) आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी या निवडणुकीसाठी शोकांतिका ठरली आहे. बुध्दिवाद आपल्यालाच माहीत आहे, विचारवंत म्हणजे काय आम्हीच, आम्हालाच जनतेला काय योग्य ह्याचे ज्ञान आहे असा कुठेतरी अविर्भाव होता. त्या उलट ट्रंप हे जनतेच्या काळजाला भिडणारे बोलत होते. त्यांचे साधे सोपे बोलणे जनतेला प्रामाणिक संवादासारखे वाटत होते. आणि डाव्यांचे 'व्हाइट अनएज्युकेटेड' वगैरेसारखे शब्द कुठेतरी जाचत होते. लोकशाहीत जे जाचते, त्याला विरोध दाखवता येण्यासारखा एकच दिवस सामान्य माणसासाठी असतो - मतदानाचा दिवस.


कुठल्याही माध्यमे, राजकीय पंडित आणि सर्वेक्षण कर्त्यांनीदेखील आपण आपल्याला योग्य वाटते तेच अथवा तेवढेच खरे आहे असे समजून तर जगाकडे बघत नाहीत ना, याचादेखील विचार करण्याची वेळ आली आहे. 'उदंड जाहले सर्व्हेज, चर्चा-वाद घालावया' अशी अमेरिकेत माध्यमांची अवस्था झाली होती. आपले मत हे खऱ्या अर्थाने गोपनीय ठेवून कात्रज दाखवण्यात जनता आता तरबेज झाली आहे. परिणामी, अशा सर्वेक्षणातून वास्तवापेक्षा आभासी माहितीच अधिक तयार होत राहिली.

म्हणूनच, थोडक्यात जर राजकारण्यांना धडाच घ्यायचा असेल, तर तो सोपा आहे का माहीत नाही, पण साधा नक्की आहे... जनतेला काय हवे हे समजून घेणे, जनतेशी संवाद साधणे आणि आपण स्वत: तसेच आपले सहकारी (निवडणूक कार्यकर्ते) हे जमिनीवर पाय ठेवून जनतेशी समरसतेने बोलत आहेत ना, याचे सतत परीक्षण करणे आणि सरतेशेवटी जी आश्वासने देत आहे ती पाळण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त वाटचाल करणे ह्याला पर्याय नाही... बुध्दिवाद, सुशिक्षित, अर्धशिक्षित वगैरे नकळत भेद करून स्वत:ला मोठे दाखवणे तर नक्कीच उपाय नाही.

शेवटी लोकशाहीत प्रजा हीच राजा असते. तिच्या निर्णयाने सरकारे येतात-जातात,  देश आणि समाज घडतो अथवा बिघडतो...  म्हणूनच, आधुनिक काळात 'प्रजा कालस्य कारणम्' असेच म्हणणे सयुक्तिक ठरेल.

 

निवडणुकीची पध्दत

अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणूक 'इलेक्टोरल कॉलेज' पध्दतीने होते. थोडक्यात, प्रत्येक राज्यासाठी किती मते/गुणांक याचा फर्ॉम्युला ठरलेला आहे. काही राज्यांत दोन्ही उमेदवारांना त्यांना मिळालेल्या मतांच्या प्रपोर्शनेट 'इलेक्टोरल कॉलेज'ची मते/गुणांक मिळतात, तर काही राज्यांत बहुमत मिळालेल्या उमेदवाराला त्या राज्याची सगळी मते/गुणांक मिळतात. ज्या उमेदवाराला 270 अथवा अधिक इलेक्टोरल कॉलेजची मते/गुणांक मिळतील, तो/ती राष्ट्राध्यक्ष. यात पुढे आणखी एक गंमत आहे! जर थर्ड पार्टी उमेदवाराने एखादे राज्य जिंकले आणि त्यामुळे दोन्ही प्रमुख उमेदवारांना 270पेक्षा कमी मते मिळाली, तर कोणीच राष्ट्राध्यक्ष होणार नाही आणि अमेरिकन काँग्रेस त्यांच्या मताने राष्ट्राध्यक्ष ठरवेल. आजपर्यंत असे कधीच घडलेले नाही. पण या वेळेस असे घडले तर आश्चर्य वाटायला नको!

सारांश : प्रत्येक वैयक्तिक मताला प्रत्यक्ष किंमत नाही, पण 'इलेक्टोरल कॉलेज' पध्दतीमुळे अप्रत्यक्ष किंमत असते. म्हणून राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणूक भ्रष्टाचार अवघड, किंबहुना अशक्य आहे.

हार स्वीकारायचा कौतुकास्पद मार्ग

इथले उमेदवार निवडणुकींचे निकाल लागल्यावर कसे वागतात याची दोन उदाहरणे. पहिले रॉमनींचे. 2012ची ओबामा विरुध्द रॉमनी निवडणूक. कॅलिफोर्नियाचे निकाल अजून आलेलेही नव्हते आणि इतर सगळीकडचेही सगळे, म्हणजे 100% जाहीर झालेले नव्हते. पण स्टॅटिस्टिकल ट्रेंड समजला होता आणि तो बदलण्याची शक्यता नव्हती. (ह्याचे खरे चित्रीकरण आहे.) रॉमनीने मुलाला सांगितले की प्रेसिडेंटचा (ओबामांचा) फोन दे (/लावून दे). मुलाचे म्हणणे होते की अजून थांबू या, चित्र बदलू शकेल. रॉमनीने सांगितले, ''नाही, इट्स ओव्हर!'' फोन केला, कन्सेशन (हरला हे मान्य करत समर्थकांना दिलेले भाषण) स्पीच दिले आणि मुला-बायकोबरोबर स्वत: गाडी चालवत घरी निघून गेले. तीच गोष्ट 2008 साली ओबामांच्या विरोधात हरलेल्या जॉन मॅकेनची. ऐकीव गोष्टींप्रमाणे, मॅकेन महाशय दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या ऍरिझोनातील घराजवळच्या ग्रोसरी स्टोअरमध्ये खरेदी करायला गेलेले दिसले!

 vvvdeshpande@gmail.com