ऋषींचे कूळ, नदीचे मूळ आणि टाटांचा मस्तकशूळ

विवेक मराठी    12-Nov-2016
Total Views |

भारतीय आणि जागतिक उद्योग जगतात आजवर टाटांचे स्थान ऋषितुल्य होते. पण दीड शतकाची देदीप्यमान परंपरा असलेल्या टाटा उद्योग समूहाचे केवळ सहावे अध्यक्ष असलेल्या सायरस मिस्त्री यांना धक्कातंत्राचा वापर करून 24 ऑॅक्टोबरला पायउतार करण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या शीतयुध्दात टाटा समूहातील कंपन्यांत घडत असलेल्या अशोभनीय गोष्टींची लक्तरे रोजच्या रोज वेशीवर टांगली जाऊ लागली आहेत. या युध्दाचा अंत नजरेच्या टप्प्यात नाही आणि त्यात कोणीही जिंकले तरी टाटा समूहाची ढासळणारी विश्वसनीयता त्यांना थांबवता येणार नाही.

षींचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात. ते खरेही आहे. उगमानंतर अल्लडपणे, खळाळत वाहणारी किंवा पुढे जाऊन स्थिर, शांत आणि विशाल प्रवाह बनून सागराला मिळणारी नदी मनात पावित्र्य आणि आनंदाचा भाव निर्माण करते. पण उगमाच्या ठिकाणी तिचे रूप ओळखणे अवघड असते. कठोर तपश्चर्येने ऋषिपदावर पोहोचलेल्या आणि समाजात आदराचे स्थान प्राप्त केलेल्या अनेक व्यक्तींच्या पूर्वायुष्यात डोकावल्यास अनेकदा विश्वास न बसणाऱ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. भारतीय आणि जागतिक उद्योग जगतात आजवर टाटांचे स्थान ऋषितुल्य होते. पण दीड शतकाची देदीप्यमान परंपरा असलेल्या टाटा उद्योग समूहाचे केवळ सहावे अध्यक्ष असलेल्या सायरस मिस्त्री यांना धक्कातंत्राचा वापर करून 24 ऑॅक्टोबरला पायउतार करण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या शीतयुध्दात टाटा समूहातील कंपन्यांत घडत असलेल्या अशोभनीय गोष्टींची लक्तरे रोजच्या रोज वेशीवर टांगली जाऊ लागली आहेत. या युध्दाचा अंत नजरेच्या टप्प्यात नाही आणि त्यात कोणीही जिंकले, तरी टाटा समूहाची ढासळणारी विश्वसनीयता त्यांना थांबवता येणार नाही.

उद्योगक्षेत्रातील मानक

103 अब्ज डॉलर्सची वार्षिक उलाढाल, 5 अब्ज डॉलर्सहून अधिक नफा, मिठापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत आणि चहापासून ते विमानसेवा अशी सर्वच क्षेत्रे पादाक्रांत केलेल्या टाटा समूहाचा 100हून अधिक देशांमध्ये पसारा असून तो 6 लाख साठ हजार लोकांना रोजगार पुरवत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील सुशासन, कर्मचारीस्नेही नियम, तत्त्वांची जपणूक, पारदर्शकता आणि सामाजिक उत्तरदायित्व या बाबतीत टाटा समूहाचे आचरण मानक म्हणून समजण्यात येते. देशातील कला, क्रीडा, विज्ञान यांच्या प्रसारासाठी टाटांएवढे योगदान खचितच दुसऱ्या कोणत्या उद्योग समूहाने दिले असेल. जागतिकीकरणाची 25 वर्षे उलटून गेल्यानंतरही समाजवादाची धुंदी पूर्णपणे न उतरलेल्या आपल्या देशात बहुसंख्य उद्योग घराण्यांना एकाकडून खरेदी करून दुसऱ्याला विकणारे म्हणजेच दुकानदार / बनिये समजले जात असताना वस्त्रोद्योग, पंचतारांकित उद्योग, विमानसेवा, वाहन आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांची देशात मुहूर्तमेढ रोवणाऱ्या टाटांकडे नेहमीच आदराने बघितले जायचे. त्यामुळे कदाचित वाजपेयी सरकारने सरकारी उद्योगांतून निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतल्यावर व्हीएसएनएल ही बलाढय कंपनी टाटांना विकली. विरोधी पक्षांनीही या निर्णयाकडे संशयाने पाहिले नाही.

पाश्चिमात्य जगात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या दशकानुदशके व्यायसायिकतेच्या मूल्यांवर चालवल्या जातात. त्यात घराणेशाहीला फारसे स्थान नसते. अनेकदा त्यात अंतर्गत बंडाळीतून किंवा बाहेरच्या मदतीतून सगळेच्या सगळे व्यवस्थापन बदलले जाते; कंपनीच्या संस्थापकालाही पायउतार व्हावे लागते. अगदी स्टीव्ह जॉब्सही त्याला अपवाद ठरला नाही. भारतातील बहुतेक कंपन्या या विविध उद्योग-घराण्यांकडे असून त्यात कार्यक्षमतेपेक्षा आपल्या वंशाच्या दिव्यांना प्राधान्य दिले जाते. त्यातही अनेकदा भावंडांत किंवा वडील आणि मुले यांच्यात मतभेद होऊन उद्योगांची विभागणी होताना दिसते. पुन्हा एकदा अपवाद टाटांचा. दीड शतकाच्या वाटचालीत टाटा आडनाव नसलेली व्यक्ती फक्त एकदा आणि तीही चार वर्षांसाठी समूहाची अध्यक्ष झाली असली, तरी टाटा समूहात घराण्यापेक्षा व्यावसायिकतेला अधिक महत्त्व दिले गेले होते. त्यामुळे 4 वर्षांपूर्वी रतन टाटांनी स्वत:हून निवृत्ती जाहीर करत व्यापक निवड प्रक्रियेद्वारे सायरस मिस्त्री यांना आपला उत्तराधिकारी निवडले, तेव्हा त्यांचे जगभरातून कौतुक झाले. टाटा नसलेले सायरस हे समूहाचे केवळ दुसरे अध्यक्ष. वयाच्या चाळिशीत समूहाची धुरा खांद्यावर घेतलेले सायरस पुढील वीस-तीस वर्षे तरी अध्यक्षपद भूषवतील, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. पण तसे घडणे नव्हते. ते का झाले नाही, याच्या दोन बाजू आहेत. टाटांच्या प्रत्यक्षाहून उत्कट असलेल्या प्रतिमेमुळे अनेकदा त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे आणि अपयशाचे परखडपणे मूल्यमापन होत नाही. लाभांश म्हणून मिळालेला नफा समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणे निश्चितच कौतुकास्पद आहे, पण प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी व्यवहाराला महत्त्व न देता नुकसान सोसणे, तोटयात असलेल्या कंपन्या आणि उद्योग तसेच चालू ठेवणे आणि कंपनीच्या इतिहासाशी असलेल्या दायित्वाखातर हात पोळले जातील अशा उद्योगांत शिरणे या गोष्टी समभागधारकांना तसेच आजच्या पिढीतील उद्योजकांना मान्य होणे कठीण आहे.


आणि मिस्त्रींची नेमणूक झाली

टाटा समूहाची रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. समूहातील शेअर बाजारात नोंदणी असलेल्या 29 पब्लिक कंपन्यांचे बाजारमूल्य 106 अब्ज डॉलर्स असले, तरी त्यातील सुमारे 75 अब्ज डॉलर्स मूल्य हे एकटया टीसीएसचे - म्हणजे टाटा कन्सल्टन्सीचे आहे. तीच गोष्ट नफ्याच्या बाबतीत लागू पडते. टाटा समूहाचा 80% नफा केवळ 20% कंपन्यांकडून होतो. त्यातही टीसीएस ही आयटी सेवा क्षेत्रातील कंपनी आणि टाटा मोटर्सचा जॅग्वार-लँडरोव्हर विभाग वाढीच्या तसेच नफ्याच्या बाबतीत सातत्य राखून आहे. टाटा समूहातील विविध कंपन्यांमध्ये टाटा सन्सचा मोठा वाटा असून टाटा सन्स या होल्डिंग कंपनीचे सर्वाधिक - म्हणजे सुमारे 67% समभाग विविध टाटा सामाजिक न्यासांकडे (ट्रस्ट्सकडे) आहेत. या न्यासांचे अप्रत्यक्ष नियंत्रण रतन टाटांकडे आहे. त्याखालोखाल सर्वाधिक - म्हणजे 18.4% समभाग शापोरजी पालनजी परिवाराकडे आहेत. रतन टाटांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीत सायरस मिस्त्रींचाही समावेश होता. त्यांच्या निवडीच्या वेळी याबद्दल फारसे प्रश्न उठले नसले, तरी आता टाटांच्या जवळील काही व्यक्ती अशी कुजबुज करत आहेत की, त्या वेळी रतन टाटांचे उत्तराधिकारी म्हणून निवडलेले अन्य पर्याय पालोनजी परिवाराने नाकारले, त्यामुळे शेवटी नाइलाजाने सायरस यांची नेमणूक करणे भाग पडले.

अंतर्गत घडामोडी

सायरस यांना अध्यक्षपदावरून हटवताना टाटा सन्सच्या संचालकांनी त्यांच्या अकार्यक्षमतेचे आणि त्यामुळे टाटा सामाजिक न्यासांना मिळणाऱ्या लाभांशातील कटोत्रीचे कारण दिले. ते सायरस यांनी टाटा सन्सच्या संचालकांना लिहिलेल्या आणि नंतर सार्वजनिक झालेल्या इमेलमध्ये मुद्देसूदरित्या खोडून काढले आहे. ते वाचल्यावर सायरस यांच्या बाजूमध्ये तथ्य आहे असे वाटू लागते. सायरस यांच्या दाव्यांनुसार त्यांना कंपनीचे अध्यक्ष बनवले असले तरी कंपनीच्या आर्टिकल्स ऑॅफ असोसिएशनमधील बदल तसेच स्वतंत्र संचालकांच्या जागी स्वत:च्या मर्जीतील व्यक्तींना बसवून रतन टाटांनी खऱ्या अर्थाने सूत्रे सायरस यांच्याकडे दिलीच नाहीत. स्वतंत्र संचालक बोर्डाच्या बैठकांच्या आधी रतन टाटांशी सल्लामसलत करून भूमिका घ्यायचे. टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या अंतर्गत व्यवहारांबाबतही सायरस यांनी प्रश्न उपस्थित केले आणि हे आतबट्टयाचे निर्णय पुढे रेटण्यामागे थेट रतन टाटांना जबाबदार ठरवले.

त्यातील एक म्हणजे टाटांचा हवाई वाहतूक क्षेत्रात उतरण्याचा निर्णय. सायरस यांच्या मते त्यात फायद्या-तोटयापेक्षा रतन टाटांच्या स्वप्नाला महत्त्व देण्यात आले होते. टाटांच्या एअर एशिया या मलेशियन हवाई वाहतूक कंपनीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने हवाई वाहतूक क्षेत्रात परदेशी कंपन्यांना 49%पेक्षा जास्त गुंतवणूक करण्यास परवानगी नाही. एअर एशिया इंडियामध्ये टाटा 49%, एअर एशिया 49% व कंपनीचे अध्यक्ष एस. रामादोराई आणि संचालक वेंकटरामन यांच्याकडे 2% समभाग आहेत. परंतु बेनामी भागभांडवलधारकांच्या माध्यमातून मलेशियन कंपनीच्या हाती सूत्रे दिल्याचा, तसेच मलेशियन कंपनीकडून टाटांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांना अव्वाच्या सव्वा किंमत लावल्याचा आरोप करण्यात आला. त्याचप्रमाणे टेलिकॉम क्षेत्रात टाटांच्या जपानची आघाडीची कंपनी डोकोमोसह भागीदारीतील असफलतेमुळे डोकोमोने 5 वर्षे पूर्ण व्हायच्या आत करारातून बाहेर पडायचा निर्णय घेतला व टाटांशी झालेल्या करारानुसार आपल्या 26.5% वाटयाच्या बदल्यात 7200 कोटी रुपयांची (1.15 अब्ज डॉलर्सची) मागणी केली. सायरसच्या अध्यक्षतेखाली टाटांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीचा आधार घेत या मागणीच्या अर्ध्याहून कमी रक्कम डोकोमोला देऊ केली. या प्रकरणात डोकोमो आंतरराष्ट्रीय लवादात गेली आणि तिथे टाटांच्या विरोधात निर्णय लागला. या प्रकरणात टाटा समूहाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला आणि विश्वासार्हतेला तडा गेला असून त्यासाठी टाटा समूहातील जुन्या-जाणत्यांनी सायरस यांना जबाबदार धरले. अर्थात सायरस यांनी त्यांचे स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे. कोरस ही युरोपातील बलाढय पोलाद कंपनी टाटा स्टीलने 2006 साली 8.1 अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम मोजून खरेदी केली होती. पण 2008 साली अमेरिकेतील गृहउद्योगावर आलेल्या संकटानंतर जागतिक अर्थव्यवस्था आजतागायत सावरली नसल्याने पोलादाच्या मागणीवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे कोरस स्टील मोठया प्रमाणावर तोटयात असून नाइलाजास्तव कंपनीला ब्रिटनमधील आपल्या खाणी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे तेथील 15000 कामगारांच्या भवितव्यावर प्रश्न निर्माण झाला. सायरस यांचा निर्णय आर्थिक शहाणपणाचा असला, तरी राजकीयदृष्टया वादग्रस्त ठरला. 1 लाखाची गाडी किंवा जगातील सर्वात स्वस्त मोटार म्हणून नॅनोने नाव मिळवले खरे; पण सिंगूर येथील प्रकल्प गुंडाळून गुजरातला हलवावा लागल्यामुळे, तसेच वाढत्या किमतींमुळे या गाडीचा उत्पादन खर्च कायम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त राहिला. पण असे असूनही, केवळ रतन टाटांची इच्छा आणि त्यांची गुंतवणूक असलेल्या एका स्टार्ट-अप कंपनीच्या हितसंबंधांकरता नॅनोचे उत्पादन सुरू असल्याचा गंभीर आरोप सायरस यांनी आपल्या ईमेलद्वारे केला आहे.


सायरस यांच्या आरोपांना टाटा सन्सने संयत पण जशास तसे उत्तर दिले. त्यांनीही सायरस यांनी आपल्या मर्जीतील लोकांना घेऊन सुरू केलेल्या एक्झिक्युटिव्ह ग्रूप काउन्सिलने (सल्लागार समितीने) टाटा सन्सच्या संचालकांना अंधारात ठेवून कशा प्रकारे निर्णय घेतले, टाटा कंपन्यांतील गैरव्यवहारांबद्दल माहिती होती तर स्वत: अध्यक्ष असताना त्याबद्दल का नाही बोलले, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय टाटा सन्सवर मालकी प्रस्थापित करणे हे सायरस आणि मिस्त्री परिवाराचे खरे उद्दिष्ट होते, असे आरोप केले. अन्य मोठया कंपन्यांच्या रचनेपेक्षा टाटा समूहाची रचना वेगळी आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. समूहातील अनेक कंपन्यांत टाटा समूहाकडे असलेल्या समभागांचा वाटा नगण्य आहे. टाटा सन्समधून सायरस यांना पायउतार करण्यात आले असले, तरी टाटा समूहातील कंपन्यांत ते आजही अध्यक्ष आहेत. त्यांना त्या त्या कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून पायउतार करायचे असेल, तर त्या त्या कंपन्यांच्या संचालक मंडळांना आणि काही बाबतीत भागधारकांना तसा निर्णय घ्यावा लागेल. इंडियन हॉटेल्सच्या बाबतीत तसेच झाले. एचडीएफसी बँकेचे दीपक पारेख आणि नादिर गोदरेज यांच्यासह सातही स्वतंत्र संचालक सायरस मिस्त्रींच्या बाजूने उभे राहिले. हा लेख लिहीत असतानाही रोज दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपांच्या आणि शह-काटशहाच्या फैरी झाडण्यात येत आहेत. या साठमारीत कोणती बाजू खरी आहे, कोणती खोटी आहे हे येणारा काळ ठरवणार असला, तरी टाटांनी आजवर राखलेली स्वच्छ प्रतिमा डागाळून गेली आहे.

काही अनुत्तरित प्रश्न

पुढील चार महिन्यांत टाटा समूहाला नवीन अध्यक्ष मिळेल. तो पारशी असेल का? असला तर टाटा आडनाव असलेला असेल का? नसेल, तर कोणी भारतीय उद्योगपती असेल का बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्षपदी विराजमान भारतीय वंशाच्या माणसाला त्यासाठी आमंत्रित केले जाईल? पालोनजी मिस्त्री परिवाराकडे असलेल्या समभागांचे काय? टाटा समूहाकडून ते विकत घेतले जातील का? मिस्त्री परिवाराने समभाग विकण्यास नकार देऊन अडवणुकीचे धोरण अवलंबले, तर काय? असे अनेक प्रश्न आज अनुत्तरित आहेत. सरकारने या प्रकरणापासून स्वत:ला वेगळे ठेवले असले, तरी दोन्ही बाजूंनी राजकारणात प्रस्थापित असलेल्या वकिलांना आपल्या बाजूने कामाला लावले असल्याने भविष्यात या प्रकरणाचे राजकारण होणार, हे नक्की आहे. सिंगापूर, जपान आणि ब्रिटन आणि अन्य काही देशांसाठी तेथील टाटांची गुंतवणूक तसेच भागीदारी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे त्यांच्याकडूनही या युध्दात रसद पुरवली जाईल यात शंका नाही. या निमित्ताने पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि समभागधारकांप्रती उत्तरदायित्व या बाबतीत फारसे चांगले नाव नसलेल्या भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रावर असलेला लोकांचा विश्वास कमी झाला आहे. यामुळे सरकारी नियंत्रणाला चालना मिळेल, तसेच तोटयातील सरकारी उद्योगांच्या निर्गुंतवणुकीकरणाला विरोध तीव्र होईल. टाटा समूहातील गृहकलह भारतातील छोटे-मोठे गुंतवणूकदार आणि सरकार या सगळयांसाठीच मस्तकशूळ ठरला आहे.

 9769474645