अध्यात्मातून समाजकार्याचा वस्तुपाठ

विवेक मराठी    28-Nov-2016
Total Views |


पुस्तकाचे स्वागतमूल्य रु. 125/-

पुस्तकासाठी संपर्क ः

l अनिल चांदवडकर - 9371804937, l मदन भंदुरे - 9403687936,

l भीमराव गारे - 9527563354.

ध्यात्मसाधना ही वैयक्तिक बाब समजली जाते. अनेकदा साधू-महंत गिरिकंदरात लोकांपासून दूर जाऊन साधना करीत असतात. मात्र अध्यात्म आणि सामाजिक कार्य हातात हात घालून चालू शकते, हे दाखवून दिले नाशिकचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि दत्तभक्त प्रभाकर पाठक तथा प्रभुजी यांनी.

श्री दत्त सेवा समितीच्या माध्यमातून ते विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवीत असतात. नाशिक परिसरातील स्वामी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांच्या गुरुपरंपरेतील दत्तभक्तांना एकत्र करून सेवा-भक्तिकार्य करणे हा त्यांचा स्तुत्य हेतू. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गरजूंना गणवेश वाटपदेखील समितीतर्फे केले जाते. तीन वर्षापूर्वी या समितीची स्थापना झाली. समितीतर्फे सिंहस्थात पालखी यात्रा काढण्यात आली होती. समितीच्या 26पैकी 17 सदस्य परिवारांचा त्यात सहभाग होता. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रभाकर पाठक हे समितीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. आज 67 वर्षे वय असलेल्या पाठक यांनी आपल्या वाहतूक व्यवसायातून निवृत्ती स्वीकारून त्यांनी सेवा-भक्तिकार्याला वाहून घेतले आहे. त्यांनी नर्मदा परिक्रमा केली असून या अवघड परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव त्यांनी 'बिल्वपत्र' या पुस्तकात प्रसिध्द केले आहेत. पाठक आणि त्यांचे मित्र बाबा देशपांडे यांनी 2008मध्ये नर्मदा परिक्रमा साडेतीन महिन्यांत - म्हणजे 135 दिवसांत पूर्ण केली. नर्मदा परिक्रमेचे अनुभव त्यांनी 'बिल्वपत्र'मध्ये व्यक्त केले आहेत. सोमवार, दि. 17 ऑॅक्टोबर रोजी येथील परशुराम साईखेडकर नाटय मंदिरात त्याचे प्रकाशन झाले.

गुरूकन्यागत पर्वानिमित्त तीन दिवसांच्या  प.पू. स्वामी वासुदेवानंद सरस्वती स्मृती व्याखानमालेचे आयोजन केले होते. त्याच्या पहिल्या दिवशी हे प्रकाशन झाले. प्रभुजी यांनी या पुस्तकाच्या विक्रीतून येणारी रक्कम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आपत्ती निवारण निधीसाठी दिली आहे. त्यासाठी त्यांनी पुस्तकाच्या सर्व एक हजार प्रती जनकल्याण समितीकडे सुपुर्द केल्या आहेत. आपल्या कमाईतून समाजकार्य करण्याचा त्यांचा प्रयत्न केवळ स्तुत्यच नव्हे, तर अनुकरणीय आहे. यापूर्वीदेखील त्यांनी दत्त संप्रदायातील सर्व माहिती देणारे पुस्तक संकलित केले असून हजारो भक्तांना त्याचा लाभ झालेला आहे.

या कार्यक्रमात पहिल्या दिवशी प.पू. स्वामी स्वरूपानंद महाराज यांचे 'नर्मदा परिक्रमा - एक चिंतन' या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी प.पू. मकरंद महाराज (दत्तधाम, परभणी) यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात श्री रंगावधूत परिवार नाशिकच्या गुरुमाई हेमाताई यांच्या हस्ते प्रभुजी यांच्या 'बिल्वपत्र - नमामि देवी नर्मदे' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मौलिक मार्गदर्शन केले. ''भक्ती ही काहीही न करता साध्य होणारी बाब नसून त्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. नर्मदा परिक्रमा हा भक्तीचा एक आविष्कार आहे'' असे त्यांनी सांगितले. मंगळवारी
दि. 18 ऑक्टोबर रोजी 'श्री दत्तात्रेयांचे चोवीस गुरू' या विषयावर वेदशास्त्रसंपन्न अतुलशास्त्री भगरे यांनी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले. भालोद येथील प.पू. प्रतापे महाराज यांचा आशीर्वाद या कार्यक्रमास लाभला. या प्रसंगी भगरे शास्त्री यांच्या 'समर्पण' या विविध स्तोत्रसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तर बुधवारी दि. 19 रोजी 'श्रीसूक्ताचा अर्थविषयक दृष्टीकोन' या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी तिसरे पुष्प गुंफून या विषयाला आधुनिक ज्ञानाची जोड दिली. 'ठेविले अनंते तैसेची रहावे' या उक्तीचा चुकीचा अर्थ काढून भारतीय संस्कृतीत पैशाला किंमत नाही, असा आरोप आपल्या ग्रंथांवर आणि संतांवर केला जातो; मात्र ते अर्धसत्य असून लक्ष्मीची आराधना करावी, अलक्ष्मीची नाही, अशीच शिकवण आपल्याला आपल्या धर्माने आणि संस्कृतीने दिल्याचे प्रतिपादन डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.

तीन दिवसांच्या या व्याख्यानमालेने नाशिककर भाविकांना आणि संघ कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिली. व्यवहार आणि अध्यात्म यातील समन्वय कसा साधावा याचा आदर्श वस्तुपाठ या निमित्ताने प्रभुजी यांनी घालून दिला असून या कार्याचा दरवळ वर्षानुवर्षे शहरातीलच नव्हे, तर अन्यत्र सर्वत्र विधायक कार्य करणाऱ्यांना प्रेरणा देत राहील, हेच या उपक्रमाचे मोठे यश म्हणावे लागेल. रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या आपत्ती विमोचन निधीला मोठया प्रमाणात मदत मिळू शकेल, असे चित्र आहे. 

 8422969603