मधुमेहाने काय होतं? - 2

विवेक मराठी    29-Nov-2016
Total Views |

पेशींमध्ये प्रमाणाबाहेर शिरलेलं ग्लुकोज इतर अनेक प्रकारे पेशीला त्रास द्यायला सुरुवात करतं. त्याची थोडी विस्तृत चर्चा केल्याशिवाय मधुमेहाला आपण मान का द्यायला हवा याची कल्पना येणार नाही. अर्थात त्यासाठी जेव्हा ग्लुकोज योग्य प्रमाणात पेशींमध्ये येतं, तेव्हा त्या ग्लुकोजचं भविष्य काय असतं यावर एक नजर टाकावी लागेल.


पे
शींमध्ये प्रमाणाबाहेर ग्लुकोज शिरल्यावर केवळ भाऊगर्दीने होणारे प्रश्न आपण पाहिले. परंतु तिथे शिरलेलं ग्लुकोज इतर अनेक प्रकारे पेशीला त्रास द्यायला सुरुवात करतं. त्याची थोडी विस्तृत चर्चा केल्याशिवाय मधुमेहाला आपण मान का द्यायला हवा याची कल्पना येणार नाही. अर्थात त्यासाठी जेव्हा ग्लुकोज योग्य प्रमाणात पेशींमध्ये येतं, तेव्हा त्या ग्लुकोजचं भविष्य काय असतं यावर एक नजर टाकावी लागेल. चला तर, तेच करू या.

जेव्हा इन्श्युलीन पेशींसाठी ग्लुकोजचं दार उघडून देतं, तेव्हा ग्लुकोजचं मुख्य काम असतं पेशींसाठी आवश्यक असलेली ऊर्जा, एनर्जी मिळवून द्यायचं. हे घडण्यासाठी ग्लुकोजला 'क्रॅब सायकल' नावाच्या चक्रात अडकावं लागतं. ऊर्जेच्या या चक्राचं वैशिष्टय म्हणजे यात उपयोगात आणलं गेलेलं ग्लुकोज पूर्णपणे वापरलं जातं आणि शेवटी फक्त पाणी आणि कार्बन डाय ऑॅक्साइड वायू इतकंच उरतं. या दोन्हीचा निचरा नैसर्गिक मार्गाने होऊ शकतो.

ग्लुकोजची भाऊगर्दी झाल्यावर थोडासा गोंधळ होणार, हे साहजिकच आहे. अचानक आलेल्या ग्लुकोजच्या लोंढयाला पुरेल इतकी क्रॅब सायकलची व्यवस्था पेशी कुठून करणार? त्यामुळे त्या ग्लुकोजला स्वत:ची काही पर्यायी सोय लावणं भाग पडतं. तशी पर्यायी व्यवस्था पेशींमध्ये असतेच. फक्त ती सुप्त असते. पेशीला तिचा वापर करण्याची फारशी गरज पडत नाही. आपत्तीच्या काळात उपयोगी पडावी यासाठी ही निसर्गाची योजना असं म्हटलं तर वावगं होणार नाही. पेशीत अतिरिक्त ग्लुकोज आल्यावर मात्र पेशीला या व्यवस्थेची आठवण होते. हायवेवर ट्रॅफिक जॅम झाल्यावर जशा गाडया बाजूच्या पायवाटेने जायचा प्रयत्न करतात, त्यातलाच हा प्रकार म्हणायला हरकत नाही. फक्त हायवेपेक्षा पायवाटेवर धूळ अधिक उडावी, तसं काहीसं इथे घडतं. या मार्गाने गेलेल्या ग्लुकोजचं पूर्ण विघटन होत नाही. त्यातून वेगवेगळी अल्कोहोल्स बनतात. अल्कोहोल वाढलं की पेशींचं नुकसान होतं.

पण पेशींना त्याहून जास्त नुकसान करणारी गोष्ट निराळी असते. ग्लुकोज हे नेहमीच्या वापरात नसलेली वाट चोखाळत असताना अल्कोहोलसोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते. पेशीत ऑॅक्सिजनचा तणाव वाढतो. शब्द समजायला अवघड आहे हे खरं. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर आपल्या सगळया पेशींमध्ये सतत रासायनिक क्रिया होत असते. त्यातल्या काहींमध्ये ऑॅक्सिजन वापरला जातो. त्या वेळी जे एकेरी ऑॅक्सिजनचे रेणू तयार होतात ते पूर्णपणे निष्प्रभ करण्याची सक्षम यंत्रणा पेशींकडे असते. असे एकेरी रेणू शिल्लक राहणं धोक्याचं असतं. वातावरणात असलेले ऑॅक्सिजनचे रेणू दोन-दोनच्या गटात असतात, ते असे एकमेकांचा हात धरून सुखाने नांदत असतात. पण वेगळे झाले की हेच कण विनाशी बनू लागतात. गर्दीत एखाद्या मुलाचा पालकांचा हात सुटावा आणि पालक व मूल दोघे सैरभैर व्हावेत, तसंच काहीसं हे. हरवलेलं मूल रडत रडत ज्याचा-त्याचा हात धरायला धावतं. तसे हे ऑॅक्सिजनचे चुकार रेणू वागतात. पेशींमध्ये हात धरायला असून असून काय असणार? प्रोटीन्स वगैरे त्यांच्या तावडीत सापडतात. एकदा हे ऑॅक्सिजनचे एकल रेणू प्रोटीन्स वगैरेंना चिकटले की ते प्रोटिन्स कामातून जातात. काम करण्याची प्रोटीन्सची शक्ती कमी होते. पेशींचं बरंच नुकसान होतं. एरव्ही ही पाळी येतच नाही. चुकार रेणूंना ठिकाणावर आणायला आवश्यक असलेली यंत्रणा पेशींमध्ये असते. पेशी व्यवस्थित राहतात. पण फार ग्लुकोज आलं आणि ऑॅक्सिजनचे खूप जास्त एकल रेणू बनले की ही यंत्रणा अपुरी पडते. बनलेले रेणू आणि त्यांना ठिकाणावर आणायला पेशीत असलेली यंत्रणा यातली तफावत म्हणजे ऑॅक्सिजनचा तणाव किंवा ऑॅक्सिडेटिव्ह स्ट्रेस. हे उपद्वयापी रेणू इथेच थांबत नाहीत. त्यांची संख्या फार वाढली की पेशींमधून बाहेर पडून रक्तात प्रवेश मिळवतात आणि संपूर्ण शरीरभर फिरतात. तेव्हा त्यांना रिऍक्टिव्ह ऑॅक्सिजन स्पेसीज (ROS) असं म्हणतात.

कोणी म्हणेल, ऑॅक्सिजनचे रेणू ते काय? त्याची इतकी पत्रास का म्हणून?

तसं या रेणूंना कमी समजू नका. त्यांच्यात प्रचंड रासायनिक शक्ती असते. अशा रासायनिक शक्तीचा अनुभव आपण दुसऱ्या महायुध्दात घेतला आहे. ऍटम बाँब हे रासायनिक गोष्टींच्या विध्वंसक ताकदीचं उदाहरण आपल्यापुढे आहेच. अर्थात ऍटम बाँबची ऑॅक्सिजनच्या चुकार रेणूंशी केलेली तुलना ही अतिशयोक्ती झाली. पण या रेणूतदेखील आपल्या शरीराला त्रास देण्याची भरपूर क्षमता असते हे कळावं, म्हणून थोडा अतिरेक करणं भाग पडलं.

रक्तात इतस्तत: फिरणारे हे ऑॅक्सिजनचे रेणू वाटेत मिळेल त्या प्रोटीन्सच्या अथवा कोलेस्टेरॉलच्या कणांना चिकटत जातात. एकदा या कणांनी कोलेस्टेरॉलचं ऑॅक्सिडेशन केलं की मग ते कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये आपलं बस्तान बसवतं. रक्तवाहिन्या चोंदू लागतात. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स झाले की माणसाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये असं काही झालं म्हणजे लकवा होतो. कळलं ऑॅक्सिजनच्या रेणूंचं हे इतकं आख्यान का लावावं लागलं ते!

मधुमेह झाला की रक्तात गुलाबजामचं सिरप फिरावं अशी परिस्थिती निर्माण होते, हे आपण पाहिलं. गुलाबजामचं सिरप चिकट असतं. तसं रक्त चिकट होतं. या चिकटपणाने रक्ताचा प्रवाह मंदावतो. मोठया रक्तवाहिन्यांना त्याचा फारसा उपद्रव निदान सुरुवातीला तरी होत नाही. परंतु सूक्ष्म रक्तवाहिन्यांना मात्र बराच त्रास सहन करावा लागतो. याला आम्ही डॉक्टर 'मायक्रो ऍंजिओपॅथी' म्हणतो. हा प्रकार केवळ मधुमेहात दिसत असल्याने त्याला महत्त्व आलं आहे. डोळे, मूत्रपिंड या इंद्रियांना मधुमेहाने होणारे प्रश्न छोटया रक्तवाहिन्यांनी झालेले असतात. असे डोळयात दिसणारे मधुमेहाशी संबंधित बदल पहिल्यांदा केव्हा दिसले, रक्तातलं ग्लुकोज किती असताना दिसले, हे पाहून आपलं ग्लुकोज नॉर्मल कधी समजायचं हे ठरवलं जातं. इतकं या छोटया रक्तवाहिन्यांत मधुमेहात होणाऱ्या बदलांना महत्त्व आहे.

रक्तातलं ग्लुकोज प्रोटीन्सना चिकटतं, त्यांचा आकार बदलतं हेदेखील आपल्याला नवं नाही. पण ते केवळ प्रोटीन्सनाच चिकटतं असं नाही. महत्त्वाच्या इतर अनेक गोष्टींनादेखील ग्लुकोज चिकटतं. त्या भागाचं काम ठप्प करून टाकतं. उदाहरणादाखल मूत्रपिंड घेऊ. मूत्रपिंड आपलं रक्त गाळून ते शुध्द करायचं काम करतं. रक्तातले नको असलेले घटक काढताना हव्या असलेल्या घटकांची जपणूक करणं हेसुध्दा मूत्रपिंडाला करावं लागतं. नको असलेला घटक म्हणजे क्रिएटिन गाळून हवे असलेले प्रोटीन्स वाया जाऊ नयेत, लघवीवाटे बाहेर टाकून दिले जाऊ नयेत यासाठी मूत्रपिंडात एक पातळ पडदा असतो. या पडद्याला असलेल्या छिद्रांतून प्रोटीन्स वाया जाऊ नयेत म्हणून त्या पडद्यावर विशिष्ट विद्युतभार असतो. प्रोटीन्स आणि पडद्यावरचा भार सारखा असल्याने ते एकमेकांशी फटकून वागायचा गुणधर्म पाळतात. एकसारखा विद्युतभार असलेल्या चुंबकाच्या वस्तू कशा एक-दुसऱ्यापासून दूर जातात, तसेच हे वागतात. त्यामुळे प्रोटीन्स पडद्याच्या जवळही फिरकत नाहीत. साहजिकच ते पडद्यामधून गाळले जात नाहीत. आपले प्रोटीन्स वाचतात. शरीराला तेच हवं असतं.

मूत्रपिंडातल्या मूत्र गाळणाऱ्या पडद्याला ग्लुकोज चिकटलं की त्या पडद्याचे गुणधर्म बदलतात. तिथला विद्युतभार बदलतो. आता प्रोटीन्स फटकून वागण्याचं कारण उरत नाही. ते त्या पडद्याशी जवळीक करतात आणि छोटया आकाराचे प्रोटीन्स गाळलेही जातात. मूत्रपिंडाचं कार्य कमी कमी व्हायला लागतं. मधुमेहात मूत्रपिंड निकामी होण्याची जी काही करणं सांगता येतील, त्यात हे प्रमुख म्हणायला हरकत नाही.

अशा अनेक गोष्टी मधुमेहात घडत असतात. अर्थात सगळीकडे मधुमेहाचा सारखाच परिणाम होत नाही. शरीराच्या वेगवेगळया इंद्रियांवर मधुमेह काय काय दिवे लावतो, ते पाहताना आपण त्या त्या इंद्रियांच्या खोलात शिरूच. पण तरीही उगीच घाबरून जाण्याचं कारण नाही. हे सगळं कोणाच्या बाबतीत घडतं? ज्यांचं ग्लुकोज ताळयावर नाही, नॉर्मलपेक्षा खूपच अधिक आणि तेही बराच काळ जास्त राहिलं आहे, त्यांच्या. उलट जर सुरुवातीला ग्लुकोज नॉर्मल ठेवण्याचा आटापिटा केला, तर पुढच्या कितीतरी काळासाठी शरीर स्वस्थ राहतं हे सिध्द झालं आहे. म्हणूनच पुढच्या भागापासून आपण आपलं ग्लुकोज कसं नॉर्मल ठेवायचं, ते पाहायला आरंभ करणार आहोत.

 9892245272