अडचण आहे, पण... देशहितासाठी सहन करू

विवेक मराठी    29-Nov-2016
Total Views |

मंगळवार दि. 8 नोव्हेंबरच्या रात्री नोटबंदी लागू झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कापसाची वेचणी करणाऱ्या मजुरांना आठवडयाची मजुरी देण्यासाठीची गावातल्या शेतकऱ्यांची लगबग थंडच होती. कारण हजार-पाचशेच्या नोटा मजूर घेणार नाही, याची खात्री होती. शेतकरी जेव्हा मजुरी देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला, तेव्हा हसूनच मजुरांनी ''शंभरच्या असतील तर द्या, नाही तर तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा द्या!'' असे उत्तर दिले. त्यानंतरचे दोन आठवडेही साधारणत: असेच गेले, पण हजार-पाचशेच्या नोटबंदीमुळे गावात कुठेच शेतकरी व मजूर असा वाद नजरेस पडला नाही. पहिल्यांदाच सगळयांना एका मापात मोजणारा कायदा आल्याचे सुख 100 रुपये रोजंदारीवर शेतात राबणाऱ्यांना जाणवले.


रोजंदारीवरच ज्यांचा संसार उभा होता, ते सगळेच - म्हणजे शेतमजूर, गावातले फेरीवाले, किराणा दुकानदार, आठवडे बाजारातले पाल टाकून दुकान थाटणारे सगळेच नोटबंदीमुळे अडचणीत असूनही सरकारच्या भ्रष्टाचार आण्ाि काळया पैशाच्या निर्मूलनासाठी अडचण सोसायला तयार दिसले. कात टाकल्यानंतरच्या नव्या झळाळीसाठी काही दिवसांच्या यातना सहन करायची तयारी सगळेच करू लागले असल्याचे जाणवले. एकमेकाच्या विश्वासावर उभी राहिलेली खेडयातली संस्कृती नोटबंदीच्या आवाहनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसले.

विठ्ठलाच्यार् दर्शनाला नाही का रांगेत उभे राहात आपण?

धरणगाव अर्बन बँकेत उभ्या असलेल्या दिनेश नीळकंठ पाटील व भगवान दिगंबर पाटील या शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ''साईबाबाच्या, विठ्ठलाच्यार् दशनासाठी आपण नेहमीच रांगेत उभे राहतो. मग दोन-चार तास बँकेच्या रांगेत उभे राहिलो तर काही बिघडत नाही.'' असे उत्तर दिले. सरकारच्या एका चांगल्या र्निणयासाठी रांगेत उभे राहण्याची आमची तयारी असल्याचे त्यांचे व रांगेतल्या सगळयांचेच म्हणणे होते.

जळगावच्या पिपल्स बँकेच्या रांगेत उभे राहिलेले पेन्शनर, स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी गेलेले व्यावसायिकांचे कर्मचारी या सगळयांच्याच प्रतिक्रिया यापेक्षा काही वेगळया नव्हत्या.

नोटबंदीचा मोदी सरकारच्या र्निणयाने सामान्य जनांच्या अडचणी तर वाढल्या. पण हे सरकार धाडसी असून देशहितासाठीचा हा योग्यच र्निणय असल्याचा विश्वास लोकांना वाटू लागलाय.


शेतकरीही चेकने व्यवहार करू लागले

रब्बी हंगामात मका लागवड करायची असल्याने धरणगाव येथील सुनील ऍग्रो सेंटर येथे एक शेतकरी मक्याचे बियाणे घ्यायला आला होता. बियाणांचे बिल तर झाले नि पैसे अदा करण्याची वेळ आली, तेव्हा झालेल्या बिलापोटी रक्कम अदा करण्यासाठी म्हणून त्यांनी खिशातून चेक काढून दिला. खते-बियाणांसाठी दुकानदाराला चेक देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. ''एका नव्या पर्वाला सुरुवात होत असून त्यासाठीची तयारी करायलाच हवी'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

याबाबतीत दुकानाचे मालक सुनील मालू यांनी सांग्ाितले की, ''शेतकरी नेहमीच रोखीने व्यवहार करतात. परंतु नोटबंदीनंतर आमच्याकडे 22 शेतकऱ्यांनी चेक देऊ न बियाणे, खते, औषधांची खरेदी केली. बियाणे, खत विक्री कमी झाली हे व्यापारी म्हणून सांगतो. अनेक शेतकऱ्यांना आम्ही उधारीवर माल दिला. शेतकरी अडचणीत आहे, परंतु दुकानात येणारा प्रत्येक शेतकरी सरकारने चांगला र्निणय घेतला अशीच प्रतिक्रिया देतो. आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ  लागली आहे.''

धरणगाव अर्बन बँकेने ग्राहकांना दिले दररोज 1 कोटी

धरणगावात जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून मिळाव्यात, यासाठी स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेच्या खालोखाल धरणगाव अर्बन बँकेमध्ये रांग लागली होती. असे असले, तरी 10 तारखेपासून 23पर्यंत या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दररोज एक तास जादा काम करून लोकांना पैसे दिले व त्यांच्याकडचे स्वीकारले. या कालखंडात वादविवादाचा प्रसंग एकही घडला नाही. ग्राहकांकडून या काळात 32 कोटी रुपये बँकेने जमा केले, तर 14 कोटी रुपयांचे वाटप केले, अशी माहिती धरणगाव अर्बन बँकेचे महाव्यवस्थापक सुशील गुजराथी यांनी दिली.

कापसाची खेडा खरेदी थांबली

अर्थव्यवस्थेतील स्वच्छता मोहिमेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असले, तरी बाजारातील खरेदी-विक्री व्यवहार अडचणीत सापडल्याचे दिसले. शेतकऱ्यांच्या दाराशी वजनमापे लावून कपाशी घेणाऱ्या व्यापाऱ्यांजवळ पुरेसे नवे चलन उपलब्ध नसल्याने त्यांनी शेतकऱ्यांना जुन्या नोटांच्या बदल्यात कापूस देण्याची विनंती केलीय, तर काहींनी 'कापूस द्या, चेक घ्या' धोरण अवलंबिले आहे. काही शेतकऱ्यांनी जुन्या नोटांच्या बदल्यात कापूस विकलादेखील. परंतु चेक घेण्याबाबत शेतकरी फारसा उत्सुक नाही. कारण व्यापाऱ्याकडून फसवणूक होऊ  शकते. त्यामुळे पुरेसे नवे चलन बाजारात आल्याश्ािवाय कापूस विकायचा नाही, असे धोरण शेतकऱ्यांनी आखल्याचे दिसते.

कृषिप्र्रदशनात सुवर्णकारांनी शेतकऱ्यांना बदलून दिल्या

12 लाखाच्या नोटा

जळगाव येथे नुकतेच 'ऍग्रोवर्ल्ड 2016'चे आयोजन पार पडले. या ठिकाणी जळगावातील सर्ुवणकार 'देवा तुझा मी सोनार ' या संघटनेने नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर प्र्रदशनस्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय टळावी, म्हणून नव्या दोन हजारांच्या नोटांच्या बदल्यात 100च्या नोटा वितरित करण्याचा अभिनव स्टॉल मांडला होता. 4 दिवसात सुमारे 30 लाख रुपये त्यांनी बदलून दिले. पहिल्या दिवशी त्यांनी आपापसात 5 लाख रुपयांचे सुटे गोळा केले होते. ते पहिल्याच दिवशी संपल्याने दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा व्यापाऱ्यांना आवाहन करून 100च्या व 50च्या नोटा गोळा केल्या. त्या दिवशी 11 लाख रुपये वितरित झाले. तिसऱ्या दिवशी 10 लाख व अखेरच्या दिवशी 4 लाख रुपये वितरित करण्यात आले.

'सर्ुवणमध्य' या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. या संस्थेचे किरण पातोंडेकर यांनी सांग्ाितले की, ''आम्ही व्यापाऱ्यांना सांग्ाितले की शेतकऱ्यांच्या हाती पैसा गेल्याश्ािवाय आपल्याकडेही पैसा येणार नाही. त्यामुळे प्र्रदशनात सहभागी शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची आम्ही चांगली सोय करू शकलो. यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती.'' या कामासाठी समाजातील अनेकांचे चांगले सहकार्य लाभल्याचे पाताेंडेकर यांनी सांग्ाितले.

मोठया किमतीच्या नोट बंदीमुळे शेतकरी काही प्रमाणात अडचणीत सापडला आहे, हे मात्र चित्र दिसून येत आहे. थांबलेली कापूस, कांदा खरेदी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. तरीही कुठेही नाराजीचा सूर नाही, हे मात्र खरे.  8805221372