संघयोगी

विवेक मराठी    30-Nov-2016
Total Views |

 एक प्रचारक आपल्या जीवनात अशी अनेक अलौकिक कार्य करतो. पण त्याचा डंका पिटत नाही. तथापि त्यांच्या कार्यामुळेच संघ समाजव्यापी बनत जातो. सूर्यनारायण राव यांचा धीरगंभीर आवाज मी अनेक वेळा ऐकला आहे. चेन्नईहून वर्षातून एकदा-दोनदा तरी त्यांचा फोन येत असे. आज ती वाणी शांत झाली आहे. संन्यासयोगी चिद्भवानंदांना संघकार्याची अनुभूती देणारे सूर्यनारायण राव महान संघयोगी होते.
रा.
स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा. सूर्यनारायण राव वयाच्या 93व्या वर्षी बंगळुरू येथे वारले. 1946 सालापासून ते प्रचारक होते. त्यांचा जन्म म्हैसुरूचा. बंगळुरू येथे त्याचा संघाशी संबंध आला आणि बी.एस्सी. झाल्यानंतर 1946 साली ते प्रचारक म्हणून बाहेर पडले. 70 वर्षांच्या प्रचारक जीवनाचा अंत 18 ऑक्टोबर 2016 रोजी झाला. दक्षिणेतील संघकाम उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कर्नाटकात प्रचारक म्हणून त्यांच्या कामाला प्रारंभ झाला. 1971 ते 1984 या काळात ते तामिळनाडूचे प्रांत प्रचारक होते. त्यानंतर क्षेत्र प्रचारक म्हणून त्यांच्यावर आंध्र, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक अशा चार प्रांतांची जबाबदारी आली. 1960नंतर ते अखिल भारतीय सेवाप्रमुख झाले. वयोमानाप्रमाणे त्यांचे शरीर थकले आणि गेली अनेक वर्षे चेन्नई येथील संघ कार्यालयात त्यांचा निवास असे.

वर त्यांच्या संघप्रचारक जीवनाची कारकिर्द दिली आहे. तेवढी वाचून तांत्रिक माहितीशिवाय हाती काही लागत नाही. या तांत्रिक माहितीमध्ये प्रचारकांचे व्यक्तिमत्त्व, संघकार्याचे त्यांचे आकलन, संघटन उभे करण्यासाठी करावे लागणारे अफाट कष्ट, समाजाच्या विविध स्तरांतील लोकांशी संपर्क आणि त्यांना संघकार्याशी जोडण्याचे कौशल्य, संघकार्याविषयी उठणाऱ्या वेगवेगळया वादळांना झेलत स्वयंसेवक कार्यकर्त्याचे मनोबल उंचावत ठेवण्यासाठी करावी लागणारी धडपड, समाजाच्या मूलगामी प्रश्नांचे चिंतन अशा एक ना अनेक विषयांची माहिती केवळ जीवनपट मांडून होत नाही. सूर्यनारायण राव तसे फार मोठे लेखक नव्हते. परंतु त्यांनी 'स्वामी विवेकानंदांची दिव्यदृष्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जीवितकार्य' या विषयावर इंग्रजीत पुस्तक लिहिले आहे. या एका पुस्तकाच्या वाचनाने सूर्यनारायण राव यांच्या व्यक्तित्वाच्या खोलीचा परिचय वाचकांना झाल्याशिवाय राहणार नाही.

स्वामी विवेकानंद यांना खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारतीय राष्ट्रवादाचे जनक समजले जाते. परंतु भारतातील अनेक तथाकथित विद्वान त्यांच्या त्यांच्या विचारसरणीप्रमाणे स्वामी विवेकानंदांना मांडण्याचा प्रयत्न करतात. समाजवाद्यांना आणि साम्यवाद्यांना विवेकानंद समाजवादी आणि साम्यवादी वाटतात. जातीच्या चिखलात लोळणाऱ्या विद्वानांना विवेकानंद चातुरर््वण्याचे आणि जातिप्रथेचे समर्थक वाटतात. तर सेक्युलरवाद्यांना विवेकानंद सेक्युलरवादाचे प्रतीक वाटतात. सूर्यनारायण राव यांनी या पुस्तकात विवेकानंदांची जीवनदृष्टी हे संघाचे जीवनकार्य कसे झाले आहे, हे अप्रतिमरित्या मांडले आहे.


ज्याला संघाची उत्तम माहिती आणि जाण आहे व स्वामी विवेकानंदांचे सखोल वाचन आहे, तोच अशी मांडणी करू शकतो. स्वामी विवेकानंद आणि श्रीगुरुजी यांच्या विचारातील साधर्म्य दाखविणारे परिच्छेदमागून परिच्छेद देता येऊ शकतात. सूर्यनारायण राव यांच्या पुस्तकात हे सर्व आहेच. विवेकानंदांच्या वाङ्मयातील असंख्य गोष्टी त्यांना कंठस्थ होत्या. श्रीगुरुजी हे त्यांच्या परमश्रध्देचे स्थान होते. परंतु एवढयाने हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे झाले असते असे नाही. या पुस्तकातील एक प्रकरण स्वामी चिद्भवानंद यांच्याविषयी आहे.

कोण होते हे चिद्भवानंद? चिद्भवानंद यांचा जन्म 1898 साली तामिळनाडूत एका संपन्न परिवारात झाला. त्यांचे नाव होते चिन्नास्वामी. आय.सी.एस.ची परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला जायचे होते, म्हणून ते मद्रासला आले होते. पासपोर्ट, तिकिटाची चौकशी करून ते बाहेर आले. पुस्तकांच्या एका दुकानात गेले. 'स्वामी विवेकानंदांची मद्रास येथील भाषणे' हे पुस्तक त्यांनी घेतले. 'आमच्या समोरील कार्य' हे भाषण त्यांनी वाचले आणि त्यांच्या जीवनाची दिशा बदलली. भारतात राहूनच भारतमातेची सेवा करण्याचा संकल्प झाला. रामकृष्ण मठाच्या मद्रास येथील आश्रमात ते गेले. रामकृष्णांच्या साहित्याशी त्यांचा परिचय झाला. बी.ए.ची फायनल परीक्षा सोडून ते बेलूर मठात दाखल झाले. आणि स्वामी शिवानंदांकडून त्यांनी ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली. त्यांचे नाव बदलले आणि ते ब्रह्मचारी त्रिंबक चैतन्य झाले. 1926 साली स्वामी शिवानंदांनी त्यांना संन्यासधर्माची दीक्षा दिली. पुन्हा त्यांचे नाव बदलले आणि ते चिद्भवानंद झाले. यानंतरचे त्यांचे सर्व जीवन मातृभूमीला समर्पित झाले.

तामिळनाडूमध्ये स्वामी विवेकानंदांचे कार्य जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. अनेक शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या. 'अंतर-योगम्' या नावाची एक चळवळ त्यांनी सुरू केली. गुरुकुलाच्या धर्तीवर शाळा आणि महाविद्यालये सुरू केली. सूर्यनारायण राव आणि चिद्भवानंद यांचा परिचय वाढत गेला. संघाविषयी चिद्भवानंद यांच्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज होते. सूर्यनारायण राव त्यांच्याशी चर्चा करीत. परंतु चर्चा करून संघ सांगता येत नाही. संघाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. सूर्यनारायण रावांनी स्वामीजींना सुचवले की, तुमच्या एका महाविद्यालयात संघ शिक्षा वर्गाचे आयोजन होऊ द्या आणि तेथे तुम्ही संघाचा अनुभव घ्या. मे 1980मध्ये विवेकानंद कॉलेज येथे संघ शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी चिद्भवानंद वर्गाच्या पूर्ण कालावधीत कॉलेजमध्येच राहिले. पहाटे पाच वाजता सुरू होणाऱ्या प्रात:स्मरणात ते सहभागी होत. प्रार्थनेला ते उभे राहत. नंतर संघ शिक्षा वर्गात त्यांचे दोन बौध्दिक वर्ग झाले आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला.

संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाचे ते अध्यक्ष होते. समारोपाच्या भाषणात ते म्हणाले, ''सूर्यनारायण रावजी, माझे पूर्ण समाधान झालेले आहे. माझे सर्व आश्रम, शाळा आणि महाविद्यालये तुम्हाला तुमच्या आईच्या घरासारखी आहेत. येथे तुम्ही कोणताही कार्यक्रम नि:संकोचपणे करू शकता. तुम्हाला लागणाऱ्या सर्व साधनांची पूर्तता आम्ही करू. दर वर्षी येथेच संघ शिक्षा वर्ग तुम्ही घेत चला.''

ते पुढे म्हणाले. ''माझ्या तरुण मित्रांनो तुम्ही फार भाग्यवान आहात. स्वामी विवेकानंदांच्या कल्पनेतील प्रशिक्षण येथे संघाच्या शिबिरात तुम्हा सर्वांना प्राप्त होत आहे. स्वामी विवेकानंदांना मनुष्य निर्माण करण्याचे आणि प्रत्येक व्यक्तीत चारित्र्य, अनुशासन, देशभक्ती आणि आपल्या बांधवांविषयीची प्रीती निर्माण करणारे शिक्षण हवे होते. तुम्ही सर्व रामभक्त हनुमानासारखे व्हा'' असे त्यांनी शेवटी आवाहन केले.

तामिळनाडूतील संघचालकांच्या बैठकीचा समारोप करताना ते म्हणाले, ''हिंदू धर्म आणि समाज यांचे रक्षण व्हावे, ही सर्वशक्तिमान परमेश्वराची इच्छा आहे आणि त्यासाठीच त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती केली आहे. हे ईश्वरीय कार्य आहे.'' स्वयंसेवकांच्या एका बैठकीत एका स्वयंसेवकाने त्यांना प्रश्न विचारला की, ''आत्मोन्नतीसाठी कशा प्रकारची आध्यात्मिक साधना करायला पाहिजे?'' उत्तर देताना स्वामी म्हणाले, ''एक तासाच्या दैनंदिन शाखेत तुम्ही रोज जा. शाखेतील सर्व कार्यक्रम करा. अनुशासनाचे पालन करून जी जबाबदारी तुमच्यावर सोपवली असेल तिचे अत्यंत प्रामाणिकपणे आणि श्रध्देने पालन करा. संघकार्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्या. तुमच्या आत्मोन्नतीसाठी ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. स्वयंसेवकांना अन्य कोणत्याही आध्यात्मिक साधनेची गरज नाही.''

स्वामी चिद्भवानंद हे विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी शिवानंद यांचे शिष्य होते. स्वामी अखंडानंद हे स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू होते. श्रीगुरुजी त्यांचे शिष्य होते. श्रीगुरुजींनी डॉ. हेडगेवारांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी घेतली. विवेकानंदांची दिव्यदृष्टी संघाचे जीवनलक्ष्य झाली. स्वामी चिद्भवानंदांना या सत्याची अनुभूती झाली. निमित्त झाले संघप्रचारक सूर्यनारायण राव. एक प्रचारक आपल्या जीवनात अशी अनेक अलौकिक कार्य करतो. पण त्याचा डंका पिटत नाही. तथापि त्यांच्या कार्यामुळेच संघ समाजव्यापी बनत जातो. सूर्यनारायण राव यांचा धीरगंभीर आवाज मी अनेक वेळा ऐकला आहे. चेन्नईहून वर्षातून एकदा-दोनदा तरी त्यांचा फोन येत असे. आज ती वाणी शांत झाली आहे. संन्यासयोगी चिद्भवानंदांना संघकार्याची अनुभूती देणारे सूर्यनारायण राव महान संघयोगी होते. कर्मयोग, ज्ञानयोग, संन्यासयोग आणि भक्तियोग हे योगाचे प्रकार श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहेत. कलियुगात या सगळयांचा संगम संघयोगात झालेला दिसतो. सूर्यनारायण रावांसारखे संघप्रचारक या संघयोगाचे जिवंत उदाहरण असतात.

vivekedit@gmail.com