हा वैचारिक गोंधळ जगण्याची कक्षा व पर्याय बदलल्याने - मंदार भारदे

विवेक मराठी    04-Nov-2016
Total Views |

जगातल्या अनेक लोकशाही देशांची उदाहरणे आहेत, जिथे राष्ट्रवाद ह्या संकल्पनेला निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि विकास ह्या संकल्पनेच्या मागे लोक उभे राहिले. आज जगभरातले उच्च मध्यमवर्गीय आणि वरच्या आर्थिक स्तरातले लोक ज्या देशातले कायदे जगण्याला अधिक लायक आहेत, जिथे प्रगतीच्या अधिक संधी आहेत, ज्या देशात अधिक स्वातंत्र्य आहे, त्या देशाची निवड आपल्या वास्तव्यासाठी करतात. आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन राहण्यात कोणतीही राष्ट्रवादाची किंवा राष्ट्रप्रेमाची भावना त्यांना आड येत नाही किंवा आपला देश आपल्या प्रगतीला सोयीचा नाही अशी भावना झाल्यावर त्यांना देश सोडून जाण्यात कोणतेही देशप्रेम अडवू शकत नाही.


र्माच्या खालोखाल राष्ट्रवाद हा कायमच वादग्रस्त शब्द ठरत आलेला आहे. ह्या शब्दाचा अनेक जणांनी अनेक प्रकारे अर्थ लावला. बहुतांश वेळेला प्रत्येकानेच त्याचा आपापल्या सोयीने अर्थ लावलेला आहे. शक्यतो एका भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांनी त्या भूप्रदेशातील मूल्ये, संस्कृती, आचारविचार ह्यांच्याप्रती अभिमान बाळगावा आणि जर ह्यापैकी एखाद्या किंवा सगळयाच गोष्टींना जर कोणी इजा पोहोचवत असेल, तर त्याविरुध्द त्याने उभे राहावे हे राष्ट्रवादाच्या साधारणपणे मान्य व्याख्येत अपेक्षित असते.

ह्या राष्ट्रवादाच्या प्रसारासाठी प्रयत्न करणारे प्रचारक किंवा राष्ट्रवादाला जर कोणी इजा पोहोचवत असेल, तर त्याविरुध्द लढणारे लोक हे सर्व सामान्यपणे त्या राष्ट्रवादाशी बांधलेल्या समूहात आदराला प्राप्त होतात. आता ह्या संकल्पनेत गोंधळाला खूप वाव आहे.

  1. एखाद्या भूप्रदेशात जो जन्माला आला, त्याने त्या भूप्रदेशाचा अभिमान बाळगायचा की एखाद्या प्रदेशात जो जन्माला नाही पण राहायला आला, त्याने त्या भूप्रदेशाचा अभिमान बाळगायचा?

जगात असे अनेक देश आहेत, जिथे कायमच दीर्घ काळासाठी किंवा कायमचे राहायला दुसऱ्या प्रदेशातून लोक येतात. त्यांनी कोणत्या प्रदेशाचा अभिमान बाळगावा? जिथे जन्मले तिथला की जिथे राहतात तिथला? उदाहरणार्थ, अनेक बांगला देशी, पाकिस्तानी किंवा भारतीय लोक आखाती देशात राहतात. त्यांनी आपापल्या देशांप्रती राष्ट्रवादाची भावना बाळगायची की आता ते ज्या देशात वास्तव्याला आहेत, तिथल्या प्रदेशाप्रती राष्ट्रवाद बाळगायचा?

  1. विविध राजकीय, सामाजिक कारणांनी देशांच्या नकाशात बदल होत असतात. अनेकदा भूप्रदेश जिंकले जातात, गमावले जातात. त्या परिस्थितीत कोणत्या भौगोलिक परिस्थितीशी आपला राष्ट्रवाद मर्यादित ठेवायचा?
  2. काही लोक राष्ट्राला पितृभू मानतात, काही मातृभू मानतात, काहीं धर्मांना राष्ट्र ही संकल्पना मान्य नाही, तर काही धर्म राष्ट्र आधी आणि मग धर्म अशी मांडणी करतात. ह्या गोंधळात राष्ट्रवादाला कोणते स्थान द्यायचे?

हे आणि असे कितीतरी प्रश्न आजच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेपुढे आहेत आणि राष्ट्रवादाची मांडणी करणाऱ्यांना ह्या सगळयावर उत्तर शोधावे लागणार आहे. आपण आज पाहतो की दोन धर्मांमध्ये, जातींमध्ये तेढ वाढत असताना जग मात्र जवळ येत चालले आहे. माणसांमधल्या भिंती बळकट होत असताना जगाच्या खिडक्या मात्र उघडत चालल्या आहेत. मग आजच्या आपल्या जगाचे वास्तव आपण काय मानतो? भिंती की उघडणाऱ्या खिडक्या? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला स्वत:ला विचारावे लागेल. कारण हा प्रश्न आपल्याला राष्ट्रवादाची गरज आहे की नाही ह्या मूळ प्रश्नाच्या गाभ्याशी घेऊन जाईल.

राष्ट्रवादाच्या संकल्पनेचे मानवाच्या प्रगतीतले स्थान काय? एकटया माणसाच्या जगणे उन्नत करण्याच्या प्रक्रियेत राष्ट्रवाद काय योगदान देतो?

जगाच्या इतिहासात आपण डोकावून पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्रवादाचा अभिमान बाळगणाऱ्या देशांनी स्वत:चे आणि इतरांचेही अपरिमित नुकसान करून घेतलेले आहे आणि जगाला आणि त्यातल्या लोकांच्या जगण्यात कोणतीही मोलाची भर राष्ट्रवादाने घातल्याचे दिसत नाही. आज आपण जेव्हा जर्मनीच्या प्रगतीकडे पाहतो, तेव्हा आपल्या असे लक्षात येईल की हिटलर हा कडवा राष्ट्रवादी म्हणूनच समोर आला आणि त्या सगळयाचा शेवट काय झाला, हे जगासमोरच आहे. कडव्या राष्ट्राभिमानातून जेव्हा जर्मनी बाहेर पडला, तेव्हा औद्योगिकदृष्टया संपन्न जर्मनी बनला.

अमेरिकन हे कधीही कडवे राष्ट्राभिमानी म्हणून ओळखले गेले नाहीत. आपल्या लोकांचे स्वातंत्र्य त्यांनी महत्त्वाचे मूल्य मानले. राष्ट्रध्वजाच्या बिकिनी घालून हिंडणाऱ्या मुली तिथल्या अनेक बीचवर दिसतात. अनेक राष्ट्रवादी संकल्पना मानणाऱ्या देशांना हे राष्ट्रद्रोहाचेच वाटण्याची शक्यता आहे. पण हे वरवर छचोर वाटणारे वर्तन करण्याची त्या देशात पूर्ण मुभा आहे, म्हणून त्यांचे काय नुकसान झाले?

राष्ट्रवाद ही संकल्पना काही समान गोष्टींसाठी समूह म्हणून अभिमान बाळगण्याचा आणि काही सामूहिक वर्तनांचा आग्रह धरते. आणि आपण गेली अनेक वर्षे हे अनुभवतो आहोत की हा सामूहिक वर्तनाचा आग्रह हा अंतिमत: कुठल्या ना कुठल्या हिंसेला कारणीभूत ठरला आहे.

आपण समूह म्हणून जेव्हा एखाद्या भूप्रदेशात राहतो, तेव्हा त्या त्या देशाचे काही नियम, काही कायदे असतात. लोकांच्या सुरळीत आणि सुरक्षित समूहजीवनासाठी ते आवश्यक असतात. गत शंभर वर्षांत जगातल्या बहुतांश देशांनी लोकशाही स्वीकारली आणि ह्या लोकनियुक्त सरकारांना त्या-त्या भूप्रदेशात जगण्याचे नियम आणि कायदे बनवण्याचा अधिकार दिला. जगाची मोठी लोकसंख्या जेव्हा मतदान करते, तेव्हा कोणते सरकार आपले जगणे अधिक चांगले करण्यासाठी काय आश्वासन देते आहे, आपल्या प्रगतीसाठी कोणत्या व्यक्तीकडे किंवा पक्षाकडे चांगली योजना आहे आणि मुख्य म्हणजे माझे व्यक्तिगत जीवन कोणामुळे अधिक सुखकर होणार आहे, ह्यावर मतदान होते.

जगातल्या अनेक लोकशाही देशांची उदाहरणे आहेत, जिथे राष्ट्रवाद ह्या संकल्पनेला निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि विकास ह्या संकल्पनेच्या मागे लोक उभे राहिले. आज जगभरातले उच्च मध्यमवर्गीय आणि वरच्या आर्थिक स्तरातले लोक ज्या देशातले कायदे जगण्याला अधिक लायक आहेत, जिथे प्रगतीच्या अधिक संधी आहेत, ज्या देशात अधिक स्वातंत्र्य आहे, त्या देशाची निवड आपल्या वास्तव्यासाठी करतात. आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन राहण्यात कोणतीही राष्ट्रवादाची किंवा राष्ट्रप्रेमाची भावना त्यांना आड येत नाही किंवा आपला देश आपल्या प्रगतीला सोयीचा नाही अशी भावना झाल्यावर त्यांना देश सोडून जाण्यात कोणतेही देशप्रेम अडवू शकत नाही.

लोकांनी त्यांचे पर्याय सोपे बनवले आहेत. जर माझा विकास मला पाहिजे तसा होणार नसेल, मला पाहिजे तसे स्वातंत्र्य मिळणार नसेल, लोकनियुक्त सरकार माझ्या अपेक्षेला उतरेल असा परफॉर्मन्स देणार नसेल, तर त्यांच्या वास्तव्याचा देश म्हणून ते दुसऱ्या देशाची निवड करतात आणि त्या वेळेला कोणतीही राष्ट्रवादाच्या प्रेमाची भावना त्यांना देशात थांबवून ठेवू शकत नाही. देशाच्या भूमीला नाकारून पहिली संधी मिळली की देश सोडून जाणाऱ्यांची संख्या आपल्याकडेही कमी नाही. ह्यातली गंमत अशी की देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन संपन्नता मिळवणाऱ्यांच्या नाकदुऱ्या सरकारांना काढाव्या लागतात. दुसऱ्या देशात जाऊन ज्यांनी भविष्य घडवले, त्या लोकांच्या मागे मागे सरकारला फिरावे लागते. अनिवासी भारतीय हे आपल्याही देशातले आज सगळयात जास्त प्रतिष्ठित आहेत, वैयक्तिक पातळीवर आणि सरकारी पातळीवरही.

जशीजशी संपर्कसाधने वाढली, तसेतसे जग अधिक जवळ यायला लागले. जेव्हा बाहेरचे जग दिसत नव्हते, तेव्हा संस्कृतीचा अभिमान, देशाचा अभिमान ही महत्त्वाची मूल्ये होती. जसजसे जग दिसायला लागले, तेव्हा तेव्हा जे आपले आहे ते टिकेल का, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आणि मग ते जे आमचे आहे तेच उत्तम आहे आणि ज्या अर्थी ते आमच्याकडे अनेक वर्षे चालत आलेले आहे, त्या अर्थी ते उत्तमच असणार, म्हणून स्वत:च्या गोष्टींचा अनाठायी आग्रह धरण्याचीही मधली काही वषर्े होती.

मानवी सभ्यता ह्याही टप्प्यातून आता पुढे जाते आहे आणि एक मोठाच सांस्कृतिक संकर होतो आहे. पुरणपोळी आणि पिझ्झा आता हातात हात घालून जातात, जीन्सवर कुडता घातला जातो आणि ओम् नमः शिवायच्या स्टिकरखाली लाफिंग बुध्दाही ठेवला जातो. आपले लोक दुसऱ्या देशात स्थायिक होतात, दुसऱ्या देशातले लोक आपल्या देशात योगा शिकायला येतात. आज जगात असेही लोक आहेत की जे दर चार-पाच वर्षांनी वेगळया देशात राहायला जातात. मी अनेक जणांचे आयुष्याचे असेही प्लानिंग ऐकले आहे की आम्ही मुले लहान असताना ह्या देशात राहणार, नंतर त्यांच्या शिक्षणासाठी अमुक एका देशात जाणार आणि एकदा ती मोठी झाली की आम्ही रिटायरमेंटनंतर अमुक एका देशात राहणार. आता ह्या लोकांसाठी राष्ट्रवादाची कल्पना काय? कोणत्याही एका देशाप्रती त्यांच्या मनात राष्ट्रवादाची भावना नसेल, तर ते राष्ट्रद्रोही ठरतील का?

जगण्याच्या कक्षा आणि चॉइसेस विस्तारताहेत, एकाच आयुष्यात माणसाला कितीतरी जास्त जगणे शक्य होते आहे आणि ह्या जगण्याच्या विस्ताराला बांधून घालू शकेल इतके बळ राष्ट्रवाद ह्या संकल्पनेत राहिलेले नाही.

आता इथे एक गंमत आहे - ज्या वेळेला एखादा माणूस राष्ट्रवाद ही कल्पना नाकारतो, त्या वेळेला त्याला राष्ट्रद्रोही मानण्याची आपल्याकडे प्रथा आहे. राष्ट्रवाद ह्या संकल्पनेला आपण अशा एका जागेवर नेऊन ठेवले आहे की बहुतांश लोक तिला जशा स्वरूपात आजवर स्वीकारत आले आहेत, तशा स्वरूपात जर कोणी स्वीकारणार नसेल, तर आपण त्याला थेट राष्ट्रद्रोही मानतो. माझ्या मते ज्या भूप्रदेशात राहतो, त्या भूप्रदेशातल्या कायद्यांचे पालन, वेगवेगळया भूप्रदेशातल्या जीवनशैलीचा स्वीकार, व्यक्तींचे आणि समूहांचे अर्थव्यवहार आणि राष्ट्रवाद ही संकल्पना ह्यांनी एकमेकांशी कसे जुळवून घ्यायचे, ह्या प्रश्नाच्या उत्तरात आजच्या राष्ट्रवाद ह्या संकल्पनेचे भविष्य दडले आहे.

ज्या भूप्रदेशात राहतो, त्या भूप्रदेशातल्या कायद्यांचे उत्तम पालन करणाऱ्या व्यक्ती ह्या जोपर्यंत त्या भूप्रदेशात राहताहेत, तोपर्यंत त्या त्या भूप्रदेशाप्रती राष्ट्रवादी इतकीच राष्ट्रवादाची व्याख्या उरेल. अशा प्रकारच्या राष्ट्रवादी लोकांना त्यांचे आयुष्य सुखकर जगण्यासाठी संरक्षण देणे आणि अधिकाधिक दर्जेदार लोक आयुष्याच्या संपूर्ण कालखंडाकरिता किंवा काही मर्यादित कालखंडाकरिता जर आपल्या भूप्रदेशात बाहेरून राहायला येणार असतील, तर त्यांच्या निवासायोग्य पर्यावरण त्यांना उपलब्ध करून देणे ह्या पलीकडे देशांची कोणतीही राष्ट्रवादी भूमिका भविष्यात व्यवहार्य राहील, असे मला वाटत नाही.

mmandarbharde@gmail.com

 

भारत म्हणजे आधुनिक जगण्याचा देश

नुकतीच तारीक फतेह ह्या पाकिस्तानी लेखकाने पाकिस्तानात आणि भारतातही मोठाच धुरळा उडवून दिलाय. भारत आणि पाकिस्तानच्या आपापसातल्या संबंधांबद्दल नवीन काही सांगायला नको. अशा परिस्थितीत फतेह महाशयांनी असे विधान केले की ते मूळचे एक हिंदुस्थानी असलेले आणि पाकिस्तानात जन्मलेले गृहस्थ आहेत. त्यांनी पाकिस्तानला यथेच्छ शिव्या दिल्या आहेत आणि पाकिस्तानातल्या सगळयांचीच मुळे ही हिंदुस्थानातली आहेत. भारत, पाकिस्तान, बांगला देश ह्या प्रदेशातील मुस्लीम लोकांनी अरबी लोकांच्या पध्दतीने मुस्लीम परंपरांचे पालन करू नये, तर हिंदुस्थानी मुस्लीम परंपरा ह्या स्वतंत्र आहेत आणि त्यांच्यावरचा स्थानिक प्रभाव हीच त्यांची वेगळी ओळख आहे, जगात मुस्लिमांना आज सगळयात प्रागतिक जगण्याची संधी फक्त भारतात आहे. इथे ते धर्माचे पालनही करू शकतात आणि आधुनिक जगण्याचा भागही होऊ  शकतात.

ह्या महोदयांनी पंतप्रधानांना आवाहन केले की मला चांगले जगायला मिळावे म्हणून भारताचा पासपोर्ट द्या. आता ह्या फतेहसाहेबांकडे शत्रुदेशातला नागरिक म्हणून पाहायचे, मुस्लीम म्हणून पाहायचे की आपल्या देशात येणारा एक प्रज्ञावान माणूस म्हणून पाहायचे? राष्ट्रवादाच्या कोणत्या व्याख्येत त्यांना बसवायचे? आपण गेली अनेक दशके दलाई लामा यांना आपल्या देशात आश्रय दिला आहे. त्यांना दिलेल्या आश्रयामुळे चीन आपल्यावर नाराज आहे, तरीही आपण ती किंमत मोजली आहे.

राष्ट्रवादाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत!!