भारतातील राष्ट्रीयतेचे परिदृश्य- रंगा हरी

विवेक मराठी    05-Nov-2016
Total Views |

प्रस्तावना

हुमताचा इतिहास रचत दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार अस्तित्वात आले आणि या सरकारच्या कार्यकाळात राष्ट्रवाद, देशप्रेम, देशद्रोह या संकल्पनांची नव्याने चर्चा होऊ लागली. वाद झडू लागले. टोकाचे परस्परविरोधी विचार असलेले समाजातले दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकून तावातावाने भांडू लागले. सोशल मीडियामुळे तर त्याला अधिकच खतपाणी मिळाले.

असहिष्णुता वाढल्याचे कारण देत पुरस्कार वापसीची लाट कलावंतांमध्ये आली. या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी होते आहे असे म्हणणाऱ्यांची संख्या अचानक वाढू लागली. रोहित वेमुला आणि कन्हैय्या घटनांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादाचा प्रश्न ऐरणीवर आला. समाजातील वातावरण गढूळ आणि संभ्रमित होण्यास गेल्या काही दिवसातल्या या घटनांनी मोठाच हातभार लावला आहे. एखादी व्यक्ती देशप्रेमी आहे की देशद्रोही याबाबतच्या मोजपट्टया बदलताहेत. तकलादू होताहेत.

 एकीकडे जग हे वैश्विक खेडे होते आहे असे बोलले जात असताना, दुसरीकडे भारतीय नागरिक देशाभिमानाच्या चुकीच्या मांडणीने परस्परांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय राष्ट्रवादाची वा भारतीयत्वाची पुनर्मांडणी व्हावी या हेतूने, 'एकविसाव्या शतकातील भारतीय राष्ट्रवाद - आशय आणि अभिव्यक्ती' या विषयावर दिवाळी अंकात परिसंवाद आयोजित केला.


या परिसंवादात सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अखिल भारतीय बौध्दिक प्रमुख रंगा हरीजी यांच्या लेखनाने या परिसंवादाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर सावरकर साहित्याचे तसेच मुस्लीम प्रश्नाचे गाढे अभ्यासक
, विश्व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष शेषराव मोरे यांनी या विषयाची स-संदर्भ दीर्घ मांडणी केली आहे. संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे विवेचन त्यानंतर वाचता येईल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारख्या विद्यार्थी संघटनेतील कामाची पार्श्वभूमी असलेले आणि दलित बांधवांमधील उद्योजकता वाढीसाठी 'डिक्की'सारख्या संस्थेच्या माध्यमातून विशेष प्रयत्नशील असलेल्या मिलिंद कांबळे यांनीही या संदर्भातले विचार मांडले आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि पीडित महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक कामाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असलेल्या विधान परिषदेच्या ज्येष्ठ सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही या परिसंवादात योगदान दिले आहे. तर व्यवसायानिमित्त सातत्याने जगभर भ्रमण करत असलेले मुंबईचे तरुण उद्योजक - खाजगी हवाई वाहतूक व्यावसायिक मंदार भारदे यांनी याबाबतचा त्यांचा दृष्टीकोन मांडला आहे. या सर्वांनी आपापल्या परिप्रेक्ष्यातून केलेली मांडणी आमच्या वाचकांना या महत्त्वाच्या विषयावर विचार करण्यास, आपले विचार तपासून घेण्यास उद्युक्त करेल असा विश्वास वाटतो.

व्यावहारिकदृष्टया राष्ट्रवाद आणि राजकारण यांचा अतूट संबंध आहे. म्हणून वाल्मिकींच्या रामायणात आणि व्यासांच्या महाभारतात 'राष्ट्रम् आणि राज्यम्' हे दोन शब्द वेगवेगळे परंतु जुळया भावंडाप्रमाणे अनेकदा एकत्र आढळतात. राष्ट्र व राष्ट्रीयता हे अपरिवर्तनीय होत, मात्र राज्य आणि राजकारण हे परिवर्तनीय आहेत. या दोघांचा संबंध आत्मा आणि शरीरासारखा आहे. आत्म्याच्या चैतन्याची अभिव्यक्ती शरीराद्वारेच शक्य आहे. तरीही आत्मा जन्मापासून मृत्यूपर्यंत अपरिवर्तनीय आणि स्थिर आहे, शरीर मात्र वर्षानुवर्षे परिवर्तनीय व म्हणून अस्थिर आहे. या विषयाची अर्थपूर्ण चर्चा करायची झाल्यास राष्ट्रीयता आणि राजकारण यातील मूळ फरक लक्षात घ्यायला हवा. राष्ट्रीयतेचा भार संपूर्ण जनतेवर आहे, राजकारणाचा फक्त राजकारण्यांवर आहे.

भारतातील  राष्ट्रीयतेचे  परिदृश्य

- रंगा हरी


राष्ट्रवादाच्या संदर्भात भारताची विशेष स्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. इंग्लंडमध्ये मुख्य राजकीय पक्ष दोन किंवा तीनच आहेत, तरीही तेथे राष्ट्रवादाच्या विषयावर सर्व पक्षांमध्ये एकमत आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत डेमोक्रॅटिक असो अथवा रिपब्लिकन, दोन्ही पक्ष राष्ट्रवादाच्या विषयावर सहमत असतात. म्हणजेच राजकीय पक्षांमधील फरक फक्त राजकीय कार्यक्रमांमध्ये आहे, राष्ट्रीयतेबाबत नाही. भारताची स्थिती मात्र वेगळी आहे. या देशात राष्ट्रवादाशी संबंधित एक नव्हे, तर तीन विचारसरणी आहेत. त्या म्हणजे नवराष्ट्रवादी, बहुराष्ट्रवादी आणि चिरराष्ट्रवादी.

नवराष्ट्रवादी मंडळींचे मत असे आहे, की भारत हे काही प्राचीन राष्ट्र नाही. इंग्रजांच्या अधीन झाल्यानंतर युरोपीय राष्ट्रवादाच्या विकासक्रमानुसार भारत हळूहळू राष्ट्र बनत गेले. म्हणून 'India is a nation in the making', राष्ट्र म्हणून भारताची घडण होत आहे. तो विकासक्रम 15 ऑॅगस्ट रोजी पूर्ण झाला आणि तेव्हापासून एक राष्ट्र म्हणून आपण विकसित झालेलो आहोत. राजकीयदृष्टया काँग्रेस किंवा काँग्रेसमधून फुटून निघालेले छोटे-मोठे पक्ष हे या विचाराचे लोक आहेत.

दुसरी विचारसरणी आहे बहुराष्ट्रवादी. हे मुख्यत: साम्यवादी लोक आहेत. त्यांचे म्हणणे असे, की भारत हे कधीही एक राष्ट्र नव्हते. आजही नाही. केरळ, तामिळनाडू, पंजाब, बंगाल असे देशातील विविध प्रांत हे मुळात वेगवेगळी राष्टे्र आहेत आणि सध्या भारत त्या वेगवेगळया राष्ट्रीयतांचा समुच्चय आहे. त्यामुळे भारत हे बहुराष्ट्रीय राज्य आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे, तर हा देश प्राचीन काळातील किंवा वर्तमानकाळातही एक राष्ट्र नसून तो अनेक राष्ट्रांचा समूह आहे, असे या मंडळींचे म्हणणे आहे. म्हणून 15 ऑॅगस्टचे महत्त्व फक्त राजकीय आहे, राष्ट्रीय नाही, हा त्यांचा दृष्टीकोन आहे.

तिसरा पक्ष आहे चिरराष्ट्रवादी मंडळींचा. भारत हा प्राचीन काळापासून राष्ट्र होता आणि मध्यंतरीच्या काळात हे राष्ट्र गुलामीत खितपत पडले असले तरी आजही ते राष्ट्र आहे, हा त्यांचा दृष्टीकोन आहे. म्हणून 15 ऑॅगस्ट हा प्राचीन राष्ट्राचा नवोदय होय, त्यामुळे राजकीय आणि राष्ट्रीय दोन्ही दृष्टीने त्याचे महत्त्व आहे. याची भलामण करणारे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी आहेत.

ज्या विचारसरणींनी या तीन पक्षांचे लोक प्रभावित झाले आहेत, त्यावरून आपण या तिघांना तीन नावे देऊ शकतो. नवराष्ट्रवादी हे मेकॉलेपुत्र आहेत, बहुराष्ट्रवादी हे माक्र्सपुत्र आहेत आणि चिरराष्ट्रवादी हे महर्षिपुत्र होत. या तिन्ही वर्गातील बांधव हे विवेकानंद युगाचे उत्तराधिकारी, व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने नि:स्वार्थी, मेहनती, तपस्वी आणि मानवहितकारी होते. ते सगळे आदरणीय होते. इंग्लिश विद्याविभूषित होते. तरीही ते तीन दृष्टीकोन असणारे बनले. का? कसे?

या प्रश्नांचे उत्तर शोधताना वेगळेच सत्य समोर येते, ते म्हणजे स्थिती आणि स्थितीनुसार असलेल्या दृष्टीचे. इंग्लिशमधील दोन प्रचलित शब्द आहेत - Stand point and View point (स्थितिमान आणि दृष्टिमान म्हणता येईल का?) आपण जेथे उभे आहोत, तो आपला Stand point होय. तेथून आपल्याला जे दिसते, तो बनतो आपला View point. म्हणजेच स्थितीनुसार दृष्टी. तुम्ही युरोपात उभे राहा, म्हणजे आखाती देश तुमच्यासाठी Near east (निकट पूर्व) ठरतात. सिंगापूर-थायलंड हे Far-east (अति पूर्व) ठरतात. तुम्ही भारतात उभे राहा, आखाती देश तुमच्यासाठी Near west (निकट पश्चिम) ठरतात आणि सिंगापूर-थायलंड हे Near-east (निकट पूर्व) ठरतात. हा फरक उपरोक्त स्थितिमान आणि दृष्टिमान यामुळे आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या राष्ट्रीयतेचा शोध घेताना वरील तिन्ही सुविद्य पुत्रांचा स्थितिमान (Stand point) वेगवेगळा होता. मेकॉलेपुत्रांचा स्थितिमान होता युरोप, परिणामी त्यांचा दृष्टिमान (View point) युरोपीय बनला. माक्र्सपुत्रांचा होता रशिया, परिणामी त्यांचा दृष्टिमान बनला रशियन. महर्षिपुत्रांचा होता भारत, म्हणून त्यांचा दृष्टिमान बनला भारतीय. म्हणजेच नवराष्ट्रवाद्यांचा दृष्टीकोन युरोपकेंद्रित होता, बहुराष्ट्रवाद्यांचा रशियाकेंद्रित होता आणि चिरराष्ट्रवाद्यांचा भारतकेंद्रित होता. त्यानुसार एकाच सत्याचे दर्शन त्यांना आपापल्या कोनातून वेगवेगळया स्वरूपात झाले. युरोपकेंद्रित व्यक्तींना आढळले, की तेथील राष्ट्रीयता ही ऍंग्लो, फ्रँको, जर्मनिक, डॅनिश अशा मानववंशांच्या संघर्षाचे फळ आहे. त्या प्रत्येकाला पोप महाशयांच्या पकडीतून बाहेर पडण्यासाठी चर्चच्या धार्मिक हुकूमशाहीच्या विरोधात संघर्ष करावा लागला. त्याचप्रमाणे नेपोलियनच्या विस्तारवादाविरोधातही लढावे लागले. बाराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत त्यांच्या अस्तित्वाचा, अस्मितेच्या प्रतिष्ठापनेचा, वर्चस्वाच्या संवर्धनाचा, सामाजिक जीवनाच्या अभिव्यक्तीचा झगडा प्रदीर्घ काळ चालू राहिला. त्या मानवी महायज्ञातून युरोपीय राष्ट्रीयतेचा महान उदय झाला. सैध्दान्तिक दृष्टीने पाहिल्यास ही युरोपीय राष्ट्रीयता राजकीय होती, संघर्षजन्य होती, भौगोलिक होती, वांशिक आणि स्पर्धात्मक होती.

युरोपीय इतिहासाची ही उत्क्रांती पाहून आपल्या मेकॉलेपुत्रांनी असा निष्कर्ष काढला, की एकोणिसाव्या शतकातील भारतात याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे आणि परिणामी आपणही क्रमश: एक राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेत पुढे सरकत आहोत. कालचक्राच्या त्या गतीतून 1947 साली आपण 'a nation in the making'पासून आपण 'a new nation'पर्यंत आलो आहोत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशातील राजकीय नेतृत्वाने तोच बहिर्मुखी युरोपकेंद्रित दृष्टीकोन पुढे चालविला, म्हणून भारतातील बहुतांश सुशिक्षित बांधवांचा हाच दृष्टीकोन आहे की भारत हे एक नवे राष्ट्र आहे. सध्या भारतात याच मताचे लोक सर्वाधिक आहेत.

माक्र्सपुत्रांनी रशिया हे आपले स्थितिकेंद्र ठरविले होते आणि ते स्वत:ला रशियन माक्र्सवादाचे धुरीण मानत होते. रशियन साम्यवादी नेत्यांनी आपल्या नवसंपादित भूभागाला 'यूएसएसआर' - म्हणजे 'सार्वभौम रशियन राष्ट्रांचा संघ' जाहीर केले होते. म्हणजेच माक्र्सपुत्रांकरिता रशिया हे एक राष्ट्र नव्हे, तर बहुराष्ट्रीय राज्य होते. त्यांनी त्याच नजरेने भारताकडे पाहिले आणि असा निष्कर्ष काढला की भारत हे एक राष्ट्र नाही आणि आपल्याला त्याला 'युनायटेड इंडो-सोशालिस्ट रिपब्लिक' (यूआयएसआर) बनवायचे आहे. म्हणजेच भारताला बहुराष्ट्रीय राज्य बनवायचे आहे.

साम्यवाद्यांच्या संदर्भात येथे जरा अधिक लक्ष द्यायला हवे. जागतिक साम्यवादाच्या दृष्टीने त्यांना राष्ट्रीयताच मंजूर नाही आणि सध्याची राष्ट्रीयता ही त्यांच्या दृष्टीने मानवताविरोधी आहे. त्यामुळे आजही उरलासुरला साम्यवादी स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेणार नाही. या अर्थाने आपण या बहुराष्ट्रवाद्यांना अराष्ट्रवादी असेही म्हणू शकतो. या लोकांची मानसिकता समजून घेताना आपण ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. तत्त्वत: ते अराष्ट्रवादी आहेत, त्यांची भूमिका बहुराष्ट्रवादाची आहे.

यानंतर येतो तो महर्षिपुत्रांचा गट. हेही इंग्लिश भाषेचे तज्ज्ञ होते. युरोपीय इतिहासाचे गहन अभ्यासक होते. परंतु त्यांचा stand point होता भारत. संस्कृतमध्ये झाडाला 'पादप' असेही म्हटले जाते. पादपचा अर्थ आहे पादांनी भूमीतून जीवनरस पिणारा. त्या अर्थाने महर्षिपुत्र हे भारताचे पादप होते. त्यांनी जेव्हा युरोपीय राष्ट्रीयतेचे मूल्यमापन केले, तेव्हा त्यांच्या मनासमोर मुख्यत: अनेक सत्य उभे ठाकले - भारताचीही राष्ट्रीयता आहे, ती शंभर टक्के सकारात्मक आहे, नकारात्मक नाही. ती संघर्षजन्य किंवा विद्वेषजन्य नाही. ती अहिंसात्मक आहे. अत्यंत शांततेच्या काळात मानवकल्याणासाठी तिचा उदय झालेला आहे. तिचे स्वरूप स्पर्धात्मक नाही, शांतीमध्ये रममाण झालेल्या मानवकल्याणाची तळमळ असलेल्या महर्षींच्या दीर्घ तपस्येचा ती परिणाम आहे. राजकारण किंवा अर्थकारण हे स्पष्टच तिचे जनक नव्हेत. वेदांच्या आधारावर महर्षिपुत्रांनी जाणून घेतले, की राष्ट्र हे प्राचीन काळापासून भारतभूमीवर विराजमान आहे. म्हणूनच भारत हे अत्यंत प्राचीन राष्ट्र असून तीच परंपरा अखंड असल्यामुळे आजही ते एक जिवंत राष्ट्र आहे, हा त्यांचा निष्कर्ष व दृढ विश्वास बनला.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या सत्तर वर्षांनंतर जेव्हा राष्ट्रीयतेवर चर्चा करण्यात येते, तेव्हा प्रत्येक विचारवंताला ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. नवराष्ट्रवाद्यांना याविषयी कोणतीही शंका नव्हती की 1947नंतर भारत एक राष्ट्र आहे आणि त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्राच्या मुळांचा शोध घेणे सुरू केले. नवजात राष्ट्राचा संबंध जगातील सगळयात जुन्या संस्कृतीशी जोडण्याच्या तीव्र इच्छेतून त्यांनी 'सत्यमेव जयते' हे देशाचे बोधवाक्य स्वीकारले. परमवीर चक्राच्या एका बाजूला देवेंद्राचे आयुध वज्र आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार मुद्रांकित केली. सर्वोत्तम खेळाडूला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करणे सुरू केले. अशी किती तरी उदाहरणे देता येतील! हे सर्व या प्राचीन देशाच्या अविरत राष्ट्रीयतेचे परिचय होत. परंतु राजकारणलिप्त युरोपीय राष्ट्रवाद हा नवराष्ट्रवाद्यांचा मूलभूत विचारदोष होय. ही वृत्ती त्यांना भारतीय राष्ट्राच्या प्राचीनतेवर आधारित भूमिका घेण्यापासून रोखते.


अराष्ट्रवाद्यांची स्थिती त्यांच्यापेक्षा अत्यंत वाईट आहे. राष्ट्रीयता हीच मुळात ज्यांना तात्त्विदृष्टया अमान्य आहे, त्या राजकीय त्रिशंकूंना आजच्या बदललेल्या वातावरणात स्वत:ला मान्य नसलेली राष्ट्रीयता शोधणे, मिळविणे आणि मान्य करणे भाग पडत आहे. खासकरून साम्यवादी गटाचे दिवाळे निघाल्यानंतर त्यांना येन केन प्रकारेण तिरस्कृत राष्ट्रीयतेचा स्वीकार करणे भाग पडत आहे. भारतीय चिरकालीन अस्सल अस्मितेच्या कट्टर विरोधक असलेल्या या लोकांची स्थिती 'धोबी का कुत्ता, न घर का, न घाट का' अशी झाली आहे. म्हणून नवीन नवीन शब्दांचे जाळे विणून ते अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात काहीही दम नाही. खरे तर ते महाभयंकर भ्रमात सापडले आहेत. सर्वात उत्तम स्थिती चिरराष्ट्रवाद्यांची आहे. त्यांचा प्रत्येक विचार प्रमाणित होत आहे. त्यांची स्थिती कालसुसंगत ठरत आहे.

माझ्या मते चिररराष्ट्रवाद्यांची भूमिका आणखी ओजस्वी होण्याची तत्काळ आवश्यकता आहे. राजकारण हा भारतीय राष्ट्रवादाचा स्रोत नव्हे, हा राष्ट्रवाद अपरिवर्तनीय आहे, हे एक अदम्य सत्य आहे. परिवर्तनीय तर राजकारण आहे. व्यावहारिकदृष्टया राष्ट्रवाद आणि राजकारण यांचा अतूट संबंध आहे. म्हणून वाल्मिकींच्या रामायणात आणि व्यासांच्या महाभारतात 'राष्ट्रम् आणि राज्यम्' हे दोन शब्द वेगवेगळे परंतु जुळया भावंडाप्रमाणे अनेकदा एकत्र आढळतात. राष्ट्र व राष्ट्रीयता हे अपरिवर्तनीय होत, मात्र राज्य आणि राजकारण हे परिवर्तनीय आहेत. या दोघांचा संबंध आत्मा आणि शरीरासारखा आहे. आत्म्याच्या चैतन्याची अभिव्यक्ती शरीराद्वारेच शक्य आहे. तरीही आत्मा जन्मापासून मृत्यूपर्यंत अपरिवर्तनीय आणि स्थिर आहे, शरीर मात्र वर्षानुवर्षे परिवर्तनीय व म्हणून अस्थिर आहे. परंतु पृथ्वीवर आयुष्मान होण्यासाठी दोघांनाही एकमेकांसोबत राहावे लागते. बदलत्या शरीरातील न बदलणाऱ्या आत्म्याचा साक्षात्कार होणे, हीच मानवाची खरी उन्नती आहे. राष्ट्रीयता आणि राजकारण यांपैकी राष्ट्रीयतेचा वास हा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असतो, परंतु राजकारणाचे तसे नाही. ज्यांचा तो पिंड आहे तिथेच त्याचा वास असतो. त्या बाबतीत त्यांचा निरुपाय आहे. म्हणून या विषयाची अर्थपूर्ण चर्चा करायची झाल्यास राष्ट्रीयता आणि राजकारण यातील मूळ फरक लक्षात घ्यायला हवा. राष्ट्रीयतेचा भार संपूर्ण जनतेवर आहे, राजकारणाचा फक्त राजकारण्यांवर आहे.

राष्ट्रीयतेशी संबंधित कर्तव्य पार पाडण्याकरिता आपले प्रारूप हे इंग्लंड-अमेरिका जशास तसे होऊ शकत नाही, कारण तिथे राष्ट्रीयतेबाबत एकमत आहे. इथे तर नवराष्ट्रवादाला आणि बहुराष्ट्रवादाला मागे सारून चिरराष्ट्रवादाला पुढे आणायचे आहे. यासाठी सरकारी, गैर-सरकारी अशा सर्वांचा परिणामकारक प्रयत्न याच दिशेने अखंडपणे होणे आवश्यक आहे. आज यासाठी अनुकूल वातावरण आहे. कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. आवश्यक आहे ते खऱ्या राष्ट्रीयतेचे पुन:प्रबोधन, त्याचे पुन:मंडन नव्हे.

7025127222