भारतीय राष्ट्रवादाच्या उत्क्रांतीत मराठयांचे योगदान - डॉ. सदानंद मोरे

विवेक मराठी    05-Nov-2016
Total Views |

अब्दालीची स्वारी आली, तेव्हा मराठयांचा सेनापती सदाशिवरावभाऊ याने उत्तरेतील सर्व हिंदू-मुसलमान सत्ताधीशांना पत्रे लिहून आपल्या सर्वांचा देश एक असून अब्दाली हा परका असल्यामुळे आपल्या सर्वांचाच शत्रू आहे, सबब आपण एक होऊन त्याचा मुकाबला करू असे आवाहन केले. मला वाटते, अलीकडच्या काळातील भारतीय राष्ट्रवादाची मुळे या आवाहनात शोधावी लागतील. हे सर्व करताना मराठयांना आपल्या स्वधर्माचा त्याग करायची आवश्यकता भासली नाही. स्वतःचा उल्लेख ते हटकून हरिभक्त असा करत असत. भारतीय राष्ट्रवादाची नव्याने मांडणी


'रा
ष्ट्र' आणि 'राष्ट्रवाद' हे दोन शब्द इंग्लिश भाषेतील ‘Nation’ आणि ‘Nationalism’ या शब्दांचे समानार्थी पर्याय म्हणून वापरले जातात. मराठी, संस्कृत यांच्यासारख्या भारतीय भाषांमध्ये 'राष्ट्र' हा शब्द पूर्वीपासून वापरण्यात येत असला, तरी 'राष्ट्रवाद' शब्द मात्र इंग्लिशमधील ‘Nationalism’ हा शब्द ज्ञात झाल्यानंतरच आपल्या भाषेत दाखल झाला, हे मान्य करायला हवे.

जेव्हा या प्रकारचे नवे शब्द  मराठी भाषेत घडवले जात होते, तेव्हा महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झालेली होती. ब्रिटिश राज्यकर्त्यांमुळे महाराष्ट्रातील लोकांना इंग्लिश भाषेचा व युरोपीय विद्येचा परिचय झाला. युरोपात विकसित झालेल्या राजकीय संकल्पनाही त्यांना ज्ञात झाल्या. या नव्या संकल्पनांसाठी मराठी शब्द तयार करण्याची व रुजवण्याची धडपडही सुरू झाली. 'दर्पण' पत्राचे संपादक बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून तर 'आधुनिक भारत' ग्रंथाचे लेखक आचार्य शं.दा. जावडेकर यांच्यापर्यंतचे मराठी पत्रकार व लेखक त्यासाठी प्रयत्न करीत होते. लोकमान्य टिळकांचाही या प्रक्रियेत मोठा वाटा होता.

अर्थात, मुद्दा फक्त भाषेचाच नसून विचारांचा आणि संकल्पनांचा आहे. राष्ट्र, राज्य ही संकल्पना आधुनिक काळात भांडवलशाहीच्या हृदयाशी जोडली जाते. राष्ट्र (Nation) आणि राज्य (State) या दोन गोष्टींमधील भेदावर भर दिला जातो. साहजिकच ब्रिटिश अमलाच्या पूर्वी अशा प्रकारच्या संकल्पनांना व विचारप्रक्रियेला आपल्या देशात अस्तित्व होते का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. ब्रिटिशपूर्व भारत म्हणजे मध्ययुगीन सरंजामशाही असाच सार्वत्रिक समज आहे. वेदकालीन शुक्रबृहस्पती अशा पुराकथात्मक राजकीय विचारवंतांचे संदर्भ सोडून देऊ, पण निदान कौटिल्याच्या अर्थशास्त्रापासून रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रापर्यंत राजकीय विचारांची एक समर्थ परंपरा आपल्या देशात होती हेसुध्दा कोणी नाकारू शकत नाही, पण तरीसुध्दा या परंपरेतील विचार राजेशाहीच्या चौकटीतील होते. त्यांचा आधुनिक विचारांशी काही संबंध नाही, असेही समजले जाते.

इतिहासाचा विचार केला, तर भांडवलशाहीचे आगमन होऊनसुध्दा युरोपात राजेशाही वा राजेशाहीचे अवशेष रेंगाळलेले दिसून येतात. लोकशाहीचा पूर्ण स्वीकार करून झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नेपोलियन निर्माण होऊ शकतो. लोकशाहीची जननी मानल्या गेलेल्या इंग्लडमध्ये आजसुध्दा राजा/राणी लागतो/ते. खुद्द महात्मा फुले यांनी याच कारणास्तव इंग्लंडमधील लोकशाही निर्भळ किंवा शुध्द नसल्याची टीका केली होती, हे लक्षात घ्यायला हवे.

मुद्दा असा आहे की, केवळ मध्ययुग आहे किंवा राजेशाही आहे म्हणून अमुक प्रकारचा विचार होऊच शकत नाही, असे समजणे मानवी बुध्दीचा अधिक्षेप आहे.या संदर्भात म्हाइंभट्टांनी लिहिलेल्या चक्रधर स्वामींच्या चरित्राचा - म्हणजेच 'लीळाचरित्र'चा संदर्भ घ्यायल    नसावी. चक्रधरांचे धार्मिक उपदेशांचे कार्य ऐन भरात होते, तेव्हा - म्हणजे तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्रात देवगिरी येथून रामदेवराय यादव हा राजा राज्य करीत होता. तपशिलात न जाता एवढे सांगणे पुरे की, यादवांच्या सत्तेचे आणि चक्रधरांचे जमेनासे झाले. त्याचा परिणाम म्हणून चक्रधरांवर आरोप ठेवून त्यांना अवयवछेदाची शिक्षा देण्यात आली. स्वामी या प्रकारातून बाहेर आले, तेव्हा थेट शिरच्छेद करण्याची आज्ञा झाली. श्रीरामपूरजवळील बेलापुरी येथे मुक्काम असताना चक्रधरांनी आपले उत्तराधिकारी व शिष्य नागदेव यांना या प्रकारची कल्पना दिली. ते म्हणाले, ''हे उत्तरापंथे जाईल. श्रीप्रभुमागा उत्तरेकडूनी म्लेंच्छ येतील, ते जाधवाते मारतील आणि राज्य घेतील. मग काळे करौनि या राष्ट्राची समूळची विनश्यंती तैसे होईल गा.''

चक्रधरांच्या विधानात राज्य आणि राष्ट्र यांच्यातील भेद अनुस्यूत आहे. त्यांनी अशा सूचना दिल्य  की, त्यांना महाराष्ट्र सोडून उत्तरेकडे जावे लागेल, तेव्हा त्यांच्या परिवाराने ॠधिपूर येथे विद्यमान असलेल्या गोविंदप्रभू नावाच्या अवतारी पुरुषाचा आश्रय घ्यावा. ते त्यांचा सांभाळ करतील. त्यांच्या मृत्यूनंतर उत्तरेकडून मुसलमानांचे आक्रमण होईल. ते यादवांचा पराभव करून त्यांची सत्ता हिरावून घेतील.

चक्रधरांनी केलेला सूक्ष्म भेद नागदेवांच्या लक्षात आला नाही. राज्यांतराचा परिणाम राष्ट्रावर कसा होईल? याचा खुलासा चक्रधरांनी केला. ''म्लेंच्छ बंद धरतील, तेणे लोक देशांतरा जातील. जे येथ असतील, ते दु:काळे मरतील. यापरि येथिचिया लोकांची विनश्यंती होईल. मग मागौनी देशआंतरीची माणुसे येती, का गेली तिये कवणी येती, मग येकाचे गाव येक, एकाचे वृत्ती एका ऐसे होईल गा.''

चक्रधरांच्या या संवादात राष्ट्र, राज्य, लोक व देश हे सर्व महत्त्वाचे शब्द आलेले आहेत. देश हा शब्द केवळ भूमिवाचक आहे. त्यापेक्षा राष्ट्र वेगळे. राज्य शब्द सत्तावाचक आहे. एक राजवट जाऊन दुसरी आली तर राष्ट्रावर परिणाम होतोच असे नाही. या यादवांच्या पूर्वी चालुक्य, राष्ट्रकूट, वाकाटक, सातवाहन अशा सत्ता महाराष्ट्रात नांदल्या, पण त्याने महाराष्ट्र नावाच्या राष्ट्राचे अस्तित्व धोक्यात आले नव्हते. या वेळचे म्हणजे म्लेंच्छांचे - अल्लाउद्दीन खिलजी याचे आक्रमण झाल्यावर जे राज्य येईल ते इतक्या वेगळया प्रकारचे असेल की, त्यामुळे राष्ट्राचाच नाश होईल. या राष्ट्रातील लोकांना स्थलांतर करावे लागेल.

येथे राष्ट्र आणि लोक यांच्यातील संबंधही अधोरेखित झाला आहे. राष्ट्राची समूळ विनश्यंती होईल म्हणजे काय होईल? तर येथील समाजजीवन विस्कळीत होईल. हा विस्कळीतपणा पेलू न शकणाऱ्या माणसांना दुसरीकडे जावे लागेल. अर्थात, या प्रक्रियेत इतर ठिकाणचे काही लोकही येथे येतील. येथून बाहेर गेलेल्या लोकांपैकी काही जण येथे परततील. पण व्यवस्था म्हणून जी होती, तिचा नाश झालेला असेल. लोकांचा वृत्तिच्छंद होईल. कोणाचा पायपोस कोणात राहणार नाही.

मुद्दा अगदीच स्पष्ट आहे. राष्ट्र याचा अर्थ विशिष्ट भूमीवर (म्हणजे देशात) एका राजकीय सत्तेच्या अंमलाखाली असलेली समाजव्यवस्था.

एकोणिसाव्या शतकात महात्मा फुले यांनी 'राष्ट्र म्हणजे एकमय लोक' अशी व्याख्या केली होती. लोकांच्या एकमयतेसाठी काही एक व्यवस्था असणे गरजेचे असते. पण ही व्यवस्था कृत्रिम वा अन्यायकारक असू शकते. ती स्वतः लोकांनी आपल्यासाठी आपली आपणच निर्माण केलेली असण्याऐवजी त्यांच्यावर लादण्यात आलेलीही असू शकते. फुल्यांच्या काळात पारंपरिक व्यवस्थेचे घटक असलेल्या समूहांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचे, आपल्या शोषणाचे भान आपल्या हक्कांसह वर्तमान होऊ लागले होते. अशा विघटित लोकांचे राष्ट्र कसे होणार हा जोतिरावांचा इंडियन नॅशनल काँग्रेसला अर्थात राष्ट्रसभेला सवाल होता.

जोतिरावांनी ज्या समाजव्यवस्थेला लक्ष्य केले होते, ती हतबल झालेली वर्ण-जातिव्यवस्था होती. त्यांच्याच काळात या व्यवस्थेला पर्यायी व्यवस्था उपलब्ध होण्याची शक्यता खुली झाली होती. दृष्टिपथात आली होती. त्यामुळे हे असे विचार मांडू शकले. वस्तुत: जातिव्यवस्था ही येथील भौतिक उत्पादन-आर्थिक-व्यवस्था असून तिला धर्माचे समर्थन लाभले होते व तिचे रक्षण करायची जबाबदारी राज्यव्यवस्थेवर टाकण्यात आली होती. या व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन ती आपल्या स्वार्थासाठी राबवणारा व त्यासाठी इतरांचे शोषण करणारा ऐदी व आइतखाऊ वर्गही निर्माण झाला होता. अर्थात, हे कोणत्याही व्यवस्थेत घडू शकते याचीही नोंद घ्यायला हवी.

चक्रधरांना अभिप्रेत असलेले राज्यांतर म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या खिलजींनी येथील यादवांच्या सत्तेचा ताबा घेणे होते. हे आक्रमक वेगळया धर्माचे, संस्कृतीचे व मुख्य म्हणजे वेगळी व्यवस्था असलेले लोक होते. साहजिकच त्यांनी राज्यावर येण्याने येथील समाजव्यवस्थेस हादरा बसणार होता. त्यांना येथील व्यवस्थेविषयी आस्था असायचे काहीच कारण नव्हते. जेथपर्यंत ती त्यांच्या राज्याला, सत्तेला अर्थात दमनाच्या व शोषणाच्या यंत्रणेला पूरक वा पोषक ठरेल, तेथपर्यंत तिचे रक्षण ते आपल्या स्वार्थासाठी करणार हे उघड आहे.

चक्रधरांना संकटाची चाहूल बरोबर लागली होती, पण त्यांना स्वत:लाच देशत्याग करावा लागल्यामुळे त्यांनी त्यावर काही उपाय सुचवल्याचे दिसत नाही. हे काम चक्रधरांनंतर महाराष्ट्रात होऊन गेलेल्या ज्ञानेश्वर-नामदेवादी संतांनी केले.

संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या भावंडांचे कार्य स्पष्ट करताना 'राजे यवन भ्रष्ट झाले। ठायीठायी दोष घडले। मग इहीं अवतार घेतले। कली दोष हरावया॥' असे म्हटले आहे. त्याची सामाजिक, राजकीय चर्चा करण्याचे धाडस प्रा. न.र. फाटक यांनी केले. वर्ण-जातिव्यवस्थेचे दुष्परिणाम ज्ञानेश्वरांच्या आधी दिसू लागले होते. ते लक्षात आल्यामुळेच चक्रधरांनी धर्माच्या माध्यमातून तिची चिकित्सा करून समाज एकसंध होईल अशी पावले उचलली होती. ती न मानवल्यामुळे किंवा त्यांची कार्यपध्दती न रुचल्यामुळे हितसंबंधी मंडळींनी त्यांना विरोध केला. त्यांचा प्रकल्प अर्धाच राहिला. या पार्श्वभूमीवरच बहुधा वारकरी संप्रदायाच्या संतांनी अर्थात धर्माच्याच माध्यमातून लोकांना रुचेल, पचेल अशा कार्यपध्दतीचा अवलंब करून व्यवस्थेतील दोष कमी करीत (व्यवस्था बदलून नव्हे, कारण सामाजिक व्यवस्था ही पारदर्शक अर्थव्यवस्था असल्याने अर्थव्यवस्था बदलल्याशिवाय तिचा त्याग करता येत नाही.) ती सुसह्य करून लोकांची एकमयता टिकवायचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यांतर होऊनही अराजक, अव्यवस्था यांच्यासारख्या संकटाला तोंड देत राष्ट्राची विनश्यंती होत असताना त्याची मुळे टिकवून धरण्याचे कार्य संतांनी केले. शिवकाळात या मुळांना खतपाणी मिळून त्यांचा पुन्हा एकदा वृक्ष झाला.

वरील मांडणी ही न्या. म.गो. रानडे यांनी केलेल्या विवेचनाची पुनर्मांडणी आहे. त्यासाठी मधले काही दुवे जोडावे लागले इतकेच.

या प्रकाराची - म्हणजेच मराठयांमधील राष्ट्रीयत्वाच्या भावनेची थोडीफार कल्पना असल्यामुळेच हंटर, ऑक्वर्थ, किंकेड यांच्यासारख्याच ब्रिटिश अभ्यासक राज्यकर्त्यांनी मराठे ही हिंदुस्थानातील राष्ट्रीयत्वाची जाणीव असलेली एकमेव जमात असल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्रीय समाजात भाषाबंधुत्वाची व समाजबंधुत्वाची कल्पना रुजली व टिकली असे म्हटले आहे. इतिहासकार त्र्यं.शं. शेजवलकर तर महाराष्ट्रात समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य ही मूल्यत्रयी रुजवण्याचे श्रेय अनुक्रमे एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांना देतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन बलाढय सत्तांशी झुंज देऊन स्वराज्याची स्थापना केली. महाराजांच्या मृत्यूनंतर हे स्वराज्य बुडवण्यासाठी दिल्लीपती औरंगजेब तब्बल सत्तावीस वर्षे धडपडला, पण त्याला यश आले नाही. पुढे सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात या राज्याचा विस्तार होऊ लागला. या विस्तारात पेशव्यांची कामगिरी महत्त्वाची आहे. नंतर असा एक काळ आला की हिंदुस्थानच्या जवळपास दोन तृतीयांश भागावर मराठयांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अंमल प्रस्थापित झाला. दिल्लीच्या तख्तावर त्यांनी पूर्ण नियंत्रण केले. या संदर्भात महादजी शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून करायला हवा.

मराठे हे करू शकले, याचे कारण त्यांचे सामर्थ्य व प्रामाणिकपणा याविषयी इतरांची खात्री पटली होती. दिल्लीच्या दुबळया सत्ताधीशांना आपले रक्षण करण्यासाठी अशाच सत्तेच्या आधाराची गरज होती. मराठे तसे असल्याचे त्यांना वाटल्यानेच हे शक्य झाले. त्यांच्या निमंत्रणावरूनच मराठयांनी उत्तरेच्या राजकारणात हस्तक्षेप केला. मराठे तिकडे गेले नसते, तर हा देश एकतर अफगाणांच्या कब्जात गेला असता किंवा त्याच्यावर ब्रिटिश सत्तेचा झेंडा खूप पूर्वी फडकला असता.

या सर्व प्रकारामागे एक सैध्दान्तिक भूमिका आहे. दिल्लीवर इराणचा बादशहा नादिरशहा याचे आक्रमण होत असताना दिल्लीच्या मोगल बादशहाने संरक्षणासाठी थोरल्या बाजीराव पेशव्यांना बोलावले होते. बाजीराव तेथे पोहोचण्यापूर्वीच नादिरशहा आपले चंबूगबाळे उचलून चालता झाला. त्यानंतर स्वतंत्र सत्ताधारी बनलेल्या अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दाली याला भारतातील 'इस्लाम खतरे में है' असे म्हणत भारतावर हल्ला करण्यासाठी निमंत्रित करणारे मूलतत्त्ववादी निर्माण झाले व अशा अणीबाणीत मराठयांना मदत करण्याऐवजी त्यांचा काटा परस्पर निघतोय तर बरेच, असे समजून तर स्वस्थ बसणारे राजपूत संस्थानिक तेव्हा होते. इतकेच नव्हे, तर त्यांच्यापैकी काही तर अब्दालीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांनाही असेच निमंत्रित करीत राहिले.

अब्दालीची स्वारी आली, तेव्हा मराठयांचा सेनापती सदाशिवरावभाऊ याने उत्तरेतील सर्व हिंदू-मुसलमान सत्ताधीशांना पत्रे लिहून आपल्या सर्वांचा देश एक असून अब्दाली हा परका असल्यामुळे आपल्या सर्वांचाच शत्रू आहे, सबब आपण एक होऊन त्याचा मुकाबला करू असे आवाहन केले. मला वाटते, अलीकडच्या काळातील भारतीय राष्ट्रवादाची मुळे या आवाहनात शोधावी लागतील.

दुसरे असे की, मराठे जेव्हा राष्ट्राच्या नावाने अशी साद घालीत होते, तेव्हा दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या सत्ताधीशांचा धर्म मुसलमान होता. धर्माने हिंदू असलेल्या मराठयांना त्याची अडचण आली नाही. कारण एव्हाना या सत्तेला भारतातील लोकांनी आपले मानले होते व त्यांचाही तसाच समज होत होता. 1857च्या समरात नानासाहेब पेशवे यांनी दिल्लीच्या बादशहाचे नेतृत्व मान्य करून हीच भावना प्रकट केली. याचाच अर्थ असा होतो की, सत्ताधाऱ्यांच्या धर्माला गौण स्थान देणारी धर्मनिरपेक्ष भूमिकाही मराठे विकसित करीत होते.

तिसरा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. मराठयांचे सामर्थ्य अब्दालीला माहीत असल्याने त्याला पराभवाची भीती होती, म्हणून त्याने मराठयांकडे तहाचे बोलणे लावले. मात्र पंजाब प्रांत मराठयांनी त्याला द्यावा अशी त्याची अट होती. ती मान्य करून तह केला असता, तर मराठयांना युध्द टाळता आले असते. तथापि तसे न करता मराठयांनी उलट अफगाणिस्तानातील काबुल, कंदहार प्रांतापर्यंत हिंदुस्थानाचीच सत्ता असल्याचा दावा केला. मराठयांच्या सेक्युलर हिंदुस्थान राष्ट्राची व्याप्तीही तशीच विशाल होती.

हे सर्व करताना मराठयांना आपल्या स्वधर्माचा त्याग करायची आवश्यकता भासली नाही. स्वतःचा उल्लेख ते हटकून हरिभक्त असा करत असत. भारतीय राष्ट्रवादाची नव्याने मांडणी करताना मराठयांच्या भूमिकेला मध्यवर्ती ठेवून ती करायला हवी, असेच हा इतिहास सांगतो.