जयललिता दंतकथेच्या नायिकेची कथा

विवेक मराठी    10-Dec-2016
Total Views |

जयललिता चोख राजकारणी होत्या आणि त्यांची राजकारणावर जबरदस्त पकड होती हे खरे. सर्व परिस्थितीवर मात करून त्या सहा वेळा सत्तेवर राहिल्या, यातच त्यांच्या राजकीय गुणात्मकतेचे चीज आहे असे म्हणता येईल.त्या मितभाषी होत्या हे खरे, पण त्यांचे बोलणे हे त्यांच्या कामातून दिसायचे. जयललितांनी सामान्य माणसासाठी केलेली कामे त्यांच्या शिरपेचात तुरा रोवायला पुढे आली, हे नाकारण्यात हशील नाही.अम्मा मीठ, अम्मा फार्मसी, अम्मा मिक्सर, अम्मा सिमेंट, अम्मा सिनेमा, अशा अम्मांच्या नावाच्या कितीतरी गोष्टी त्यांनी बाजारात आणल्या.  घराघरात अम्मा दिसू लागल्या, पण आधीपासूनच त्या मनामनात ठसलेल्या होत्या. त्यामुळेच जे. जयललिता यांनी घेतलेला इहलोकाचा निरोप हा अनेकांना चटका लावून गेला यात शंकाच नाही.

कोणे एके काळी एक राणी असते. ती आपल्या गोरगरीब प्रजेसाठी रात्रंदिन कष्ट घेत असे, वगैरे वगैरे अशा कितीतरी दंतकथा आपण ऐकलेल्या आहेत, पण अशा दंतकथेच्या पटकथा लेखकांना आपण पार विसरून गेलो आहोत. अशा एका दंतकथेला नव्याने उजाळा देणाऱ्या एका राजकीय नेतृत्वाचा अस्त झाल्यानंतर त्या कथेचा नव्याने घेतलेला हा शोध आहे. जे. जयललिता यांच्याविषयीच मी हे लिहितो आहे. थोडे मागे जाऊन पाहिले, तर पंतप्रधानपदी असताना अटलबिहारी वाजपेयी त्यांना सर्वाधिक त्रास जर कोणापासून झाला असेल, तर तो जयललिता जयरामन म्हणजेच जे. जयललिता यांच्यापासून. 1998मध्ये त्यांनी वाजपेयींच्या सरकारला पाठिंबा तर दिलेला होता, पण आपल्या मर्जीप्रमाणे वाजपेयी सरकार वागणार नसेल, तर त्या सरकारला पाठिंबा चालू ठेवण्यात आपल्याला यत्किंचितही रस नाही, हे त्यांनी वाजपेयींना सांगितले होते. पहिल्या पाच महिन्यांमध्येच त्यांनी त्या सरकारविरोधात कारवायांना आरंभ केला होता. जयललितांचे मन वळवायला वाजपेयींनी जॉर्ज फर्नांडिस यांना चेन्नईला पाठविले. त्यांच्यासमवेत प्रमोद महाजन हेही होते. महाजन यांचे आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते मुरासोली मारन यांच्याशी 'व्यावसायिक संबंध' असल्याच्या संशयावरून त्यांना महाजनांची उपस्थिती तिथे नको होती. अखेरीस त्या बोलल्या आणि पाठिंबा मागे घेण्यापासून परावृत्तही झाल्या, पण नंतर त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केलेच. त्या वेळी वाजपेयी सरकारला समता, ममता आणि जयललिता या सर्व 'ता'वाल्यांकडून त्रास दिला जात असल्याचे म्हटले जाई. वाजपेयींचे पहिले सरकार केवळ 13 दिवसांचे होते. 1998मध्ये सत्तेवर आलेले हे त्यांचे दुसऱ्या खेपेचे सरकार होते आणि 1999च्या मध्याला पुन्हा एकदा जयललितांनी या सरकारविरोधात भूमिका घेतलेली होती. जॉर्ज फर्नांडिस आणि लालकृष्ण अडवानी हे तामिळ दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असतात, हा त्यांनी केलेला एक आरोप होता. त्यामुळे फर्नांडिसांना मंत्रीमंडळातून काढून टाकायची त्यांची मागणी होती. ऍॅडमिरल विष्णू भागवत यांनी भ्रष्टाचारासंबंधी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यात यावी, अशीही त्यांची एक मागणी होती, ज्याला वाजपेयींचा ठाम नकार होता.

त्या वेळी त्यांनी ओसामा बिन लादेनचे काही हस्तक तामिळनाडूमध्ये असल्याचाही आरोप केला होता. तेव्हा डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे जयललितांचे मार्गदर्शक मित्र होते. काँग्रेस पक्ष वाजपेयी सरकारविरोधात अविश्वाास ठराव आणायची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन जयललितांनीच या सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे स्वामींनी त्यांना सुचवले होते. त्यांच्या या सर्व हालचालींचा अर्थ तेव्हा एकच होता आणि तो म्हणजे त्यांना तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमचे सरकार सत्तेवर नको होते. तशी थेट मागणी न करता त्यांनी हे आडवळण घेतलेले होते. तेव्हा वाजपेयी सरकारचा पाठिंबा जयललितांनी काढून घेतला आणि तेरा महिन्यांचे वाजपेयी सरकार कोसळले. त्या वेळी वाजपेयी सरकारने तामिळनाडू सरकार बरखास्त केले असते, तर वाजपेयी सरकार सत्तेवर राहू शकले असते. जयललिता त्या काळात लहरीपणाने वागल्या यात शंकाच नाही. त्या दिवशी दिल्लीमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. पत्रकारांनी जेव्हा त्यांना गाठले, तेव्हा त्यांनी तोच धागा पकडून 'तुम्हाला लवकरच राजकीय भूकंपही अनुभवायला मिळेल' असे भाकीत केले आणि लगेच वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीरही केले.

अशा या जयललिता आपल्या राजकीय प्रभावाखाली तामिळनाडूसारख्या राज्यावर सत्ता गाजवत होत्या. आपली स्मृती फार अल्प असते असे म्हटले जाते, ते खरेच आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल वाईट लिहू नये हा झाला संकेत, पण एखाद्याविषयीची वस्तुस्थिती मांडण्यात गैर काही नाही. माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे विरोधक एम. करुणानिधी यांच्या निवासस्थानी मध्यरात्रीनंतर पावणेदोन वाजता पोलीस पाठवून त्यांना अटक करायचा अतिशय चुकीचा मार्ग त्यांना चोखाळला होता. 30 जून 2001ची ही घटना आहे. करुणानिधी यांच्यासमवेतच टी.आर. बालू आणि मुरासोली मारन या त्या वेळच्या केंद्रीय मंत्र्यांनाही त्यांनी अटक केली होती. केंद्रीय मंत्र्यांना अशा पध्दतीने अटक होण्याचीही ती पहिलीच वेळ होती. चेन्नई शहरातल्या मिनी उड्डाणपुलाच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून हे अटकसत्र करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी राजकारणात धसमुसळेपणा केला नाही, त्या अतिशय नम्र स्वभावाच्या होत्या, असे लिहिणे म्हणजे स्वत:चीच फसवणूक करून घेण्यासारखे आहे. त्या चोख राजकारणी होत्या आणि त्यांची राजकारणावर जबरदस्त पकड होती हे खरे. सर्व परिस्थितीवर मात करून त्या तिथे सहा वेळा सत्तेवर राहिल्या, यातच त्यांच्या राजकीय गुणात्मकतेचे चीज आहे असे म्हणता येईल. त्यामुळेच जे. जयललिता यांनी घेतलेला इहलोकाचा निरोप हा अनेकांना चटका लावून गेला यात शंकाच नाही. त्या मुख्यमंत्री होत्या, आणि त्यांनी ही सत्ता आपल्या डोक्यावर स्वारही होऊ दिली.

 
त्या कमी बोलायच्या, हे खरे. पण त्यांचे बोलणे हे त्यांच्या कामातून दिसायचे. एक काळ असा होता की, लोकसभेत मिरचीच्या स्प्रेचा वापर केला गेला आणि वातावरणात आत्यंतिक द्वेषाचे वातावरण निर्माण झाले. आजही आपण त्याचा अनुभव घेत असतो. जयललितांचे राजकारणातले गुरू आणि चित्रपटातले सहकलाकार एम.जी. रामचंद्रन यांचे डिसेंबर 1987मध्ये निधन झाले, तेव्हा एम.जी.आर. यांच्या विधवा पत्नी जानकी यांच्याकडे सत्तेची सूत्रे दिली जावीत, असा पवित्रा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या काही मंडळींनी घेतला. असे हे निर्णय अनेकांना लाभदायी असतात, म्हणून त्यासाठी त्यांचा आग्रह असतो. एखाद्या अपात्र व्यक्तीला जेव्हा उपकृत करून ठेवले जाते, तेव्हा तिच्याबरोबर काम करणाऱ्या इतरांना त्या व्यक्तीच्या नावाखाली कोणताही भ्रष्टाचारी धिंगाणा घालता येऊ शकतो, ही आपल्याकडली एक राजकीय पध्दत पडून गेलेली आहे. एम.जी.आर. यांच्या पार्थिवाशेजारी जानकी आणि जयललिता या बसल्या असताना जानकी यांच्या जवळच्या नातलगांनी जयललिता यांना त्यांच्या जागेवरून हुसकावून लावले आणि अतिशय वाईट पध्दतीने त्यांना अवमानित केले. एक दिवस त्या पदावर जाऊन दाखवले नाही तर मी जयललिता नाव लावणार नाही, असा निर्धार कदाचित त्या वेळीच त्यांनी केला असण्याची शक्यता आहे. जानकी यांच्या अण्णा द्र.मु.क.ला तेव्हा तामिळनाडू विधानसभेत बहुमत नव्हते आणि नाही म्हटले तरी त्याला पाठिंबा देणाऱ्या तेव्हाच्या काँग्रेस पक्षाकडे बळ बऱ्यापैकी होते. त्या पक्षाच्या साठ सदस्यांच्या पाठिंब्यावर जानकी यांचे भवितव्य अवलंबून होते. पण आपला पक्ष सभागृहात जानकी यांच्या सरकारच्या विश्वाासदर्शक ठरावाला विरोध करील, असे राजीव गांधींनी ऐन वेळी जाहीर केले. अनुनभवी जानकी सभागृहात आपल्या पक्षाच्या सदस्यांसह आल्या, पण येताना त्यांनी तिथे गुंडांनाही आणले. प्रत्यक्षात हाणामारी झाली आणि अनेक जण त्यात जखमी झाले. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच सभागृहात पोलिसांनी लाठीहल्ला केला. माईकची तोडफोड झाली आणि बऱ्याच गोष्टींना हवेत भिरकावले गेले. लोकशाहीच्या पावित्र्याचीच ती विटंबना होती. एका काँग्रेस सदस्याने विधानसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून विश्वासदर्शक ठराव फेटाळला गेल्याचेही जाहीर केले. करुणानिधींनी विधानसभेतच जयललिता यांना अतिशय वाईट भाषेत शिव्या दिल्या. अर्थात तेव्हाच्या या अश्लाघ्य चर्चेपैकी काहीच सरकारी कामकाजात नोंदवले गेले नाही. त्यानंतर सत्तेवर आलेल्या एम. करुणानिधींच्या अर्थसंकल्पाच्या भाषणाच्या वेळी मार्च 1989मध्ये जयललिता सभागृहात होत्या. त्यांच्यावर द्रविड मुन्नेत्र कळघमच्या दोघा सदस्यांनी अत्यंत क्रूरपणाने हल्ला केला. त्यांच्या झिंज्या उपटल्या गेल्या आणि त्यांच्या साडीलाही हात घालण्यात आला. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला राजकारणातूनच संपवेन असा त्या दिवशी जयललितांनी केलेला निश्चय त्यांनी पुढे प्रत्यक्षात आणला.

अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष आपल्या नावावर चालतो, हे त्यांनी दाखवून दिले. सामान्य माणसाविषयी त्यांना काय वाटत होते ते त्यांनी सत्तेवर असताना आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. प्रारंभी जेव्हा त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या, तेव्हा 1989मध्ये त्यांना साडेचोपन्न टक्के मते पडली होती. 1991 ते 1996 या काळात त्यांनी प्रचंड प्रमाणात पैसा जमा केला असा त्यांच्यावर आरोप झाला. 27 सप्टेंबर 2014 रोजी बंगळुरूच्या खास न्यायालयाने त्यांना शंभर कोटी रुपयांचा दंड केला. त्या वेळी त्यांच्या मैत्रीण शशिकला यांनाही शिक्षा झाली. दोन हजार एकर जमीन, 30 किलो सोने आणि बारा हजार साडया यासारख्या त्यांच्या मालमत्तेची किंमत 66 कोटी 65 लाख रुपये करण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या या साडया आणि चपलांचे जोड याविषयी बरेच काही प्रसिध्द झाले होते. त्यांच्या या अतिरेकी हव्यासाबद्दल त्यांना शिक्षा झाल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 17 ऑॅक्टोबर 2014 सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आणि त्यांची शिक्षा दोन महिन्यांसाठी स्थगित केली. 11 मे 2015 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खास न्यायालयाने त्यांना सर्व आरोपांतून निर्दोष ठरवले. जयललिता त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री बनल्या. तेव्हा त्यांनी पोटनिवडणुकीत 88.43 टक्के मते मिळवून विक्रम घडवला. याच वर्षाच्या आरंभी विधानसभेच्या निवडणुकीत जयललिता यांना त्यांच्या सत्तेविरुध्दचे जनमत अंगाशी येईल असे भाकीत अनेक वृत्तवाहिन्यांनी केले होते, ते खोटे ठरवून त्यांनी आपल्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. त्यांना विधानसभेच्या सभागृहात ज्या पध्दतीने अवमानित करण्यात आले होते, त्याचा सूड त्यांनी अशा पध्दतीने घेतला.

त्यांना एका मुलाखतीत विचारले गेले होते की, तुम्ही हुकूमशहा आहात असा आरोप करण्यात येतो, तशा तुम्ही कशामुळे आहात? त्यावर त्यांनी म्हटले होते की, मी तशी वागते याचे कारण मी स्त्री आहे हे आहे. अनेकदा असा अनुभव येतो की काही अधिकारी बऱ्याच सबबी सांगून काम टाळतात. तेव्हा त्यांना मी मुख्यमंत्री आहे याची जाणीव द्यावी लागते. मी स्त्री आहे म्हणून ही चालढकल होते, तेव्हा मी कोण आहे ते त्यांना दाखवून द्यावे लागते. असा युक्तिवाद करणाऱ्या जयललिता यांनी स्त्रीला म्हणूनच आपल्या राज्यात सन्मानाचे स्थान दिले. त्यांना जर मी असे दरडावले नसते तर राज्यातली महत्त्वाची कामे झालीच नसती, असेही पुष्टीकरण त्यांनी दिले आहे. त्यांनी राज्यात आपल्या पहिल्याच खेपेच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत तामिळनाडूमध्ये सर्व महिला असलेल्या 200 पोलीस स्टेशन्सची निर्मिती तर केलीच, तसेच पोलीस खात्यात महिलांसाठी 40 टक्के जागा राखीव ठेवल्या. तामिळनाडूमध्ये 1991मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 39 जागा काँग्रेस आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष यांच्या आघाडीला मिळवून देण्याचाही विक्रम त्यांनी घडवलेला आहे. अर्थात तो राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या मतदानात मिळालेला होता, हे विसरता येत नाही. मात्र 1996मध्ये त्यांना विधानसभेच्या 168 जागांपैकी केवळ 4 जागाच जिंकता आल्या आणि सत्तेविरुध्दचा रोष म्हणून बारगूर मतदारसंघात त्यांचाही पराभव झाला. त्यांच्यावर केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचाही तो परिणाम होता. त्यानंतर लगेचच त्यांच्याविरुध्द एम. करुणानिधी यांच्या सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले. त्यांच्याविरुध्द खटले दाखल केले. रंगीत टीव्हीच्या एका प्रकरणात त्यांना 10 कोटी 13 लाख रुपयांची लाच देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. त्यांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला होता, पण तो फेटाळण्यात आला. 30 मे 2000 रोजी त्यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांना फेटाळण्यात आले. मात्र 'तान्सी' या सरकारी मालकीच्या व्यवस्थेची जागा आपल्या स्वत:च्या उपयोगासाठी घेतल्याच्या फौजदारी प्रकरणात त्या दोषी आढळल्याने त्यांना 2001मध्ये निवडणूक लढवायला बंदी घालण्यात आली. त्या प्रकरणात आणि प्लेझंट स्टे हॉटेलच्या दुसऱ्या एका प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले. असे हे खटले आणि त्यांचे निकाल, पण कोणत्याही प्रकरणात त्यांनी आपल्याविरुध्द हे कुभांड रचले जात असल्याचा दावा केला नाही. मे 2016मध्ये त्या सहाव्यांदा मुख्यमंत्री बनल्या, पण त्या पदाचा सन्मान त्या फार काळ मिरवू शकल्या नाहीत. सप्टेंबरमध्ये त्या आजारी पडल्या आणि 5 डिसेंबरला त्यांचे निधन झाले.

त्या मितभाषी होत्या. राजकारणात असलेल्या कुवतीपेक्षा आपण जरा जास्तच आहोत हे दाखवायचे अनेकांचे प्रयत्न चालतात. त्यासाठी अगदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही उदाहरण आपण घेऊ शकतो. त्यांनी पाचशेच्या आणि एक हजारांच्या नोटांवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर जो थयथयाट केला, तो त्यांच्या पदाला आणि त्यांच्या राजकारणाला शोभणारा नक्कीच नाही. सांगायचा मुद्दा हा की, सामान्य माणसासाठी आपण काम करत असल्याचा दावा करायचा आणि प्रत्यक्षात बडया उद्योगपतींचे चोचले पुरवायचे, असे सातत्याने खपवून घेतले जातेच असे नाही. जयललितांनी सामान्य माणसासाठी केलेली कामे त्यांच्या शिरपेचात तुरा रोवायला पुढे आली, हे नाकारण्यात हशील नाही. त्यांनी चेन्नईची पाण्याची गरज ओळखून कुड्डलोक जिल्ह्यातल्या वीरनाम पाण्याच्या तलावातून पाणी उचलून घेऊन ते चेन्नईकडे वळवले. मुळात 1967मध्ये सी.एन. अण्णादुराई मुख्यमंत्री असताना ही योजना हाती घेण्यात आली होती, पण नंतर ती मागे पडली. ती पुढे एम. करुणानिधी यांनी सुरू केली, तेव्हा त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. हा तलाव कावेरी नदीच्या अगदी टोकाला आहे. जयललिता यांनी ही योजना पूर्ण करून कावेरी पाणी वाटपाच्या प्रश्नावर कर्नाटकाकडून आपल्या राज्याच्या झालेल्या अडवणुकीचे अशा पध्दतीने परिमार्जन केले. त्यांनी 2001मध्ये सरकारी शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप द्यायची योजना राबवली आणि ती अतिशय यशस्वी झाली. त्याही पलीकडे जाऊन त्यांनी 'अम्मा उनावगम' (अम्मा कँटीन) ही योजना हाती घेऊन एक रुपयामध्ये इडली, डोसा आणि पाच रुपयांमध्ये सांबारभात द्यायचा उपक्रम राबवला. तो कमालीचा यशस्वी झाला. हा संपूर्ण प्रकल्प सरकारी मदतीवर चालतो. तिथे काम करणाऱ्या सर्व महिला आहेत हे विशेष. जो समाज शुध्द पाणी विकत घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी त्यांनी अम्मा कुडिनीर प्रकल्प हाती घेतला आणि 20 रुपये लीटर या दराने त्यांना शुध्द पाणी दिले. आपल्या राज्यात पाण्याचा असलेला दुष्काळ संपवायच्या उद्देशाने त्यांनी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची चळवळच उभी केली. त्यांनी सर्व इमारतींना त्यासाठी योग्य ती तरतूद करण्याची सक्तीच केली. तामिळनाडू जिल्हा म्युनिसिपालिटी कायद्यात त्यासाठी त्यांनी सुधारणाही घडवून आणली. महिलांना मोफत मोबाईल द्यायचाही उपक़्रम तामिळनाडू महिला विकास महामंडळाकडून त्यांनी राबवला आणि तोही असंघटित महिलांसाठी उपयुक्त ठरला आहे. त्यांनी 'अम्मा' नावाचा एक छापच तयार केला आणि तो सर्वाधिक लोकप्रिय बनला. अम्मा मीठ, अम्मा फार्मसी, अम्मा मिक्सर, अम्मा सिमेंट, अम्मा सिनेमा, अशा अम्मांच्या नावाच्या कितीतरी गोष्टी त्यांनी बाजारात आणल्या की त्यायोगे आपले नाव सतत जनतेच्या डोळयासमोर राहील अशीच त्यांची व्यवस्था होती. घराघरात अम्मा दिसू लागल्या, पण आधीपासूनच त्या मनामनात ठसलेल्या होत्या. भर व्यासपीठावर आपल्याच आमदारांकडून लोटांगण घालायला लावण्याची खासियत त्यांचीच. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर त्यांचे संबंध चांगले होते, पण त्यांचा जीएसटीला विरोध होता. तरीही त्यांच्या पक्षाने राज्यसभेत सभात्याग करून मोदी सरकारला मदतच केली आणि विधेयक संमत होऊ दिले.

पत्रकार करण थापर हे कसे आक्रमक बोलतात आणि अनेकांना कशा प्रकारे अडचणीत आणतात, हे सर्वांना माहीत आहेच. त्यांनी एकदा त्यांच्या वृत्तवाहिनीसाठी जयललितांची मुलाखत घेतली. तेव्हा करण थापर त्यांना म्हणाले, ''इट वॉज प्लेझंट टॉकिंग टू यू.'' त्यावर जयललिता यांनी आपली प्रतिक़ि्रया लगेचच नोंदवली. त्या म्हणाल्या, ''इट वॉज सर्टनली नॉट नाईस टॉकिंग टू यू.'' तशाही त्या स्पष्टवक्त्या होत्या. त्यांचे विरोधक आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांनी म्हटल्याप्रमाणे जयललिता यांच्या जाण्याने द्राविडी राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढता येणे अवघड आहे. त्या स्वत:ची प्रतिमा जपण्याच्या नादात कार्यमग्न राहिल्या खऱ्या, पण त्यांची ती प्रतिमाच त्यांच्या जीवनसर्वस्वाच्या आड आली. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्या एका कर्तृत्वाचाच हा शेवट होय. स्वत:च नायिका असणाऱ्या या दंतकथेच्या लेखिकेचे पडद्याआड जाणे हेही पडद्यावर तसे ठसा उमटवणारेच.  

9822553076