खान्देशात पॉलीहाऊस क्रांती

विवेक मराठी    10-Dec-2016
Total Views |

पॉलीहाऊस तंत्रज्ञानाच्या बाबतीतही पश्चिम महाराष्ट्राने आघाडीच घेतली. तत्कालीन नेतृत्वाने उर्वरीत महाराष्ट्राला या तंत्राची ओळखही होऊ दिली नाही हे देखील तेवढेच खरे आहे. मात्र आता पॉलीहाऊस शेती तंत्राचा वापर करुन खान्देशातला शेतकरीही जमिनीच्या कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पादन काढण्याच्या स्पर्धेत उतरला आहे. नंदूरबार वगळता खान्देशातील धुळे व जळगाव जिल्ह्यात या दोन वर्षाच्या  कालखंडात तब्बल 57 पॉलीहाऊस उभे राहिले आहेत.
हाराष्ट्रात कृषिक्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रवेश पश्चिम महाराष्ट्रातूनच होतो हे वास्तव आहेच. तेथील राजकारण्यांनी त्यासाठी वापरलेली ताकद आणि पोषक नैसर्गिक परिस्थिती त्याला कारणीभूत ठरते. पॉलीहाऊस तंत्रज्ञानाच्या बाबतीतही पश्चिम महाराष्ट्राने आघाडी घेतली. तत्कालीन नेतृत्वाने उर्वरीत महाराष्ट्राला या तंत्राची ओळखही होऊ दिली नाही, हे देखील तेवढेच खरे आहे. मात्र आता पॉलीहाऊस शेतीतंत्राचा वापर करुन, खान्देशातला शेतकरीही जमिनीच्या कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पादन काढण्याच्या स्पर्धेत उतरला आहे. नंदूरबार वगळता खान्देशातील धुळे व जळगाव या जिल्ह्यांत या दोन वर्षाच्या कालखंडात तब्बल 57 पॉलीहाऊस उभे राहिले आहेत. जळगावजवळच्या एकटया म्हसावद गावात गट शेतीच्या माध्यमातून चार कोटी पन्नास लाख रुपये गुंतवून तेथील 13 शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस उभे केले आहेत.

'आत्मा' खरोखरच शेतकऱ्यांचा आत्मा

Agricultural Technology Management Agency (ATMA)

2004 पासून कृषि विभागात 'आत्म्या'च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नवे दालन उघडण्यात आले. मागच्या दशकात पॉलीहाऊस म्हणजे धनाढय शेतकऱ्यानेच उभारावे, असे काहीसे चित्र होतं. त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्याने पॉलीहाऊस केवळ चित्रात पाहावं आणि गप्प बसावं अशीच स्थिती होती. परंतु शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून कृषि विभागाला जोडूनच त्यांना प्रशिक्षण देणारा 'आत्मा' हा कक्ष तालुका पातळीपर्यंत स्थापन झाला. आत्माच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्यात येऊ लागलं.

नॅशनल हॉर्टीकल्चर ही कृषि विभागाच्या विविध योजनांपैकीच एक योजना आहे. त्यामार्फत फळबाग लागवडीप्रमाणे शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस आणि शेडनेटमध्ये भाजीपाला व फुलशेतीकडे वळावे, यासाठी कार्यक्रम आखण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रशिक्षण हा त्यातलाच एक भाग. त्यासाठी तळेगाव-दाभाडे (पुणे) येथील हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरमध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांना गटागटाने प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पॉलीहाऊस शेतीत पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर असला तरी, हळूहळू उर्वरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या शेतीत उडी घेतली.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून (एनएचएम) अनुदान

या योजनेतून शेतकऱ्यांना पॉलीहाऊस उभारणीत आलेल्या खर्चाच्या 50 टक्के इतके अनुदान मिळते. शेतीशी निगडीत सगळयाच योजनांचे अनुदान आता ऑनलाइन प्रकरणांनाच  मिळते. पॉलीहाऊस अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस उभारणी वेळेत व दर्जेदार साहित्याचा वापर करणे गरजेचे असते. उदा. सांगाडा उभा करण्यासाठी अस्सल गॅल्व्हनाइज पाइप, मान्यताप्राप्त कंपनीची पॉलीफिल्म वापरणे बंधनकारक असते. माती, पाणी परीक्षणापासून ते ठिबक सिंचन प्रणालीपर्यंतचे काटेकोर नियोजन करावे लागते. याबाबत वेळोवेळी परीक्षण करून, त्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना मिळते. दहा गुंठयाच्या पॉलीहाऊससाठी सुमारे 10 ते 11 लाख रुपये इतका खर्च लागतो. त्यापैकी पाच लाख रुपये अनुदान मिळू शकते.

खान्देशात 64 पॉलीहाऊस

नाशिक आणि पुण्याकडे पॉलीहाऊस शेतीने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडत असताना उर्वरीत महाराष्ट्रातला शेतकरी कर्जबाजारी होऊन गळयात फास अडकवित होता. खान्देशातला तरुण शेतकरी पुण्याला प्रशिक्षणाला तर जायचा, परंतु पॉलीहाऊस उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाचा आकडा ऐकूनच त्याचे डोके बधीर व्हायचे. दहा गुंठयासाठी दहा-बारा लाख कोठून उभे करायचे? बँका तर शेतकऱ्यांचा एक शब्दही ऐकून घेत नाहीत. त्यामुळे प्रशिक्षण घेऊनही अनेकांना पॉलीहाऊस उभे करता आले नाहीत. परंतु, अलिकडच्या काळात काही धाडसी बँक अधिकाऱ्यांमुळे खान्देशातील शेतकऱ्यांना कर्ज मिळू लागले आहे. त्यातून मागच्या तीनच वर्षात धुळे व जळगाव जिल्ह्यात 57 पॉलीहाऊस उभे राहिले. (पूर्वीचे सात धरुन 64).

उभारणी करणाऱ्या कंपन्यांची टाळाटाळ

45 ते 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणारे तापमान पॉलीहाऊससाठी पोषक नाही, अशी कारणे पुढे करून या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या खान्देशात पॉलीहाऊस उभे करायला सुरुवातीला उत्सुक नव्हत्या. मोठया उत्साहाने काही शेतकऱ्यांनी प्रकल्प उभा करायला सुरुवात केली, परंतु उभारणी करणाऱ्या कंपनीकडून फसवणूक होऊ लागली. आगाऊ पैसे घेऊनही साहित्य देताना कंपन्या टाळाटाळ करु लागल्या.

जळगावात ऍग्रोवर्ल्डची पॉलीहाऊस कार्यशाळा

पॉलीहाऊसबद्दल शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या उत्सुकतेचा या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या गैरफायदा करून घेऊ लागल्यामुळे, शेतकऱ्यांना जागरूकपणे पॉलीहाऊस उभारणी व उत्पादन कसे घ्यावे, याबाबतचे मार्गदर्शन होणे गरजेचे होते. कृषिक्षेत्रात कार्यरत फार्मर्स मल्टिपर्पज असोसिएशन व ऍग्रोवर्ल्ड मासिकतर्फे सप्टेंबर महिन्यात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस उभारणीबाबत काय काळजी घ्यावी, यापासून ते पॉलीहाऊसमध्ये उत्पादीत मालाचे मार्केटिंग कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी खान्देशासह विदर्भ, मराठवाडयातील सुमारे 400 शेतकरी उपस्थित होते. यावेळी पॉलीहाऊस स्ट्रक्टर उभे करताना वापरण्यात येणारे गॅल्व्हनाइज पाइप आहेत की नाहीत हे कसे ओळखावे, पॉलीफिल्म योग्य जाळीची व दर्जाची आहे का? पाण्याचा निचरा होणारी माती आहे का? पाण्याचा पी.एच. योग्य आहे का? मातीचे निर्जंतुकीकरण, गादीवाफ्यावर लागवड, रोपांची निवड आदीबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पॉलीहाऊस उभारणीबाबत प्रकरण कसे तयार करावे व बँकेकडे कर्जप्रकरण कसे सादर करावे, याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.

म्हसावदमध्ये पॉलीहाऊसची गटशेती

जळगावपासून जवळच असलेल्या म्हसावद गावातील 13 शेतकऱ्यांनी गट स्थापन करुन पॉलीहाऊस उभे केले आहेत. हा राज्यातील एक नावीन्यपूर्ण उपक्रम ठरला आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांना सुमारे चार कोटी 50 लाख रुपये इतका खर्च आला आहे. विशेष म्हणजे या 13 जणांमध्ये ज्याच्याकडे फक्त एक एकरच शेती आहे, अशा एका लहान शेतकऱ्यानेही पॉलीहाऊस उभे केले. या प्रकल्पाचे उद्धाटन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व विभागीय कृषिसंचालक कैलास मोते यांनी केले होते.

कमी पाण्यातही लाखाचे उत्पादन

पॉलीहाऊसची उभारणीसाठी लाखो रुपये मोजावे लागतात हे जरी खरे असले, तरी हा खर्च एकदाच करावा लागतो, परंतु त्याचे फायदे पुढील काही वर्षे मिळत राहतात. पॉलीहाऊसमध्ये कमी पाण्यात विक्रमी उत्पादन घेण्याचे प्रयोग खान्देशातील अनेक शेतकऱ्यांनी केले आहेत. शिंदखेडे तालुक्यातील डाबली-धांदरणे येथील जयपालसिंग गिरासे यांच्या विहिरीत दररोज फक्त दीडफूट पाणी गोळा व्हायचे. हे पाणी त्यांनी मोकळया शेतातल्या पिकासाठी वापरले असते, तर एक गुंठयातदेखील लागवड करता आली नसती. परंतु त्यांनी 20 गुंठयात उभारलेल्या पॉलीहाऊसमध्ये काकडीचे उत्पादन घेऊन 3 लाख रुपयांचे उत्पादन घेतले. एकूण दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना पॉलीहाऊस शेती वरदान ठरू पहात आहे.

या नव्या तंत्राची भुरळ नव्या पिढीतील शेतकरी कुटुंबातील तरुणांना पडल्याचे दिसून येते. त्याची अनेक उदारहरणे पाहायला मिळत आहेत. &

8805221372

 

खान्देशात दोन वर्षात 200 पॉलीहाऊस

- शैलेंद्र चव्हाण (ऍग्रोवर्ल्ड)

 2014पर्यंत खान्देशात फक्त सात पॉलीहाऊस  होते. मात्र कृषिविकास आणि कृषिविस्तार क्षेत्रात 2014 पासून कार्यरत कृषिमासिक ऍत्रोवर्ल्डच्या प्रयत्नांमुळे दोनच वर्षात 57 नवे पॉलीहाऊस उभे राहिले. 2014 पर्यंत खान्देशसाठी शासनाने अत्यल्प आर्थिक तरतूद केली असल्याने इच्छा असूनही शेतकरी प्रकल्प उभा करु शकत नव्हते. त्यासाठी ऍग्रोवर्ल्डच्या प्रयत्नांमुळे कृषि आयुक्तालयामार्फत विकास देशमुख यांनी पहिल्यांदाच 12 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. पूर्वी खान्देशातील तापमानाचा बाऊ करून उभारणी करणाऱ्या कंपन्या खान्देशात यायला फारशा उत्सुक नव्हत्या मात्र आता त्यांचाही दृष्टिकोन  सकारात्मक झाला आहे, नगर, पुणे, इंदूर, अहमदाबाद, दिल्ली तसेच इस्त्रायलची कंपनी देखील खान्देशात काम करु लागल्या.

 

केंद्राकडे अनुदान वाढीसाठी पाठपुरावा करेन - खा. रक्षाताई खडसे

सध्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पॉलीहाऊस शेतीकडे कल वाढला आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत जळगाव जिल्ह्याला मिळणाऱ्या अनुदानात वाढ झाली आहे. मात्र ती पुरेशी नसल्याचे दिसून आले आहे. म्हणून मी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे पाठपुरावा केलाच आहे. ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीही असल्याने अनुदानात आणखी वाढ होऊ शकेल. तसेच एनएचबीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी केंद्र सरकारकडे मी स्वत: प्रयत्न करेन.

 

लक्ष्यांक वाढीसाठी प्रयत्न करु - आ. हरिभाऊ जावळे

''शेतीसाठी कमी कमी होत जाणारी जमीन व वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पॉलीहाऊसमधील संरक्षित शेती गरजेची आहे. या महागडया तंत्रज्ञनामुळे शेतकऱ्याला बाजारपेठेचा अभ्यास करूनच पिकांची निवड करावी लागेल. पॉलीहाऊस शेतीमुळे आता शेतकऱ्याला हिशोब करायची सवय लागणार आहे. या क्षेत्रात गटाने एकत्र येऊन शेतकऱ्यांनी शेती करणे फायद्याचे आहे. येत्या काळात या शेतीचे फायदे दिसू लागतील.