कर्मयोगी दृष्टीदाता

विवेक मराठी    12-Dec-2016
Total Views |

एखादी व्यक्ती आपल्या क्षेत्रात नावलौकिकाला आली की समाजाकडून तिचा आयडॉल म्हणून स्वीकार होतो. त्या व्यक्तीच्या जीवन-प्रवासाचा अभ्यास करून इतरांनी तसाच जीवनमार्ग स्वीकारावा अशी त्यामागे भूमिका असते. आयडॉल म्हणून मान्यता मिळवलेल्या, आपल्या क्षेत्रात यशाची उत्तुंग भरारी घेतलेल्या व्यक्तीचे जीवन तिच्या कामाचा अभ्यास करून कळतेच असे नाही. कारण जोपर्यंत त्या व्यक्तीचे अंतरंग आणि  जगण्याच्या प्रेरणा समजून घेतल्या जात नाहीत  तोपर्यंत यशाचे गमक लक्षात येणार नाही. पनवेल शहरातील सुप्रसिध्द नेत्रतज्ज्ञ आणि भारतातील 'फेको'तंत्रज्ञानातील द्रोणाचार्य
डॉ. सुहास  हळदीपूरकर यांच्याबाबतीत वरील विधाने लागू आहेत. डॉ. हळदीपूरकर आज देशात नेत्रतज्ज्ञ म्हणून प्रसिध्द आहेत. देशविदेशातून अनेक डॉक्टर  प्रशिक्षणासाठी हळदीपूरकराकडे येतात आणि 'फेको' तंत्र शिकतात. लक्ष्मी आय इन्स्टिटयूट या अद्ययावत रुग्णालयाबरोबरच एक धर्मादाय न्यास स्थापन करून समाजसेवा करणारे डॉ. सुहास हळदीपूरकर ही स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला कर्मयोग आजच्या काळात जगणारी व्यक्ती आहे. लीनता, निरपेक्षता आणि सेवाभाव यांचा त्रिवेणी संगम डॉक्टरांशी बोलताना आपल्याला अनुभवता येतो.
''तू
जेव्हा रुग्णाला तपासशील आणि रुग्णाच्या डोळयात तुला मोतीबिंदू दिसेल, तेव्हा तुला आनंद होईल की वेदना?'' डॉ. सुहास हळदीपूरकर जेव्हा शिकत होते तेव्हा त्यांचे गुरू डॉ. गोखले यांनी हा प्रश्न त्यांना विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर डॉ. सुहास हळदीपूरकर यांनी आपल्या कृतीतून दिले आहे. आयुष्यात केवळ पैसाच महत्त्वाचा नाही तर आपल्या सेवेतून फुलणारे चेहरे आणि त्यात लपलेला आनंदही महत्त्वाचा आहे. हेच डॉ. सुहास हळदीपूरकर यांनी आपल्या कृतीतून सिध्द केले आहे. अर्थात अशी मनोभूमिका एका क्षणात निर्माण होत नाही. त्यासाठी मनात खूप खोलवर संस्काराची रुजवात व्हावी लागते आणि त्याच संस्कारांचे बोट धरून वाटचालही करावी लागते. डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. आपले बालपण, गाव आणि जडणघडण या विषयी बोलताना डॉ. सांगतात, ''कारवार हा शब्द ऐकला तर आजही मी भूतकाळात जातो आणि माझ्या शरीरातून चैतन्यलहरी वाहू लागतात. मी मूळचा कारवारचा. पस्तीस-चाळीस माणसांच्या एकत्र कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. सकाळच्या उदयरागाने आमची दिनचर्या सुरू व्हायची आणि रात्रीच्या प्रार्थनेने ती संपायची. आजोबा सामाजिक जीवनात होते, त्यामुळे अनेक मोठया माणसांचा घरी राबता होता. महात्मा गांधी, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर अशा थोर व्यक्ती आमच्या घरी वास्तव्याला राहिल्या आहेत. तर अशा घरात आणि संस्कारात मी लहानाचा मोठा झालो. आर्थिक परिस्थिती फार चांगली होती असे नाही, पण कशाची कमतरताही नव्हती. माझी जेव्हा मेडिकलला निवड झाली, तेव्हा आईवडिलांना आनंद झाला. पण माझ्यापुढे प्रश्न होता की या शिक्षणाचा खर्च कशाप्रकारे पुरा करायचा? वडिलांची फार क्षमता नव्हती. त्याही परिस्थितीत त्यांनी मला सिंडीकेट बँकेत ओ.डी. खाते उघडून दिले. दर महिन्याला मला शंभर रुपये त्या खात्यातून मिळत, पण तेवढयाने महिनाभराचा खर्च भागणार नव्हता. मी विविध शिष्यवृत्त्या मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्यवृत्त्यांची रक्कम मी त्या त्या संस्थाना परतही केली. मी शिकत असताना बहीण मला आर्थिक मदत करत असे. महाविद्यालयातही अनेकांनी मदत केली. आज जेव्हा काही लोक म्हणतात की मी सेल्फ मेड आहे, तेव्हा मला हसू येते. कारण सेल्फ मेड कोणीच नसतो. त्याच्या जडणघडणीत असंख्य हात गुंतलेले असतात. माझ्याही बाबतीत असेच आहे. माझ्या आजीपासून ते माझ्या अनेक गुरूंपर्यंत अनेकांनी मला घडवले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे मी आज आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्या दिवशी मी पनवेलमध्ये काम सुरू केलं, त्याच्या आदल्या दिवसापर्यंत मलाही माहिती नव्हते की, पुढे आपली कर्मभूमी पनवेल असेल. पण काही काही गोष्टीचे योग असतात. कारवारपेक्षा पनवेल मुंबईला खूपच जवळ आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि माझ्या क्षेत्रातील बदल सातत्याने मला कळत राहिले. 1981 साली मी पनवेलला काम सुरू केले. आज आमच्याकडे दिवसाला कमीतकमी दोनशे-अडीचशे रुग्ण येतात, पण सुरुवात केली तेव्हा दिवसाला दोन रुग्ण आले तरी खूप आनंद वाटायचा. काम करण्याची नवी उभारी येत असे. 1981च्या आसपास डोळयाच्या शस्त्रक्रियांसाठी सर्वजण मुंबईकडे धाव घेत असत. मी सुरुवातीपासून मुंबईकडे जाणारा हा ओघ थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. पनवेलमध्ये फारशा साधनसुविधा नसतानाही आत्मविश्वासाने शस्त्रक्रिया करू लागलो. आण्ाि आता केवळ मुंबई नव्हे तर देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून रुग्ण पनवेलला येतात. हा 1981पासून सुरू झालेला माझ्या वैद्यकीय सेवेचा प्रवास आहे.''

डॉक्टर हळदीपूरकरांनी 1981 साली केवळ साडेचार हजार रुपयांची साधनसामग्री आणि अवजारे उधारीवर घेऊन आपल्या कामास सुरुवात केली. नित्यनूतन होणारे तंत्रज्ञानातील बदल
डॉ. हळदीपूरकरांनी आत्मसात करत अत्याधुनिक साधनसुविधांनी युक्त असे रुग्णालय उभे केले आहे. फेको तंत्रज्ञानासाठी देशभरातून रुग्ण येतात. एका छोटया बॅगेतील साधने ते अद्ययावत रुग्णालय हा त्यांचा प्रवास खूप काही शिकवणारा आहे. डॉ. सुहास हळदीपूरकर सांगतात, ''सुरुवातीला दिवसाला एक-दोन रुग्ण तपासले तरी खूप आनंद मिळत होता. हा आनंद मी सातत्याने विकसित करत गेलो. पनवेलशिवाय कर्जत, उरण, रोहा अशा तालुक्याच्या गावातही जाऊ लागलो. त्यावेळी वाहतुकीची साधने नव्हती, त्याचप्रमाणे आरोग्याबाबत फार जागरुकताही नव्हती. अनेक लोक केवळ सुविधा नव्हती म्हणून त्रास सहन करत होते. रोह्यात मला एकदा दोन्ही डोळयांत मोतीबिंदू असलेले बाळ आढळले. कातकरी समाजातील ती महिला आपल्या मुलाला घेऊन भेटली तेव्हा तिच्याकडे गाडीभाडयाचेही पैसे नव्हते. मी त्यांना एसटीने पनवेलला घेऊन आलो. त्या मुलाच्या दोन्ही डोळयांतून मोतीबिंदू काढला. आणि दुसऱ्या दिवशी परत पाठवले. त्यावेळी अशा शस्त्रक्रिया करताना खूप जोखीम होती. तंत्रज्ञान फार प्रगत नव्हते. पण असलेल्या सुविधांच्या साहाय्याने जास्तीतजास्त गुणवत्तापूर्ण काम करण्याचा माझा प्रयत्न कायम असतो. आता माझ्या रुग्णालयात अत्याधुनिक सेवासुविधा आहेत. पंधरा दिवसांपूर्वी मी एका पंधरा दिवसाच्या बाळाच्या डोळयाची शस्त्रक्रिया केली. आता आधुनिक तंत्रज्ञान हाताशी असल्याने खूप चांगले काम करता आले. माझ्या वैद्यकीय कारकिर्दीतील ही दोन टोके आहेत. पण दोनही प्रसंगी जास्तीतजास्त गुणवत्तापूर्ण कामावरच मी लक्ष केंद्रित केले होते. सातत्याने बदलणारे तंत्रज्ञान आपण अवगत केले पाहिजे आणि त्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या व्यवसायासाठी, समाजाच्या सेवेसाठी केला पाहिजे ही माझी भूमिका असते. याच भूमिकेतून मी 1991 साली जर्मनीला जाऊन डॉ. फेड्रीक रेनटेक यांच्याकडून फेको तंत्रज्ञान अवगत केले. आता हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी आता देशभरातून असंख्य डॉक्टर येत असतात.''


डॉ. सुहास हळदीपूरकर केवळ रुग्णालय चालवत नाहीत, तर एक धर्मादाय न्यासही चालवतात. या न्यासाच्या माध्यमातून दररोज शेकडो रुग्णावर नि:शुल्क उपचार केले जातात. न्यासाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया आणि रुग्णाच्या आहाराची-निवासाची व्यवस्था केली जाते. यामागची भूमिका सांगताना डॉ. सुहास हळदीपूरकर म्हणतात, 'लक्ष्मी आय इन्स्टिटयूट'च्या माध्यमातून माझे काम उत्तम प्रकारे चालू आहेच. माझ्या कामातून मी गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करतो. पण समाजात असाही घटक आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असते. केवळ याच कारणामुळे ते अंधकारमय जगात जगत असतात. त्यांच्यावर उपचार कोण करणार? त्या घटकाचा हे सुंदर जग बघण्याचा अधिकार हिरावून घेणारे आपण कोण? केवळ पैसा कमावणे हा माझ्या जीवनाचा कधीच उद्देश नव्हता. त्याला कारण मला लहानपणापासून मिळत गेलेले संस्कार. माझी आजी सर्वांशी आपुलकीने व्यवहार करायची. सर्वांवर प्रेम करायची. तिच्याच संस्कारात मी वाढलो आहे. त्याचप्रमाणे आपल्या जगण्यासाठी किती पैशाची आवश्यकता आहे, याची मर्यादा मी निश्चित करू शकलो आहे. त्यामुळे आपण समाजासाठी काही केले पाहिजे, या समाजाचे आपण देणे लागतो ही भावनाही अधिक बळकट झाली आहे. माझ्या या भावनेला माझ्या कुटुंबियांनी पाठिंबा दिला आहे. माझ्या कामाचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे, एवढया एकाच कारणासाठी मी धर्मादाय न्यास स्थापन केला. या न्यासाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात वेगवेगळया तालुक्यांत नेत्रतपासणी शिबिरे घेतली जातात. त्या शिबिरांत दाखल झालेल्या लोकांना पनवेलमध्ये आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या जातात. व्हिजन-2020 अंतर्गत आम्ही हे काम करत असून, त्यासाठी गावपातळीपर्यंतची कार्य करणाऱ्या व्यक्तींची साखळी आम्ही निर्माण केली आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरही त्या रुग्णांशी आम्हाला संपर्क ठेवता येतो. या न्यासाच्या कामाला खूप मोठया प्रमाणात धनाची आवश्यकता असते. त्यातील अधिकांश वाटा मी उचलतो. माझ्याकडे फेको शिकायला येणारे डॉक्टरही या न्यासाला देणगी देतात. त्यातून हा समाजसेवेचा रथ पुढे जात असतो. आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना मला न्यासाच्या कामात गुंतवून ठेवते आणि आनंदही देते.'' 

एकूणच डॉ. सुहास हळदीपूरकर याचा हा प्रवास पाहिला की, आपण एका उदात्त आणि ध्येयासक्त व्यक्तिमत्वाच्या सहवासात वावरत आहोत, याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही. शांत पण ठाम स्वरात डॉक्टर आपले मत मांडतात. ते आपल्या जीवनावर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, श्री स्वामी समर्थ याचा खूप मोठा प्रभाव असल्याचे सांगतात. डॉ. हळदीपूरकर म्हणतात, ''स्वामी विवेकानंद यांचा कर्मयोग वाचताना प्रत्येक वेळेस नवी दृष्टी प्राप्त होते. नवी प्रेरणा मिळते. जगायचं कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर मला विवेकानंदांच्या विचारातून मिळत असते. साध्य आणि साधन यातील मूलभूत फरक स्वामीजींनी उत्तम प्रकारे मांडला आहे. आपल्या जीवनात हा विचार कशाप्रकारे रुजवता येईल, याचा मी सातत्याने विचार करतो आणि त्या विचारानुसार जगण्याचा माझा प्रयत्न असतो. या महापुरुषाच्या विचारपाथेयामुळे मी माझ्या जीवनाला आकार देऊ शकलो. अपेक्षा आणि अपेक्षाभंगातून होणारा भ्रमनिरास यांचा समतोल सांभाळण्याची कला या तत्त्वज्ञानामुळे अवगत करता आली. त्यामुळे मी केवळ आनंद आणि आनंदच उपभोगत आहे. आपण आपल्या अपेक्षांचा परीघ निश्चित केला तर अपेक्षाभंगाचे दुःख वाटयाला येणार नाही. सर्वांसोबत राहून, काम करून देखील सर्वांपासून अलिप्त राहण्याची कला स्वामीच्या तत्त्वज्ञानातून मिळते. सातत्याने त्या तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले तर ही कला अंगात मुरू शकते.'' डॉ. सुहास हळदीपूरकर स्वामी विवेकानंदांबाबत केवळ भरभरून बोलत नाहीत तर त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान आचरणातही आणतात. स्वामीजींनी दरिद्रीनारायणाची सेवा हीच नारायणाची सेवा असल्याचे सांगितले आणि सेवामार्ग निर्माण केला. डॉ. हळदीपूरकर त्याच मार्गाने प्रवास करत आहेत. उपेक्षित, दुःखितांना दृष्टीदान करण्याचे, जे अंधकारात जगतात किंवा ज्याच्या आयुष्यात भविष्यात अंधकार येणार आहे, अशांसाठी डॉ. हळदीपूरकर कर्माने आणि धर्मानेही दृष्टीदाता आहेत. स्वामींचा कर्मयोग आधुनिक जगात जगणाऱ्या व्यक्तींच्या यादीत डॉ. सुहास हळदीपूरकरांचे नाव खूप वरच्या स्थानावर असेल.

डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या न्यासाच्या माध्यमातून एक ऑप्टोमॅट्री महाविद्यालय चालवले जात असून भविष्यातील दृष्टीदाते घडवण्याचे पवित्र काम डॉ. हळदीपूरकरांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. दरवर्षी चाळीस विद्यार्थ्यांना या पदवी शिक्षणक्रमास प्रवेश दिला जातो. चार वषर्े कालावधीच्या या प्रशिक्षणात तीन वर्षे थिअरी शिकवली जाते तर एक वर्ष प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर या क्षेत्रातील पदव्युत्तर उच्च शिक्षणाची सोय केली जाते. आपल्या व्यवसायाला केवळ पैसा कमावण्याचे साधन म्हणून न पाहाता समाजाच्या सेवेचे एक उपकरण मानणाऱ्या डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या कार्याचा अनेक संस्थांकडून आणि व्यक्तींकडून गौरव झाला आहे. डॉ. हळदीपूरकरांच्या नावावर अनेक पुरस्कार जमा आहेत. तरीही डॉक्टरांच्या कामाचा शब्दशः गौरव करणारा पुरस्कार म्हणून बॉम्बे मेडिकल एड फाउंडेशनच्या 'कर्मयोगी पुरस्कारा'चा उल्लेख करावाच लागेल. गेल्या तीस-पस्तीस वर्षांत डॉ. हळदीपूरकरांनी जे केले आहे त्याला कर्मयोग नाही तर आणखी वेगळे काय म्हणायचे? इतके मानसन्मान प्राप्त होऊनही डॉ. हळदीपूरकराच्या जगण्या-वागण्यात काहीही फरक पडला नाही. ते आपला कर्ममार्ग, सेवामार्ग चालतच आहेत आणि पुढेही चालत रहातील.

लक्ष्मी आय इन्स्टिटयूटचा पसारा पाहाता असंख्य कर्मचारी
डॉ. हळदीपूरकराच्या सोबत काम करताना दिसतात. डॉक्टर जो सेवाभाव जपतात आणि जगतात तोच भाव इथल्या कर्मचारी वर्गाच्या व्यवहारातून दिसून येतो. एवढे मोठे टिमवर्क कशाप्रकारे संचालित केले जाते; कोणत्या गोष्टीवर भर दिल्यामुळे सर्व गोष्टी योग्य प्रकारे घडून येतात, या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. सुहास हळदीपूरकर म्हणतात, ''मी पनवेलला जेव्हा काम सुरू केले तेव्हापासून मला सोबत करणारे तीनजण आजही आमच्या टिममध्ये आहेत. दिवसेंदिवस आमच्या कामाचा व्याप वाढत चालला आहे तसं टिममध्ये सहभागी होणाऱ्याची संख्याही वाढत आहे. एकमेकांच्या सहवासात राहून नवे लोक जुन्यांकडून शिकतात. आमची संस्था म्हणजे एक मोठे कुटुंबच आहे. संवाद, विश्वास, सन्मान, प्रेम यातून आम्हा सर्वांची कार्यसंस्कृती विकसित झाली आहे. इतक्या वर्षांच्या वाटचालीनंतर आता आम्हाला नव्याने कार्यसंस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. आमच्या सर्वांमध्ये एक भेदापलीकडे जाणारे नाते तयार  झाले आहे आणि तेच आमचे बळही आहे.''

 आज वयाची 62 वर्षे पूर्ण केलेले डॉ. सुहास हळदीपूरकर सातत्याने नवे शिकण्याचा प्रयत्न करतात. आपली गुणवत्ता अधिकाधिक वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न करतात. स्वामी विवेकानंद म्हणत की, प्रत्येक व्यक्तीचे एक जीवनध्येय असते. आपले जीवनध्येय समजलेली माणसे समाजात फारच कमी असतात.
डॉ. हळदीपूरकर त्यांतील एक आहेत.

 9594961860