महासत्तेची पायाभरणी करणारा विचारवंत

विवेक मराठी    14-Dec-2016
Total Views |

अमेरिकेच्या स्वातंत्र्याची आणि भावी प्रगतीची पायाभरणी अनेक लोकांनी केली. तो सर्व इतिहास अतिशय रोमांचक आणि ज्याच्यापासून आपण खूप काही शिकावे असा आहे. दुर्दैवाने आपण फक्त अमेरिकेच्या पोषाखाची, संगीताची, खाद्यसंस्कृतीची नक्कल करत असतो. ज्या अनेक लोकांनी अमेरिका घडविली, त्यातील एकाचे नाव आहे - थॉमस पेन. आपल्या महाराष्ट्रातील महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांवर थॉमस पेन यांच्या विचारांचा जबरदस्त परिणाम आहे. व्यक्ती एक स्वतंत्र मूल्य आहे आणि जन्मताच व्यक्तीला न काढून घेता येणारे हक्क प्राप्त झाले आहेत, ही संकल्पना थॉमस पेन यांची.
मेरिकेचे नाव माहीत नसणारा माणूस जगाच्या पाठीवर सापडणे कठीणच आहे. भारतातील तर अनेकांचे म्हणणे असे आहे की, अमेरिका म्हणजे भूलोकीचा स्वर्ग आहे. भौतिक समृध्दीचे सर्वोच्च टोक अमेरिकेने गाठलेले आहे. अमेरिका जशी जगातील एक आर्थिक महासत्ता आहे, तशी ती सैनिकी महासत्तादेखील आहे. 1990पर्यंत अमेरिकेशी सैनिकी महासत्ताच्या संदर्भात रशिया एक स्पर्धक देश होता. परंतु 1990 साली रशियन साम्राज्य कोसळले आणि अमेरिका जगातील एकमेव महासत्ता झाली.

अशी ही अमेरिका अठराव्या शतकात कशी होती? 1775 साली अमेरिकन स्वातंत्र्ययुध्दाला प्रारंभ होतो आणि 1783 साली त्याची समाप्ती होते. अमेरिकेवर इंग्लडची सत्ता होती. तेव्हा अमेरिकेत 13 वसाहती होत्या. या 13 वसाहतींचे मिळून एक राज्यही (स्टेट) तयार झालेले नव्हते. या तेरा वसाहतींचा कारभार इंग्लंडमधून चालत असे. इंग्लिश पार्लमेंट आणि राजा या वसाहतींवर कर लादत असे. शेतमालाचे जे उत्पादन होई, त्याची खरेदी करत असे. बहुतेक व्यापार इंग्रजांच्या हातातच होता. इंग्लंडच्या आर्थिक फायद्यासाठी ब्रिटिश राज्यकर्ते अमेरिकेच्या या वसाहतींचे शोषण करीत.

या शोषणाविरुध्द अमेरिकन वसाहतीत प्रचंड असंतोष निर्माण झाला. या वसाहती शस्त्रसज्ज होत्या. प्रत्येकाचे स्वत:चे सुरक्षादल होते. इंग्लडला आमच्यावर राज्य करण्याचा काय अधिकार आहे? इंग्लिश पार्लमेंटमध्ये आमचे प्रतिनिधी नाही, असे असताना आमच्यावर कर लादण्याचा त्यांना कुणी अधिकार दिला? असा असंतोष खूप वाढत गेला, ब्रिटिशांशी संघर्ष होऊ लागला, तो वाढत वाढत त्याचे रूपांतर बंडात झाले आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली तेरा वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी इंग्रजी सैन्यांचा पराभव करून स्वातंत्र्य मिळविले. त्यानंतर खऱ्या अर्थाने अमेरिका या नावाच्या देशाचा जन्म झालेला आहे. गेल्या सव्वादोनशे वर्षातील अमेरिकेची प्रगती थक्क करणारीच आहे.

अमेरिकेच्या स्वातंत्र्याची आणि भावी प्रगतीची पायाभरणी अनेक लोकांनी केली. तो सर्व इतिहास अतिशय रोमांचक आणि ज्याच्यापासून आपण खूप काही शिकावे असा आहे. दुर्दैवाने आपण फक्त अमेरिकेच्या पोषाखाची, संगीताची, खाद्यसंस्कृतीची नक्कल करत असतो. ज्या अनेक लोकांनी अमेरिका घडविली, त्यातील एकाचे नाव आहे - 'थॉमस पेन'. आपल्या महाराष्ट्रातील महात्मा जोतिराव फुले हे राईटस् ऑफ मॅन या पुस्तकाने फार प्रभावीत झालेले होते. थॉमस पेन यांच्या विचारांचा जबरदस्त परिणाम आहे. व्यक्ती एक स्वतंत्र मूल्य आहे आणि जन्मताच व्यक्तीला न काढून घेता येणारे हक्क प्राप्त झाले आहेत, ही संकल्पना थॉमस पेन यांची. महात्मा फुले आणि पुढे डॉ. बाबासाहेब यांनी आपल्या समाजरचनेच्या संदर्भात तिचा विस्तार केला.

थॉमस पेन यांनी 1776 साली 'कॉमन सेन्स' या नावाने 48 पानांची पुस्तिका प्रकाशित केली. सर्वाधिक खप असलेली ही पुस्तिका अशी आजही तिची गणना केली जाते. या पुस्तिकेत त्यांनी अमेरिकन स्वातंत्र्ययुध्दाची सैध्दान्तिक भूमिका मांडली. जिचा पुढे विस्तार अमेरिकेच्या राज्यघटनेत झालेला आपल्याला दिसतो. पुस्तिका जेव्हा प्रकाशित झाली, तेव्हा पुस्तिकेवर थॉमस पेन यांचे नाव नव्हते. नाव टाकले असते तर इंग्रजांनी त्यांना पकडले असते, त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला असता आणि त्यांना एकतर फासावर चढविले असते किंवा दीर्घ मुदतीची तुरुंगवासाची शिक्षा दिली असती. त्या काळात या पुस्तिकेच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या निघाल्या आणि अमेरिकन तरुण, राजनेते, समाजनेते, स्वातंत्र्याच्या विचाराने भारावून युध्दात उतरले.

या पुस्तिकेत एकूण चार भाग आहेत. पहिल्या भागामध्ये थॉमस पेन यांनी राजेशाही आणि घराणेशाही समाजात कशी निर्माण झाली, याचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. तो मुख्यत: बायबलमध्ये आलेल्या कथांच्या आधारे आणि इंग्लंडच्या इतिहासाच्या आधारे त्यांनी मांडलेला आहे. परमेश्वराने माणसाला दुसऱ्यावर राज्य करण्यासाठी घडविलेले नाही. 'देवाचे राज्य आपल्यावर राहील' ही कल्पना पेन यांनी मांडली. या राज्यात सर्व आनंदात असतील, कुणी कुणाचा चाकर राहणार नाही, समता असेल वगैरे सर्व संकल्पना त्यांनी विशद केल्या. त्यात ते म्हणतात, ''मूलभूतरित्या सर्व माणसे समान असल्यामुळे कुणालाही जन्माने आपल्या परिवाराचे राज्य निरंतरपणे दुसऱ्यावर लादण्याचा अधिकार नाही.'' पुढे जेफरर्सन याने अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिताना हेच वाक्य म्हटले, ''ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल.'' जेफरर्सनचे हे वाक्य जगभराच्या समता चळवळीचे घोषवाक्य झालेले आहे.

राजेशाही ही अत्यंत घाणेरडी संकल्पना असून, राजा म्हणेल तो कायदा आणि बाकीच्यांनी त्याचे मुकाटपणे पालन करायचे ही स्थिती योग्य नाही, असे पेन यांनी जोरदार भाषेत मांडले. घराणेशाहीसंबंधी त्यांची मते अशी आहेत - ''ज्या लोकांना असे वाटते की आपला जन्म दुसऱ्यांवर राज्य करण्यासाठीच झालेला आहे आणि बाकीच्यांनी आपल्या आज्ञेचेच पालन केले पाहिजे, अशी माणसे उर्मट होतात, आपण कोणीतरी मोठे आहोत या विषारी विचाराने त्यांचे मन भरून जाते आणि ज्या जगात ते जगत असतात, त्या जगाच्या व्यवहारापेक्षा ते अत्यंत वेगळे वागतात. या जगाचे हितसंबंध कशात आहेत, हे जाणून घेण्याची संधी त्यांना मिळत नाहीत आणि अशी माणसे जेव्ही वंशपरंपरेने सत्तेवर येतात, तेव्हा ती घोर अज्ञानी तर असतातच, परंतु राज्य करण्यात पूर्णपणे नालायक असतात.''

लोकमान्य टिळक यांचे 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे' हे वाक्य आपल्या सर्वांना माहीत आहे. 1775 साली थॉमस पेन आपल्या पुस्तिकेत म्हणतात, ''A government of our own is our natural right.'' आपले सरकार बनविण्यासाठी आपण आपली राज्यघटना तयार केली पाहिजे. तेरा वसाहतींनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी ऐक्य केले पाहिजे आणि सर्वांनी मिळून आपले राज्य कसे असेल, कसे चालेल, आपली संसद कशी असली पाहिजे, या संसदेत प्रतिनिधींची निवड कशी केली पाहिजे, इत्यादी विषयांची सैध्दान्तिक चर्चा थॉमस पेन यांनी केली. पेन आम्हाला अक्कल शिकविणारा कोण? असे त्या वेळच्या राजकीय नेत्यांना, कायदेपंडितांना वाटले नाही. 1777 साली जेव्हा तेरा राज्याचे प्रतिनिधी अमेरिकेची राज्यघटना बनविण्यासाठी फिलाडेल्फिया येथे बसले, तेव्हा त्यांनी थॉमस पेन यांच्या अनेक सूचना राज्यघटनेच्या कलमात आणलेल्या आहेत, म्हणून पेन यांची 48 पानांची पुस्तिका अमेरिकेच्या राज्यघटनेचा आधारभूत दस्तावेज झालेला दिसतो.

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुध्द चालू असताना वेगवेगळया प्रकारचे विचारप्रवाह त्या वेळेला होते. एक विचारप्रवाह होता की, युध्द करण्याऐवजी आपण इंग्लंडशी समझौता केला पाहिजे, त्यात आपला फायदा आहे. आपण सैनिकी सामर्थ्याच्या दृष्टीने, नाविक दलाच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने दुर्बळ आहोत. आपल्यात म्हणावी तशी एकीदेखील नाही. इंग्लडऐवजी दुसऱ्या कुठल्या युरोपीय महासत्तेने आपल्यावर आक्रमण केल्यास त्यांच्यापुढे आपला टिकाव लागणार नाही. युध्द नको, असा म्हणणारा एक मोठा गट होता. त्यांचा सर्व युक्तिवाद खोडून काढताना थॉमस पेन म्हणतो, ''समझौता हवा असे कोण म्हणतात? ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, ते समझौत्याची भाषा करतात म्हणून ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. दुसरे जे दुर्बळ आहेत, त्यांना काही समजतच नाही, तिसरे जे पूर्वग्रहदूषित आहेत, ते पाहण्याचेच नाकारतात आणि चौथे मवाळ जे युरोपकडे तो जसा नाही त्या दृष्टीने बघतात आणि शेवटच्या वर्गात चुकीच्या पध्दतीने विश्लेषण करणाऱ्या लोकांचा समावेश होतो. हा शेवटचा गट आपल्या देशावर पहिल्या चार गटांपेक्षा अधिक संकट आणणारा ठरू शकतो.'' थॉमस पेनचे हे विश्लेषण वाचत असताना अनेक बाबतीत आजच्या भारतीय परिस्थितीशी ते कसे तंतोतंत लागू पडते, हे जाणवू लागते.

इंग्लंडच्या जोखडातून अमेरिका मुक्त झाल्यास तिची स्वतंत्र ओळख निर्माण होईल. अमेरिकेची अंगभूत क्षमता इंग्लडपेक्षाही मोठे होण्याची आहे. 1775 साली इंग्लंड ही जगातील एकमेव महासत्ता होती. इंग्लंडचे आरमार हे त्याचे कारण होते. या इंग्लंडच्या आरमाराशी टक्कर देईल असे आरमार अमेरिका उभे करू शकेल. तेव्हा जहाजे बांधण्यासाठी लाकडांचा उपयोग केला जात असे आणि अमेरिकेत त्याची कमतरता नव्हती. इंग्लंडचे आरमार आपले रक्षण करील या भ्रमात राहण्याचे काही कारण नाही.

थॉमस पेन याच्या लिखाणाने अमेरिकन स्वातंत्र्ययुध्दाला फार मोठा वैचारिक आशय मिळाला. थॉमस पेन यांच्या लिखाणाची शैली समजावून सांगण्याची आहे, उपदेश करण्याची नाही. जे मांडायचे आहे त्याला आवश्यक ते पुरावे, वस्तुस्थितीचे दाखले आणि काही ठिकाणी थोडीशी आकडेवारी त्याने दिली आहे. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुध्द हे राजकीय स्वातंत्र्यासाठी लढले गेले नाही, तो तर त्याचा भाग होताच; परंतु ते 'वॉर फॉर ऍन आयडिया' - म्हणजे सिध्दान्तासाठी युध्द होते. यामुळे युध्दसमाप्तीनंतर आम्ही स्वतंत्र झालो, म्हणजे काय? आमचे लक्ष्य कोणते? मानवजातीला आम्हाला काय देता येईल? हा विचार प्रारंभापासूनच अमेरिकेपुढे राहिला आणि या सिध्दान्तावर अमेरिकेने वाटचाल केली. आपल्या देशातही स्वातंत्र्यलढयाला सैध्दान्तिक पाया देण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले आणि महात्मा गांधी यांनी 'हिंद स्वराज्य' या पुस्तिकेतून केले. स्वातंत्र्यानंतर पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून पुन्हा हेच काम केले. प्रश्न फक्त एवढाच उभा राहतो की, अमेरिकेतील सर्वसामान्य माणसापासून ते राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी स्वातंत्र्याचा ध्येयवाद पचविला. आपण काय केले?.......?

vivekedit@gmail.com