बाहेरच्यापेक्षा आतच सुरक्षित...

विवेक मराठी    14-Dec-2016
Total Views |

''मावशी, बाहेरच्यापेक्षा आतच किती सुरक्षित असतं, नाही?'' तिने उच्चारलेलं ते वाक्य केवळ तिच्या संदर्भात नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल बोलत होतं, पण माझं मन मात्र क्षणात कितीतरी प्रसंगांच्या, घटनांच्या प्रदेशात प्रवास करून आलं. मुंबईसारख्या महानगरीत प्रत्येक नागरिकाला रोज कोणत्या ना कोणत्या अघटिताशी सामना करावा लागतो. घरातली जाणती माणसं म्हणतातही - मुंबईचा चाकरमानी सकाळी बाहेर पडून संध्याकाळी...रात्री घरी सुखरूप परतला की सुटकेचा श्वास सोडायचा! खरंच आहे हे...


मची आनंदिता म्हणजे मूर्तिमंत उत्साह! तिच्यापुढे काही कल्पना व्यक्त करायचाच अवकाश, की लगेच त्या कल्पनेचं साल आणि साल सोलून ती कल्पना प्रत्यक्षात आल्यावर कशी दिसेल त्यावर विचार आणि प्रत्यक्ष कृती लगेच सुरू व्हायची! या मुलीला मी तिच्या वयाच्या दहाव्या वर्षापासून पाहतेय, जवळून पाहतेय आणि आता सुमारे 15 वर्षानंतर तिला खूपच अधिक ओळखायला लागलेय. आनंदिता आहे खूपच बडबडी! वरकरणी पाहता एकदम छान, प्रसन्न... काहीशी Happy Go Luckyही वाटेल, पण तिच्या मनाच्या आत सतत काहीतरी शोधकाम सुरू असतं. प्रत्येक गोष्टीबद्दल तिचे म्हणून काही विचार असतात, आणि त्या विचारांचा मागोवा तिच्या पध्दतीने ती घेत असते.

अगदी गेल्याच आठवडयातली गोष्ट! आनंदिता, मी आणि प्रेक्षा काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार होतो, काही गोष्टी नीट लिहून काढायच्या होत्या, काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे होते. आम्ही प्रेक्षाची वाट बघत होतो. दुपारी 4ची वेळ ठरली होती. 4.30 वाजले. मी हळूहळू अस्वस्थ व्हायला लागले. 5 वाजून गेले, तसा रागही यायला लागला मला. कामही महत्त्वाचं होतं आणि प्रेक्षा आल्याशिवाय ते नीट मार्गी लागणारही नव्हतं. ''येईल अगं ती मावशी. लांबून येते खूप! जरा वाट बघू या. नाहीतर पुन्हा भेटू आपण!'' ''कधी ते?'' मी चिडून म्हणाले. इतक्यात बेल वाजली. ''आली'' असं म्हणून आनंदिता दार उघडायला धावली. दार उघडताच प्रेक्षा तीरासारखी आत घुसली आणि तिने धावत येऊन मला घट्ट मिठी मारली. ती जोरजोरात रडत होती. मी तर हबकूनच गेले. माझ्या मनातल्या रागाने दडी मारली कुठेतरी आणि एका क्षणात माझं मन भयकंपित झालं. त्या मुलीच्या विलक्षण काळजीने मी धास्तावले. आम्ही तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. खुर्चीवर बसवलं. आनंदिताने धावत जाऊन पाणी आणलं. मी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिले.

काही वेळाने शांत झाल्यावर प्रेक्षा म्हणाली, ''माझी खूप वाट पाहिली असेल ना तुम्ही? पण अगं काय करू? सगळया ट्रेन्स लेट! स्टेशनवर इतकी गर्दी होती! आलेली पहिली ट्रेन पकडली. लेडीज डब्यातसुध्दा मरणाची गर्दी! आणि बायका इतक्या पॅनिक झालेल्या असतात अगं! ढकलतात काय, बोचकारतात काय, पायावर पाय काय देतात! एक तास हा छळ! बरं, दादरला उतरले, तर पुन्हा ही गर्दी! अक्षरश: मुंग्यांसारखी माणसं....ईऽऽ, किती घाणेरडी, किळसवाणी, ओंगळ असतात गं माणसं! त्या लोंढयातून मी कशी इथे पोहोचले ते माझं मला माहीत!'' आणि प्रेक्षा परत मुसमुसायला लागली. कोणाला काही बोलावंसं वाटतच नव्हतं काही वेळ. ''अगं, पण आज का आहे एवढी गर्दी? आणि रस्त्यावरसुध्दा..'' मी हळूच विचारलं. ''आज कसली तरी सभा आणि मोर्चा आहे म्हणे!'' प्रेक्षा म्हणाली.

आमच्या मिटिंगचा उत्साह मावळलाच होता. आनंदिता अचानक म्हणाली, ''मावशी, बाहेरच्यापेक्षा आतच किती सुरक्षित असतं, नाही?'' मी तिच्या या वाक्याने विचारात पडले. तिने उच्चारलेलं ते वाक्य केवळ तिच्या संदर्भात नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल बोलत होतं, पण माझं मन मात्र क्षणात कितीतरी प्रसंगांच्या, घटनांच्या प्रदेशात प्रवास करून आलं. मुंबईसारख्या महानगरीत प्रत्येक नागरिकाला रोज कोणत्या ना कोणत्या अघटिताशी सामना करावा लागतो. घरातली जाणती माणसं म्हणतातही - मुंबईचा चाकरमानी सकाळी बाहेर पडून संध्याकाळी...रात्री घरी सुखरूप परतला की सुटकेचा श्वास सोडायचा! खरंच आहे हे... रोज एक नवा अडथळा म्हणा, संकट म्हणा किंवा मुंबईकरांच्याच सुपीक मेंदूतून जन्मलेली मोर्चा, मिरवणूक, जत्रा यांच्यासारखी आयडिया म्हणा! माणूस फसलाच म्हणून समजा. कधी ट्रॅफिक जॅम... मग तो रस्त्यातल्या खड्डयांमुळे असेल, किंवा एखादाच भलामोठ्ठा ट्रक रस्त्यात फतकल मारून बसल्यामुळे असेल किंवा 'रास्ता रोको' वगैरे कल्पनांमुळे असेल, मग तो बसमधला असो, टॅक्सीतला असो की गाडीतला - काही तास अजिबात न हलता तिथेच बसून असतो. पेशन्स म्हणजे काय, ते माणूस मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये खऱ्या अर्थाने शिकतो.

मुंबईत काय किंवा मोठया शहरांत काय, विविध गावांतल्या, प्रांतांतल्या लोकांचे लोंढे येत असतात. ही महाकाय शहरं आपल्या पोटात त्यांना सामावून घेतात खरी, पण इथे टिकून राहण्यासाठी लहानसहान कामांपासून ते चोरी, उचलेगिरी, बनवाबनवी, फसवणूक ते अगदी भीक मागण्यापर्यंत काहीही करण्याची वेळ या लोकांवर येते. एक प्रकारे आपली गावं, पाडे, प्रांत सोडून आलेली ही माणसं 'आतून' बाहेर आलेलीच असतात, नाही? कधीकधी स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी ही माणसं त्या शहरातल्या सामान्य माणसालाच असुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करतात.

तुमचं जे एक सामाजिक वर्तुळ असतं, त्याच्या आत तुम्ही सुरक्षित असता. पण तुम्हाला ते वर्तुळ भेदणं भाग असतं. अगदी साधी गोष्ट... सायकल न येणाऱ्याने सायकल चालवायला शिकणं म्हणजे सुरक्षिततेकडून असुरक्षिततेकडे जाणं. जे जे नवं आहे, ते ते मिळवण्याची इच्छा म्हणजे 'आतून' बाहेर जाणं. जितकी अधिक वर्तुळं एखादा माणूस भेदेल, तितका तो अधिक असुरक्षित होत जातो. श्रम, बेकारी, फसवणूक, लोकापवाद या गोष्टींना त्याला तोंड द्यावं लागतं. पण वर्तुळं भेदण्याची ही नशा त्याला खूप काही देतेही! तसा प्रत्येकच माणूस रिस्क घेऊन आयुष्य जगतो. 'आतून बाहेरचा' प्रवास आधी टिकून राहण्यास आवश्यक, परंतु हळूहळू कष्टप्रद असला, तरी त्यातून मिळणाऱ्या लाभांमुळे कठीण असला, तरी आनंददायी वाटू लागतो, अपरिहार्यही असतोच तो!

अचानक मनात आलं, 'आतून बाहेर' जाणारी अनेक महाद्वारं आहेत. एक महाद्वार उजवीकडचं, दुसरं डावीकडचं, तिसरं इकडचं, चौथं तिकडचं, अशीच आणखी काही द्वारं! अपरिहार्य वर्तुळं भेदून झाल्यानंतर एका वर्तुळातून बाहेर पडणारी माणसं अनेक अभेद्य वर्तुळं भेदून नवी आव्हानं स्वीकारतात. जितकी रिस्क जास्त, तितकं ते वर्तुळ त्यांना खुणावत राहतं. दुसऱ्या एखाद्या महाद्वारातून बाहेर पडणारी कित्येक माणसं अपरिहार्य असुरक्षितता मान्य करून सर्वसामान्य आयुष्य जगतात, तर आणखी एखाद्या डाव्या द्वारातून बाहेर पडणारी माणसं खऱ्या अर्थाने वाममार्गाला लागतात.

गेल्याच आठवडयात कळलं की माझ्या एका विद्यार्थिनीला मुलगी झाली आहे. आम्ही दोघी-तिघी जणी तिला भेटायला गेलो होतो. 15 दिवसांची तिची छोटुकली एखाद्या बंद पाकिटात ठेवावी तशी मऊ  दुपट्टयात घट्ट गुंडाळून ठेवली होती. माझ्या बरोबर आलेली एक मुलगी म्हणाली, ''ए, का रे त्या बाळाला इतकं घट्ट गुंडाळून ठेवलंय? त्याला नसेल का हात-पाय हलवावेसे वाटत? खेळावंसं, मोकळं व्हावंसं वाटत?'' ''अगं, खूप छोटं आहे ते! त्याला अशीच तर सवय आहे गेल्या नऊ  महिन्यांची! आईच्या पोटात होतं ना ते? असं गुंडाळलं की ऊबदार, सुरक्षित वाटतं नवजात बाळाला!'' त्या बाळाची आजी म्हणाली.

अचानक पुन्हा एकदा आनंदिताचे ते शब्द मनात चमकून गेले, 'बाहेरच्यापेक्षा आतच किती सुरक्षित असतं, नाही?'

 9594962586