मराठवाडयात सकारतो आहे ड्रायपोर्ट प्रकल्प

विवेक मराठी    15-Dec-2016
Total Views |

औरंगाबाद, जालना आणि त्यालाच जोडलेल्या मराठवाडा आणि लगतच्या बुलढाणा जिल्ह्यातील उद्योग, शेती उत्पादनांच्या मालाचे थेट निर्यात आणि आयात केंद्र ड्रायपोर्ट हे विशेष रेल्वेच्या मार्गाने थेट मुंबई येथील जेएनपीटी बंदरासोबत जोडले जात आहे. यासाठी इंडियन पोर्ट रेल कार्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) या कंपनीच्या माध्यमातून रेल्वेच्या थेट कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. रेल्वे व जलवाहतूक मंत्रालयाच्या एकत्रित समभाग असलेल्या या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण मार्गाची पाहणी करून प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे.
राठवाडयाच्या संपूर्ण समृध्दीचा महामार्ग ठरणाऱ्या 'ड्रायपोर्ट' या प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर, पहिल्या टप्प्यातील सर्व प्रकारची  प्रस्तावित कामे रेकॉर्डब्रेक वेळेत पहिल्याच वर्षांत शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट - जेएनपीटी - या सागरी बंदराची मराठवाडयातील जमिनीवर निर्माण होत  असलेली ही एक अत्यंत अभिनव आणि नावीन्यपूर्ण  शाखा म्हणजे जालन्यातील ड्रायपोर्ट. केंद्रीय भू-जलपृष्ठ आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे या महाप्रकल्पाचे जनक असून या  संकल्पनेच्या वास्तवाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी कामाला अतिशय प्राधान्य दिले आहे. 

इमारती, मोठे रस्ते व उड्डाणपूल यांच्या बांधकामात महत्त्वाचे माध्यम असणाऱ्या लोखंडाच्या सळयांच्या उत्पादनांची आणि शेती बियाणांच्या उद्योगाची पंढरी, म्हणून प्रसिध्द असलेले जालना हे मराठवाडयातील भूमिपुत्र उद्योजकांचे शहर म्हणून विकसित होत आहे. व्यापार-उद्योगात  परंपरेचा वारसा आणि त्याला नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीची जोड आहे. या परिसरातील व्यापार आणि उद्योग मोठया प्रमाणात वाढत आहेत. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महत्त्वाकांक्षी डीएमआयसी (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर)ला जोडूनच 500 एकर जमिनीवर ड्रायपोर्टच्या उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे.  

मराठवाडयात गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसायाला मान्सूनच्या लहरीपणाचा मोठा फटका बसत आहे. कापूस, सोयाबीन व मका ही खरीपाची मुख्य पिके आहेत. चांगले उत्पादन झाल्यानंतरही शेती उत्पादनांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळेच आज मराठवाडयातील शेती आणि शेतकरी कायम संकटात सापडलेल्या अवस्थेत आहेत. या भागातून या सर्व कृषी उत्पादनांच्या प्रक्रिया उद्योगवाढीसाठी ठोस पावले उचलण्याच्या सातत्याने मागण्या करण्यात येत असतात. याचसोबत मराठवाडयात वेगवान दळणवळणाच्या साधनांची खूप मोठी गरज आहे. माफक दरात कृषी उत्पादनांची जलद वाहतूक व्यवस्था झाल्यासच मराठवाडयाच्या पाचवीला पूजलेल्या दारिद्रयाच्या अभिशापापासून मुक्ती मिळेल, ही वस्तुस्थिती आहे.

औरंगाबाद, जालना आणि त्यालाच जोडलेल्या मराठवाडा आणि लगतच्या बुलढाणा जिल्ह्यातील उद्योग, शेती उत्पादनांच्या मालाचे थेट निर्यात आणि आयात केंद्र ड्रायपोर्ट हे विशेष रेल्वेच्या मार्गाने थेट मुंबई येथील जेएनपीटी बंदरासोबत जोडले जात आहे. यासाठी इंडियन पोर्ट रेल कार्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) या कंपनीच्या माध्यमातून रेल्वेच्या थेट कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. रेल्वे व जलवाहतूक मंत्रालयाच्या एकत्रित समभाग असलेल्या या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण मार्गाची पाहणी करून प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. याच कंपनीच्या माध्यमातून इंदोर ते मनमाड हा विशेष रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. यातून माल वाहतुकीचे अंतर साधारणपणे 200 कि.मी.ने कमी होईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

ड्रायपोर्टचा पहिला टप्पा...

आर्थिक तरतूद 500 कोटी रुपये.

जालना ते संभाजीनगर (औरंगाबाद) रेल्वेच्या  मार्गावर बदनापूर तालुक्यात जवसगाव व दरेगाव या गावातील 500 एकर सरकारी गायरान जमीन महाराष्ट्र सरकारने जेएनपीटीला नाममात्र शासकीय दराने प्रत्यक्ष हस्तांतरित केली आहे. या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 25 डिसेंबर 2015 रोजी भूमिपूजन झाले आहे.

ड्रायपोर्टचा प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला आहे. यात कस्टम कार्यालय, कृषी उत्पादनांच्या मालाची निर्यात करण्यासाठी विशेष सुविधा केंद्र, वेअर हाउस, कोल्ड स्टोअरेज, लिक्विड स्टोअरेज, रेल्वे ट्रान्झिट यार्ड, वजन मापक यंत्रणा व प्रोसेसिंग युनिट उभारणी करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, या ड्रायपोर्टच्या अंतर्गत इंडस्टि्रअल पार्कसाठी 150 एकर जमीन स्वतंत्रपणे आरक्षित करून, त्यावर पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून मराठवाडयातून जगातील विविध देशांना आपली उत्पादनांची निर्यात करणाऱ्या कंपन्यांसोबत जेएनपीटीने एमओयू सामंजस्य करार पूर्ण केले आहेत. यात महिको, विनोदराय इंजीनिअर्स, अभय ऑॅईल मिल यांसह अनेक प्रतिष्ठित कंपन्या आपले उद्योग याच ड्रायपोर्टच्या आतील बाजूस असलेल्या विशेष औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यास  मोठया प्रमाणात उत्सुक आहेत. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ड्रायपोर्टच्याअंतर्गत इंडस्टि्रअल पार्क हा कस्टम फ्री भाग असतो, याचा सर्वाधिक चांगला फायदा उत्पादन करणाऱ्या कारखानदारांना होणार आहे.

याचसोबत मराठवाडयातील कापूस, सोयाबीन व मका यांच्या विदेशातील थेट निर्यातीची सोय.

मराठवाडयातून मुंबईच्या जेएनपीटी बंदरात रस्त्याद्वारे आज रोजी किमान एक हजार ट्रकची रस्ते वाहतूक कोंडी थांबेल. या सर्व वाहतुकीला लागणारे डिझेल वाचेल आणि याच ट्रकमधून बाहेर पडणारा कार्बन डायऑॅक्साईड थांबवून 'कार्बन क्रेडिट' मिळवून देणारा हा महाप्रकल्प आहे.

संपूर्ण ड्रायपोर्टच्या जमिनीला कुंपण घालण्यासाठी कंपाउंड वॉल उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. जमीन सपाटीकरण करण्यात येत आहे. दर महिन्याला जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिगीकर, संचालक प्रसिध्द उद्योगपती राम भोगले व विवेक देशपांडे हे जालन्यात सुरुवातीपासून आढावा घेत आहेत.

अशी झाली सुरुवात....

जालन्यातील लोखंड उत्पादन करणाऱ्या काही कारखानदारांना लोखंडाच्या कच्च्या मालाची विदेशातून आयात करण्यासाठी नेहमीच मुंबईतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर आणण्याचे काम पडते. जेएनपीटीमधील प्रचंड गर्दीमुळे कस्टम क्लिअरन्समध्ये खूपच वेळ जातो आहे, यावर उपाय शोधण्यासाठी औरंगाबादजवळच्या माळीवाडा या ठिकाणी कस्टम क्लिअरन्स देण्याची मागणी करणारे एक निवेदन जालना व औरंगाबादच्या उद्योजकांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या, वर्तमान भाजपा प्रदेशाध्यक्ष  खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर पहिल्याच महिन्यात केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना दिले. याच भेटीत या शिष्टमंडळाला गडकरी यांनी ''माळीवाडयाला कस्टम क्लिअरन्स काय मागता? आपण जालन्यात एक ड्रायपोर्ट उभारू'' असे आश्वासन दिले. ड्रायपोर्ट ही काय भानगड आहे? हे तोपर्यंत कुणालाच काही माहीत नव्हते.  हे नावदेखील कुणी ऐकले नव्हते. त्यानंतर नितीन गडकरी यांनी ड्रायपोर्टची संकल्पना सर्वांना स्वत: समजावून सांगितली.

जालना, औरंगाबाद होणार मुंबई...

समुद्रकिनारा आणि त्यात नैसर्गिक बंदर. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन व्यापार करणारी जहाजे त्या शहराच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत करणाऱ्या व्यवस्थांपैकी एक आहेत. भारतातील नैसर्गिक बंदराची असलेली शहरे अतिशय झपाटयाने विकसित झाली, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे समुद्रमार्गे सहजपणे दळणवळण व्यापार करण्याची तेथील  उपलब्धता. जालना आणि मराठवाडा आता याच सहजतेने मुंबईतील जेएनपीटीसोबत जोडले जात आहेत. जणू काही मुंबईचे जेएनपीटी बंदर जालन्यात येत आहे. या प्रकल्पाचा सर्वाधिक मोठा फायदा म्हणजे बंदरातून होणाऱ्या सर्वसाधारण व्यापार-उद्योगाच्या अनुषंगाने अनेक छोटे छोटे उद्योग या भागात मोठया प्रमाणात उभे राहणार आहेत. यात प्रामुख्याने कस्टम सेवा देणाऱ्या कंपन्या, लॉजिंग-बोर्डिंग, ट्रक वाहतूक ट्रान्सपोर्टचा धंदा असे अनेक व्यवसाय उभे राहतील आणि यातूनच विशाल समृध्दीचा एक महामार्ग विकसित होईल असे चित्र स्पष्ट दिसत आहे.

9423731480