झारीतील शुक्राचार्य

विवेक मराठी    17-Dec-2016
Total Views |

माजहिताचा, राष्ट्रहिताचा कोणताही निर्णय हा तो निर्णय घोषित करणाऱ्या सरकारचा नसतो, तर संपूर्ण देशवासीयांचा असतो आणि त्या निर्णयाच्या पाठीशी संपूर्ण देश उभा राहत असतो. आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी प्रस्थापित भारतीय अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणणारा क्रांतिकारक निर्णय घेतला आणि त्याच दिवसापासून जनता या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. या निर्णयानंतर पुढील काही दिवस-महिने आपल्याला खडतर जीवनाचा अनुभव घ्यावा लागणार आहे, हे माहीत असतानाही जनतेने कोणतीही खळबळ न करता या निर्णयाचे स्वागत केले. कोणताही बदल तत्काळ होत नाही, त्यासाठी काहीतरी सहन करावे लागते, हे जनतेला चंागल्या प्रकारे समजते. नोटबंदीचा विषय घेऊन विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमातील काही तथाकथित पंडित यांनी जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. नोटबंदीच्या आधाराने जनतेला भडकवून देशात अराजक निर्माण करण्याचा त्यांचा डाव जनतेने हाणून पाडला आहे. पंतप्रधानांनी ज्या धाडसाने नोटबंदीचा निर्णय घेतला, त्याला विरोध करून अपशकून करण्यात या मंडळींना स्वारस्य होते, हेही जनतेने ओळखले होते. त्यामुळे हरतऱ्हेने प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही.
नोटबंदीनंतर ज्याच्याकडे काळा पैसा आहे, तो उघड करण्याची संधी सरकारने दिली. त्याचप्रमाणे देशभरात होणाऱ्या आर्थिक घडामोडींवर नजर ठेवण्याचे आणि काही अनुचित प्रकार लक्षात आल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार देशभरात काही ठिकाणी कारवाई झाल्याचे समोर आले आहेच. महाराष्ट्राचा विचार करता जिल्हा मध्यवर्ती बँकांना 8 नोव्हेंबरनंतर आर्थिक व्यवहारापासून अलिप्त ठेवण्याचा निर्णय झाला होता, त्याला काही राजकीय आणि सामाजिक कारणे होती. महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण, असे चित्र गेली काही वर्षे समोर येत होते. अनेक बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नेमले गेले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांना नोटबदली करण्याच्या कामातून वगळले होते. त्याचा ग्रामीण भागात खूप मोठा परिणाम दिसून आला. ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी नुकतीच जिल्हा बँकांना व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे. पंतप्रधानांनी मागितलेली पन्नास दिवसांची मुदत संपायला आता काहीच दिवस बाकी असताना जे समाजवास्तव समोर येते आहे, ते पाहिल्यावर लक्षात येते की खूप मोठया प्रमाणात त्रास होत असतानाही जनता निर्णयाच्या बाजूने उभी आहे. रांगा लावून हाती येणाऱ्या तुटपुंज्या रकमेत आपले व्यवहार करत आहेत. आणि हे व्यवहार एकमेकांच्या विश्वासावर उभे आहेत. अनेक छोटे छोटे व्यावसायिक, दुकानदार 'कॅशलेश' व्यवहाराचा अंगीकार करू लागले आहेत. दैनंदिन जीवनातील खूप छोटया रकमेचे व्यवहार आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत आहेत. जनतेने हा निर्णय केवळ स्वीकारला नाही, तर आपल्या जगण्यात आणला आहे, यांचे हे संकेत आहेत. 

पंतप्रधानांनी क्रांतिकारक निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाला प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वात अधिक कष्ट करणारा समाजघटक म्हणजे बँक कर्मचारी होय. नियमित कामाच्या वेळापेक्षाही अधिक वेळ या बांधवांनी काम करून समाजाने स्वीकारलेला हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी आपला सक्रिय सहभाग दिला आहे. यासाठी सर्वच बँक कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. पण काही मंडळींनी मात्र बँक कर्मचाऱ्यांच्या कष्टावर आपल्या कुकृत्याने पाणी फिरवले आहे. धनदांडग्यांशी संगनमत करून त्यांनी दोन हजाराच्या नव्या नोटांची मोठया प्रमाणात हेराफेरी केली आहे. गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी छापे टाकून पकडल्या गेलेल्या रकमेत नव्या नोटा सापडत आहेत, त्याला हेच झारीतील शुक्राचार्य कारणीभूत आहेत. अशा मूठभर लोकांच्या करणीमुळे काही धनवानांचे उखळ पांढरे होते आहे. एका बाजूला जनता त्रास होत असतानाही सरकारने घेतलेला निर्णय देशहिताचा आहे म्हणून रांगेत उभे राहून मिळणाऱ्या रकमेवर आपला प्रपंच चालवत आहे आणि दुसऱ्या बाजूला बँकिंग क्षेत्रातील काही गणंग धनवानांशी हातमिळवणी करून सरकारच्या निर्णयाशी प्रतारणा करत आहेत. गेले चाळीस दिवस शांतपणे, समाजात कसल्याही प्रकारचा उद्रेक होणार नाही, याची काळजी घेत असंख्य बँक कर्मचारी काम करत आहेत. आपला त्रास बाजूला ठेवून ते सरकारचा निर्णय यशस्वी करू पाहत आहेत. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम मूठभर स्वार्थी लोकांनी केले आहे. अशा राष्ट्रविरोधी कृत्याबद्दल कठोर शिक्षेस सामोरे जाण्याशिवाय त्यांच्याकडे आता पर्याय नसणार आहे. आणि ज्यांनी अशा प्रकारे मोठया प्रमाणात नोटांची हेराफेरी केली, त्यांनाही पुढील काळात कठोर निर्णयाचा सामना करावाच लागेल. त्यांनी सरकारला आणि जनतेला अंधारात ठेवून अशा प्रकारची कृत्ये करण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी विजय सत्याचाच होत असतो. त्यामुळे नव्या नोटांच्या हेराफेरीच्या घटना उघड झाल्यावर त्याचा समाजमनावर थोडाफार परिणाम जाणवला, तरी या क्षणीही जनता सरकारच्या निर्णयाच्या पाठीशीच आहे, असे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय हा देशहिताचा आहे हे जनतेने मनोमन स्वीकारलेले आहे आणि ती त्यावर ठाम आहे. पण हा निर्णय अयशस्वी ठरणे हेच ज्यांच्यासाठी इष्टापत्ती आहे, अशा विरोधी पक्षांनी, सरकारविरोधी-राष्ट्रविरोधी प्रसारमाध्यमांनी आणि काळया पैशाच्या रूपाने ज्यांचा हात दगडाखाली अडकला आहे अशांनी मिळून कोल्हेकुई सुरू केली आहे. पंतप्रधानांचा निर्णय चुकीचा असल्यापासून ते नियोजनाचा अभाव आहे येथपर्यंत आणि हा निर्णय गरिबांना उद्ध्वस्त करणारा आहे येथपासून ते रांगांमध्ये गरीब लोक मरत आहेत असे नकारात्मक भाव ते सातत्याने प्रकट करत आहेत. विरोधी पक्ष, तथाकथित माध्यमे आणि त्यातील बोलके पंडित, धनदांडगे आणि बँकांतील त्याचे हस्तक यांच्या अभद्र युतीमुळे नोटबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण होत आहे हे जरी खरे असले, तरी अशा झारीतील शुक्राचार्यांना जनता भुलणार नाही. कारण तिने मनापासून पंतप्रधानांचा निर्णय स्वीकारला आहे, तो निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठीच जनता आजही रांगेत उभी आहे.