पर्यटनाच्या निर्भेळ आनंदासाठी कृषी पर्यटन

विवेक मराठी    20-Dec-2016
Total Views |

निसर्गाचा मुक्त आस्वाद घेणाऱ्या अनेक पर्यटकांचा ओढा आता शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या शेतांकडे वळला आहे. अनेक शेतकऱ्यांनीदेखील त्या दृष्टीने शेतांना रूपडे दिले आहे. एखादा सुट्टीचा दिवस काढून कृषिसंस्कृतीच्या सान्निध्यात तो घालविण्याची संधी अनेक जण पटकावतात. कृषी पर्यटनाचा पहिलावहिला पुरस्कार पटकावणारे केंद्र जळगावातले आहे. गिरणा नदीच्या काठावर सावखेडा शिवारात 'आर्यन पार्क' साकारले आहे. रेखा महाजन यांनी अतिशय देखणे असे हे कृषी पर्यटन केंद्र उभे केले आहे.
हरातली चमक गाव सोडायला भाग पाडत असली, तरी मन पुन:पुन्हा गावाकडेच ओढ घेते. मजल्यांवर चढत जाणाऱ्या मजल्यांमुळे शहरातून माती नि तिच्या सान्निध्यात वाढणारी हिरवळ नष्ट झाली, लोक वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे शांततेला पारखे झाले. दिवसा ऐसपैस रस्त्यांवरून धावणाऱ्या नि रात्री फ्लॅटमध्ये बंदिस्त होणाऱ्या शिस्तबध्द नि 'साचले'बध्द जीवनाला कंटाळलेले शहरी लोक आता वीकेंड खाचखळग्यांच्या रस्त्याने, ओबडधोबड शेतशिवारात, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्याची संधी शोधू लागलेत. ह्या शहरी पाहुण्यांसाठी 'कृषी पर्यटन' ही संकल्पना रुजू लागली. ही मंडळी शेतकऱ्यांच्या शेताची भटकंती करतात, कृषी संस्कृतीचा, ग्रामीण जीवनाचा आनंद लुटतात नि शेतकरी त्यांचा मोबदला घेऊन आदरातिथ्य करतो.

कृषी नि ग्रामीण संस्कृतीला मिळाली व्यावसायिक जोड

अलीकडे जरी याला 'कृषी पर्यटन' हे नाव मिळाले असले, तरी शहरी पाहुण्याचे आपल्या शेतात आदरातिथ्य करण्याची आपली संस्कृतीच आहे. महाराष्ट्रातल्या विविधतापूर्ण पीकपध्दतीतूनही कृषी पर्यटनाचे सौंदर्य बहरले आहे. कोकणातल्या नारळ,पोफळी, सुपारी, फणस, आंब्याच्या बागा, नाशिकच्या द्राक्ष, डाळिंबाच्या बागा, पश्चिम महाराष्ट्रातली उसाची शेते, गुऱ्हाळे, मराठवाडयातली हिरवीगार ज्वारीची शेते, त्यातून हुरडयाला आलेली कणसे, खान्देशातल्या केळीच्या बागा, वांग्याच्या भरतासाठी खुणवणारे शेते, सातपुडयाच्या जंगलझाडीतील वनवासी संस्कृती, वऱ्हाडातल्या संत्रे-मोसंबीच्या बागा सहलीच्या आयोजनासाठी पोषक ठरल्या आहेत. त्याला पर्यटनाचे व्यावसायिक रूप अलीकडच्या कालखंडात देण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून व्यावसायिक पध्दतीने कृषी पर्यटनाची सुरुवात केली.

राज्यात अशी पर्यटन केंद्रे मोठया संख्येने विखुरलेली आहेत. ती संख्या सुमारे 300पेक्षा अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रात ती संख्या सर्वाधिक असून एकटया पुण्यात 40, तर साताऱ्यात 30पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र साकारली गेली आहेत. त्या तुलनेत अमरावती, नागपूर, खान्देश व मराठवाडयात ती संख्या अतिशय कमी आहे. 2008 मध्ये विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे अशा केंद्रांना संघटित रूप देण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाची ('मार्ट'ची) स्थापन झाली. सध्या बाळासाहेब बराटे संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेमुळे शासन दरबारी अशा केंद्रचालक शेतकऱ्यांना कृषी पर्यटन केंद्र कसे असावे यासाठी प्रशिक्षण देण्यात येऊ लागले. शासनाची त्यासाठी कशी मदत होऊ शकते, याबाबतचे मार्गदर्शन होऊ लागले.

मराठवाडयातला हुरडा नि जळगावातली भरीत पार्टी

कृषी पर्यटनासाठी हिवाळा हा अतिशय सुखद नि रम्य. जंगल शिवारातील हिरवे गवत आता सुकून सोनेरी होऊ लागते. सावलीत गेलात तर गारठा वाटतो नि उन्हात उभे राहिलात तर चटका लावणारे ऊन, असे वातावरण. मात्र थंडीचा कडाका वाढू लागला, गावरान ज्वारीची कणसे हुरडयावर आली की सुट्टीचा दिवस हेरून मराठवाडयात हुरडा पाटर्यांचे बेत आखले जातात. पूर्वी शेतात झाडाच्या सावलीला दुपारी अगर सायंकाळी मित्रमंडळी बसली की हुरडयावर आलेली कणसे खुडून भाजून खात बसत. कधीकधी मग आपल्याकडे आलेल्या शहरी पाव्हण्यासाठी शेतात हुरडा भाजण्याचा बेत आखला जायचा. पाहता पाहता हुरडयाच्या चवीला वलय प्राप्त होऊ लागले. अलीकडे हुरडा पार्टी हा रोजगार मिळवून देणारा उद्योग होऊन गेला आहे. अनेक शेतकरी तर या भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर तयार हुरडा विकायचा व्यवसायदेखील करतात.

हुरडा पार्टीत फक्त हुरडा भाजून खाणेच नसते, तर गावरान जेवणाची लज्जतदेखील अनुभवता येते. यात ज्वारी-बाजरीच्या चुल्ह्यावर भाजलेल्या भाकरी, मिरच्यांचा ठेचा, चटणी अगर खमंग, मसालेदार रश्श्याची कोणतीही भाजी असा बेत असतो. काही आयोजक दाल-बाटीचा बेतही आखतात. असे आयोजन करणारे अनेक ग्रूप आता तयार झाले आहेत.

हुरडा भाजून होत नाही, तोवर मंडळी त्या शेताचा फेरफटकाही मारतात. शेताच्या बांधावरच्या रानमेव्यांचा आस्वादही घेतात. त्यानंतर शेतात मोकळया जागी हुरडा भाजला जातो. गरम गरम हुरडयाची चव पक्वान्नांनाही लाजवते. शहरातल्या रुळलेल्या वाटेवरून कृषिसंस्कृतीत घालवलेला हा दिवस चांगलाच लक्षात राहतो.

हुरडयासारखेच भरीत पाटर्यांची चंगळ हिवाळयात खान्देशात असते. विशेषतः जळगावच्या आसपास भरीत पाटर्यांची रेलचेल असते. मोठया शहरापासून खेडयावर आडवाटेला एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर हा भरीत पार्टीचा बेत आखला जातो. अशा भरीत पाटर्यांसाठी जळगावजवळच आसोदा, शिरसोली, उमाळे परिसराचा लौकिक आहे. या गावांमध्ये स्वादिष्ट भरीत करणारे अनेक जण आहेत. एखाद्या शेतात विहिरीच्या उतरंडीवर भरीत करण्याची तयारी सुरू असते. तेवढया वेळात आलेली मंडळी शिवारात फिरून कृषीसंस्कृतीची माहिती करून घेतात. ह्या मोसमात काटेरी बोरींना गोड-आंबट बोरे लगडलेली असतात. मेहरूणची बोरे तशी अवीट गोडीसाठी प्रसिध्दच. त्याचाही आस्वाद मंडळी घेतात. भरीत आणि हुरडा पार्टी शेतशिवारातच होतात. ही अनेक वर्षे चालत आलेली कृषी पर्यटनाची परंपराच. याला आता अनेक ठिकाणी व्यवसायाचे स्वरूप मिळाल्यामुळे त्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेकांना रोजगार मिळू लागला आहे.

ऍग्रो टूरिझमची नवी संस्कृती

निसर्गाचा मुक्त आस्वाद घेणाऱ्या अनेक पर्यटकांचा ओढा आता शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या शेतांकडे वळला आहे. अनेक शेतकऱ्यांनीदेखील त्या दृष्टीने शेतांना रूपडे दिले आहे. एखादा सुट्टीचा दिवस काढून कृषिसंस्कृतीच्या सान्निध्यात तो घालविण्याची संधी अनेक जण पटकावतात. कृषी पर्यटनाचा पहिलावहिला पुरस्कार पटकावणारे केंद्र जळगावातले आहे. गिरणा नदीच्या काठावर सावखेडा शिवारात 'आर्यन पार्क' साकारले आहे. रेखा महाजन यांनी अतिशय देखणे असे हे कृषी पर्यटन केंद्र उभे केले आहे. येथे निवडक लोकांसाठी निवासाचीदेखील व्यवस्था असते. येथे येणाऱ्या शहरात वाढलेल्या परंतु ग्रामसंस्कृतीची माहिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी व ग्रामसंस्कृतीची माहिती व्हावी, यासाठीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. शिवारातून ट्रॅ्रक्टरवरून अगर बैलगाडीवरून फेरफटका मारता येतो. गप्पाटप्पा मारीत येथल्या खान्देशी भोजनाचा आस्वाद पर्यटक आवर्जून घेतात.


बच्चेमंडळीसाठी
'मामाचा गाव'

सुट्टयांमध्येही शिकवण्यांच्या दावणीला बांधलेल्या बच्चेमंडळींसाठी अलीकडे मामाच्या गावी जाऊन सुट्टीत हुंदडता येत नाही. शाळेच्या नि शिकवणीच्या वेळापत्रकाशी त्यांचे बालपण बांधून टाकण्यात आलेले असते. मामाच्या गावी जाण्याची त्यांची हौस आता 'मामाच्या गावाची' आठवण करून देणाऱ्या कृषी पर्यटन केंद्राला सहल आयोजित करून पालक पूर्ण करतात. अनेक पर्यटन केंद्रांना 'मामाचा गाव' असेच नाव देण्यात आले आहे. मामाच्या नात्यातला स्नेह येथे गेल्यावर जाणवल्याशिवाय राहत नाही. कोकणातले गुहागर तालुक्यातल्या मुंढेर गावाजवळचे समीर साळवी यांचे 'माझ्या मामाचं गाव' व पालघर जिल्ह्यातल्या बोइसरजवळ गुंदेलगाव येथील 'मामाचं गाव कृषी पर्यटन केंद्र' ह्यांचे उदाहरण देता येईल.

कृषी पर्यटनाला संधी

व्यग्र शहरी जीवनाला काही काळ निसर्गात जाऊन रममाण होण्याचे ठिकाण म्हणजे कृषी पर्यटन. शेती, शेतातली विविध पिके, पशुपक्षी हे कृषी पर्यटनाचे भाग असले, तरी त्याची पध्दतशीर रचना लावणेही गरजेचे असते. सध्या कार्यरत सर्व कृषी पर्यटन केंद्रांमध्ये अशी शिस्त लावण्यात आली आहे. ग्रामीण बाज असलेल्या राहुटया, बांबूंपासून तयार करण्यात आलेली घरे, बोटिंग, पशुपक्ष्यांचे अस्तित्व यामुळे कृषी पर्यटन केंद्र आकर्षण ठरू लागली आहेत.

अशी पर्यटन केंद्रे अर्थातच शहरापासून दूर ग्रामीण भागात उभी राहिली आहेत. त्यामुळे त्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराचे नवे साधन उभे राहिले आहे. प्रत्यक्ष शेतीतून येणाऱ्या उत्पन्नपेक्षा कितीक पट उत्पन्न या मार्गाने येऊ शकत असल्याने अगदी 4 एकरपासून ते 40 एकरपर्यंतच्या शेताला शेतकऱ्यांनी पर्यटन केंद्राचे रूप दिले आहे.

शेती, शेती व्यवसाय, ग्रामीण जीवन यांना कृषी पर्यटनामुळे ग्लॅमर आले आहे. अनेक तरुणांनी शहरातला नोकरी, व्यवसाय सोडून गावाकडच्या आपल्या वाडवडिलांच्या शेतीला पर्यटनाचे रूप देऊन त्याला आपले उत्पन्नाचे साधन केले आहे. यामुळे गावे शहरात सामावली जाण्याच्या काळात शहरे गावाकडे येऊ लागली आहेत. शहरातला पैसा गावाकडे येऊ लागला आहे. या माध्यमातून गावांचा विकास होण्यास मदत होऊ लागली आहे.

नवनव्या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे मानवी जीवन अधिकाधिक एककल्ली होत चालले असताना आपली भूक भागविणारे अन्न पिकते कुठे ह्याचे मात्र फारसे ज्ञान नव्या पिढीला नसते. कृषी पर्यटनातून ही कमतरता दूर होऊ लागली आहे. फळझाडे, तृणधान्ये, वेली, भाजीपाला, पशुधन, शेतीसाठी लागणार यंत्रे, पाणीपुरवठयाची साधने याची माहिती शेतात फिरता फिरताच होऊ लागते. यातून शेतीचे महत्त्व पटून ज्ञानातही भर पडते. जगण्यातला आनंद द्विगुणित करण्यासाठी चला तर मग, येत्या शनिवार-रविवारी आपल्या जवळच्या कृषी पर्यटन केंद्राच्या सहलीच्या तयारीला लागू या.

 8805221372