पदरी निखारा बांधणाऱ्या सुलभा

विवेक मराठी    21-Dec-2016
Total Views |

संघकाम करीत असताना असंख्य घरांशी संबंध येतो. घरोघर संपर्क ठेवल्याशिवाय संघकाम होत नाही. हक्काची घरे निर्माण करावी लागतात, जेथे प्रवासी कार्यकर्त्याचे चहा-पान, नाश्ता, भोजन यांची आणि कधीकधी निवासाची व्यवस्था करावी लागते. अशा प्रत्येक घरात एक 'वहिनी' असते आणि तीच आलेल्या कार्यकर्त्यांची आई, बहीण, मावशी होत असते. सुलभा शांताराम भालेराव या अशा वहिनींपैकी एक होत्या.
त्या
कुणी खासदार नव्हत्या, आमदार नव्हत्या.. एवढेच काय, त्या साध्या नगरसेविकाही नव्हत्या. तशा त्या सामाजिक किंवा राजकीय कामातील आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या असेदेखील नाही. जशा लाखो गृहिणी असतात, तशा त्या सामान्य गृहिणी होत्या. म्हणून त्यांच्या मृत्यूची बातमी 'बातमीचा' विषय झाली नाही. माध्यमांत त्यांचे नाव येण्याचे काही कारण नव्हते, वृत्तपत्रात त्यांच्या श्रध्दांजलीपर लेख लिहिण्याचा प्रश्नच नव्हता.

सामान्य गृहिणी असूनही त्यांनी एक असामान्य काम केले. एक जळता निखारा पदराला बांधून एक महिना त्या राहिल्या. तो जळता निखारा मी होतो. काळ अणीबाणीचा होता आणि संघाच्या आदेशाने मी भूमिगत झालो होतो.

माझ्या दृष्टीने त्या 'वहिनी' होत्या. त्यांचे नाव काय? शिक्षण किती? वगैरे वगैरेची माहिती तेव्हा करून घेण्याची काही गरज नव्हती. संघकार्यकर्त्याला त्याची गरज वाटत नाही. संघकाम करीत असताना असंख्य घरांशी संबंध येतो. घरोघर संपर्क ठेवल्याशिवाय संघकाम होत नाही. हक्काची घरे निर्माण करावी लागतात, जेथे प्रवासी कार्यकर्त्याचे चहा-पान, नाश्ता, भोजन यांची आणि कधीकधी निवासाची व्यवस्था करावी लागते. अशा प्रत्येक घरात एक 'वहिनी' असते आणि तीच आलेल्या कार्यकर्त्यांची आई, बहीण, मावशी होत असते. सुलभा शांताराम भालेराव या अशा वहिनींपैकी एक होत्या.

मी अंधेरीचा मंडल कार्यवाह झाल्यानंतर त्यांचा-माझा पहिला परिचय झाला. माझ्या मंडलाचा विस्तार अंधेरी (पूर्व) ते साकीनाका असा होता. तेव्हा नुकतीच वसती संपर्क योजना सुरू झाली होती. अंधेरी-कुर्ला रस्त्यावर मरोळ गाव आहे. त्या गावाला स्वत:चा दीर्घकाळाचा इतिहास आहे. चिमाजी अप्पांनी जी वसई मोहीम काढली, त्यात मरोळमध्ये एक छोटी चकमक झाल्याचा उल्लेख येतो. हे गाव पूर्वी साष्टी बेटात येत असे. त्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. पोर्तुगीजांनी अत्यंत क्रूरपणे अनेक गावे ख्रिश्चन केली, त्यात मरोळ गावदेखील ख्रिश्चन झाले. माझ्या कार्यक्षेत्रात गुंदवली, सहार, बामणवाडा, चकाला, अशी सगळी ख्रिश्चन गावे येत होती. मरोळमध्ये हिंदू वस्ती होती आणि येथे संघाचे काम सुरू करायचे होते.

संपर्काचे घर म्हणून शांताराम भालेराव यांच्याशी परिचय झाला. ते डयूक्स सोडा कंपनीमध्ये सप्लायर म्हणून काम करीत. त्यांच्या घरी माझे जाणे-येणे सुरू झाले. माझ्याबरोबर शंकरदास वधवा असत, जे पुढे भारतीय मजूर संघाच्या घरेलू कामगार संघटनेचे मुख्य संघटक झाले. ते तेव्हा साकीनाका येथे राहत. भालेराव कुटुंबाशी माझ्यापेक्षा त्यांचा घनिष्ट संबंध झाला.

वसतिश: जेव्हा-जेव्हा कार्यक्रम घेण्याचे ठरे, तेव्हा भालेराव यांचे घर आमचे कार्यालय होई आणि वहिनी सर्व कार्यकर्त्यांचे चहापान, प्रसंगी भोजन करीत. एका प्रसंगी त्यांच्या घरी भोजनाचा कार्यक्रम होता आणि तो बहुधा शंकरदास वधवा यांनीच ठरविला असावा आणि वहिनी प्रसूतीतून नुकत्याच उठल्या होत्या, तशाच स्थितीत त्यांनी कार्यकर्त्यांचे भोजन केले. आज त्याची आठवण झाली की मजकूर लिहितानादेखील हातांना कंप सुटतो.

अणीबाणी जाहीर झाली, मी भूमिगत झालो आणि मनुष्यस्वभावाचे वेगवेगळे अनुभव घेऊ लागलो. माझ्या परिचयाचा जर कुणी समोरून आला, तर तो फुटपाथ बदलत असे किंवा खाली मान घालून निघून जाई. रमेशला ओळख दाखविणे म्हणजे संकटाला निमंत्रण अशी स्थिती होती. सामान्यपणे जे स्वयंसेवक कधी फारसे 'प्रकट' झालेले नाहीत, अशांची घरे आम्ही शोधण्यास सुरू केली. तेव्हा संघाच्या प्रांतस्तराच्या आणि केंद्रस्तराच्या भूमिगत कार्यकर्त्यांची, जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा माझ्या कार्यक्षेत्रात व्यवस्था करण्याचे काम माझ्याकडे आले. तोपर्यंत मी पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी या तीन शहरांचा कार्यवाह झालो होतो. माझ्याही निवासाची व्यवस्था करण्याचे कामही माझ्याकडे अाले. त्यात एक महिना भालेरावांच्या घरी राहावे असे ठरले. तेव्हा शांताराम भालेराव पूर्वीचे घर सोडून मरोळ गावातच एका फ्लॅटमध्ये राहायला गेले होते. फ्लॅट तसा लहानच होता आणि आजही तो तसाच आहे. आजच्या भाषेत 1Rk हे त्याचे क्षेत्रफळ होते. परंतु ते पूर्वीचे बांधकाम असल्यामुळे 1Rkच्या मानाने जागा थोडी मोठी होती. 1975ला दिवाळीपूर्वी मी त्यांच्या घरी राहायला गेलो. माधुरी, संगीता, अरुणा, वीणा आणि दिलीप अशी पाच मुले, पती-पत्नी आणि त्यात मी. मुले तेव्हा शाळेत जात होती.

माझा पूर्वपरिचय असल्यामुळे नव्याने परिचय करून देण्याचा प्रश्न नव्हता. परंतु मला घरात ठेवून घेण्यात कोणता धोका आहे याची जाणीव करून देणे आवश्यक होते, ती त्यांना होती. मी त्यांना एवढेच म्हटले की, ''मी रोज कोठे जातो? केव्हा येणार? हे प्रश्न तुम्ही मला विचारायचे नाहीत. मी परत आलो नाही, तर हे समजायचे की मी पोलिसांचा पाहुणा झालेलो आहे. माझी चिंतादेखील करायची नाही.'' जेव्हा मी घरी असे तेव्हा माधुरी, संगीता, अरुणा यांच्या संगतीत काळ आनंदाने निघून जाई. घर छोटेसे असल्यामुळे छोटी मुलगी माझ्याच कुशीत झोपत असे. अणीबाणीचा कालखंड जसा अत्यंत विवंचनेचा होता, तसाच तो आयुष्यभर पुराव्यात अशा आठवणी देणारा ठरलेला आहे.

अणीबाणीतली दिवाळी वहिनींच्या घरीच साजरी झाली. तेव्हा मी सहार गावात राहत होतो. मरोळ ते सहार अंतर फार नाही. पण घरी जाण्याचा प्रश्न नव्हता. 15-20 दिवस झाल्यानंतर वहिनींनी मला एकदा विचारले, ''रमेशजी, तुम्हाला जेवणात काय आवडते, काही समजत नाही?'' तरुण माणसाला शोभेल असा माझा आहार होता. परंतु संघकार्यकर्त्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते की, जे पानात पडेल ते आवडीने खायचे, आवडी-निवडीचा बाऊ करायचा नाही. मी त्यांना म्हटले, ''मला काय आवडत नाही ते तुम्हाला सांगतो. मला शेपूची भाजी अजिबात आवडत नाही आणि तुमच्या घरात ती मी पहिल्यांदाच खाल्ली.'' त्या हसायला लागल्या आणि म्हणाल्या, ''मग तुम्ही बोलला का नाहीत? मी तुम्हाला आग्रह करून दुसऱ्यांदा भाजी वाढली.'' मी त्यांना म्हणालो, ''आणखी एकदा भाजी केली तरी मी खाईन.''

नंतर मी 11 फेब्रुवारी 1976 रोजी त्यांच्या घरापासूनच दोन किलोमीटर अंतरावर पकडला गेलो. योगायोगाने संघर्ष समितीचे अखिल भारतीय कार्यवाह संघटना काँग्रेसचे सचिव आणि त्या वेळच्या काँग्रेसचे अखिल भारतीय नेते रवींद्र वर्मा यांच्याबरोबर माझी अटक झाली. आम्हाला 'मिसा' लावण्यात आला. मिसा म्हणजे तुरुंगातून बाहेर येणारे सर्व दरवाजे बंद करणारा कायदा. 14 महिन्यानंतर मी बाहेर आलो. अणीबाणी संपली होती. इंदिरा गांधींचे शासन लोकांनी मतपेटींच्या माध्यमातून घालवून लावले. अहिंसक क्रांती झाली.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भव्य मिरवणूक, सत्कार, हार-तुरे असे सगळे गळयात पडत राहिले. तेव्हाही आणि आजही मनात सतत विचार येत राहतो की, खरे म्हणजे अणीबाणीचा लढा सुलभा शांताराम भालेराव यांच्यासारख्या वहिनींनीच लढला. त्या जर आमच्यामागे खंबीरपणे, निडरपणे उभ्या राहिल्या नसत्या, तर भूमिगत कार्य होणे अशक्यच होते. एक जळता निखारा पदराला बांधून सुखी आनंदी कुटुंबात महिनाभर जगणे हे किती मानसिक ताणाचे झाले असेल, हे कल्पना करता येणार नाही. त्यांच्या घरापासून जवळच मला अटक झाल्यामुळे पोलीस आपल्या घरावर कधीही येऊन धडकतील अशी भालेराव दांपत्याला भीती वाटली नसेल का? वाटली असेलच, परंतु ती त्यांनी व्यक्त केली नाही. ''रमेश पतंगे भूमिगत असताना मी त्याला आश्रय दिला'' असेही सुलभा वहिनीदेखील कधी म्हणाल्या नाहीत.

अणीबाणी संपविण्याचे श्रेय लाटण्याचे काम अनेक लोकांनी केले आहे. परंतु जे अणीबाणीच्या विरोधात उभे राहिले, भूमिगत झाले आणि तुरुंगात गेले, त्यांना हे माहीत आहे की अणीबाणीविरुध्दचा लढा जिंकला गेला, कारण सुलभा शांताराम भालेराव अबोलपणे या लढयाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अशा सर्व 'सुलभांना' चरणस्पर्श करून हा लेख संपवितो.

vivekedit@gmail.com