राहुलची पोपटपंची

विवेक मराठी    24-Dec-2016
Total Views |


''मी
संसदेत बोललो तर भूकंप होईल'' अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अधिवेशन काळात काहीच बोलले नाहीत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला होता. थेट पंतप्रधानांच्या गैरव्यवहाराची गोपनीय माहिती आपल्या हाती असल्याचा दावा राहुल गांधी करत होते आणि त्याला काही प्रसारमाध्यमे वारेमाप प्रसिध्दही देत होती. पण राहुल गंाधी संसदेत काहीच बोलले नाहीत आणि देशात मोठा भूकंप होता होताच हवेत विरून गेला. पण राहुल गांधींनी भूकंप घडवून आणायचाच असे ठरवले असल्यामुळे बाकी कुणी काय करणार? शेवटी गुजरातमधील मेहसाणा येथील सभेत राहुल गांधींना भूकंप घडवण्याचा मुहूर्त मिळाला आणि देशाच्या पंतप्रधानांवर त्यांनी सहारा समूह व बिर्ला समूह यांच्याकडून 52 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला. मोदींच्या होम पीचवर जाऊन अशा प्रकारच्या आरोप केल्यामुळे देशात खळबळ माजेल आणि राजकीय भूकंप होईल, अशी राहुल गंाधी यांची अटकळ असावी. प्रत्यक्षात कोणताही भूकंप झाला नाहीच, उलट राहुल गांधी यांचेच हसे झाले. 

कारण ज्या उद्योगांची नावे घेऊन राहुल गांधींनी पंतप्रधानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, त्याच उद्योगांचा संदर्भ देऊन याआधीच पंतप्रधानावर आरोप करत कॉमन कॉज या संस्थेने  न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे घ्यायला सांगत न्यायालयाने मत व्यक्त केले होते की, ''तुमच्या याचिकेत पंतप्रधानांविरुध्द तिळाएवढाही पुरावा असता, तर आम्ही निश्चितच चौकशीचे आदेश दिले असते. आजकाल असे प्रचलनच झाले आहे की, कुणीही उठतो आणि घटनात्मक पदांवरील व्यक्तीविरुध्द ऐकीव माहितीच्या आधारे खटला दाखल करतो. अशाने या व्यक्तींनी काम कसे करायचे? तुम्ही केवळ आक्षेप घेता. त्या आक्षेपाने समज निर्माण होतात. कुठल्याही पुराव्याशिवाय असले आक्षेप घेत बसलात, तर घटनात्मक पदांवरील व्यक्तीने काम कसे करायचे? आम्ही निश्चित कारवाई करू, पण त्या आधी आरोपामध्ये काहीतरी दम हवा ना!'' कॉमन कॉज या संस्थेच्या माध्यमातून जे आरोप झाले, तेच आरोप राहुल गांधी करत आहेत आणि अरविंद केजरीवाल यांनीही केले आहे. या साऱ्या आरोपांवर व याचिकांवर मत व्यक्त करत न्यायालयाने विषय निकाली काढला आहे असे म्हणायला हरकत नाही.

काहीही करून प्रकाशझोतात राहण्याची सहजसोपी रीत काही लोकांना जन्मत:च अवगत असते. त्यामुळे पुराव्याशिवाय आरोप करून ते काही काळासाठी का होईना, पण प्रकाशझोतात राहतात. मात्र शतकाची परंपरा असलेल्या पक्षाच्या भावी अध्यक्षानेही अशा मार्गांचा अवलंब करावा हे पचनी पडत नाही. राहुल गांधींनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भूकंप घडवणार असे जेव्हा म्हटले, तेव्हाच त्यांच्या राजकीय वाटचालीस ओहोटी लागली आहे असे लक्षात येत होते. लोकशाहीत विरोधी पक्ष जितका सक्षम असेल तितकी लोकशाही मजबूत आणि समाजहितकेंद्री होत असते. पण गेल्या दोन वर्षांतील विरोधी पक्षाचा व्यवहार पाहता ते अजून पराभवाच्या धक्क्यातून सावरले नसल्याचे निदर्शनास येत आहे. सभागृहात केवळ गोंधळ घालणे आणि सदनाचे कामकाज बंद पाडणे म्हणजेच विरोधी पक्षाचे काम असा समज बहुधा राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून घेतल्यामुळे कोणत्याही गृहपाठाची त्यांना आवश्यकता वाटत नाही. गृहपाठ करायचा नसल्यामुळे जगात काय चालले आहे हे समजून घेण्याचीही आवश्यकताही उरत नाही. अशा पार्श्वभूमीवर जेव्हा राहुल गांधी संसदेत भूकंप घडवून आणण्याच्या बाता मारत होते, तेव्हा त्यांचे सल्लागार काय करत होते? की त्याच सल्लागारांनी संगनमत करून राहुल गांधींचे कान भरले आणि संसदेतील भूकंपाचे केंद्र मेहसाण्यात आणून राहुल गांधींना तोंडघशी पाडले? राहुल गांधी यांची स्थिती बोलक्या पोपटासारखी झाली आहे का? पोपटाला जे शिकवले जाते, सांगितले जाते तेच तो बोलतो. राहुल गांधींनी पंतप्रधानांवर केलेल्या आरोपानंतर बोलक्या पोपटाची प्रकर्षाने आठवण झाली. काही दिवसांपूर्वी सहारा आणि बिर्ला ग्रूपच्या संदर्भात केजरीवाल यांनी पंतप्रधानांना आरोपी केले होते, तेच आरोप पुन्हा नव्याने राहुल गांधी यांनी करून काय साध्य केले?

 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला, तरी अखिल भारतीय जनाधार असणारा सध्या तरी तो एकच पक्ष आहे. त्यामुळे आपल्या पक्षाची प्रतिमा पुन्हा कशी उजाळायची याचा विचार राहुल गांधींनी करायला हवा होता, पण ते आपल्या बालिश व्यवहाराने काँग्रेसला अधिक गाळात नेत आहेत. गेल्या दोन वर्षांतील पक्षाच्या पराभवाचा विचार करून त्यातून बोध घेऊन मतदार आणि देशाची जनता आपल्याला का नाकारते आहे यांचे आत्मचिंतन केले असते, तर राहुल गांधींना पंतप्रधानावर बिनबुडाचे आरोप करण्याची वेळ आली नसती. प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या काँग्रेसला पुन्हा नव्याने चेतना देण्याचा हा मार्ग आहे, हे राहुल गांधींना कदाचित कळत नसेल. पण त्यांच्या सल्लागारांच्या ही गोष्ट का लक्षात आली नाही, याचेच आम्हाला आश्चर्य वाटते आहे. सक्षम विरोधी पक्षनेता ठरण्यासाठी प्रचंड गृहपाठाची आणि आपण सत्तापक्षावर करत असलेल्या आरोपाविषयी सबळ पुरावा उभा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे एवढे तरी या प्रकरणातून राहुल गांधी यांच्या लक्षात आले आणि त्याच्या परिणाम त्याच्या भविष्यातील व्यवहारावर पडला, तरी खूप झाले. राहुल गांधी देशभर कोठेही जाऊन केवळ आरोप करत राहिले आणि कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत, तर लोक त्याला पोपटपंची ठरवून बेदखल करतील.