राज्याचे विषय आणि राष्ट्राचे विषय

विवेक मराठी    27-Dec-2016
Total Views |

राष्ट्राच्या हिताचा विचार करताना राज्याचे हित, पक्षाचे हित व पक्षनेतृत्वाचे हित असे त्रिभाजन करावे लागते. यातील तिसऱ्या घटकांचे हित राष्ट्राच्या हिताशी मेळ खाणारेच असेल असे नाही. म्हणून व्यक्ती,पक्ष, राज्य यांचे भक्तगण न बनता राष्ट्रभक्त बनूनच घडणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करावा लागतो. यातल्या सीमारेषा नीट समजून घ्याव्या लागतात आणि त्या मांडत असताना कोणाच्या रागा-लोभाची पर्वा करून चालत नाही.
भा
रतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर देशातील राजकीय चर्चेची विषयसूची बदलत गेलेली आहे. काँग्रेसची राजवट असताना भ्रष्टाचार, दहशतवाद, पाकिस्तान, आरक्षण, महिलांवरील अत्याचार, रोजगार, शिक्षणाची ढासळत चाललेली गुणवत्ता, प्रादेशिक पक्षांचा वाढता भाव, माया-ममता-ललितांचे राजकारण, अशा असंख्य विषयांवर चर्चा होत असे. नरेंद्र मोदींचे शासन आल्यानंतर चर्चेचा फोकस बदललेला आहे.

पहिल्याच वर्षी 'पुरस्कारवापसी'चा विषय झाला. हे सरकार व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी आहे, फॅसिस्ट आहे, म्हणून पुरस्कारवापसीचा खेळ खेळण्यात आला. घरवापसीचा विषय तेव्हा सुरू झाला, गोहत्याबंदीचा विषय तेव्हा आला, गोमांस खाण्यावरून एका मुसलमानाची हत्या झाली, मग चर्चा सुरू झाली धर्मस्वातंत्र्याची, आहारस्वातंत्र्याची, मुंबईतील माजी पोलीस अधिकारी रिबेरो यांची ख्रिश्चानिटी एकदम जागी झाली आणि त्यांनी दि इंडियन एक्स्प्रेसमध्ये 'आम्हाला असुरक्षित वाटते आहे' अशा आशयाचा लेख लिहिला. चारशे वर्षांपूर्वीचे आपले हिंदू नाव रिबेरो कसे झाले, असा शोध त्यांना घ्यावासा वाटला नाही.

दि गार्डियन या इंग्रजी वर्तमानपत्राने भाजपाच्या सत्तांतराविषयी लिहिले होते की, खऱ्या अर्थाने इंग्रजांनी देश कायमचा सोडला आहे आणि भारतीयांचे राज्य सुरू झाले आहे. 1947 सालापासून राज्य करणारे भारतीयच होते. मग नरेंद्र मोदी हे एकदम भारतीय कसे झाले? 47 सालापासून राज्य करणारे इंग्रजी विचारांनी आणि इंग्रजी पध्दतीने राज्य करीत होते. ही पध्दती नाकारणारी एक पिढी 2014 साली सत्तेवर आली. या पिढीशी माझ्यासहित अनेक वाचकांची वैचारिक बांधिलकी आहे. ती आहे म्हणून सत्तेवर बसलेले लोक जे काही करीत आहेत, ते सर्व नवीन आहे, देशाला पुढे नेणारे आहे, राष्ट्रसंवर्धन करणारे आहे, असे म्हटलेच पाहिजे असे नाही.

राष्ट्राचा विचार करताना पहिली वैचारिक बांधणी राष्ट्राशी असावी लागते. राज्य, राष्ट्राचा एक भाग असतो आणि सरकार राज्याचे अंग असते. सरकार चालविणारी पॉलिटिकल पार्टी सरकार चालविणारे एक यंत्र असते. राजकीय पक्ष ही एक पध्दती आहे, ते एक संघटन आहे, त्या संघटनेला नेता लागतो. अनेक नेत्यांतील नरेंद्र मोदी एक नेते आहेत.

राष्ट्राच्या हिताचा विचार करताना राज्याचे हित, पक्षाचे हित व पक्षनेतृत्वाचे हित असे त्रिभाजन करावे लागते. यातील तिसऱ्या घटकांचे हित राष्ट्राच्या हिताशी मेळ खाणारेच असेल असे नाही. म्हणून व्यक्ती,पक्ष, राज्य यांचे भक्तगण न बनता राष्ट्रभक्त बनूनच घडणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करावा लागतो. यातल्या सीमारेषा नीट समजून घ्याव्या लागतात आणि त्या मांडत असताना कोणाच्या रागा-लोभाची पर्वा करून चालत नाही.

'हे हिंदुराष्ट्र आहे' हा संघाचा मूलभूत सिध्दान्त आहे. हे हिंदुराष्ट्र असल्यामुळे ते नवीन निर्माण करायचे नाही आहे. केंद्रातील भाजपाला ते निर्माण करायचे नाही, ते त्यांचे काम नाही. हे सनातन हिंदुराष्ट्र म्हणजे आजचा राजकीय भारत नव्हे. त्याच्या सीमा अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश आणि काश्मीर ते श्रीलंका अशा आहेत. या हिंदुराष्ट्रात पाकिस्तान, भारत, बांगला देश, नेपाळ, ब्रह्मदेश, श्रीलंका ही स्वतंत्र आणि सार्वभौम राज्ये आहेत. यापैकी कुणाचेही सार्वभौमत्व आपल्याला काढून घ्यायचे नाही. त्यांच्या राजकीय व्यवस्थेत ढवळाढवळ करायची नाही आहे. तथापि हे सर्व देश एका विशाल भारतीय सांस्कृतिक परीघात येतात. या सर्वांची संस्कृती एक आहे, जीवनमूल्ये सारखी आहेत, अधात्म्य हा सर्वांचा अविभाज्य भाग आहे. त्याची अभिव्यक्ती त्या-त्या देशाच्या स्वभावाप्रमाणे झाली आहे. ही सर्व विविधता आहे. सत्य एकच आहे आणि विद्वान लोक त्याचा आविष्कार वेगवेगळया प्रकारे करतात, याचे हे उदाहरण आहे.

इंग्रज गेले, काळे इंग्रज गेले आणि भारतीय लोक सत्तेवर आले. या सत्तेवर आलेल्या लोकांना काळे इंग्रज सुखाने राज्य करून देणार नाहीत. लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले की सारा देश त्याचा अनुभव घेतो. गाडी जेव्हा रूळ बदलते, तेव्हा चाकांचा खूप खडखडाट होतो. डब्यात बसलेल्यांना वाटते की, डबा बहुतेक उलटा होणार. परंतु तसे काही होत नाही. गाडीचा वेग थोडा कमी होतो आणि पुन्हा गाडी आपल्या वेगाने धावायला लागते. सत्तेवर आलेल्या सरकारला राज्य नीट चालवावे लागते, लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. त्यासाठी विकासाच्या योजना कराव्या लागतात. आणि नोटाबंदीसारखे कठोर निर्णय घ्यावे लागतात. रोजगार उपलब्ध करण्याच्या नवनवीन योजना आखाव्या लागतात. देशी-विदेशी भांडवलवृध्दी करावी लागते. दळणवळणाच्या साधनांत प्रचंड विकास करावा लागतो. अशा असंख्य योजना आणि विषय मांडता येतील किंवा सरकारी योजनांची यादीच्या यादी देता येईल.

प्रश्न असा निर्माण होतो की, राज्य आर्थिकदृष्टया विकसनशील होणे, समृध्द होणे चांगली गोष्ट आहे. पण राष्ट्राचे काय? राष्ट्र म्हणजे राज्य नव्हे. हे राष्ट्र सनातन आहे. याचा अर्थ त्याचे अस्तित्व आठ-दहा हजार वर्षांपासून आहे. अशी राज्ये आली आणि गेली. आर्थिक समृध्दी आली आणि गेली. पण राष्ट्र लयाला गेले नाही. ''बात कुछ ऐसी है, की हसती मिट्टी नही हमारी'' ही काव्यओळ सर्वांना माहीत आहे. युगानुयुगे टिकून राहण्याचे आमचे सामर्थ्य कोणते आणि त्याच्या संवर्धनासाठी आताचे राज्य आणि सरकार काय करतात?

हजारो वर्षे आम्ही टिकून राहिलो, कारण आम्ही आमच्या जीवनात धर्माला सर्वाधिक स्थान दिले. धर्म म्हणजे उपासनापध्दती नव्हे, उपास-तापास, कर्मकांडे नव्हे. धर्म म्हणजे ही सर्व चराचर सृष्टी नियमाने चालते, या सर्व चराचर सृष्टीत चैतन्य भरलेले आहे त्याची जाणीव करून घेणे, त्याची अनुभूती करून घेणे, सृष्टिचक्राच्या नियमाला धरून आपला समाज, आपला देश चालविणे. सृष्टीचा नियम सांगतो की, मनुष्यजीवन परस्परावलंबी आहे. म्हणून आपण एकमेकांना पूरक बनून जगले पाहिजे. एकमेकांना अनुकूल होईल असा व्यवहार केला पाहिजे. तो सरकारी कायद्याने नव्हे, तर धर्माच्या कायद्याने केला पाहिजे. धर्माचे कायदे पवित्र असतात आणि ते मोडायचे नसतात. हे धर्मशिक्षण आजचे आमचे केंद्रातील शासन किंवा राज्यातील शासन शाळा-महाविद्यालयांतून देण्याचे काम सुरू केले आहे का? ते कशा प्रकारे देता येईल? याचा काही आराखडा केला आहे का?

राष्ट्र म्हणून आपण टिकून राहिलो, याचे कारण आम्ही हे मानले आणि अनुभवले की सर्व चराचर सृष्टी एका चैतन्याचा आविष्कार आहे. जे चैतन्य माझ्यात आहे, ते किडामुंगीतदेखील आहे. म्हणून मी हिंसा करता कामा नये. कुणाला दु:ख देता कामा नये. जीवसृष्टीतील मी अतिशय प्रगत प्राणी असल्यामुळे या सर्वांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोरक्षा आहे. मनुष्यजीवनाला अत्यंत पूरक कृषिसंस्कृतीचा भक्कम आधार आणि आयुर्वेदिक औषधांचे भंडार असे गायीचे स्वरूप आहे. तिचे रक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे. हे राष्ट्रीय काम आहे, राजकीय काम नव्हे, मतबँकाशी हा विषय जोडू नये. त्याचप्रमाणे ज्यांना गो-विज्ञान समजत नाही, अशा भक्तांशीही हा विषय जोडू नये.

राष्ट्राचा तिसरा विषय येतो उत्तम संस्कार देण्याचा. जन्मत: माणूस कोणीच नसतो. तो संस्काराने नराचा नारायण होतो. हे संस्कार देण्याचे पहिले केंद्र कुटुंब असते. आई-वडील, आजी-आजोबा, मावशी, आत्या, काका, मामा, इत्यादी केवळ नात्यांची नावे नाहीत. नराला नारायणाकडे घेऊन जाणाऱ्या या सर्व पायऱ्या आहेत. संस्कार देण्याचे दुसरे केंद्र असते, गुरू. महात्मा गांधी,
डॉ. हेडगेवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे लोकपुरुष आपल्या चारित्र्यबळावर अनेक पिढयांचा पुनर्जन्म घडवून आणत असतात. भारत आर्थिकदृष्टया किती संपन्न झाला, सैनिकीदृष्टया किती सामर्थ्यवान झाला, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याहून जास्त महत्त्वाची गोष्ट या भारतातील प्रत्येक पिढी कोणता संस्कार घेऊन उभी राहत आहे, आपल्या संस्कार परंपरेत ज्ञानसाधना, थोरांचा सन्मान, अतिथी सत्कार, खरे बोलणे, दुसऱ्यांचे दु:ख जाणणे, परोपकार करणे, क्रोधावर जय मिळविणे, समाजाचे आपण काही देणे लागतो याची जाणीव ठेवणे, परमेश्वरावर श्रध्दा ठेवणे, प्रार्थना करणे, दिव्याची पूजा करणे, अशा असंख्य गोष्टी येत असतात. यातील एकही गोष्ट पार्लमेंटच्या कायद्याने होणार नाही. त्या गोष्टी संस्कार परंपरेत बसवाव्या लागतात. राज्य सरकार, केंद्र सरकार, शिक्षणसंस्थांना अशी संस्कार स्वायत्तता देणार आहे का? एकत्र कुटुंबपध्दतीचा गौरव करणार आहे का? कशा प्रकारच्या दूरदर्शनवरील सिरियल येतील, चित्रपट येतील, त्यांना प्रोत्साहन देणार आहे का?

हिंदुराष्ट्राचा पूर्वजांना न करता आलेला एक विषय आहे, तो म्हणजे आपल्या पूर्वजांना भारतात आलेल्या इस्लामी आणि ख्रिश्चानिटीच्या तत्त्वज्ञानाला आपल्यात पचवून टाकता आलेले नाही. यापूर्वी शक, हूण, क़ुशाण, ग्रीक, मोगल आणि त्यापूर्वीही अनेक मानववंशांचे लोक आले. आपल्या पूर्वजांनी त्यांना पचवून टाकले. अगस्ती ऋषींनी ज्याप्रमाणे वातापिचा भाऊ इतापिला पोटात पचवून टाकले, तसे झाले. परंतु नंतर आलेल्या इस्लामी आणि ख्रिश्चानिटी मतांना आपल्या देव्हाऱ्यात स्थान देण्यात आपल्याला यश आलेले नाही. भारतात राहणारे सगळे मुसलमान आणि ख्रिश्चन मूळचे हिंदूच आहेत. त्यांनी पूजापध्दती बदलली. आपल्या हिंदूंतही पूजापध्दती बदलण्याचे प्रकार सतत चालू असतात. शंभर वर्षांपूर्वी स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यांची घरोघर पूजा कोणी करत नसे. आज तसे नाही. इस्लामला आणि ख्रिश्चानिटीला पचविणे सोपे काम नाही हे खरे. पण अवघड आणि अशक्य आहे असेही नाही. राज्य चालविणाऱ्या शासनकर्त्यांनी त्यांच्या वेगळया अस्तित्वाला मान्यता देणे सोडून दिले पाहिजे, त्यांचे वेगळेपण जोपासणे बंद केले पाहिजे. राज्याची एकच शिक्षणपध्दती सर्वांना लागू केली पाहिजे. सण-उत्सव हे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक उत्सव असतात, ते सर्व समाजाने एकत्र साजरे करण्याची प्रथा चालू केली पाहिजे.

भारतीय राज्याचा प्रमुख हा कायद्याने आणि घटनेने त्या राज्याचा प्रमुख असतो. परंतु राष्ट्र आणि राष्ट्रीय घटनेने तो सगळया राष्ट्राचा प्रमुख असतो. त्याची कायदेशीर सत्ता राजकीय भारतापुरती मर्यादित राहते, परंतु त्याची सांस्कृतिक सत्ता अखंड भारताला व्यापून उरते अशी जाणीव ठेवून जर सरकार चालले, तर इंग्रज गेले, काळे इंग्रज गेले आणि आम्ही आलो, हे म्हणणे सार्थक ठरेल.

vivekedit@gmail.com