जनाधारावर शिक्कामोर्तब

विवेक मराठी    03-Dec-2016
Total Views |

2014 साली भाजपाने बहुमताच्या दिशेने झेप घेतली हा फक्त नशिबाचा खेळ नव्हता, तर भाजपाने आपला जनाधार वाढवीत तो सर्वात मोठा पक्ष झाला आहे असे सिध्द केले होते. जनाधार वाढला हे समीकरण विरोधकांना मान्य नव्हते. त्यामुळे ते विविध कारणे देत असत. पण तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्र राज्यातील 195 नगरपरिषदांसाठी निवडणुका घोषित झाल्या आणि 27 नोव्हेंबर 2016ला 147 नगरपरिषदांसाठी मतदान झाले आणि मतमोजणीनंतर भाजपा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष या बिरुदावर जनाधाराचे शिक्कामोर्तब झाले. या दाव्यावर लोकमान्यतेची राजमुद्रा उमटली आहे.
20
14 साली भाजपाने बहुमताच्या दिशेने झेप घेतली हा फक्त नशिबाचा खेळ नव्हता, तर भाजपाने आपला जनाधार वाढवीत तो सर्वात मोठा पक्ष झाला आहे असे सिध्द केले होते. जनाधार वाढला हे समीकरण विरोधकांना मान्य नव्हते. त्यामुळे ते विविध कारणे देत असत. पण तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्र राज्यातील 195 नगरपरिषदांसाठी निवडणुका घोषित झाल्या आणि 27 नोव्हेंबर 2016ला 147 नगरपरिषदांसाठी मतदान झाले आणि मतमोजणीनंतर भाजपा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष या बिरुदावर जनाधाराचे शिक्कामोर्तब झाले. या दाव्यावर लोकमान्यतेची राजमुद्रा उमटली आहे.

या 147 नगरपरिषदांत 3510 नगरसेवक आहेत. त्यातील सर्वाधिक - म्हणजे 851 जागा भाजपाला मिळाल्या आहेत. त्या खालोखाल 643 जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यांना 638 जागी यश मिळविता आले. शिवसेना 516 जागी विजयी झाली आहे. नगरपरिषदांतील बहुमताचे गणित मांडले, तर भाजपाने निर्विवादपणे 47 जागा जिंकल्या आहेत, तर सेनेने 27 जागा जिंकल्या आहेत. युतीमधील या पक्षांना एकूण 74 जागी यश मिळाले आहे, तर काँग्रेसला 23 व राष्ट्रवादीला 21 नगरपरिषदा राखता आल्या आहेत. स्थानिक आघाडयांना 21 नगरपरिषदांत यश मिळाले आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला 52 जागी आपले नगराध्यक्ष प्रस्थापित करता आले आहेत. यात शिरपेच म्हणून ज्या नगराध्यक्षपदाचा उल्लेख करावा लागेल, ती नगरपरिषद सातारा येथील आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या गावी ठाण मांडून बसले होते, पण त्यांचा नगराध्यक्षपदांचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. त्या ठिकाणी भाजपाचा नगराध्यक्ष झाला आहे. भाजपाने या ठिकाणी केलेली व्यूहरचना फलदायी ठरली आहे. पृथ्वीराज बाबांनी नगरपरिषद तर राखली, पण नगराध्यक्षपद गमावले आहे. गड आला पण सिंह गेला अशी बाबांची अवस्था झाली आहे.

2011 साली नगरपरिषद निवडणुका झाल्या होत्या, त्या वेळी 195 नगरपरिषदांत सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते. त्या पक्षाचे 1127 नगरसेवक होते, ते आता 638 झाले आहेत. तर काँग्रेसचे 1111 नगरसेवक होते, त्यांची संख्या आज 643 झाली आहे. याउलट भाजपाचे 396 नगरसेवक होते, ते आता वाढून 851 झाले आहेत. तर सेनेला 363 नगरसेवकांना 2011 साली विजयी करता आले होते. या वेळी त्यांची संख्या वाढून 514 झाली आहे. यात फक्त 147 नगरपरिषदांतील विजयी जागा 2016च्या निकालासाठी उपलब्ध आहेत. ते बघता भाजपाला तिप्पट, तर सेनेला दुप्पट जागा मिळाल्या आहेत.

या वेळच्या नगरपरिषद निवडणुकीचे वैशिष्टय होते की, 2001नंतर प्रथमच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान होऊन सरळ नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. 2001 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुका घेतल्या होत्या. पण त्यानंतर काही काळातच तो निर्णय मागे घेण्यात आला. पण भाजपा-सेना युती सरकार सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकांचा निर्णय घेतला.

भाजपा-सेना युतीवर जनमान्यतेची लोकमोहर उठण्याचा विभागनिहाय विचार करता असे लक्षात येते की, विदर्भात भाजपाने आपला दबदबा कायम राखला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातही चांगला विजय मिळविला आहे. विरोधकांच्या अंगाने विचार करायचा, तर वीरेंद्र जगतापसारख्या काँग्रेस आमदाराने आपल्या क्षेत्रात आपला प्रभाव कायम ठेवला आहे. मात्र त्याच वेळी विधानसभेचे उपसभापती झालेले काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना दणका बसण्याची परंपरा कायम राहिली आहे. त्यांनी यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीतही आपल्या उमेदवाराचा पराभव बघितला.

उत्तर महाराष्ट्रात जळगाव हा जिल्हा येतो आणि नाथाभाऊ खडसे यांचा त्या जिल्ह्यावर जबर प्रभाव आहे. नाथाभाऊंनी मागणी केल्यानुसार त्यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असेपर्यंत ते मंत्रिपदावरही नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यात काय होईल याबद्दल माध्यमांनी खूप शंका उपस्थित केल्या होत्या. पण ज्याप्रमाणे भाजपाने या ठिकाणची विधानपरिषदेची जागा कायम राखली, तसेच घवघवीत यश जळगाव जिल्ह्यात संपादन केले आहे. बाकी सर्व जिल्ह्यांतही भाजपाची घोडदौड कायम आहे. गिरीश महाजन व त्या खालोखाल रावल यांना या यशाचे श्रेय जाते. रावल यांनी आपल्या जिल्ह्यात चांगलेच यश मिळविले आहे. शिरपूरमध्ये अमरीश पटेल यांच्या पत्नी विजयी झाल्या आहेत.


पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड मानला जातो. सहकारी चळवळीमुळे या भागावर राष्ट्रवादीची मजबूत पकड होती. पण चंद्रकांतदादा पाटील यांनी स्थानिक आघाडयांच्या मदतीने ती पकड खिळखिळी केली आहे. राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांचे हे प्रभावक्षेत्र. त्या ठिकाणी जयंत पाटील नेहमी बोलत की, ''या भागातील राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी फक्त आंदोलने करावीत, तर सत्ता राबविणे, यश मिळविणे हा आमचा प्रभाव भाग आहे.'' पण या वेळी इस्लामपूरमध्येही जयंतरावांना हार पत्करावी लागली. भाजपाने वारणानगरचे विनय कोरे यांना आपल्याबरोबर राखण्यात यश मिळविले आणि त्याचे परिणाम दिसतात. भाजपाचे चांगले परिश्रम करून हे यश संपादन केले आहे. गडहिंग्लज भागात समाजवाद्यांचा प्रभाव गट आहे, तो कायम आहे.

कोकणात भाजपाजवळ प्रभावी नेतृत्व नाही व त्या तळकोकणात नारायण राणे व दीपक केसरकर यांच्यात लढत आहे. त्यात भाजपाने प्रवेश केला आहे. नारायण राणे यांना कणकवली, मालवण व सावंतवाडी यात संमिश्र यश मिळाले. मात्र केसरकर यांच्या प्रांतात त्यांनी प्रवेश केला आहे. भाजपासाठी नगर जिल्हा तसा अडचणीचा जिल्हा ठरत आहे. यात बाळासाहेब थोरातांनी यश मिळविले आहे, तर विखे पाटील यांना कसाबसा विजय मिळाला आहे. या निकालांमुळे रामकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणी वाढतील.

भाजपा-सेनेसाठी मराठवाडा हा चिंतेचा प्रांत असे मानले गेले पाहिजे. या ठिकाणी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपल्या पत्नीला नगराध्यक्षपदासाठी उभे केले होते, पण त्या पराभूत झाल्या. तसेच परळीत झाले आहे. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या वादात प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांनी विजय मिळविला आहे, पण या वेळी मात्र त्यांना परळी गमवावी लागली आहे. याच मराठवाडयात भाजपाचे प्रांताध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालना जिल्हाही येतो. या ठिकाणी भाजपाला अजून हातपाय पसरता आलेले नाहीत. पण त्याला दानवे यांचा पराभव असे मानता येणार नाही. संपूर्ण राज्यात ढेपाळलेल्या राष्ट्रवादीला उस्मानाबाद, बीड वगैरे भागात मात्र विजय मिळविता आला आहे.

या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 40 ठिकाणी सभा घेतल्या होत्या. त्यापैकी 32 जागी भाजपाला यश मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या व भाजपाला यश मिळाले नाही, अशातील दोन सभा या पंकजा मुंडे यांच्या कार्यक्षेत्रात घेण्यात आल्या होत्या. भाजपाने परळी गमावले असले, तरी दोन नगरपरिषदा मात्र आपल्याकडे कायम ठेवल्या आहेत. या यशामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावरील मांड अधिक मजबूत झाली आहे. या निवडणूक काळात मुख्यमंत्र्यांनी स्थानिक विकासकामांवर आपल्या प्रचाराचा भर दिला होता. त्यांनी विरोधकांवर फारशी टीका वगैरेही केली नव्हती. विकासकामांचे सुयोग्य नियोजन महाराष्ट्रातील जनतेला पटले आहे, हेच या निकालांनी सिध्द केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विकासकामांना जी गती दिली आहे, ती महाराष्ट्रातील जनतेला भावली आहे, हे सत्यही या निवडणूक यशांमुळे अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्रातील त्यांच्या नेतृत्वाबद्दल शंका निर्माण करणारे शंकासुर आता नक्की शांत होणार आहेत, अशी चिन्हे आहेत. माध्यमातील मित्रमंडळी अधूनमधून 'देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे पक्षातील नेत्यांत असमाधान आहे, त्यांच्या नेतृत्वाला भाजपातूनच सुरुंग लावला जात आहे' वगैरे बाजारगप्पा मारतात, त्याही आता शांत होतील अशी आशा बाळगायला हरकत नसावी. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाची पावले नवनवीन प्रदेशांत रोवली जात आहेत, हेच सिध्द झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाला आलेले यश भाजपा समर्थकांना सुखावणारे आहे.

या निवडणुकांत शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे वा आदित्य ठाकरे हे दोघेही प्रचाराला बाहेर पडले नव्हते. पण आपला प्रभाव आपापल्या क्षेत्रात कायम आहे, हेच स्थानिक नेतृत्वाने दाखवून दिले आहे. या निवडणुकीत भाजपा-सेना यांची युती होती. ती युतीही शेवटी शेवटी झाली. म्हणजे अगदी AB फॉर्म दिल्यावर झाली होती. पण ही युती नसती तर कदाचित भाजपाला यापेक्षा अधिक यश मिळाले असते. मात्र ही युती झाल्यामुळे आता राज्यात जिथे जिथे निवडणुका आहेत, तिथे तिथे वातावरणात सामंजस्याचे एक वातावरण निर्माण झाले आहे. याउलट काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व नारायण राणे यांची जुगलबंदी सुरू झाली आहे. नारायण राणे यांनी पक्षाचे उमेदवार चांगले व सर्वमान्य नाहीत, असे सांगत अशोक चव्हाणांवर तोफ डागली आहे, तर अशोक चव्हाण यांनी ''उमेदवार निवड हा भाग सांसदीय मंडळाचा असतो'' या तांत्रिकतेकडे लक्ष वेधले आहे.

या निवडणुकीतून भाजपा प्रस्थापित झाला आहे. पुणे, पिंपरी, चिंचवड व मुंबईत अधिक यश मिळेल, तर नागपुरात मनपा कायम राखू, या विश्वासाने वागू लागला आहे. मात्र अजूनही नगर, ठाणे वगैरे भागात काम करण्याची गरज आहे. जनमत अजून भाजपाच्या बाजूने पूर्णपणे वळलेले नाही. पंकजा मुंडे, विष्णू सावरा व बबनराव लोणीकर यांना पुन्हा जनतेत विश्वास निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहावे लागणार आहे. परळी गमविली, पण दोन नगरपरिषदा तर कायम राखल्याने या युक्तिवादाला आता जनता भुलणार नाही.

या निवडणूक यशातून नोकरशाहीलाही ठाम संदेश गेला आहे. नोकरशाहीतील पहिली व सर्वोच्च फळी तर मंत्र्याच्या अपेक्षेप्रमाणे काम करीत आहे, पण दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नोकरशाहीला हा संदेश गेला आहे की, भाजपाचे विधानसभेतील यश हा अपघात नव्हता व कुणाच्या तरी फक्त लाटेचा प्रभाव नव्हता, तर जनमानसात भाजपाचे कमळ फुलले आहे, भाजपाला राज्यात जनाधार आहे. त्यामुळे ही नोकरशाहीही नकारात्मक विचार टाकून जनहिताचे निर्णय घेईल, असा विश्वास बाळगायला प्रत्यवाय नसावा.

भाजपाला पहिल्या टप्प्यात मिळालेले हे यश हा भाग लोकमान्यतेचा, जनमान्यतेचा आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचूकपणाने टि्वटरवर या यशासाठी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद देत हा विजय पक्षाचा संघटित विजय आहे, असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी या विजयाला 'गरिबांच्या बाजूने असणाऱ्यांचा व विकासवाद्यांचा विजय' मानला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रावसाहेब दानवे यांचा व लक्षावधी कार्यकर्त्यांचा विजय मानला आहे.

सामान्यत: नगरपरिषदांच्या निवडणुका होतात, तेव्हा स्थानिक प्रश्नच महत्त्वाचे ठरतात. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीव वा अगदी जिल्हास्तरावरील प्रश्नही फारसे महत्त्वाचे ठरत नाहीत. अगदी प्रदेश पातळीवरील प्रश्न - मराठा आंदोलन, ऍट्रॉसिटी ऍक्ट तसाच कायम राहावा यासाठी निघालेला मोर्चा हे प्रश्न महत्त्वाचे राहतात, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न असतो तो माझ्या घरासमोरील नाले कोण साफ ठेवू शकेल हा. परस्पर संबंध, मित्रत्व या आधारावरच मतदान होत असते, पण या वेळी 1000 व 500 रुपयांच्या नोटांचे निश्चलनीकरण हा विषय सामान्यांचा विषय होता. त्यापायी जनतेला त्रासही भोगावा लागला. काही काळ रांगेत काढावा लागला, तर ज्यांच्या घरी लग्नकार्य होते, त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. हाती पैसा, रोख नसताना व्यवहार करणे किती कठीण होत जाते, यांचा जणू वस्तुपाठ या निमित्ताने मिळाला होता. समाजातील सर्व घटकांना हा त्रास सहन करावा लागत होता. 27 तारखेला या निश्चलीकरणाला दोन दिवस झाले होते. चिंता, काळजी, काहीसे असुरक्षित वातावरण कायम असतानाही अगदी 27ला भाजपासाठी मतदान करत जनतेने नरेंद्र मोदी यांच्या धोरणावरही पसंतीची मोहोर उमटविली आहे. त्यामुळेच हा विजय म्हणजे भाजपासाठी जनाधारावर लोकमान्यतेची मोहोर उमटवण्याचा सोहळा होता. भाजपाने या निमित्ताने महाराष्ट्रात घडून आलेले परिवर्तन कायम केले आहे. त्यासाठी भाजपाचे मन:पूर्वक अभिनंदन!

 8888397727