साहित्याचा आनंदयात्री

विवेक मराठी    05-Dec-2016
Total Views |

महान साहित्यिक हा एका अर्थाने परमेश्वराप्रमाणे स्वतंत्र प्रतिमा सृष्टी निर्माण करणाराच असतो. जे निर्माण केले आहे त्याच्यापासून पूर्ण अलिप्त. इदम् न मम या भूमिकेत राहणारा. डॉ. आनंद यादव मराठी रसिकाला साहित्यानंद देण्यासाठी जगले, लिहीत राहिले, प्रसंगी बोलत राहिले. साहित्याच्या या आनंदयात्रीला विनम्र प्रणाम.
नंद यादव गेल्याची बातमी ऐकली. निरागस आनंद देणारा एक साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला. मृत्युसमयी त्यांचे वय 83 होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू आकस्मिक, अनपेक्षित होता असे काही म्हणता येणार नाही. गेल्या वर्षी मी त्यांना भेटायला गेलो होतो. कल्याण येथे समरसता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली होती आणि आनंद यादव पहिल्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेणे हे माझे कर्तव्य होते.

त्यांच्या भेटीत असे लक्षात आले की, स्मृतिभ्रंशाचा वेगळया प्रकारचा विकार त्यांना झाला होता. एकच विषय दोन ते चार मिनिटांच्या अंतराने पुन्हा-पुन्हा बोलत असत. एवढे एक सोडले, तर 1998 साली त्यांच्या भेटीत जाणवलेली प्रसन्नता, मनमोकळेपणा आणि सुहास्यवदन तसेच कायम होते.

जेव्हा आम्ही समरसता साहित्य परिषद सुरू करण्याचा निर्णय केला, तेव्हा प्रामाणिकपणे सांगायचे तर साहित्य चळवळ काय असते, साहित्य व्यवहार काय असतो, साहित्यिक भाषा काय असते याचे मला काही ज्ञान नव्हते. ते मिळविण्यासाठी मी अनेक पुस्तकांचे वाचन सुरू केले. त्यात ग्रामीण साहित्य चळवळीविषयीचे डॉ. आनंद यादव यांचे साहित्य माझ्या वाचनात आले. डॉ. आनंद यादव हे महाराष्ट्रातील ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रणेते होते. पुढाकार घेऊन त्यांनी अनेक साहित्य संमेलने भरविली. या संमेलनात अध्यक्षीय भाषणातून मांडले गेलेले विचार, संकल्पना मला आवडल्या. त्यानंतर असे वाटायला लागले की, डॉ. आनंद यादव आणि आम्ही यांचे चांगले जमू शकते.

त्यांना समरसता मंचाच्या व्यासपीठावर आणण्याचा पहिला उपक्रम आम्ही केला. निमित्त होते 89-90 साली जी महाराष्ट्रव्यापी संदेशयात्रा झाली, त्यात मांडल्या गेलेल्या विचारांच्या संकलनांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. पूज्य बाळासाहेब देवरस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ठरला. डॉ. आनंद यादव यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले, ते आले. खरे म्हणजे 92 साली समरसता मंचाच्या व्यासपीठावर येणे हे धाडसाचे होते. कारण फुले, आंबेडकर, शाहू यांच्या 'पुरोगामी' महाराष्ट्रात समरसता मंचाचे व्यासपीठ प्रतिगामी ठरवून टाकण्यात आले होते. एक जबरदस्त वैचारिक दहशत निर्माण केली होती. व्यासपीठावर गेल्यावर पुरस्कार बंद, सरकारी पदे बंद, व्यासपीठे बंद, वैचारिक अस्पृश्यतेत जगावे लागे ही दहशत होती. डॉ. आनंद यादव यांना हे सर्व माहीत होते, तरीही ते आले, न घाबरता, न डगमगता. ते काय बोलले याला फारसे महत्त्व नव्हते. तसे त्यांचे भाषण मला विचारप्रवर्तक वाटलेदेखील नाही. विचारांची स्पष्टताही मला जाणविली नाही. परंतु त्याने काही बिघडत नव्हते. कारण विचारांच्या दृष्टीने आम्ही पक्के होतो.

पहिले समरसता साहित्य संमेलन जळगाव येथे भरविण्याचा निर्णय मोतीबागेतील समरसता मंचाच्या बैठकीत मी घोषित केला आणि समरसता संमेलनाचे अध्यक्ष कोण? या नावाची चर्चा सुरू झाली. सर्वानुमते डॉ. आनंद यादव यांचे नाव पक्के झाले. पुण्याला त्यांच्या घरी जाऊन त्यांना आम्ही रीतसर निमंत्रण दिले. त्यांनी ते आनंदाने स्वीकारले. तरीही मनात धाकधूक होतीच. 'पुरोगामी' जगताकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जाईल, त्यांच्यावर आक्षेप घेतले जातील... हे सर्व झालेच. पण डॉ. आनंद यादव खंबीर राहिले. जळगाव येथे पहिले समरसता साहित्य संमेलन झाले. हे संमेलन त्यांच्या अध्यक्षीय भाषणाने मराठी साहित्य क्षेत्रात एक मोठी झेप घेणारे साहित्य संमेलन ठरले. 'समरसता एक साहित्यमूल्य आहे' हा मूल्यसिध्दान्त त्यांनी या संमेलनात मांडला. मराठी साहित्य क्षेत्रातील हे त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. हे कळायला अनेकांना खूप वर्र्षे लागतील, हे आपण गृहीत धरले पाहिजे.

यानंतर डॉ. आनंद यादव समरसता चळवळीतील एक कार्यकर्ता झाले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याबद्दल प्रथेप्रमाणे त्यांना मानधन देण्यासाठी मी, दामूअण्णा दाते, इदाते, डॉ. तोरो, श्यामराव अत्रे त्यांच्या निवासी गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले, ''अहो, मी तुमचाच कार्यकर्ता आहे, मला मानधन कशाला?'' हे कार्यकर्तापण त्यांनी शेवटपर्यंत जपले. जोपर्यंत शरीर साथ देत होते, तोपर्यंत साहित्य परिषदेच्या सर्व बैठकांना ते उपस्थित राहिले. मोकळया मनाने ते गप्पा मारीत. बालपणी माझा संघाशी कसा संबंध आला याचा किस्साही ते सांगत. संघसंस्काराचे पेरलेले बीज जळून गेले नाही. अनुकूलता निर्माण झाल्यावर त्याला पालवी फुटली. यामुळेदेखील संघसंस्काराच्या अक्षयतेची अनुभूती आली.

वेगवेगळया पुरस्कारांचा विषय एकदा निघाला असता डॉ. आनंद यादव सहजपणे म्हणून गेले, ''मी समरसता साहित्य संमेलनाचा पहिला अध्यक्ष झालो, हा माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ सन्मान आहे असे मी मानतो.'' त्यांचे हे वाक्य ऐकून अभिमानाने छाती फुगून गेली आणि पूर्वीपासून ताठ असलेली मान अधिक ताठ झाली. मोतीबागेत त्यांचे येणेही खूप वाढत गेले. दामूअण्णा, प्रल्हादजी यांच्याशी त्यांचे संवाद घडू लागले. एकदा ते मला म्हणाले की, ''ही दोन माणसे फार मोठया उंचीची माणसे आहेत. प्रल्हादजी तर एक कादंबरीचा विषय आहे.''


डॉ. आनंद यादव 2009 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तेव्हा तुकारामांवरील त्यांची कादंबरी नुकताच प्रकाशित झाली होती. या कादंबरीने मराठी साहित्यविश्वात वादळ निर्माण केले. वारकरी संप्रदायातील एका गटाने जोरदार आंदोलन केले. प्रकाशकाला ही कादंबरी मागे घ्यायला भाग पाडले. आंदोलक येथवरच थांबले नाहीत, त्यांनी डॉ. आनंद यादव यांचे साहित्य संमेलन उधळून लावू अशी धमकी दिली. डॉ. आनंद यादव यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या 'पुरोगामी' महाराष्ट्रात एका साहित्यिकाची वाचा झुंडशाहीने बंद पाडण्याचा हा प्रकार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला लागलेला कलंक आहे. महाराष्ट्रात संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वर यांच्यावर अभद्र लेखन करणारी मंडळी काही कमी नाहीत. त्यांच्या लिखाणावर आक्षेप घेतला असे कधी वाचण्यात येत नाही. मग डॉ. आनंद यादव यांनाच लक्ष्य का करण्यात आले? त्यांचा पूर्वेतिहास तर श्रध्दाभंजनाचा नाही, महापुरुषांच्या निंदानालस्तीचा नाही. एक साहित्यिक, एक कांदबरीकार आपल्या प्रतिभेने जग बघत असतो. त्यातील पात्रांची निर्मिती करतो, ती सजीव करतो आणि त्या पात्रांच्या मुखातून त्याला आकलन झालेले विश्व तो मांडत असतो. ही त्याची प्रतिभासंपन्नता असते. ती नाकारणे ही भारतीय परंपरा नाही. आपल्या देशात वेदनिंदकांनादेखील आपल्या भावविश्वात सन्मानाचे स्थान असते.

अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला याची खंत किंवा विषाद डॉ. आनंद यादव यांच्या बोलण्यातून कधी प्रकट झाला नाही. त्यांनी सर्व प्रसंग स्थितप्रज्ञ वृत्तीने स्वीकारला. ना खंत ना खेद अशा मनोभूमिकेत ते राहिले. मनाची ही अवस्थादेखील कठीण गोष्ट आहे. महान साहित्यिक हा एका अर्थाने परमेश्वराप्रमाणे स्वतंत्र प्रतिमा सृष्टी निर्माण करणाराच असतो. जे निर्माण केले आहे त्याच्यापासून पूर्ण अलिप्त. इदम् न मम या भूमिकेत राहणारा. डॉ.आनंद यादव मराठी रसिकाला साहित्यानंद देण्यासाठी जगले, लिहीत राहिले, प्रसंगी बोलत राहिले. साहित्याच्या या आनंदयात्रीला विनम्र प्रणाम.

आनंद यादव यांची साहित्य संपदा

ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे वयाच्या 83व्या वर्षी नुकतेच निधन झाले. 'झोंबी' या आपल्या आत्मचरित्रात्मक कादंबरीतून ग्रामीण दुरवस्थेची गाथा त्यांनी मांडली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावी गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या यादव यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन मराठी व संस्कृत भाषांत एम.ए.च्या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर पुणे विद्यापीठातून पीएच.डी.देखील मिळवली. प्रारंभी पंढरपूर येथे अध्यापन व आकाशवाणी केंद्रावर नोकरी केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. 60च्या दशकात मराठी ग्रामीण साहित्याला विशेष लोकप्रियता लाभत असतानाच यादव यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली होती. 1967 साली खळाळ हा त्यांचा कथासंग्रह मौज प्रकाशन गृहाने प्रसिध्द केला. पुढे त्यांच्या गोतावळा, नटरंग, माउली, घर, काचवेल आदी कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. एकलकोंडा, कलेचे कातडे, यांशिवाय लोकसखा ज्ञानेश्वर आणि संतसूर्य तुकाराम या चरित्रात्मक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. घरजावई, माळावरची मैना, शेवटची लढाई, आदिताल, डवरणी, उखडलेली झाडं, भूमिकन्या हे त्यांचे अन्य कथासंग्रह होत. स्पर्शकमळे, पाणभवरे, मातीखालची माती, साहित्यिकाचा गाव, ग्रामसंस्कृती अशी ललित पुस्तकेही त्यांनी लिहिली. यांसह हिरवे जग, मळयाची माती हे काव्यसंग्रह, तर मायलेकरे, रानमेवा, सैनिकहो तुमच्यासाठी हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत. ग्रामीण साहित्य - स्वरूप आणि समस्या, मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती, साहित्याची निर्मिती प्रक्रिया, मराठी लघुनिबंधांचा इतिहास, आत्मचरित्र मीमांसा, 1960नंतरची सामाजिक स्थिती व साहित्यातील नवे प्रवाह, ग्रामसंस्कृती हे त्यांचे वैचारिक व समीक्षात्मक लेखन होय. मातीतले मोती, निळे दिवस, तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा, कतावैभव, माझ्या आठवणी आणि अनुभव - विठ्ठल रामजी शिंदे यांसारख्या पुस्तकाचे त्यांनी संपादनही केले. 82व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बहुमताने त्यांची निवड झाली होती, परंतु संतसूर्य तुकाराम या आपल्या चरित्रात्मक कादंबरीतील मजकुराबाबत वाद निर्माण झाल्याने त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

vivekedit@gmail.com