खान्देशाने दिले भाजपाला भरभरून यश

विवेक मराठी    06-Dec-2016
Total Views |

खान्देशात भाजपाला विधानसभा निवडणुकांपेक्षाही नुकत्याच संपलेल्या नगरपालिका निवडणुकीत अधिक यश मिळाले. खान्देशात झालेल्या पहिल्या टप्प्यातील 16 पालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक  9 जागांवर विजय मिळविला. 3 ठिकाणी शहर विकास आघाडीला, 3 ठिकाणी शिवसेनेला व एका ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले. अंमळनेर वगळता चोपडा व रावेरमध्ये स्थापन झालेल्या शहर विकास आघाडीमध्ये भाजपाचा सहभाग होता हे विशेष.
चु
रशीच्या या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, सावदा, फैजपूर, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव या बारापैकी सहा नगरपालिकांमध्ये, तर बोदवड नगरपंचायतमध्ये भाजपाने विजय मिळविला. या पक्षाने धुळे जिल्ह्यातील दोंडाइचा व नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यात विजय मिळवून खान्देशातील आपल्या वर्चस्वावर पुन्हा एकदा श्ािक्कामोर्तब केले. श्ािरपूर वगळता या तिन्ही जिल्ह्यांतून काँग्रेसला आलेले अपयश व राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव या निवडणुकीने सिध्द केला असून शिवसेनेलाही उतरती कळा लागल्याचे दिसून आले. सत्तेत सहभागी असूनही सतत सरकारविरोधी तुणतुणे वाजविणाऱ्या शिवसेनेच्या गोटात घुसून भाजपाने काही ठिकाणी नगराध्यक्षपद पटकावले. त्यात एरंडोल व पारोळे यांचा समावेश आहे. धरणगावचा निसटता विजय शिवसेनेची तालुक्यातून होणाऱ्या अखेरचा संकेत देणारा आहे. यावलमध्ये या पक्षाचा नगराध्यक्ष असला, तरी येथे या पक्षाचा फक्त एक नगरसेवक निवडून आला आहे. पाचोऱ्यात सेनेचा नगराध्यक्ष झाला असला, तरी 26पैकी शिवसेनेचे फक्त 11 सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे 7, तर अपक्ष 6 नगरसेवक आहेत.

पुन्हा काँग्रेसमुक्त जळगाव जिल्हा

या पालिका निवडणुकीत विधानसभेपेक्षाही जादा यश मिळाले असून काँग्रेस व राष्ट्रवादीची पार दाणादाण उडाल्याचे दिसले. विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात किमान पारोळयात तरी राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली होती. परंतु पारोळा पालिकेतही भाजपाने नगराध्यक्षपद पटकावून विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटलांना धक्का दिला. या पक्षाला जिल्ह्यात कुठेच भरीव यश मिळाले नाही.

तीच गत काँग्रेसची. स्वबळावर आपली डाळ श्ािजणार नाही म्हणून या पक्षातील धुरीणांनी अंमळनेर, चोपडा व रावेर येथे स्थानिक आघाडीत घुसून थोडेफार यश मिळविले. मात्र हे यश त्या पक्षाचे म्हणता येणार नाही. चोपडयात डॉ. संदीप पाटील यांच्या प्रयत्नांमुळे स्थानिक विकास आघाडीने शिवसेनेला धूळ चारली, तर अंमळनेरमध्ये माजी आमदार साहेबराव पाटील व भाजपातून निष्कासित अनिल भाईदास पाटील यांच्या शहर विकास व तालुका विकास आघाडीत सहभागी होण्याच्या र्निणय ऍड. ललिता पाटील यांनी घेऊन काँग्रेसची इभ्रत राखली. मात्र हे आघाडयांचे यश असून जळगाव जिल्ह्यातून काँग्रेस खरोखर हद्दपार झाल्याचे दिसून आले.

श्ािरपुरात पुन्हा अमरीशभाईंची जादू

खान्देशातील श्ािरपूर नगरपालिकेची सत्ता पुन्हा एकदा अमरीशभाई पटेल गटाकडे गेली. आ. अमरीशभाई पटेल यांच्या विकासकामांमुळे येथे वर्षानुवर्षे जनतेने त्यांच्या बाजूनेच कल दिला असून या निवडणुकीतही वेगळे काही चित्र पाहायला मिळाले नाही. अमरीशभाईंच्या माध्यमातून खान्देशात काँग्रेसला मिळालेले हे एकमेव यश. येथे या पक्षाचे 30पैकी 21 नगरसेवक निवडून आले असले, तरी भाजपाच्या 7 जणांचा विजय लक्षणीय मानला जात आहे. काँग्रेसचा हा अखेरचा विजय असल्याचे येथे मानले जात आहे.

शहाद्यातही भाजपा

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पालिकेत भाजपाचे 10 सदस्य निवडून आले असून नगराध्यक्षपद भाजपानेच बळकावले आहे. काँग्रेसने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या असल्या, तरी नगराध्यक्षपद मात्र गमावले आहे. या नंदुरबार-शहाद्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या संस्थानाला लागलेली ही घरघर असल्याची चर्चा शहाद्यात होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसची एक जागा मिळाली, तर शिवसेनेचा कुठेच धांगपत्ता लागला नाही.

रावळांनी दोंडाइचा राखले

श्ािरपूरमध्ये अमरीशभाई पटेल यांच्या वर्चस्वाप्रमाणे दोंडाइचात भाजपा नेते जयकुमार रावळांचे वर्चस्व आहे. जयकुमार रावळ यांच्या माध्यमातून रावळ कुटुंबातील तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली असून विधानसभेप्रमाणे नगरपालिकेतही भाजपाने निर्भेळ यश मिळविले. येथे भाजपाने 20, तर काँग्रेसने 3 जागा जिंकल्या. इतर पक्षांची दाणादाण उडाली.

अंमळनेरात 'दादाग्ािरी हरली'

विधानसभा निवडणुकीत भाजपाचे अनिल पाटील, राष्ट्रवादीचे साहेबराव पाटील यांच्यातील मतविभागणीचा फायदा उचलीत श्ािरीष चौधरी यांनी विजय मिळविला होता. मात्र हा विजय त्यांच्या कर्तृत्वाचा नव्हता, हे या पालिका निवडणुकीने सिध्द करून दाखविले. विधानभेच्या वेळी आपण केलेली चूक दुरुस्तीची संधी पालिका निवडणुकीतून मतदारांनी मिळविली आणि विद्यमान अपक्ष आमदार श्ािरीष चौधरी यांना धोबीपछाड दिली. अंमळनेरच्या नगराध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या शहर विकास आघाडीच्या पुष्पलता साहेबराव पाटील या जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष ठरल्या. या आघाडीचेच सर्वाधिक - म्हणजे 16 नगरसेवक निवडून आले.

पुष्पलता पाटील यांचे यश म्हणजे आ. श्ािरीष चौधरी गटाच्या दादाग्ािरीचे परिणाम असल्याची शहर व तालुक्यात चर्चा आहे. ही दादाग्ािरी या गटाचीच नाही, तर खुद्द आमदारांची असल्याचे ऐन मतदानाच्या दिवशी दिसून आले. भाजपातून निष्कासित व जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांना मतदानाच्या दिवशी आर.के. नगर भागात जबर मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की अनिल पाटील यांना अतिदक्षता विभागात भरती करावे लागले. आमदारांच्या दादाग्ािरीला पालिका निवडणुकीतून जनतेने इशारा दिल्याचे दिसून येत असून ग्रामीण जनतेने आता येत्या जि.प. निवडणुकीत आमदारांचा पुरता नक्षा उतरविण्याची तयारी केल्याची चर्चा आहे.

धरणगावकरांची संधी थोडक्यात हुकली

वर्षानुवर्षे स्वच्छ व भरपूर पाणी पुरविण्याच्या आश्वासनाच्या बळावर पालिका ताब्यात घेणाऱ्या शिवसेनेला या निवडणुकीत निरोप  देण्याचा र्निणय धरणगावकरांनी घेतला होता, असे फक्त 185 मतांनी झालेल्या सेनेच्या विजयातून सिध्द होते. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात आमदारांची पोकळ आश्वासने हाच चर्चेचा विषय होता. पुन:पुन्हा फिल्टर प्लान्ट, दररोज पाणीपुरवठा, स्वच्छता हा विषय रेटून शिवसेना येथे निवडणुका जिंकत आली आहे. संध्या मंत्री असलेले गुलाबराव पाटील ''ह्या सगळया गोष्टी आठ दिवसात करतो, महिन्याभरात करतो, सहा महिन्यात करतो'' असे सतत सांगत आलेत. परंतु अद्याप प्रत्यक्षात ही कामे र्मागी लागली नाहीत. पूर्वी ते फक्त आमदार होते, आता तर मंत्री झाले आहेत. आता तरी काही करतील अशी लोकांची आशा होती. परंतु मंत्री होऊनही आता सहा महिने उलटलेत, तरीही वरील आश्वासनांबाबत ठोस काहीच झालेले नाही. नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करून मंत्री गुलाबराव पाटलांना झणझणीत अंजन घालण्याची संधी धरणगावकरांना आली होती. परंतु ती थोडक्यात हुकली. भाजपाचे तरुण उमेदवार संजय महाजन यांनी शिवसेनेचे सलीम पटेल यांना चांगली लढत दिली. एकगठ्ठा मुस्लीम मतांच्या बळावर सलीम पटेल जिंकून येतील हा शिवसेनेचा विश्वास कामी आला व सलीम पटेल 185 मतांनी जिंकू शकले. मात्र हा विजय सलीम पटेल यांचा आहे की शिवसेनेचा? हा येथे चर्चेचा विषय ठरला आहे. धरणगावचा विजय शिवसेनेपेक्षा 'सलीम पटेल' यांचा अधिक असल्याचे 'एकगठ्ठा' मतांच्या राजकारणातून दिसून आले. मात्र स्वच्छ, पाणीदार व बाणेदार धरणगाव बनविण्यासाठी भाजपाला निवडून द्यायची धरणगावकरांना मिळालेली संधी थोडक्यात हुकली. शिवसेनेला लागलेली उतरती कळा व देवकरांच्या रूपाने राष्ट्रवादीला मिळालेल्या नेतृत्वाचा अस्त होत चालल्याचे भाजपाच्या यशाने दिसून आले.

पारोळा व एरंडोलमध्ये सर्जिकल स्टाइक

मागच्या पालिका निवडणुकीत शिवसेना नेते सुरेशदादांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीने एरंडोल पालिकेच्या सगळया जागा जिंकल्या होत्या. म्हणजे शिवसेनेची सत्ता होती. मात्र तेथे या वेळी भाजपाने रमेश परदेशींच्या माध्यमातून व्यवस्थित ऑपरेशन करून नगराध्यक्षपद पटकाविले. तीच गत पारोळयात. तेथे कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी अशी सत्ता बदलत राहिली. या वेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सतीश पाटील व शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या गोटात घुसून भाजपाने विजय मिळविला. ह्या दोन्ही ठिकाणचा भाजपाचा विजय पुढच्या सगळया निवडणुकांमध्ये बदलाचे संकेत देणारे ठरले आहेत.

अंमळनेरातला पराभव भाजपाला चिंतादायक

अंमळनेर शहरात व तालुक्यात भाजपाला सतत विजय मिळत आलेला आहे. मात्र पालिका निवडणुकीत विद्यमान आमदार श्ािरीष चौधरी यांची आघाडी व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आघाडी यांच्यातच खरी लढत झाली. येथे भाजपा तिसऱ्या स्थानी राहिला. विधानसभा निवडणुकीत साहेबराव पाटील यांचा पराभव झाला होता. तेव्हापासूनच त्यांच्याविषयी मतदारांमध्ये सहानुभती निर्माण होऊ  लागलेली होती. त्यांच्या पत्नींच्या विजयात या सहानुभूतीचाही वाटा आहे.

एकूण या निवडणुकांत शहरी मतदारांनी भाजपाच्या पारडयात भरभरून यश टाकले आहे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्याचीच पुनरावृत्ती दिसून येईल असे संकेत मिळत आहेत.

8805221372