सुप्रजा संस्कार - उज्ज्वल भारतासाठी

विवेक मराठी    08-Dec-2016
Total Views |

गरोदरपणात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी अनेक जणी गर्भसंस्कार करणारी पुस्तकं वाचतात, ऑडिओ ऐकतात, सीडीज पाहतात. आरोग्यविषयक आयुर्वेदिक सल्ले, योगविषयक सल्ले, आजीच्या बटव्यातली औषधं असे एक ना अनेक उपाय आपल्याला या गर्भसंस्कार शिबिरांतून, पुस्तकांतून आणि अन्य दृक्-श्राव्य माध्यमांतून मिळतात. पण हे सगळं जर सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून - म्हणजे मोबाइल ऍपच्या माध्यमातून एकाच ठिकाणी मिळालं, तर?


आपली संतती संस्कारक्षम आणि निरोगी असावी, असं प्रत्येक मातेला वाटतं. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आणि ताणतणावात मातेला स्वतःचं स्वास्थ्य सांभाळणं हे तितकंच कठीण झालं आहे. अनेकदा घरात मोठं माणूस नसतं, त्यामुळे गरोदरपणातल्या अडचणींना कसं सामोरं जायचं असा प्रश्न उभा राहतो. या वेळी आपल्या मदतीला धावून येतात गर्भसंस्कार शिबिरं आणि मार्गदर्शक पुस्तकं.

गरोदरपणात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी अनेक जणी गर्भसंस्कार करणारी पुस्तकं वाचतात, ऑडिओ ऐकतात, सीडीज पाहतात. आरोग्यविषयक आयुर्वेदिक सल्ले, योगविषयक सल्ले, आजीच्या बटव्यातली औषधं असे एक ना अनेक उपाय आपल्याला या गर्भसंस्कार शिबिरांतून, पुस्तकांतून आणि अन्य दृक्-श्राव्य माध्यमांतून मिळतात. पण हे सगळं जर सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून - म्हणजे मोबाइल ऍपच्या माध्यमातून एकाच ठिकाणी मिळालं, तर ?

आरोग्य भारतीतर्फे दि. 22 डिसेंबर रोजी मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ येथे सुप्रजा संस्कार या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या वेळी आरोग्य भारतीतर्फे सुप्रजा संस्कार या विशेषांकाचं प्रकाशनही केलं जाणार आहे व याच नावाचं मोबाइल ऍप्लिकेशनही लाँच होणार आहे. आरोग्य भारतीचे संघटन सचिव डॉ. दीपक घुमे, डॉ. ज्योती जगताप, डॉ. मधुरा कुलकर्णी आणि डॉ. जयश्री त्रिभुवन यांनी सुप्रजा संस्कार याविषयी अधिक माहिती दिली. त्या माहितीचा हा सविस्तर आढावा.

अपेक्षित संतती ही आरोग्यदृष्टया सुदृढ तर व्हावीच, तशीच ती संस्कारक्षमही व्हावी, ती उज्ज्वल भारताची उज्ज्वल नागरिक असावी, देशाप्रती तिचं मन समर्पित व्हावं यासाठी गर्भसंस्कारातून आरोग्यविषयक सल्ल्यांसह, तिच्या मनावर देशभक्तीचेही संस्कार व्हावेत या हेतूने या कार्यशाळेची आणि ऍप्लिकेशनची आखणी करण्यात आली आहे. गर्भावस्थापूर्व, गर्भावस्था आणि प्रसूतिपश्चात असे तीन टप्पे. या तीन टप्प्यांवर देशभरात 24 संस्था वेगवेगळया स्वरूपाचं काम करतात. काही योगतज्ज्ञ आहेत, काही वेद-ऋचा पठण करणारे आहेत, काही आयुर्वेदतज्ज्ञ आहेत, काही होमिओपॅथीतज्ज्ञ आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, फिटनेसतज्ज्ञ आहेत, निसर्गोपचारतज्ज्ञ आहेत. हे सगळे जण आपापल्या पध्दतीनुसार गर्भसंस्कार तसंच आईच्या व बाळाच्या आरोग्यात मोलाची भूमिका बजावतात. या सगळया संस्थांच्या कामाच्या पध्दतीचं डॉक्युमेंटेशन करण्यात आलं आणि त्याचं उपयोजन या ऍप्लिकेशनमध्ये करण्यात आलं आहे.

गर्भ राहिल्यानंतरच नव्हे, तर बाळाचा विचार सुरू असतानाच गर्भसंस्कारांचा विचार करणं गरजेचं असतं. गर्भधारणेपूर्वी पती आणि पत्नी दोघांनी शरीरशुध्दी करून घेतल्यास होणाऱ्या बाळाला त्याचा उपयोग होतो. सकारात्मक पुस्तकं वाचल्यास पोटातील बाळही त्या पध्दतीने विचार करू लागतं. व्यायाम केल्यास प्रसूतिप्रक्रियेत त्रास कमी होतो, या व अशा अनेक स्वरूपाचे सल्ले तसंच वैद्यकीय मार्गदर्शन या ऍप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. गर्भ राहिल्यानंतर शरीरात, मानसिक अवस्थेत होणारे बदल ते बाळाच्या जन्मानंतर होणारे बदल स्वीकारताना स्वतःमध्ये कोणते बदल करावेत, आहार कसा असावा, तब्येतीच्या तक्रारींवर कोणते उपाय करावेत यासाठी मोबाइल ऍप्लिकेशनसह ग़र्भधारणेशी संबंधित विविध पुस्तिकांचा संच छापण्यात आला आहे. या मोबाइल ऍप्लिकेशनवर या सगळया प्रश्नांची उत्तरं मातेच्या प्रकृतीनुसार देण्यात आली आहेत. गर्भावस्थेत प्रत्येक महिन्याचा आहार, व्यायाम, प्रसूतिपश्चात आहार, व्यायाम व पॅथॉलॉजिकल नोंदी या सगळयांचं पुस्तिकांमध्ये महिनावार विभाजन केलेलं आहे. ऍप्लिकेशनसह एक वेबपेजही तयार करण्यात आलं आहे.


अनेक संस्थांतील वेगवेगळे स्तुत्य उपक्रम एकत्र करून पुस्तिकेचा आणि मोबाइल ऍप्लिकेशनचा हा आराखडा तयार करण्यात आला. दिल्लीतील 'भारत की धरोहर' नावाची गर्भवतींसाठी आयुर्वेदिक उपचारपध्दती राबवणारी संस्था, गुजरातमधील गर्भ अनुसंधान केंद्र, विद्याभारती यांमधील जे जे माता-बालकांना उपयुक्त, त्याचा समावेश करण्यात आला आहे. मुळातच अपत्यात मातृशक्तीच्या माध्यमातून देशभक्ती रुजावी, पुढच्या पिढीने भारतमातेची सेवा करावी हाच हेतू हा उपक्रम सुरू करताना होता. त्यामुळे या ऍप्लिकेशनमध्ये आणि वेबपेजवर आरोग्यविषयक सल्ल्यांसह वेदांतील ऋचा, श्लोक, बोधकथा, ऐतिहासिक व पौराणिक कथा, आदर्श व्यक्तिमत्त्वांची चरित्रं, आल्हादकारक संगीताच्या क्लिप्स आदी गोष्टी दृक्-श्राव्य स्वरूपात असणार आहेत. ऋचा, सुश्राव्य संगीत या सगळयांमुळे सकारात्मक लहरी उत्पन्न होऊन गर्भावर त्याचा अपेक्षित परिणाम होईल. तसंच बोधकथा, आदर्श व्यक्तींची चरित्रं वाचल्याने, ऐकल्याने गर्भात असतानाच बाळावर त्यांचे संस्कार होतील. 

सुप्रजा संस्कार या उपक्रमाअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालयं, आयुर्वेद महाविद्यालयांची रुग्णालयं व खासगी रुग्णालयं अशी 20 समुपदेशन केंद्रं सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स, समुपदेशक व आरोग्य भारतीचे कार्यकर्ते माता-बालकांसाठी सदैव कार्यतत्पर असतील. मातेच्या आरोग्याचा आलेख तपासला जाईल, तसंच तिला आवश्यक असणाऱ्या पोषक आहाराची, व्यायामाची तिला माहिती दिली जाईल. या समुपदेशन केंद्रांवर टॅब्लेट्स पुरवण्यात येणार आहेत. येणाऱ्या रुग्णाचे सगळे रिपोट्र्स, त्याचे नियमित अपडेट्स त्या टॅबलेटमध्ये साठवून ठेवण्यात येतात. त्यामुळे एका क्लिकवर रुग्णाची सगळी पार्श्वभूमी समुपदेशकांना मिळते. एकूण 100 डॉक्टर्स, समुपदेशक यांना याबाबत ट्रेनिंग देण्यात येणार आहे.  दि. 18 ते 28 फेब्रुवारी या काळात हे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतर ही केंद्रं सुरू होणार आहेत.   

 

गरोदरपणात स्त्रियांनी योग्य पध्दतीने योगसाधना केली आणि मन प्रफुल्लित करणारे यमनसारखे राग ऐकले, ॐकारसाधना केली, तर गर्भावर त्याचा चांगला परिणाम होतो असं आम्हाला संशोधनात लक्षात आलं. म्हणूनच या ऍपवर आणि वेबपेजवर आम्ही काही ऑडिओ क्लिप्स आणि योगाच्या व्हिडिओ क्लिप्स टाकण्याचा निर्णय घेतला.

- डॉ. मधुरा कुलकर्णी

 

सुप्रजा संस्कारात केवळ गर्भालाच महत्त्व आहे असं नाही, तर मातेलाही तितकंच महत्त्व आहे. मातेचं आरोग्यही चांगलं राहायला हवं. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव याने दोषांचं प्रमाण वाढतं. अनेकदा प्रसूतीदरम्यान त्रास होतो. त्यामुळे बाळात जन्मतःच काही दोष वा आजार निर्माण होतात. अशा वेळी बाळाचा विचार करताना आयुर्वेदिक उपचारपध्दतींचा अवलंब केलाआणि नंतरही उपचार सुरू ठेवले, तर सुदृढ संतती होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

- डॉ. ज्योती जगताप

 

मातेच्या आणि बालकांच्या आरोग्याची आज घेतलेली काळजी ही देशाची उद्याची पिढी घडवणारी आहे. निरनिराळया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून सशक्त, सुदृढ आणि सुसंस्कृत पिढी उदयाला येईल. दर महिन्याच्या 9 तारखेला खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी माता-बालकांना मोफत सेवा द्यावी, असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. उद्याच्या भारतासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

- डॉ. दीपक घुमे

 

पूर्वीच्या काळी घरात आई, आजी, सासू असायची. त्यामुळे गरोदरपणी कोणतीही अडचण आली, तरी घरातल्या घरात त्यावर मार्ग निघत असे. घरातलं वातावरणही सांस्कृतिक असे. निरनिराळी व्रतं केली जात, श्लोकपठण होत असे. या सगळयाचा सकारात्मक परिणाम मुलांवर व्हायचा. ज्या ज्या गोष्टींचा माता अनुभव घेते, त्याचा परिणाम बाळाच्या व्यक्तिमत्त्वावर होतो.

- डॉ. जयश्री त्रिभुवन

 

सुप्रजा संस्कार कार्यशाळा नोंदणी

संपर्क :

डॉ. मधुरा कुलकर्णी

 9892444924/9867140014

(नोंदणी 18 डिसेंबरपर्यंत)