झाकीर नाईक आणि दादा कोंडके

विवेक मराठी    17-Jul-2016   
Total Views |

झाकीर नाईक अल्लाहच्या नावाने कुठल्याही थापा ठोकायला मोकळे असतात. मग समोर बसलेले सुखावतात आणि टाळया पिटतात. दादा कोंडके यांच्या त्या वगनाटयात मधू कडू जसा आपल्याविषयी तुकोबांनी इतके काही लिहून ठेवले, म्हणून असाच भारावून जायचा, त्यापेक्षा नाईक यांनी भारावून टाकलेल्यांनी मनःस्थिती किंचितही वेगळी नसते. आपल्या गळयात हार घालून कत्तलखान्याकडे धावत सुटलेल्यांना कुठला ईश्वर किंवा राखणदार वाचवू शकत नसतो. कोणाला झाकीर नाईक यांच्याकडून बुध्दीने हलाल व्हायला आवडते, तर कोणाला बुऱ्हान वानीकडून मरायला आवडते, इतकाच काय तो फरक असतो.


आजच्या पिढीला दादा कोंडके ऐकून माहीत आहेत. तत्कालीन गाजलेल्या विनोदी चित्रपटांमुळे आधीच्या पिढीला दादांची ओळख आहे. पण त्याच्याही मागची पिढी दादा कोंडकेंना सोंगाडया म्हणूनच ओळखते. वसंत सबनीसांच्या 'विच्छा माझी पुरी करा' या वगनाटयाने दादा नावारूपाला आले. त्यात ते शाब्दिक व प्रासंगिक विनोद करून प्रेक्षकांची वाहवा मिळवायचे. त्यात दादांनी हवालदाराची भूमिका केलेली होती आणि मधू कडू नावाचा त्यांचा जोडीदार शिपायाचे पात्र रंगवायचा. एका प्रसंगात त्या सहकारी मित्राच्या मदतीचे कौतुक करताना दादा धमाल उडवून द्यायचे. ''तुझ्यासारखा मित्र अमूल्य असतो'' असे सांगताना दादा म्हणायचे, ''तुकोबांनी तुझ्याबद्दल लिहून ठेवलेय - फ्रेंड इन नीड इज फ़्रेंड इन्डीड.'' त्या शिपायाला त्यातले काही उमजत नाही. पण तुकोबांनी आपल्याबद्दल काही लिहून ठेवलेय, एवढयानेच तो भारावून जायचा. हा विनोद लोकांना उमजत असे आणि लोक खळखळून हसायचे. पण सुदैवाने तेव्हा समाजात व प्रेक्षकात बुध्दिमंत विचारवंतांचा आजच्याइतका भरणा नव्हता. म्हणून अशी विधाने व वक्तव्ये विनोद म्हणून ऐकून सोडून दिली जात. आजचा जमाना असता, तर काय झाले असते त्याची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी वाटते. कारण आजच्या अनेक शहाण्यांना, विचारवंत जाणत्यांना डॉ. झाकीर नाईकही विद्वान वाटतो. कारण तोही दादा कोंडके यांच्याप्रमाणे कसलेही संदर्भ वा उल्लेख समोर बसलेल्या श्रोत्यांच्या तोंडावर फेकतो आणि त्यात बसलेल्या अनेक जाणत्यांनाही भारावून टाकतो. जगातल्या सर्व धर्मांचा व धर्मशास्त्रांचा परिपूर्ण अभ्यास केलेला कोणी माणूस असेल, तर तो एकमेवाद्वितीय झाकीर नाईक अशीच अनेकांची समजूत आहे. अशी जर काही मान्यवरांची समजूत असेल, तर इस्लामवर अगाध श्रध्दा असलेल्या सामान्य मुस्लिमांचे काय? कारण त्याला आपला धर्म जगात सर्वश्रेष्ठ असल्याचेच ऐकायचे असते आणि म्हणूनच आपल्या जीवनातील तमाम समस्यांचा भार अन्य कशावर फेकून समाधानी व्हायचे असते. झाकीर नाईक अशा लोकांना त्यांच्या दु:ख, वेदना व समस्यांपासून मुक्ती देण्याचे महान कार्य सांप्रत काळात करतो आहे. कुठल्याही धर्मशास्त्र, धर्म किंवा तर्कशास्त्राशी त्याचा काडीचा संबंध नाही. जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम गर्दीसमोर व्याख्यान देताना झाकीर नाईक यांनी मुस्लिमांना आपल्या मुस्लीम असल्याची थोरवी पटवून दिली. त्यात गणपतीचे कथानक रंगवून सांगितल्याची एक क्लिप इंटरनेटवर उपलब्ध आहे. ती काळजीपूर्वक वाचून या माणसाला समजून घेण्याचा प्रयास केला, तर तो किती विनोदी आहे, त्याची प्रचिती येऊ शकते.

आपल्या गणपतीभक्त मित्राने प्रसाद दिल्यावर आपण त्याच्याशी काय बोललो, किंवा बोलू ते सांगताना झाकीर नाईक गणपतीच्या जन्माचे कथानक सांगतात. शिवाची पत्नी पार्वती आपल्या पर्णकुटीत विश्रांती घेत असते आणि त्यात व्यत्यय नको म्हणून ती अंगावरच्या मळापासून एक मूर्ती बनवून त्याला राखणदार म्हणून दारात उभा करते. नंतर शिव भगवान परत येतात आणि हा रखवालदार त्यांना रोखतो. तेव्हा चिडलेले भगवान शंकर त्याचे मुंडके उडवून देतात. मग ते सापडत नाही, म्हणून कुठलेही मुंडके आणून त्या धडाला लावले जाते. त्यातून गणेश भगवान तयार झाले, वगैरे. त्यातला झाकीर नाईक यांचा मुद्दा असा, की जो भगवान शिव आपल्याच मुलाला म्हणजे गणपतीला ओळखत नाही, त्याची पूजा भक्ती करून काय उपयोग? उद्या भक्त संकटात असेल आणि त्याने शिव भगवानाचा धावा केला, तर तो भक्ताला ओळखणार कसा? ज्याला आपलाच पुत्र ओळखता येत नाही, तो भक्ताला ओळखणार कसा नि मदत तरी करणार कसा? किती बिनतोड युक्तिवाद आहे ना? पण हे फक्त हिंदू पुराणात वा धर्मातच आहे काय? भगवान किंवा ईश्वर ज्याला म्हणतात, तो सर्वज्ञ असल्याची एक धारणा आहे. म्हणूनच शिवाने सर्व काही ओळखले पाहिजे, जाणले पाहिजे असे झाकीर नाईक यांचे त्यामागचे गृहीत आहे. कुठल्याही पुस्तकी पंडिताला ते चटकन पटणारे आहे. पण हिंदूंचा कुठला देव भगवान आपल्या मुलाला वा भक्ताला ओळखत नाही, तर अन्य धर्मातला भगवान वा ईश्वर तरी परस्पर सगळयांना ओळखतो काय? ओळखत असेल तर कसा ओळखणार? उदाहरणार्थ, झाकीर नाईक ज्याला सर्वज्ञ अल्ला ईश्वर मानतात, त्याला तरी जगातल्या सर्व गोष्टी व आपले अनुयायी ठाऊक आहेत काय? भक्त अनुयायांना अल्ला तरी ओळखतो काय? नसेल, तर तो झाकीर नाईक यांच्या मदतीला संकटकाळात कसा धावून येणार? जे तर्कशास्त्र नाईक हिंदू देवतांना लावतात, तेच त्यांच्याही जिवापाड श्रध्दास्थान असलेल्या अल्लाला लागू होते ना? त्यालाही कुणाही अनुयायाला वा मुस्लिमाला परस्पर ओळखता आले पाहिजे. त्यासाठी कुठले ओळखपत्र वा ओळखपरेड देण्याचे काही कारण असता कामा नये. अल्लापाशी तितकी क्षमता असल्याचा कुठला पुरावा त्याच व्याख्यान-प्रवचनातून झाकीर नाईक देत नाहीत. याचा अर्थ असा, की इतरांच्या धर्माची व देवदेवतांची टिंगल करणे यापेक्षा त्यांच्यापाशी कुठले तर्कशास्त्र नाही. कारण अल्ला आहे तर कसा आहे आणि कुठे आहे, त्याचा तपशील त्यांच्यापाशीही नाही. ते ज्याला अल्लाह म्हणतात, त्याने प्रेषित महंमदाला इस्लाम धर्माची शिकवण दिली, इतकाच दावा आहे. पण खुद्द प्रेषित वगळता अन्य कोणीही अल्लाह बघितलेला नाही की त्याचे वर्णन कोणी कुठे करून ठेवलेले नाही. मग त्या अल्लाहने झाकीर नाईकना ओळखण्याची गोष्ट आहे, तशीच या भक्तानेही अल्ला परमेश्वराला ओळखण्याची गरज नाही काय? झाकीर नाईक यांच्यासमोर उद्या अल्लाह येऊन उभा ठाकला, तर हे प्रवचनकार त्याला ओळखणार कसे?

म्हणजे असे की झाकीर नाईक आज शेकडो कार्यक्रमांतून प्रवचन देतात आणि ज्या अल्लाहच्या गोष्टी रंगवून सांगतात, त्याचा खरेखोटेपणा त्यांनी तरी तपासून कधी बघितला आहे काय? ज्या अल्लाहला त्यांनी कधी बघितला नाही की ओळखही झालेली नाही, त्याच्या बाबतीत नाईक सांगतात, त्याला गावगप्पा वा भ्रम नाही तर काय म्हणायचे? समजा, जे काही कुराण अल्लाहने प्रेषितामार्फत पृथ्वीतलावरील मानवजातीच्या कल्याणासाठी पाठवले, त्यात काही गफलत असेल, तर काय करायचे? जे कुराण आज नाईक कथन करून टाळया व वाहवा मिळवतात, ते खरेच प्रेषिताने ऐकलेले व कथन केलेले होते, याची हमी कोणती? कारण प्रेषिताचे चरित्र बघितले तर ते स्वत: साक्षर नव्हते. म्हणूनच अल्लाहचा देवदूत कुराणातील श्लोक त्यांच्यापर्यंत घेऊन आला, यावर श्रध्दा असायला हरकत नाही. पण जे काही तिथून आले व प्रेषितांच्या कुणा सहकाऱ्यांनी वेळोवेळी नोंदवून ठेवले, तेच अल्लाहचे शब्द असल्याची खातरजमा कोणी कधी केली आहे काय? कारण आपण जे शब्द ऐकले व कथन करीत आहोत, तेच तसेच्या तसे आपल्या सहकाऱ्याने टिपलेत, हे तपासू शकणारी एकमेव व्यक्ती होती, ते प्रेषित महंमद! पण तेच साक्षर नव्हते किंवा त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. मग जे लिहिलेले कुराण आज झाकीर नाईक फडकावत असतात, तेच नेमके शब्द अल्लाहने देवदूतामार्फत कळवलेले शब्द आहेत, याची खातरजमा कशी होऊ शकते? नसेल होत आणि नाईकसारखी मंडळी त्यात काही गफलत करीत असतील, तर काय करायचे? खुद्द अल्लाहला म्हणजे इस्लामच्या एकमेव ईश्वराला त्यातल्या गफलती दूर करायच्या असतील, तर कोणता मार्ग आहे? ते करायला ईश्वराने कोणी देवदूत पाठवला किंवा स्वत:च पुढे यायचे ठरवले, तर त्याच्यावर कोण किती विश्वास ठेवणार आहे? झाकीर नाईक तरी त्याला अल्लाह म्हणून ओळखतील काय? कारण कोणीही अल्लाहला बघितलेले नाही, हा त्यांचाच दावा आहे. म्हणून शिव भगवान आपल्या मुलाला ओळखत नाही, हे तर्कशास्त्र झाकीर नाईक यांनी जरा आपल्याच धर्माला व धर्मातील ईश्वराला लावून बघावे. त्याचेही उत्तर तिथेच द्यावे. जे तर्कशास्त्र शिव किंवा गणपती भगवानाची खिल्ली उडवायला नाईक वापरतात, त्याच तर्काने ते आपल्याच परमपवित्र अल्लाहची खिल्ली उडवत असतात ही त्यातली वस्तुस्थिती आहे. पण त्यांच्यासमोर इस्लामचे कोडकौतुक ऐकायलाच जमलेल्यांना, नाईक इस्लामच्या एकमेव अल्लाहचीच टवाळी करतात, हे लक्षात येत नाही. ते बिचारे मुस्लीम हिंदू देवदेवतांची खिल्ली ऐकण्यात रममाण होतात आणि आपल्याही दैवताची व श्रध्देची पायमल्ली होऊ देतात. एकूणच झाकीर नाईक किती लबाड आहेत, त्याची प्रचिती त्यांच्याच तर्कशास्त्रातून येऊ शकते.

अर्थात आपले तर्कशास्त्र फसवे आहे, हे नाईक यांनाही पक्के ठाऊक आहे. पण त्यांना विद्वत्ता, बुध्दिमत्ता किंवा धर्म याच्याशी कुठलेही कर्तव्य नाही. त्यांना मुस्लिमांच्या कडव्या धर्मश्रध्देतून आपली तुंबडी भरायची असते आणि त्यासाठी परदेशातून, मुस्लीम देशातून प्रचंड पैसा मिळत असतो. तोच झाकीर नाईक यांचा खरा ईश्वर आहे. जो सामान्य मुस्लीम श्रध्देने भारावून जिहाद म्हणून आपला प्राण अर्पण करायला राजी असतो, त्याला किरकोळ रकमेसाठी लुबाडणे अवघड नसते. त्यातून हा उद्योग उभा राहिलेला आहे. संशोधन संस्था, धार्मिक प्रवचन किंवा मार्गदर्शन हा एक सोपा व्यवसाय झाला आहे. जगातील बलवान देश, तिथल्या सत्ता किंवा हेरखाती असल्या धार्मिक व धर्मदाय संस्थांना हाताशी धरून आपापले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी उपयोग करून घेत असतात. त्यांना पैसा पुरवण्याचे काम बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून होत असते. धर्मांतर घडवून आणणे, जिहादचा हिंसाचार चालवण्यासाठी आत्मघाताला सज्ज असलेले तरुण भरती करणे, अशा अनेक गोष्टी यातून सोप्या मार्गाने करता येत असतात. समाजसेवी संस्था, लोकसेवा असेही बुरखे पांघरून ह्या कारवाया चालत असतात. वरकरणी बघितले तर झाकीर नाईक विविध धर्मांची तुलनात्मक चर्चा व ऊहापोह करतात असेच भासते. पण त्यांच्या अशा व्याख्यानातून इसिस व मुजाहिदीन होण्याची प्रेरणा मिळत असेल, तर ती बाब दुर्लक्षणीय राहत नाही. उदहरणार्थ, काश्मीरच्या उपरोक्त त्याच व्याख्यानात झाकीर नाईक ''आपल्या आईची बदनामी करणाऱ्यावर तुम्ही हल्ला कराल की नाही? तुम्हाला शक्य नसेल तर भाडोत्री मारेकरी आणून बदला घ्याल की नाही?'' असे प्रश्न विचारतात. मग जे आईच्या बाबतीत आहे, तेच अल्लाहची निंदा करणाऱ्यांच्या बाबतीत करायला नको काय? असाही सवाल नाईक विचारतात. ते अल्लाहची थोरवी सांगत नाहीत, अल्लाह नावाचा ईश्वर मानवाचे कल्याण कसे करणार व उध्दार कसा करणार, त्याचे विवरण देत नाहीत. मात्र सर्वशक्तिमान अल्लाहच्या प्रतिष्ठेसाठी व सुरक्षेसाठी लढायचे आवाहन उपस्थित मुस्लिमांना करतात. जो सर्वशक्तिमान निर्माता आहे, त्याने मानवाचे संरक्षण करावे की दुबळया मोहपाशात अडकलेल्या अनुयायी मानवाने देवाला सुरक्षा द्यावी? ईश्वर इतका शक्तिमान आहे, तर त्याला मानवाने सुरक्षा देण्याची गरजच काय? झाकीर नाईक त्याचे कुठलेही तर्कशुध्द उत्तर कुठे देत नाहीत. त्यांची कुठलीही व्याख्याने प्रवचने काढून तपासून बघा. त्यात अन्य धर्मांची, देवादिकांची हेटाळणी व तार्किक तपासणी आढळेल. पण अल्लाहच्या किंवा इस्लामी देवाच्या खरेखोटेपणाविषयी मौन धारण केलेले दिसेल. ही त्यातली खरी भामटेगिरी आहे. बाकी सर्व धर्म तर्कशास्त्राच्या आधाराने तपासायचे आणि इस्लामविषयी अवाक्षर बोलायचे नाही.

गेल्या शंभर वर्षांत इस्लाममध्ये शिया-सुन्नी यांच्या पलीकडे अनेक पंथ पुढे आले आहेत. जागतिकीकरणाने त्यांच्यातले भेदभाव उफाळून पुढे आलेले आहेत. त्यापैकी सुन्नी मानल्या जाणाऱ्या पंथामध्ये सलाफी नावाचा एक उपपंथ वेगाने आक्रमक होत इतर पंथांना मागे टाकू बघत आहे. त्याला प्रामुख्याने आखाती तेलसंपन्न देशातील अतिरिक्त पैशाचे पाठबळ लाभलेले आहे. सलाफी म्हणजे प्रेषित महंमदांच्या कालखंडातील जो कडवेपणा होता, त्याचे अनुकरण होय. सगळेच सुन्नी मुस्लीम सलाफी नाहीत. पण जे नाहीत, ते भ्रष्ट मुस्लीम असून ते इस्लाम भ्रष्ट करीत असल्याची सलाफींची तक्रार आहे. त्यातून मग अशा कडवेपणा नाकारणाऱ्यांना काफिर ठरवले जाते आणि अधिकाधिक मुस्लिमांना सलाफी पंथामध्ये ओढण्याची स्पर्धा चालली आहे. त्यात इसिस, अल कायदा यासारख्या संघटना इस्लामचे जागतिक वर्चस्व सिध्द करण्यासाठी हिंसेचा अवलंब करतात, तर झाकीर नाईक यांच्यासारखे प्रचारक-प्रवचनकार शब्दातून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा उद्योग चालवीत असतात. त्याचा एकत्रित परिणाम आपण आज बघत आहोत. ओसामा बिन लादेन जिहादी व हिंसाचारी होता, म्हणून नाईक त्याचा निषेध करीत नाहीत. उलट त्याचे उदात्तीकरण करण्यास हातभार लावत असतात. अमेरिका हा जगातला सर्वात युध्दखोर देश आहे आणि म्हणूनच त्याच्या दहशतवादाशी लढत असेल तर ओसामा योग्य काम करतोय. प्रत्येक मुस्लिमाने ओसामासारखे दहशतवादी व्हावे, अशी नाईक यांची शिकवण आहे. मुद्दा इतकाच की हा तर्क फसवा आहे, अमेरिका कुणा धर्माचे राष्ट्र नाही, म्हणूनच त्याचा विरोध राजकीय असू शकतो. धार्मिक तत्त्वावर अमेरिकेशी लढायचा मुद्दा दिशाभूल करणारा आहे. कारण तो जगभरच्या कुठल्याही देशातील मुस्लिमांना हिंसेचे आवाहन करणारा आहे. जगात कुठेही घातपात घडवणे किंवा युध्दासाठी अमेरिकन नागरिकांना इस्लामचे शत्रू ठरवणे, हा तर्क नाईक देतात. तोच मान्य करायचा तर जगातल्या कुठल्याही मुस्लीम संघटनेने कुठल्याही देशात घातपात केला, तर संपूर्ण जगातले कुठलेही मुस्लीम त्यासाठी गुन्हेगार मानून त्यांना शिक्षा द्यायची काय? इराक-अफगाणिस्तान युध्दासाठी अमेरिकन राज्यकर्ते दोषी असू शकतील. पण सामान्य नागरिकांना त्यासाठी घातपाताने मारणे मुस्लिमांसाठी पवित्र कार्य ठरवून नाईक जिहादी घातपातालाच चालना देतात ना?

बांगला देशातील काही तरुणांनी अलीकडेच राजधानी ढाका येथे एका हॉटेल बेकरीत शेकडो लोकांना ओलिस ठेवून मुस्लीम नसतील त्यांचे हत्याकांड घडवून आणले, ते कुणामुळे त्या कृत्याला प्रवृत्त झाले? हे पवित्र धर्मकार्य असल्याची धारणा त्यांच्या मनात कोणी भरवली? त्याच मुलांची चौकशी करता ते नाईक यांचे अनुयायी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना कुणा बगदादीने वा लादेनने प्रशिक्षित केले नाही, की भरती केलेले नाही. त्यांना नाईक यांनी पवित्र कार्यासाठी प्रवृत्त केले. घातपात व हत्याकांड हे पवित्र धर्मकार्य असल्याची त्या तरुणांची समजूत नाईक यांनीच करून दिली. असे नाईक कुठला प्रचार करीत असतात? धर्माच्या नावाने ते हिंसाचाराचाच प्रचार व प्रसार करीत नसतात काय? इस्लामची टवाळी व निंदा होत असेल तर ती रोखण्याचे आवाहन नाईक करतात. पण तेच स्वत: ज्या पध्दतीचे तर्कशास्त्र मांडून इस्लामचे वर्णन करतात, ती इस्लामची विटंबना नाही काय? इस्लाम ही शांततेची शिकवण असेल, तर कुठल्याही युक्तिवादाने, तर्कशास्त्राने हिंसेचे समर्थन करणे हीच त्या धर्माची निंदा व बदनामी नाही काय? ते कोणी रोखायचे? आत्महत्या इस्लामला मान्य नाही, असे पांडित्य झाकीर नाईक सांगतात. पण त्याच वेळी अन्यायाच्या विरुध्द लढताना आत्महत्येचा मार्गही योग्य असल्याचाही दावा करतात. त्याचा अर्थ इतकाच, की फिदायिन म्हणून आत्मघात करताना आत्महत्येचा मार्ग पत्करणे इस्लामला मान्य आहे. पण आत्मघातकी कृत्य करणारा कुठली लढाई लढत असतो? तो सामान्य माणसांना बेसावध पकडून त्यांची हत्या करीत असतो. जे मारले जातात, ते लढणारे सैनिक नसतात की सशस्त्रही नसतात. म्हणजेच असा फिदायिन आत्महत्या करताना इतरांना हकनाक मारत असतो. त्याने एकटयाने आत्महत्या करण्याला इस्लाम मान्यता देत नाही. पण इतर निरपराधांना निष्कारण ठार मारताना मरायला मात्र इस्लाम मान्यता देतो, असे तर्क नाईक शिकवतात ना? मग ती इस्लामची निंदानालस्ती नाही तर काय आहे? कुणा मुस्लिमाने त्याचा जाब विचारला मग? झाकीर नाईक अशा प्रश्नांना कधी उत्तरे देतात काय?

अली सिना, तारेक फतेह, अन्वर शेख अशा अनेक मुस्लीम अभ्यासकांनी नाईक यांच्या पांडित्याला खुले आव्हान दिलेले आहे. पण नाईक यांनी त्यांच्या रास्त प्रश्नांना उत्तरे देण्याची हिंमत कधी दाखवलेली नाही. आपल्या घोळक्यात येणाऱ्यांनाच नाईक उत्तरे देतात. त्याचेही कारण आहे. घोळका नाईक यांना धर्मपंडित मानतो आणि त्याला छेद देणाऱ्याला जीव मुठीत धरून पळून जाण्याची वेळ येऊ शकते. सलमान रश्दी किंवा तस्लिमा नसरीन यांना सामोरे जाण्याची हिंमत कधी झाकीर नाईकनी दाखवलेली नाही. कारण त्यांच्या खऱ्या बुध्दिवादापुढे नाईक लंगडे पडणार, हे उघड आहे. साहजिकच आपल्या चाहत्यांचा किंवा सेक्युलरांचा घोळका जमा करून नाईक आपलीच टिमकी वाजवून घेत असतात. त्यात मग कुठल्याही धर्मग्रंथातले अध्याय-श्लोकांचे आकडे फेकायचे की काम संपले. त्यातून या पंडिताला जगातल्या सर्व धर्मांचे ज्ञान झाले असल्याचा आभास निर्माण होतो आणि तोच म्हणतोय म्हणून इस्लाम त्यातला सर्वश्रेष्ठ धर्म असल्याची समजूत करून घ्यायला चाहते मोकळे असतात. असे मुस्लीम मोठया संख्येने आहेत, तसेच अन्य धर्मातलेही अर्धवट कमी नाहीत. त्यात भारतीय सेक्युलरांचा भरणा असल्यास नवल नाही. त्यांना हिंदुत्व नावाच्या भुताटकीने पछाडलेले आहे. मग त्यांना झाकीरबाबांचा अंगाराधुपारा आधार देत असल्यास नवल नाही. ते आपल्या राजकीय हेतूने झाकीर नाईकच्या समर्थनाला उभे राहणार आणि नाईक त्यांची शिडी बनवून पंडित ठरला, तर आश्चर्य कुठले? आपल्याच अनुयायी मुस्लिमांना निदान एकमेकांच्या जिवावर उठू नका अशी बुध्दी जो देऊ शकत नाही, तो झाकीर नाईक यांचा अल्लाह ईश्वर नेमका कोणाला कसा ओळखतो? त्याचा खुलासा नाईक कधी करणार आहेत? माणसाला उगाच निष्कारण मारणे ही अवघ्या मानवतेची हत्या असल्याची पोपटपंची भारतीय वाहिन्यांवर अखंड ऐकायला मिळते. त्या मानवतेची गोष्ट सोडून द्या. जे कोणी मुस्लीम आहेत वा अल्लाहच्या प्रेमाने मुस्लीम झालेत, त्यापैकी कोणाचीही हत्या ही पाप असल्याची बुध्दी मुस्लिमांना त्यांचा ईश्वर अजून कशाला देत नाही? नाईक यांच्याकडे त्याचे उत्तर आहे काय?

शिव-गणेशाच्या गोष्टीत झाकीर नाईक जे तर्कशास्त्र सांगतात, तेच वापरून आपल्याला याही प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. जसा शिवशंकर नावाचा हिंदू भगवान आपल्याच मुलांना ओळखू शकलेला नाही, तसा अल्लाहसुध्दा कोण मुस्लीम हे ओळखू शकत नसावा. अन्यथा त्याने निदान मुस्लिमांची मुस्लिमानेच कत्तल करू नये, असे प्रत्येक मुस्लिमाला समजावून सांगितले असते. पण आजच्या स्थितीत कोण खरा मुस्लीम आहे आणि त्याला कसे ओळखावे, हा यक्षप्रश्न अल्लाहलाही सतावत असेल. अन्य मुस्लिमांचे सोडून द्या, खुद्द झाकीर नाईक जे काही बडबडतात, तोच खरा इस्लाम आहे काय? तो तपासून बघायला व त्यातल्या चुका दाखवायला तो ईश्वर अवतरला, तर त्याने नाईकना तरी कसे ओळखावे? झाकीर नाईक गोल विणलेली टोपी घातलेले म्हणून? तशी टोपी तर इफ्तार पाटर्या देणारे केजरीवाल किंवा कोणीही घालून फिरत असतात. टोपी घातली म्हणून कोणाला मुस्लीम अशी ओळख मिळत नाही, की त्याला तितक्या पेहरावाने ओळखता येणार नाही. म्हणून झाकीर नाईक अल्लाहच्या नावाने कुठल्याही थापा ठोकायला मोकळे असतात. मग समोर बसलेले सुखावतात आणि टाळया पिटतात. दादा कोंडके यांच्या त्या वगनाटयात मधू कडू जसा आपल्याविषयी तुकोबांनी इतके काही लिहून ठेवले, म्हणून असाच भारावून जायचा, त्यापेक्षा नाईक यांनी भारावून टाकलेल्यांनी मनःस्थिती किंचितही वेगळी नसते. आपल्या गळयात हार घालून कत्तलखान्याकडे धावत सुटलेल्यांना कुठला ईश्वर किंवा राखणदार वाचवू शकत नसतो. कोणाला झाकीर नाईक यांच्याकडून बुध्दीने हलाल व्हायला आवडते, तर कोणाला बुऱ्हान वानीकडून मरायला आवडते, इतकाच काय तो फरक असतो.